अकेला... (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

कास्टऽवे... हा चित्रपट सरधोपट पद्धतीनं हाताळला गेला असता तर अन्य डझनावारी ‘सर्वायवल’पटांपैकी एक झाला असता; पण तसं घडलं नाही. दूर बेटावर अडकून पडलेल्या माणसाचा, निसर्गाशी आणि जीवनाशी संघर्ष मांडल्याचं ठराविक चित्रण बघायला मिळालं असतं. मात्र, दिग्दर्शक रॉबर्ट झेमेकिस आणि अभिनेता टॉम हॅंक्‍स यांनी ते टाळून दाखवलं. कधीही चुकवू नये, असा हा चित्रपट अधूनमधून टीव्हीवर लागतो. आपल्या आदिम मानवी प्रेरणांपासून आपण किती दूर आलो आहोत, याचा साक्षात्कार घडवतो.

कास्टऽवे... हा चित्रपट सरधोपट पद्धतीनं हाताळला गेला असता तर अन्य डझनावारी ‘सर्वायवल’पटांपैकी एक झाला असता; पण तसं घडलं नाही. दूर बेटावर अडकून पडलेल्या माणसाचा, निसर्गाशी आणि जीवनाशी संघर्ष मांडल्याचं ठराविक चित्रण बघायला मिळालं असतं. मात्र, दिग्दर्शक रॉबर्ट झेमेकिस आणि अभिनेता टॉम हॅंक्‍स यांनी ते टाळून दाखवलं. कधीही चुकवू नये, असा हा चित्रपट अधूनमधून टीव्हीवर लागतो. आपल्या आदिम मानवी प्रेरणांपासून आपण किती दूर आलो आहोत, याचा साक्षात्कार घडवतो.

तु  म्ही कधी जंगलात एकटे अडकून राहिलाय? साप किंवा सरडा खाल्लाय? जमिनीवर रेंगणारा किडा दाताखाली चावून ‘बरा लागतो...शेंगदाण्यासारखी चव आहे’ असं म्हटलंय? कड्यावरून उतरलाय किंवा चढलाय? निबिड अरण्यात झावळ्यांची झोपडी करून राहिलाय...? तुम्ही म्हणाल, हे काय सवाल झाले? दिवाळीच्या दिवसात चांगलं फराळाबिराळचं विचारावं. किडे-मकोडे हे काय खाण्याचे पदार्थ आहेत? पण ‘डिस्कव्हरी’ किंवा तत्सम ज्ञानवाहिनीवर लागणाऱ्या बिअर ग्राइल्सच्या ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ कार्यक्रमात हे असले सवाल खटकत नाहीत. कारण, ते सगळं तो कॅमेऱ्यासमोर करतही असतो. प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी हे सगळं करावं लागतं...म्हणजे असं तो बिअर ग्राइल्स म्हणतो! त्याच्या टीव्ही-मालिकेतले हे उदात्त विचार ऐकून मराठी मन म्हणतं ः ‘दोस्ता, आम्ही कशाला जातोय मरायला त्या जंगलात? आमचं सिमेंटचं जंगल तुझ्या जंगलाहून कितीतरी अधिक निबिड आणि भयंकर आहे. आम्ही गिळतो ते अपमान, खातो त्या लाथा किंवा असंच काहीतरी माणसांच्या जंगलातलं...हिंमत असेल तर हे खाऊन दाखव.’
पण खरंच वेळ काही सांगून येत नाही.

टेनेसीतल्या चक नोलॅंडचं असंच झालं. फेडेक्‍समधली छान नोकरी करता करता दैवगतीनं त्याच्यावर अशी वेळ आली, की त्याला एका निर्जन बेटावर तब्बल चार वर्ष राहावं लागलं. स्वत:चा जीव जगवावा लागलाच; पण जगण्यासाठी आवश्‍यक असलेली बरीच कौशल्यं, माणसात राहून आपण गमावून बसलोय, हेही कळलं. ती पुन्हा नव्यानं शिकून जीवनाला भिडावं लागलं. चित्रपट होता- कास्टऽवे. सरधोपट पद्धतीनं हाताळला असता तर हा चित्रपट अन्य डझनावारी ‘सर्वायवल’पटांपैकी एक झाला असता; पण तसं घडलं नाही. दूर बेटावर अडकून पडलेल्या माणसाचा, निसर्गाशी आणि जीवनाशी संघर्ष मांडल्याचं ठराविक चित्रण बघायला मिळालं असतं. मात्र, दिग्दर्शक रॉबर्ट झेमेकिस आणि अभिनेता टॉम हॅंक्‍स यांनी ते टाळून दाखवलं. कधीही चुकवू नये, असा हा चित्रपट अधूनमधून टीव्हीवर लागतो. आपल्या आदिम मानवी प्रेरणांपासून आपण किती दूर आलो आहोत, याचा साक्षात्कार घडवतो.
* * *

चक नोलॅंडसारखे दहा कर्मचारी कंपनीला मिळाले, तर कंपनीची तीनेक वर्षांत सोळा हजारपट भरभराट होईल. तो ‘फेडेक्‍स’ या आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीत सिस्टिम्स मॅनेजर आहे. घड्याळावर एक डोळा ठेवून तो हाताखालच्या टीमला चोवीस तास धारेवर धरत असतो. मेम्फिसहून तो मॉस्कोला पोचल्यानंतर त्याला एक पार्सल आलं. ते त्यानंच प्रस्थानापूर्वी स्वत:ला पाठवलं होतं. सगळ्या टीमसमक्ष त्यानं ते फोडलं. आतून निघालं एक डिजिटल टायमर. त्यावर ८७ तास आणि काही मिनिटं अशी वेळ टिकटिकत होती.

‘‘हे बघा, मेम्फिसहून मॉस्को...८७ तास! हे भयानक आहे. सृष्टीची निर्मिती यापेक्षा कमी वेळात झाली होती. तुम्हाला एक साधं पार्सल वेळेत पोचवता येत नाही? हे हॉरिबल आहे...आपला धंदा घड्याळावर चालतो हे लक्षात ठेवा. पार्सलांचं सॉर्टिंग आणि मूव्हमेंट हे एकाच वेळी झालं तर वेळ वाचतो. पान-तंबाकू चघळत कामं कसली करताय? चला, चला हात चालवा...’’ मॉस्कोतल्या कामगारांना तो उगीचच इंग्लिशमध्ये झापत होता. त्यांना काहीही कळत नव्हतं; पण हा अमेरिक्‍या काहीतरी घाई करतोय, एवढं तरी कळत होतंच त्यांना.

-मॉस्कोतल्या कुरिअरची भानगडच झाली. क्रेमलिनसमोरच्या लाल चौकातल्या जगद्विख्यात वाहतूकखोळंब्यात फेडेक्‍सचा ट्रक अडकला. तिथल्या तिथं रस्त्यात पुन्हा सॉर्टिंग करून चकनं पार्सलं विमानतळावर पोचवली आणि तो स्वत: घरी परतला. त्याचा निम्मा वेळ असा विमानात जातो. उरलेला कुठेतरी पार्सलांच्या मागं. त्यातूनही वेळ उरलाच, तर मग त्यात प्रेम, गर्लफ्रेंड वगैरे.

मेम्फिस, टेनेसी हे फेडेक्‍सचं मुख्यालय. चकच्या निष्ठेचा इथं आदर आहे. त्याच्या कामाच्या धडाक्‍याचा दबदबा आहे. फेडेक्‍स किंवा फेडरल एक्‍सप्रेस नावाची भानगड नसती तर आज अमेरिका-युरोपातल्या कित्येक कंपन्यांना धंदा करणं अशक्‍य झालं असतं. ही आहे एक अवाढव्य कुरिअर कंपनी. तिचा पसारा जगभरात तब्बल २२० देशांत आणि मुलखांमध्ये पसरला आहे. मनात आणतील तर काँगोच्या खोऱ्यातल्या एखाद्या दुर्गम पिग्मीच्या झोपड्यातही पार्सल डिलिव्हर करतील ही मंडळी! जवळपास तीन लाखांहून अधिक कर्मचारी आहेत फेडेक्‍समध्ये. जगभर त्यांची जहाजं जातात. विमानं पोचतात. फ्रेडरिक स्मिथनं काळाची पावलं ओळखून १९७१ मध्ये हा खासगी टपालधंदा सुरू केला. आज त्याचा अजस्र वटवृक्ष झाला आहे. हे स्मिथसाहेब अजूनही पार्सलांची काळजी घेण्यात कार्यरत आहेत.
बॅक टू आपली स्टोरी.

...तर जेहत्ते कालाचे ठायी चक नोलॅंड हा, कामापुढं गर्लफ्रेंडलाही दुय्यम मानणारा फेडेक्‍सचा लाडका कर्मचारी आहे. नववर्षाचं स्वागत काही दिवसांवर येऊन ठेपलेलं. कबूल केल्याप्रमाणं चक आला. त्यानं आपल्या बऱ्याच काळच्या गर्लफ्रेंडला, केली फ्रिअर्सला शेवटी एकदाचं प्रपोज केलं. अंगठीबिंगठी दिली. ‘लग्न करून सेटल होऊ या’ म्हणाला. या बारा पिंपळावरच्या मुंजाशी लग्न करणं दिव्यच होतं; पण केली त्याच्या आकंठ प्रेमात होती. सतत भ्रमंतीवरचा हा कुरिअरबॉय तिला मनापासून आवडला होता. तेवढ्यात त्याला पेजरवर वर्दी आली, मलेशियात कुठंतरी डिलिव्हरी पोचवायची आहे. विमान तयार आहे. निघा!

‘झटकन जाऊन पटकन परत येतो’, असं केलीला सांगून चक निघाला. केली त्याला सोडायला विमानतळावर कार्गोपर्यंत गेली. तिनं त्याला एक छानदार घड्याळ दिलं. बंद डबीसारखं. त्यात तिचा फोटोही होता. म्हटलं तर पेंडंट, म्हटलं तर घड्याळ. या कुरिअरबॉयला बरंच. चक नोलॅंड कार्गो विमानात बसला. तो एकटाच पॅसेंजर होता. बाकी दोघं पायलटच. या रुटवर विमान नेणं सवयीचंही होतं. गप्पा हाणत तिघंही पार्सलं घेऊन निघाले. आणि प्रॉब्लेम झाला...

विमान वादळात अडकलं. तुफान वारं. पाऊस. विमानाचं नियंत्रण सांभाळता येणं अशक्‍य झालं. सगळ्यांचं धाबं दणाणलं. थडाथड आवाज येऊन एकेक भाग तुटत होता विमानाचा. कोपऱ्यात हवेनं फुगणाऱ्या लाइफबोटीची मोठीशी पिशवी कवटाळून चक नोलॅंड बसून राहिला. काही कळण्याच्या आत विमान खाली समुद्रात कोसळलं. एका जबरदस्त तडाख्यानिशी चक नोलॅंड बेवारशी पार्सलासारखा पाण्यात उडाला. अफाट पाण्याचा जोरकस प्रवाह वेड्यासारखा घुसला. निमिषार्धात विमानाचा चक्‍काचूर उडाला. खोल पाण्यात बुडालेल्या चकनं स्वत:ला कसंबसं सावरत पृष्ठभाग गाठला. लाइफबोटीची पकड मात्र त्यानं सोडली नव्हती. मग त्याची शुद्धच हरपली...
***

खळाळत्या लाटांच्या आवाजानं त्याला शुद्ध आली. चकाचौंध करणारा उजेड भस्सकन डोळ्यात शिरला. तोंडात खारट चव होती. खरखरीत वाळूचा स्पर्श त्याच्या जिभेला झाला. त्याला ढवळून आलं. पायाशी पाण्याच्या लाटा थडकत होत्या. हळूहळू त्यानं डोळे किलकिले केले. दूरवर समुद्र पसरलेला. देहाखाली पांढरीशुभ्र वाळू. दूरवर हिरवी झाडी दिसते आहे...मी कुठं आहे?

आसपास फेडेक्‍सची काही तुरळक पार्सलं दिसत होती. खुरडत खुरडत तो निघाला. शरीर आणि मन दोन्ही जर्जर झालेलं. आपण कुठं आहोत? माहीत नाही. इथं कसे आलो? माहीत नाही. इथून निघायचं कसं? तेही माहीत नाही.किनाऱ्याजवळच्याच एका झाडाखाली त्यानं बसकण मारली. रानातली किर्रर्र शांतता इथं समुद्राला भेटायला आलेली. ‘कुणी आहे का इथं?’ नारळाची झाडं तेवढी हलत होती. पानांची सळसळ. दगड आणि वाळूत चालता येणंही अशक्‍य झालं. पायाला फोड आले होते. भूक लागलीये. काही खायला मिळेल? येता येता सवयीनं त्यानं फेडेक्‍सची विखुरलेली काही पार्सलं उचलून आणली होती. ती उघडली. काहीही नव्हतं. झाडावरचे नारळ फोडण्याचा प्रयत्न केला. पण योग्य हत्यारं नसतील तर हे श्रीफळ काही लुंग्यासुंग्याला बधत नाही. त्यातून असोले नारळ. म्हणजे वैतागच. दूरवर त्याला लाटांवर काही तरंगताना दिसलं. तिथं पोचून त्यानं बघितलं, तर विमानाच्या पायलटचं फुगलेलं शव. चकला हुंदकाच आला. अरे, किती छान गप्पा मारत आलो आपण. आता हे काय! चकनं त्याचं शव ओढून आणलं. बूट काढून घेतले. त्याच्या कमरेला टॉर्च होता. कामाची वस्तू. चकनं ठेवून घेतली. मग खड्‌डा खणून त्याला नीट दफन केलं. रात्रीच्या मिट्ट काळोखात त्याला दूरवर समुद्रात दिवा दिसला. किती वाजले असतील? कुणास ठाऊक. हातातला टॉर्च हलवून त्यानं त्या जहाजाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. पण छे...दिवा छोटाच होत होता. तेवढ्यात सूर्य उगवला आणि सगळेच प्रयत्न पाण्यात गेले. दूरवर एक ठिपका दिसेनासा झाला. असं किती दिवस वाट पाहत राहणार?
* * *

वाट बघत इथं उपाशी मरण्यापेक्षा पुन्हा समुद्रात घुसावं. जे होईल ते होईल. चकनं एक तराफा करायला घेतला. त्याला जमेल तसा. लांब बांबूची काठी घेऊन त्यानं स्वत:ला पाण्यात लोटलं. समुद्राच्या लाटांपुढं त्याचं काय चालणार? थोडं दूर जाईपर्यंत लाटांनी त्याला उलटापालटा केला. कसाबसा खुरडत हार मानून चक नोलॅंड किनाऱ्याला परतला. या मर्दुमकीत त्याच्या मांडीला मोठी जखम झाली होती.
झाडाखालच्या आपल्या मुक्‍कामात त्यानं इतर पार्सलं उघडायला सुरवात केली. एका खोक्‍यात त्याला व्हॉलीबॉल मिळाला. विल्सन कंपनीचा. एका खोक्‍यात आइस स्केटिंग होत्या. सटरफटर सामान. जगायला उपयोगशून्य.

चक नोलॅंडनं आज एक क्रांती केली. उत्क्रांतीच. विनालायटर, काड्यापेटीशिवाय त्यानं अथक प्रयत्नांनी अग्नी प्रज्वलित केला. हे सोपं नव्हतं. त्या प्रयत्नात त्याच्या हाताला लागलंच. रक्‍ताची धार लागली. त्यानं संतापून तो व्हॉलीबॉल दूर फेकला. त्या निर्जीव चेंडूवर रक्‍ताचे धब्बे उमटले आणि एक हसरा चेहरा दिसू लागला. चकचं दिल बहललं. त्यानं त्या व्हॉलीबॉलचं नामकरण केलं ः विल्सन.
हा विल्सन त्याचा जिवाभावाचा दोस्तच बनला. असेल निर्जीव. म्हणून काय झालं? रिश्‍ता आखिर रिश्‍ता होता है.
...चकला आता आग पेटवता येते. नारळ फोडता येतो. किनाऱ्यावरच्या खडकाळात दडलेले खेकडे पकडून भूक भागवता येते. झाड-पानांमध्ये अडकलेलं गोडं पाणी गोळा करता येतं. लौकरच त्यानं झाडाखालचा मुक्‍काम हलवून जवळच्या गुहेत ठाण मांडलं. एक बिछानाही झाला.
विल्सनशी तो रीतसर गप्पा मारायचा. जोक करायचा. बोलायला कुणीतरी हवंच ना; पण असं किती दिवस चालणार? विमानाचा मार्ग ध्यानात घेऊन त्यानं अंदाज लावला की पाच लाख चौरस मैलांचा परिसर धुंडाळला तरच आपला शोध लागू शकेल. तेव्हा हे अशक्‍य आहे...

...एक दोर वळून उंच कड्यावरच्या निष्पर्ण झाडावर अडकवून त्यानं फास घेतला. पण च्यामारी, फांदीच तुटली! आपल्याला साधी आत्महत्यासुद्धा करता येत नाही. आग लागो असल्या आयुष्याला. थोड्या वेळानं शांत झाल्यावर उबदार चादरीसारखी मऊ जिवंतपणाची जाणीव त्याला घेरू लागली. कमॉन, मला श्‍वास घेत जगत राहणं भाग आहे. हा जन्म मरण्यासाठी नव्हताच कधी. जगावंच.
* * *

दिवस उगवत होता. मावळत होता. समुद्र आपला तसाच. निःसंग. निर्दय. काळासारखा स्थितप्रज्ञ. चक नोलॅंड आणि विल्सन यांचा संसार चाललेला. त्याला केलीची सतत आठवण यायची. घड्याळाची डबी उघडून तो तिची छबी बघे. तिच्याशी बोले.
त्या निर्जन बेटावर मात्र त्याचं बस्तान बसलं होतं. जगणं तो शिकला होता. म्हणजे जिवंत राहण्याचे नियम त्याला कळले होते. इथं नात्यागोत्यांचे गुंते नव्हते. वेळ-काळाचं बंधन नव्हतं. माणसंच नव्हती, त्यामुळं कपड्यांचीही फिकीर करण्याचं कारण नव्हतं.
...किनाऱ्यालगतच्या प्रचंड कातळावर तो रोज एक खडूची रेघ ओढायचा. किती रेघा झाल्या? चौदाशेसाठ रेघा. म्हणजे चार वर्षं झाली. ओह गॉड, इथंच असंच आयुष्य काढायचं?
* * *

‘‘तुझ्या बथ्थड डोक्‍यात काही शिरतंय का विल्सन? आपण समुद्र ओलांडून जाऊसुद्धा कदाचित. जाऊ दे. तुला कळणार नाही. तुझ्यासारख्या एखाद्या...फडतूस व्हॉलिबॉलशी गप्पा मारत बसण्यापेक्षा समुद्रात जाऊन मरणं मी पसंत करीन...’’ विल्सनकडं बघत चक जोरात ओरडला. विल्सन काहीच बोलला नाही. नंतर बराच वेळ चक त्याला ‘सॉरी’ म्हणत राहिला.
तरीही त्यानं नारळ, काही खेकडे असं सामान जमवलं. झाडं कापून तराफा बांधायला घेतला. टॉयलेटचे दोन फायबर ग्लासचे पत्रे वाहून आले होते. शिडांसारखा उपयोग होईल, म्हणून जपून ठेवले होते. विल्सनशी गप्पाटप्पा करत त्यानं तराफा बांधला. भरती-ओहोटीची गणितं तो शिकला होता. लाटांचा जोर जास्त कधी असतो आणि कमी कधी असतो, याची गणितं त्यानं मनोमन बांधली होती.
एक दिवस विल्सनला घेऊन त्यानं तराफा लाटांवर लोटला. आश्‍चर्य म्हणजे अजस्र लाटेनं या वेळी त्याला दूर लोटलं नाही. उलट मदत केली. वाऱ्यावर स्वार होत तो शांत, खोल समुद्राकडं निघाला...
आणखी काही दिवस. काही रात्री. पुन्हा दिवस...
त्याला झोप लागलेली असताना विल्सन मात्र तराफ्यावरून वाहून गेला. त्याला वाचवण्याचे अशक्‍त चकनं खूप प्रयत्न केले; पण समुद्रात देवमासे होते... सोबत्याच्या विरहाच्या शोकात, भुकेच्या डोंबात, बधीर झालेल्या चक नोलॅंडला एक जहाज जवळ येताना नीट दिसलंच नाही.
...पण जहाजाला तो दिसला होता.
* * *

चक नोलॅंडचं परत येणं फेडेक्‍सला आश्‍चर्याचा धक्‍का देणारं होतं. कारण, एव्हाना तो मृत पावल्याचं घोषित होऊन त्याचे अंत्यसंस्कारही पार पडले होते. दफनभूमीत त्याच्या नावाचं थडगं होतं.
फेडेक्‍सनं त्याचं शानदार स्वागत केलं. पण केली फ्रिअर्स त्याला भेटायला आली नाही. त्याच्याच डेंटिस्टशी तिनं लग्न केलं होतं, तिला आता एक गोड मुलगीही होती. घ्या, म्हणजे माणसातून उठून चक नोलॅंड निर्मनुष्य ठिकाणी पोचला. आता माणसात येऊनही पुन्हा निर्मनुष्यच.
...केली त्याला भेटली? येस, भेटली. पण पुढं काय झालं? यात खरं तर फारसं काही नाट्य नाही; पण जे काही आहे, ते या चित्रपटाचं सार म्हणावं असं आहे. ते प्रत्यक्ष पडद्यावर बघण्यातच मजा आहे.
* * *

‘कास्टऽऽवे’ चं नाव घेतलं की भले भले जाणकार हातभर जीभ काढून कानाची पाळी पकडतात. टॉम हॅंक्‍स हा आधुनिक नटसम्राट का आहे, याचं उत्तर तर या चित्रपटात मिळतंच; पण दिग्दर्शक रॉबर्ट झेमेकिसची कल्पकता तर दादच घेऊन जाते. त्याहूनही हा चित्रपट आहे लेखक विल्यम ब्रॉइल्स यांचा. या चित्रपटकथेची संकल्पना सुचल्यावर त्यांनी चक्‍क काही महिने एका बेटावर स्वत: काढले. प्रत्यक्ष अनुभव घेऊन मगच चित्रपटलेखनाला हात घातला. या कामात त्यांना जवळपास सहा वर्षं लागली.
फिजी बेटांमधल्या एका चिमुकल्या बेटावर या चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग झालं. आता तिथल्या पर्यटन संस्था ‘कास्टऽवे’च्या बेटावर पर्यटकांच्या सहली काढतात. विल्सनच्या छापाचे व्हॉलीबॉल तिथं स्मरणचिन्हं म्हणून विकायला ठेवतात. विल्सन हा चित्रपटात व्हॉलीबॉल असला तरी ते एक कॅरेक्‍टरच आहे. दुसऱ्या अर्थानं पाहिलं तर ते चक नोलॅंडचंच एक मन आहे. सामग्रीचं असं व्यक्‍तिरेखेत रूपांतर करणं ही खास झेमेकिसची आयडिया होती. त्याचप्रमाणे फेडेक्‍स कंपनीनं या चित्रपटासाठी दोन ढब्बू पैसेही दिले नाहीत; पण शूटिंगसाठी आपली कार्यस्थळं, विमानं, जहाजं उपलब्ध करुन दिली. ‘‘ ‘फेडेक्‍स’ ही या चित्रपटातली एक व्यक्‍तिरेखा आहे, असं नाही तुम्हाला वाटत?’’ असा उलट सवाल फेडेक्‍सचा प्रमुख फ्रेड स्मिथनं विचारला. त्यात तथ्य होतं. चित्रपटाच्या क्‍लायमॅक्‍सपूर्वी चक नोलॅंडचं ‘फेडेक्‍स’मध्ये स्वागत होतं, त्या दृश्‍यात खुद्द फ्रेड स्मिथ सहभागी झाला.

या चित्रपटासाठी टॉम हॅंक्‍सनं खरोखर पन्नास किलो वजन घटवलं. त्याला दुखापती आणि आजारही झाले; पण आजही टॉम हॅंक्‍सच्या स्वत:च्या फेवरिट चित्रपटांच्या यादीत ‘कास्टऽवे’ बऱ्याच वरच्या स्थानावर आहे. लेखक ब्रॉइल्स, दिग्दर्शक झेमेकिस आणि अभिनेता टॉम हॅंक्‍स यांचे हे परिश्रम सत्कारणी लागले. टॉम हॅंक्‍सला त्या वर्षीचं गोल्डन ग्लोब ॲवॉर्ड मिळालं.

माणसाच्या जीवनकलहात अन्न, वस्त्र आणि निवारा याच्यापलीकडंही खूप काही असतं. त्यासाठी पंचमहाभूतांना आव्हान देण्याचीही माणसाची तयारी असते. इथंच तर उत्क्रांतीचं कोडं हलकेच उलगडायला लागतं.

Web Title: pravin tokekar write article in muktapeeth