गंध माझा वेगळा... (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 20 ऑगस्ट 2017

‘सेंट ऑफ अ वूमन’ हा सुगंधवाही चित्रपट आहे. त्यातल्या व्यक्‍तिरेखांचे गंध इतके गडद आणि पार्थिव आहेत, की आपल्या चित्तवृत्तींची एकदम चलबिचल व्हायला लागते. हा चित्रपट आपल्याच जाणिवेबद्दल, मेलेल्या, अर्धमृत किंवा मलूल पडलेल्या ऊर्मींबद्दल काही सांगू पाहतो. दुष्काळानंतर अचानक आलेल्या मृद्‌गंधासारखा सुखद झटका हा चित्रपट देतो.

Men do change, and change comes like a little wind that ruffles the curtains at dawn, and it comes like the stealthy perfume of wildflowers hidden in the grass.
 - John Steinbeck
स्वीट थर्सडे, कादंबरी (१९५४)

‘सेंट ऑफ अ वूमन’ हा सुगंधवाही चित्रपट आहे. त्यातल्या व्यक्‍तिरेखांचे गंध इतके गडद आणि पार्थिव आहेत, की आपल्या चित्तवृत्तींची एकदम चलबिचल व्हायला लागते. हा चित्रपट आपल्याच जाणिवेबद्दल, मेलेल्या, अर्धमृत किंवा मलूल पडलेल्या ऊर्मींबद्दल काही सांगू पाहतो. दुष्काळानंतर अचानक आलेल्या मृद्‌गंधासारखा सुखद झटका हा चित्रपट देतो.

Men do change, and change comes like a little wind that ruffles the curtains at dawn, and it comes like the stealthy perfume of wildflowers hidden in the grass.
 - John Steinbeck
स्वीट थर्सडे, कादंबरी (१९५४)

‘सौं  दर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं’, अशा आशयाचं विल्यम शेक्‍सपीअरचं सुप्रसिद्ध वाक्‍य एव्हाना वापरून घासून गुळगुळीत झालेलं आहे; पण ते शेक्‍सपीअरचं असलं तरीही ते तितकंसं खरं नाही. एखाद्याला दृष्टीच नसेल तर? तरीही त्याला सौंदर्याची चाहूल लागतेच. डोळे हे एकच ज्ञानेंद्रिय देवानं दिलेलं नाही. सौंदर्य त्वचेला जाणवतं. कानांनी ऐकताही येतं आणि त्याचे गंधकण नाकानं टिपताही येतात. ‘आमोद सुनांस जाले’, असं ज्ञानेश्‍वरमाउली म्हणते ते उगीच नाही. त्याचा भोक्‍ता मात्र हवा. असं सौंदर्य आढळलं की मग रानफुलाचा वास दडवून आणणारी पहाटेची झुळुक मनाच्या खिडक्‍यांचे पडदे सळसळवते. मेन डू चेंज...खरंय.

‘सेंट ऑफ अ वूमन’ हा एक असाच सुगंधवाही चित्रपट आहे. त्यातल्या व्यक्‍तिरेखांचे गंध इतके गडद आणि पार्थिव आहेत की आपल्या चित्तवृत्तींची एकदम चलबिचल व्हायला लागते. फूटपाथवरच्या घामाघूम भाऊगर्दीत चालताना अचानक एखादा परिमळ नाकाशी रुंजी घालावा आणि गर्दीतही आपली मान त्या सुगंधाचा मालक किंवा मालकीण कोण आहे, हे बघण्यासाठी नकळत मागं वळावी, तशी जाणीव देतो हा चित्रपट. वरकरणी वाटतं की हा चित्रपट एका वाढत्या वयाच्या पोराचा अनुभव सांगतोय किंवा एका अंध लष्करी अधिकाऱ्याचा; पण कालांतरानं जबरदस्त जाणीव होते, की हा चित्रपट आपल्याच जाणिवेबद्दल बोलतोय. मेलेल्या, अर्धमृत किंवा मलूल पडलेल्या ऊर्मींबद्दल काही सांगू पाहतोय. दुष्काळनंतर अचानक आलेल्या मृद्गंधासारखा सुखद झटका हा चित्रपट देतो. पर्फ्युमचे नोट्‌स असतात म्हणे. तो गंध पहिल्यांदा तीव्र अस्तित्व दाखवतो. ती फर्स्ट नोट. मग काही काळ गेला की तोच गंध आपल्या व्यक्‍तिमत्त्वाशी सम्मीलित होतो आणि वेगळी छटा निर्माण करतो. ती दुसरी नोट. तिसरी फक्‍त सहवासात आलेल्या व्यक्‍तींना जाणवते. चौथी तर त्याहूनही...जाऊ दे.
...‘सेंट ऑफ अ वूमन’ या चित्रपटाची मांडणी ही अशी एका महागड्या पर्फ्यूमसारखीच आहे. पहनो तो जानो.
* * *

लेफ्टनंट कर्नल फ्रॅंक स्लेड हे एक तेजाब होतं. रगेल आणि रंगेल. पिंडात लष्करी खाक्‍या ओतप्रोत भरलेला. फौजी माणूस म्हणजे आधीच बायाबापड्यांच्या रंगीन जगापासून कोसभर दूर राहणारा. लेकिन आदमी था, भाई. सौ फीसदी मर्द आदमी था.
...एक दिवस सैनिकांना धडे देत असताना हातात हॅंडग्रेनेड फुटला आणि डोळेच गेले. एरवी खविसासारखा ओरडणारा, शिस्तीच्या बडग्याखाली हाताखालच्या सोल्जर्सना चिरडणारा स्लेड आंधळा...ठार आंधळा झाला. आधीच संतापी, तिरसट त्यात आता दृष्टिहीन. आंधळ्या लष्करी अधिकाऱ्याला सरहद्दीवर जागा नाही. सबब लेफ्टनंट कर्नल फ्रॅंक स्लेड यांना सक्‍तीनं; पण सन्मानानं घरी पाठवण्यात आलंय.

एकटा राहतो. आपल्या भाचीकडं. पण याचा रागरंग असा की जणू काही याच्याचकडं भाची आणि तिचा कुटुंबकबिला आश्रित म्हणून आलाय! त्याच्या खसकेल कवटीनं घरची मंडळी कातावलेली आहेत; पण ती त्याला सभ्यपणे सहन करताहेत. तेवढ्यात थॅंक्‍सगिव्हिंगचा दिवस जवळ आल्यानं पंचाईत होते. अमेरिकेत थॅंक्‍सगिव्हिंग म्हणजे एक जोरदार सण. अशा सणासुदीला हा तिरशिंगराव सांभाळत बसायचा की जरा एंजॉय करायचं? भाचीनं ठरवलं की एखादा गरजू महाविद्यालयीन विद्यार्थी बोलवावा याला कम्पॅनियन म्हणून. याच्याबरोबरीनं हिंडेल, फिरेल. खाईल. राहील. आपण जाऊन येऊ. शेवटी एका वीकेंडचा तर प्रश्‍न आहे.

एक बोर्डिंग स्कूल होतं. बेअर्ड ॲकॅडमी फॉर बॉइज. तिथं चार्ली सिम्स नावाचा एक होनहार मुलगा सापडला. गरजू होता. पैसेवाल्यांच्या स्कुलात शिकत असला तरी श्रीमंत घरातला नव्हता. शिष्यवृत्तीवर शिकत होता. शिवाय छोटी-मोठी कामं करून चार पैसे गाठीला लावायची त्याला सवयही होती.
ओरेगॉनला आई-वडिलांकडं क्रिसमसच्या सुट्टीवर जाण्यासाठी त्यालाही पैसे जमवायचे होतेच. त्यानं हा टेम्परवारी जॉब घेतला...एका आंधळ्याला साथ द्यायचीये, एवढंच ना? नो प्रॉब्लेम. अधूनमधून सिगारबिगार आणून द्यायला पळवेल. बाथरूममध्ये टॉवेल दे, म्हणून सांगेल. ठीकंय. करू या...असं म्हणून सिम्सनंही होकार कळवला.
इथून कहाणीला सुरवात होते...
* * *

कर्नल फ्रॅंक स्लेडला चार्लीच्या ताब्यात देऊन घरची मंडळी रवाना झाली. सुरवातीला चार्ली चांगलाच दबकला होता. फौजी अधिकारी. त्यात जरा सर्किट. स्लेडनं त्याला विश्रांतीला वेळच दिला नाही. ‘आपल्यालाही थॅंक्‍सगिव्हिंगची सुट्टी एन्जॉय करायची आहे. तेव्हा बॅगा भरा, आपण न्यूयॉर्कला निघतो आहोत,’ असं त्यानं जाहीर केलं. बाप रे! या कर्नलचे बेत निराळेच दिसताहेत. कर्नल अंध असला तरी कमालीचा टापटीप आहे. वस्तू त्याला जिथल्या तिथं लागते. ती तशी नसेल तर तो घर डोक्‍यावर घेतो.
खुर्चीतून उठताना नकळत चार्लीनं स्लेडचा हात पकडला. अभावितपणे.
‘‘आर यू ब्लाइंड? आंधळा आहेस का तू पण?’’ स्लेडनं विचारलं.
‘‘नो सर...’’ चार्ली चाचरत म्हणाला.
‘‘मग *** हात सोड ना माझा!!’’ स्लेड भडकला होता.
 ...भयंकर माणसाशी आपली गाठ पडली आहे, हे चार्लीच्या लक्षात आलं. तो हबकून गेला.

इथं टेम्पररी जॉबवर येण्याआधी बेअर्ड स्कूलमध्ये एक नाटक घडलं होतं, त्याचं टेन्शन त्या बिचाऱ्या पोराला होतंच. झालं होतं ते थोडक्‍यात असं, की शाळेतल्या काही टारगट पोरांनी हेडमास्तर मि. ट्रास्क यांची काहीतरी भयानक मस्करी केली होती. मस्करीची कुस्करी झाली होती. कुणी हा वाह्यात प्रकार केला, हे मि. ट्रास्क यांना कळलं नाही; पण चार्ली सिम्स आणि त्याचा दोस्त जॉर्ज विलिस ज्युनिअर यांच्यासमोर हे घडलंय, एवढं त्यांना कळलं. ‘त्या टारगट पोरांची नावं सांगितलीत तर पुढल्या वर्षी तुम्हाला विशेष शिफारसपत्र देईन, आयव्ही लीग महाविद्यालयातला तुमचा प्रवेश पक्‍का होईल,’ असं आमिष त्यांनी दाखवलं. ‘नाही सांगितलीत, तर तुम्हाला काढून टाकण्यात येईल,’ असा दमही दिला. चार्ली गोंधळात पडला होता. काय करावं? फितूर होऊन मित्रांना लटकवून भविष्याचा मार्ग सुकर करून घ्यावा? की दोस्ती के वास्ते शहीद व्हावं? असल्या भावनिक गोंधळातच तो स्लेड यांच्याकडं नोकरीला आला होता.
* * *

लेफ्टनंट कर्नल फ्रॅंक स्लेड यांना डोळे नव्हते; पण दृष्टी होती. माणूस मनानं रसिक होता. गाण्याचा कान होता. वाचन अफाट होतं. नुसत्या चाहुलीवर खोलीत कोण आलंय हे त्यांना कळतं. कुठून आलाय, हेसुद्धा कळतं. शेरलॉक होम्सचा बाप आहे हा माणूस. पर्फ्यूम्सचा शौकीन आणि जाणकारही आहे. माणूस ओळखण्याचे त्याचे स्वत:चे काही आडाखे आहेत. त्यात तो सहसा चुकत नाही, असा त्याचा दावा आहे.
-फ्रॅंक स्लेडनं पोराला आपल्या बरोबर न्यूयॉर्कला आणलं. का आणलं?
सुप्रसिद्ध वॉल्डॉर्फ-अस्टोरिया हॉटेलातला सगळ्यात महागडा स्यूइट भाड्यानं घ्यायचा. तिथं भिंतभर जॅक डॅनियल्सच्या बाटल्या लावून ठेवायच्या. एकेक संपवायची. मग जगातली सगळ्यात उंची, महागडी वाईन प्यायची. वाऱ्याशी शर्यत लावणाऱ्या फेरारीची थरारक फेरी मारायची. सगळ्यात सुंदर पोरगी गटवून तिच्याबरोबर टॅंगो नृत्य करायचं. आणि...आणि नंतर पिस्तूल कपाळाला टेकवून ढिचक्‍यांव...संपून जायचं. स्लेडचा हा इरादा ध्यानात आल्यावर चार्लीनं आवंढाच गिळला. ही भलतीच भानगड झाली. या फौजी माणसाकडं खरंच पिस्तूल आहे आणि गोळ्याही आहेत. गमतीत बोलल्यासारखं बोलतोय; पण खरंच त्यानं असलं काही केलं तर?
एव्हाना दोघांचं बरं जुळलं होतं. चार्लीचं पोरपण स्लेडला भावलं होतं नि स्लेडच्या खडकाळ व्यक्तिमत्त्वात दडून वाहणाऱ्या ममतेच्या झऱ्याची अस्पष्ट खळखळ चार्लीला ऐकू आली होती. शाळेत झालेली भानगड त्यानं सहज बोलता बोलता स्लेडना सांगितली. स्लेड म्हणाले : ‘हल्ला झाला की एक तर आक्रमण करावं किंवा खंदकात दडावं...खंदक बरा!’ चार्लीला काही पटलं नाही. न्यू यॉर्कमध्ये फेरारीच्या शोरूममध्ये जाऊन स्लेडनं टेस्ट ड्राइव्हची मागणी केली. फेरारीसारख्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह वगैरे नसते. ती विकत घेऊनच चालवायची असते, असं सेल्समननं नम्रपणे सांगितलं; पण स्लेडनं त्याला बोल बोल म्हणता पटवला. गाडी शोरूमबाहेर काढलीच. स्पीड ड्रायव्हिंगसाठी त्याला पोलिसानं अडवलं, तेव्हा त्याला असा काही जमालगोटा दिला की स्वारी सुटली. एवढं होऊन तो अंध आहे, हे कुणाला कळलंदेखील नाही. वॉल्डॉर्फच्या जगद्विख्यात रेस्तरांमध्ये स्लेडला लांबून सुगंध आला. प्रत्येक सुगंध आपली ओळख सांगतो. ती आपली दुसरी त्वचा असते. स्पर्शातून जसं काहीतरी संक्रमित होतं, तसंच सुगंधातूनही होत असतं. उदाहरणार्थ ः एखादा मादक सुगंध कितीही महागडा असला तरी सामान्य स्त्रीनं लावून त्याचा मोह पडत नाही. तो सुगंध धारण करणाऱ्या व्यक्‍तीशी त्याचं नातं जुळावं लागतं. हे शास्त्र तितकं सोपं नाही...
स्लेडनं दुसऱ्या टेबलावरून आलेल्या त्या सुगंधाच्या जन्मदेहाचं अचूक वर्णन केलं. चार्ली चाट पडला. ती डोना होती....डोना. ती कुणाची तरी वाट पाहत होती. कुणाची तरी म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडची. स्लेडनं त्याची पर्वा न करता डोनाला गाठलं...त्या रात्री स्लेडनं डोनाबरोबर टॅंगोही केला.
सो, अब हो गया.
* * *

हॉटेलच्या खोलीत आल्यावर स्लेड त्याला म्हणाला ः ‘‘ माझ्या औषधाच्या गोळ्या संपल्या आहेत. घेऊन ये...आणि हो, आणखी थोडं पुढं जा. माझ्या क्‍यूबन सिगार्स आण.’’
स्लेडनं त्याला उघड उघड कटवलं होतं. काहीतरी घोटाळा आहे, असं जाणवून चार्ली परत फिरला. खोलीत स्लेडनं आपला नखशिखान्त युनिफॉर्म चढवला होता आणि तो पिस्तुलात गोळ्या भरत होता.
‘‘तू लौकर परत का आलास? जा!’’
‘‘सर, तुम्ही...तुम्ही पिस्तूल माझ्याकडं द्या, प्लीज!’’ चार्लीनं गळ घातली.
‘‘फूट!’’
‘‘तुम्ही मला शब्द दिला होतात की गोळ्या तरी माझ्यापाशी द्याल म्हणून. तुम्ही शब्द मोडताय!’’ चार्ली रडकुंडीला आला होता.
‘‘मी खोटं बोललो! काय म्हणणं आहे? तू जा, नाहीतर मी पहिली गोळी तुला घालीन!’’
‘‘तसं नका करू सर...पिस्तूल द्या ना माझ्याकडं प्लीज! नाहीतर...’’
‘‘नाहीतर? नाहीतर काय? मला अल्टिमेटम देतोस? मी देतो अल्टिमेटम नेहमी, समजलं?’’
‘‘ डोंट टू धिस सर, प्लीज...’’
‘‘गोळीच घालतो तुला! साल्या, नाहीतरी तू माझ्यावाचून कसा जगणारेस? नेभळट लेकाचा!! काहीही करू शकणार नाहीस तू!! तुला गोळी घालावी की दत्तक घ्यावं, हा खरा सवाल आहे!!’’
‘‘गोळी घालणं हा चॉइस नाही होऊ शकत, कर्नल!’’ धीर एकवटून चार्ली म्हणाला.
‘‘गोड बोलू नकोस, साल्या!’’
दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. अखेर चार्ली जिंकला. स्लेडनं त्याला पिस्तूल दिलं.
* * *

बेअर्ड स्कूलमधल्या प्रकरणाची रीतसर सुनावणी झाली. महासभा बोलावून चौकशी करून चार्ली आणि त्याचा दोस्त जॉर्ज यांना काढून टाकायचं ठरलं. जॉर्जचे वडील आले होते. त्यांनी पोरासाठी काही चाव्या फिरवल्या. जॉर्ज तंबीनिशी सुटणार हे नक्‍की झालं. वाली नव्हता तो चार्लीलाच; पण ऐनवेळी कर्नल फ्रॅंक स्लेड चार्लीच्या बचावाला आले. सगळ्या महासभेसमोर त्यांनी जबरदस्त प्रभावी भाषण केलं.
‘‘मि. ट्रास्क, तुम्ही चार्लीला खोटारडा म्हणताय? खोटारडा? का? तुमच्या आमिषाला बळी पडून त्यानं त्याचा आत्मा विकला नाही म्हणून? बंद करा ही तुमची भंकस, बेअर्ड संस्था. तुमच्या परंपरांना लावा आग! त्याचा मित्र इथं तुमच्या डोळ्यांदेखत अमीर बापाच्या खिशात बसून सुटका करून घेतोय आणि स्वत:च्या तत्त्वांशी घट्ट राहणारा हा चार्ली नावाचा एक ओरेगॉनचा पोरगा मात्र तुम्हाला परत पाठवायचाय. लाज आहे लाज! तुमच्या मते, तुम्ही फक्‍त एका विद्यार्थ्याला काढून टाकताय; पण नाही, मि. ट्रास्क, तुम्ही त्याचा आत्मा फासावर द्यायला निघाला आहात. हा कुठला पुरुषार्थ आणि तुमच्या बेअर्डची परंपरा? माझ्या आयुष्यात मी खूप तरुण मुलं बघितली आहेत. हात-पाय तुटलेले, चेहरा गमावलेले, कितीतरी जायबंदी सोल्जर्स बघितलेत; पण त्यांची स्थिती जरा बरी होती. शरीर घायाळ झालेलं चालतं मि. ट्रास्क; पण उमेद नावाची गोष्ट मोडली की त्याला कुठला कृत्रिम अवयव नाही लावता येत. या पोराच्या उमेदीलाच तुम्ही नख लावताय...चार्ली विकला गेला नाही. दुर्दम्य खलाश्‍यासारखा तुमच्यासमोर उभा राहिलाय. तुमच्या संस्थेला ‘क्रेडल ऑफ लीडरशिप’ म्हणतात ना? इथून अनेक नेते-पुढारी शिकून गेलेत म्हणे. माय फूट! पण दोर तुटला की पाळणा कोसळतो मि. ट्रास्क...आणि तुमच्या पाळण्याचा दोर केव्हाच तुटलाय! हिंमत, आत्मनिष्ठा आणि तत्त्वांची सामूहिक कत्तल करताय तुम्ही. हेल विथ यू...’’
चार्ली सुटला. स्लेड दिमाखात पावलं टाकत आपल्या लिमूझिनकडं निघाला. तेव्हाच त्याला एक परिचित सुगंध पुन्हा एकदा आला...
* * *

अल पचिनो नावाच्या अजोड कलाकारानं साकारलेला कर्नल फ्रॅंक स्लेड केवळ अफलातून आहे. त्याचा हा रोल त्याला १९९२ मधलं ऑस्कर देऊन गेला, यात काहीही आश्‍चर्यकारक नव्हतं. अहंकारी, दारुडा, तरीही सुजाण असा अंध लष्करी अधिकारी त्यानं (एकदाही गॉगल न वापरता) अशा काही खुबीनं रंगवला की बस...भल्याभल्यांचे डोळेच उघडावेत! विशेषत: क्‍लायमॅक्‍सच्या आधीचं कर्नल स्लेडचं स्वगत केवळ लाजबाब आहे. ते अभिजात तर आहेच; पण अनेक संस्थाचालकांनी, विद्यार्थ्यांनीही आवर्जून ऐकावं असं आहे. या स्वगतासाठी अल पचिनोनं सर्वाधिक दाद मिळवली आहे. फक्‍त या स्वगतासाठी संपूर्ण चित्रपट अनेकदा पाहणारे रसिकही आहेत. कहाणीपेक्षाही इथं व्यक्‍तिरेखांच्या ठळक रेषा अधिक भावतात. संवाद कमालीचे खटकेबाज आहेत. क्रिस ओडोनलनं केलेली चार्लीची भूमिका आणि त्याचं स्लेडशी जडलेलं नातं इतकं हळुवार आहे, की त्याचं अस्तित्व रांगड्या संवादांमध्येही लपून राहत नाही.

वास्तविक ही मूळ कहाणी इटालियन आहे. कादंबरी जिओवन्नी आर्पिनो यांनी लिहिलेली. युद्धभूमीवर जायबंदी झालेल्या कर्नलची आणि त्याला घरी सोडायला निघालेल्या सोल्जरची; पण तिच्यात थोडा बदल करून सन १९७२ मध्ये ‘सेंट ऑफ अ वूमन‘ याच नावाचा एक इटालियन चित्रपटही आला होता. सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट म्हणून त्याला त्या वर्षीचं ऑस्करही मिळालं; पण त्यानंतर २० वर्षांनी अल पचिनोनं केलेला रिमेक काहीच्या काही सरस निघाला. पचिनोच्या चाहत्यांना तर ही पर्वणीच आहे. ‘गॉडफादर’ त्रिधारा किंवा ‘स्कारफेस’मधला पचिनो कित्येकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला होता. आजवर आठ वेळा ऑस्कर नामांकन मिळालेला हा अभिनयसम्राट हॉलिवूडच्या गळ्यातला तन्मणी आहे. ‘सेंट ऑफ अ वूमन’ हा त्याच्याही अभिनयाची कसोटी पाहणारा ठरला. दिग्दर्शक मार्टिन ब्रेस्ट यांनी त्याची मांडणीच एखाद्या कसबी अत्तरवाल्यासारखी केली आहे. चिमुकली बाटली घेऊन त्यात नानाविध सुगंध एकत्र करून नवाच परिमळ पेश करणारा अत्तरवाला...

तो परिमळ आपल्यापर्यंत आपसूक पोचतो. त्याची फर्स्ट नोट तीव्र वाटते. चौथ्या नोटचा त्याचा मंद गंध आपल्या व्यक्‍तिमत्त्वात झिरपत जातो. रानाकडून आलेल्या गंधित पहाटवाऱ्यानं मनातले पडदे मंदपणे सळसळू लागतात.

Web Title: pravin tokekar write article in muktapeeth