बातमीदारीचा अड्डा!

Reporter
Reporter

दिवस ‘ब्रेकिंग न्यूज’चे बिलकूलच नव्हते...आणि जमाना ‘मीडिया ट्रायल’चाही नव्हता.‘दूरदर्शन’ या एकमात्र चॅनेलवरून हिंदी-इंग्लिश आणि शिवाय प्रादेशिक भाषांतूनसुद्धा बातमीपत्रही सादर व्हायचं...तरीही छाप्यातल्या बातम्यांनाच काय ते महत्त्व असायचं.

बातमीदारीच्या काळातलं तेव्हा सर्वात ‘ग्लॅमरस’ म्हणता येईल असं बीट सरकारच्या कारभाराचं आणि राजकीय घडामोडींच्या वार्तांकनाचं होतं. सक्‍काळी उठून बातमीचा शोध घेण्याचे ते दिवस नव्हते आणि त्यामुळेच ‘सिंहासन’ चित्रपटातल्या दिगू टिपणीसप्रमाणे त्या काळातले ‘मंत्रालय-रिपोर्टर्स’ सकाळी डाराडूर झोपा काढू शकत. या बीटवरचं मुख्य काम मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरचं ‘सीएम’चं ‘ब्रीफिंग’ कव्हर करणं हेच असे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरच्या छोटेखानी कॉन्फरन्स रूममध्ये एका अंडाकृती टेबलाच्या शिरोभागी मुख्यमंत्री विराजमान होत. मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसण्यासाठी काही पत्रकारांमध्ये अहमहमिका असे! संध्याकाळी दूरदर्शनवरच्या बातम्यांमध्ये या ब्रीफिंगची दोन-चार दृश्यं दाखवली जात. त्यात चमकावं यासाठीच ही धडपड असे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्या काळातला एक किस्सा. मुख्यमंत्री ब्रीफिंगसाठी दाखल झाले की पश्चिम महाराष्ट्रातल्या दैनिकाचे एक वार्ताहर शेजारच्याकडे कागद मागत आणि दुसऱ्याकडे पेन. सीएम बोलू लागले की ते कागदावर काहीतरी गिरमिटं काढत बसत. एकदा पवारसाहेबांचं ब्रीफिंग संपलं आणि ते निघाले. त्यापाठोपाठ हे वार्ताहरही त्यांच्या मागे ‘साहेब...साहेब...’ करत पळू लागले. पवारांनी मागं वळून बघितलं आणि ते म्हणाले : ‘‘अहो, तो शेजारच्याचा कागद आणि दुसऱ्याचं पेन तरी परत करा ना...’’

कधीही, कोणतीही, कसलीही बातमी न देणाऱ्या; पण मंत्रालयात नित्यनेमानं हजेरी लावणाऱ्या वार्ताहरांचा अड्डा मंत्रालयाच्या तळमजल्यावरच्या ‘प्रेसरूम’मध्ये असे. यापैकी काहीजण नेमके कोणत्या वर्तमानपत्रासाठी काम करत, तेही अनेकांना ठाऊक नसे. मात्र, त्यांचा काही विशिष्ट मंत्री, काही मोजकेच अधिकारी यांच्या दरबारी राबता असे. बातमीविषयी कधीही बोलताना बघायला न मिळालेल्या या ‘पत्रकार’ मंडळींचा मंत्रालयाच्या परिसरात मोठा दबदबा असे. अजूनही पत्रकारांची ती जमात मंत्रालयात असतेच.

मंत्रालयातल्या तळमजल्यावरची ही ‘प्रेसरूम’ हीच या ३६ जिल्ह्यांच्या, ३६० तालुक्‍यांच्या आणि काही हजार खेड्यांमधल्या कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारच्या बातम्या काढायची त्या काळातली मुख्य जागा असे. सरकारदरबारी निवेदनं घेऊन येणारी मंडळी मंत्र्यासंत्र्यांच्या हातात ही निवेदनं खुपसून ‘प्रेसरूम’मध्ये येत आणि मग काही पत्रकार त्याच मंडळींना घेऊन, चहा-नाष्ट्यासाठी वरच्या मजल्यावरच्या कँटीनकडे रवाना होत...

मात्र, याचा अर्थ मंत्रालयात नेमकं काय चालतं त्याचा शोध कुणीच घेत नसे असा बिलकूलच नाही. ‘प्रेसरूम’मध्ये वर्दळ सुरू होई सर्वसाधारणपणे दुपारी दोननंतर. सीएमसाहेबांचं ब्रीफिंग नसेल त्या दिवशी बातमीदार गटागटानं कधी कुण्या उच्चस्तरीय सनदी अधिकाऱ्याकडे, कधी कुण्या चर्चेतल्या मंत्र्याकडे वा अन्य कुणाकडे बातमीच्या शोधात काही प्रश्न घेऊन जात. मात्र, हातात काही घबाड ‘एक्‍सक्‍लुजिव्ह’ म्हणून लागावं यासाठी जातीनं मेहनत घेणारे काही बातमीदार होतेच. असे बातमीदार तर आपल्याबरोबरच फिरतात आणि बरोबर संध्याकाळी मंत्रालयातून काढता पायही घेतात...मग, त्यांना ही ‘एक्‍सक्‍लुजिव्ह’ बातमी मिळते तरी कशी याचं रहस्य बऱ्याच काळानं उलगडलं. राज्याच्या प्रश्नांचा खोलात जाऊन अभ्यास करणारी, त्यासंदर्भात चक्‍क लायब्ररीत वगैरे जाऊन धांडोळा घेऊन माहिती जमा करणारी ही अशी बातमीदार मंडळी अभ्यासू राजकारण्यांशी चर्चा करताना सामोऱ्या आलेल्या प्रश्नांची उत्तरं सरकारकडून मिळवण्यासाठी दुपारचा जेवणाचा ‘ब्रेक’ होण्याआधीच मंत्रालयात जात, हे कळकळेपर्यंत अर्धं आयुष्य निघून गेलं होतं...

मंत्रालयात बातम्यांच्या शोधाताना, अनेक फाटकी माणसं एखाद्या मंत्र्याच्या दालनासमोर उभी दिसत...त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्नही कठीणच असे.

मात्र, पुढं लक्षात आलं की हितसंबंधांचं राजकारण करणाऱ्या आणि प्रेसरूममध्ये येणाऱ्या पत्रकबहाद्दरांपेक्षा खरी बातमीच नव्हे, तर राज्याचं धगधगतं वास्तव समजून घ्यायचं असेल, तर त्यासाठी याच लोकांशी संवाद साधावा लागेल. शिवाय, बातमी काय फक्‍त मंत्री वा सनदी अधिकारी यांच्याकडे थोडीच असते? ती तर मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरच्या चोपदारापासून, कोणत्याही साध्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याकडेही असते.

तेव्हा मंत्रालयात आल्यावर तुम्ही जर ‘प्रेसरूम’मध्ये गप्पांचे अड्डे जमवण्यातच मश्गूल झालात तर, अव्वल म्हणता येईल अशी बातमी तुमच्या हाती लागणं कठीणच.

एकदा अचानक मंत्रालयात दुर्गाबाई भागवत येताना दिसल्या. दुर्गाबाई थेट सहाव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत गेल्या. आत वर्दी गेली आणि मुख्यमंत्र्यांनी ताडकन बाहेर येऊन, त्यांना थेट वाकून नमस्कार केला. या नऊवारी साडीतल्या बाई कोण याचा मुख्यमंत्री-कक्षातल्या कर्मचाऱ्यांना ठावठिकाणा नव्हता. दुर्गाबाई मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी थेट ‘अरे, मनोहर...’ करूनच बोलू लागल्या. ग्रंथालयांची दुरवस्था, तिथल्या कर्मचाऱ्यांचे तुटपुंजे पगार अशी काही गाऱ्हाणी घेऊन दुर्गाबाई आल्या होत्या. सीएमसाहेबांनी तातडीनं संबंधित विभागाच्या सचिवाला पाचारण केलं. दुर्गाबाईंनी त्या सचिवांनाही पहिल्याच नावानं पुकारलं आणि त्या आपल्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत एकदम उद्गारल्या : ‘अरे, तू एमएला नापास झाला होतास ना...’

आपल्याला भेटायला दुर्गाबाई येणार आहेत हे मनोहरपंतांना ठाऊक होतं, तरी त्यांनी त्याची कुणालाच पूर्वकल्पना दिली नव्हती. आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात हे घडतं तर ‘दुर्गाबाई येणार’ हीच बातमी मग त्या दिवशी सकाळपासून बघावी लागली असती!

मंत्रालयातल्या बातमीदारीच्या या शांत, सुशेगाद वातावरणात थोडीफार ‘हलचल मचे’ ती मुख्यमंत्री-बदलाच्या हालचाली सुरू झाल्यावर. तशी ‘हलचल’ निवडणुकांच्या मोसमातही व्हायचीच; पण तेव्हा हालचालींचा केंद्रबिंदू हा मंत्रालयातून नजीकच्याच विविध पक्षांच्या कार्यालयांच्या दिशेनं सरकलेला असायचा. सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वातच बदल होण्याच्या हालचाली सुरू झाल्या की मग तो बिंदू मलबार हिलवर एरवी शांतपणे पहुडलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दिशेनं जाई. मग मंत्रालय कव्हर करणाऱ्या बातमीदारांची धावपळ वाढे. 

तो जमाना मुंबईतल्या मराठी वर्तमानपत्रांत, बातमीदारीच्या या सर्वात महत्त्वाच्या अड्ड्यावर एकच बातमीदार पाठवण्याचा होता. त्यालाच मग प्रशासन, तसंच पक्षीय राजकारणही कव्हर करावं लागे. अर्थात्, त्या काळात राजकीय हालचाली या फारच क्‍वचित घडत आणि मराठी वर्तमानपत्रांत एकुणातच बातमीदारांची संख्याही क्‍वचितच दोन्ही हातांच्या बोटांवर मोजायला लागायची. इंग्लिशभाषक वृत्तपत्रांचे आणि विशेषत: ‘टाइम्स’चे किमान दोन वार्ताहर तरी मंत्रालयात येत. एक प्रशासन कव्हर करत असे, तर दुसरा राजकीय घडामोडी. त्यामुळेच कामाचा दर्जा आणि अचूकताही वाढत जाई.

मंत्रालयाच्या बातमीदारीत तळमजल्यावरच्या या ‘प्रेसरूम’ला प्रतिष्ठा प्राप्त झाली ती टीव्हीपूर्व जमान्यात अथक् मेहनत घेणाऱ्या काही अभ्यासू आणि समतोल विचारशक्‍ती असणाऱ्या पत्रकारांमुळे. कधी कधी सहाच्या सहा मजले उलथेपालथे घातले तरी हातास बातमी कशी ती लागतच नसे. तेव्हा याच ‘प्रेसरूम’मध्ये गप्पांचे अड्डे जमत आणि जुने-जाणते पत्रकार किश्‍शांची बहार उडवून देत. त्यामध्ये अग्रभागी असत यशवंत ऊर्फ नाना मोने. मात्र, त्यांच्या कहाण्या म्हणजे ‘केवळ किस्से’ असं कधीच नसे. त्यातूनच राज्याचे राजकीय रंग, प्रशासकीय निर्णयांची परंपरा, कधी त्यातून झालेला गोंधळ आदींचा इतिहासच सामोरा येत जाई. कधी एखादी घटना घडलेली असे; पण तिचा ताळमेळ लागत नसे. त्या वेळी मोने त्या घटनेमागचे दुवे उकलायला लागत. त्यांचा मिश्‍किल स्वभाव मग पुढं त्यात आपल्या पद्धतीनं पाणी घालत जाई. अर्थात्, ती कल्पनेच्या तीरावर उभं राहून बेतलेली कहाणी असे... हा ‘अभ्यासवर्ग’ सुरू असताना ‘प्रेसरूम’मधल्या सोफ्यावर लवंडून चक्‍क झोपा काढणारेही काही पत्रकार अधूनमधून बघायला मिळत. झोपेतून उठल्यावर ते बाकीच्यांना ‘नाही ना काही बातमी?’ असाच प्रश्न विचारत!

दिवसभरात हातात काहीच बातमी लागली नाही की मग याच ‘प्रेसरूम’समोरच्या बोळकांडात जायचं. तिथं सरकारी प्रसिद्धिपत्रकं सायक्‍लोस्टाइल करण्याचं काम चाले. ती तेव्हा वर्तमानपत्रांच्या कार्यालयात पोहोचवण्याचं काम एक सरकारी कर्मचारी संध्याकाळनंतर मोटारसायकलवरून करत असे. त्याला रायडर म्हणत. ही पत्रकं आधीच हस्तगत केल्यामुळे, त्यांतली बातमीही आपल्या हाती आधीच लागली होती, असा देखावा कार्यालयात उभा करता येत असे.

मंत्रालयात त्या काळात येणाऱ्या पत्रकारांमध्ये तेव्हा विविध राजकीय विचारांशी जवळीक असणाऱ्या पत्रकारांचा भरणा असे. मात्र, अयोध्येत सन १९९२ च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा ‘वार्ताहरानं बातमी तटस्थपणे द्यावी,’ हा शिरस्ता तेव्हाच अयोध्येतल्या शरयू नदीत बुडवण्यात आला होता. पुढं सन १९९५ मध्ये ‘युती’चं सरकार आलं आणि पत्रकारांच्या निष्ठा अधिक ठळकपणे सामोऱ्या आल्या. मंत्रालयाच्या ‘प्रेसरूम’मध्येही त्यांचं प्रदर्शन होऊ लागलं.

बातमीतली रंगत आणि राज्यातल्या या सर्वात मोठ्या बातमीच्या अड्ड्यावरची गंमतही मग कमी कमी होत गेली. २४ तास ‘ब्रेकिंग न्यूज’ देणाऱ्या टीव्हीची चाहूल लागली होती. बातमीमागं धावण्याचं काम सुरू झालं होतं. मग बातमीच्या या सर्वात मोठ्या अड्ड्याचं महत्त्व कमी आणि कमीच होत गेलं, यात आश्चर्य ते कोणतंच नव्हतं...

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com