रातराणी! (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 8 एप्रिल 2018

"इट हॅपन्ड्‌ वन नाइट' या चित्रपटाला 88 वर्षं उलटून गेली आहेत...तरी तो अजूनही रातराणीसारखा घमघमतोच आहे. तसं बघायला गेलं तर या चित्रपटात काहीही खरंखुरं, वास्तववादी नाही. सगळी आचरट धमाल आहे. एक मस्तवाल, आखडू पोरगी घरातून पळून जाते काय, बसमध्ये तिला एक रंगीला भेटतो काय आणि मजेमजेदार वळणांनिशी पोरीचे हात पिवळे होतात काय...सगळंच अतर्क्‍य; पण ते अतर्क्‍यच जादू करून गेलं!

छे गंऽ आता कशी रहावी
स्मृती मला तेव्हाची सगळी?
होता का गंऽ चंद्र तेधवा
की होती ती रात्र वादळी?

"इट हॅपन्ड्‌ वन नाइट' या चित्रपटाला 88 वर्षं उलटून गेली आहेत...तरी तो अजूनही रातराणीसारखा घमघमतोच आहे. तसं बघायला गेलं तर या चित्रपटात काहीही खरंखुरं, वास्तववादी नाही. सगळी आचरट धमाल आहे. एक मस्तवाल, आखडू पोरगी घरातून पळून जाते काय, बसमध्ये तिला एक रंगीला भेटतो काय आणि मजेमजेदार वळणांनिशी पोरीचे हात पिवळे होतात काय...सगळंच अतर्क्‍य; पण ते अतर्क्‍यच जादू करून गेलं!

छे गंऽ आता कशी रहावी
स्मृती मला तेव्हाची सगळी?
होता का गंऽ चंद्र तेधवा
की होती ती रात्र वादळी?

...कविवर्य वसंत बापटांची "विस्मृती' नावाची सुंदर कविता आहे. वाचतानाच मन ओठांच्या कोपऱ्यातून हसू लागतं. पिकलेल्यांना आपले हिरवे दिवस आठवतात. यौवनाच्या हिरवळीवर हुंदडणाऱ्यांना त्या ओळीत दडलेला जुना गंध जाणवतो. ही कविता आठवली की का कुणास ठाऊक, फ्रॅंक काप्राच्या "इट हॅपन्ड्‌ वन नाइट' या सदाबहार चित्रकृतीची कडकडून आठवण येते. किंवा या चित्रपटाचा उल्लेख झाला तर खिशात चुरमडलेल्या सोनचाफ्याच्या कळीसारखी बापटसरांची कविता हाती लागते.
जुनी आठवण तेव्हाची ती सगळी...पण अजूनही किती ताजी आहे!

-फ्रॅंक काप्रा नावाच्या हॉलिवूडच्या जादूगारानं अवघ्या महिन्याभरात उभा केलेला हा चित्रपट. आज 88 वर्षं झाली तरी अजूनही रातराणीसारखा घमघमतोच आहे. तसं बघायला गेलं तर या चित्रपटात काहीही खरंखुरं, वास्तववादी नाही. सगळी आचरट धमाल आहे. एक मस्तवाल, आखडू पोरगी घरातून पळून जाते काय, बसमध्ये तिला एक रंगीला भेटतो काय आणि मजेमजेदार वळणांनिशी पोरीचे हात पिवळे होतात काय...सगळंच अतर्क्‍य; पण ते अतर्क्‍यच जादू करून गेलं. ही जादू तेव्हा खूप गरजेचीही होती. पोट रिकामं असलं की भलभलतं सुचत राहतं, त्यापैकीच हा प्रकार.
हा चित्रपट आला, तेव्हा वर्ष होतं 1934. पहिल्या महायुद्धाचे धक्‍के पचवून अमेरिका उभी राहत होती. महामंदीचा काळ होता तो. बेकार तरुणांचे तांडे नोकऱ्या, काम-धंदे शोधत निघालेले. महागाई, चोऱ्यांचा सुळसुळाट होता. युद्धाची किंमत युद्धापेक्षाही भयंकर असते. महामंदीतून बाहेर येण्यासाठी जवळपास प्रत्येक देश धडपडत होता. "पुढं काय?' हा अक्राळविक्राळ सवाल काळालाही हतबल करणारा.
...अशा परिस्थितीत दरवळली होती ती फ्रॅंक काप्राची रातराणी. उकाड्यानं गदमदणाऱ्या दाटीवाटीच्या वस्तीत दिवे गेलेल्या रात्री अचानक रातराणीचा अनावर गंध यावा आणि सगळी वस्ती कोंदून जावी, तसं घडलं.
* * *

"बेटा एली, सोड त्या मूर्खाचा नाद...असा हट्ट करू नकोस. मी शेवटी तुझा बाप आहे....कुणाच्या बापाचं ऐकीन का?'' अँड्य्रूजशेठनं पोरीला गळ घातली. अँड्य्रूजशेठ ही साधीसुधी असामी नाही. मायामीचा हा धनाढ्य बॅंकर बहुधा अमेरिकेतला सर्वात श्रीमंत असावा; पण शेठजीचं पोरीवर अपार प्रेम. तिला त्यानं लाडाकोडात वाढवून पार वाया घालवलेलं. पाण्यासारखा पैसा वाहवला त्यानं पोरीसाठी; पण पोरगी आता बधत नव्हती. शेठजीनं तिला धरून आपल्याच मालकीच्या आलिशान बोटीवर आणून ठेवलं होतं. पठ्ठी महापळपुटी आहे. याआधीही घरातून दोन-चारदा पळाली आहे.
ताज्या भानगडीनुसार एलीनं आपल्या बापाला धुडकावून एका वैमानिकाशी लग्न उरकलंसुद्धा होतं. वैमानिक कसला? लुच्चा आहे एक नंबरचा. श्रीमंत मूर्ख पोरगी पटवावी, त्यायोगे तिच्या बापाची प्रॉपर्टी हडपावी, हा त्याचा इरादा शेठजीला कळला होता; पण पोरगी ऐकेना.
""आय विल हॅव माय वे, हनी...हट्ट सोड!'' अँड्य्रूज म्हणाला. संतापलेल्या एलीनं खाद्यपदार्थांचा ट्रे उधळून लावत सरळ बोटीचा डेक गाठला...आणि मारली उडी!
"अँड्य्रूजशेठची पोरगी पुन्हा पळाली' ही बातमी काही तासांतच मायामीभर पसरली. शेठजीनं पुन्हा एका खासगी गुप्तचर संस्थेला पोरगी परत आणण्याचं कंत्राट दिलं. दहा हजार डॉलर्सचं इनाम जाहीर केलं. पोलिसांकडं तक्रार गुदरली.
...त्याच रात्री मायामीच्या ग्रेहाउंड बसडेपोत एली न्यूयॉर्कच्या बसची वाट पाहत उभी होती. न्यूयॉर्कमध्ये तिचा नवरा राहतो. तिला त्याच्याकडं जायचंय. दोन हजार किलोमीटरचा प्रवास.
...तेव्हाच तिथल्या फोनबूथवर पत्रकार पीटर वॉर्न कुणाला तरी झापत होता. ""समजतोस काय स्वत:ला? हे असलं काही खपवून घेणार नाही मी...अच्छा? आता भाषा का बदलली? माफी मागू नकोस. ती वेळ निघून गेली. लेको, तुम्हाला धडा शिकवलाच पाहिजेलाय...'' वगैरे वगैरे.
प्रत्यक्षात पत्रकार पीटर वॉर्नला त्याचा संपादक सांगत होता : ""गेलास ढगात! न्यूयॉर्कला येऊच नकोस. आलास तर ऑफिसच्या जवळही फिरकू नकोस. तुझी नोकरी गेली! गेली! गेली!''
बगलबच्च्यांच्या वरातीत शूरवीर पीटर वॉर्नची स्वारी ग्रेहाउंड बसमध्ये स्वार झाली.
""ड्रायव्हर, इथं वर्तमानपत्रांचे गठ्ठे कुणी ठेवले?'' असं म्हणत पीटरनं ते बसमधून खाली फेकून दिले. ड्रायव्हरची सटकली.
""मी त्या पेपरांच्या गठ्ठ्यांवर बसू शकत नाही. का विचार? एकदा बसलो होतो. बुडाला सगळी शाई लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा गाव हेडलायनी वाचत वाचत माझ्या मागं मागं! हा हा!!'' पीटरनं ऐकवलं. या भांडणात त्याची सीट गेली. तिथं कुणी एक नखरेल युवती बसली होती. नाक वर करून!
...पीटर तिच्या शेजारी बसला.
* * *

एलीला हा सहप्रवासी बिलकूल आवडला नव्हता. अत्यंत आढ्यतेखोर. आगाऊ. दीडशहाणा. स्वत:ला किंग समजतो. मध्यरात्री कधीतरी बस पाण्यासाठी थांबली. पाय मोकळे करायला सगळेजण खाली उतरले. तेवढ्यात एका चोरट्यानं एलीची बॅगसुद्धा पळवली. हातात चार डॉलर तेवढे उरले होते. चडफडत ती बसमध्ये पुन्हा चढली. पहाटे जॅक्‍सनव्हिलचा स्टॉप आला, तेव्हा एली पीटर वॉर्नच्या खांद्यावर मान टाकून झोपून गेली होती. त्याचा स्कार्फ तिच्या गळ्यात होता.
""सॉरी हं!'' एली म्हणाली.
""इट्‌स ओके. झोपल्यावर तुम्ही सुंदर दिसता!'' पीटर म्हणाला.
"" मी इथं जवळच जाऊन येते. मला थोडा उशीर होईल. बस थांबवायला सांगा!'' एलीनं फर्मावलं.
""हूड! तुम्हीच सांगा...'' पीटर.
..एली गेलीच. परत आली तेव्हा बस निघून गेली होती. पुढची बस रात्री आठ वाजता. म्हणजे बारा तासांनी. ओह गॉड...पाहते तो काय! समोर बाकावर पीटर वॉर्न बसलेला.
""तुम्ही माझ्यासाठी थांबलात हे आता सांगू नका,'' एली वैतागून म्हणाली.
""डोकं नाही फिरलेलं माझं. हे घ्या तुमचं तिकीट. सीटवर राहिलं होतं! शिवाय आता तुम्हाला शोधायला तुमच्या वडिलांनी सोडलेली शिकारी कुत्रीही निघाली असतील मागावर! श्रीमंत लोकांचे असभ्य चाळे सगळे! तुमच्या मागं कोण धावेल? तुमच्या बापानं तुम्हाला शोधण्यासाठी दहा हजार डॉलर्सचं इनाम लावलंय, हे तरी माहीत आहे का?'' पीटर भडकला होता.
""बरीच माहिती काढलेली दिसते तुम्ही...बक्षिसाच्या रकमेनं लाळ सुटली का?'' एलीनं टोमणा मारला.
""हूड!! हवाय कुणाला तुमचा हरामाचा पैसा? हे सगळं पेपरात आलंय छापून...बघा!'' हातात "जॅक्‍सनव्हिल गॅजेट'चा ताजा अंक फडकावत तो म्हणाला.
""मी तुम्हाला दुप्पट पैसे देते...बोलू नका कुठं प्लीज! मला मदत करा...कराल? मला न्यूयॉर्कला माझ्या नवऱ्याकडं पोहोचू दे...बस!'' ती व्याकुळ होऊन म्हणाली. तो एकटक तिच्याकडं बघत राहिला.
* * *

तुफ्फान पावसानं रस्ता तात्पुरता बंद झाल्यामुळं दोघांनाही एका मोटेलमध्ये आसरा घ्यावा लागला. पती-पत्नी वॉर्न एका खोलीत! आल्या आल्या पीटरनं दोन पलंगांच्या मध्ये एक दोरी बांधून चादर आडवी टाकून दिली.
"" मला प्रायव्हसी लागते. कुणी टक लावून बघितलेलं मला चालत नाही...'' त्यानं खुलासा केला. दोरीवरच्या चादरीकडं बोट दाखवून तो म्हणाला ः ""ही जेरिकोची भिंत...जोशुआच्या ट्रम्पेटच्या आवाजानं प्राचीन जेरिकोची भिंत कोसळली होती ना? इथं ट्रम्पेट नाहीए. ही अशीच अभेद्य राहणार. मला तुमच्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. तुम्ही न्यूयॉर्कला नवऱ्याकडं पोहोचा, मला एक चांगली बातमी मिळेल. दॅट्‌स इट!''
""मी तुमची बातमी आहे?'' एली ओरडली.
""येस...दॅट्‌स द डील!'' तो म्हणाला.
तिच्या अंगावर एक पैजामा नि सदरा फेकून तो शांतपणे कपडे उतरवू लागला. सोबत तोंडाची टकळी सुरू होतीच. ती चादरीपलीकडं निघून गेली.
सकाळी ग्रेहाउंड बस पुढच्या प्रवासाला निघाली खरी; पण गाणी म्हणायच्या नादात ड्रायव्हरनं गाडी थेट चिखलाच्या डबक्‍यात घातली. एव्हाना एलीचा शोध घ्यायला डिटेक्‍टिव्ह निघाले होते. दोघांनी मस्त अभिनय करून त्यांना फुटवलं. बक्षिसाच्या आशेनं आणखीही एक गडी मागावर आला होता, त्यालाही त्यांनी गुंगारा दिला.
शेवटी दोघंही चालत निघाले.
* * *

पीटर वॉर्न रांगडा आहे. थोडासा विक्षिप्त आहे; पण हॅंडसम आहे. त्याचं नखरेल स्मित खिळवून ठेवतं. त्याची ती तलवारकट मिशी भलतीच घायाळ करणारी आहे. "अरे'ला "का रे' करणारा खराखुरा पुरुष. अन्याय दिसला की हात उगारणारा. मनात येईल ते बेधडक बोलणारा...चांगला माणूस आहे पीटर वॉर्न....
""तू कधी प्रेमात पडलायस?'' एलीनं विचारलं.
"" हॅ: ...मला कुठली पोरगी मिळायला बसलीये? आमच्या आवडीनिवडी या अशा...'' बिछान्यावर पडल्या पडल्या तो काहीशा कडवटपणानं म्हणाला.
""कशा?'' एली.
""एखाद्या बेटावर जाऊन राहायचंय मला...जिथं पाणी, चांद आणि मन एक झालेलं असतं तिथं...वर ताऱ्यांनी खच्च भरलेलं आकाश. पडल्या पडल्या आपण आकाशात बोट खुपसावं आणि सारं तारांगण ढवळून काढावं...अशा ठिकाणी निवांत पडून राहायचंय मला. कोण येणार असल्या ठिकाणी आपल्याबरोबर?'' तो स्वत:शीच म्हणाला.
""मी येईन...मला यायचंय तिथं पीटर...मला घेऊन चल!'' आवेगानं त्याच्या कुशीत शिरत ती म्हणाली. मुसमुसून रडू लागली. एलीनं तरी आयुष्यभराची पळापळ कशासाठी केली होती?
""तूर्त तू तुझ्या बिछान्यात गेलेलं बरं, एली!'' घोगऱ्या, गंभीर आवाजात पीटर म्हणाला.
...पण सकाळी एलीला मोटेलच्या मालकिणीनं उठवलं तेव्हा पीटर निघून गेलेला होता.
* * *

एलीनं वडिलांना फोन केला. तिला घरी घेऊन येण्यासाठी मोटारींचा ताफा निघाला. तिच्या नवऱ्यालाही बातमी कळली होतीच. तोही तिला भेटायला निघाला. एली घरी आली. अँड्य्रूजशेठनं तिचं लग्न अखेर मान्य केलं. तिनंही पीटरला विसरून सेटल्‌ व्हायचं ठरवलं. पुन्हा एकदा चर्चमध्ये रीतसर लग्न करून अधिकृतरीत्या संसारात रमण्याचा निर्धार तिनं केला.
पीटरची इकडं ओढाताण झाली. मोटेलचं भाडं मिळवण्यासाठी उसनवारी करण्याच्या नादात तो तिला मोटेलवर सोडून आला होता. एलीच्या लग्नाची बातमी मिळताच तो वैतागला. शेवटी हे सगळे श्रीमंतांचे चाळेच ठरले तर...
पीटरनं एलीच्या बापाला पत्र पाठवून पैशाची मागणी केली. एलीवर खर्च झालेले 39 डॉलर्स फक्‍त त्याला हवे होते. "बक्षीस वगैरे तुम्हीच ठेवा तुमच्या खिशात!' तो म्हणाला. एलीच्या बापाला हा अभिमानी पोरगा जाम पटून गेला.
पुढं काय झालं? हे तर सगळ्यांनाच माहीत आहे.
* * *

-फ्रॅंक काप्राच्या वाचनात एक लघुकथा आली होती. "नाइट बस' नावाची. लेखक होते अँथनी हॉपकिन्स ऍडम्स. यावर सिनेमा करायचा असं काप्रानं ठरवलं. रॉबर्ट रिस्किनकडून त्यानं नवं स्क्रिप्ट लिहून घेतलं. कुणालाच ते फारसं आवडलं नव्हतं. कथेचा "प्लॉट'च बंडल आहे, असं सगळ्यांचं म्हणणं होतं. उदाहरणार्थ ः श्रीमंत बापाची पोरगी पळून गेली? यात बातमी काय? त्याची हेडलाइन होण्याचं कारण काय? पत्रकारानं काय असल्या स्टोऱ्यांच्या मागावर राहायचं असतं का? त्यात कसला आलाय पुरुषार्थ? असले सवाल त्या काळीही उमटलेच; पण काप्रा बधला नाही. अवघ्या चार आठवड्यांत त्यानं चित्रपट पुरा केला.

फ्रॅंक काप्राचं हे अपत्य तेव्हा कुणालाच नको होतं. - अर्थात काप्रा सोडून! नायकाच्या भूमिकेसाठी कसाबसा राजी झालेला अक्‍कडबाज क्‍लार्क गेबल "लवकरात लवकर हे भंगार आवरा' असं म्हणतच कॅमेऱ्यासमोर आला. गेबल तेव्हाही सुपरस्टार होता. लोक त्याला लाडानं "किंग' म्हणत. नायिका क्‍लॉडेट कोल्बर्ट हिचा नखरा औरच होता. शेवटचं दृश्‍य चित्रित झाल्यावर खुर्चीत बसत तिनं म्हटलं होतं ः "हुश्‍श! जगातलं सगळ्यात फालतू स्क्रिप्ट आणि फडतूस रोल संपला...थॅंक गॉड!'
खरंतर गेबल-कोल्बर्टला या चित्रपटात कामच करायचं नव्हतं. ते करारानं दुसऱ्या स्टुडिओज्‌ना बांधलेले होते; पण त्या स्टुडिओज्‌कडं तूर्त काही काम नसल्यानं त्यांनी ही जोडी निर्माती कंपनी "कोलंबिया पिक्‍चर्स'ला एका चित्रपटापुरती उसनी देऊ केली होती आणि मधल्या मध्ये पैसे कमावले होते. "कोलंबिया पिक्‍चर्स'कडंही पैशाचा तसा खडखडाटच होता. परिणामी, बजेट तुटपुंजं होतं आणि होतं ते क्‍लार्क गेबल आणि क्‍लॉडेट कोल्बर्ट यांनी निम्म्याहून अधिक संपवलं होतं. अवघ्या चार आठवड्यांत फ्रॅंक काप्राला चित्रपट पुरा करावा लागला. तोही जवळपासच्या दुय्यम लोकेशन्सवर. स्वस्तातल्या साधनसामग्रीनिशी.

"कोलंबिया'नं चित्रपटाची जाहिरात (आजकालच्या भाषेत प्रमोशन) केलीच नाही फारशी. त्यामुळे थिएटरंही मिळाली नाहीत. दुय्यम वस्त्यांमधल्या तिय्यम "थेटरां'मध्ये चित्रपट लागला. आठवडा उलटला असेल-नसेल....रातराणीच्या भस्सकन्‌ आलेल्या गंधलोळानं अवघा आसमंत कोंदाटून गेला.

बघत बघता थिएटरांसमोर रांगा लागल्या. त्या हटता हटेनात. पब्लिकनं पिक्‍चर डोक्‍यावर घेतलं. पाहावं तिथं क्‍लार्क गेबल आणि कोल्बर्ट यांचे चेहरे. चित्रपटातले एरवी बंडल ठरावेत असे डायलॉग्ज्‌ लोक आठवून आठवून म्हणत होते.
एवढा गाजलेला हॉलिवूडचा प्रेमपट; पण आख्ख्या चित्रपटात एक साधं पुसटसं चुंबनदृश्‍यदेखील नाही. "किंचितही अंगप्रदर्शन करणार नाही,' असं क्‍लॉडेटनं ठणकावून सांगितल्यामुळंच "जेरिकोच्या भिंती'चा संवाद रचला गेला. क्‍लार्क गेबल तर दारू पिऊनच सेटवर यायचा. मोटेलमधल्या दृश्‍यात तो तोंडाची टकळी चालवत कपडे बदलतो, असा सीन आहे. तेव्हा संवादांबरहुकूम कपडे उतरवताना फेफे उडतेय, हे बघून त्यानं शर्टाच्या आत बनियन घालणं रद्द केलं. शर्ट काढल्यावर थेट गडी उघडाच! चित्रपट गाजायला लागल्यावर त्याचा भन्नाट परिणाम दिसला. अमेरिकेतल्या पुरुषांनी बनियन घालणंच बंद करून टाकलं. गंजिफ्रॉकवाल्यांचे धंदेच बसले म्हणे!
तेवढ्यात आलेल्या 1934 च्या सातव्या ऑस्कर समारंभात "इट हॅपन्ड्‌ वन नाइट'नं इतिहास घडवला. सर्वोत्कृष्टतेचे पहिले पाचही पुरस्कार या चित्रपटानं पटकावून "ऑस्कर ग्रॅंड स्लॅम' साधला. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शन आणि संहिता अशा "बिग फाइव्ह' पुरस्कारांना ग्रॅंड स्लॅम म्हणायचं. हा विक्रम नंतर "वन फ्ल्यू ओव्हर ककूज्‌ नेस्ट' (1975) आणि "सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌' (1991) या दोन चित्रपटांनाच साधता आला आहे.

आजही एखाद्या रिकाम्या दुपारी किंवा खरं तर रात्रीच बापटसरांची कविता आठवते आणि मग पाठोपाठ "इट हॅपन्ड्‌ वन नाइट' बघावासा वाटतो. दूरवर कुणाच्या तरी बागेतली रातराणी घमघमू लागते.

Web Title: pravin tokekar write article in saptarang