Padmavati
Padmavati

पद्मावती: समांतर सेन्सॉरशिप आणि कलात्मक स्वातंत्र्याचा तिढा

सिनेदिग्दर्शक संजय भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाने कलात्मक स्वातंत्र्य आणि अस्मिता या वादाला पुन्हा तोंड फोडले आहे. चौदाव्या शतकात राजस्थानातील चित्तोड राज्याच्या राजकुमारी पद्मावतीच्या जोहरच्या कथेवर या चित्रपटाचे कथानक बेतले आहे. ऐतिहासिक पात्रांवर आधारित असणार्या कथानकांच्या बाबतीत वाद होणे भारतात नवीन राहिलेले नाही. यापूर्वीही भन्साळी यांच्याच बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या बाबतीत असाच वाद झाला असून त्याने वातावरण ढवळून निघाले होते. यावेळी पद्मावती या चित्रपटाच्या सेटवर राणी पद्मिनी आणि अल्लाउद्दिन खिलजी याच्या कथित प्रेमदृश्यांचे चित्रीकरण झाल्याची बातमी पसरल्यानंतर राजपुतांच्या कर्णी सेनेने या चित्रपटाला आक्षेप घेतला आणि हे प्रकरण थेट सेटवर भन्साळी यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत जाऊन पोचले. या घटनेनंतर माध्यमांत या चित्रपटावरील चर्चा आणि समर्थक विरोधकांचा गोंधळ जोर धरू लागला आहे. चित्रपट दिग्दर्शकांच्या समूहाने एकत्र येत भन्साळी यांच्या बाजूने जाहीर भूमिका घेतली आहे. कर्णी सेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर हे प्रकरण आता स्थानिक राजपूत अस्मितेच्या सीमा ओलांडून सार्वत्रिक धार्मिक अस्मितेपर्यंत जाणार हे स्पष्ट आहे.   

या पार्श्वभूमीवर पद्मावती या पात्राची ऐतिहासिक सत्य- असत्यता, राजपूत राजांचा इतिहास, चित्रपटातील कलात्मक स्वातंत्र्य, सहिष्णुता या मुद्द्यांची चर्चा करणे आवश्यक ठरते आहे.

पद्मावती: इतिहास की दंतकथा?

ऐतिहासिक कागदपत्रांत पद्मावती राणीचा पहिला उल्लेख अल्लाउद्दिन खिलजीच्या स्वारीनंतर सुमारे दोनशे वर्षे नंतर मलिक मोहम्मद जायसी या कवीने लिहिलेल्या ‘पद्मावत’ या काव्यात सापडतो. जायसीचे ‘अवधी’ भाषेतील या काव्याच्या आधीच्या कुठल्याही दस्तऐवजात पद्मावती या पात्राचा उल्लेख सापडत नाही. अल्लाउद्दिन खिलजी याच्या स्वारीच्या काळातल्या समकालीन कागदपत्रात पद्मावती हे पात्र सापडत नाही. जायसीच्या नंतर अनेक लोकाथांमधून आणि काव्यांमधून पद्मावतीची कथा लोकांपर्यंत पोचत राहिली. त्याचे उत्तरकालीन पुरावे उपलब्ध आहेत, उत्तरकालीन संदर्भाच्या तपशिलात जाणे तूर्तास टाळू. जिज्ञासूंनी ती काव्ये मुळातून पाहणे संयुक्तिक ठरेल. परंतु अनेक आधुनिक इतिहासकारांनी राणी पद्मिनीच्या कथेच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतिहासकार सेतुमाधवराव पगडी पद्मावतीच्या कथेबद्दल लिहितात;

“पद्मिनीची कथा म्हणजे इतिहासातील विनोदाचा एक उत्तम नमुना म्हणता येईल. समकालीन साधनांतून, मग ती फारसी भाषेतील साधने असोत अगर संस्कृत मधील शिलालेख असोत, पद्मिनीचे उल्लेख आढळत नाहीत. सोळाव्या शतकातील मलिक मोहम्मद जायसी याच्या पद्मावत या काव्यात पद्मिनीची काल्पनिक कथा आहे, तिचे इतिहासावर कलम करण्यात येऊन हे रोप जोपासण्यात आले. आणि आता तर चितोडला पद्मिनीचा महाल (गेल्या शतकात बांधलेला) आणि पद्मिनीचे सरोवर ही स्थळे पर्यटकांना दाखवली जातात. हा विनोद नव्हे तर काय?” (समग्र सेतुमाधवराव पगडी, खंड १, पृष्ठ १००१.)

हे झाले तरी अनेक लेखकांनी आणि नेत्यांनी राणी पद्मिनी या पात्राला ऐतिहासिक सत्य म्हणून स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. एकोणिसाव्या शतकात सुरु झालेल्या स्वदेशी चळवळीत राणी पद्मिनी हे देशभक्तीचे बोधचिन्ह म्हणूनच ओळखले जाऊ लागले. रवींद्रनाथ टागोर यांच्या “राजकहाणी” या कादंबरीने शालेय विद्यार्थांमध्ये पद्मिनीचे पात्र लोकप्रिय केले. नेहरूंच्या “भारत एक खोज” मध्ये खिलजी राणी पद्मिनीला आरशात पाहत असल्याचे वर्णन आले आहे. पण या सर्व उल्लेखांना त्या काळातल्या लोकोक्तींचा आणि लोकसाहित्याच्या माध्यमातून प्रसिध्द झालेल्या कथांचा संदर्भ आहे.

मध्ययुगीन कालखंडात झालेली परकीय आक्रमणे आणि प्रकर्षाने मुस्लीम आक्रमणे, त्यातल्या हिंदू योध्य्यांच्या, स्त्रियांच्या शौर्यकथा हे भारताचे सांस्कृतिक संचित आहे. त्यातही या काळात मध्य-उत्तर आशियातून झालेली मुघल आक्रमणे आणि मुस्लीम बादशाहांच्या जुलमी सत्ता हे कालसापेक्ष विचार करता भारतीय समाजमनात अजून जिवंत आहेत. त्यामुळे पद्मावती आणि तत्सम अनेक कहाण्या लोकसाहित्याच्या माध्यमातून उतरोत्तर लोकप्रिय झाल्या, त्यांनी सांस्कृतिक विश्वात कित्येक काळ गाजवला यात आश्चर्य नाही.

कर्णी सेनेची भूमिका:

राजस्थानातील कर्णी सेना ही राजपूत जातीचे प्रतिनिधित्व करणारी अस्मितावादी संघटना आहे. अल्लाउद्दिन खिलजी आणि राणी पद्मिनी यांचे प्रेमदृष्य दाखवल्याने इतिहासाचे विकृतीकरण होत आहे असे कर्णी सेनेचे मत आहे. या दृश्याचे चित्रीकरण झाल्याची बातमी पसरताच नेहमीप्रमाणे कट्टर अस्मितावादी भूमिका घेत कर्णी सेनेने शक्य त्या सर्व मार्गांनी चित्रपटाला विरोध करणे सुरु केले आहे. वास्तवात चित्रित झालेली कथित प्रेमदृश्ये ही खिलजी आणि पद्मिनी यांच्यातली नसून राजपूत राजा रतनसिंह आणि पद्मिनी यांच्यातली आहेत हे नंतर स्पष्ट झाले आहे. तरी कर्णी सेनेने पद्मावतीला विरोध करणे थांबविलेले नाही. कर्णी सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी तर या चित्रपटातील नायिकेचे नाक कापण्यात येईल अशा वल्गना केल्या आहेत. अनेक महाभागांनी दीपिकाचे मस्तक छाटून आणणाऱ्या व्यक्तीस आपापल्या कुवतीप्रमाणे लाखांचे तर काहींनी कोटींचे बक्षीस जाहीर करून टाकले आहे. अस्मिताबाजीच्या राजकारण करण्यापासून खुद्द राजकीय पक्षही दूर राहिलेले नाहीत. योगी आदित्यनाथ, आचार्य गिरीराज किशोर या नेत्यांनी तर अस्मितावादी लोकभावना कुरवाळणारी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला केराची टोपली दाखवणारी भूमिका जाहीररीत्या घेतली आहे. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये काढल्याशिवाय तो प्रसिद्ध करण्यात येऊ नये असे या सर्वांचे मत आहे.

खरे पाहता दिग्दर्शक संजय भन्साळी हा दिग्दर्शक काही व्ही शांताराम किंवा श्याम बेनेगल यांच्याप्रमाणे आशयघन चित्रपटांची निर्मिती करणारा नाही, हे त्याच्या आजवरच्या कामावरून उघड आहे. भन्साळीचे चित्रपट कलात्मक अंगाने पाहू जाता त्यात काडीचाही दर्जा नाही. तद्दन व्यावसायिक गल्लाभरू चित्रपट बनवण्यात भन्सालीचा हातखंडा आहे हे गेल्याच वर्षी बाजीराव मस्तानी या त्याच्या चित्रपटाने सिध्द केले आहे. असे असताना पद्मावती च्या निमित्ताने सुरु असलेला वाद हा निर्मात्याचा पब्लिसिटी स्टंट आहे या युक्तीवादातही तथ्य असू शकते. मुद्दा हा आहे की, हे खरे असेल तर अपरिहार्य व्यावसायिक गणिते डोळ्यासमोर ठेवून जाणीपूर्वक घडवून आणलेल्या वादातही भारतीय समाजमन कमालीचे अस्मितावादी आणि प्रतिक्रियावादी होते, ही गोष्ट भन्सालीच्या सिनेमांच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा चव्हाट्यावर येते आहे.

इथे महत्वाचा मुद्दा असा की पद्मावती हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही. जो काही वाद आहे तो त्यावर पसरलेल्या ऐकीव बातम्याच्या आधारावर घातला जातो आहे. चित्रपटाचे कथानक नक्की काय आहे, त्याचे सार काय हे पूर्ण चित्रपट पाहिल्याशिवाय ठरविणे अशक्य आहे. तरी या चित्रपटाला इतिहासाचे विकृतीकरण केल्याचे कारण देऊन विरोध होतो आहे. या वादानंतर संजय भन्साळी यांनी एका चित्रफितीद्वारे “निव्वळ अफवा आणि चुकीच्या माहितीवरून पद्मावतीला विरोध होतो आहे. तुम्हाला वाटतंय तसं या सिनेमात काहीही नाही. राणी पद्मावती आणि अल्लाउद्दिन खिलजी यांच्यात ड्रीम सिक्वेन्स दाखवण्यात आल्याची अफवा पसरवण्यात आली असून मी ही गोष्ट यापूर्वीच नाकारली आहे” असे स्पष्टीकरणही दिले आहे. असे झाल्यानंतरही पद्मावतीच्या विरोधात असणारा जनक्षोभ अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे हे अस्मितावादी आणि जमावावादी आक्रमकतेचे हे वास्तव आपल्याला कोठे घेऊन जाणार याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

समांतर सेन्सॉरशिप भारताला नवीन नाही. आत्ता निमित्त पद्मावती आहे. काही दिवसापूर्वी इंदू सरकारचे निमित्त होते. निमित्त बदलत राहतील. विरोधकांचे, समर्थकांचे गटही बदलत राहतील. पण आक्रमणाची दिशा एक असेल. ज्यांना आत्ता अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हुक्की आली आहे त्यांनी त्यांच्या अस्मितांविषयी कलाकृती आल्यानंतर तिलाही याच पातळीचा विरोध केला होता. त्यामुळे कलात्मक स्वातंत्र्याची गळचेपी करण्याच्या बाबतीत सर्व राजकीय पक्ष आणि विचारप्रवाह हातात हात घालून काम करत आहेत असे चित्र आहे. एका दंतकथेवरील व्यावसायिक चित्रपटाविरोधात कुठलीतरी जातीय संघटना शड्डू ठोकून उभी राहते. कायद्याला केराची टोपली दाखवून चित्रपटातील कलाकाराचे मुंडके कापण्याची भाषा करते, आणि सर्व राजकीय पक्ष त्या संघटनेच्या विरोधात चकार शब्द काढत नाहीत हे भयानक वास्तव पद्मावतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही दशा अशीच चालू राहिली तर परिपक्व लोकशाही देश म्हणून मिरवण्याचा आपल्याला हक्क नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com