द्वंद्व आणि युद्ध! (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar write article in saptarang
pravin tokekar write article in saptarang

हॉलिवूडवाल्यांना जे धडपणे टिपता आलं नाही, ते रशियन चित्रकर्त्यांनी तोडीस तोड युद्धपट बनवून जतन करून ठेवलं आहे. त्यातले बरेचसे चित्रपट साम्यवादी प्रचारामुळं पाश्‍चिमात्यांनी स्वीकारले नाहीत. काही हॉलिवूडपटांमध्ये स्तालिनग्राडचं युद्ध प्रभावीरीत्या चितारलं गेलं. त्यापैकी एक म्हणजे "एनिमी ऍट द गेट्‌स' हा चित्रपट. स्तालिनग्राडचा गड सोव्हिएत नागरिकांनी कसा लढवला, याची अंगावर काटा येणारी झलक पाहायची असेल तर हा चित्रपट नक्‍कीच बघावा.

स्तालिनग्राडच्या अभूतपूर्व संगराला 76 वर्षं झाली. दुसऱ्या महायुद्धातलं ते एक निर्णायक रण आहे. तब्बल पाच महिने एक आठवडा आणि तीन दिवस चाललेल्या या रणानंतर हिटलरशाहीला अखेरची घरघर लागली. या रणयुद्धाची अफाट किंमत सोव्हिएत रशियानंही मोजली होती. उभयक्षी सुमारे सव्वादोन कोटी सैनिक आणि नागरिक या संगरात होरपळले. किमान वीसेक लाख मृत्युमुखी पडले. कैक जायबंदी झाले. स्तालिनग्राडमधल्या घराघरात हे युद्ध लढलं गेलं.

असं म्हणतात की स्तालिनग्राडच्या लढाईनंतर काही वर्षं तिथल्या गल्ली-बोळात मरणकळेचा कुबट वास भरून राहिलेला असे. स्मशानवत्‌ झालेलं हे शहर पुन्हा उभं राहिलं. आज ते व्होल्गाग्राड किंवा व्होल्गासिटी म्हणून ओळखलं जातं.
या संगराची चाहूल लागली होती 1942 च्या वसंत ऋतूतच. फेब्रुवारीत हिटलरनं आपला इरादा जाहीर केला होता आणि नंतर 28 जुलै 1942 रोजी सोव्हिएत हायकमांडनं आपल्या रेड आर्मीला सुस्पष्ट आदेश पाठवला. "आदेश क्रमांक 227' म्हणून तो इतिहासात नोंदला गेला आहे. त्यावर सोव्हिएत-प्रमुख जोसेफ स्तालिन यांची सही आहे. हा आदेश म्हणतो ः
""लाल सैन्यावर अपरंपार प्रेमादराचा वर्षाव करणाऱ्या आपल्या नागरिकांचा विश्वास डळमळीत होऊ लागला आहे. नाझी राक्षसांच्या तोंडी निरपराध बळी देऊन लष्कर पूर्वेकडं जीव वाचवत पळ काढते आहे, अशी भावना जनमानसात होत आहे. काही मूर्खांना वाटतं की पूर्वेकडं अजूनही अधिक जमीन, पाणी, धान्यधुन्य मुबलक उरलं असल्यानं थोडीशी माघार घेण्यास काही प्रत्यवाय नाही; परंतु हा भ्रम आहे. इतकंच नव्हे तर, शत्रूला मदत करणारा घातकी खोटारडेपणा आहे. पूर्वेकडं सरकत जाणं हे मायभूमी गमावण्यासारखंच आहे. युक्रेन, बायलोरशियातले मुलुख आणि बाल्टिक भूमी गमावल्यानंतर आपल्याकडं उरलेलं जे काही आहे, ते तुटपुंजं आहे. सबब, माघार घेण्याची वेळ टळून गेली आहे. आता एकही पाऊल माघार नाही...नॉट वन स्टेप बॅक!''- जोसेफ स्टालिन.

"नॉट वन स्टेप बॅक' हे पुढं महायुद्धाचं घोषवाक्‍य बनून गेलं.
...जेते नेहमीच इतिहासाचं पुनर्लेखन करतात, किमान त्यांचा तसा प्रयत्न तरी असतोच. त्यानुसार हॉलिवूडनं दिलेल्या चित्रपटांच्या बहुतांश कहाण्या दोस्तांच्या फौजेतल्या वीरांच्या होत्या किंवा आहेत; पण दुसऱ्या महायुद्धात हिटलरसारखा हैवान गाडला तो सोव्हिएत सैन्यानं. तिथल्या विजयगाथांचंही एक समृद्ध दालन जागतिक चित्रपटांच्या दुनियेत आहे. हॉलिवूडवाल्यांना जे धडपणे टिपता आलं नाही, ते रशियन चित्रकर्त्यांनी तोडीस तोड युद्धपट बनवून जतन करून ठेवलं आहे. त्यातले बरेचसे चित्रपट साम्यवादी प्रचारामुळं पाश्‍चिमात्यांनी स्वीकारले नाहीत. काही हॉलिवूडपटांमध्ये स्तालिनग्राडचं युद्ध प्रभावीरीत्या चितारलं गेलं. त्यापैकी एक म्हणजे "एनिमी ऍट द गेट्‌स' हा चित्रपट. 2001 मध्ये येऊन गेलेल्या या सिनेमात स्तालिनग्राडच्या लढाईची पार्श्‍वभूमी आहे. समोर महायुद्धाचा पट उलगडलेला आणि त्यातून आपल्याला दिसतं ते दोन योद्‌ध्यांमधलं अफलातून द्वंद्व आणि एक अबोल प्रेमकहाणी.

हे योद्धेही कुणी मुत्सद्दी किंवा इतिहासपुरुष नव्हेत; खरेखुरे सैनिक आहेत.
त्यांचा जीवनकलह, परिस्थितिजन्य अपरिहार्यता म्हणून एकमेकांच्या जिवावर उठणं हे तर आहेच, शिवाय त्याला प्रेमाची एक गडदरंगी किनारही आहे. टायटॅनिक ही घटना खरी; पण त्या घटनेवर आधारित चित्रपटात साकारलेली रोझ आणि जॅकची अजरामर प्रेमकथा हे लेखकाच्या प्रतिभेचं यशस्वी; पण काल्पनिक कलम होतं. तसंच "एनिमी ऍट द गेट्‌स'च्या बाबतीत म्हणता येईल. म्हणजे असं की स्तालिनग्राडची लढाई खरीखुरी आहे. नेमबाज वासिली झायत्सेव हा सोव्हिएत रशियाचा हीरो होता हेदेखील खरं आहे. त्यानं एकट्यानं शेकडो नाझी सैनिक टिपून मारले, हेही शंभर टक्‍के सत्य आहे...तरीही त्याची चित्रपटातली गोष्ट मात्र काल्पनिक आहे. सत्याचा हा अपलाप रशियन प्रेक्षकांना पटला नाही. चित्रपटीय स्वातंत्र्याच्या नावाखाली हे हॉलिवूडवाले कुठलाही मसाला घालतात, अशी जोरदार ओरड झाली. चित्रपटानं धंदा तसा चांगलाच केला; पण बुद्धिजीवींनी मात्र नाकं मुरडली. स्तालिनग्राडचा गड सोव्हिएत नागरिकांनी कसा लढवला, याची अंगावर काटा येणारी झलक पाहायची असेल तर हा चित्रपट नक्‍कीच बघावा.
* * *
कहाणीची सुरवात खरं तर बरीच आधी झाली. उरल पर्वतराजीत आपल्या आजोबांच्या तरबेज नजरेखाली वासिली झायत्सेव पट्टीचा नेमबाज झाला तेव्हाच. त्यानं आयुष्यातला पहिला लांडगा लोळवला, तेव्हा त्याचं वय फक्‍त पाच वर्षांचं होतं. वासिली आयुष्यभर एक मेंढपाळ म्हणून उरलच्या डोंगरात "हिर्र झिर्र' करत हिंडला असता; पण हातातल्या बंदुकीनं त्याचं आयुष्य बदललं. तो युद्धवीर झाला.
अगदी दुरून पाखरू टिपणारी नजर, कमालीचे स्थिर हात आणि एखाद्या तपस्व्यालाच साधावी, अशी एकाग्रता... हे सगळं त्याला आजोबांनी दिलं होतं. महायुद्धाला तोंड फुटलं तेव्हा तो चांगला तरणाबांड झाला होता. नजर अधिक तेज झाली होती. स्नायू भरले होते.

युद्ध ही गोष्ट वणव्यासारखी आसपासचं सारंच जीवित खाऊन टाकते. तसे गावपाड्यातले तरुण-तरुणी भराभरा सैन्यात स्थानिक जवान म्हणून भरती होत होते. वासिली झायत्सेवनंही तेच केलं. सन 1942 चा हिवाळा नुकताच सुरू झाला होता. हिटलर-मुसोलिनीच्या ऍक्‍सिस फौजा आता स्तालिनग्राडवर हल्ला चढवतील, हा सोव्हिएत-प्रमुख जोसेफ स्तालिन यांचा अंदाज अचूक ठरला. व्होल्गा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे टुमदार शहर. सोव्हिएत मुलुख जिंकत आशियातल्या तेलविहिरींकडं कूच करणाऱ्या नाझी फौजांच्या मार्गात स्तालिनग्राड हा एक मोठा अडथळा होता. स्तालिनग्राडच्या आकाशात लुफ्तवाफ या जर्मन विमानदलातली विमानं घिरट्या घालू लागली. शहराच्या बाजूनं वाहणारी व्होल्गा आणि त्सारित्सा नदीच्या संगमावर जर्मनांनी चखोट नाकेबंदी केलेली. ऍक्‍सिस फौजांनी स्तालिनग्राड घेरलं. बॉम्बचा वर्षाव सुरू झाला. शहर उद्‌ध्वस्त होत गेलं. बाया-बापड्या, म्हातारेकोतारे गाव सोडून निघाले. धडधाकट पुरुषांना लष्कराच्या मदतीसाठी थांबणं भाग पडलं.
लाल सैन्याचा ज्येष्ठ अधिकारी कोमिसार दानिलॉव याला स्तालिनग्राड लढवताना वासिली झायत्सेवच्या नेमबाजीतल्या हुन्नराची कल्पना आली. आजूबाजूला उसळलेल्या आगडोंबात शांत चित्तानं तो बंदूक रोखून एकेक नाझी सैनिक उडवत होता.
* * *

"मी निकिता सर्गेइविच क्रुश्‍चेव...स्तालिनग्राडची सूत्रं घेण्यासाठी आलो आहे. स्तालिनग्राड हे आपल्या बॉसच्या नावाचं शहर आहे. आपलं गंडस्थळ. हे पडलं की राष्ट्र पडणार. तेव्हा आता घाबरून जाऊन पळ काढणं सोडा आणि बंदुका घेऊन त्या नाझींच्या मागं धावा...इथले अधिकारी लेकाचे नेभळटासारखे माघार घ्यायचा सल्ले देताहेत. पळून जाताहेत. त्यांचं काय करायचं? मला हिंमतवान सैनिक हवेत. कसे मिळतील? बोला!'' क्रुश्‍चेवच्या आम्लयुक्‍त बोलण्यानं बैठक स्तब्ध झाली.
""पळपुट्यांना बेदखल करा...त्यांची घरंदारं उद्‌ध्वस्त करा. गोळ्या घाला त्यांना!'' एक अधिकारी म्हणाला.
""ते सगळं करून झालंय!'' क्रुश्‍चेवच्या वाक्‍यानं सगळ्यांच्या मणक्‍यातून एक थंडगार शिरशिरी आली.
""हिंमत देता आली पाहिजे सैनिकांना. आपल्याला हीरो हवा आहे, सर...युद्धनायक. एक नाही अनेक. ज्यांच्या पराक्रमाचे पवाडे गाइले जायला हवेत. ज्याच्या कथा आपण लष्करी वार्तापत्रात प्रसिद्ध करायला हव्यात...'' कोमिसार दानिलोव म्हणाला.
""कुणाला भेटलाय असा पराक्रमी?'' क्रुश्‍चेवनं विचारलं.
""एक आहे माझ्या पाहण्यात,'' दानिलोव म्हणाला.
...इथून पुढं वासिली झायत्सेव हे एक मिथक बनलं.
* * *

वासिलीच्या पराक्रमाचे गोडवे लष्करी वार्तापत्रांतून प्रसिद्ध होऊ लागले होते. स्तालिनग्राडमध्ये त्याचं नाव झालं होतं. तिथंच त्याला भेटली तान्या चेर्नोवा. तान्या लष्करात भरती झाली होती. दानिलोवनं तिला गुप्तचरांच्या ताफ्यात घुसवलं.
शहरांमधल्या पडक्‍या इमारती, उद्‌ध्वस्त चौक, नदीकिनारा...सगळीकडं युद्धकाळाची कळा होती. तश्‍शातही काही नागरिक जीव मुठीत धरून राहत होते. त्यात होती मिसेस फिलिपोव आणि तिचा आठ वर्षांचा छोकरा साशा. नाझी सैनिक कुठं दडले आहेत हे तो छोकरा अचूक येऊन सांगे. पलीकडं जाऊन नाझींना असलीच काही थातुरमातुर माहिती देई, त्यांच्याकडून अन्न मिळवी. एकंदरीत, पोरगं डबल एजंट होतं! वासिली आणि तान्याशी मात्र त्याची गट्टी जमली.
योग्य जागी दडून वासिली धडाधड नाझी डोकी उडवत निघाला होता. रशियन फौजेत इतका खतरनाक नेमबाज कोण उपटला आहे? याचं नाझी अधिकाऱ्यांना कोडं पडलं होतं. दानिलोवचं वार्तापत्र त्यांच्या हाती लागलं आणि बातमी फुटली. वासिली झायत्सेवचा खात्मा केला की स्तालिनग्राडचा प्रतिकार जवळपास संपेल, अशी नाझींची अटकळ होती. त्यांनी जर्मनीतला पट्टीचा नेमबाज मेजर एरविन कोनिग याला स्तालिनग्राडला धाडलं. कोनिगचा नेम हा नाझी फौजांमधला एक अचंब्याचा विषय असे. जर्मनीतल्या लष्करी शाळेत तो नेमबाजीचा प्रशिक्षकच होता.
कोनिगनं आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची वर्दी दिली. रशियन नेमबाजांचे त्यानं धडाधड वेध घेतले. वासिली दरवेळी कसाबसा वाचत होता. कोनिगला एकदा फक्‍त जायबंदी करण्यात त्याला यश मिळालं तेवढंच.
वासिली ज्या लाकडी ओंडक्‍यावर बंदूक ठेवून नेम साधायचा, तो ओंडका पळवून आणून काही सैनिकांनी कोनिगला सांगितलं ः ""वासिली झायत्सेव मेला आहे...''
""शक्‍य नाही. तो मेलेला नाही, कारण मी अजून त्याला मारलेलं नाही!'' कोनिग म्हणाला.
...एका विलक्षण द्वंद्वयुद्धाला प्रारंभ झाला होता.
* * *
वासिली हबकून गेला. कोनिगइतका आपला नेम अचूक नाही, हे त्याला माहीत होतं. त्याला नैराश्‍यानं ग्रासलं. एकीकडं युद्धाचं पारडं फिरलं होतं. विजयी वीर वासिलीला आता दिवाभीतासारखं लपून-छपून वावरावं लागत होतं. लष्कराच्या मदतीनं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेणं जोखमीचं झालं होतं. त्यात झायत्सेव आणि कोनिगमधल्या द्वंद्वानं अवघं महायुद्ध वैयक्‍तिक मामला झाला होता. निदान स्तालिनग्राडपुरता तरी. दुसरीकडं तान्यात जीव गुंतत चाललेला. त्यात भरीस भर म्हणून की काय, कोमिसार दानिलोवचंही तान्यावर मन गेलं होतं. दानिलोवनं तिची दुसरीकडं बदली करून टाकली. झायत्सेवची अवस्था एकाकी झाली. हे भलंतच त्रांगडं होऊन बसलं.
त्यात एक दिवस कोनिगनं लहानग्या साशाला फितवून आपल्याबरोबर नेलं आणि गोळी घातली. त्याचा मृतदेह टांगून ठेवला. जणू त्यानं वासिलीला निर्णायक आव्हान दिलं.
...वासिली जिंकला? की हरला? हे द्वंद्व कसं संपलं? हे पडद्यावर बघणं थरारून टाकणारं आहे.
* * *
स्तालिनग्राडमध्ये, म्हणजेच आताच्या व्होल्गासिटीतल्या लष्करी वस्तुसंग्रहालयात वासिली झायत्सेवची ती नाझींचा कर्दनकाळ बनलेली बंदूक ठेवलेली आहे. झायत्सेवला "ऑर्डर ऑफ लेनिन' हा मानाचा किताबही देण्यात आला होता. विल्यम क्रेग या अमेरिकी लेखकानं लिहून ठेवल्या स्तालिनग्राडच्या समराबद्दलच्या ग्रंथातल्या काही पानांमध्ये वासिली झायत्सेवचा उल्लेख आहे. अर्थात हे पुस्तक म्हणजे कादंबरी नाही. शेकडो माजी सैनिक, स्तालिनग्राडचे नागरिक यांच्या मुलाखती घेऊन त्यांनी ही बखर सिद्ध केली. त्याचं नावही "एनिमी ऍट द गेट्‌स' असंच आहे. त्यातल्या झायत्सेवच्या कहाणीत तान्या चेर्नोवा आणि दानिलोवसोबतचा प्रेमाचा त्रिकोणबिकोण अजिबातच नाही.
शिवाय, वासिली झायत्सेवनं निवृत्तीनंतर स्वत: "नोट्‌स ऑफ अ रशियन स्नायपर' नावाचं एक छोटं आत्मकथन लिहिलं आहे. त्यातही प्रेमबीम काहीही नाही; पण फ्रेंच दिग्दर्शक ज्यॉं जेक अनो यांनी हा मसाला त्यात कोंबला. ज्यूड लॉसारखा तरणाबांड तल्लख अभिनेता त्यांच्याकडं होता. त्यानं वासिलीची भूमिका समरसून केली. दानिलोवच्या रोलमध्ये जोसेफ फिएन्ससारखा कसलेला अभिनेता होता, आणि कसलेला ब्रिटिश अभिनेता बॉब हॉस्किन्सनं निकिता क्रुश्‍चेवची भूमिका केली होती आणि जर्मन मेजर कोनिगची व्यक्‍तिरेखा एड हॅरिसनं जिवंत केली होती. "एनिमी ऍट द गेट्‌स'कडं इतकी तगडी स्टारकास्ट होती, शिवाय पटकथाही बांधीव अशीच; पण केवळ प्रेमाच्या भानगडीत चित्रपट जवळपास फसला. रशियातल्या रेड आर्मीत कामं केलेल्या काही वृद्ध अधिकाऱ्यांनी चित्रपट पाहून चक्‍क नापसंती दर्शवली. अनेक ठिकाणी प्रेक्षक थिएटरातून उठून गेले.
सर्गेइ बोंदारचुक हे रशियन चित्रपटांमधलं एक स्वतंत्र प्रकरण आहे. कमालीचा गाजलेला हा दिग्दर्शक. ल्येव टोलस्टोयच्या "वॉर अँड पीस' कादंबरीचा सहा तासांचा ऑस्करविजेता महाचित्रपट उभा करणारा महाप्रतिभावंत. बोंदारचुकसारख्याच मिखाइल कालातोजोव यांचा "द क्रेन्स आर फ्लाइंग' किंवा अशा अनेक अप्रतिम कलाकृती निर्माण करून सोव्हिएत चित्रकर्त्यांनी जाणकारांचा सलाम मिळवला आहे. त्यांच्या तुलनेत "एनिमी ऍट द गेट्‌स'नं आपला शिक्‍का नाही उमटवला. तरीही त्यातल्या चित्रकथेनं आणि स्तालिनग्राडच्या रणांगणामुळं चित्रपट दीर्घकाळ मनात रेंगाळतो.

...ज्याच्या सन्मानार्थ गावाचं नाव बदलण्यात आलं, त्याच स्तालिनचं नामोनिशाण पुढं राहिलं नाही. स्तालिनवादाचं उच्चाटन साठी-सत्तरीच्या दशकातच व्हायला लागलं होतं. त्यांचे पुतळे खाली खेचण्यात आले. सरकारी नोंदी हटवण्यात आल्या. पुढं तर स्तालिनग्राडचं नावही बदलून व्होल्गाग्राड करण्यात आलं. "एनिमी ऍट द गेट्‌स'मध्ये नावापुरता स्तालिन उरला आहे.

हे एक द्वंद्वच. चित्रपटाबाहेरचं आणि आता इतिहासजमा झालेलं. स्तालिन नावाचा सत्ताधीश आणि काळामधलं...खरंच, काळासारखा सूडकरी दुसरा नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com