(सु)संवाद हवा

रोजच्या जीवनात आपण ज्या क्षेत्रात काम करत असतो त्या क्षेत्रांतील अनेक व्यक्ती, संस्था यांची माहिती आपल्याला विविध माध्यमांतून मिळत असते.
(सु)संवाद हवा
Summary

रोजच्या जीवनात आपण ज्या क्षेत्रात काम करत असतो त्या क्षेत्रांतील अनेक व्यक्ती, संस्था यांची माहिती आपल्याला विविध माध्यमांतून मिळत असते.

रोजच्या जीवनात आपण ज्या क्षेत्रात काम करत असतो त्या क्षेत्रांतील अनेक व्यक्ती, संस्था यांची माहिती आपल्याला विविध माध्यमांतून मिळत असते. आपली व्यक्तिगत जिज्ञासा असेल तर आपण एखाद्या संस्थेबद्दल माहिती मिळवण्याचाही प्रयत्न करतो. मात्र, अनेकदा असं ध्यानात येतं की, आज कोणतंही तंत्रज्ञान, विज्ञान एका शाखेपुरतं मर्यादित नसतं, तर ते अनेक तंत्रज्ञानांचं मिळून तयार झालेलं एक उपयुक्त; परंतु सामूहिक अशा ज्ञानाचं प्रतीक असतं. रोजच्या वापरातील मोबाईल-फोनचं उदाहरण घ्या. तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत असंख्य गोष्टींचा समावेश त्यात झालेला असतो. याचा अर्थ असा आहे की, अनेक लोकांनी एकत्र हातभार लावल्याशिवाय कोणतीही अशी गोष्ट होऊ शकणार नाही.

याची शेकडो उदाहरणं देता येतील. वैद्यकीय क्षेत्रातील उपयुक्त साधनं किंवा मशिन्स पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की, केवळ इंजिनिअरिंगच नव्हे तर, वैद्यकीय शास्त्रातील तज्ज्ञांनी एकत्र काम केल्याशिवाय ती साधनं अथवा ती मशिन्स तयार होणारच नाहीत. ‘एमआरआय’ किंवा ‘डायलिसिस’ ही त्यातील सर्वांना माहीत असलेली साधनं आहेत. पेसमेकर, स्टेंट अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा वापर विविध क्षेत्रांत करायला कितीतरी इतर तंत्रज्ञाने, अगदी गणितापासून (ॲल्गरिदम) वापरावी लागतात. हे सर्व विस्तारानं सांगण्याचं कारण, जिथं जिथं अशा गोष्टी विकसित होतात किंवा त्यांत सातत्यानं संशोधन, विकास केला जातो तिथं तिथं समन्वयानं काम होत असतं.

पुण्यात देशपातळीवरील २७ संशोधनसंस्था आहेत. तिथं काय काम चाललं आहे, कोणती तंत्रज्ञाने उत्पादन-उद्योजकांना उपलब्ध आहेत हे जवळपास कुणालाच माहीत नाही. त्यांच्या गरजा काय आहेत, ज्या पुण्यातील उद्योजक भरून काढू शकतात, हेही कुणाला माहीत नाही. यातून देशाची प्रगती खुंटते, खर्च होत राहतात. यामुळे आता ‘मराठा चेंबर’मध्ये असा एक विचार/प्रयत्न सुरू आहे, ज्यातून वर्षातून निदान एकदा अशा सर्व संस्थांना एकत्रित आणून त्यांचा एकमेकींशी आणि उद्योजकांशी संवाद निर्माण करायचा. सुदैवानं आता संरक्षणक्षेत्रातही ‘आत्मनिर्भरता’ (उशिरा सुचलेलं शहाणपण) आणण्याचे भारत सरकारचे प्रयत्न सुरू झालेले आहेत.

एक उदाहरण सांगतो...‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग-पुणे’ (COEP), ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ आणि ‘एनसीएल’मधील एक शास्त्रज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून महाराष्ट्राच्या सर्व साखर कारखान्यांचं दोनशे-तीनशे कोटी रुपयांची बचत करणारं संशोधन यशस्वी झालं आहे. त्यावर यापूर्वीच्या एका लेखांतून चर्चा झाली असून त्याची सविस्तर माहितीही त्यात दिली होती. त्यांचे अनेक अडचणींवर मात करण्याचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत. हे केवळ संवादातून शक्य झालं.

तिन्ही संस्था आपापल्या परीनं स्वतःच्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेतच; परंतु एकत्र आल्याबरोबर त्याची परिणामकारकता खूप व्यापक आणि यशस्वी झाली आहे. हेच संशोधनसंस्था, औद्योगिक संस्था, शिक्षणसंस्था यांनी एकत्रित काम करून स्वतःची प्रगती साधत, देशाच्या प्रगतीत योगदान देणं अभिप्रेत आहे.

असा प्रामाणिक प्रयत्न झाल्यास हे शंभर टक्के यशस्वी होईल, असा विश्र्वास निर्माण झाला आहे. विविध प्रदर्शनं, परिषदा यांतून (Conferences), चर्चासत्रं यांतून संवाद जरूर होतो; परंतु त्याची व्याप्ती सर्वच पातळ्यांवर व्हायला हवी. आश्चर्य वाटेल कदाचित; परंतु अनेक शिक्षणसंस्थांमध्ये वेगवेगळ्या खात्यांमधील प्राध्यापकांमध्ये संवाद नसतो किंवा नाममात्र असतो. ‘तुम्ही माझ्या कामात किंवा मी तुमच्या कामात ढवळाढवळ करायची नाही,’ हे जवळपास अलिखित आहे आणि हे माझ्यासारख्याला प्रकर्षानं जाणवतं. यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीनं गेल्या १५ वर्षांपासून ‘एज्युकॉन’ परिषदेच्या उपक्रमाचं आयोजन केलं जातं. जगभरातील वेगवेगळ्या देशांत ही परिषद होत असते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होत असतात.

या परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे, या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींनी माहितीचं आदान-प्रदान करणं. अनेक वेगवेगळे उपक्रम शिक्षणक्षेत्रात राबवले जात असतात; परंतु त्या माहितीची देवाण-घेवाण होत नाही. या परिषदेच्या निमित्तानं विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींची एकमेकांशी थेट भेट होते. चर्चा होते, संवाद साधला जातो. विविध प्रयोगांची एकमेकांना माहिती होते.

संवादाचा हा पूल ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीनं बांधला जातो. एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद होत असल्यानं ‘एज्युकॉन’च्या परिषदेची आता शैक्षणिक जगतात वाट पाहिली जाते. ही सर्व किमया संवादामुळे घडली.

संवाद हा फक्त एका क्षेत्रापुरता मर्यादित नाही, तर व्यक्तीव्यक्तीत, जाती-धर्मांमध्ये, विविध राजकीय प्रणालींमध्ये तो असायला हवा. सर्वसाधारणतः सामान्य माणूस हा - जगात कुठंही जा - चांगलाच असतो. त्याला आपण जात-धर्म-राजकीय प्रणाली-प्रांत-देश वगैरेमध्ये अडकवलं की सर्व बदलतं. सुज्ञ समाजानं हे ध्यानात घेऊन व्यक्तिगत आणि सामूहिक विकास केल्यास परिस्थिती किती लवकर बदलेल! आपण आपल्या परीनं तरी प्रयत्न करू या.

विख्यात अमेरिकी साहित्यिक मार्क ट्वेन यानं दिलेलं एक उदाहरण यानिमित्तानं सांगावंसं वाटतं : शंभर काळ्या मुंग्या आणि शंभर लाल मुंग्या एका काचेच्या बरणीत भरा...या मुंग्यांचं सर्व काही ठीक चाललेलं तुम्हाला आढळेल. पण कुठपर्यंत? तर, तुम्ही ती बरणी हलवत नाही तोपर्यंत! मात्र, एका दिवसानंतर ती बरणी काही काळ जोरजोरात हलवून उलटीपालटी केली आणि टेबलावर ठेवली तर आढळेल की, त्या मुंग्यांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला आहे! कारण, या घुसळणीनंतर लाल मुंग्यांना वाटेल की, काळ्या मुंग्या आपल्या शत्रू आहेत आणि काळ्या मुंग्यांना वाटेल की, लाल मुंग्या आपल्या शत्रू आहेत. मग दोन्ही प्रकारच्या मुंग्या जिवावर उदार होऊन एकमेकींवर तुटून पडलेल्या आढळतील...

मात्र, या मुंग्यांचा खरा शत्रू कोण? तर ज्यानं बरणी जोरजोरात हलवून ठेवली तो! हेच सध्या समाजात जात-धर्म-राजकीय पक्ष यांच्या नेत्यांमुळे होत आहे. काळे विरुद्ध गोरे, पुरुष विरुद्ध महिला, श्रद्धा विरुद्ध शास्त्र, तरुण विरुद्ध वृद्ध वगैरे.

कुणीतरी बरणी हलवणारा असतो, त्यामुळे हे सर्व होत आहे. आपण एकमेकांशी शत्रुत्व करण्याआधी ‘बरणी कुणी घुसळली? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे व त्याचं उत्तर शोधलं पाहिजे.

मात्र, आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो का, हा खरा प्रश्न आहे. संवादात विलक्षण शक्ती आहे. ती सकारात्मक पद्धतीनं उपयोगात आणली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे, केवळ एकमेकांशी बोलणं म्हणजे संवाद नव्हे, तर हृदयापासून बोललं पाहिजे, तरच तो सुसंवाद होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com