कधी कधी ‘अशाही’ ठिकाणी जा...

cambodia
cambodia

व्हिएतनाम-अमेरिकायुद्ध सर्वपरिचित आहे. त्याची झळ शेजारच्या कंबोडियालादेखील बसली होती. शांततेचं आश्वासन दिलं जाऊनही तिथं शांतता कधी प्रस्थापित झालीच नाही. कृषिप्रधान समाज निर्माण करण्याच्या नादात हुकूमशाह पोल पॉट याच्या आदेशानुसार, एक चतुर्थांश लोक तिथं मारले गेले. तिथं शिक्षण आणि स्वतंत्र विचार बेकायदेशीर होते. नागरिकांना कामगारछावण्यांमध्ये कामाला पाठवलं जात होतं. शिक्षक, डॉक्टर, राजकारणी आणि इतर सुशिक्षित नागरिकांना तुरुंगात डांबलं जायचं आणि नंतर छावण्यांमध्ये नेऊन त्यांना ठार मारलं जायचं. छोट्या, गरीब देशातली ही सर्वाधिक कठीण अशी चार वर्षं!

तब्बल १७ लाख लोकांना तिथं मारलं गेलं. कुणी उपासमारीमुळे मेलं, तर कुणी आजारपणामुळे. काही जणांचा अनेक दिवस शारीरिक छळ केला गेला, तर काहींचा जीव थेट घेतला गेला.

छळछावणीचं हे ठिकाण कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह पासून १७ ते २० किलोमीटरवर आहे. तिथं S-२१ नावाची मोठी छावणी होती. तिथं अनेकांना डांबलं गेलं होतं. आज त्या ठिकाणी एक स्तूप असून, १० हजार लोकांची हाडं व कवट्या जतन करून ठेवलेल्या आहेत. भूतकाळात काय घडलं याची माहिती  तिथल्या नव्या पिढीला व्हावी असं तिथल्या काही लोकांना वाटल्यामुळे हे अनोखं स्मारक बांधलं गेलं आहे. त्यातून नव्या पिढीनं काही बोध घ्यावा ही त्या लोकांची इच्छा आहे. इतिहास जाणून घेतल्याशिवाय पुढची वाटचाल करता येत नाही. कंबोडियातल्या ‘द किलिंग फील्ड्स : चोइंग एक’ या ठिकाणी गेल्यावर सुन्न व्हायला होतं. ही सर्वात भयंकर जागा आहे, म्हणूनच मला वाटतं की, प्रत्येकानं तिथं गेलं पाहिजे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रवास करत असताना आनंद मिळणाऱ्या ठिकाणीच नेहमी का जायचं? कधी कधी अशाही ठिकाणी जायला हवं, जिथं गेल्यावर आपला संवाद किंवा आपला वाद आपल्याशीच झाला पाहिजे! असंख्य प्रश्न मनात निर्माण झाले पाहिजेत. राजवटी व राजे-महाराजे असे का वागले असावेत? सत्तेसाठी कोण कुठल्या थराला जाऊ शकतं याची कल्पना अशा ठिकाणी गेल्यावर येते. भूतकाळातल्या घटनांविषयीचे असे वेगवेगळे विचार मनात येऊ लागल्यावर त्यासंदर्भानं वर्तमानातीलही काही उत्तरं सापडू लागतात. 
मी त्या ठिकाणी तीन-चार तास घालवले; पण हा सगळा कालावधी मी अगदी निस्तब्ध होतो.

पर्यटकांसाठी तिथं दीड तासाची ‘ऑडिओ टूर’ असते. ज्यांनी हिंसाचार, अत्याचार पाहिला-अनुभवला आहे त्यांच्या आवाजात तो इतिहास ऐकणं हा एक वेगळाच अनुभव आहे असं मला वाटतं. कधी डोळ्यात पाणी येतं, तर कधी अंगावर काटा येतो. ५० वर्षांपूर्वी काय घडलं असावं हे डोळ्यांपुढं उभं राहतं. 

कंबोडिया देशच वेगळा आहे. एकीकडे ९०० वर्षांचा इतिहास असलेलं ‘अंकोर मंदिर’, तर दुसरीकडे ४० वर्षांपूर्वीचं ख्मेर शासन अन् त्याची क्रूरता. हे विरोधाभासी दृश्य बघायला असंख्य पर्यटक तिथं भेट देतात. कुठल्याही देशाचा इतिहास जाणून घेतल्याशिवाय तिथलं वर्तमान अन् भविष्य कसं असलं पाहिजे याबद्दल ठोस उपाययोजना करता येत नाहीत. 

‘चोइंग एक’ हे तिथलं ठिकाण आज एक शांततामय असं ठिकाण आहे. ख्मेर राजवटीत ज्यांनी मोठ्या प्रमाणात दुःख-अत्याचार सहन केले त्यांना तिथं आदरांजली वाहिलेली आहे. ही जागा बघण्यापेक्षा अनुभवायला हवी असं मला वाटतं. पोलंड व रवांडा या दोन देशांतही असाच काहीसा इतिहास आहे आणि अशीच काही ठिकाणं तिथंही आहेत. 

मी कधीतरी तिकडेही जाईन. आपण एका चौकटीत राहून आनंद व समाधान शोधत असतो; परंतु जीवन हे सुख-दु:खांचं पॅकेज आहे हेच अंतिम सत्य आहे. त्यामुळे ‘जिंदगी वसूल’ करत असताना जर वास्तवाचं भान असेल तर आपला सर्वांगीण विकास होऊ शकतो. तुम्ही जर कधी कंबोडियाला गेलात तर या ठिकाणी जायला विसरू नका.
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून, ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com