esakal | ‘बघता काय ? सामील व्हा..! ’
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers Long Mach in Mumbai

‘बघता काय ? सामील व्हा..! ’

sakal_logo
By
प्रकाश अकोलकर akolkar.prakash@gmail.com

मुंबापुरीत निघालेला सर्वात मोठा मोर्चा कोणता? संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मोरारजीभाई देसाई यांच्या सरकारवर साथी एस. एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वात चाल करून गेलेला, की सन १९८० च्या दशकात गिरणीकामगारांच्या ऐतिहासिक संपानंतर डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात निघालेला ‘लाँग मार्च’? की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘रिडल्स ऑफ राम-कृष्ण’ या ग्रंथातील काही मजकूर राजकीय दबावापोटी वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर तमाम दलित संघटनांनी एकत्र येऊन हुतात्मा चौकावर नेलेला विशाल मोर्चा, की या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेनं छगन भुजबळ यांच्या पुढाकारानं काढलेला, की अलीकडेच लाल बावटा हातात घेऊन थेट नाशिकपासून मुंबईवर चाल करून आलेला शेतकरीबांधवांचा? - की ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणा देत आलेला मराठा-संघटनांचा?

खरं तर शेतकरी आणि मराठा-संघटना मुंबापुरीवर दूरवरून चाल करून जरूर आले होते. मात्र, त्यांची सांगता ही बोरीबंदर रेल्वेस्थानकातून बाहेर येताच सामोरं येणाऱ्या विशाल आझाद मैदानातच झाली होती. सरकारचं मुख्य ठाणं असलेल्या मंत्रालयापर्यंत ते जाऊच शकले नव्हते. कोणे एके काळी हेच आझाद मैदान मोर्चेकऱ्यांचं एकत्र जमण्याचं एक स्थान होतं आणि तिथून निघालेले विशाल मोर्चे थेट मंत्रालयाच्या परिसरापर्यंत म्हणजेच चर्चगेट रेल्वेस्थानकाजवळच्या ‘सम्राट’ हॉटेलपर्यंत जात, ही तर आजच्या पिढीला दंतकथाच वाटू शकेल!

पण तसं व्हायचं खरं आणि तेव्हा आझाद मैदानातून निघालेले मोर्चे खादी भांडार, फिरोजशहा मेहता रोड ओलांडून पुढं हुतात्मा चौकाला वळसा घालून थेट मंत्रालयाच्या दिशेनं जात. मात्र, ‘बघता काय? सामील व्हा!’ अशा खणखणीत घोषणा देत चाल करून येणाऱ्या या मोर्चेकऱ्यांची सरकारला बहुधा भीती वाटू लागली आणि मग मंत्रालयाच्या दिशेनं येणारे हे मोर्चे हुतात्मा चौकातून सरळ पुढं जाऊन ‘काळा घोडा’ या नावानं प्रसिद्ध असलेल्या जहांगीर कलादालनाच्या पुढच्या चौकात विसर्जित होऊ लागले. अर्थात, त्यापूर्वी तिथं नेतेमंडळींची होणारी दणदणीत भाषणं ही श्रुती धन्य करून सोडणारीच असत.

ऐंशीचं ते दशक उजाडलं तेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं की बहुधा रोजच्या रोज कुणाचा न कुणाचा मोर्चा निघत असेच...आझाद मैदानातून दुपारी अडीच-तीनच्या सुमारास निघणाऱ्या या मोर्चाबरोबर ‘काळा घोडा’ चौकापर्यंत चालत जाणं हा एक वेगळाच अनुभव असे. मोर्चेकऱ्यांच्या दणाणून सोडणाऱ्या घोषणांनी दक्षिण मुंबईतील अवघा फोर्टपरिसर जिवंत होऊन गेलेला असे. कार्यकर्ते मागण्यांची पत्रकं, नेमक्या त्याच वेळी घराकडे परतीची वाट चालू लागणाऱ्यांना, देत असत. काही लोक निव्वळ ‘टाइमपास’ म्हणूनही मग मोर्चाबरोबर चालू लागत. एकुणातच मोर्चेकऱ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत, हे आजूबाजूच्या लोकांनाही मग थोडंफार उमजून जात असे. मात्र, मोर्चा काढण्यापेक्षाही नंतर मोर्चेकऱ्यांना शांततेत घरी परत पाठवणं हेच नेत्यांपुढचं अधिक मोठं आव्हान असे. त्याचं कारण म्हणजे याच मोर्चेकऱ्यांपुढे याच नेत्यांनी केलेली माथी भडकवणारी भाषणं हेच असे...

एकदा सीमाप्रश्नावरून शिवसेनेचा भव्य मोर्चा निघाला होता. मोर्चेकरी शांततेत ‘काळ्या घोडा’पर्यंत जाऊन पोहोचले. राणा भीमदेवी थाटात भाषणंही झाली. संध्याकाळ मोर्चेकऱ्यांना कवेत घेऊ लागली आणि शिवसैनिक काढता पाय घेऊ लागले. खरं तर मोर्चा; मग तो कुणाचाही असो; फोर्टपरिसरातले अवघे फेरीवाले आधीच आवरासावर करत... शिवसेनेचा मोर्चा असला की तर जवळपास अवघा फोर्टपरिसर ‘बंद’च पाळे. मात्र, त्या दिवशी परतताना मोर्चेकऱ्यांची कुणी खोडी काढली की काय, देवच जाणे! पण दगडफेक आणि लुटालूट सुरू झाली. राज ठाकरे यांनी ‘खळ्ळ् खट्याक्’ शब्दप्रयोग लोकप्रिय करण्याआधीचा तो काळ होता. मात्र, ती तोडफोड सुरू असतानाही शिवसेनेचा मधल्या फळीतला एक नेता रस्त्याच्या दुभाजकावर उभा राहून शिवसैनिकांना शपथा घालून शांततेचं आवाहन करताना दिसला. माथी तापलेले सैनिक मात्र त्याचं काहीएक ऐकायला तयार नव्हते. डॉ. सामंतांनी तर गिरणीसंप ऐन भरात असताना ‘लाँग मार्च’च्या आधीही अनेक मोर्चे काढले. तेव्हा तर मोर्चाबरोबर चालण्याऐवजी मोर्चा नेमका किती मोठा आहे, हे जाणून घेण्यासाठी शेवटचा कामगार आझाद मैदानातून बाहेर पडेपर्यंत तिथंच थांबावं लागे. एकदा तर मोर्चानं हुतात्मा चौक ओलांडून पुढं ‘काळा घोडा’च्या दिशेनं कूच केलं तरी आझाद मैदानातून कामगार बाहेर येत मोर्चा वाढवतच होते आणि अखेरीस असं लक्षात आलं की, डॉक्टरांचं भाषण ‘काळा घोडा’ चौकात सुरू झालं, तेव्हा मोर्चातला शेवटचा कामगार हा बोरीबंदर परिसरातच होता.

आता या अशा मोर्चात नेमके किती कामगार सहभागी आहेत ते बातमीत लिहायचं कसं? त्यांची मोजदाद होणार तरी कशी? तेव्हा एक पर्याय सुचला. डॉक्टरांनी या मोर्चाला ‘आज तीन लाख लोक आलेले आहेत,’ असं वक्तव्य केलेलं असे, तर पोलिसांचा अंदाज लाखभराचा असे. या दोन्ही अंदाजांची सरासरी काढून मग ‘दोन लाखांचा मोर्चा’ असं छापून मोकळं होता यायचं!

बातमीदारी करतानाचे असे अनेक मोर्चे आठवणीत आहेतच...पण कधी कधी पत्रकारच मोर्चे काढायचे...अशा पत्रकारांच्या अनेक मोर्चांपैकी स्मरणात राहणारा मोर्चा हा त्याच ऐंशीच्या दशकात ‘बिहार प्रेस बिला’विरुद्धचा होता आणि तो चांगलाच भव्य होता. कधीही आपल्या हस्तीदंती मनोऱ्यातून बाहेर पडून रस्त्यावरच्या लढाईत न उतरणारे अनेक बडे पत्रकारही त्या मोर्चात सहभागी झाले होते. देशभरात पत्रकारांनी असे अनेक मोर्चे काढले आणि मग बिहार सरकारला पत्रकारांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारं ते विधेयक मागं घ्यावं लागलं. ‘महानगर’ या सायंदैनिकावर झालेल्या हल्ल्यानंतर निघालेला मोर्चाही मोठाच होता. मात्र, तो त्या दैनिकाच्या माहीम कार्यालयापासून दादरच्या ‘शिवसेनाभवना’वर नेण्यात आला होता...पत्रकार जे. डे यांच्या हत्येनंतर तर आझाद मैदानावरून निघालेला भव्य मोर्चा सारी बंधनं ओलांडून थेट मंत्रालयावर जाऊन पोचला होता...

मात्र, एकदा फोर्टपरिसरातील रहिवाशांच्या संघटनेनं ‘या मोर्चांचा आपल्याला उपद्रव होतो,’ अशी याचिका थेट मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली...आणि नव्वदचं दशक संपता संपता उच्च न्यायालयानं या मोर्चांना बंदी घातली...तेव्हापासून फोर्टपरिसराचं जिवंतपणच संपलं...मोर्चांचं रूपांतर ‘धरण्या’तच होऊन गेलं...आताही मोर्चेकरी आझाद मैदानावर जमतात...तिथंच भाषणं होतात आणि मग संध्याकाळी बाहेर येऊन वडा-पाव खात घरची वाट धरतात...नव्या आर्थिक धोरणांनंतर तर मुंबईत ‘ब्लू कॉलर’ कामगारच राहिला नाही आणि मोर्चांची सारी मजाच संपून गेली...