अनोखा देश

आशिया खंडातील इस्राईलची राजधानी जेरुसलेम ही असून त्या देशाची लोकसंख्या ७८ लाख ८१ हजार आहे. प्रमुख भाषा हिब्रू व अरबी आहे.
Dome of the Rock
Dome of the RockSakal

‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकरबर्ग, ‘ओरॅकल’ कंपनीचे संस्थापक लॅरी एलिसन, अमेरिकेतील प्रसिद्ध राजकारणी व ‘ब्लूमबर्ग’ कंपनीचे संस्थापक मायकल ब्लूमबर्ग, ‘गूगल’चे संस्थापक सर्जे ब्रिन आणि लॅरी पेज, ‘डेल’ कंपनीचे संस्थापक मायकल डेल, जगप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग, प्रसिद्ध गायक बॉब डॅलन व विलक्षण बास्केटबॉलपटू ओम्री कॅस्पी यांची नावं किंवा यांच्याबद्दलची माहिती तुम्ही कधी ना कधी वाचली असेल. गूगल व फेसबुक हे तर आपल्या आयुष्याचा भागच होऊन गेलेले आहेत...पण आजच्या सदरात या सगळ्यांबद्दल मी हे का सांगतोय, असा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. या सगळ्या व्यक्ती अब्जाधीश अथवा कोट्यधीश तर आहेतच; शिवाय, जगभरातील असंख्य लोकांसाठी ती प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वंही आहेत. मी तर यांना Powerful व Influential लोक असंच म्हणेन. या सगळ्यांनी अफलातून कामं करून लोकांच्या मनावर काही दशकांपासून राज्य केलं आहे. फारच भारी अन् भन्नाट लोक आहेत. खरं तर या सगळ्यांमध्ये एक साम्य आहे व ते म्हणजे, जगभरात विखुरलेल्या या सगळ्या व्यक्ती ज्यू (Jewish) समाजातील आहेत. हे ज्यूबांधव आर्थिक क्षेत्रात जगावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे राज्य करतात असंच म्हणावं लागेल.

तर मित्रांनो, ज्यूंच्या इस्राराईल (Israel) या देशाबद्दल आज मला तुम्हाला सांगायचं आहे.

हा ज्यू समाज परंपरा, संस्कृती, भाषा व खाद्यसंस्कृती याबद्दल प्रेम बाळगणारा आहे. अस्मिता सतत जागती ठेवून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू असते. कायम प्रयोगशील असणारे हे लोक आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन. नावीन्याचा व पूर्वजांचा शोध घेणारे हे लोक आहेत. इस्राईलला ता. १४ मे १९४८ रोजी ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्य मिळालं. सन १९४९ मध्ये या देशाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला. तेव्हापासून ते आतापर्यंत विविध राष्ट्रांच्या धोरणांशी किंवा विचारसरणींशी अनेकानेक प्रसिद्ध ज्यू व्यक्ती संबंधित राहिल्या आहेत; परंतु माणूस नेहमी स्वत:चं कूळ अन् मूळ शोधत असतो.

डेव्हिड बेन-गुरियन यांनी, ज्यूंचा वेगळा देश असावा का, तो कुठं असावा, कसा असावा इत्यादी मुद्द्यांवर प्रबोधन व चळवळी उभ्या केल्या, त्यातूनच १९४८ ला इस्राईलची निर्मिती झाली. कट्टर समाजवादी असलेले, ज्यू असण्याचा अभिमान बाळगणारे; पण धार्मिक नसलेले डेव्हिड बेन-गुरियन हे या देशाचा चेहरा ठरले व पुढं १५ वर्षं पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं. या सर्व प्रक्रियेला ‘ज्यूंचं पुनरुज्जीवन’ असंच म्हणावं लागेल.

गेल्या सात-आठ दशकांपासून ते आजपर्यंत आपण इस्राईल-पॅलेस्टाइन हा संघर्ष पाहत आहोत. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये हा वाद विकोपला गेला आहे. लवकरच हे सारं शांत होईल अशी आशा आपण बाळगू या.

आशिया खंडातील इस्राईलची राजधानी जेरुसलेम ही असून त्या देशाची लोकसंख्या ७८ लाख ८१ हजार आहे. प्रमुख भाषा हिब्रू व अरबी आहे. तिथं वर्षभरात कुठल्याही काळात पर्यटन करता येण्याजोगं असतं. भारत-इस्राईलचे विविध कारणांमुळे वर्षानुवर्षांचे संबंध आहेत. गंमत म्हणजे, भारतासारखंच इस्राईलमध्ये उत्तरेत बर्फ पडतं, तर दक्षिणेत वाळवंटी जमीन आहे. इस्राईलनं कृषिक्षेत्रात खूपच प्रगती केली असून, यासंबंधात भारताशी काही करार झाल्यामुळे त्याचा भारताला नक्कीच फायदा झाला. शेतीतील प्रयोग, जोडव्यवसाय व तंत्रज्ञानाची साथ यांमुळे भारतात शेतीच्या उत्पन्नात वाढ झाली. या सर्व प्रक्रियेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे.

इस्राईलमध्ये हजारो मराठी-भारतीय ज्यूबांधव राहतात. ‘बेने इस्राईल’ (Bene Israel) म्हणून ओळखले जाणारे अनेक ज्यूबांधवही भारतात वास्तव्याला आहेत. तसं पाहायला गेलं तर कॅनडा-अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडपर्यंत ज्यू समाज पसरलेला आहे. त्या सगळ्यांसाठी सन २०१८ पासून ‘लॉ ऑफ रिटर्न’ हा नियम तयार करण्यात आला असून जगभरातील ज्यूंसाठी इस्राईलची दारं कायम खुली आहेत. जागतिकीकरणाच्या या युगात व्यक्तिश: मला असं वाटतं, की मराठी माणसानं ज्यू लोकांशी स्पर्धा करून नवनवीन क्षेत्रात पाऊल ठेवावं!

इस्राईल आणि पॅलेस्टाईन या देशांत पवित्र धार्मिक स्थळं, पुरातत्त्‍वीयदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तू, भव्य शहरं आणि उल्हसित करणारं निसर्गसौंदर्य आहे. कलात्मक गोष्टी, व्यवसायासाठी लिबरल हब्ज्, लांबच लांब समुद्रकिनारे आणि आध्यात्मावरचे देखावे ही तिथली काही ठळक वैशिष्ट्यं. अरब आणि ज्यू संस्कृतीतील बऱ्याच गोष्टी इथं पाहायला मिळतात. जेरुसलेम येथील जुन्या शहराचं चार भागांत (Four Quarters) विभाजन केलं गेलेलं आहे. अर्मेनियन (Armenian), ख्रिश्चन (Christian), ज्यूईश (Jewish) आणि मुस्लिम (Muslim). सन १९८१ मध्ये या जुन्या शहराचा समावेश ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत करण्यात आला. दुर्दैव म्हणजे List of World Heritage in Danger मध्येदेखील त्याचा समावेश आहे.

जेरुसलेम इथला सोन्याचा चमकदार डोम ऑफ द रॉक (Dome of the Rock), शहराच्या थोडासा बाहेर असलेला मर सबा मठ (Mar Saba Monastery), द वेस्टर्न वॉल (The Western Wall), चर्च ऑफ द होली सेपलकर (Church of the Holy Sepulchre), टेम्पल माऊंट (Temple Mount), टॉवर ऑफ डेव्हिड, अल्-अक्सा मशीद (Al-Aqsa Mosque), जुन्या शहराचं प्रवेशद्वार - दमास्कस गेट (Damascus Gate), वॉल्स ऑफ जेरुसलेम, द इस्राईल म्युझियम (The Israel Museum) व अशी इथं बरीच प्रेक्षणीय स्थळं पाहण्यासारखी आहेत.

इस्त्राईलचं दुसरं महत्त्वाचं शहर म्हणजे तेल अवीव (Tel Aviv). तिथं सुंदर समुद्रकिनारे आणि जबरदस्त नाईटलाईफ आहे. The city that never sleeps, असे तेल अवीवचं वर्णन केलं जातं.

धार्मिक स्थळांना भेट देण्यात काही पर्यटकांना तितकीशी रुची नसते. अशांसाठी काही निसर्गस्थळं आहेत, त्यांपैकीच एक ‘मृत समुद्र’ (Dead Sea). या समुद्रात कुणी बुडत नाही. त्यामुळे इथं डुबक्या मारण्याचा आनंद मनमुराद घेता येतो. या मृत समुद्राचं वर्णन World’s most wacky natural wonder व Lowest place on earth असं केलं जातं. हा समुद्र खनिजसमृद्ध व अतिखारट आहे. या अशा पाण्यात तरंगत राहणं हा पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो.

याशिवाय, अक्को (Akko), मसाडा (Masada), सी ऑफ गॅलिली (Sea of Galilee), वाळवंटी टिम्ना पार्क (Timna Park), बेथलेहेम (Bethlehem) व हैफा (Haifa) ही काही ठिकाणं व शहरं बघण्यासारखी आहेत. जेरुसलेममध्ये इतिहास आहे, तर तेल अवीव हे आधुनिक शहर आहे, म्हणून बहुसंख्य बजेट ट्रॅव्हलर्स हे उत्तरेतल्या हैफाला जाऊन काही दिवस निवांत घालवतात. खाण्या-पिण्यासाठी गरम ब्रेड-हमस (Hummus) व इस्राइली वाईन्स हे उत्तम पर्याय!

तर मित्रांनो, कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. हळूहळू भारतातील व जगभरातील पर्यटन काही नियमांसह खुलं होईल. अर्थात्, लसीकरण करूनच फिरायचं. कोरोनाच्या या महामारीच्या काळात आयुष्याची किंमत आपल्या सर्वांनाच समजली आहे. तर, थोडा वेळ काढून आपल्या व्यग्रतेतून ब्रेक घेऊ या आणि भटकंती करू या. ‘बजेट ट्रॅव्हल’ व ‘डू इट युवरसेल्फ’ हे डोक्यात कायम असू द्या. कुठंही जाण्यापूर्वी मित्रमंडळींशी किंवा अनुभवी लोकांशी चर्चा करू या आणि कुठंही फिरत असताना नवनवीन संधी शोधू या. संकटातच संधी शोधून तिचं सोनं करायचं असतं हे कायम लक्षात ठेवून ‘जिंदगी वसूल’ करू या!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com