मराठीचा मक्ता काय गोरगरिबांनी घेतला आहे ? 

Education in Marathi
Education in Marathi

अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या मराठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते नागपूरहून मुंबईत आले. त्यांनी आपल्या कन्येसाठी मराठी शाळा शोधली नाही तर इंग्रजी शाळाच शोधली. तेच राज ठाकरे यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांचे. सर्व बड्या मंडळींनी प्रथम आपल्या मुला-मुलींना मराठी माध्यमांच्या शाळेत टाकावे त्यानंतरच गोरगरिबांना मराठीचे धडे द्यावे.
 

इंग्रजी ही वाघिणीचे दूध आहे असे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी म्हटले होते. चिपळूणकर यांच्या सारख्या महान मानवाला इंग्रजीचे महत्त्व कळले होते. भविष्यात इंग्रजीशिवाय काही खरे नाही हे त्यांना पक्के ठाऊक होते. आज गल्लीबोळात इंग्रजीच्या शाळा का सुरू झाल्या याचा गांभीर्याने कोणी विचार करीत नाही. उलट इंग्रजीला विरोध करून मराठीसाठी गळा काढला जातोय. हेच मुळात हास्यास्पद आहे. कशासाठी मराठी शाळेत प्रवेश घ्यायचा हा प्रश्‍न उरतोच. 

श्रीमंत, गर्भश्रीमंतांबरोबरच विविध पक्षाच्या नेत्यांची आणि सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुलं-मुली हायफाय शाळेत इंग्रजीचे धडे घेणार. शाळेत मुलामुलींना सोडायला आलिशान गाड्या. नोकरचाकर असे चित्र आहे. तर दुसरीकडे गरीब, शेताच्या बांधावर घाम गाळणारा, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरी करणाऱ्याची पोर मोडक्‍या तोडक्‍या आणि फुटलेल्या कौलांच्या शाळेत मायमराठीला जगविण्यासाठी धडे गिरविणार. वा ! क्‍या बात है ! 

शिक्षणतज्ज्ञ, राजकीय विश्‍लेषक वातानुकूलित कार्यालयात बसून छान विचार देतात. बहुजन समाजातील किंवा गरिबांनी मराठी जगविण्याचा मक्ता घेतला आहे का ? असा सवाल एका इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या आणि मराठी विषय नसणाऱ्या एका मुलीचा बाप मराठी मुलखातील सर्व शिक्षणतज्ज्ञांसह ढोंगी राजकीय पुढाऱ्यांना आणि मराठीचे बेगडी प्रेम असणाऱ्या मंडळींना करीत आहे. 

मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत असून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले आहे. याचा परिणाम म्हणून मुली शिक्षणापासून हद्दपार होणार आहेत. बहुजनांचे शिक्षण वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे असे शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे विश्‍लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी म्हटले आहे. डॉ.पवार यांचे भाषण वाचून मला आश्‍चर्य वाटले. क्षणभर माझ्या मनात विचार आला,'' जर माझी मुलगी नाही शिकली मराठी म्हणून काय मोठे आभाळ कोसळणार आहे. आज जर इंग्रजी जागतिक भाषा बनली असेल आणि तिला स्पर्धेत टिकायचे असेल तर तिला उत्कृष्ट इंग्रजी यायलाच हवे. असे एक पिता म्हणून माझे ठाम मत बनले आहे. याचा अर्थ मी मराठी विरोधात आहे असे नाही.'' 

भाषा जगविण्याचा ठेका काय बहुजनांनी आणि गोरगरीबांनीच घेतला आहे की काय ? याचे उत्तर प्रथम शिक्षणतज्ज्ञांनी द्यायला हवे. मराठी म्हणून मराठी भाषेविषयी अभिमानच आहे. त्याविषयी दुमत असण्याचे कारण नाहीच. पण, मराठी शाळा बंद पडतायत त्यामुळे बहुजन समाजातील मुली शिक्षणापासून वंचित राहतील ही भीती बाळगण्याचे कारण काय ? आपण प्रगत आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जगात वावरत असल्याने मुलगा-मुलगी असा भेदभाव करायलाच नको. मुलांपेक्षा मुलीच अधिक शिकलेल्या दिसून येतात. उलट स्पर्धेत मुली कुठेच कमी पडत आहेत असे चित्र नाही. मुलानाच कशाला मुलीलाही इंग्रजी शाळेत टाकायला पाहिजे. गाव-खेडे सोडले तर आज कोणत्याही शहरात जा. तेथे मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजीच चालते. गावातून मराठीचे धडे घेऊन बाहेर पडलेली मुले-मुली मोठ्या शहरात बावरतात. त्यांना इंग्रजी, हिंदीची भीती का वाटते ? याचे उत्तर कोणी देत नाही. जर खेड्यात मराठीबरोबरच इंग्रजीचा पाया भक्कम झाला तर गावातील ही गरिबांची मुलंही शहरातील मुलां-मुलींच्या बरोबर येतील. नाही तर 'गड्या आपला गावच बरा' म्हणून पुन्हा गावाकडे वळतील. 

मुंबई, पुणे असो किंवा कोल्हापूर. शहराबरोबरच तालुकास्तरावर गल्लीबोळात खासगी इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. प्रत्येक पालकाला आपल्या पोरा-पोरीनं इंग्रजी बोलाव. नीटनेटकं राहावं. टाय बांधून शाळेत जावे असे वाटते. हे आकर्षण त्याला श्रीमंत मुलांकडे पाहून वाटत असेल तर चूक काय ? पदरमोड करून पालक जर मुला-मुलींना इंग्रजी शाळेत का टाकतो याचा खरंच विचार व्हायला हवा. मराठी संपत चालली. मराठीला धोका म्हणून भुई बडविण्यात काहीच अर्थ नाही. 

शाळांचा दर्जा का सुधारत नाही. ज्ञानदान करणारे शिक्षक कोठे कमी पडतात? त्यांच्या डोक्‍यावर सरकारने इतर जो बोजा दिला आहे तो का कमी होत नाही ? शिक्षणाचा दर्जा सुधारला नाही तर नोकरीला मुकावे लागेल अशी सक्ती का केली जात नाही. मराठी शाळांची दुरवस्था पाहून तिकडे आजचा पालक फिरकतच नाही. हे कटुसत्य आहे. बिचाऱ्या शिक्षकांना नोकरी टिकविण्यासाठी ' चल, चल शाळेला चल चल तारा, ' अशी साद नव्हे तर हातपाय जोडावे लागत आहे. यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकते. 

महाराष्ट्रातील प्रत्येक गावात गेल्यास मंदिरासाठी कोट्यवधी खर्च झाल्याचे दिसून येईल. लोकवर्गणी सढळ हस्ते मिळत असते. मंदिराच्या कळसाला सोन्याचा पत्रा असतो. पण त्याच गावातील शाळेचा पत्रा गंजलेला तर असतो किंवा शाळेची कौले फुटकी तरी असतात. हे भीषण चित्र आज नाही तर वर्षानुवर्षे पाहण्यास मिळत आहे. एखाद्या सरपंचाने किंवा पुढाऱ्याने शाळेसाठी पुढाकार घेतला अशी उदाहरणे तुलनेने खूपच कमी आहेत. मग मराठीसाठी गळा काढून काहीच उपयोग होणार नाही. 
राहिला प्रश्‍न तो राजकारणी मंडळींचा. सर्वच मराठी नेते म्हणतात मराठी टिकली पाहिजे. ती जिवंत राहण्यासाठी सांघिक प्रयत्न करायला हवेत. हा शुद्ध ढोंगीपणा आहे.

अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या मराठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते नागपूरहून मुंबईत आले. त्यांनी आपल्या कन्येसाठी मराठी शाळा शोधली नाही. तर इंग्रजी शाळाच शोधली. तेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे. त्यांची मुलेही इंग्रजीचे धडे घेणार आणि ते रोज मराठी माणसाची चिंता करणार. कमीअधिक प्रमाणात सर्वच पक्ष याबाबतीत माळेचे मणी आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मराठीचा मला गर्व आहे तर इंग्रजीचा अभिमान आहे. मराठीबरोबर इंग्रजीही आलेच पाहिजे. त्यामुळे गल्लीबोळात इंग्रजी शाळा सुरू होत असेल तर काही बिघडत नाही. मराठी लिहिता, वाचता, बोलता आले तरी पुरे ! मराठीची चिंता करतानाच सर्व मोठ्या माणसांनी प्रथम आपल्या मुला-मुलींना मराठी माध्यमांच्या शाळेत टाकावे त्यानंतरच गोरगरिबांना मराठीचे धडे द्यावे इतकीच साधी मागणी आहे एका मराठी माणसाची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com