श्रीलंका : प्रेमात पडावं असा देश

प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com
Sunday, 21 February 2021

जिंदगी वसूल
‘तुमच्यातील जिज्ञासापुरुष जिवंत ठेवा...!’ असं ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे सर नेहमी म्हणतात. थोडक्यात काय तर, ‘क्युरिऑसिटी फॅक्टर’ हा कायम पाहिजे. जितके प्रश्न विचारू, जितकी त्यांची उत्तरं शोधू, जितकी चिकित्सा करू तितके समृद्ध होत जाऊ.

‘तुमच्यातील जिज्ञासापुरुष जिवंत ठेवा...!’ असं ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे सर नेहमी म्हणतात. थोडक्यात काय तर, ‘क्युरिऑसिटी फॅक्टर’ हा कायम पाहिजे. जितके प्रश्न विचारू, जितकी त्यांची उत्तरं शोधू, जितकी चिकित्सा करू तितके समृद्ध होत जाऊ. आपण या पृथ्वीवरचे थोड्या वर्षांचे पाहुणे आहोत याचं भान पाहिजे आणि तसंच जगलंही पाहिजे असं वाटतं. 

आज थोडा वेगळा विषय मांडायचाय. पर्यटनस्थळं भारतात कमी आहेत असं अजिबात नाही; परंतु आपल्याला ती नीट ‘मार्केट’ करता येत नाहीत हे मात्र खरंय. भारताचाच लहान भाऊ म्हणजे श्रीलंका! लहान देश; पण छोट्या छोट्या जागा त्यांनी ‘मार्केट’ केल्या. प्रत्येक ठिकाणी त्या जागा बघण्यासाठी काही ना काही तिकीट आहेच. आपण भारतीय लोक व सरकार अजून तरी पर्यटनाकडे तितक्या गांभीर्यानं बघत नाही. भारताकडे सौंदर्यसंपत्ती भरपूर आहे; परंतु ती नीट चॅनलाईज् व मॉनिटाईज् करता आली पाहिजे. स्वच्छता, चांगले रस्ते, सुविध इत्यादी गोष्टी नीट असल्या की पर्यटकांना ते आवडतं. ‘वर्ड ऑफ माऊथ’ नं लोक देशात येत असतात, त्यामुळे जागतिक पातळीवर आपलं रिप्रेझेंटेशन नीट झालं पाहिजे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

युरोपीय पर्यटक श्रीलंकेला जरा जास्तच येतात. काही तर कित्येक महिने राहतात. तुलनेनं भारतीय पर्यटक तिथं फार कमी दिसतात. जवळपास आपण सगळेच भारतीय लोक श्रीलंकेला कमी लेखतो असं माझं प्रामाणिक मत आहे; पण एकदा तिथं जाऊन तर बघा...पुनःपुन्हा जावंसं वाटेल असं ते छोटंसं सौंदर्यपूर्ण बेट आहे.

पूर्वी ‘सिलोन’ या नावानं ओळखला जाणारा हा देश प्राचीन संस्कृतीचा अभिमान बाळगणारा आहे. सोनेरी वाळूचे समुद्रकिनारे, नारळ, पाम, डोंगर आणि चहाच्या बागांनी हा देश बहरलेला आहे. या बेटावर ज्यांनी राज्य केलं ते पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश यांची वासाहतिक वास्तुकला इथं दिसते. श्रीलंकेत बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव आहे. 
श्रीलंकेतील जैववैविध्य एकदम वेगळं आहे. खूप प्राणी-पक्षी, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, जंगलं तिथं आहेत. 

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

बौद्ध लेण्या, गौतम बुद्धांचे पुतळे, डोंगर-दऱ्या, धबधबे, थंड हवेची ठिकाणं व जागतिक वारसा असलेली ठिकाणं या सगळ्यांनी ‘श्रीलंका’ खऱ्या अर्थानं ‘श्रीमंत’ आहे. प्राचीन शहरी नियोजनाचं इथलं सर्वोत्कृष्ट संरक्षित उदाहरण म्हणजे ‘सिगिरिया रॉक’ हे युनेस्कोनं मान्यता दिलेलं जागतिक वारसा ठिकाण. सिगिरिया इथं काही प्राचीन पेंटिग्ज् आहेत. या चित्रांचं भारतातील अजिंठा लेण्यांमधल्या चित्रांशी मोठंच साम्य आहे. 
तिथं तीन मुख्य गार्डन असून त्यांत काही ठिकाणी तळी आहेत. सिगिरियावरून हे दृश्य अप्रतिम दिसतं. स्थानिक लोक त्याला ‘जगातील आठवं आश्चर्य’ असं म्हणतात!

श्रीलंकेत सहा ‘जागतिक वारसा साईट’ असून जगभरातील प्रवासी या ठिकाणांना भेट देतात. कॉस्मोपॉलिटन कोलंबोला श्रीमंत वसाहतींचा वारसा आहे. अनुराधापुरा इथले बौद्ध स्तूप, त्रिंकोमालीचा समुद्रकिनारा आणि युद्धस्मारक, डंबुला शहरातील डंबुलागुंफा अन् याच परिसरातील डंबुला पपई प्रसिद्ध आहे. नुवारा इलिया व कॅंडी हे थंड हवेचं ठिकाणं असून ते छोटेखानी शहर आहे. कॅंडी येथून ‘वर्ल्डज् मोस्ट सिनिक् ट्रेन ट्रिप्स’ ही रेल्वे एल्लाच्या दिशेनं जाते. एल्ला इथं रावणगुंफा व रावणप्रपात आहेत. ‘ॲडम्स पीक’ला ट्रेकिंगसाठी जाता येतं. बरेच परदेशी प्रवासी तिथं स्थायिक झाले असून व्यवसाय करतात. वन्यजीव अभयारण्य असलेल्या ‘याला नॅशनल पार्क’ इथं अन्य जंगली प्राण्यांसह बिबटे आहेत. श्रीलंका वन्यजीव संरक्षण विभागानं १९७५ मध्ये ‘पिन्नावाला हत्ती अनाथाश्रमा’ची स्थापना केली असून जगातील सर्वात मोठा कळप तिथं आहे. बेंटोटा, अरुगम बे, मिरिसा, मटारा, वेलिगामा अशा सुप्रसिद्ध समुद्रकिनारी विविध वॉटर स्पोर्टस् खेळता व अनुभवता येतात. अप्रतिम असं डच व पोर्तुगीज आर्किटेक्चर असलेल्या गॉल या ठिकाणी गेल्याशिवाय श्रीलंकेची सफर पूर्णच होऊ शकत नाही.

श्रीलंकेला ‘बजेट ट्रिप’ नक्कीच होऊ शकते. तिथं काही दिवस राहून निवांत फिरता आलं पाहिजे असं नियोजन मात्र करता यायला हवं. श्रीलंकेचे नागरिक भारताला मोठा भाऊ मानतात. पाहायला गेलं तर ‘पैसा वसूल’ म्हणजेच ‘जिंदगी वसूल’ देश आहे सोन्याची श्रीलंका! भारतीय म्हणून आपण पाकिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका हे आपले शेजारीदेश फिरलेच पाहिजेत. 

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pradnyesh molak writes about Sri lanka