‘डार्क’ देश

सीरियाची संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. समृद्ध, कलात्मक आणि सांस्कृतिक वारसा या देशाला लाभलेला आहे.
‘डार्क’ देश

With age, comes wisdom. With travel, comes understanding...कॅनडास्थित सुप्रसिद्ध लेखिका सॅंड्रा लेक यांची ही उक्ती. बघा ना, आपल्या सगळ्यांच्या कुटुंबातील बहुतेक वृद्धमंडळींना अनुभवातून शहाणपण (Wisdom) आलेलं असतं; परंतु आपल्यात समजूतदारपणाही (Understanding) आणायचा असेल तर प्रवास करत राहिलं पाहिजे असं सॅंड्रा म्हणतात. मी या मताशी पूर्णपणे सहमत आहे. तुम्ही जर कायम प्रवास करणारे असाल तर तुम्हालाही हे पटेल. प्रवास हे एक प्रकारचं चालतं-बोलतं विद्यापीठच असतं. खरं तर आपण सगळेच एकेकाळी भटके लोक होतो; काही ना काही कारणानं आपण एका ठिकाणी स्थिर होण्याकडे वळलो, असं मी मागं एकदा म्हणालो होतो. थोडक्यात काय तर, आपण ‘सेटल’ झालो. जिथं सेटल आहोत तिथून फिरायला का होईना पण - कोरोनाच्या या महामारीनंतर - बाहेर पडायचंय असं अनेकांना वाटू लागलं आहे. आता येत्या काही महिन्यांत आपल्याला नक्कीच प्रवास करता येईल व त्यातूनच अधिक समजूतदारपणा येईल अशी खात्री वाटते.

तर मित्रांनो, आज २० जून २०२१ रोजी ‘जागतिक निर्वासितदिन’ (World Refugee Day) आहे. जगाची लोकसंख्या ७५० कोटी असून अनेक लोक स्थलांतर करत राहतात, त्यामुळे नातेसंबंध तर जोडले जातातच व शांतताही प्रस्थापित होण्यास मदत होते; पण स्थलांतरित व निर्वासित यांत फरक आहे आणि निर्वासित लोकांचा फार मोठा संघर्ष असतो हे मात्र कुणीच नाकारू शकत नाही. काही प्रसंग किंवा कठीण अडचणींमुळे लोक स्थलांतरित किंवा निर्वासित होत राहतात. निर्वासित लोकांना इंग्लिशमध्ये Refugees हा शब्द आहे. सध्या जगातील कुठल्या देशातील लोक जास्त निर्वासित होतात? तर या देशाचं नाव आहे ‘सीरिया’. स्वाभाविकपणे सीरिया म्हटलं तर ‘वॉर’, ‘डेंजर’ किंवा ‘डार्क’ असंच समोर येतं.

गेल्या दशकातील Global Refugee Population चा आकडा पाहिला तर जगातील २५ टक्के निर्वासित लोक हे सीरियातले आहेत. सन २०२० च्या आकडेवारीनुसार, तब्बल ६६ लाख सीरियन हे जगातील १२६ देशांमध्ये निर्वासित झाले आहेत.

ता. १५ मार्च २०११ पासून सरकार व विविध गट यांच्यात ‘सीरियन गृहयुद्ध’ (Syrian Civil War) सुरू झालं. इराण, रशिया, तुर्कस्तान व अमेरिका या देशांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारे सीरियन गृहयुद्धात भाग घेतला आहे. जवळपास तीन लाख ८० हजार लोक तिथं मारले गेले. त्यांत एक लाख सोळा हजार ९११ हे तिथले नागरिक होते. अर्थात्, हा आकडा कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात तो आकडा वेगळा किंबहुना अधिक असू शकतो, त्यामुळे तिथं पर्यटनासाठी जाण्याचं धाडस सहसा कुणी करत नाही; परंतु सीरिया आता पुनरुज्जीवनाच्या दिशेनं वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाही. म्हणून, ज्यांना इच्छा आहे किंवा ज्यांना आयुष्यात थ्रिल हवंय असे पर्यटक नक्कीच तिथं जाऊ शकतात. भविष्यात सीरियापुढं काय मांडून ठेवलं आहे याची कल्पना करणं तसं अशक्य आहे. तरीही मला वैयक्तिकरीत्या पश्चिम आशियाबद्दल (Middle East) विशेष आकर्षण आहे. गेल्या आठवड्यातील सदरात मी पश्चिम आशियातीलच इस्राईल या देशाबद्दल लिहिलं होतं. त्याच इस्राईलच्या ईशान्य बाजूला सीरिया आहे. सीरियाच्या उत्तरेला तुर्कस्तान, पूर्व बाजूला इराक, दक्षिणेकडे जॉर्डन, पश्चिमेला समुद्रकिनारपट्टी, तर नैर्ऋत्येला लेबनॉन व इस्राईल आहे. सीरियाची लोकसंख्या पावणेदोन कोटी असून दमास्कस (Damascus) ही देशाची राजधानी आहे. अरबी ही तिथली प्रमुख भाषा आहे.

सीरियाची संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. समृद्ध, कलात्मक आणि सांस्कृतिक वारसा या देशाला लाभलेला आहे. त्याच्या प्राचीन मुळांपासून ते अलीकडील राजकीय अस्थिरता व सीरियन गृहयुद्धांपर्यंत या देशाचा प्रवास गुंतागुंतीचा आणि गोंधळाचाही राहिला आहे. मी जरी या देशात गेलेलो नसलो तर तिथं जायला मी उत्सुक आहे. कारण, जगातील अनेक देश असे अशांत आहेत आणि तिथं लोक जातात. अस्थिरता असलेल्या अशा देशात तुम्हाला जायचं असेल तर ‘भारतीय दूतावास’ला (Indian Embassy) विश्वासात घेऊन व त्याच्या मार्गदर्शनानुसार आपली मोहीम आखायची. त्याचा निश्चितच फायदा होईल.

Long Live Syria अशी घोषणा तिथले नागरिक देतात. मार्च, एप्रिल व मे हे महिने तिथं जाण्यासाठी सर्वोत्तम आहेत; पण इतर वेळीही आपण जाऊ शकतो. दमास्कस, अलेप्पो (Aleppo), तार्तस (Tartus), लट्टाकिया (Lattakia), पामिरा (Palmyra), होम्स (Homs), मालौला (Maaloula) व हमा (Hama) अशा विविध ठिकाणी प्रेक्षणीय स्थळं आहेत. दमास्कस, बोसरा (Bosra) व अलेप्पो या शहरांतील काही ठिकाणांना ‘युनेस्को’नं जागतिक वारसास्थळांचा दर्जा दिलेला आहे. जुनं दमास्कास अप्रतिम असून तिथं पायी फिरण्यानं समृद्ध अनुभव मिळू शकतो. दमास्कसला City of Jasmine असंही म्हटलं जातं. तिथंच उमय्यदकाळातील मशीद (Umayyad era Mosque), रोमनकाळातील टेम्पल ऑफ ज्युपिटर (Temple of Jupiter) व जगातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक चॅपेल ऑफ सेंट पॉल (Chapel of Saint Paul) पाहण्यासारखं आहे. बोसरा इथलं १५ हजारांची आसनक्षमता असलेलं रोमन थिएटर हेही प्रेक्षणीय स्थळ. ऐतिहासिक युफ्रेटस नदी (Euphrates River) ही पश्चिम आशियातील लांब नदी आहे. अलेप्पो व इडलिब (Idlib) या शहरांच्या दरम्यान ओसाड पडलेली सातशे गावं म्हणा किंवा वसाहती आहेत. या ग्रामसमूहाला ‘मृत शहरं’ (Dead Cities) म्हणून संबोधलं जातं.

साहसी प्रवास करण्याची वृत्ती असणाऱ्या पर्यटकांना सीरियन गृहयुद्धाच्या कहाण्या अनुभवण्यासाठी सीरियात जावंसं वाटतं. अशा पद्धतीच्या पर्यटनाला ‘वॉर टूरिझम’ किंवा ‘डार्क टूरिझम’ असं म्हटलं जातं.

तुर्कस्तान, कोलंबिया, पाकिस्तान, युगांडा व जर्मनी हे देश जास्तीत जास्त निर्वासित लोकांना स्वत:च्या देशात राहू देतात.

निर्वासित लोकांचं आयुष्य किती भयानक असेल याचा फक्त विचारच आपण करू शकतो. अजून एक विशेष बाब म्हणजे, तीन सीरियन निर्वासितांपैकी एक व्यक्ती ही पंधरा वर्षांच्या आतली असते. सीरियाला जाणं सोपं नाही व तिथं धोका आहे म्हणून तिथं जाणं हे धाडसाचंही म्हणावं लागेल. सीरिया सातत्यानं गृहयुद्धाच्या तडाख्यात सापडला असला तरी तिथल्या अविनाशी परंपरांपैकी प्रेमळ आदरातिथ्य, कथाकथन, गोड चहा, आगळ्यावेगळ्या चवदार पाककृती आणि समृद्ध कलात्मक संस्कृती या बाबी तिथं अद्यापही टिकून आहेत.

मला सीरियाला जायला नक्कीच आवडेल. आयुष्यात जसे सुख-दु:ख किंवा कडू-गोड प्रसंग येत राहतात, तसेच पर्यटनातही चांगले-वाईट अनुभव येत राहतात. त्यातूनच तर आपण विकसित व्हायचं असतं; किंबहुना त्यातूनच तर आपल्यात समजूतदारपणा येत असतो. त्यामुळे मित्र हो, वयानुसार अनुभवातून शहाणपण येईलच; पण समजूतदारपणा अवगत करायचा असेल तर येणाऱ्या काळात जगभरात कुठंही, कसाही व त्यातल्या त्यात ‘बजेट ट्रॅव्हल’ करून प्रवास करा...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com