व्यग्र राहायचं की निवृत्त व्हायचं?

आपल्याकडे उद्योगधंदा, दुकान चालवणारी वा अगदी नोकरी करणारी कित्येक कुटुंबे अशी असतात की, मुलगा किंवा मुलगी कामाला लागली की ते आई-वडिलांनी रिटायर्ड व्हावे, असा हट्ट धरतात.
Old People
Old PeopleSakal

आपल्याकडे उद्योगधंदा, दुकान चालवणारी वा अगदी नोकरी करणारी कित्येक कुटुंबे अशी असतात की, मुलगा किंवा मुलगी कामाला लागली की ते आई-वडिलांनी रिटायर्ड व्हावे, असा हट्ट धरतात. अगदी बऱ्याच ठिकाणी तर आई-वडील दोघेही बिनधास्त होतात. प्रेम-माया वगैरे असते. जरा आरामाचे दिवस प्रत्येकालाच हवे असतात, पण तरीही व्यग्र राहायचं की निवृत्त व्हायचं, याचा विचार प्रत्येकानेच करायची गरज आहे.

शैलेशभाई आणि मी फॉरेन टूरचे पार्टनर. ते दक्षिण मुंबईत राहणारे, सुखवस्तू कुटुंब. त्यांच्या वडिलांचा खेळणी आयात करण्याचा व्यवसाय होता. शैलेशभाई माझ्यापेक्षा वयाने मोठे; पण विनोदी स्वभाव, एकदम जिंदादिल माणूस. बोलताना अघळपघळ पण खर्च करताना अत्यंत जपून. भारताबाहेर प्रवास करताना वेळ आणि पैसा कसा वाचवायचा, यासाठीचे ते माझे गुरूच. बरं, जवळपास सर्व जग फिरल्यामुळे कोणत्याही देशाबद्दल, प्रवासाबद्दल आमचं हक्काचं गुगलच. एका कॉमन मित्रामुळे आमची ओळख झाली आणि पुढे सततच्या प्रवासामुळे मैत्री.

आमचे दोघांचेही व्यवसाय भिन्न. आवडीनिवडी, संस्कृती भिन्न. भाषा वेगळ्या. माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग विषयातलं आणि त्यांचं कॅामर्सचं. मी मांसाहारी ते शाकाहारी. ते जन्मापासून दक्षिण मुंबईकर, मी खेडेगावातून आलेलो. इतका टोकाचा फरक असला, तरी आम्ही एकमेकांचे मित्र आहोत, तेही गेली १८ वर्षं. कारण एकच, पैशाची भाषा! होय, पैशाला स्वतःची एक भाषा असते. लय असते. आपल्याला ती समजायला हवी, शिकायला हवी. आम्हा दोघांनाही ती एकमेकांकडून शिकायची होती... मला निगोशिएन्स करायला आवडायचं आणि त्यांना विकायला. आम्ही दोघं मिळून विदेशात, पुढे भारतातही एकमेकांच्या व्हेंडर आणि कस्टमरकडे जायचो. ते कमी पडतील, तिथे मी मदत करायचो आणि मी कमी पडेल तिथे ते. एकमेकांकडून भरपूर शिकायचो.

अगदी आजही आम्ही भेटलो की या विषयांवरील गप्पा संपत नाहीत. आमचा व्यवसाय कोअर इंजिनिअरिंग, रिसर्च आणि प्रोजेक्ट्सचा आणि यांचा पूर्ण ट्रेडिंगचा. आम्ही एकत्र मीटिंग करायचो. एकत्र रहायचो. अनेक वेगळ्या व्यक्तिमत्त्वांना भेटायचो, त्यांचा एकत्रित अभ्यास करायचो. त्यातून त्याची वेगळी मतं मला कळायची आणि माझ्या विचारशक्तीपलिकडची गणितं सोडवायला ते मदत करायचे.

शैलेशभाई हुशार माणूस. वडिलांचा पूर्वीपासूनचा लहान मुलांच्या खेळण्यांचा व्यवसाय. चीनमधून मोठ्या प्रमाणावर आयात सुरू झाल्यावर हा व्यवसाय कालबाह्य होईल, हे आधीच गृहीत धरून अगदी २००० सालीच डायव्हर्सिफिकेशन करून ते इतर अनेक गोष्टी आयात करू लागले. त्यांच्या कंपनीचे गुडविल चांगले होतेच; त्यामुळे सहजी जमही बसला.

नवनवे प्रॉडक्ट शोधायला ते सतत विदेशदौरे करायचे, तेव्हा इकडे वडील सर्व व्यवसाय पाहायचे. शैलेशभाईंना एक दुःख मोठं होतं. त्यांचं इंग्रजी एवढं अस्खलित नव्हतं आणि कौटुंबिक जबाबदारीमुळे म्हणा किंवा त्यांना तेव्हा मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता आलं नाही. म्हणून मुलांना अत्यंत नामांकित शाळेत तर टाकलेच; शिवाय दहावीनंतरच मुलांना अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवलं.

मागे आम्ही दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या एका घरगुती कार्यक्रमात जमलो होतो तेव्हा त्यांचा संपूर्ण परिवार भेटला. दोन-तीन वर्षांपासून आता शैलेशभाईंचा मुलगा व्यवसाय पाहतोय. मुलगीही नुकतीच आली आणि तिनेही ॲाफिस जॉईन केलं. या हल्लीच्या तरुण मुलांमध्ये जो मला सर्वात आवडतो तो गुण त्यांची टेक्नॉलॉजीवर असलेली कमांड. विषय कोणताही असूदे, हे लोक इतक्या फास्ट ते कसं काय समजून घेत असतील, याचं मला न उलगडलेलं कोडं आहे. शैलेशभाईंची मुलंही तशीच. ती इतकी फास्ट निघाली, की आल्याआल्याच सर्व सिस्टीम सुरळीत केल्या. नवनवे तंत्रज्ञान आपलंसं केलं. संपूर्ण ॲाफिसचा कायापालट केला. अगदी कॅार्पोरेट लूक आणि कामही तसंच सुटसुटीत आणि नेटकं. बोलण्यात एकदम शिष्टाई. महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचं तेज अगदी चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं.

त्यांचा व्यवसाय दर वर्षी काही पटीत वाढतोय. या सर्वांचा मला वैयक्तिक फार आनंद, कारण शैलेशभाईही तसा अगदीच जिवाभावाचा मित्र आणि एका अर्थाने गुरूही आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही चार-पाच जण मुंबईत जेवायला भेटलो. ज्यांच्यामुळे आम्ही दोघे भेटलो होतो, त्यांचा वाढदिवस होता. तेव्हा एक जण गप्पा मारता मारता म्हणाला- ‘‘आता मुलांची लग्न लावून दिली की शैलेशभाई मोकळा, रिटायर्ड व्हायला. किती दगदग केलीये त्याने आयुष्यभर?’’ हे ऐकून शैलेशभाई एकदम ताडकन उत्तरला - ‘‘मी मरेपर्यंत काम करणार आहे भाई. माझे वडील मला घरातून हाकलून देतील, जर मी असा विचारही केला तर.’’

ते पुढे म्हणाले की, ‘‘अरे, माझे वडील आजही रोज कामाला येताहेत आणि ते तेव्हा सोबत होते म्हणूनच मी बाहेर फिरू शकलो, नवा धंदा वाढवला. आता माझा मुलगा, मुलगी बिनधास्त काम करतील, आम्ही मिळून त्यांना सपोर्ट करू.’’ त्याने सर्वांनाच उलट प्रतिप्रश्न केला की, ‘‘मला जर साठीच्याही आत तुम्ही रिटायर्ड व्हायला लावताय, तर त्या न्यायाने भारतातील राजकारणातील बहुतांश खासदार, आमदार आणि मंत्री रिटायर्ड व्हायला हवेत, नाही का? आपण आपल्या अनुभवाचा फायदा पुढच्या पिढीला योग्यरीत्या द्यायला हवा आणि मदतनिसाच्या भूमिकेतून शक्य होईल, तिथपर्यंत काम करत रहायला हवे.’’ आम्ही त्याला सर्वांनी मनापासून दाद दिली. विषय तिथेच संपला आणि घरी आलो.

घरी आल्यावर तो विषय जरी तिथं पुरता संपला होता, तरी माझ्या डोक्यातून जात नव्हता. कारण अगदी बारकाईने विचार केला, तर हेच कल्चर /संस्कार उद्योगधंदा पिढ्यान् पिढ्यात ट्रान्स्फर होण्यासाठी गरजेचं आहे. ते आपल्या बऱ्याच मराठी कुटुंबात होत नाही. नोकरी असो की उद्योग - उत्पन्नाचे स्रोत वाढविणे आणि एकमेकांना पूरक भूमिका घेऊन नियोजन करणे, ही काळाची गरज आहे. ज्याला हे लवकर कळेल तो सुखी होईल.

आपल्याकडे उद्योगधंदा, दुकान वा अगदी नोकरी करणारी कित्येक कुटुंबे अशी असतात की मुलगा किंवा मुलगी कामाला लागली की ते आई-वडिलांनी रिटायर्ड व्हावे, असा हट्ट धरतात. अगदी बऱ्याच ठिकाणी तर आई-वडील दोघेही बिनधास्त होतात. प्रेम-माया वगैरे असते; पण जरा आरामाचे दिवस प्रत्येकालाच हवे असतात.

आपल्याकडे कित्येक मराठी कुटुंबात एक माणूस नोकरी करत असतो आणि संपूर्ण कुटुंबाचा तो गाडा ओढत असतो. इतरांना थोडीफार मदत करणे शक्य असते, तरी उगीचच ‘लोकलज्जेचे’ कारण पुढे करत तसेच बसून राहतात. हल्ली शहरातून बऱ्यापैकी दोघेही पती-पत्नी कमावतात; पण त्याचे योग्य नियोजन नसते. बऱ्याचदा तर योग्य नियोजनाअभावी पुरेसे पैसे मिळत असूनही ताणतणाव आणि पैशांची चणचण होते. प्रत्येक वेळी उद्योग-व्यवसाय करूनच प्रश्न मिटणारे नसतात; पण जर आपल्या कुटुंबातून एकत्रितपणे, नेटके नियोजन करून, योग्य विचारांनी, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे सहज शक्य असेल, तर नियोजनपूर्वक ते वाढवायला हवेत.

आई-वडिलांची सेवा आणि काळजी ही करायलाच हवी. त्यांनी अगदी शेवटपर्यंत काम करावे, हे अजिबात अभिप्रेत नाहीच. शैलेशभाईंचे वडीलही आता फक्त तास - दोन तास विरंगुळा म्हणूनच तिकडे जातात. तसा त्यांचा धंद्याशी व्यावहारिकदृष्ट्या काहीच संबंध नाही. गुजराती - मारवाडी समाजात सहसा लग्न जरा लवकर लावली जातात. त्यामुळे त्यांची मुलंही वडिलांच्या पन्नाशीदरम्यान करिअरची सुरुवात करतात. आपल्याकडे मात्र तशी परिस्थिती नाही. याला सामाजिक, शैक्षणिक आणि इतर अनेक कारणं आहेत; परंतु आपल्याकडे एक उत्पन्नाचा चांगला सोर्स तयार झाला, की बाकीचे कुटुंबातले थोडे ढिले पडतात, हेही बहुतांश वेळा पाहायला मिळते.

कित्येक ठिकाणी मुलांना सुरुवातीलाच हल्ली मोठे पॅकेज मिळते आणि वडिलांपेक्षा ते थोडे जास्त कमवायला लागले, की त्यांचे निर्णय स्वतःच घ्यायला लागतात. ते आई-वडिलांनाच शिकवायला लागतात. काहींना तर आपले आई-वडील आऊटडेटेड वाटतात, इथंपर्यंत भयंकर परिस्थिती आहे. याउलट काही पालकही अचानक बॅक सीट घेतात आणि जसा सपोर्ट करायला हवा, तसा तो करत नाहीत.

खरं तर अशा वेळी शॉर्टटर्म म्हणून येणाऱ्या एक-दोन वर्षांचे तसेच लाँगटर्मसाठी दशकभराचे सुयोग्य नियोजन व्हायला हवे. तसेच त्या त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती, तज्ज्ञ वा योग्य मार्गदर्शक शोधून त्यांच्याकडूनही सल्ले घेणे गरजेचे असते.

दोन्ही परिस्थितीमध्ये योग्य दिशा आणि अचानक पैशांचा प्रवाह सुरू झाल्यानंतर नक्की काय करायला हवे, यावर फार दूरचा विचार झालेला नसतो. खरे पाहता आर्थिक उत्पन्न सुरू झाले की तरुणांनी आर्थिक साक्षरता वाढविण्यास सुरुवात करावी. पाच-सहा आकडी पगार मिळाला की काम संपत नाही; पैशाचे योग्य नियोजन कळाले, तरच त्या कमाईला अर्थ. पैशाची खरी ताकद तो आपण वापरतो आणि गुंतवतो कसा, यावर ठरते. आपल्याकडची आर्थिक निरक्षरता आणि त्यासंबंधीची कुटुंबात न होणारी सर्वसमावेशक चर्चा प्रगतीला मारक ठरतेय. त्यातही कोरोना, महागाई, बेरोजगारी आणि उत्पन्नाचे स्रोत कमी होण्याचा धोका असताना तर हे करणे अत्यंत आवश्यक आहे.

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com