जातिव्यवस्थेतील ‘कर्तव्य’जाणिवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pratima joshi caste system After marriage girl has to forcibly converted two religion

वर किंवा वधूला धर्म न बदलता, आपापल्या श्रद्धा स्वतंत्रपणे जपूनही भिन्नधर्मीय विवाह करण्यास मान्यता देणारा विशेष विवाह कायदा आपल्या देशात आहे;

जातिव्यवस्थेतील ‘कर्तव्य’जाणिवा

- प्रतिमा जोशी

वर किंवा वधूला धर्म न बदलता, आपापल्या श्रद्धा स्वतंत्रपणे जपूनही भिन्नधर्मीय विवाह करण्यास मान्यता देणारा विशेष विवाह कायदा आपल्या देशात आहे; तरीही दोन धर्मीयांमध्ये लग्न झाल्यानंतर मुलीला बळजबरीने धर्मांतर करावे लागणार, असे समाजमनात ठसवले जातेे. त्यात जातिव्यवस्था अखंड ठेवण्यासाठीचा ‘कर्तव्य’पणा डोकावतो.

आपल्या देशात घरचे लग्न म्हणजे एक सोहळा असतो. मुलगी बघणे / दाखवणे, पत्रिका जुळणे, मुख्य म्हणजे पदर / गोत्र जुळणे... अर्थातच केवळ जातच नव्हे, तर पोटजातसुद्धा जुळणे, देणी-घेणी, सोने-नाणे, जेवणावळ, मानपान, आहेर, रुखवत, रीतीभाती, वरात अशी एक लांबलचक प्रक्रियाच असते.

या प्रक्रियेत ज्यांना आयुष्यभर एकत्र नांदायचे आहे, त्या तरुण जोडप्याच्या भावना, नव्या नात्यातील हळुवारपणा याला फारसे महत्त्व नसते. महत्त्व असते ते दोन घराण्यांच्या मानसन्मानाला, पत-ऐपतीला, वडीलधाऱ्या मंडळींच्या राग-रुसव्याला. अशा रीतीने देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने डोईवर अक्षता पडल्या की एका नव्या संसाराला सुरुवात होते.

कधी हसत, कधी चिडत संसार होतो. मुले बाळे, सणवार, आला-गेला, सुएर-सुतक सांभाळत वाटचाल होते आणि पुन्हा वीस-पंचवीस वर्षांनंतर पुढल्या पिढीचे तसेच पत्रिका जुळणे देणी-घेणी, पदर जुळणे... चक्र चालू राहते.

भारतीय समाजात वंशसातत्याबरोबरच जातिव्यवस्था अखंड अबाधित राखण्याचे कर्तव्य आपली विवाहसंस्था इमानेइतबारे करत असते. या जातिव्यवस्थेला गेल्या काही दशकात आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून अधूनमधून किरकोळ तडे जातात...

एखादा मोठाच दणका असेल, तर राडे वगैरे होतात. मंडळी फारच जात्याभिमानी असतील, तर तरुण जोडप्याच्या हत्या म्हणजे ऑनर किलिंग होतात. थोडी खळबळ माजते नि मग पुन्हा चौकटीतील व्यवस्था घट्ट होत जाते. प्रेम, सहजीवन वगैरे रोमँटिक कल्पनांना आपल्याकडे फारसा वाव नाही.

जिथे एकाच धर्मातील भिन्न जातींशी सहसा विवाहसंबंध फार मनापासून स्वीकारले जात नाहीत, तिथे दोन भिन्न धर्मीय विवाहसंबंध हा केवळ कुटुंबसंस्थेवरीलच नव्हे, तर समाजव्यवस्थेवरील आणि जणू काही आपल्या धर्मावरील घाला असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तर नवल काय?

आजवर इतिहास काळापासून अनेक आंतरधर्मीय विवाह झालेले असले, भारतात विभिन्न धर्म आणि त्या धर्माच्या कैक पिढ्या अस्तित्वात असल्याला कित्येक शतके लोटून गेली असली, तरी भारतीय समाजमन अद्यापही ‘परधर्म भयावह’ याच पगड्याखाली आहे.

जिथे एकच धर्म असला, तरी त्यातीलच जाती फारशा सैल व्हायला मागत नाहीत, तिथे धर्म ओलांडून जगणे ही तशी दुर्मिळ बाब म्हणायला हवी. आणि तसे ‘धाडस कोणी केलेच, तर प्रचंड विरोधाला, उपहासाला आणि प्रसंगी हिंसेलासुद्धा त्यांना सामोरे जावे लागते.

सध्या स्वरा भास्कर आणि फरहाद अहमद या नवपरिणीत जोडप्याला अशा उपहासातून, टीकेतून जावे लागतेय. स्वरा ही एक चांगली अभिनेत्री आहे, तर फरहाद हा सामाजिक/राजकीय कार्यकर्ता आहे.

आपण फरहादशी लग्नगाठ बांधल्याचे वृत्त आणि फोटो स्वराने सोशल मीडियावर टाकताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होण्याऐवजी टीकेचा भडिमार सुरू झाला. अतिशय वाईट पद्धतीने ट्रोलिंग सुरू झाले व ते अजूनही सुरू आहे.

या कुत्सित शेरेबाजीतून एक समज ठळकपणे दिसतो, तो म्हणजे स्वरा हिने इस्लाम धर्म स्वीकारला असणार. तिचे धर्मांतर गृहीत धरून तिचे लग्न हा ‘लव्ह जिहाद’ असल्याची विखारी टीकासुद्धा अनेकांनी केलेली दिसते.

या समजुतीत दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे धर्मांतराशिवाय आंतरधर्मीय लग्न शक्य नाही; आणि दुसरा म्हणजे बाईलाच नवऱ्याचा धर्म स्वीकारावा लागतो, ही पितृप्रधान समज. आपल्या देशातील वैयक्तिक कायद्यानुसार ते काही प्रमाणात बरोबरही आहे.

म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉ (१९५४) किंवा हिंदू मॅरेज ॲक्ट (१९५५)नुसार विवाह होणाऱ्या दोन्ही व्यक्ती एकाच धर्माच्या असायला हव्या. जर त्या भिन्न धर्माच्या असतील, तर ज्या धर्माच्या वैयक्तिक कायद्याखाली त्या विवाहबद्ध होणार आहेत, त्या धर्माचे नसलेल्या व्यक्तीला तो धर्म स्वीकारावा लागतो. स्वरावर टीका यातूनच होत आहे, हे उघड आहे.

पण स्वतंत्र भारत देशाचे संविधान सर्व धर्माच्या लोकांना जसे उपासना आणि जीवनमार्ग जपण्याचे स्वातंत्र्य देते, तसेच जात/धर्म/वंश यांच्या पलीकडे जाऊन, निरपेक्ष जीवन जगण्याचा अधिकारसुद्धा तेवढ्याच ठळकपणे देते.

वर किंवा वधू या कोणालाही आपला धर्म बदलायला न लागता, आपापल्या श्रद्धा स्वतंत्रपणे जपूनही भिन्न धर्मीय विवाह करण्यास व जीवन जगण्यास मान्यता देणारा विशेष विवाह कायदा म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट आपल्या देशात आहे!

हा नागरी कायदा सर्वांना समान न्याय आणि अधिकार देतो. आधुनिक भारताची पायाभरणी करणारा असा हा कायदा आहे. स्वरा आणि फरहाद याच कायद्याखाली विवाहबद्ध झाले आहेत. हा विशेष विवाह कायदा आपल्या संसदेत ९ ऑक्टोबर १९५४ रोजी संमत झाला.

हा कायदा विवाह ही धार्मिक नव्हे, तर सामाजिक बाब मानतो आणि कोणत्याही धर्माच्या भारतीय नागरिकाला (पुरुषांसाठी वय २१ आणि स्त्रियांसाठी १८) आपल्या पसंतीच्या कोणत्याही धर्माच्या व्यक्तीशी विवाहबद्ध होण्यास विधिवत संमती आणि त्याला जोडून येणारे अधिकारही देतो.

विवाहबद्ध होणाऱ्या व्यक्तीचे आधी तिसऱ्या कोणाशी वैवाहिक संबंध नाहीत ना, हेही हा कायदा काटेकोर तपासून घेतो. विवाहापूर्वी एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. या एक महिन्याच्या काळात या कायद्याचे उल्लंघन करणारी कोणतीही बाब इच्छुक पक्षांकडून होत नाहीये, याची शहानिशा केली जाते.

या तरतुदीबाबत अलीकडेच अलाहाबाद कोर्टाने काही महत्त्वाचा निर्णय दिला आहे, यानुसार एक महिन्याचा नोटीस पिरियडबाबत सारासार विचार होऊनही तरतूद बदलली जाऊ शकते. या कायद्याखाली आजवर देशात लाखो आंतरजातीय, आंतरधर्मीय तसेच विवेकवादी विवाह झाले आहेत.

अगदी रुढीवादी, पारंपरिक कुटुंबेसुद्धा काळाप्रमाणे चालत नोंदणी विवाहाची वाट चोखाळू लागले आहेत; तर आंतरधर्मीय, आंतरवर्णीय, आंतरप्रांतीय विवाहाची परंपरा भारतातही फार जुन्या काळापासून दिसते. मुघल राजवटीत राजपुतांच्या अनेक मुली मुघल राजघराण्यात उभयपक्षी मान्यतेने गेलेल्या दिसतात.

पैकी जोधाबाईचे उदाहरण सर्वांनाच ठावूक आहे. अर्थात ही पद्धत राजघराणी, मान्यवर कुटुंबात अधिक होती. पुढील काळात तर भिन्न धर्म, संस्कृती, वंश यांच्यात विवाहसंबंधाने सरमिसळ झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

त्या काळात विशेष विवाह कायदा नसतानाही असे विवाह झाले आणि टिकलेही. बळजबरीने धर्मांतर करून विवाह केल्याची उदाहरणे फारशी दिसत नाहीत. आता तर स्वातंत्र्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या अधिकाराची जपणूक करणारी संवैधानिक शासनव्यवस्था अस्तित्वात आहे.

सर्वसामान्य नागरिकांत शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. आपापल्या श्रद्धा जपूनही भिन्न धर्मीय वैवाहिक जीवन जगण्यास कायद्याचे पाठबळ आहे; तरीही अशा विवाहांमध्ये मुलीला बळजबरीने धर्मांतर करावे लागणार असे समजण्यात, तसे ठसविण्यात आणि समाजमनात प्रक्षोभ टिकवून ठेवण्यात नेमके कोणाला काय साधायचे आहे, याचा शांतपणे विचार करायची वेळ आली आहे.

टॅग्स :marriagecastesaptarang