ऑनलाइन कर्ज (प्रवीण कुलकर्णी)

प्रवीण कुलकर्णी
रविवार, 26 ऑगस्ट 2018

तातडीच्या गरजेसाठी कर्ज देणारी वेगवेगळी ऍप्स आणि वेबसाइट्‌स उपलब्ध आहेत. संबंधित कंपनीच्या निकषांत बसत असल्यास आणि वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास तातडीनं कर्ज मिळू शकतं. अशीच काही ऍप्स आणि वेबसाइट्‌स यांच्याविषयी माहिती.

तातडीच्या गरजेसाठी कर्ज देणारी वेगवेगळी ऍप्स आणि वेबसाइट्‌स उपलब्ध आहेत. संबंधित कंपनीच्या निकषांत बसत असल्यास आणि वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास तातडीनं कर्ज मिळू शकतं. अशीच काही ऍप्स आणि वेबसाइट्‌स यांच्याविषयी माहिती.

कर्ज काढणं ही एकेकाळी अतिशय अवघड असलेली गोष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सोपी करून टाकली आहे. अनेक ऍप्स, वेबसाइट्‌स अडीअडचणीच्या काळात हात देतात. तुम्ही संबंधित कंपन्यांच्या निकषांत बसलात आणि ठराविक कागदपत्रांची, नियमांची पूर्तता केली, तर अक्षरशः पुढच्या 15 मिनिटांमध्ये त्या कंपन्या तुमच्या बॅंक खात्यात पैसे जमा करतात. कागदपत्रांची मोठी फाइलच सादर करणं, 10-15 दिवस बॅंकेचे उंबरठे झिजवणं, असं काहीही इथं करावं लागत नाही. तुम्हाला फक्त तुमच्या स्मार्ट फोनमध्ये मनी लेन्डिंग (कर्ज देणारं) ऍप डाऊनलोड करावं लागतं. त्यावर तुमचं नाव, नोकरीचं ठिकाण, पगाराची माहिती किंवा उत्पन्नाचा मार्ग अशी काही विशिष्ट माहितीसह हव्या असलेल्या कर्जाची रक्कम भरून द्यावी लागते. पुढच्या काही सेकंदात तुम्ही कर्जाला पात्र आहे की नाही हे ठरवलं जातं. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅंक स्टेटमेंट आणि पगाराची स्लिप अशी काही कागदपत्रं "अपलोड' केली, की साधारणतः पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये मंजूर रक्कम तुमच्या खात्यावर जमा होते. मात्र, या बहुतेक कंपन्यांच्या कर्जांचे दर हे बॅंकांपेक्षा जास्त असतात, हेही लक्षात घेतलं पाहिजे.

कर्जाची पात्रता ठरवण्याचे प्रत्येक कंपनीचे स्वतःचे नियम असतात. काही कंपन्या सोशल माध्यमांवर असलेले मित्र किंवा फॉलोअर्सचा अभ्यास करून तुमची पत ठरवतात. तुम्ही कर्जाची रक्कम परत करण्यास सक्षम आहात की नाही, हे ठरवण्याचेही प्रत्येकाचे निकष वेगळे आहेत. अर्थात, तुमचा क्रेडिट स्कोअर, गेल्या काही महिन्यांत बॅंक खात्यातून झालेल्या पैशांची देवाणघेवाण हे निकष बहुतांश कंपन्या पाळतात. "पी टू पी' प्रकारातल्या कंपन्या कर्ज देण्यासाठीची रक्कम श्रीमंत व्यक्ती, कर्जदार संस्था किंवा अँजेल इन्व्हेस्टर यांबरोबरच सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडून उभा करतात. म्हणजेच तुम्हीदेखील "कर्ज देणारे' (लेंडर) म्हणून यात सहभागी होऊन गुंतवणुकीवर अर्थार्जन करू शकता. यामध्ये तुम्हाला वेबसाइटवर "लेंडर' म्हणून रजिस्टर व्हावं लागतं. रजिस्टर होताना "बॉरोअर'प्रमाणं तुमची माहिती द्यावी लागते आणि किती रक्कम उपलब्ध करून द्यायची आहे इत्यादी माहिती दिल्यानंतर "वन टाइम प्रोसेसिंग फी' भरून सहभागी होता येतं. अशीच वेगवेगळी ऍप्स आणि वेबसाइट्‌सबद्दल आपण माहिती घेऊया.

अर्ली सॅलरी (Early Salary) ः ही कंपनी तिच्या नावाप्रमाणंच पगारदारांना- विशेषतः त्यातल्या तरुण पगारदारांना कर्ज देते. ज्याप्रमाणं काही वेळा पगाराची रक्कम गरजेनुसार तुम्ही आगाऊ उचलता किंवा क्रेडिट कार्डद्वारे कॅश घेण्याचा पर्याय जसा असतो, त्याचप्रमाणं ऍपच्या माध्यमातून तुमच्या पगारानुसार कर्ज दिलं जातं. यामध्ये कर्ज घेतलेली रक्कम तुम्हाला तीस दिवसांच्या आत व्याजासह परत करावी लागते. आतापर्यंत अंदाजे 15 लाख ग्राहकांनी हे ऍप डाऊनलोड केलं आहे.

शुभ लोन्स (shubhloans) ः बारा हजारांपेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना या ऍपद्वारे कर्ज दिलं जातं. जास्तीत जास्त चार वर्षांच्या मुदतीसाठी पाच लाखांपर्यंतची कर्जं मंजूर केली जातात. हप्त्याची रक्कम पारंपरिक बॅंकाप्रमाणं न ठरवता शुभ लोन्सनं विकसित केलेल्या मॉडेलनुसार आणि तुम्हाला शक्‍य असलेल्या क्षमतेवर आधारित निश्‍चित करून दिली जाते.

व्होट फोर कॅश (vote 4 cash) ः "तुमची समाजातली पत ही क्रेडिट रेटिंग संस्थांनी ठरवलेल्या पतमानांकनापेक्षा जास्त महत्त्वाची आहे,' या तत्त्वानुसार या ऍपद्वारे कर्ज मंजूर केलं जातं. या ऍपवर खातं उघडण्यासाठी फेसबुक किंवा लिंक्‍डइनसारख्या माध्यमांद्वारे तुम्ही लॉगिन करू शकता. ऍपवर कर्जमंजुरीसाठी सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम असे तीन प्रकार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सुरुवातीला सहा महिन्यांसाठी तीस हजार रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात येतं. त्यानंतर तुमच्या व्यवहारपद्धतीनुसार कर्जाचा कालावधी आणि रक्कम चाळीस आणि साठ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाते.

लेन्डबॉक्‍स.इन (lendbox.in) ः लेन्डबॉक्‍स ही भारतातील आघाडीची "पी टू पी' कंपनी आहे. या कंपनीमार्फत आतापर्यंत एक लाख 21 हजार ग्राहकांनी कर्ज सुविधेचा फायदा घेतला असून, बारा हजारांपेक्षा जास्त नोंदणीकृत गुंतवणूकदारांना "लेंडर' म्हणून मोबदला मिळाला आहे.

फेअरसेन्ट.कॉम (faircent.com) ः या वेबसाइटमार्फत आतापर्यंत जवळजवळ पन्नास लाख लोकांनी स्वतःला "लेंडर' म्हणून रजिस्टर केलं आहे. वेबसाईट सुरू झाल्यापासून तब्बल शंभर कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. "लेंडर्स'साठी कमी जोखीम- ते उच्च जोखीम अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येतं.

लेनदेन क्‍लब.कॉम (lendenclub.com) ः लेनदेन क्‍लबवर पाच लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज मंजूर करण्यात येतं. सर्वच प्रकारच्या कर्जवाटपाबरोबरच क्रेडिट कार्डचं कर्ज भरून कमी दरात ते फेडण्याची सुविधा वेबसाइटवर देण्यात आली आहे. बारा हजारांपेक्षा जास्त पगार असणाऱ्या आणि जानेवारी 2012 नंतर कर्जफेड चांगली असलेल्या आणि बॅंक डिफॉल्ट नसलेल्या 21 ते 55 वयोगटातल्या ग्राहकाला कर्ज मंजूर करण्यात येतं.

आय2आय फंडिंग.कॉम (i2ifunding.com) ः गुंतवणूकदाराचे पैसे सुरक्षित ठेवण्याकडं या कंपनीचं विशेष लक्ष असतं. कर्ज मंजूर करताना कंपनीनं ठरवलेल्या तब्बल शंभर नियमांची कात्री लावूनच इथं कर्ज मंजूर केलं जातं. कर्ज घेणाऱ्याची वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक; तसंच नोकरीविषयक इत्थंभूत माहिती घेऊनच पुढची प्रक्रिया पार पडली जाते. या ऍपद्वारे आतापर्यंत बारा कोटींचं कर्ज वितरित करण्यात आलं आहे.

(डिस्क्‍लेमर ः संबंधित मजकूर हा केवळ माहिती व्हावी यापुरता मर्यादित आहे. मात्र, कर्ज घेताना किंवा गुंतवणूक करताना प्रत्येकानं खात्री करूनच आपली आर्थिक आणि वैयक्तिक माहिती देणं अपेक्षित आहे. या क्षेत्रात जोखीमही मोठी असते, हे लक्षात घेतलं पाहिजे.)

Web Title: pravin kulkarni write online loan technodost article in saptarang