पंचतारांकित!

Lata-Mangeshkar
Lata-Mangeshkar

फॉर सम अनॲव्हॉयडेबल रीझन्स, वुई हॅव डिसायडेड नॉट टू काँटेस्ट इलेक्शन्स धिस टाइम...
प्रेस कॉन्फरन्सची सुरुवातच या वाक्यानं झाली आणि एक मोठ्ठाच फुगा फुटला!
त्या काळात प्रेस कॉन्फरन्सना, म्हणजेच पत्रकार परिषदांना, बातमीदारीच्या व्यवसायात कमालीचं महत्त्व होतं. राजकीय पक्ष असोत की कामगार संघटना असोत की सेलिब्रिटी असोत...आपला कोणताही निर्णय जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद हाच एकमेव मार्ग तेव्हा उपलब्ध असायचा. अशा त्या काळात या पत्रकार परिषदेकडे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. वर्ष होतं १९८०. काही सिनेकलावंत आणि हाय प्रोफाइल विचारवंत यांनी एकत्र येऊन ‘नॅशनॅलिस्ट पार्टी’ या नावानं एक नवा पक्ष स्थापन केल्याची घोषणा त्यापूर्वीच झाली होती. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ झालेलं जनता पक्षाचं सरकार कोसळल्यानंतर आलेलं चरणसिंग यांचं सरकारही पडलं होतं आणि मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या होत्या.

त्यामुळेच या नव्या पक्षाविषयी कमालीचं औत्सुक्य निर्माण झालं होतं. उमेदवारांच्या नावाची चर्चाही जोरात होती. दक्षिण मुंबईतून नानी पालखीवाला उभे राहणार, तर वांद्रे-कार्टर रोड या सिनेकलावंतांचं माहेरघर असलेल्या परिसरातून साक्षात देव आनंद उभा राहणार अशा वावड्या उठत होत्या. या पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार या अपेक्षेनं तिथं जमलेल्या असंख्य पत्रकारांचा, देव आनंद यांनी उच्चारलेल्या या वाक्यानं, कमालीचा अपेक्षाभंग झाला आणि साऱ्यांचंच लक्ष, देवसाब पुढं काय बोलतात यावरून उडून, शेजारच्याच ‘बुफे’कडे गेलं!

या बुफेकडे लक्ष जाण्याचं एकमेव कारण म्हणजे, ही प्रेस कॉन्फरन्स चर्चगेट रेल्वेस्थानकाजवळच्या बहुचर्चित अशा ‘ॲम्बॅसेडर’ या तारांकित हॉटेलमध्ये सुरू होती. ‘ॲम्बॅसेडर’मध्ये जाण्याचा योगही तेव्हा पत्रकारांच्या नशिबी क्वचितच यायचा. मग ‘गेट वे’समोरच्या ‘ताजमहाल’मध्ये जायला मिळणं हा तर कपिलाशष्टीचाच योग. ‘ॲम्बॅसेडर’ हॉटेलात पत्रकार परिषदा व्हायच्या त्या प्रामुख्यानं राम जेठमलानी यांच्याच. ‘ते हॉटेल मनू नारंग या कुख्यात तस्कराचं आहे आणि जेठमलानींनी त्याचं वकीलपत्र घेतलेलं असल्यानंच त्यांना त्या तिथं घेता येतात,’ असंही तेव्हा कानावर आलं होतं.

अन्यथा, मुंबईत पत्रकार परिषदा आयोजित करण्याच्या दोनच हक्काच्या जागा होत्या. एक म्हणजे, बोरीबंदर रेल्वे स्थानकासमोर आझाद मैदानाला लागून असलेलं मुंबई मराठी पत्रकार संघाचं छोटेखानी सभागृह, आणि दुसरी जागा होती, ‘बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्ट्‍स’ - बीयूजे - या संघटनेचा ‘प्रॉस्पेक्ट चेंबर’ या ब्रिटिशकालीन जुनाट, अंधाऱ्या वास्तूत  असलेला लांबलचक हॉल. ही जागाही बोरीबंदरपासून, म्हणजेच आजच्या भाषेतील ‘सीएसएमटी’ स्थानकापासून,  आठ-दहा मिनिटं चालून गाठता येत असे. ‘खादी भांडार’च्या डायगोनली ऑपोझिट असलेल्या हॉलमध्ये पत्रकार परिषदा घेणारे बहुतेक हे डाव्या विचारांचे आणि प्रस्थापितविरोधी गटातील लोक असत, तर पत्रकार संघात मात्र सर्वधर्मसमभाव या न्यायानं कुणीही येऊन वार्ताहरबैठक घेत असे आणि अजूनही घेतात. त्याचं एक कारण म्हणजे, या सभागृहाचं भाडं अत्यल्प होतं आणि मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोरच ही वास्तू असल्यानं पालिकेतील बातमीदार तिथं सहजगत्या येऊ शकत. ‘बीयूजे’ असो की पत्रकार संघ, तिथल्या खाद्यपदार्थांचा मेनूही बहुधा सारखाच असे आणि एका पेपर डिशमध्ये एक वडा वा सामोसा, चार-सहा वेफर्स आणि एखादा बर्फीचा तुकडा एवढ्यापुरताच तो मर्यादित असे!

त्यामुळे मग देव आनंद यांनी ‘फॉर सम अनॲव्हॉयडेबल रीझन्स वुई हॅव डिसायडेड नॉट टू काँटेस्ट इलेक्शन्स धिस टाइम...’ अशी पहिल्याच वाक्यात आपल्या पत्रकार परिषदेची ‘सांगता’ केल्यानंतर वार्ताहरांचं लक्ष हे बाजूलाच लावलेल्या तारांकित बुफेकडे जाणं अपरिहार्यच म्हणावं लागतं!

बातमीदारांना त्या काळात पत्रकार संघ असो की ‘बीयूजे’ इथं नियमित जावं लागायचंच. मात्र, कधी तरी ‘ब्रिस्टोल ग्रील’ असं मॉडर्न वाटणारं नाव धारण करणाऱ्या एका छोटेखानी उपाहारगृहात जायचा योग यायचा. हे रेस्टॉरंटही खादी भांडाराला आडव्या जाणाऱ्या फिरोजशहा मेहता पथावर ‘एचएमव्ही’च्या कार्यालयासमोर होतं. नाव इंग्लिश वळणाचं असलं तरी बाज हा दाक्षिणात्यच होता आणि तेथील वेटर्सही मोठ्या अदबीनं येऊन सांबार तसंच चटणी वाढत राहायचे. तिथली दक्षिणी कॉफी हे खास आकर्षण होतं. मात्र, पुढं लक्षात आलं की बरेच पत्रकार हे त्या कॉफीऐवजी उंचाड्या ग्लासातून काहीतरी थंड पेयाचे घुटके घेत आहेत. चौकशीअंती कळलं की ती तर कोल्ड कॉफी. ‘सीसीडी’ वा ‘स्टारबक्स’ यांच्या उदयाच्या आधी कोल्ड कॉफीची चटक लावणारं ‘ब्रिस्टोल ग्रील’ पुढं काळाच्या उदरात केव्हा नाहीसं झालं ते कळलंही नाही.

मात्र, याचा अर्थ या साऱ्या पत्रकार परिषदांचं बातमीदारांना असलेलं आकर्षण निव्वळ खान-पानसेवेपोटीच असायचं असं बिलकूलच नाही. उलट सगळे पत्रकार खाण्या-पिण्यात दंग असताना, आयोजकांशी खासगी बोलून वेगळीच माहिती पदरात पाडून घेता यायची. दरवेळी त्यातून बातमी निघायचीच असं नाही; पण त्यानिमित्तानं त्या संयोजकांशी दोस्ताना निर्माण होणं आणि त्यातूनच पुढं ‘सोर्स’ तयार होणं यासाठी या वार्ताहरबैठकांचं महत्त्व फार म्हणजे फारच मोठं असायचं. मनात कायम घर करून राहिलेल्या एका पत्रकार परिषदेची कहाणी अगदीच वेगळी आहे. 

एकदा कार्यालयात गेल्यावर विचारणा झाली : ‘काय, ‘ताजमहाल’ला जायचंय का?’ एकदमच हुरळून जायला झालं. ते वर्ष होतं १९७९. ताजमहाल हॉटेल त्यापूर्वी ‘मुंबईदर्शन’साठी झालेल्या फेऱ्यात बाहेरून अनेकदा बघितलं होतं आणि त्याच्या आत काय असेल याविषयी कमालीचं कुतूहल निर्माण झालं होतं. मुख्य वार्ताहरांनी हातात एक छोटेखानी आमंत्रण ठेवलं. त्या आवतणाच्या खाली लफ्फेदार सही होती : लता मंगेशकर! लंडनच्या सुविख्यात रॉयल आल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम होता आणि त्याची माहिती साक्षात् गानसम्राज्ञी देणार होती! हा तर दुग्ध-शर्करा की काय म्हणतात, तसलाच योग होता...

आणखी एक योग म्हणजे, ‘ताज’च्या ‘प्रिन्सेस रूम’मध्येच ही वार्ताहरबैठक होती! एकाच फटक्यात ‘ताजमहाल’ आणि लताबाई असं दोहोंचं दर्शन होऊ घातलं होतं. पत्रकार परिषद झाली. बातमीही दिली...पण लक्षात आलं ते एवढंच, की ताजमहाल हॉटेलपेक्षाही लताबाईंची ऐट अगदीच आगळीवेगळी आहे...

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com