अनाम वीरा... (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar write article in saptarang
pravin tokekar write article in saptarang

"जगणं अनमोल असतं, त्याच्यासाठी कुणीतरी किंमत मोजतंय, ते जपून वापरा' हा विचार आणि हा संस्कार मनावर ठसवणारा आणि त्याचा प्रत्यय देणारा चित्रपट म्हणजे "सेव्हिंग प्रायव्हेट रायन' हा चित्रपट. दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा हा चित्रपट प्रत्येक संवेदनशील व्यक्तीनं पाहायलाच हवा. तो चुकवून चालणार नाही.

छोकऱ्याच्या जावळात बोटं फिरवून, दह्याची कवडी तळहाती घेत, डबडबलेल्या डोळ्यांच्या बायकोकडं चोरटी नजर टाकून "येतो' असं पुटपुटत, पाठ वळवून निघालेला मिलिटरीतला सैनिक काही वेळा परत येतो तो चार जणांच्या खांद्यावरल्या शवपेटीतून. तिरंग्यात गुंडाळलेल्या त्याच्या शरीराचं शेवटचं दर्शनही नाही होत अनेकदा. हुतात्मा झालेला तो अनाम वीर लढताना एक सैनिक असतो. हजारातला एक. त्या अनाम वीराचा जीवनान्त जिथं झाला तिथं ना कुठला स्तंभ उभारला जात ना एखादी वात पेटत. जनभक्‍तीचे भाव त्याच्यावर उधाणले जात नाहीत, रियासतीवर त्याचं नावही नोंदलं जात नाही. आपण सुरक्षित जगावं म्हणून त्यानं आपल्या प्राणांची किंमत दिलेली असते.

"जगणं अनमोल असतं, त्याच्यासाठी कुणीतरी किंमत मोजतंय, ते जपून वापरा' हा शाळेतल्या फळ्यावरचा नुसता सुविचार नाही. तो एक संस्कार आहे. त्याचा अस्सल प्रत्यय देणारा चित्रपट स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता ः "सेव्हिंग प्रायव्हेट रायन'. सन 1998 मध्ये आलेल्या या चित्रपटानं पाच ऑस्कर पुरस्कार पटकावले. गोल्डन ग्लोबही कमावलं. "सर्वात प्रत्ययकारी युद्धपट' म्हणून तो ओळखला जातो. या चित्रपटातला भयानक रक्‍तपात उमासे आणणारा आहे. तरीही एकाही चौकटीची काटछाट न करता हा चित्रपट दाखवावा, अशी स्पीलबर्गची पूर्वअट होती. कारण त्याचा हेतूच वेगळा होता.

भारतातही सेन्सॉर बोर्डानं तेव्हा आपली कात्री ड्रावरातून बाहेर काढलीच होती; पण तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांनी स्वत: चित्रपट पाहून तो बिनाकाटछाट दाखवण्याचा निर्णय घेतला होता. हा युद्धपट म्हणजे 169 मिनिटांचं माणुसकीवरचं गहन भाष्यच आहे. त्यातला निर्घृण संहार, रक्‍तपात, देहामांसाच्या चिंधड्या, सस्त्यात मिळालेली मौत... या नरकचित्रातून उगवलेलं फूल भलाईचं आहे. त्याचा गंध दीर्घ काळ रेंगाळत राहतो मनात.
***

नॉर्मंडीतल्या अमेरिकी सैनिकांच्या दफनभूमीकडं हा रस्ता जातो. दुतर्फा उंच उंच झाडं. एक वृद्ध मनुष्य पाय ओढत तिथं निघाला आहे. कोण आहे हा म्हातारा...? पाठोपाठ त्याचं कुुटुंब चालतंय. हजारोंच्या रांगेत उभे पांढरेशुभ्र संगमरवरी क्रॉस. रांगाच रांगा. निळ्याशार आभाळाच्या पार्श्‍वभूमीवर, हिरव्यागार कुरणावरच्या त्या रांगा पाहून मन शतश: फाटतं. या भूमीत हजारो सैनिक चिरनिद्रा घेत आहेत.
...एक शुभ्र क्रॉस शोधून म्हातारा गुडघ्यावर मटकन बसला. ढसाढसा रडू लागला. वृद्ध पुटपुटत होता...
""मला वाटतं...मी चांगला प्रयत्न केलाय...मी जगलो...चांगला जगलो...मला वाटतं तेवढं पुरेसं ठरावं...तुझे उद्गार कायम माझ्या मनात आहेत. आय हॅव अर्न्ड धिस...''
त्या वृद्धाला पुन्हा रडू कोसळलं. त्याच्या डबडबलेल्या डोळ्यांमध्ये 60 वर्षांपूर्वीचा नॉर्मंडीचा समुद्रकिनारा दिसू लागला...
* * *

दुसऱ्या महायुद्धातली उत्तरार्धातली गोष्ट. नाझी जर्मनीनं फ्रान्स गिळंकृत करून उत्तरेकडच्या नॉर्मंडी किनाऱ्यापर्यंत बस्तान बसवलं होतं. नॉर्मंडीचा किनारा विस्तीर्ण होता. समुद्र, वाळू आणि लगेचच पहाडी भाग सुरू व्हायचा. त्या टेकाडांवर जर्मन बंकर्स होते. दोस्तांनाही काही ना काही करणं भाग होतं. नॉर्मंडीत चढाई करून जर्मनीला मागं ढकलायचं, असा बेत ठरला. अमेरिकेसह, ब्रिटन, कॅनडा आणि मुक्‍त फ्रान्सच्या पलटणींनी या मोहिमेत भाग घेतला. नॉर्मंडीच्या विस्तीर्ण किनाऱ्याचे पाच काल्पनिक भाग करण्यात आले. स्वोर्ड, जुनो, गोल्ड, ओमाहा आणि युटाह अशी त्यांची पाच सांकेतिक नावं होती. पैकी ओमाहा किनाऱ्यावर सहा जून 1944 रोजी सकाळी काही जमिनीपर्यंत घुसणारी जहाजं घुसवून समुद्रमार्गे अमेरिकी फौज घुसली. "डी-डे' म्हणून हा दिवस युद्धैतिहासात अमर झाला आहे.

भरतीच्या काळात पाणी वाळू ओलांडून थेट डोंगररांगेपर्यंत जात असे. त्याच सुमारास हल्ला चढवून जर्मन ठाणी उद्‌ध्वस्त करायची असा दोस्तांचा डाव होता; पण त्यांना भयानक प्रतिहल्ल्याला सामोरं जावं लागलं. किनाऱ्यानजीक समुद्रातल्या पाणसुरुंगांनी त्यांची जहाजं उडवली. डोंगरावर सुरक्षित दडलेल्या जर्मन तोफांच्या भडिमारानं त्यांची बिनीची फौज जवळपास कापली गेली. समोरून बंदुकीच्या गोळ्यांचा मुसळधार वर्षाव होत होता. बॉम्ब फुटत होते. बघता बघता मृतदेहांचा खच पडला. रक्‍तामांसाचा चिखल झाला. नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर आपटणाऱ्या सागरलाटा लालेलाल झाल्या...

कॅप्टन जॉन एच. मिलर आणि त्याच्या युनिटनं हा पहिला फटका सहन केला. मिलरनं कसाबसा वाळूचा एक ढिगारा गाठला. आठ-दहा जण वाचून त्याच्या जोडीला आले. दोन स्नायपर्स, एक रेडिओ ऑपरेटर, एक वैद्यकतज्ज्ञ, बाकी साधे सैनिक असं त्याचं तोकडं युनिट होतं; पण स्नायपर्सच्या मदतीनं त्यानं हिकमतीनं टेकडीवरचा बंकर उडवला. जर्मन तोफांची थोबाडं बंद पाडली. मग डझनभर बॉम्ब फेकून जर्मन ठाणं जाळून काढलं. ओमाहाचा किनारा थंडावला. जर्मन मागे हटले होते.
क्षणभराची उसंत घेऊन कॅप्टन मिलरनं सभोवार पाहिलं. टेकडीवरून दिसणारं दृश्‍य ओकारी आणणारं होतं. शेकडो मृतदेह लाटांवर हलत होते. एका मृत सैनिकाच्या पाठीवरच्या पिशवीवर नाव होतं ः रायन एस.
""गुड जॉब सर...काय दृश्‍य आहे ना!'' सार्जंट होर्वाथनं मान हलवत विचारलं.
""...अद्भुत आहे, अद्भुत!'' मिलर कडवटपणानं म्हणाला. विलक्षण थकवा देहमनात भरला होता. उत्तेजनेची जागा आता वेदनेनं घेतली होती. त्याच वेळी वॉशिंग्टनमधल्या लष्करी मुख्यालयात एक शोकान्तिका नवं वळण घेत होती.
* * *

लष्करी कामगिरीत कामी आलेल्या सैनिकांच्या घरी मुख्यालयातून पत्रं रवाना होत होती. ठरलेला मसुदा होता : "प्रिय अमुक अमुक, कळविण्यास अत्यंत दु:ख होतं की आपला पुत्र *** एका अपरिहार्य लष्करी कामगिरीत कामी आला. देशासाठी त्यानं दिलेलं बलिदान अतुलनीय आहे. रणांगणावर त्यानं गाजवलेलं शौर्य येणाऱ्या पिढ्यांना स्फूर्ती देत राहील. या दु:खदायक प्रसंगात अमेरिका आपल्यासोबत आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्‍ती आपल्याला मिळो, ही ईशचरणी प्रार्थना. आपला.
जनरल अमुक अमुक...इत्यादी इत्यादी.'

...अशी तीन पत्रं आयोवातल्या एका आईकडं रवाना होत असल्याचं टायपिस्टच्या लक्षात आलं. कुणी रायन नावाचं कुटुंब होतं. याचा अर्थ त्या आईची तीन मुलं युद्धात मारली गेली होती. तीन मुलगे एकाच युद्धात गमावलेल्या आईचं सांत्वन करायचं तरी कसं? तिन्ही पत्र एकाच वेळी हातात घेताना त्या माउलीची अवस्था काय होईल? त्या रायनबाईला तोंड कसं द्यायचं? मुख्यालयातले अधिकारीही हैराण झाले.
तेवढ्यात ध्यानी आलं की रायनबाईंची तीन मुलं वेगवेगळ्या कामगिरीत कामी आली असली तरी चौथा मुलगा नुकत्याच नॉर्मंडीत झालेल्या धुमश्‍चक्रीत बेपत्ता झाला आहे. पॅराशूटच्या साह्यानं काही ठिकाणी दोस्तसैन्य उतरवण्यात आलं होतं. त्यात प्रायव्हेट जेम्स रायन होता. जर्मनीच्या ताब्यात असलेल्या भूप्रदेशात तो अडकला असावा किंवा मारला तरी गेला असावा. "प्रायव्हेट' म्हणजे अमेरिकी सैन्याच्या उतरंडीतला सर्वात तळातला सैनिक.

त्याला शोधून घरी पाठवावं, त्या माउलीचं दु:ख थोडं तरी हलकं होईल, असं चीफ ऑफ स्टाफ जनरल जॉर्ज सी. मार्शल यांचं मत पडलं. फ्रान्सच्या अंतर्भागात कुठं कुठं चकमकी झडत होत्या. दोस्तांचं सैन्य ठिकठिकाणी लढत होतं. जेम्स रायनचा शोध घेण्यासाठी तिथं एक युनिट तातडीनं पाठवावं असं ठरलं. ...एका साध्या सैनिकासाठी डझनभर सैनिक पणाला लावायचे? काही अधिकाऱ्यांना हे पटत नव्हतं. त्यात तथ्यही होतंच. जेम्स रायनला शोधायला गेलेल्या युनिटमधले कितीजण माघारी येऊ शकतील, याची शाश्‍वती नव्हती. "डी-डे'नंतर तीन दिवसांनी कॅप्टन जॉन मिलरला आदेश मिळाला की नॉर्मंडीच्या अंतर्भागात शिरून प्रायव्हेट जेम्स रायन याचा शोध घ्यावा, जमल्यास त्याला घेऊन परत यावं.
मिलरनं आपला चमू जमवला आणि एका भयानक युद्धमय शोधमोहिमेला प्रारंभ झाला.
* * *

शोधमोहिमेसाठी मिलरनं कॉर्पोरल टिमथी अपहॅमला निवडलं. अपहॅम खुशमिजाज गडी होता; पण लढणं त्याच्या रक्‍तात नव्हतं. फ्रेंच आणि जर्मन भाषा तो चांगली बोलत असे. एखादा दुभाषा असलेला बरा. त्याच्या चमूतले मेलिश आणि कापार्झो हे दोघं रांगडे गडी पट्टीचे नेमबाज होते. प्रायव्हेट जॅक्‍सनही लढवय्या होता. आयर्विन वेड हा वैद्यकतज्ज्ञ होता. ब्रूकलिनचा रिचर्ड रायबेन हा आणखी एक प्रायव्हेट होता. सार्जंट होर्वाथ होताच. त्यांना कुणालाच अपहॅम आवडला नाही. अंगचोर लेकाचा. आठ जणांचं युनिट घेऊन मिलर फ्रान्सच्या ग्रामीण भागात निघाला. ही कामगिरी म्हणजे गवताच्या नव्हे, सुयांच्या गंजीतून सुई शोधून काढण्यासारखं आहे, याची मिलरला पुरेपूर जाणीव होती.
""एव्हाना तो केआयए झाला असेल...'' मेलिश म्हणाला. केआयए म्हणजे किल्ड इन ऍक्‍शन.
""कॅप्टन, एका प्रायव्हेटसाठी इतका जीव धोक्‍यात घालणं आपल्याला पटत नाही! शिवाय हा लष्करी सामग्रीचा गैरवापर आहे...'' अपहॅम म्हणाला. सगळ्यांना तसंच वाटत होतं. एकंदरीत, हा जो कुणी प्रायव्हेट जेम्स रायन होता, तो काळा की गोरा हे माहीत होण्याआधीच नावडता झाला होता.
जर्मन सैन्याच्या हालचाली चुकवत-हुकवत मिलरचा चमू निघाला. वाटेत उद्‌ध्वस्त गावं लागायची. एखाद्‌दुसरा होरपळलेला नागरिक दिसायचा. पडक्‍या इमारतीत सैनिक दडून बसलेले आढळायचे. हरेक ठिकाणी मिलर चौकशी करत होता ः प्रायव्हेट रायनला बघितलंय कुणी?
ही शोधमोहीम अपेक्षेपेक्षा खूपच भयंकर ठरली. घनघोर लढाईत मिलरचे दोन नेमबाज मारले गेले. रायनचा नाद सोडून सरळ निघून जावं, असं युनिटमधल्या प्रत्येकाला वाटायचं; पण मिलरनं त्यांची समजूत काढली.
""युद्धापूर्वी मी पेनसिल्वानियात एका शाळेत मास्तर होतो. इंग्लिश शिकवायचो. वसंत ऋतूत बेसबॉल शिकवायचो. उदरनिर्वाह मी छान चालवलाय, असं सगळे म्हणायचे; पण इथं युद्धभूमीत सगळं वेगळंच आहे. आज मी एक वेगळाच माणूस झालोय. इतका की माझी बायको मला ओळखेल की नाही, याचीच शंका येते. रायन कोण, कुठला मला काही देणं-घेणं नाही. माझ्यासाठी ते फक्‍त नाव आहे; पण त्याला गाठून घरी पाठवणं जमलंच तर बायकोला मी युद्धात नेमकं काय केलं हे खऱ्या अर्थानं सांगू शकेन,'' मिलर म्हणाला.
""...युद्धात माणसं मरतात; पण वाचवणं ही खरी कमाई असते. यू हॅव टू अर्न युअर लाइफ...,'' मिलर म्हणायचा ः""माझ्या नेतृत्वाखाली 94 सैनिक कामी आले; पण त्याच्या वीसपट लोकांचा जीव वाचवला याचं समाधान जरूर आहे...''
...अखेर रामेले गावाच्या अलीकडं कुणी एक रायन नावाचा सैनिक पॅराशूटनं उतरला होता असं कळलं. रामेले हे गाव एका नदीवर होतं. तिच्यावर एक पूल होता. या पुलाला अचानक लष्करी महत्त्व आलेलं.
प्रचंड हातघाईच्या समरप्रसंगांना तोंड देत मिलरचे सैनिक रामेलेनजीक पोचले. त्या उद्‌ध्वस्त गावात अमेरिकी पलटणीतले अगदी हातावर मोजण्याइतके सैनिक टिकाव धरून होते. प्रायव्हेट जेम्स फ्रान्सिस रायन त्यांच्यात होता.
""प्रायव्हेट रायन, वाईट बातमी आहे...तुझे भाऊ गेले!'' मिलर म्हणाला.
""कुठले भाऊ?'' प्रायव्हेट रायन.
""सगळे...तुला आईकडं पोचवण्याच्या ऑर्डर्स आहेत. तुझी सुट्टी मंजूर झाली आहे...चल!'' मिलर.
""...सुट्टी या माझ्या सहकाऱ्यांनाही हवी आहे. मी एकटा नाही येणार,'' रायन म्हणाला.
""तुझ्या आईला आणखी एका ध्वजाची घडी नेऊन देऊ?'' मिलर वैतागला.
""तिला सांगा, रायन भेटला तेव्हा तो त्याच्या भावांसोबतच होता...'' बाणेदारपणानं उत्तर देत रायननं आपली पोस्ट गाठली. हे अद्भुत होतं. एक साधा सैनिक नकळत सैनिकधर्माचा वस्तुपाठ बनून गेला होता. मिलर आणि त्याचं युनिट स्तंभित झालं.
...अखेर रायनबरोबर राहून त्यांनीही रामेलेचं ठाणं लढवायचं ठरवलं. एका भयानक चकमकीची तयारी सुरू झाली. कॅप्टन मिलरकडं नकळत त्या चकमकीचं नेतृत्व आलं. जर्मन रणगाडे धडधडत आले. त्यांना पूल ओलांडू द्यायचा नाही, हे ठरलं होतं.
जिवाच्या करारानं लढत मिलर आणि त्याच्या युनिटनं चारेकशे जर्मन सैन्याचा मार्ग रोखला. तोदेखील अपुऱ्या स्फोटकांनिशी. सर्व शस्त्रसामग्री संपली. मिलर घायाळ होऊन पडला. पुढं येणाऱ्या रणगाड्यावर पिस्तुलानं गोळ्या झाडत मिलरनं अखेरचा हल्ला केला, तेव्हाच देवदूतासारख्या धावून आलेल्या दोस्तांच्या पी-51 विमानांनी जर्मन रणगाडे उडवले. रामेले वाचलं! शेजारीच उभ्या असलेल्या प्रायव्हेट रायनला मिलर कसंबसं म्हणाला ः ""अर्न धिस...जेम्स, अर्न इट..!''
* * *

एकाच घरातली चार-पाच भावंडं युद्धात मारली गेल्याची काही मोजकी उदाहरणं अमेरिकेत आहेत. नीलॅंड ब्रदर्स म्हणून एका घरातली चार भावंडं युद्धात मारली गेली होती. त्यांच्या कहाणीनं प्रेरित होऊन रॉबर्ट रोडॅट नामक लेखकानं ही पटकथा लिहून काढली. ती टॉम हॅंक्‍सच्या वाचनात आली. त्यानं स्पीलबर्गशी संधान बांधलं. अक्षरश: एका दिवसात याचा चित्रपट काढण्याचा निर्णय झाला. स्वत: स्पीलबर्गनं दिग्दर्शनाची सूत्रं हातात घेतली. मिलरच्या भूमिकेत टॉम हॅंक्‍सनं अक्षरश: कमाल केली. प्रायव्हेट कापार्झोच्या चिमुकल्या भूमिकेत "फास्ट अँड फ्युरिअस' आणि "ट्रिपल एक्‍स'वाला विन डिझेल दिसतो. प्रायव्हेट रायनच्या व्यक्‍तिरेखेत कोवळा मॅट डॅमन दिसतो. या भूमिकेसाठी स्पीलबर्गला खरंतर कुणीतरी अनोळखी नट हवा होता. मॅट डॅमनच्या "गुडविल हंटिंग'चं तेव्हा नुकतंच शूटिंग आटोपलं होतं. "सेव्हिंग प्रायव्हेट रायन' रिलीज होईपर्यंत मॅटला "गुडविल हंटिंग'साठी ऑस्कर मिळून गेलंच होतं!
या चित्रपटापूर्वी स्पीलबर्गनं सर्व कलाकारांसाठी चक्‍क एक "बूट कॅम्प' घेतला. सगळ्यांना युद्धाचं प्रशिक्षण घ्यायला लावलं. चित्रपटाच्या सुरवातीला असलेला, नॉर्मंडीच्या किनाऱ्यावरचा युद्धप्रसंग जवळपास 20 मिनिटांचा आहे. या दृश्‍यासारखी प्रत्ययकारी युद्धदृश्‍यं आजवर दिसली नाहीत, असं म्हटलं जातं. (नुकत्याच आलेल्या क्रिस्तोफर नोलानच्या "डंकर्क'नंही तोडीस तोड युद्धदृश्‍यं टिपली आहेत). "सेव्हिंग प्रायव्हेट रायन' बघताना अनेक रांगडे सैनिकही हलून, गलबलून जातात. "हळहळ' आणि "हुळहुळ' पंथांतल्या रसिकांसाठी हा चित्रपट बनलेलाच नाही.

आपल्यासारख्या सामान्य माणसानं नेकीनं आणि उत्फुल्लपणे जगणं हीच खरी त्या सरहद्दीवर प्राण पणाला लावणाऱ्या अनाम वीरांसाठी खरी श्रद्धांजली असते. आपणच त्यांचं जितंजागतं स्मारक असतो. ..."सेव्हिंग प्रायव्हेट रायन'मधल्या अखेरच्या दृश्‍यात तो ऐंशीच्या घरातला रायन आपल्या पत्नीला रडत रडत विचारतो ः ""मी नीट जगलो ना? मी चांगला माणूस आहे ना? सांग मला तसं...प्लीज!'' तेव्हा त्याला हेच म्हणायचं असतं.
...त्याच वेळी हाच सवाल आपल्याही मनात उमटतो आणि खरंच...शरम वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com