
लेहमध्ये आपली मराठी खानावळ
आयुष्यात वेगवेगळे टप्पे आपल्याला खुणावत असतात; मात्र एकाच ठिकाणी स्थिरस्थावर होण्याचा आपला प्रयत्न असतो. मी लहानपणापासून आवडेल तिथे रमलो. एकाच ठिकाणी न थांबता नवे काहीतरी करण्याचे धाडस करत गेलो. आजवरच्या प्रवासात दोन गोष्टी आवर्जून केल्या. एक, कुठल्याही कामाची लाज बाळगली नाही. जे काम निवडलं ते मन लावून केलं. आवडतात ते छंद मन:पूर्वक जोपासले. नाटकात कामं केली, पत्रकार झालो, मतदार नोंदणी अभियान राबवलं, गोवा-मुंबईसह पुढे अरुणाचल प्रदेशात सायकलिंग केलं. डिजिटल कन्सल्टन्सी कंपनी सुरू केली. फूड सायकलचा घाट घालत आता लेहमधील ११ हजार ५०० फूट उंचीवरील पहिली मराठमोळी ‘खानावळ’ सुरू केली. इथपर्यंतच्या प्रवासाची ही गोष्ट...
शाळेत असताना मी अनेकदा मुख्याध्यापकांच्या खोलीबाहेर उभा असे. बाहेर ‘ननावरे आला आहे’, असा निरोप जाई आणि मला आत बोलवलं जायचं. कोणत्या तरी नवीन उपक्रमात किंवा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांची परवानगी मागण्यासाठी किंवा मला मिळालेलं बक्षीस त्यांना दाखवण्यासाठी मी मुख्याध्यापकांकडे जात असे. मी अभ्यासात कधीच हुशार नव्हतो. घरूनही कधी इतके गुण मिळालेच पाहिजेत, असा दबाव टाकला गेला नाही; पण वडिलांकडून एक गोष्ट कायम सांगितली जायची, की शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त होणाऱ्या सर्व उपक्रम, स्पर्धांमध्ये सहभागी झालं पाहिजे. कदाचित त्यामुळे सरळमार्गी अभ्यास करून डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचा विचार कधी डोक्यात आलाच नाही.
बाबा ‘बेस्ट’ परिवहन सेवेत नोकरीला असले, तरी वर्तमानपत्रे आणि साप्ताहिकांमध्ये विविध विषयांवर लिहीत असत. त्यांच्याकडूनच माझ्यात वाचनवेड रुजले. लग्नानंतर आता माझ्या नवीन घरीसुद्धा बायको नाजुका आणि मलासुद्धा वाचनाची आवड असल्याने पुस्तकांसाठी एक वेगळा कोपरा राखून ठेवलाय. शाळेत असताना बाबांचे लेख छापून आले, की शिक्षक लेखाबाबतची प्रतिक्रिया त्यांना कळवायला सांगत असत. तेव्हा वाटू लागलं की आपलंही नाव छापून यायला हवं. मी ज्या कोणत्याही शिबिरांना जायचो तिथला अनुभव लिहून काढून वर्तमानपत्रांना पाठवत असे. त्यापैकी काही पत्रांना वाचक प्रतिसादामध्ये स्थान मिळाले. आत्मविश्वास वाढू लागला आणि हळूहळू लिहू लागलो.
माझ्या आईचा गेली अठ्ठावीस वर्षे मासेविक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी जेव्हा सर्व मुलं मैदानावर क्रिकेट खेळण्यात दंग असत तेव्हा मी रस्त्यावर आईच्या बाजूला वेगळा फळा लावून मासे विकायचो. दसऱ्याला झेंडूच्या फुलांची तोरणं, दिवाळीला पणत्या, रांगोळी, रंगपंचमीला रंग, पिचकाऱ्या, नवरात्रीत फुलांच्या वेण्या विकणे असे अनेक धंदे शाळेच्या वयात असताना केले आहेत. त्यामुळे आजही कुठलंही काम करण्याची लाज वाटत नाही.
शाळेमध्ये कला विभागात होतो. दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या सर्व शाखांच्या दरवर्षी भरणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सहभागी होणं, हा जणू दंडकच होता. तिथूनच अभिनयाची गोडी लागली. गौरी केंद्रे यांच्याकडे अभिनयाचं शिबिर केलं. दूरदर्शन आणि स्टार प्लसवरील काही मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे दहावीनंतर ज्या महाविद्यालयांमध्ये चांगलं नाटक होतं, तिथेच प्रवेश घ्यायचा हे मनाशी पक्कं केलं. दहावीत मला पंच्चावन्न टक्के होते.
तरी मी कला शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी साठ्ये, भवन्स, रुपारेल, रुईया आणि झेवियर्स अशा फक्त पाच प्रथितयश महाविद्यालयांचाच अर्ज भरला होता. सुदैवाने रुपारेलमध्ये प्रवेश मिळाला. शाळेतील अनुभवाच्या आधारावर नाट्य विभागात प्रवेश मिळाला आणि तिथे इतका चांगला ग्रुप मिळाला की पुढील पाच वर्षे मी जवळपास फक्त नाटक एके नाटक केलं. ‘एनसीसी’मध्येही होतो. नाटकाच्या ग्रुपमधून ‘आविष्कार’सारख्या नाट्यसंस्थेत जाऊ लागलो. तिथे अनेक दिग्गजांना काम करताना जवळून पाहता आलं. चेतन दातार, पं. सत्यदेव दुबेंसारख्या नाट्यमहर्षींच्या हाताखाली काम केलं.
दिग्दर्शकाला चहा आणून देणं, नेपथ्य लावणं, टेम्पोत सामान भरण्यापासून ते नाटकांमध्ये प्रमुख भूमिकाही केल्या. पुढे पूर्णवेळ अभिनय क्षेत्र निवडलं नसलं, तरी हा काळ खूप काही शिकवून गेला. संघभावना काय असते, इथे शिकायला मिळालं. नवीन लेखक वाचले, नाटकं पाहिली, फिल्म फेस्टिव्हलमुळे परदेशी चित्रपटांची गोडी लागली.
शाळेपासूनच लिखाणाला सुरुवात झाली होती. रुपारेल महाविद्यालयात असताना वर्तमानपत्रात पत्र, लेख छापून आले की ते महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डावर लागत असत. लिहीत होतो, पण लिखाणाला योग्य दिशा मिळणं आवश्यक होतं. त्यासाठी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवीच्या तीन वर्षांत कॉलेजमधील बातम्यांचं रिपोर्टिंग करण्याव्यतिरिक्त भरपूर वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केलं. कॉलेजच्या काळात मुंबई उभी-आडवी पिंजून काढली. ट्रेन, बस आणि पायी भरपूर प्रवास केला.
पदवीनंतर काय करायचं, हा प्रश्न जेव्हा आला तेव्हा पुण्यातील ‘एमआयटी’मध्ये नव्याने सुरू झालेल्या ‘मास्टर्स प्रोग्राम इन गव्हर्नमेंट’ या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचं ठरवलं. ज्यांना राजकारणात रस आहे, अशांसाठी त्यावेळी (२००७ मध्ये) भारतातील हा एकमेव अभ्यासक्रम होता. प्रवेश परीक्षेद्वारे संपूर्ण भारतातून फक्त ६० जणांची निवड होत असे. पदवी हा निकष असला, तरी आमच्या अभ्यासक्रमाला डॉक्टर, इंजिनिअर, वकील, राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अशी सर्व क्षेत्रांतील माणसं होती.
त्यांच्यामध्ये निवड झालेला मी सर्वात लहान वयाचा विद्यार्थी होतो. त्या वर्षभरात एका वेगळ्याच जगाची ओळख झाली. तमिळनाडू, दिल्ली, नागालँड अशा वेगवेगळ्या १७ राज्यांतील मुलं आमच्या वर्गात होती. त्यांची भाषा, पेहराव, विचार करण्याची पद्धत, सर्वच वेगळं होतं. त्यामुळे वर्गात कोणत्याही विषयावरून घमासान चाले. या अभ्यासक्रमाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था ते आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास आणि त्यांना प्रत्यक्ष भेटी देण्याची संधी मिळाली. तीन आठवड्यांच्या युरोपमधील अभ्याससहलीने तर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला.
मास्टर्स झाल्यानंतर इंटर्नशिपसाठी मी टीव्ही माध्यमाची निवड केली. एका मराठी वृत्तवाहिनीत संशोधन करण्याची संधी मिळाली. दोन महिन्यानंतर मी बंगळूरच्या जनाग्रह संस्थेत ‘जागो रे!’ अभियानासाठी पश्चिम भारताचा समन्वयक म्हणून रुजू झालो. महाविद्यालये आणि कंपन्यांमध्ये जाऊन आम्ही मतदार नोंदणी अभियान राबवायचो. या अभियानाअंतर्गत आम्ही २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सहा लाख मतदारांची नोंदणी केली. फेसबुक, ट्विटरची लोकांना माहितीही नव्हती त्या काळी संपूर्णपणे डिजिटल पद्धतीने यशस्वीरीत्या राबविण्यात आलेले ते एकमेव अभियान होते.
बंगळूरनंतर परत आल्यावर मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण विभागातून भूगर्भशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ‘इंडिया स्टडी सेंटर’ आणि ‘आर्किओ टूर इंडिया’ या दोन कंपन्यांसाठी समन्वयक म्हणून वर्षभर काम केले. त्याचदरम्यान ‘आमराई’ या संस्थेकडून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या न्यूयॉर्क येथील एका परिषदेसाठी जाण्याची संधी मिळाली. पूर्वी युरोप सहलीत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जीनिव्हा येथील कार्यालयात गेलो होतो; पण न्यूयॉर्क येथील कार्यालयात जगातील वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींशी भेट झाली. तिथूनच पुढे बँकॉक येथे पार पडलेल्या एका परिषदेसाठी ‘भारतातील तरुणाई, कुटुंबव्यवस्था आणि संस्कृती’ या विषयावर बोलण्यासाठी युवा भारतीय प्रतिनिधी म्हणून निवडला गेलो. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी इतक्या तरुण वयात मिळणं, हे मी माझं भाग्य समजतो.
खाण्यासोबतच लांब पल्ल्याचं सायकलिंग करू लागलो होतो. त्यातूनच गोवा-मुंबई असा सायकल प्रवास दोनदा केला. पुढे अरुणाचल प्रदेशात सायकलिंग केलं. वालाँग, टुटिंग, मेचुका या ठिकाणी सायकलिंग करणारे आम्ही पहिले ठरलो. सायकलिंगमुळे वेगळ्या विचारांच्या मंडळींसोबत ओळख झाली. त्यातून आम्ही ‘सायकल कट्टा’ हा उपक्रम सुरू केला, गेली आठ वर्षे पूर्णपणे सायकलिंगची आवड असणारे आणि सायकल ॲडव्होकसीसाठी वाहिलेला हा नॉन-प्रॉफिट उपक्रम सुरू आहे.
पत्रकारितेतून ब्रेक घेतल्यानंतर फूड आणि सायकलिंगची आवड जोपासण्याच्या उद्देशाने ‘फूड सायकल’ हे यूट्यूब चॅनल सुरू केलं. पुढे एका मराठी संकेतस्थळासाठी मुंबईतून बातमीदारी केली. जगातील एका अग्रगण्य वृत्तमाध्यमासाठी काम करण्याचा अनुभव अतिशय वेगळा होता. माझे काम पाहून त्यांच्या दिल्लीतील पत्रकारितेच्या कार्यशाळेसाठी निवड झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला तब्बल १५-२० वर्षे प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव असला, तरी सहभागींचे म्हणणे ऐकून घेण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची त्यांची वृत्ती होती.
नोव्हेंबर २०१८ मध्ये एक अतिशय वेगळी संधी चालून आली. सॉफ्टवेअर कंपन्यांची पंढरी असलेल्या सिलिकन व्हॅलीतील Quora या जागतिक ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रश्नोत्तरांचे संकेतस्थळ इतर भाषांमध्ये आता येऊ घातले होते. ज्यामध्ये भारतातील हिंदी, तमिळ, बंगाली आणि मराठी भाषेचा समावेश होता. समुदाय व्यवस्थापक या पदासाठी त्यांना मराठी भाषा, डिजिटल माध्यम आणि विविध विषयांची जाण तसेच सर्वसमावेशक दृष्टिकोन असलेली व्यक्ती हवी होती. तीन टप्प्यांमध्ये मुलाखती झाल्यानंतर माझी या पदासाठी निवड झाली.
आयटीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही मराठी भाषा, लिखाण आणि डिजिटल माध्यमांची जाण या बळावर भारतात बसून सिलिकन व्हॅलीतील कंपनीसाठी काम करण्याची संधी मिळणे आयुष्यातील सर्वोत्तम शिखर गाठण्यासारखे होते, असे मला वाटते. फक्त ३०० कर्मचारी असलेल्या कंपनीमध्ये प्रत्येकाला फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, टीकटॉक, ट्विटर, झूम, लिंकडइन अशा अनेक व्यासपीठांसोबत काम करण्याची पार्श्वभूमी होती.
त्यांच्यासोबत काम करताना एक गोष्ट ध्यानात आली की आपण जगाच्या किती मागे आहोत. कारण ही सर्व मंडळी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात किमान पाच ते दहा वर्षे पुढचा विचार करणारी आहेत. तंत्रज्ञानाबाबतची ज्या गोष्टी आपल्या खिजगणीतही नाहीत, त्यावर यांचं काम आधीच सुरू झालेलं आहे. सहा महिन्यांपूर्वी सर्वांसाठी खुल्या झालेल्या ‘एआय’बद्दल ही मंडळी चार वर्षांपूर्वीच बोलत होती. काळाच्या पुढे विचार करणं काय असतं, हे तिथे कळलं.
‘एमआयटी’मधून मास्टर्स केल्यानंतर राजकारणाशी थेट संबंध आला नव्हता. नोव्हेंबर २०२२ मध्ये ती संधी चालून आली. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या महाराष्ट्र टप्प्यासाठी पुन्हा एकदा चांगला जनसंपर्क आणि डिजिटल कंटेंटची जाण असणारी तरुण व्यक्ती हवी होती. अनेक पत्रकारांनी माझं नाव सुचवलं. मी तेलंगणा येथे टीमला जॉईन होऊन मध्य प्रदेशापर्यंत यात्रेसोबत होतो. राहुल गांधी आपल्या भाषणामध्ये ज्या समस्यांबद्दल बोलत होते, त्याबाबातचे छोटे माहितीपट करण्याची जबाबदारी आमच्या टीमवर होती.
महाराष्ट्राच्या ज्या भागांमधून यात्रा गेली तिथल्या गावांमध्ये जाऊन लोकांशी थेट संवाद यानिमित्ताने साधता आला. पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन लोकांना लोकांच्या समस्या समजून घेता आल्या. ही राजकीय यात्रा असल्याने आपले नाव विशिष्ट पक्षासोबत जोडले जाण्याची शक्यता होतीच; पण भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची यात्रा होत असल्याने त्यासाठी माझी कौशल्ये देण्याचा मोह मला आवरता आला नाही. यात्रेचा सदर पक्षाला किती राजकीय फायदा झाला किंवा होईल हे येणारा काळच ठरवेल; पण भारतातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाची कार्यपद्धती यानिमित्ताने थोड्याफार प्रमाणात समजून घेता आली, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं.
डिजिटल क्षेत्रातील माझा इतक्या वर्षांचा कामाचा अनुभव आणि भविष्यातील संधींचा विचार करून काही महिन्यांपूर्वी मी ‘थिंकल मीडिया’ ही माझी डिजिटल कन्सल्टन्सी कंपनी सुरू केली आहे. इतकी वर्षे काम करताना दोन नोकऱ्यांच्या मधल्या वेळात माझ्या डोक्यात कायमच खाण्याशी संबंधित काहीतरी करायला हवं, हा विचार असे. फूड सायकलचा घाट त्यासाठीच घातला होता; पण ते पूर्णवेळ करू शकलो नव्हतो. या वेळी स्वतंत्रपणे काम करताना ही संधी मिळाली.
ग्रीष्मा सोले आणि कौस्तुभ दळवी हे माझे मित्र गेली दहा वर्षे लेहमध्ये स्थायिक आहेत. बाईक राईड आणि लेह सहलींचे आयोजन ते करत असतात. लेहमधील पहिले बॅकपॅकर्स हॉस्टेल सुरू करण्याचा मान त्यांच्याकडेच जातो. मागच्या वर्षी त्यांनी हेरिटेज चुबी ही नवीन प्रॉपर्टी घेतली. यावर्षी त्या जागेत मराठी रेस्टॉरंट सुरू करण्याचे ठरत होते. मी दोन वर्षांपूर्वी लेह सहलीला आलो असताना बहुतांश वेळा हॉस्टेलच्या किचनमध्येच असायचो. तेव्हा मला इथे नोकरीला ठेवून घ्या, असं मी गमतीने म्हणायचो.
ग्रीष्मा आणि कौस्तुभने तेव्हाच आपण पार्टनरशीपमध्ये हे करूयात, अशी ऑफर तेव्हाच देऊ केली होती. त्यामुळे यावर्षी जेव्हा मराठी रेस्टॉरंट सुरू करण्याचे ठरत होते तेव्हा मी पूर्णवेळ लेहमध्ये येण्याचा निर्णय घेतला. ‘खानावळ’ हे लेहमधील ११ हजार ५०० फूट उंचीवरील पहिले मराठमोठे रेस्टॉरंट आहे. १ मे, महाराष्ट्रदिनी आम्ही त्याची घोषणा केली आणि इथे येणाऱ्या लोकांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे.
लेहमध्ये व्यवसाय करणं सोप्प नाही. कारण येथील हवामान आणि दळणवळणाच्या ठराविक सोयी. शिवाय इथली अर्थव्यवस्था एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या काळात होणाऱ्या पर्यटनावर आधारलेली आहे. त्यामुळे इथे येऊन पूर्णवेळ व्यवसाय करणे हा थोडा धाडसी निर्णय होता. पण ग्रीष्मा आणि कौस्तुभच्या मदतीने रेस्टॉरंटचं आणि व्यवसाय करण्याचं स्वप्न पूर्ण प्रत्यक्षात उतरतंय, याचा अतिशय आनंद आहे.
आजवरच्या संपूर्ण प्रवासात दोन गोष्टी आवर्जून केल्या. एक, कुठल्याही कामाची लाज बाळगली नाही आणि दुसरं, जे काही केलं ते काम मन लावून केलं. एकातून एक संधी मिळत गेल्या. चांगल्या संस्थांमधून शिक्षण घेतलं, नामवंत कंपन्यांसोबत नोकऱ्या केल्या, जगातील महत्त्वाच्या देशांना भेटी दिल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व करत असताना अतिशय चांगल्या माणसांचा सहवास लाभला.
मला माणसांच्या गोतावळ्यात राहायला आवडतं. त्यामुळे प्रत्येक वेळी लहान मुलं, उच्चशिक्षित व्यक्ती किंवा अंगमेहनत करणारी साधी व्यक्ती असो, प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकत गेलो. कितीही मोठं पद, चांगल्या पगाराची नोकरी असो माणसांना जपायला हवं, शिकत राहायला हवं, आधी शिकलेलं विसरता यायला हवं आणि पाय कायम जमिनीवर असायला पाहिजेत, ही तत्त्व कायम पाळत आलो. यापुढील प्रवासातही हे पाळण्याचा प्रयत्न राहील.