चला बेटावर...!

‘मलय द्वीपसमूहां’पैकी असलेलं फिलिपिन्समधील एक बेट.
‘मलय द्वीपसमूहां’पैकी असलेलं फिलिपिन्समधील एक बेट.

पृथ्वी...आपलं घर...हे आपण सारे जाणतोच. वातावरणात भरपूर मुक्त ऑक्सिजन, पृष्ठभागावर महासागर आणि सुरक्षित जीवनाची हमी असा हा एकमेव ग्रह. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अंदाजे ७१ टक्के भाग हा जलव्याप्त असून त्यातील बहुतेक भाग हे महासागरात आहेत. जगातल्या १९६ देशांपैकी किती तरी देश चहूबाजूंनी पाण्यानं वेढलेले आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे त्यातील काही देशांच्या अस्तित्वाला धोकाही निर्माण झाला आहे; परंतु हे देश लांब समुद्रकिनारपट्टीमुळे फारच सुंदर असून तिथं पर्यटकांची वर्दळ कायमच असते. यातील काही देश हे द्वीपसमूहांनी तयार झालेले आहेत. द्वीपसमूह (Archipelago) म्हणजेच पाण्याच्या मोठ्या भागावर असलेल्या अनेक बेटांचा एक गट. ही मुळात सागरी बेटे असून, ती द्वीपश्रृंखला किंवा विखुरलेल्या बेटांचा समुच्चय आहेत. बहुतेक द्वीपसमूह हे महासागरातील बेटांनी तयार झालेले आहेत. याचा अर्थ समुद्रातून ज्वालामुखी फुटल्यामुळे बेटांची निर्मिती झाली. सागरी बेटांनी बनलेल्या द्वीपसमूहाला ‘आयलंड आर्क’ (Island Arc) असंही म्हणतात. 

जगातील सर्वात मोठा ‘मलय द्वीपसमूह’ (Malay Archipelagos) हिमनदीच्या माघारानंतर (Glacial Retreat) तयार केला गेला. पॅसिफिक आणि हिंदी महासागराच्या मध्यभागी असलेल्या ‘मलय’ द्वीपसमूहात आग्नेय आशियातील २५ हजारहून अधिक बेटं आहेत. इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि मलेशियाची हजारो बेटं ही मलय द्वीपसमूहातील एक भाग आहेत. मलय द्वीपसमूहांनंतर ‘कॅनेडियन आर्क्टिक द्वीपसमूह’ (Canadian Arctic Archipelago) हा क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा द्वीपसमूह आहे आणि यात ३५ हजार ५६३ बेटांचा समावेश आहे. हा द्वीपसमूह ‘आर्क्टिक द्वीपसमूह’ म्हणूनही ओळखला जातो.

त्यानंतर ‘न्यू गिनी द्वीपसमूह’ (New Guinea Archipelago) हे ग्रीनलँडशेजारील जगातील दुसरं सर्वात मोठं बेट आहे आणि क्षेत्रफळानुसार हा तिसरा द्वीपसमूह आहे. त्याचबरोबर जपानी द्वीपसमूह (Japanese Archipelago), ब्रिटिश आधिपत्यित बेटे (British Isles), न्यूझीलंड (New Zealand), अँटिल्स (Antilles), नोवाया झेमल्या (Novaya Zemlya), स्वालबार्ड (Svalbard), सरनाया झेमल्या (Sernaya Zemlya) असे मोठे दहा द्वीपसमूह आहेत. 

मी आज मलय द्वीपसमूहातील फिलिपिन्सबद्दल सांगणार आहे. फिलिपिन्ससारखं उष्णकटिबंधीय राष्ट्र (Tropical Nation) हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा द्वीपसमूह आहे. तो सात हजार ६४१ बेटांनी तयार झालेला आहे. पॅसिफिक महासागरात हा द्वीपसमूह विखुरलेल्या दागिन्यांप्रमाणे दिसतो. पाम झाडं, कोरल रीफ इथं मोठ्या प्रमाणात आढळतात अन् त्यामुळेच असंख्य प्रवासी फिलिपिन्सला भेट देतात. 

आता त्याची ओळख ‘आशियातील सर्वात मोठा कॅथॉलिक देश’ म्हणूनही झपाट्यानं होत आहे. सांस्कृतिकदृष्ट्या हा देश ‘अमेरिकन ब्रेव्हाडो’सारखा आहे,  म्हणजे येथील लोकांचा आत्मविश्वास हा अमेरिकेतील लोकांसारखा आहे असं समजलं जातं! चीनच्या विविध उद्योगांनीही इथली बाजारपेठ व्यापलेली आहे. थोडंफार आदिवासी वातावरण, तसंच स्पॅनिश गूढवादही इथं दिसतो. प्रवाशांसाठी कोरल समुद्रकिनारे, ज्वालामुखी आणि वर्षावने अशी आकर्षित करणारी ठिकाणं खूप मोठ्या संख्येनं इथं आहेत.

व्हिएतनामयुद्धामुळे फिलिपिन्सला विकसित होण्यात काही अडचणी निर्माण झाल्या आणि दुष्परिणामही भोगावे लागले. गेल्या काही दशकांपासून परिस्थिती बदलेली दिसते. ‘वॉटरस्पोर्टस्’ ही संकल्पना इथं सध्या जोर धरू लागली आहे. ‘डीप सी डायव्हिंग’ आणि ‘सर्फिंग’साठी पर्यटक इथं गर्दी करतात. याविषयीच्या कोर्सचा कालावधी कमीत कमी तीन दिवस व जास्तीत जास्त महिना असा असतो. 

फिलिपिन्सला ३६ हजार किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली असून  स्वच्छ-सुंदर शुभ्र वालुकामय किनारे इथं आहेत. या देशात आयलंड हॉपिंग (Island Hopping) हा प्रकार लोकप्रिय आहे. म्हणजे, एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाणं, तिथं फिरणं आणि पुन्हा तिसऱ्या-चौथ्या...असं करत करत अनेक बेटांना एकाच छोट्या सहलीदरम्यान भेट देणं. हा असा प्रकार प्रवाशांना आवडतो. वादळाचा कालावधी सोडला तर ऑक्टोबर ते मे महिना असा इथं फिरण्याचा हंगाम आहे. 

फिलिपिन्समध्ये बोहोल (Bohol) हे दहावं मोठं बेट असून त्याच्या भोवती ७५ लहान लहान बेटं आहेत. कोरड्या ऋतूत जिथल्या टेकड्यांवरील गवताचा रंग तपकिरी होतो अशा एक हजार २७० हून अधिक टेकड्यांची विशिष्ट भौगोलिक रचना बोहोलमधील ‘द चॉकलेट हिल’ या ठिकाणी पाहायला मिळते. दक्षिण फिलिपिन्स मध्ये ‘टार्सियर’ हा जगातला सर्वात लहान असा सस्तन प्राणी आढळतो.

बोराके (Boracay) या मध्य फिलिपिन्समधल्या ठिकाणी सुंदर किनारे, विविध लँडस्केप्स पाहायला मिळतात. इथल्या निवडक पाककृतीही उत्तम असतात. उत्तर फिलिपिन्समध्ये बागुईओ (Baguio) हे १५ डिग्रीच्या खाली तापमान असलेलं थंड हवेचं निसर्गरम्य ठिकाण आहे. ‘द व्हॅली ऑफ कलर्स’ हे इथलं मुख्य आकर्षण. इथं एका डोंगरावर रंगीबेरंगी घरांची सामुदायिक कलाकृती साकारलेली आहे. 

मनिला ही फिलिपिन्सची राजधानी. तीन लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या देशाची लोकसंख्या दहा कोटींच्या आसपास आहे. फिलिपिनो महिला या फार कष्ट करणाऱ्या असून, त्या विविध व्यवसायांत तर दिसतातच; परंतु अवतीभवतीच्या अनेक देशांत त्या नोकरीसाठीही जातात. पाश्चिमात्य देशांपेक्षा आग्नेय आशियातील तैवान, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, इंडोनेशिया, कंबोडिया, श्रीलंका, तिमोर-लेस्टे अशा साध्या लोकांच्या देशांविषयी मला जास्त कुतूहल आहे. प्रवासात माणसांना भेटणं, त्यांच्याशी नातं तयार करणं, विचारांची देवाण-घेवाण होणं, स्थानिक ठिकाणी जास्तीत जास्त फिरणं आणि ऋणानुबंध निर्माण करून ते आयुष्यभर जपणं म्हणजे खऱ्या अर्थानं ‘प्रवासी’ होणं होय...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com