esakal | आत्मशोधाची ‘वारी’
sakal

बोलून बातमी शोधा

Wari

आत्मशोधाची ‘वारी’

sakal_logo
By
प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com

महाराष्ट्राला संतविचारांची महान परंपरा आहे. महाराष्ट्रात भक्ती-शक्तीचा संगम दिसून येतो. संतविचारांमुळे अनेक पिढ्या प्रगल्भ झाल्या. सर्वच संत मानवधर्माचे प्रवर्तक होते व त्यांच्या अभंगांमधून लहान-थोरांना शिकवण मिळते.

वृक्ष-वल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षीही सुस्वरे आळवीती।

येणे सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुण-दोष अंगा येत।

आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे वास क्रीडा करू।

कंथाकमंडलू देह उपचारा। जाणवितो वारा अवसरू ।

हरिकथा भोजन परवडी विस्तार। करोनि प्रकार सेवू रुची।

तुका म्हणे होय मनाशी संवाद। आपुलाचि वाद आपणासी।

हा संत तुकाराममहाराजांचा अभंग पाहता सभोवतालच्या वातावरणाचा, पर्यावरणाचा अप्रत्यक्ष विचार यामध्ये दिसतो. ज्यांनी वृक्षांशीसुद्धा सोयरेपणाचं नातं जोडलं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साक्षात् वंदन. संत तुकाराममहाराजांनी वृक्षांशी नातं जोडून भावविश्व निर्माण केलं, मानवधर्म सांगितला. शेवटी निसर्गापुढं मानवाला लीन व्हावं लागतं. जीवन तृप्त होण्यासाठी आंतरिक ओढ व आनंद यांतच धन्यता असते. जेव्हा आपलाच आपल्या मनाशी संवाद अन् वाद होईल तेव्हा हे सारं साध्य करता येईल.

संत तुकाराममहाराज हे नक्कीच स्थलयात्री होते. तेच नव्हे तर, इतर संतही तसेच होते. प्रवास करता करता या साऱ्या संतांनी विवेकी विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. साडेसातशे वर्षांपूर्वी संत नामदेवमहाराज हे वारकरी धर्माचा प्रचार-प्रसार करत पंजाबला पोहोचले. संतपरंपरा, संतविचार हे दरवर्षी होणाऱ्या पंढरीच्या वारीतून वर्षानुवर्षं जपले जातात, पुढील पिढीतही रुजवले जातात. येत्या २० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षीही कुठलीच पायी वारी होऊ शकली नाही.

वारी म्हणजे एक ‘प्रवास’च आहे. एक असा प्रवास, ज्यामध्ये माणूस सर्व काही विसरून वेगळ्याच विश्वात जातो, अंतर्मनात डोकावून पाहतो.

मला या प्रवासवारीचं नेहमी आश्चर्य वाटायचं. आषाढीच्या निमित्तानं लाखो वारकरी ऊन्ह, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता पंढरीच्या दिशेनं निघतात. ही कोणती ऊर्जा असेल? वारकरी कसे राहत असतील? जेवण, राहणं, झोपणं हे सगळं कुठं करत असतील? अशा अनेक प्रश्नांनी माझ्या मनात घर केलं होतं. माझ्या आईच्या माहेराकडे संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीच्या चोपदारकीचा वंशपरंपरागत मान आहे. ‘एक तरी वारी अनुभवावी...’ असं म्हटलं जातं आणि म्हणूनच उत्सुकतेपोटी माझे आजोबा कृष्णराव चोपदार गुरुजी यांच्या मार्गदर्शनानुसार मी सन २०११ ला ‘आळंदी ते पंढरपूर’ अशी पायी वारी प्रथमच केली.

तिथून पुढं सलग अगदी झपाटल्याप्रमाणे सहा वर्षं मी पायी वारी केली. फोटोग्राफीच्या छंदामुळे वारीत भरपूर फोटोही काढले. वारीत मला जे अनुभवायला मिळालं ते मी अनेकदा शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करत असतो; परंतु प्रत्येकाला वारी ज्याच्या त्याच्या अनुभवातून भरपूर काही शिकवत असते.

वारीत काय पाहायला मिळेल? तर प्रत्येक पालखीसोहळ्याचं प्रस्थान हे अतिशय वेगळ्या पद्धतीनं होत असतं. संतांच्या पादुका आता विठ्ठलभेटीसाठी निघणार आहेत याचा सर्वत्र आनंद पसरलेला असतो. पुणे शहरातून संत ज्ञानेश्वरमहाराज व संत तुकाराममहाराज यांच्या पालख्या जातात तेव्हा पुण्यातील रस्त्यांवर तुडुंब गर्दी होते. थोडाफार पाऊस झाल्यामुळे निसर्गाची हिरवी चादर असलेल्या दिवे घाटात माउलींची, तर रोटी घाटात तुकोबांची पालखी सुंदर दिसते.

संत सोपानकाकांची पालखी सासवडहून निघते. संत निवृत्तीमहाराजांची पालखी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथून, संत एकनाथमहाराजांची पालखी पैठणमधून, संत मुक्ताबाई यांची पालखी मेहुण इथून निघते, तर संत नामदेवमहाराजांची पालखी पंढरपुरात या साऱ्यांचं स्वागत करते. पालखीसोहळ्यातील पहाटेचा पवमान अभिषेक, तसंच सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी होणाऱ्या समाजआरतीचा अवर्णनीय सोहळा पाहण्यासारखा असतो. तिथली शिस्तबद्धता पाहून आपण थरारून जातो. काही ठिकाणी होणारा ‘रिंगणसोहळा’ हा नेत्रदीपक असतो. रिंगणानंतर उडीचा खेळदेखील काही पालखीसोहळ्यांत पाहायला मिळतो. ‘जय जय राम कृष्ण हरी’ व ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या भजनासह हरिपाठ आणि अभंग वारीत म्हटले जातात. ठिकठिकाणी भारूड, कीर्तन व प्रवचन ऐकायला मिळतं.

तर वारीतून असा हा लाखोंचा जनसमुदाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे स्थलांतरित होत असतो. मात्र, आपल्याकडून दुसऱ्या कुणालाही कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता प्रत्येक वारकऱ्याकडून घेतली जाते. वारीत प्रत्येक वारकरी हा ‘माउली’ असतो. वारीतला अनुभव व शिकवण म्हणजे एक अशी ‘डिग्री’ आहे, जी कुठल्याही विद्यापीठात मिळू शकत नाही, म्हणूनच कदाचित अनेक परदेशी नागरिक वारी अनुभवण्यासाठी महाराष्ट्रात येतात. जपानचे युरिको इकनोया हे गेली ३६ वर्षं वारी करत आहेत, तसेच जर्मनीचे डॉ. गुंथर सोंथायमर यांनी सन १९९० मध्ये वारी या विषयावर A Divine Play on Earth नावाची डॉक्युमेंट्री ही केली होती.

या सदरातून मी दर रविवारी परदेशांविषयीची माहिती देत असतो; पण मला सांगायला आनंद होतो, की आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचा भाग असणारी आषाढवारी अनुभवण्यासाठी दर वर्षी अनेक परदेशी नागरिक येत असतात.

भ्रमंती किंवा पर्यटन करायला आपण दूर दूर जातो; परंतु आपल्याच राज्यात अतिशय कमी बजेटमध्ये ‘जिंदगी वसूल’ करण्यासाठी वारी अनुभवली पाहिजे. त्यासाठी नवोदित लोकांसाठी ‘आम्ही वारकरी’ ही संस्था ‘Wari with wisdom’ असा उपक्रमही चालवते. तर मित्रांनो, एकदा का होईना पण; कुठल्या तरी संतांच्या पालखीसोहळ्याचा भाग व्हा.

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

loading image