"छंद जिवाला वेड लावी पिसे'' 

प्रकाश पाटील 
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

आपल्याकडे दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात नाक खुपण्याची सवय अधिक असल्याने अशा चर्चा होणारच. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे व्हायरल झालेले छायाचित्र पाहून इतकेच म्हणावेसे वाटते,"" छंद जिवाला वेड लावी पिसे''

 

मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदावर असलेल्या मंडळीनी प्रोटोकॉल पाळले पाहिजेत हे खरेही असेल. पण त्यांच्या पत्नी किंवा मुलांनीही प्रोटोकॉल पाळलेच पाहिजेत का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सुंदर गात असतील नृत्य करीत असतील जर त्यांच्याकडे ती कला असेल तर ती कलाजोपासण्याचा अधिकार त्यांना नक्कीच आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाण्यावर नृत्य करतानाचे एक छायाचित्र व्हायरल झाले. त्यानंतर या छायाचित्रावर प्रतिक्रिया देताना नेटीझन तुटून पडले. अर्थात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असल्याने तशी चर्चा होणे स्वाभाविकच. पण, त्यामध्ये विशेष असे काय आहे ? राजकारणात आहे म्हणजे अगदी सोवळे पाळले पाहिजे की काय ? आपले छंद जोपासू नयेत असे समजण्याचे काय कारण ? आपल्याकडे असल्या फालतू चर्चेला खूपच महत्त्व दिले जाते.

आजकाल सर्वच क्षेत्रात बदल होत चालले असताना राजकारणही बदलले ते बदलत चालले. बरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारणात आहेत म्हणून त्यांच्या पत्नीने किंवा मुलींने आपणास जे जे आवडते त्यासाठी वेळ दिला किंवा त्या गोष्टी बिनधास्तपणे केले म्हणून आचारसंहितेचा भंग होणार आहे की काय ? राजकारणातील बरीच मंडळींचे पूर्वीचे जीवन लक्षात घेता असे दिसेल की कोणी चित्रपट, व्यवसाय, पत्रकारिता, खेळ, उद्योग अगदी गुन्हेगारी क्षेत्रातील गुंड मंडळीही राजकारणात आली. ते लोकप्रतिनिधी झाले. त्यामुळे त्यांच्या अंगी राजकारणाशिवाय वेगळे छंदही असणारच. राजकारणात आले म्हणून त्याने हेच करावे ते करून नये असे कुठे लिहिले आहे (गुन्हेगारी सोडून). राजकारणातील माणसांकडून आपण साधनसूचितेच्या खूपच अपेक्षा ठेवतो. एखाद्या नेत्याला असते धुम्रपानाची सवय. त्याने ते जाहीररित्या करू नये हे ठीक. पण, स्वत:च्या घरात तो दारू पित असेल तर काय हरकत आहे.

कर्नाटकाचे दिवंगत मुख्यमंत्री जे. एच. पटेल हे मुख्यमंत्री असताना जाहीररित्या मी दारू पितो असे म्हणत असतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही हो मी बीअर घेतो असे जाहीर सांगितले होते. माजी मंत्री प्रमोद नवलकर मंत्री असताना थेट मच्छिबाजारात जाऊन आवडीचे मासे आणत अशी एक ना अनेक उदाहरणे यानिमित्त देता येतील. पिंपरी चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल यांनी नृत्य केल्याने मध्यतंरी किती टीका झाली. तेच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल भारत दौऱ्यावर असताना त्यांनी कोळी गाण्यावर डान्स केला तर आपण त्यांना "चिअरअप' करतो. आनंद व्यक्त करतो. पण, आपल्याकडे कोणी असे नाचले असते तर त्याच्या अब्रुचे धिंडवडे निघाले असते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्या की त्या लोकांच्या आग्रहास्तव नृत्य करीत असत. पदावर असलेल्या मंडळीने प्रोटोकॉल पाळले पाहिजेत हे खरे. पण त्यांच्या पत्नी किंवा मुला-मुलांनीही प्रोटोकॉल पाळलेच पाहिजेत का ? मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुंदर गात असतील नृत्य करीत असतील. जर त्यांच्याकडे ती कला असेल तर ती कलाजोपासण्याचा अधिकार त्यांना नक्कीच आहे. दुसऱ्यांनी उगाच नाक मुरडायचे कारण काय ? प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे आणि ते प्रत्येकाने जोपासावे.

आपल्याकडे दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात नाक खुपण्याची सवय अधिक असल्याने अशा चर्चा होणारच. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे व्हायरल झालेले छायाचित्र पाहून इतकेच म्हणावेसे वाटते,"" छंद जिवाला वेड लावी पिसे''

Web Title: Prakash Patil write about Amruta Fadnavis