
कोणत्याही देशात गेल्यावर त्या ठिकाणचा इतिहास जाणून घेण्याची मला उत्सुकता असते. त्याअनुषंगानं आपोआपच आयर्लंडचा इतिहास वगैरेबाबत माहिती घेतली.
इतिहासाची पानं उलगडताना...!
काही वर्षांपूर्वी आम्ही उभयता आयर्लंडच्या डब्लिन शहरात गेलो होतो. ‘वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर’ची तिथं बोर्ड मीटिंग होती. कोणत्याही देशात गेल्यावर त्या ठिकाणचा इतिहास जाणून घेण्याची मला उत्सुकता असते. त्याअनुषंगानं आपोआपच आयर्लंडचा इतिहास वगैरेबाबत माहिती घेतली.
सुमारे ७०० वर्षं इंग्लंडनं त्यांच्यावर कब्जा करून कसे हाल केले याबाबतची कटुता त्यांच्या मनात अजूनही असल्याचं स्थानिकांशी बोलताना जाणवलं. डब्लिन इथलं काम झाल्यावर तिथून आम्ही स्कॉटलंडच्या ग्लासगो इथं सहज चार-पाच दिवस घालवायचे म्हणून गेलो.
यासाठी आमच्या ट्रॅव्हल एजंटकडे आम्ही एखादी मोटार आणि ड्रायव्हर - जो आम्हाला विविध ठिकाणी नेईल आणि माहितीही सांगेल - अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी एक धिप्पाड स्कॉटिश व्यक्ती उत्तम दर्जाची मोटार घेऊन हजर झाली. सुटाबुटातील ती व्यक्ती पाहिल्यावर मला जरा आश्र्चर्यच वाटलं. माझा गैरसमज होत नाही ना, याची खात्री मी करून घेतली.
हा मोटारमालक असून आम्हाला घेण्यासाठी आला असेल, असं मला वाटलं होतं. चौकशी केल्यावर समजलं की, तो चालक असून तोच आमच्या पुढील प्रवासातील ‘गाइड’ही असेल. त्या प्रवासात आमच्या गप्पा सुरू झाल्या. तो खूपच अनुभवी आणि हुशार वाटला. वय असेल अंदाजे ६०-६५. मी साहजिकच विचारलं : ‘‘ही मोटार कुणाची? तुम्ही किती वर्षं गाडी चालवता?’’
संवाद साधल्यावर ध्यानात आलं की, ही व्यक्ती परदेशातून उच्च पदावरून निवृत्त झालेली होती आणि केवळ आवड आणि स्कॉटलंडचा अभिमान म्हणून हे काम करत होती. त्यानं स्पष्टपणे सांगितलं : ‘‘तुमची निवड मी करतो.
काम स्वीकारण्याच्या आधी तुमची सर्व माहिती मी मिळवली आणि मग तुमच्यासाठी ‘गाइड’ आणि चालक हे काम स्वीकारलं.’’ हा मला आश्र्चर्याचा आणखी एक धक्काच होता. या ‘गाइड’ला अनेक विषयांत उत्तम गती होती; विशेषतः इतिहासात.
बोलता बोलता तिथलं शिक्षण या विषयावर आमची गाडी आली. तो म्हणाला : ‘‘तुम्हाला तेवढा वेळ नाही; अन्यथा माझ्या आवडत्या विद्यापीठात तुम्हाला घेऊन जायला मला आवडलं असतं.’’
यावर, ‘सकाळ’च्या वतीनं सुरू असलेल्या ‘एज्युकॉन’ या उपक्रमाची थोडी माहिती मी त्याला दिली. त्यावर त्या महाशयांनी ‘मी आता माझ्या आवडीच्या विद्यापीठाची माहिती तुम्हाला सांगतो,’ असं आग्रहपूर्वक म्हणत माहिती द्यायला सुरुवात केली.
या विद्यापीठाचं नाव सेंट अँड्रयूज्. त्याची स्थापना २८ ऑगस्ट १४१३ मध्ये झाली असून स्कॉटलंडच्या चार प्राचीन विद्यापीठांपैकी ते एक आहे. ‘ऑक्सफर्ड’ आणि ‘केम्ब्रिज’ या विद्यापीठांनंतर इंग्लिशभाषक जगतातील तिसऱ्या क्रमांकाचे ते जुनं विद्यापीठ आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे, ते इतिहास या विषयाला सर्वोच्च महत्त्व देतं. ही आमच्यासाठी नवीनच माहिती होती.
गाइड’ पुढं सांगू लागला : ‘‘आपण इतिहास हा प्रामुख्यानं आपल्या भागाचा, आपल्या देशाचा शिकतो. इतर देशांतील जुजबी माहितीही आपल्याला आपल्या शिक्षणातून मिळते; परंतु स्कॉटिश, ब्रिटिश लोकांमध्ये जगाच्या इतिहासाबद्दल जागरूकता आहे.
जगाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या वेळी महत्त्वाचं काय घडलं, का घडलं आणि त्याचे परिणाम काय झाले हा त्या शिक्षणाचा गाभा आहे. त्याचबरोबर तिथल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करणं हाही त्यातील एक भाग आहे.’’
त्याचं म्हणणं असं की, त्या समाजाचं, देशाचं भवितव्य काय असू शकेल याचा अंदाज या गोष्टींच्या परिस्थितीवरून बांधता येतो; त्याचबरोबर लोकशाही, समाजवाद, कम्युनिझम, हुकूमशाही यांचाही अभ्यास आणि त्यांचे संभाव्य परिणाम यांचा अंदाज बांधता येतो.
आपल्याला सबळ ठरू नये म्हणून ब्रिटिशांनी याचा उपयोग जगभर; विशेषतः भारतात, मोठ्या प्रमाणावर केला. ब्रिटिशांनी भारतात दुहीची बीजे पेरून पाकिस्तान, बांगलादेश निर्माण केले. त्याची आपण काश्मीरमध्ये आजही किंमत मोजतो आहोत.
अशा गोष्टींमुळे संरक्षण वगैरे गोष्टीत देशाचे भरपूर खर्च होत असतात, जे उत्पादनाच्या विरुद्ध असतात. त्यांचा परिणाम तुमच्या शक्तिक्षयामध्ये होतो. इंग्लंडच्या आधी पोर्तुगीजांचं समुद्रमार्गांवर जगभर नियंत्रण होतं. सोळाव्या शतकात ते ब्रिटिशांनी मिळवलं. शिस्त, तंत्रज्ञान, विचारवंत, संशोधन आणि देशप्रेम या बळाच्या जिवावर त्यांनी जगावर राज्य केलं.
तसं पाहिलं तर हे इंग्लंडपुरतं मर्यादित नव्हतं. आपण युरोपचा तीनशे-चारशे वर्षांचा इतिहास अभ्यासला तर, त्यांनी संपूर्ण उत्तर अमेरिका, कॅनडा आणि यूएसए, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका इथं आपली राज्येच वसवली. म्हणजे, युरोपचा म्हटलं तर तो भूगोल आहे, जो त्यांचा इतिहास सांगतो.
आपल्याबाबत सांगायचं तर, आपण कंदाहार म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान, एक तृतीयांश काश्मीर, भूतान, नेपाळ, ब्रह्मदेश, श्रीलंका गमावले. आपला भूगोलही आपला इतिहास सांगतो. युरोपीय लोकांनी, विशेषतः ब्रिटिशांनी, इतिहासाची बारकाईनं नोंद ठेवली. आजही आपण आपल्या इतिहासाचे दाखले इंग्लंडमध्ये शोधतो.
सेंट अँड्रयूज् विद्यापीठात १३० देशांतील विद्यार्थी शिकतात. राजघराण्यांतील, परदेशांतील उच्च किंवा सर्वोच्च पदावरील कुटुंबीयांची मुलं तिथं शिकायला जातात. विल्यम प्रिन्स ऑफ वेल्स आणि कॅथरिन हे तिथंच भेटले.
जगातील अनेक उद्योग, संस्था यांच्या सर्वोच्चपदी या विद्यापीठातील विद्यार्थी आढळतात. आमच्या या स्कॉटिश मित्राला त्या विद्यापीठाचा अभिमान वाटला तर त्यात आश्चर्य करण्याचं कारण नव्हतं; परंतु यातून आपलंही विचारमंथन सुरू होतं.
विचार करत असताना मला ग्रीसमधील एक प्रसंग आठवला. आम्ही उभयतांनी एकदा युरोपमधील न गेलेल्या ठिकाणी भेटी देण्याचं ठरवलं. त्यानुसार अथेन्समध्ये जाण्याचं नियोजन केलं. कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी भेटी देत असताना त्या ठिकाणी ‘गाइड’ घेण्याची माझी सवय आहे.
त्यामुळे अनेक गोष्टी समजतात. आम्ही मुक्कामाला असलेल्या हॉटेलच्या व्यवस्थापनाला याची कल्पना दिली. त्यानुसार, इतिहासाचा पदव्युत्तर अभ्यास करणारी एक चुणचुणीत मुलगी ‘गाइड’ म्हणून आम्हाला देण्यात आली. ती आमच्याबरोबर तीन दिवस होती. त्यामुळे आमचा चांगला स्नेह निर्माण झाला. प्रवास संपायच्या आदल्या दिवशी आम्ही तिला भोजनासाठी आमंत्रित केलं. त्या वेळी आमच्या चांगल्या गप्पा रंगल्या.
गप्पांच्या ओघात तिनं मला विचारलं : ‘‘सर, एक वैयक्तिक प्रश्न विचारू का? आणि, त्याचं तुम्ही खरं उत्तर द्याल का?’’
मी म्हणालो : ‘‘निश्चितच प्रयत्न करेन.’’
तिनं विचारलं : ‘‘युरोपात किती तरी सुंदर ठिकाणं पाहण्यासारखी असताना, पडझड झालेल्या अथेन्स शहराला भेट द्यावी, असं तुम्हाला का वाटलं?’’
तिचा प्रश्न मी शांतपणे ऐकून घेतला आणि म्हणालो : ‘‘माझं उत्तर ऐकून तुला कदाचित वाईट वाटेल.’’
त्यावर ती म्हणाली: ‘‘नाही सर, सांगा.’’
मी म्हणालो : ‘‘तुझ्या देशानं ॲलेक्झांडरसारखा अनेक देश जिंकणारा योद्धा निर्माण केला, सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटलसारखे महान तत्त्ववेत्ते निर्माण केले. तरीही तुझ्या देशावर तीन हजार वर्षं परकीयांची सत्ता आहे. माझ्या देशावर हजार वर्षं परकीयांनी राज्य केलं. तुझ्या देशात काय आहे, हे समजून घेण्यासाठी मी आलो आहे.’’
माझं उत्तर पूर्ण होत असतानाच तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्यातून सावरत ती म्हणाली : ‘‘आमच्यात वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे आणि ‘बाहेरचा माणूस चालेल; परंतु आपल्यातील कुणी नको,’ अशी मानसिकता आहे. त्यातूनच हे घडलं आहे. माझ्या पिढीला याबाबतची अस्वस्थता कायमच वाटत राहते.’’
आपल्याही देशात यापेक्षा वेगळं काय घडलं आहे? आपण इतिहासापासून काय शिकलो? आज जिथं जिथं अधिकार मिळाले आहेत तिथं तिथं कर्तव्याचा विसर पडलेला आढळून येतो. त्याचबरोबर त्यांचा गैरवापर केला जात असल्याचे परिणाम आपण सर्वत्र पाहतो. जेव्हा जेव्हा कर्तव्य हे अधिकारापेक्षा समाजानं महत्त्वाचं ठरवलं, तेव्हाच त्याची प्रगती झाली. छत्रपती शिवाजीमहाराजांचा काळ पाहा...
आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याआधीचा काळ पाहा...त्या काळातील लोकांनी कर्तव्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची भूमिका घेतली होती आणि त्याची चांगली फळं आपण चाखत आहोत. मात्र, आज आपल्यांतील बहुतांश लोक कर्तव्याऐवजी अधिकाराला सर्वोच्च महत्त्व देत असतील तर समाजही तसाच निर्माण होणार आहे. समाजाची प्रगतीही त्याच गतीनं होणार आहे.
‘आमच्याकडे पुष्पक विमान होतं...आम्ही खूप प्रगल्भ होतो,’ अशा काळात रमण्याऐवजी आपण आपलं भविष्य घडवणार आहोत की नाही? चीनचं उदाहरण (सध्याच्या काळात) पुरेसं नाही का? इतिहासापासून आपण काही तरी शिकू या.