अनंताचा प्रवासी! (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar write article in saptarang
pravin tokekar write article in saptarang

"थिअरी ऑफ एव्हरीथिंग' नावाचा एक अप्रतिम चित्रपट सन 2014 मध्ये येऊन गेला. तो चित्रपट म्हणजे डॉ. स्टीव्हन हॉकिंग यांची चरितकहाणी होती. मात्र, या चित्रपटात विज्ञान कमी आणि स्टीव्हन यांचं "जगणं' अधिक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिदशेपासून ते हॉकिंग आणि त्यांची पत्नी जेन यांच्या अफलातून नातेबंधांपर्यंतची उंच-सखल वाटचाल या चित्रपटात आहे. डॉ. हॉकिंग यांचं नुकतंच निधन झालं, त्यानिमित्त या चित्रपटाची ही ओळख...

नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्धजो नो व्योमपरो यत्‌।
किमवरीव: कुहकस्पर्शन्नभ: किमसिद्धहनं गभीरं।।
...इयंविसृष्टिर्यत ऽ आबूभव यदि वा दधे यदि वा न।
यो ऽ अस्याध्यक्ष: परमे व्यासमत्सो ऽ अंग वेद यदि वा न वेद।।

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातले, नासदीय सूक्‍तातले हे श्‍लोक. चराचराच्या उत्पत्तीबद्दल प्रश्‍न उपस्थित करणारे. त्याचा थेट संबंध डॉ. स्टीव्हन हॉकिंग (स्पेलिंग स्टीफन असं; पण उच्चार स्टीव्हन असाच!) या महाबुद्धी शास्त्रज्ञाच्या कर्तृत्वाशी आहे. को ऽ हम्‌? मी कोण आहे? कुठून आलो? कुठं जाणार? या सृष्टीचं प्रयोजन काय? विश्वाची निर्मिती कुणी आणि कशी केली? का केली? हे सगळं कुठून आलं आणि कुठं जात आहे?...यातल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं अजून विज्ञानालाही सापडलेली नाहीत. अनादिकाळापासून मानवाला छळणाऱ्या याच प्रश्‍नोपनिषदांची उत्तरं शोधण्याचा अफाट उद्योग हॉकिंग यांनी केला. उत्तरांच्या अगदी जवळ पोचलेल्या काही मोजक्‍या शास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना होते.

गेल्या बुधवारी (14 मार्च) या महाबुद्धिमंताचं केंब्रिजमधल्या राहत्या घरातच अवसान झालं. हॉकिंग यांचं शरीर गेली कित्येक वर्षं निश्‍चेष्टच होतं. चाक-संगणकाच्या अत्याधुनिक खुर्चीला खिळून राहिलेल्या त्यांच्या शरीरातला विदेही बुद्धिमान मेंदू मात्र अविरत कार्यरत होता. त्याच अफाट मेंदूच्या जोरावर त्यांनी अवकाशाला कवेत घेतलं. त्याच्या मर्यादा शोधल्या. त्याच्या अमर्यादित असण्याचाही अर्थ शोधला. त्याची गणितं मांडली. अवघ्या विश्वव्यापाराला एकाच समीकरणात मांडण्याचा खटाटोप केला. हाच तो "सर्वसिद्धान्त' किंवा "थिअरी ऑफ एव्हरीथिंग.'
पूंजयांत्रिकी, गुरुत्व, भौतिकी, सापेक्षता, कृष्णविवरांची रचना आदी गहन विषयांत हॉकिंग यांनी करून ठेवलेलं काम तारांगणाएवढं प्रचंड आहे. ते येणाऱ्या पिढ्यांनाही पुरून उरेल. सर्वसाक्षी काळाचं सैद्धान्तिक स्वरूप मांडणाऱ्या या काटेकोर शास्त्रज्ञानं सर्वसामान्यांना रुचेल, पचेल अशा रसाळ भाषेत त्याची मांडणीही केली.ः "ब्रीफ हिस्ट्री ऑफ द टाइम'. हे विज्ञानावर आधारित पुस्तक असूनही ते अनेक वर्षं बेस्टसेलर राहिलं आहे.

चार-पाच वर्षांपूर्वी, सन 2014 मध्ये "थिअरी ऑफ एव्हरीथिंग' नावाचाच अप्रतिम चित्रपट येऊन गेला. ती हॉकिंग यांची चरितकहाणीच होती; पण त्यात विज्ञान कमी आणि त्यांचं "जगणं' अधिक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिदशेपासून ते हॉकिंग आणि त्यांची पत्नी जेन यांच्या अफलातून नातेबंधांपर्यंतची उंच-सखल वाटचाल या चित्रपटात आहे.
* * *

हा सगळा सिलसिला सुरू झाला केंब्रिजच्या विद्याविभूषित हवेत सन 1963 च्या वसंत ऋतूत. ऑक्‍सफर्डमधलं शिक्षण आटोपून पीएच. डी करण्यासाठी विद्यार्थी स्टीव्हन विल्यम हॉकिंग केंब्रिजमध्ये दाखल झाला होता. मेंदू तल्लख असला तरी संशोधनाचा विषय मात्र त्याला गवसत नव्हता. तशातच त्याची ओळख एका चिमुकल्या पार्टीत जेन वाइल्डशी झाली. गोड, चुणचुणीत मुलगी. प्रेमळ डोळ्यांची. कला शाखेची विद्यार्थिनी. कृश शरीरयष्टीचा हा चष्मिष्ट तरुण तिला कसा कुणास ठाऊक; पण भावला.
""मी कॉस्मॉलजिस्ट आहे...'' त्यानं ओळख दिली.
""म्हंजे?''
""अंऽऽ...ते बुद्धिमंत नास्तिकांचं श्रद्धास्थान आहे, असं म्हण!'' तो.
""ओह...तू नेमकं काय करायचं ठरवलं आहेस?'' ती.
""वेल्‌, विश्वाच्या आरंभापासून हा सगळा पसारा आहे ना... तो एका समीकरणात बांधायचा आहे...'' तो. जेनला काहीही ढिम्म कळलं नाही.
""म्हणजे?''
""तेच तर शोधायचं आहे...'' तो.
""हे समीकरण नेमकं काय आहे?'' ती.
""तेही शोधायचंच आहे...'' तो.
...या संवादानं बघता बघता एक पूल उभा केला, त्यावर दोघंही जोडीनं चालू लागले. जेनसोबतचे दिवस सुंदर होते; पण हा प्रणय-अनुनय फार अल्पायुषी ठरला. गणिताच्या रानातून तंद्रीतच निघालेल्या स्टीव्हनला महाविद्यालयाच्या प्रांगणातच चक्‍कर आली आणि तो फरसबंदीवर कोसळला. चाचण्या-तपासण्या झाल्यावर डॉक्‍टरांनी त्याला सांगितलं :""याला "मोटर न्यूरॉन डिसीज्‌' असं म्हणतात. आपल्या स्नायूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूतल्या पेशी नष्ट होत जातात. परिणामी, स्नायूंवरचं नियंत्रण निसटत जातं. हिंडणं-फिरणं, लिहिणं, हसणं, बोलणं, श्‍वासोच्छ्वास सगळंच हळूहळू थांबतं. याला काहीही इलाज नाही. आय ऍम एव्हर सो सॉरी...जास्तीत जास्त दोन वर्षं देऊ शकेन मी तुला...''
""मेंदू... मेंदूचं काय?'' स्टीव्हननं कसंबसं विचारलं.
""तो ठीक आहे...राहील. मात्र, तुझ्या मेंदूत काय चाललंय, हे कुणाला कळणार आहे?'' डॉक्‍टर म्हणाले.
* * *

जेनच्या आयुष्याची माती करण्यात अर्थ नाही, या भावनेतून स्टीव्हननं तिला दूर होण्याची गळ घातली; पण जेन बधली नाही. "काहीही होवो, आपण एकत्र राहू,' असं तिनं सुचवलं. त्याच्या शुश्रूषेचा ताबाच तिनं घेतला. काही महिन्यांतच त्यांनी लग्न केलं.

आजारपण आणि अभ्यास हे दोन्ही परीक्षा पाहणारं होतं. त्यातून मार्ग काढत स्टीव्हननं आपला डॉक्‍टरेटचा प्रबंध पूर्ण केला. स्टीव्हनच्या हालचाली हळूहळू थंडावत होत्या. त्याला आधाराशिवाय चालता येत नसे. जेन त्याच्यासोबत असे. त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल दोस्तांमध्ये उगीचच कुतूहल होतं.
""हा तुझा काय तो मोटरमाऊथ रोग आहे...त्याचा वैवाहिक आयुष्यावर काही परिणाम होतो का रे?'' डोळा मारत ब्रायननं स्टीव्हनला वाह्यातासारखं विचारलं.
""कसला ? छे. डिफरंट सिस्टिम... ऑटोमॅटिक....'' स्टीव्हननं अत्यंत पुस्तकी उत्तर देऊन त्याला गप्प केलं. स्टीव्हन आणि जेन यांना यथावकाश दोन मुलंही झाली.
हल्ली हल्ली जेन उदास राहू लागली आहे. काय कारण असेल? जेननं चर्चच्या कॉयरमध्ये गाणं म्हणण्यासाठी जावं, असं तिच्या आईनं सुचवलं. चर्चमध्ये जेनला गाणं मिळालं की नाही कोण जाणे; पण एक अनोखा सूर लाभला. तो सूर गेली काही वर्षं ती जणू विसरलीच होती. त्या सुराचं नाव होतं जोनाथन हेलर जोन्स.
तरणाबांड जोनाथन चर्चच्या वाद्यवृंदाचा संचालक होता. हळुवार. हसतमुख. हजरजबाबी.
जेनचं मन त्याच्याकडं ओढलं गेलं. जोनाथनच्या त्यांच्या घरातल्या फेऱ्याही वाढल्या.
* * *
...स्टीव्हनची तब्येत खालावत गेली. श्‍वासोच्छ्वास धड करता यावा म्हणून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली गेली. त्यात त्याची वाचा गेली. हाताची बोटं आणि गालांचे काही स्नायू एवढेच काय ते हलत. बाकी शरीर निश्‍चल होत गेलं. तो खुर्चीला खिळला. त्या खुर्चीला एक संगणक जोडलेला होता. बोटांच्या मर्यादित हालचालींनिशी तो संगणकावर आपलं म्हणणं टाइप करत असे. ते शब्द संगणकीय आवाजातच ऐकू येत. संगणकाचे उच्चार मात्र अमेरिकी हेलाचे होते. अर्थात त्याची शुश्रूषा, त्याच्या पुस्तकाचं डिक्‍टेशन, टायपिंग, व्याख्यानांची तयारी करून देणं यात जेनचा कमरेचा काटा ढिला होत असे. त्यात जोनाथनमध्ये झालेली गुंतागुंत तिला अस्वस्थ करत असे.
जेन आणि जोनाथनची मैत्री गडद होत चाललेली स्टीव्हनला दिसत होती. शुश्रूषेत आणि घर-गृहस्थीमध्ये ती कर्तव्य बजावत असली तरी तिचा हुरूप कमी झालाय, हेही स्टीव्हनला कळत होतं; पण त्याला पर्वा नव्हती. एलेन नावाची एक वैयक्‍तिक सहायक त्याच्यासाठी नेमण्यात आली आणि तिथून सगळ्यालाच वेगळं वळण लागलं. स्टीव्हन तिच्यात नकळत गुंतत गेला...
* * *

...दैवगती किती वेगवेगळे खेळ दाखवते! अशा प्रतिकूल शारीरिक अवस्थेतच डॉ. स्टीव्हन हॉकिंग यांच्या कार्याची ओळख जगाला झाली. "एका महास्फोटात पृथ्वीची निर्मिती झाली, त्याच क्षणी काळाचा जन्म झाला,' हे त्यांनी गणितानं सिद्ध करून दाखवलंच होतं. आता कृष्णविवरांच्या अस्तित्वाचं आणि स्वरूपाचं गणितीय आकलन करून अवकाश-संशोधनाला वेगळीच दिशा त्यांनी दिली होती. एक प्रकांड बुद्धिमान सिद्धान्तवादी वैज्ञानिक म्हणून त्यांचा नावलौकिक होऊ लागला. "आइनस्टाइन यांच्यानंतरचा अलौकिक शास्त्रज्ञ' म्हणून त्यांची जगाला ओळख झाली.
सुप्रसिद्ध कॉकक्रॉफ्ट व्याख्यानात लोकांना संगणकीय आवाजात उत्तरं देताना हॉकिंग यांना एकदा श्रोत्यानं विचारलं ः ""तुम्ही आता सुप्रसिद्ध झालेला आहात. ही प्रसिद्धी तुम्ही कशी पेलता? आय मीन...हाऊ डू यू डील विथ इट?''
""मध्यंतरी केंब्रिजमध्ये एक टूरिस्ट आला होता. त्यानं मला गाठून विचारलं, "तुम्ही खरंच डॉ. स्टीव्हन हॉकिंग आहात का?' मी म्हणालो ः "नाही, तो मी नाही. खरा हॉकिंग दिसायला बराच बरा होता...' '' हॉकिंग यांनी उत्तर दिलं. आख्खा हॉल हास्यानं दणाणून गेला.

तब्बल 20 वर्षांच्या काळानंतर हॉकिंग यांनी जेनला घटस्फोट देऊन एलेनबरोबरच राहायचा निर्णय घेतला. जेननंही जोनाथनशी लग्न केलं. दोघांचे संबंध मात्र शेवटपर्यंत मैत्रीचे राहिले. इतके की इंग्लंडच्या राणीनं हॉकिंग यांना पॅलेसवर सन्मानपूर्वक बोलावलं, तेव्हा ते सहकुटुंब जेनबरोबरच गेले. तिथल्या बगिच्यात आपल्या मुलांना खेळताना पाहून ते जेनला म्हणाले ः ""बघ, आपण काय निर्माण केलंय ते..!''
* * *

जेन हॉकिंग यांनी नंतर आपल्या आठवणी लिहिल्या. त्या पुस्तकाचं नाव होतं ः "म्युझिक टू मूव्ह द स्टार्स'. त्याची चर्चा झाली; पण इंग्लंडपुरतीच. पुढं याच आठवणी "ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी' या नावानं चकचकीत पुस्तकरूपानं आल्या. त्या जगभर गाजल्या. त्याच आठवणींवर आधारित "थिअरी ऑफ एव्हरीथिंग' हा चित्रपट आहे. फेलिसिटी जोन्स या गोड अभिनेत्रीनं जेनची भूमिका सुंदर पेलली आहे. या चित्रपटाची पटकथा लिहिणारे अँथनी मॅक्‌कार्टन यांनी जेनच्या आठवणींपूर्वी हॉकिंग यांच्या "ब्रीफ हिस्टरी ऑफ द टाइम'ची पारायणं केलीच होती. जेम्स मार्शनं दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली. केंब्रिज विद्यापीठानं त्यांना चित्रीकरणासाठी जागा तर दिलीच; शिवाय अन्यही बरीच मदत देऊ केली. खुद्द हॉकिंग यांनी आपला संगणकीय आवाज चित्रपटासाठी वापरायला दिला. यातली मध्यवर्ती भूमिका अर्थात हॉकिंग यांच्याच व्यक्‍तिरेखेची. एडी रेडमेन या तरुण अभिनेत्यानं साकारलेला हॉकिंग केवळ अजोड आहे. या भूमिकेसाठी त्यानं हॉकिंग यांची भेट घेतली. "तीन तास मी त्यांच्यासोबत होतो, ते सर्व मिळून आठ वाक्‍य बोलले' असं तो म्हणतो; पण आपलं बहुमानाचं पदक आणि शोधनिबंधाची मूळ प्रत शूटिंगसाठी रेडमेनच्या हातात त्यांनी ठेवली, तेव्हा रेडमेनला रडू आवरलं नव्हतं. "मोटर न्यूरॉन डिसीज्‌' झालेल्या चाळीसेक रुग्णांना भेटून त्यानं स्नायूंच्या पडझडीचा क्रम अभ्यासला. हॉकिंग यांची जुनी चित्रीकरणं पाहिली, टिपणं काढली, मगच तो कॅमेऱ्यासमोर उभा राहिला. ख्यातनाम नटसम्राट सर डॅनियल डे लुईस यांच्या "द लेफ्ट फूट'शी त्याची तुलना झाली. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं ऑस्कर मिळालं; पण सगळ्यात मोठा पुरस्कार त्याला चित्रपट रिलीज होण्याआधीच मिळाला होता. डॉ. हॉकिंग यांच्यासाठी खास शो आयोजिण्यात आला होता, तेव्हा काही मोजक्‍या प्रेक्षकांनी ते दृश्‍य पाहिलं...चित्रपट संपल्यावर चित्रगृहातले दिवे लागले, तेव्हा डॉ. हॉकिंग यांची नर्स त्यांच्या निश्‍चेष्ट गालावरचे अश्रूंचे ओघळ पुसत होती...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com