लघुपटांमध्ये प्रकटलेलं काश्‍मीर !

काश्मीर धुमसू लागलं. रोजा, दिल से वगैरे मोजक्या चित्रपटांमधून आपल्याला धुमसतं, अस्वस्थ काश्मीर दिसलं.
mushtaq ali ahmad khan
mushtaq ali ahmad khansakal
Summary

काश्मीर धुमसू लागलं. रोजा, दिल से वगैरे मोजक्या चित्रपटांमधून आपल्याला धुमसतं, अस्वस्थ काश्मीर दिसलं.

- प्रशांत तळणीकर prashant.talnikar@gmail.com

पृथ्वीवरचं आणि भारताचं नंदनवन म्हणून आपण काश्मीरला ओळखतो. १९६०च्या दशकामध्ये शशी कपूरचा जब जब फूल खिले, राजेंद्रकुमारचा आरजू, शर्मिला टागोरचा कश्मीर की कली, पुढे १९७०च्या दशकात राजेश खन्नाचा रोटी, अमिताभ-राखीचा कभी कभी, फारुख शेखचा नूरी, १९८० च्या दशकात सिलसिला, बेमिसाल असे एक ना अनेक चित्रपट आठवतात. या चित्रपटांमधून काश्मीरचं अनुपम निसर्गसौंदर्य आपण पाहिलं. किंबहुना हे आणि असे चित्रपट आणि त्यात पार्श्वभूमी म्हणून आपल्याला दिसलेलं काश्मीर हीच बहुतेकांची काश्मीरशी ओळख होती. परदेशप्रवास आजच्याइतका सहज होण्यापूर्वी काश्मीरला जाणं हीच बहुतेक पर्यटकांची सर्वांत मोठी महत्त्वाकांक्षा होती. मग १९९०च्या दशकामध्ये अचानक काळरात्र झाली आणि या नंदनवनामध्ये दहशतवादाची आग लागली.

काश्मीर धुमसू लागलं. रोजा, दिल से वगैरे मोजक्या चित्रपटांमधून आपल्याला धुमसतं, अस्वस्थ काश्मीर दिसलं. पण आधीचं काश्मीर आणि दहशतवाद-अशांतता यांनी ग्रासलेलं काश्मीर या दोन्हींमधला सामान्य काश्मिरी माणूस, त्याचं दैनंदिन जीवन, त्याच्या समस्या, त्याचं भावविश्व या गोष्टी उर्वरित भारतामध्ये फारशा ज्ञात नव्हत्या आणि नाहीत. त्यातच काश्मीर मुस्लिमबहुल आणि शेजारी पाकिस्तान यामुळे इथल्या लोकांबद्दल एक विशिष्ट (गैर)समज कायम राहिला आणि मन, संस्कृती, इतिहास या सर्वांनी भारतीयच असलेल्या बहुसंख्य काश्मिरींना या परकेपणामुळे स्वतःची नेमकी ओळख सांगणं अवघड झालं. पर्यायाने प्रचलित परिस्थितीमध्ये खुद्द काश्मिरींची मानसिक स्थिती काय आहे; त्या ठिकाणच्या दहशतवाद, हिंसा, पंडितांचं स्थलांतर यांबद्दल आणि यासंबंधी त्यांच्याबद्दल जगाने जी प्रतिमा करून घेतली आहे तिच्याबद्दल त्यांना स्वतःला काय वाटतं हे व्यक्त झालंच नाही. ‘कश्मीर की कली’ ते ‘काश्मीर फाइल्स’ असा हा काश्मीरचा पडद्यावरचा आणि उर्वरित भारतातील लोकांच्या मनातलाही बव्हंशी एकतर्फी प्रवास आहे.

मात्र अशा अस्वस्थ, अस्थिर काश्मीरमध्ये तरीही चित्रपट बनत आहेत. दहशतीच्या वातावरणामध्ये कला, संगीत, साहित्याची स्फूर्ती येत आहे. जिथं वातावरणामध्ये वर्षानुवर्षं ताण आहे, तिथं सकारात्मक विचार फुलत आहेत. जिथं गेल्या तीस वर्षांमध्ये दोन्ही बाजूच्या गोळ्यांना अनेक लोक बळी पडले आहेत, तिथं सृजन होतं आहे. हे खूपच आशादायक चित्र आहे.

पुण्यातील सरहद संस्थेतर्फे आयोजित पहिला जम्मू आणि काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुण्यामध्ये नुकताच संपन्न झाला. महोत्सवाचं सूत्र अर्थातच जम्मू-काश्मीर हेच होतं. या विषयावर जम्मू-काश्मीरच्याच निर्माता-दिग्दर्शकांनी निर्माण केलेले लघुपट, पूर्ण लांबीचे चित्रपट, माहितीपट आणि सांगीतिक ध्वनिचित्रफितींचा या महोत्सवामध्ये समावेश होता. चाळीसहून अधिक असे विविध प्रकारचे चित्रपट पाहण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळाली. महोत्सवाचे संचालक मुश्ताक अली अहमद खान हे श्रीनगरमध्ये राहणारे नाट्य-चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते. सर्वप्रकारे प्रतिकूल परिस्थिती असूनही अत्यंत सकारात्मक विचार करणारे मुश्ताक अली गेली पाच वर्षं काश्मिरी चित्रपट महोत्सव आयोजित करत आहेत, पण ते काश्मीरमध्ये. सरहदच्या रूपात त्यांना जेव्हा भारताला पहिला चित्रपट देणाऱ्या पुण्यातून साद दिली गेली, तेव्हा ते भारावून गेले. आपण निर्माण केलेल्या चित्रपटापासून काहीही उत्पन्न मिळणार नाही याची खात्री असूनही काश्मिरी कलावंत लहान-मोठे चित्रपट निर्माण करत असतात. काही परदेशस्थ काश्मिरीदेखील आपल्या मायभूमीच्या प्रेमाखातर इथं येऊन चित्रपट निर्माण करतात. मुश्ताक अलींनी या सर्वांशी संपर्क साधून तब्बल ८० चित्रपट या महोत्सवाकरिता मिळवले.

दर्जा, विषयवस्तू, मिळणारा संदेश, तसंच एकूणच या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन एका निष्पक्ष निवड समितीने महोत्सवामध्ये प्रदर्शित करण्याकरिता चित्रपट-लघुपट-माहितीपट निवडले. हे चित्रपट बघताना काश्मिरी कलावंतांबद्दल कौतुक वाटल्यावाचून राहिलं नाही. आजवर बाहेरच्यांच्या दृष्टीने आपण काश्मीर पाहात आलो, आता काश्मिरींच्या दृष्टीने ते त्यांच्या चित्रपटांमधून दिसून आलं. आज काश्मीरमध्ये एकही चित्रपटगृह नाही. सर्व चित्रपटगृहं व नाट्यगृहं ९०च्या दशकामध्ये बंद झाली. पण, मुश्ताक अलींसारखे ‘वेडे’ स्वतःच्या पदराला खार लावून घेत नाटकं बसवत आहेत, चित्रपट करत आहेत. धमक्या, विरोध सहन करूनही ही सर्जनशील अभिव्यक्ती अविरत सुरू आहे हे महत्त्वाचं आहे!

महोत्सवामध्ये काश्मिरींनी निर्मिलेले चित्रपट पाहण्याबरोबरच काश्मिरी निर्माते-दिग्दर्शकांशी भेटण्या-बोलण्याची संधीही मिळाली. या भेटींमध्ये प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे, काश्मीरपासून इतक्या दूरवरच्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये आपल्या कलाकृतींचा असा महोत्सव साजरा केला जातो आहे; आपल्या कला, संगीत आणि संस्कृतीबद्दल जिव्हाळा असलेले लोक आहेत, याचं या सर्व मंडळींना वाटत असलेलं अप्रूप!

महोत्सवादरम्यानच्या परिचर्चेमध्ये आणि इतर वेळीही, हे सर्व लोक अतिशय भारावलेले वाटले. आपल्याला कुणीतरी जाणून घेतं आहे, आपलं समजतं आहे, आपल्या कलाकौशल्याबद्दल आस्था दाखवतं आहे, याचाच त्यांना आनंद वाटत होता. आम्हीदेखील तुमच्यासारखेच भारतीयच आहोत ही भावना; आमच्या इतिहासामुळे नव्हे, तर आमच्या भौगोलिक स्थानामुळे आम्हाला खूप काही सोसावं लागतं आहे हा सल त्यांच्या बोलण्यातून जाणवला. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके महाराष्ट्राचे आणि भारताचे पहिले सुपरस्टार कुंदनलाल सैगल यांचा जन्म जम्मूतला, त्यामुळे पहिला आंतरराष्ट्रीय जम्मू-काश्मीर चित्रपट महोत्सव महाराष्ट्रात होणं औचित्यपूर्ण म्हणावं लागेल.

या महोत्सवाच्या निमित्ताने वयाच्या शंभरीनजीक असलेले ज्येष्ठ काश्मिरी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, लेखक, रेडिओ काश्मीरचे अनेक वर्षं प्रमुख राहिलेले प्राण किशोर कौल, काश्मीरमधील पर्यटन व हॉटेल व्यवसायातील दिग्गज मुश्ताक चाया आणि रामोजी फिल्म सिटीचे प्रमुख डॉ. राजीव जालनापूरकर यांचा सरहद संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. आता पुण्यामध्ये स्थायिक झालेल्या कौल यांची ‘गुल, गुलशन, गुलफाम’ ही मालिका ९० च्या दशकामध्ये दूरदर्शनवर प्रचंड लोकप्रिय झाली होती.

त्यांच्या या कादंबरीचा प्रस्तुत लेखकाने केलेला मराठी अनुवादही सरहदच्या चिनार प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाला आहे. खोऱ्यातील हिंदू व मुसलमान अशा दोघांनाही पूजनीय असलेल्या नुंद ऋषी ऊर्फ नुरुद्दीन नूरानी यांच्यावरील माहितीपट, हवामान बदलाच्या धोक्यांबद्दलचे लघुपट, आजच्या काश्मिरी तरुणांची भावनिक घुसमट दाखवणाऱ्या ‘कोई नहीं’ आणि ‘मायी चानी’ या ध्वनिचित्रफिती नितांत सुंदर आणि विचारप्रवर्तक; तर ‘डॉटर्स ऑफ पॅराडाईज’मध्ये दिसलेलं काश्मिरी स्त्रियांचं जीवन मन हेलावणारं होतं. या चित्रपटांमधून विविध स्तरांतील काश्मिरींचं आजचं खडतर जीवन आणि ही काळरात्र कधीतरी सरेल ही आशा प्रखरपणे समोर येते. त्यांचा हाच आशावाद देशाकरिता आश्वासक आहे.

‘स्कॅटर्ड’ आणि ‘द हिंदू बॉय’ हे लघुपट विस्थापित पंडित कुटुंबांतील नव्या पिढीची आपल्या मायभूमीबद्दलची ओढ दाखवतात. १९९०च्या दशकामध्ये ही पंडित कुटुंबं जेव्हा काश्मीर खोरं सोडून गेली तेव्हाची परिस्थिती हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुदायांकरिता किती अप्रिय होती, हे या दोन्ही लघुपटांमध्ये अतिशय प्रभावीपणे दाखवलं आहे. खोऱ्यामध्ये बालपण घालवलेली तरुण हिंदू मुलं जेव्हा आपलं वडिलोपार्जित घर पाहण्याच्या तीव्र इच्छेने खोऱ्यात येतात, तेव्हा शेजारची मुस्लिम कुटुंबं त्यांचं स्वागत अगत्याने आणि आपुलकीने करतात. त्या वेळी तुम्ही का नाही आमच्या बाजूने उभे राहिलात, असं या मुलांनी थेटच विचारल्यावर किंचित अपराधी भावनेने स्वतःची अगतिकता त्यांना समजावून सांगताना त्या कुटुंबांची होणारी प्रचंड मानसिक ओढाताण गलबलून टाकते. ‘याने (दहशतवाद) आपल्याच भूमीमध्ये आम्हाला कैदी आणि तुम्हाला पर्यटक करून टाकलं’ हे एक मुस्लिम आजी आपल्या हिंदू नातवाला म्हणते, तेव्हा दोन्ही समाजांची अगतिकता खोलवर जखमी करते. काश्मिरींमधील संवेदनशीलता, सर्जनशीलता जतन करणं आणि त्यांच्या आपुलकीच्या भुकेला प्रतिसाद देणं देशाकरिता आवश्यक आहे. काश्मीरच नव्हे, तर अस्वस्थ असलेल्या कुठल्याही राज्यातील कुठल्याही प्रवाहांबद्दल समावेशकतेची दृष्टी ठेवणं ही काळाची गरजच आहे. समाज एकसंध राहिला तरच देश एकसंध राहू शकतो, अन्यथा अंतर्गत भेदांचा गैरफायदा घेऊन संपूर्ण देश असुरक्षित करू पाहणाऱ्या शत्रूंची संख्या जगामध्ये कमी नाही. सरहद आणि तिच्यासारख्या आणखीही संस्था याकरिता झटत आहेत. त्यांची शक्ती आणि संख्या कितीतरी पटींनी वाढण्याची नितांत गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com