संवादिनी लहान बाळासारखी सांभाळावी! (प्रमोद मराठे)

प्रमोद मराठे
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

विद्यार्थी घडवत असताना आपण स्वतःच घडतो आहोत, याचा साक्षात प्रत्यय मला असंख्य वेळा आला आहे. महाविद्यालयीन जीवनात संवादिनीप्रमाणेच "रामभक्ती'चं व "नामस्मरणा'चं वेड - हो वेडच - मला लागलं. त्यामुळे रियाज केल्यावर नामस्मरणाचा व नामस्मरण केल्यावर रियाजाचा आनंद मला मिळतो!

विद्यार्थी घडवत असताना आपण स्वतःच घडतो आहोत, याचा साक्षात प्रत्यय मला असंख्य वेळा आला आहे. महाविद्यालयीन जीवनात संवादिनीप्रमाणेच "रामभक्ती'चं व "नामस्मरणा'चं वेड - हो वेडच - मला लागलं. त्यामुळे रियाज केल्यावर नामस्मरणाचा व नामस्मरण केल्यावर रियाजाचा आनंद मला मिळतो!

सर्वसाधारणपणे प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला विचारला जाणारा पहिला प्रश्न असतो ः "तुम्ही या क्षेत्रात कसे आलात?' डॉक्‍टर, इंजिनिअर त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात पदार्पण करतात; पण संगीतक्षेत्रात तसं नसतं! मला हा प्रश्न एकदा विचारला गेला होता, तेव्हा मलाच प्रश्न पडला की "माशाला प्रश्न विचारतात का, की "तू पाण्यात (सागरात) कधीपासून आलास'? माझे आतोबा (आत्याचे यजमान) पंडित विनायकराव पटवर्धन (पुण्यातल्या गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक), वडील धुंडिराजपंत, काका अनंतराव, मातुःश्री, ज्येष्ठ भगिनी असं सगळंच कुटुंब पूर्ण वेळ संगीत करणारं होतं. त्यामुळे वरील प्रश्नाविषयी माझं उत्तर असं, की मी स्वरसागरात येणारच होतो...आणि आलो!

नूतन मराठी विद्यालय व गांधर्व महाविद्यालय इथं लौकिकार्थानं माझं शालेय व सांगीतिक शिक्षण झालं. वडील धोंडूमामा प्राचार्य असल्यानं जाणत्या-अजाणत्या वयातच मी संस्थेत जाऊ लागलो. संगीतशिक्षणाची सुरवात अर्थातच कंठसंगीतानं झाली. इयत्ता दुसरी ते नववीपर्यंत तब्बल आठ वर्षं "प्रारंभिक ते विशारद परीक्षे'पर्यंतचा गायनाचा अभ्यास वडिलांच्या मृदू मार्गदर्शनाखाली झाला. मृदू म्हणण्याचं कारण असं, की माझे वडील कधीच रागावत नसत. मात्र, त्यांना जे हवं ते ते माझ्याकडून गोड बोलून करवून घेत. उदाहरणार्थ ः तबल्यावर सर्व ताल वाजवता यायला यावेत, तानपुरा मिळवता व वाजवता यायला हवा, सतार, व्हायोलिन, दिलरुबा, जलतरंग, यांचं ट्यूनिंग यायलाच हवं... हा त्यांचा आग्रह असे. सोपे राग व सिनेमातली गाणी त्यांनी मला वाजवायला शिकवली. पुढच्या आयुष्यात मला याचा सांगीतिक फायदा खूपच झाला. वैयक्तिक संगीतप्रवास उलगडायचा झाल्यास विद्यार्थी, कलाकार, गुरू किंवा मार्गदर्शक, प्रशासक (गांधर्व महाविद्यालयाचं संचालन) संयोजक (विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं संयोजन) असा बहुपैलूत्वाचा आहे.
"प्रत्येक कलाकार अथवा गुरू आयुष्यभर विद्यार्थीच असतो' या विधानाशी मी शंभर टक्के सहमत आहे. लहानपणापासून वडिलांनी एक गोष्ट मनावर बिंबवली व ती म्हणजे "कान, डोळे, स्वतःची बुद्धी सतत जागृत ठेव. चांगल्या गोष्टींचं सतत ग्रहण करत जा. लहान-मोठा असा कुठलाही विचार न करता!' याविषयी मला उस्ताद झाकीर हुसेन यांचंही एक वाक्‍य मला सतत स्मरतं. ते एकदा म्हणाले होते ः "प्रत्येक व्यक्तीला आई-वडील असतात अन्‌ त्यांच्याविषयी त्या व्यक्तीला प्रेम व आदरही असतो, यात विशेष काहीच नाही; पण आपल्याला काका, मामा, मावशी, थोरले भाऊ, धाकटे भाऊ असतात, त्यांच्याविषयीसुद्धा आपल्याला प्रेम, आदर असतो. तद्वत्‌ संगीत हेही आपलं कुटुंबच आहे व गुरूंप्रमाणेच सर्वांना मान व प्रेम द्या.' झाकीरजींच्या या वक्तव्याचा माझ्या मनावर खोलवर झालेला परिणाम, पडलेला प्रभाव हे माझ्या सांगीतिक यशाचं इंगित अर्थात गुपित आहे, असं मी विनयानं सांगू इच्छितो. लहान वयात जसं सगळ्यांचंच कौतुक होत असतं, तसंच माझंही कौतुक झालं, लाड झाले. आकाशवाणीवर "बालोद्यान' कार्यक्रमात भैरव रागगायन, एक-दोन समूहगायनांत सहभाग, शाळेत कवितांना चाली लावून गायन असं सुरू होतं. मात्र, मला कधीच विशेष व वेगळी वागणूक घरातून दिली गेली नाही, हे मला प्रकर्षानं आठवतंय. हेही आठवतंय की, माझ्या अनेक परदेशदौऱ्यांनंतर, मोठ्या कलाकारांना मी केलेल्या साथीनंतर, रसिकांकडून कौतुकोद्गार मिळाल्यानंतरसुद्धा माझे वडील म्हणायचे ः "ठीक आहे. अजून त्याला काहीच येत नाही. खूप काही करायचं बाकी आहे.'

झाकिरजींचं ते वाक्‍य, वडिलांचं माझ्याबद्दलचं मत आणि मालिनी राजूरकर, वीणा सहस्रबुद्धे व पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या प्रदीर्घ सहवासानं व शिकवणुकीतून माझे पाय जमिनीवर राहिले, असं मी कृतज्ञतापूर्वक म्हणेन. नववीपर्यंतचा माझा गायनप्रवास रडत-खडत झाला. कारण, तेव्हा आई-वडिलांची जबरदस्ती होती. नववीत माझा आवाज फुटला, गायन बंद झालं अन्‌ मला अत्यानंद झाला! (जे त्या वेळी वाटलं ते प्रामाणिकपणे सांगितल्याबद्दल रसिकांनी माफ करावं!). त्या वर्षभर मी महाराष्ट्र मंडळातल्या आखाड्यात रोज सायंकाळी मातीवरच्या कुस्तीचं रीतसर शिक्षण घेतलं. जोर, बैठका, कुस्ती, पोहणं याचा मला प्रचंड फायदा झाला. खिलाडूवृत्ती, झुंजारवृत्ती, येईल त्या संकटाशी सामना, रियाजाकरिता वाद्यं वाहून नेण्यासाठीची प्रचंड शारीरिक क्षमता यातून निर्माण झाली. अर्थात तेव्हा व्यायामाची लागलेली गोडी अजूनही टिकून आहे व तीसुद्धा "तालीम' मी माझ्या शिष्यांना देत आहे.

माझ्या विद्यार्थिदशेतल्या काही सुवर्णक्षणांपैकी एक म्हणजे परवीन सुलताना यांची त्यांच्या घरी झालेली भेट आणि त्यांच्या मधुर वाणीतून माझ्या मनावर कायमचं कोरलेलं एक वाक्‍य ः "प्रमोद, रियाज म्हणजे बॅंकेत केलेली बचत आहे. तरुणपणात खूप खूप रियाज/बचत करा आणि पुढं आयुष्यभर त्यावरील व्याजावर सुंदर आयुष्य जगा!'
परवीनजींशिवाय पुण्यातले त्या वेळचे प्रख्यात तबलावादक उस्ताद गुलाम रसूल व पंडित चंद्रकांत कामत यांच्या शिकवणुकीतून माझ्या वयाच्या 19 ते 23 पर्यंत माझा प्रचंड रियाज झाला. दिवसात कमीत कमी आठ ते जास्तीत जास्त 20 तासांपर्यंत मजल पोचली होती. असो! गायनशिक्षण थांबून एक वर्षं कुस्तीचं प्रशिक्षण झालं आणि चमत्कार घडावा अशी घटना एके दिवशी घडली.

माझे मित्र आणि माझे पहिले (हार्मोनिअम) संवादिनीगुरू दिलीप गोसावी हे नोकरीनिमित्त सहा महिने कल्याणहून पुण्याला आले. त्यांचा मुक्काम गांधर्व महाविद्यालयात होता. (माझे वडील आणि दिलीप यांचे वडील वसंतराव हे गुरुबंधू). दिलीप यांचं हार्मोनिअमवादन ऐकून मी या वाद्याकडं आकृष्ट झालो. त्यांच्याकडं शिक्षण सुरू झालं अन्‌ दोन महिन्यांनी दिलीप पुन्हा कल्याणला परतले. त्यानंतर 15 पैशांच्या पोस्टकार्डच्या माध्यमातून संपर्क असायचा किंवा परतीच्या भाड्याइतके पैसे जमले की मी कल्याणला जायचो. अशा प्रकारे सुमारे दोन वर्षं शिक्षण घेतलं. महिन्यातून किंवा दोन महिन्यांतून एका शनिवारी/रविवारी हे शिक्षण व्हायचं. दिलीप यांचे वडील वसंतराव हे कल्याणच्या "दिनकर संगीत विद्यालया'चे प्राचार्य होते. त्याच विद्यालयात रात्री 10 ते सकाळी सहा असं हे शिक्षण चाले. दिलीप यांच्याकडं दोन-तीन वर्षं शिक्षण झाल्यावर त्यांनी त्यांचे गुरू पंडित मनोहर चिमोटे यांच्याकडं शिक्षण घेण्याचा सल्ला मला दिला. मग माझी यात्रा पुणे-दादर सिंहगड एक्‍स्प्रेसनं दादरला व तिथून दादर-विरार लोकलनं गुरुजींच्या घरी...अशी सुरू झाली. तिथं स्नान, भोजन, दुपारची विश्रांती, विरार-गोरेगाव प्रवास, (क्‍लास गोरेगावला होता) सायंकाळी पाचपासून शिक्षणाला प्रारंभ, कमीत कमी चार-पाच तास शिक्षण, त्यानंतर रात्रीचं भोजन एकत्र, त्यांत वैचारिक गप्पांमधून शिक्षण व शेवटच्या लोकलनं गुरुजी विरारला जात व मी मुंबई सेंट्रलला येऊन रात्री दीडच्या शेवटच्या एशियाड बसनं पुण्याला परतत असे. असा तो सगळा क्रम होता. या सर्व गोष्टींचा माझ्या मनावर असा सुपरिणाम झाला, की विद्यार्थ्यांना त्रास होऊ न देता त्यांना जास्तीत जास्त मुक्त हस्तानं विद्यादान करायचं, असं मी ठरवलं. माझ्या वयाच्या 21-22 व्या वर्षी एक विलक्षण कलाटणी माझ्या आयुष्याला मिळाली. "डी. एस. रामसिंग कंपनी'च्या हार्मोनिअमच्या प्रेमात मी पडलो. काहीही करून ती मिळवायचीच, असा माझा विचार मी वडिलांना सांगितला. त्या वेळी तिची किंमत होती 1800 रुपये. किंमत ऐकल्यावर वडिलांनी अतिशय सौम्य भाषेत सुनावलं ः "पैसे झाडाला लागत नाहीत, स्वतः कमव व विकत घे.'

-माझ्या मेहुण्यांच्या कंपनीचं तेव्हा चंद्रपूरला काम सुरू होतं. नवीन हार्मोनिअम विकत घ्यायची म्हणून मी तिथल्या औष्णिक विद्युत केंद्रासाठी सुपरवायझर म्हणून दहा महिने नोकरी केली. "चंद्रपूर' इथं कष्ट करून खरेदी केलेल्या हार्मोनिअमचं नामकरण नरेंद्र चिपळूणकर व तेव्हाच्या मित्रांच्या साक्षीनं "चंद्रिका' असं करण्यात आलं! या हार्मोनिअमचं एका वर्षातच "काळी पाच' या स्वरात "गंधार ट्यूनिंग' केलं गेलं आणि "वीणाताईंची हार्मोनिअम' अशी तिची ओळख बनली!

व्यावसायिक साथ असलेला माझा पहिला कार्यक्रम म्हणजे "दादर माटुंगा सर्कल' इथं झालेला वीणाताई यांचा कार्यक्रम! ता. 14 जुलै 1985 रोजी तो झाला. या कार्यक्रमानं माझी व वीणाताईंची सांगीतिक कारकीर्द बहरली. वीणाताई या नात्यानं माझी आत्या (वडिलांची सख्खी मावसबहीण) त्यामुळे व आमची मनं जुळल्यामुळे मी सर्वाधिक काळ साथसंगत केलेल्या कलाकारांमध्ये वीणाताईंचा उल्लेख अटळ आहे. वीणाताईंपाठोपाठ प्रभा अत्रे, मालिनी राजूरकर, पद्मा तळवलकर, आरती अंकलीकर या गायिकांबरोबरच संजीव अभ्यंकर, राजन-साजन मिश्रा, जयतीर्थ मेवुंडी, व्यंकटेशकुमार, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी अशा क्रमानं माझा सांगीतिक प्रवास बहरतच गेला. भीमसेनजींसोबत 1995 मध्ये अमेरिकेत 21 दिवसांत 14 कार्यक्रम हा माझ्या साथसंगतीच्या प्रवासातला मी "कळसाध्याय' समजतो. वीणाताई व संजीव यांचे असंख्य कार्यक्रम मी वाजवले असले तरी "हा अमुकचा संगतकार' हा शिक्का माझ्यावर कधीच बसला नाही. 15 पेक्षा जास्त कलाकारांसोबत, 13 देशांमध्ये 30 दौरे असं भाग्य मला मिळालं. हे सर्व लिहिताना एक गोष्ट नम्रतापूर्वक नमूद करावीशी वाटते ती ही, की रियाज करताना व शिक्षण घेताना डोळ्यासमोर वरील गोष्टी कधीच नव्हत्या. या क्षेत्रात आल्यानंतर आत्तापर्यंतच्या गुरूंनी सांगितलेल्या आणि कायम लक्षात ठेवलेल्या तीन गोष्टी अशा ः 1) पिताश्री उवाच ः "ज्या व्यक्तीला तानपुरा मिळवता येत नाही त्या व्यक्तीसोबत "संगीत'विषयक चर्चा करू नये". 2) दिलीप गोसावी ः "पैशाच्या मागे लागलास तर पैसा पाठ दाखवेल. पैशाला पाठीमागे सोड, मग पैसा पाठ सोडणार नाही'. 3) पंडित मनोहर चिमोटे ः "संगीतक्षेत्रातल्या मूर्खांना डिवचू नये'! साथसंगतक्षेत्रात जास्तीत जास्त प्रामाणिक राहायला शिकवणारा माझा गुरू म्हणजे माझा परममित्र, सहव्यावसायिक डॉक्‍टर अरविंद थत्ते! "गंधार ट्यूनिंग'ची हार्मोनिअम वापराची सवय मला अरविंदमुळे लागली. आमच्या दोघांच्या स्वभावात काहीसा अतिरेकी भाव असतो; पण तो "आपल्या वाद्याला कुणी नावं ठेवता काम नये,' याकरिताच असतो. साधारणतः सन 2000-2001 मध्ये मी व भरत कामतनं हैदराबादमधून चालणाऱ्या एका टीव्ही चॅनेलसाठी 12 विविध गायक/गायिकांच्या 36 भागांसाठी साथसांगत केली. "प्रत्येकासोबत "गंधार ट्यूनिंग' संवादिनी वाजवायची' या माझ्या हट्टापोटी मी सहा वाद्यं हैदराबादला नेली. ज्याप्रमाणे "प्रेम कधीही एकतर्फी होत नसतं' किंवा "एकतर्फी प्रेमाला काही अर्थ नसतो' याच धर्तीवर वाद्यांबाबत, कलेबाबतही म्हणता येईल. तुम्ही आधी तुमच्या वाद्यांवर, कलेवर प्रेम करायला हवं मग ती वाद्यं, ती कलाही तुमच्यावर प्रेम करेलच!!

"संवादिनी कशी सांभाळायची? तिची काळजी घ्यायची?' असं मला परवा एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. मी तत्क्षणी म्हणालो ः "लहान बाळाला आपण जसं सांभाळतो ना, तशीच सांभाळायची असते संवादिनी!' संगीतशिक्षकाची माझी कारकीर्द 1980 मध्ये सुरू झाली. निमित्त झालं ते कॉलेजमध्ये जायला लागल्यावर मी वडिलांकडं "पॉकेटमनी' मागितला.' त्यांनी मला तत्काळ एक पत्ता दिला. तो पत्ता चतुःश्रृंगीसमोर राहणाऱ्या देशपांडे आडनावाच्या बाईंचा होता. वडील मला म्हणाले ः ""आठवड्यातून एक दिवस देशपांडे बाईंना हार्मोनिअम शिकव व चाळीस रुपये फी घे.' दुसरी ट्यूशन होती थेट वानवडीत! दोन टोकांना असलेल्या या दोन्ही ठिकाणी मी त्या वेळी सायकल मारत जात असे. गेली 38 वर्षं अव्याहतपणे अध्यापनकार्य सुरू आहे. सुरवातीच्या चार-पाच वर्षांनंतर मी गायन सोडून फक्त संवादिनी या वाद्यावर लक्ष केंद्रित केलं आणि "जे काही अर्थार्जन करेन ते फक्त संवादिनीच्याच माध्यमातून करेन,' असा मनाचा निश्‍चय केला. संवादिनीशिक्षक, संगतकार, परीक्षेनुसार या वाद्याविषयीच्या पुस्तकांचं लेखन, त्याबरहुकूम सीडींची निर्मिती, इतकंच नव्हे तर या वाद्याची खरेदी/विक्री, दुरुस्ती अशी विविध कामं सुरवातीच्या काळात मी केली. माझ्या हातून असंख्य विद्यार्थी घडण्याचं प्रमुख कारण म्हणजे, पुण्यातली "गांधर्व महाविद्यालय' ही वास्तू. ही वास्तू मला 24 तास उपलब्ध होती. ही वास्तू मला स्वतःला रियाजासाठी, विद्यार्थ्यांसोबत शिकवताना, त्यांच्या निवासासाठी उपलब्ध झाली. मला स्वतःला रियाजाचं "व्यसन'च असल्यानं दिवसातले 10-12 तास स्वतःसोबतच शिष्यांकडून रियाज करून घेतला. यातून किती विद्यार्थी तयार झाले, याचा मी अजून हिशेब केला नाही. मात्र, पंडित सुरेश तळवलकर व पंडित उल्हास कशाळकर यांना आदर्श मानून पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या एक टक्का तरी कार्य हातून व्हावं, अशी मनोमन इच्छा आहे व तसा प्रयत्न मी करत आहे. विद्यार्थी घडवत असताना आपण स्वतःच घडतो आहोत, याचा साक्षात प्रत्यय मला असंख्य वेळा आला आहे. महाविद्यालयीन जीवनात संवादिनीप्रमाणेच "रामभक्ती'चं व "नामस्मरणा'चं वेड - हो वेडच - मला लागलं. त्यामुळे रियाज केल्यावर नामस्मरणाचा व नामस्मरण केल्यावर रियाजाचा आनंद मला मिळतो! श्रीक्षेत्र गोंदवले व महाराज हे माझं असीम श्रद्धास्थान आहे. त्यामुळे गेली 35 वर्षं अव्याहत, तसंच रामनवमीच्या दिवशी अखंड 24 तास रियाजाचा माझा संकल्प विद्यार्थ्यांच्या मदतीनं सुरू आहे. याचा माझ्या मनावर झालेला संस्कार म्हणजे, सगळं काही त्यांच्या इच्छेनं, कृपेनं होत आहे, अशी दृढ निष्ठा निर्माण झाली व त्यामुळेच हातून अनेक उत्तमोत्तम कार्यं घडत गेली.

Web Title: pramod marathe write article in saptarang