शाळा आणि सुटी (प्रसाद मणेरीकर)

प्रसाद मणेरीकर pmanerikar@gmail.com
रविवार, 6 मे 2018

मुलं शाळेत कधीपर्यंत आली पाहिजेत, त्यांना सुटी किती असावी, कधी असावी आणि का असावी हा प्रश्न उद्‌भवतो याचं कारण आहे ते आपल्या शाळेविषयीच्या पारंपरिक दृष्टिकोनात. सुटीचा विचार करताना शाळा, शिक्षणाची प्रक्रिया, शिक्षकांचा सहभाग, मुलांची-पालकांची मानसिकता या सर्वच गोष्टींचा मुळापासून विचार करावा लागेल.

मुलं शाळेत कधीपर्यंत आली पाहिजेत, त्यांना सुटी किती असावी, कधी असावी आणि का असावी हा प्रश्न उद्‌भवतो याचं कारण आहे ते आपल्या शाळेविषयीच्या पारंपरिक दृष्टिकोनात. सुटीचा विचार करताना शाळा, शिक्षणाची प्रक्रिया, शिक्षकांचा सहभाग, मुलांची-पालकांची मानसिकता या सर्वच गोष्टींचा मुळापासून विचार करावा लागेल.

पहिली ते नववीची मुलं परीक्षेनंतर मे महिन्याची सुटी सुरू होईपर्यंत शाळेत येतील आणि शाळेत शिक्षकांनी त्यांचे गाणी, गोष्टी, पुस्तकवाचन, कलाकाम इत्यादी उपक्रम घ्यावेत, असं राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. नंतर या वर्षीसाठी हा निर्णय मागं घेण्यात आला. मात्र, पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी कदाचित सुटीमध्ये थोडी कपात होईल किंवा विशिष्ट उपक्रम पार पडले नाहीत, तर परीक्षा संपल्यानंतरही मुलांना काही काळ शाळेत यावं लागेल, असंही बोललं जात आहे. याबाबतचा संभ्रम लवकरच दूर होईल आणि चित्र स्पष्ट होईल. मात्र, एकूणच या चर्चांच्या आणि निर्णयांच्या निमित्तानं शाळा, सुटी आणि मुलं या त्रिकोणाचा वेगळ्या प्रकारे विचार करण्याची गरज आहे.

मुलं शाळेत कधीपर्यंत आली पाहिजेत, त्यांना सुटी किती असावी, कधी असावी आणि का असावी हा प्रश्न आज उद्‌भवला आणि कदाचित उद्याही असाच उद्‌भवेल याचं कारण आहे ते आपल्या शाळेविषयीच्या पारंपरिक दृष्टिकोनात. शाळेत मुलांनी यायचं, शिकवू ते शिकायचं, ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करायचा, निमूट अभ्यास करायचा, परीक्षेत शक्‍य तितके गुण मिळवून पास व्हायचं, श्रेणी घ्यायची आणि पुढील इयत्तेत जायचं... ज्यांना हे जमत नाही त्यांनी शाळा सोडून किंवा नापास होऊन घरी बसायचं. शाळा का सोडली? तर आवडत नव्हती, वा हुशार नव्हता, अभ्यास करत नव्हता, म्हणून नापास झाला. आपण कितीही नाकारलं, तरी शाळेबद्दलचा आपला हा दृष्टिकोन अजूनही थोड्याफार फरकानं असाच आहे. शिकण्याचा संबंध आपण थेट परीक्षेशी आणि पास-नापासाशी लावतो. कारण शाळा म्हणजे नेमून दिलेला अभ्यास करणं, त्यावर आधारित परीक्षा देणं इतकाच विचार आपण वर्षानुवर्षं करत आलेलो आहोत. रचनावाद स्वीकारला, तरी त्यात फारसा फरक पडलेला नाही आणि शाळेत जाऊन शिकणं म्हणजे पास-नापास याचा पगडा आपल्यावर इतका आहे, की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धत स्वीकारून इतकी वर्षं झाली, तरी या पारंपरिक दृष्टिकोनात फरक पडलेला नाही.

दुसरं म्हणजे, "परीक्षा संपली म्हणजे आता शाळेला सुटी' ही मुलांची आणि पालकांचीही तयार झालेली मानसिकता शाळा नामक व्यवस्थेसाठी जास्त घातक आहे. शाळेकडं मुलं वा पालक काय दृष्टीनं पाहतात, हे यातून लक्षात येतं. नेहमीच्या कामातून सुटी गरजेची असते आणि सुटीचा आनंद उपभोगावाही. मात्र, शाळा (एकदाची) संपली आणि सुटी सुरू झाली याचा आनंद होतो, याचा अर्थ मुलांना शाळा ही सक्तीची आणि कंटाळवाणी व्यवस्था वाटते.

प्रश्न कसे सोडवायचे?
खरं तर शाळा ही व्यवस्था आपण मुलांच्या शिकण्यासाठी तयार केली आहे; आणि नव्या मेंदू संशोधनानुसार मुलाचं मन सतत नवं शिकण्यासाठी तयार असतं, शिकण्याचा नवनव्या संधी शोधात असतं, शिकण्यातून आनंद मिळवत असतं. मग तरी शाळा संपली याचा मुलांना का आनंद व्हावा? कारण मुलांचं शिकणं, त्यातून त्यांना मिळणारा आनंद आणि शालेय व्यवस्था ही तिपेडी वीण नीटपणे बांधायला आपण कमी पडतो आहोत. मुलांना काय किंवा शिक्षकांना काय- शाळेत जे जे काही करू त्यातून आनंद अनुभवता आला पाहिजे. (मूल काय किंवा कोणीही माणूस काय- शिकतो म्हणजे तो ताण घेतो. मात्र, तो ताण सकारात्मक असेल तर शिकणं चांगलं होतं, त्यातून आपण शिकलो याचा आनंद मिळतो.) हे झालं म्हणजे आपोआपच इतर प्रश्नांची तीव्रता कमी होते.

ज्या चौकटीत हे प्रश्न निर्माण होतात त्याच चौकटीत बसून, आपण त्या प्रश्नांची उत्तरं, तीही त्याच चौकटीत बसतील अशी शोधू लागलो, की गोंधळ उडतो. उदाहरणार्थ, शाळेच्या पाच तासांत जी मुलं शिकू शकत नाहीत, त्यांना शाळेच्या आधी वा नंतर एक तास जादा घ्या, असा फतवा निघतो. आता ती पाच तासांत शिकू शकत नसतील, तर जादाच्या एक तासात कशी शिकतील? आणि जादाच्या एक तासात ती खरंच शिकत असतील, तर शाळेतले उरलेले पाच तास त्यांनी वाया का घालवायचे? मग त्या पाच तासांत त्यांना आवडेल ते करू द्यायचं, किंवा वर्षभर जी मुलं मागं आहेत त्यांना शिक्षकांनी परीक्षेनंतरच्या पंधरा दिवसांत शिकवायचं, या प्रकारामुळं मूळ प्रश्न सुटतच नाहीत; पण शिक्षक आणि मुलं हे दोनही घटक शाळा या व्यवस्थेविषयी मनात नाराजी मात्र बाळगून राहतात.

ही नाराजी न होता मुलं शाळेत यायला हवी असतील, आणि शिक्षकही सदैव तितकेच उत्साही दिसायला हवे असतील, तर आपल्या शाळेविषयीच्या दृष्टिकोनात मुळातून बदल करावे लागतील. शाळा ही मुलांनी शिकावं म्हणून आहे, यात दुमतच नाही. त्यामुळं खरं तर तिथं सदैव मुलांच्या शिकण्याचा विचार आणि काम झालं पाहिजे. मुद्दा येतो ते हे शिकण्याचं काम कसं झालं पाहिजे असा. उत्तर सरळ आहे, की ते शिक्षक आणि मुलं या दोघांसाठीही आनंददायी असलं पाहिजे.

मुलं आणि शाळा यांचा संबंध
इथं प्रश्न येतो तो मुलं आणि शाळा यांतल्या संबंधाचा. मुळात शाळा मुलांसाठी असेल आणि मुलांनी शाळेत यावं आणि शिकावं असं आपल्याला वाटत असेल, तर काही मूलभूत स्वरूपाचे बदल आपल्याला विचारातच घ्यावे लागतील. शाळेत मुलांना का यावंसं वाटेल, त्यांना काय शिकायला आवडेल, कसं शिकायला आवडेल या संदर्भात मुलांच्या मतांचा विचार आपण कधी करतच नाही. मुळात या संदर्भात मुलांना मतं असू शकतात, हेच आपल्याला पटत नाही. मुलांच्या समोर त्यांच्या संदर्भातला एखादा प्रश्न ठेवला, तर तो प्रश्न सोडवण्यासाठी मुलं मनापासून प्रयत्न करतात, त्याच्या सोडवणुकीचे अनेक पर्याय देतात. मुलांची ही प्रश्न सोडवणुकीची प्रक्रिया पाहणं हा फार आनंददायी अनुभव असतो. सरकारला मुलं जर पूर्णवेळ, किंवा सुटीतही काही काळ शाळेत यावीशी वाटत असतील (आणि ते वाटणं योग्यच आहे), तर मुलांना शाळेत यायला का आवडेल याचा त्यांनी जरूर शोध घेतला पाहिजे आणि मग ते घटक शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनवले पाहिजेत. पण मग सगळीकडं एकाच अभ्यासक्रम, एकाच प्रकारे परीक्षा, एकाच प्रकारे मूल्यमापन ही चौकटही आपल्याला सोडावी लागेल. त्यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं स्वरूप पूर्णत: बदलावं लागेल. सांगितलं ते शिकवण्यापेक्षा शिक्षक अधिक सर्जनशील कसा बनेल, असे प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावे लागतील.

मुलं शाळेत का येतील?... त्यांना शाळा आवडली तर! त्यांना शाळा का आवडेल?... मुलांना त्यांना हव्या त्या पद्धतीनं शिकायला मिळालं तर! (मुलांना शिकायला आवडत नाही हा आपला भ्रम आहे, मुलांना शिकायला आवडतं ते त्यांना हव्या त्या पद्धतीनं शिकायला मिळालं तर. प्रश्‍न आपला आहे, की मुलांना कोणत्या पद्धतीनं शिकायला आवडतं ते ओळखून तशी संधी देण्यात आपण कमी पडतो.) तसं झालं, तर मुलं आपणहूनच, स्वयंप्रेरणेनं, आनंदानं शाळेत येतील. आमच्या ग्राममंगल संस्थेत शाळांना सुट्या खूप कमी दिवस असतात. मुलं नियमित शाळेत येत असतात. घरी एखादा दुःखद प्रसंग आलेला असतानासुद्धा शाळेत जायचं म्हणून हट्ट करणारी मुलं आम्हाला माहिती आहेत. कारण शाळा हा त्यांच्यासाठी आनंदाचा अनुभव असतो. शिकण्याची सांगड आम्ही परीक्षा, पास-नापास यांच्याशी कधीच घातली नाही. जे मुलांचं तेच शिक्षकांचं.

उपक्रम रोजच असणं आवश्‍यक
परीक्षेनंतरच्या काळात शिक्षकांनी मुलांसोबत विविध उपक्रम करावेत, ही सरकारची कल्पना योग्यच आहे; पण ज्या गाणी, गोष्टी, कविता, नाटक, कलाकाम इत्यादी उपक्रमांविषयी शिक्षणमंत्री बोलतात, ते खरं तर रोजच्या उपक्रमाचा भाग व्हायला हवेत. मुलांना या आणि अशा विविध माध्यमांतून शिकण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या विविध संधी मिळायला हव्यात. तसं होण्यासाठी आधी शिक्षकाची त्यासाठी आवश्‍यक ती तयारी व्हायला हवी. ती तशी होण्यासाठी आवश्‍यक ती सातत्यपूर्ण प्रशिक्षण यंत्रणा हवी. केवळ उद्यापासून हे हे करा, असं सांगून ते होत नाही. आदेश दिले तर केवळ आदेशपूर्ततेचे कागद भरले जातील.

शिक्षकांनी विविध उपक्रम घ्यावेत, नाट्यीकरण करावं, कविता तालासुरात म्हणाव्यात, कलाकाम घ्यावं हे योग्यच आहे. ते करायलाच हवं. मात्र, हे करायचं कसं त्यासाठी आवश्‍यक कौशल्य शिक्षकांत निर्माण करायला नको का? कारण प्रत्येक विषयाचं एक शास्त्र आहे. भाषा गणितासारखी शिकवून चालत नाही हे जसं कळावं लागतं, तसं गणित आणि चित्रकला एकत्र कसं जोडता येईल, हेही कळावं लागतं. यासाठी ती शिक्षकांची आवश्‍यक ती तयारी करावी लागेल. ती केवळ तीन दिवसांच्या प्रशिक्षणातून होत नाही, त्यासाठी डीएड-बीएडचे अभ्यासक्रम मुळातून बदलावे लागतील. ते शिक्षकाला अधिक सर्जनशील करणारे असावे लागतील.

पालकांचाही सहभाग
दुसरं म्हणजे शाळा, मुलं आणि शिक्षक हे समीकरण आपण इतकं घट्ट बांधून ठेवलं आहे, की मुलांच्या शिकण्यासाठी शिक्षकापलीकडं दुसऱ्या कशाचा विचारच आपल्या मनात येत नाही. खरं तर कोणत्याही गावात विविध गुण असणारी इतकी माणसं असतात, की त्यांना शाळेशी जोडून घेतलं तर शिक्षकांवरचा ताण कमी होऊ शकतो. ठरीव अभ्यासक्रमाला पूरक ठरणारे आणि त्या अभ्यासक्रमाच्या पलीकडं जाणारे अनेक उपक्रम या लोकांच्या माध्यमातून करता येतील. मुलांनाही आपल्या पालकांकडून शिकायला आवडेल आणि पालकांसाठीही आनंदाची व अभिमानाची बाब ठरेल. हा कधी तरी एखादा उपक्रम म्हणून करण्याचा भाग नसेल, तर दैनंदिन शालेय कामाचा भाग असेल. या दृष्टीनं शाळेत अस्तित्वात असलेल्या पालक समित्या अधिक सक्षम कशा करता येतील, हा विचार करता येईल. यातून शाळा अधिक सक्षम होईल आणि मुलांचं शिकणं अधिक प्रभावी होईल.

पालकांना शाळेशी जोडून घेणे, विविध विषय एकत्रितपणे मुलांसमोर ठेवणं, शिक्षक आणि मुलांमधली सर्जनशीलता जोपासणं व वाढवणं या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या "अक्षरनंदन', "ग्राममंगल', "सृजन आनंद', "आनंदनिकेतन' अशा प्रयोगशील शाळांनी अनेक प्रयोग केलेले आहेत, ते यशस्वी झालेले आहेत. ते सार्वत्रिक करायचे, तर अर्थातच त्यात काही बदल करावे; पण हे प्रयोग समजून घेऊन जरूर वापरावेत. ज्यातून शाळा हे केवळ शिकण्या-शिकवण्याचं केंद्र न राहता एक सर्व समाजाचा सहभाग असलेलं निर्मितीशील केंद्र बनेल. जे कदाचित शिक्षण मंत्र्यांना अपेक्षित असावं.

यासाठी काय करावं लागेल? एक सर्वंकष निश्‍चित असं दीर्घकालीन शिक्षणविषयक धोरण ठरवावं लागेल. हे ठरवताना त्याच्याशी संबंधित प्रत्येक घटकाचं मत विचारात घावं लागेल. शिक्षण कशासाठी, या मूलभूत अशा प्रश्नाचं ठोस उत्तर ठरवावं लागेल. त्यामागं पुढच्या पन्नास वर्षांचा विचार असेल. नाही तर आपण सुटीबाबतच्या निर्णयासारखे तात्कालिक निर्णय घेत राहू. त्याचे प्रतिसाद आणि परिणामही तात्कालिकच राहतील.

Web Title: prasad manerikar write school article in saptarang