शब्देविण संवादु.... (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 24 जून 2018

"स्टोरी ऑफ युवर लाइफ' या विज्ञानकथेनं संशोधक, रसिक सगळेच चक्रावले. कारण, इतकी वर्षं स्टार वॉर्स आणि एलियन्सशी काल्पनिक झट्या-झोंब्या घेणाऱ्या विज्ञानकथेनं नकळत इथं वेगळीच पातळी गाठली होती. भाषाशास्त्र इथं केंद्रस्थानी होतं. विषय गुंतागुंतीचा वाटला ना? तसा तो आहेच. या विज्ञानकथेवरून निर्माण करण्यात आलेला "अरायव्हल' हा चित्रपट हे कथासूत्र आणि "चित्रभाषा' हा विषय इतका सोप्पा करून मांडतो की थक्‍क व्हायला होतं. हा चित्रपट सुजाण रसिकांनी किमान दोनदा पाहावा, असा आहे.

"स्टोरी ऑफ युवर लाइफ' या विज्ञानकथेनं संशोधक, रसिक सगळेच चक्रावले. कारण, इतकी वर्षं स्टार वॉर्स आणि एलियन्सशी काल्पनिक झट्या-झोंब्या घेणाऱ्या विज्ञानकथेनं नकळत इथं वेगळीच पातळी गाठली होती. भाषाशास्त्र इथं केंद्रस्थानी होतं. विषय गुंतागुंतीचा वाटला ना? तसा तो आहेच. या विज्ञानकथेवरून निर्माण करण्यात आलेला "अरायव्हल' हा चित्रपट हे कथासूत्र आणि "चित्रभाषा' हा विषय इतका सोप्पा करून मांडतो की थक्‍क व्हायला होतं. हा चित्रपट सुजाण रसिकांनी किमान दोनदा पाहावा, असा आहे.

The distinction between the past, present and future is only a stubbornly persistent illusion.- Albert Einstein (1879-1955)

विख्यात शास्त्रज्ञ आल्बर्ट आइन्स्टाइन यांचं 18 एप्रिल 1955 रोजी देहावसान झालं. मृत्यूपूर्वी महिनाभर आधी त्यांचे जीवलग मित्र मायकेल बेस्सो हे निवर्तले होते. त्यांच्या कुटुंबीयांना लिहिलेल्या सांत्वनपर पत्रात हा प्रतिभावान वैज्ञानिक म्हणाला होता : ""या विचित्र जगातून तो माझ्या जरासा आधी निघून गेला आहे. खरं तर त्याला काही अर्थ नाही. भौतिकावर विश्‍वास ठेवणाऱ्या आमच्यासारख्या सिद्धान्तवाद्यांना ठाऊक असतं की भूत, वर्तमान आणि भविष्य यांच्यामधला फरक म्हणजे फक्‍त एक सातत्यपूर्ण भ्रम आहे...''

सिएटलला राहणाऱ्या चियांग फेन-नान नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या वाचनात आइन्स्टाइन यांचं हे वाक्‍य आलं आणि त्याचं मन आंतर्बाह्य ढवळून निघालं. चियांग फेन-नान हा चिनी वंशाचा असला तरी शुद्ध अमेरिकी होता. टेड चियांग या आपल्या अमेरिकी नावानिशी संगणकशास्त्रात या तरुणानं उत्तम कारकीर्द उभी केली होती; पण त्याच्या आवडत्या संगणकीय भाषेत प्रोग्रॅम वगैरे लिहीत बसण्याऐवजी त्यानं इंग्लिशमध्ये वैज्ञानिक गोष्टी लिहायला घेतल्या. टेड आता पन्नाशीचा आहे. सन 1998 मध्ये ऐन तिशीत असताना याच टेडनं आइन्स्टाइन यांच्या वचनापासून प्रेरणा घेऊन एक विज्ञानकथा लिहिली. तिचं शीर्षक होतं ः "स्टोरी ऑफ युवर लाइफ'. या विज्ञानकथेनं संशोधक, रसिक सगळेच चक्रावले. कारण, इतकी वर्षं स्टार वॉर्स आणि एलियन्सशी काल्पनिक झट्या-झोंब्या घेणाऱ्या विज्ञानकथेनं नकळत इथं वेगळीच पातळी गाठली होती. भाषाशास्त्र इथं केंद्रस्थानी होतं.

एलियन्सची, परग्रहवासीयांची भाषा कोणती असेल, हा प्रश्न विज्ञानकथालेखकांना नेहमीच छळत किंवा लुभावत आला आहे. अगदी आर्थर सी. क्‍लार्क किंवा आयझॅक असिमॉवपासून थेट स्टीव्हन हॉकिंगपर्यंत अनेक विज्ञानलेखकांनी माणूस आणि एलियन्स यांच्यातल्या भविष्यातल्या संवादाच्या माध्यमांचा, काल्पनिक का होईना, विचार केला आहे. टेड चियांगनं त्याच्या कथेत दर्शवलेला पर्याय अवकाशसंशोधनातल्या सिद्धान्तवाद्यांना तितका नवा नव्हता; पण त्याचं थेट कथारूप दिसल्यानं लोक चक्रावले. गुंतागुंतीचा विषय सुसह्य करण्यात त्यानं बऱ्यापैकी यश मिळवलं होतं.
या कथेवर आधारित एक अप्रतिम चित्रपट सन 2016 मध्ये येऊन गेला. नाव होतं ः अरायव्हल.
हा चित्रपट बघितल्यानंतर भाषेबद्दलच्या आपल्या संकल्पनाच हादरतात. रोटीची भाषा, मातीची भाषा, आईची भाषा, देशाची भाषा, खाणाखुणांची भाषा अशा अनेक वर्गवाऱ्या आपण आपापल्या सोईनं पाडत असतो; पण भाषा ही त्यापलीकडं जाणारी गोष्ट आहे. तिला दरवेळी शब्दांचीच गरज भासते असं नाही.

भाषा हे संवादाचं माध्यम. हे माध्यम एकरेषीय आहे. माणसाच्या जीविताचा हात धरून सोबतच ही भाषा चालत असते. तिलाही काळाचं भान ठेवावं लागतं, मर्यादा मान्य कराव्या लागतात. हीच एका रेषेवर चालणारी भाषा वर्तुळाकृती झाली तर? भूत, वर्तमान आणि भविष्य तिच्या आवाक्‍यात येईल? तसं झालं तर अस्तित्वाच्या तीन मिती आणि एका ग्रहापुरती ती मर्यादित राहण्याचं काही कारणच नाही...
टेड चियांगच्या लघुकथेवर आधारित असलेल्या "अरायव्हल"नं प्रज्ञावंतांना चक्‍क कामाला लावलं. लिंग्विस्टिक्‍स किंवा भाषाविज्ञान या शाखेतल्या ज्ञानवंतांना अचानक भाव आला. जगभर चर्चा-परिसंवाद घडले. भाषा म्हणजे काय? भाषेचा व्यवहार, प्रयोजन आणि मर्यादा यांचा ऊहापोह सुरू झाला. "भाषा ही प्राय: बोली आहे' हे खरं आहे का? किंवा लिपी ही फक्‍त बोलीभाषा लिखित पद्धतीनं मांडण्याची पद्धती तेवढी आहे, हेही खरं आहे का? भाषा फक्‍त संवादासाठीच जन्माला आली की तिचं प्रयोजन आणखी काही वेगळं आहे? जे बोलायचं, तेच लिहीतही बसायचं हा वेळेचा अपव्यय नाही का? असे कितीतरी मूलभूत प्रश्‍न उभे झाले. त्यांची उत्तरं शोधताना, अवकाश संशोधनाकडंही नव्यानं बघण्याचा आणखी एक दृष्टिकोन शास्त्रज्ञांना मिळाला.
विषय गुंतागुंतीचा वाटला ना? तसा तो आहेच; पण "अरायव्हल'मधलं कथासूत्र आणि "चित्रभाषा' हा विषय इतका सोप्पा करून मांडते की थक्‍क व्हायला होतं. हा चित्रपट सुजाण रसिकांनी किमान दोनदा पाहावा, असा आहे.
* * *

भाषाविज्ञानाच्या वर्गात डॉ. लुईस बॅंक्‍स शिकवतेय. समोर जेमतेम दहा-बारा विद्यार्थी आहेत. इतक्‍यात एका विद्यार्थ्याचा फोन वाजतो. ""मॅम, टीव्ही लावा जरा'' तो विद्यार्थी सांगतो. भिंतीवरचा फळा सरकून तिथला टीव्ही सुरू होतो.
जगभरात बारा ठिकाणी परग्रहवासीयांची महाकाय यानं उतरली असून हाहाकार माजला आहे. जपानमध्ये होक्‍कायडोजवळ, भारतीय उपसागरात, सिएरा लिऑन, सुदान, ग्रीनलॅंडमध्ये, व्हेनेझुएला, शांघाय, सायबेरिया, यूकेमध्ये डेव्हनशर, रशियातल्या काळ्या समुद्रात, पाकिस्तानात आणि अमेरिकेत - मोंटानानजीक उतरलेल्या या तबकड्यांनी पृथ्वीगोल का घेरला असेल? ते का आले आहेत? कोण आहेत? अजून तरी याची उत्तरं मिळालेली नाहीत. अनेक देशांच्या फौजा मात्र "ऍलर्ट'वर आल्या आहेत. या अवकाशयानांमधून कुठलीही हालचाल होत नाहीए. कुठलाही संवाद साधला जात नाहीए; किंबहुना ही यानं जीवरहीत आहेत की कुणी त्यांच्या आत आहे, हेही कुणाला ठाऊक नाहीए. साहजिकच एलियन्सचं स्वागत करणं तर दूरच, कुठल्याही क्षणी भयानक नरसंहार होईल, अशी भीती मात्र सर्वदूर पसरली आहे. लोक शहरं रिकामी करू लागली आहेत...
* * *

दूरवर सायरन वाजत होता. डॉ. बॅंक्‍सनं वर्ग सोडून दिला. ती घरी जायला निघाली. नुकताच पाऊस पडून गेला असावा. ढगाळ हवेमुळं वातावरण राखाडी रंगाचं झालं होतं.
डॉ. बॅंक्‍स एकटीच राहते. गावाबाहेर तिचं प्रशस्त घर आहे. निसर्गरम्य परिसरातलं. तिच्या अभ्यासिकेत नोआम चॉम्स्कीचं पुस्तक दिसेल असं ठेवलंय. भाषाशास्त्रात डॉ. बॅंक्‍स हे एक मातब्बर नाव आहे, हे कळून येतंय. रात्री उशिरा घराबाहेरच्या पटांगणावर एक हेलिकॉप्टर उतरलं. लष्कराची काही माणसं ताडताड चालत घराशी आली.
""डॉ. बॅंक्‍स?'' मिटमिट्या, एका डोळ्याच्या वयस्क लष्करी अधिकाऱ्यानं घरात शिरत विचारलं. खुर्चीत बसकण मारून त्यानं थेट विषयाला हात घातला. "" मी कर्नल वेबर, मोंटानाजवळ एका पठारावर परग्रहवासीयांचं यान उतरलं आहे. अजून काहीही संपर्क झालेला नाही. काही चित्राकृतींसारखे संदेश मिळताहेत. त्याचा अर्थ उलगडत नाहीए...भाषेसंबंधी काही शंका होत्या म्हणून आलो होतो...'' लष्करातल्या अधिकाऱ्यांना आधीच नागरी सेवेतल्या लोकांची मदत घेणं थोडं कमीपणाचं वाटतं. ती आढ्यता कर्नलसाहेबांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
"" दर अठरा तासांनी त्या यानाचं दार उघडलं जातं. आमची टीम जाऊन आली. सगळं रिकामं आहे. संपर्क करायचा तर कुणाशी हेही कळत नाही. आपण आलात तर बरं होईल...'' कर्नल वेबरनं अखेर विनंती केली.
...हेलिकॉप्टर उडालं, तेव्हा कर्नल वेबरनं अनेक तज्ज्ञांची टीम जमवलेली दिसली. कुणी रसायनशास्त्रज्ञ होता, तर कुणी जीवशास्त्रज्ञ. असल्या संकटकाळात भाषाशास्त्रज्ञ काय करणार, हा प्रश्‍न सगळ्यांच्या डोक्‍यात आलाच. डॉ. बॅंक्‍सच्या शेजारी डॉ. इयन कॉनोली नावाचा एक सिद्धान्तवादी भौतिकशास्त्रज्ञ बसला होता. भाषातज्ज्ञ इथं काय दिवे लावणार, असं त्याचंही मत आहे. डॉ. बॅंक्‍स शांतपणे बसून राहिली.
* * *

-मोंटानाच्या टेकाडावर महाकाय यान उभं होतं. लांबून अंडाकृती दिसत होतं; पण जरा जवळ गेल्यावर दिसलं की ती एक विशालकाय तबकडी आहे. काळ्या रंगाची बशी उभी धरल्यासारखी दिसते आहे. काळं कुळकुळीत आणि गुळगुळीत पृष्ठभागाचं ते निमुळतं यान जमिनीला धड टेकलेलंही नव्हतं. एकही खिडकी नव्हती. लुकलुकणारे दिवे नव्हते. अस्तित्वाचा मागमूसही नव्हता. छाती दडपावी, असा त्याचा आकार होता.
अमेरिकी लष्करानं तिथं जणू एक तात्पुरता तळच उभारून सैन्याची जमवाजमव केली होती. क्षेपणास्त्रं रोखून धरली होती. जागोजाग तंबू पडले होते. सरहद्दीवर असावी तशी गडबड उडाली होती.
...संपूर्ण निर्जंतुक आणि ऑक्‍सिजनच्या पुरवठ्यानं युक्‍त असा अत्याधुनिक पोशाख डॉ. बॅंक्‍स आणि डॉ. कॉनोली यांना चढवण्यात आला. जिवंत पक्षी असलेला एक पिंजरा सोबत दिला गेला.
ठरल्या वेळेला यानाचं दार उघडलं. दोघंही आत गेले. यानाच्या उभ्या भिंतींवर सहज जमिनीवर चालावं तसं चालता येतंय. याचा अर्थ यानात गुरुत्वाकर्षण नियंत्रित केलं जातंय. इथं गुरुत्व "उभं' नसून "आडवं' आहे तर...डॉ. कॉनोलीनं नोंद घेतली.
पांढराशुभ्र उजळ पडदा समोर दिसत होता. डॉ. बॅंक्‍सनं पुठ्ठ्यावर "माणूस', "हॅल्लो' असे काही शब्द लिहिले. ती उभी राहिली.
हालचालींची मंद सळसळ पडद्यामागं झाली. व्हेल माशानं दीर्घ नि:श्‍वास सोडावा, तसा आवाज झाला. पडद्यामागचं पांढरं धुकं आणखी उजळ झालं. एक विचित्र आकाराच्या प्राण्याचं ओझरतं दर्शन झालं. डॉ. लुईस बॅंक्‍स थरारली. याला किती पाय असावेत? सात? की आठ?
पुढं अचानक सारं विझून गेलं.
* * *

आपल्याकडं वेळ नाही; पण पुन्हा प्रयत्न करावा लागेल, असं लष्कराकडून सांगण्यात आलं. डॉ. बॅंक्‍स आणि डॉ. कॉनोलीचं आता जरा बरं जमायला लागलं होतं. पहिल्याच भेटीत त्या सप्तपाद परग्रहवासी प्राण्यांनी पांढऱ्याशुभ्र पडद्यावर शाईनं एक वर्तुळ काढलं होतं. त्याचा अर्थ लावण्याचं काम सुरू झालं. नॉन लिनिअर ऑर्थोग्राफीबद्दल डॉ. बॅंक्‍सला माहिती होती. ऑर्थोग्राफी म्हणजे शब्दांच्या जडणघडणीचा आणि शुद्धतेचा विचार करून शब्दाचं अचूक "स्पेलिंग' ठरवणारी शुद्धलेखनपद्धती. डॉ. बॅंक्‍ससमोर उमटलेली आकृती ही अक्षरसदृश नव्हती. एक वर्तुळ आणि त्याच्या परिघावर शाई फुटावी तसा ठळक प्रस्फुटित बिंदू...काय असेल या संकेताचा अर्थ?
पुढच्या फेरीत डॉ. बॅंक्‍सनं माणूस, लुईस, इयन असले शब्द दाखवून आपली भाषा त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बदल्यात तिला छोट्या छोट्या वर्तुळाकार चिन्हांचा प्रतिसाद मिळाला. डॉ. बॅंक्‍सनं आपलं ऑक्‍सिजनयुक्‍त हेल्मेट काढून हाताचा पंजा त्या पडद्यावर ठेवला. त्या सप्तपादानंही तेच केलं.
डॉ. कॉनोलीनं त्या दोघा सप्तपादांना नाव ठेवलं ः ऍबट आणि कॉस्टिलो.
एलियन्सचे हे संदेश इतर देशांमधल्या "तळां'वर पाठवले जात होते. शांघायमध्ये जनरल शॅंग जातीनं सारी देखरेख करत होते.
...यानंतर डॉ. बॅंक्‍सनं वेगानं संपर्क वाढवला. पांढऱ्याशुभ्र पडद्यावर पंजा टेकवून डॉ. बॅंक्‍स ही ऍबट आणि कॉस्टिलो यांच्याशी सदिच्छांची देवाण-घेवाण करायची. पडद्यापलीकडून ते प्राणीही आपले लांबलचक हात (की पाय?) पडद्याला टेकवायचे.
अशाच एका संपर्कात डॉ. बॅंक्‍सला तो दृष्टान्त झाला...
...ही तान्ही मुलगी माझीच आहे...तिचं नाव हॅना..एच-ए-एन-एन-ए-एच...उलटं केलं तरी तेच स्पेलिंग. याला पॅलिंड्रोम म्हणायचं. या विलोमनामाशी आपलं घट्ट नातं आहे. रांगणारी हॅना...बागेत खेळणारी, खिदळणारी हॅना...कागदावर मम्मा आणि डॅडीचं चित्र काढणारी हॅना...
...डॉ. बॅंक्‍स क्षणात भानावर आली.
""तुम्ही इथं का आलाय?'' तिनं विचारलं. पडद्याआड एक शांतता पसरली. पुन्हा तो उच्छ्वासाचा आवाज. एक नर्म गुरगुराट. पडद्यावर वर्तुळाकार चिन्ह उमटलं...त्याचा अर्थ "शस्त्र' असा होतो...यूज वेपन...शस्त्र वापरा...कॉस्टिलो सांगत होता...डॉ. बॅंक्‍स थरारली.
* * *

हाच संदेश अन्य देशांमध्ये थडकल्यावर सगळ्यांचं धाबं दणाणलं. चीनच्या जनरल शॅंगनं तर त्याचा अर्थ सरळसरळ धमकी असल्यासारखा घेतला. शांघायमधलं वातावरण घटकाभरात युद्धमान झालं.
"चोवीस तासांत पृथ्वी सोडून जा, अन्यथा हल्ला करू,' असा संदेश त्यानं धाडला.
डॉ. बॅंक्‍सला मात्र काहीतरी गडबड वाटत होती. कर्नल वेबरला तिनं समजावण्याचा प्रयत्न केला. डॉ. कॉनोलीलाही तिनं केलेली उकल मान्य होती. "यूज वेपन'चा अर्थ "शस्त्र वापरा' असा होत नाही, तर त्यांना "वेपन' हा शब्द "अवजार' याअर्थी वापरायचा आहे, याची तिला खात्री पटली होती.
भाषा हेच ते अवजार होतं. कोट्यवधी मैल लांब प्रवास करून आलेली ही मंडळी नेमकं काय सांगताहेत हे तिला भराभरा उलगडायला लागलं. तिला जे कळलं ते अद्भुत होतं...
* * *

ऍबट आणि कॉस्टिलो यांच्याशी दीर्घ बोलण्यासाठी डॉ. बॅंक्‍स आणि कॉनोली दोघंही त्या यानाच्या अंतर्भागात पोचले, तेव्हाच काही अमेरिकी सैनिकांनी त्या यानात शक्‍तिशाली बॉम्ब पेरला. कसल्या तरी घाईत असलेल्या ऍबटनं अचानक छोट्या छोट्या संकेतवर्तुळांची बरसात केली आणि दोघांनाही यानातून बाहेर ढकललं.
दोघंही शुद्धीवर आले तेव्हा यान आवाक्‍याच्या बाहेर निघून गेलं होतं...
तळावरच्या गडबडीतच पुन्हा डॉ. बॅंक्‍सनं यानाकडं धाव घेतली. कॉस्टिलोची पुन्हा भेट घेऊन त्याची माफी मागितली. बॉम्बच्या स्फोटात ऍबट मरणोन्मुख झाला आहे, अशी बातमी कॉस्टिलोनं दिली. त्याच वेळी आपली भाषा डॉ. बॅंक्‍सला शिकवूनही टाकली. तो म्हणाला...

""आणखी तीन हजार वर्षांनी आम्हाला कदाचित मानवाच्या मदतीची गरज भासेल, म्हणून आम्ही आत्ता आलो आहोत. कुठल्याही युद्धात भाषा हे पहिलं अस्त्र वापरलं जातं. त्यानंतर बंदुका वगैरे. आम्ही निर्मिलेली भाषा ही लिपीबद्ध नाही. ती कालबद्धही नाही; किंबहुना काळाचा संपूर्ण आवाका आमच्या भाषेला असल्यानं "कारण', "हेतू' आणि "साफल्य' या संकल्पनाच आमच्यासाठी निरर्थक आहेत. भूत, वर्तमान आणि भविष्य असे काळाचे तुकडे आमच्या भाषेला करता येत नाहीत...ही भाषा शिकून घ्या...''

कॉस्टिलोचं विवेचन डॉ. बॅंक्‍सच्या प्रज्ञेचा परीघ विस्तारून गेलं.
पृथ्वीवासीयांनी एकत्र येऊन आपली ही दिव्यभाषेची भेट स्वीकारावी, असं एलियन्सना वाटत होतं, म्हणून बारा प्रांतांत त्यांनी बारा यानं उतरवून बारा तुकड्यांत आपला संदेश दिला होता. दुर्दैवानं प्रत्येक देशानं आपापल्या तुकड्याचा सोईस्कर अर्थ लावून युद्धाची तयारी केली होती.
युद्ध टाळण्यासाठी अखेर डॉ. बॅंक्‍सनं धावाधाव केली. चीनच्या जनरलशी थेट संपर्क साधून संभाव्य रक्‍तपात टाळला.
* * *

पुढं काय घडलं? ते पडद्यावर पाहणं हा एक दिव्य अनुभव आहे. स्पेसवॉर आणि भाषांतराच्या धामधुमीत घटना घडत असतानाच आपण हलकेच एका क्‍लिष्ट, गुंतागुंतीच्या भावकथनात गुंतत जातो. ते भावकथन बघताना इतका वेळ आपण "फ्लॅश बॅक' नव्हे, तर फ्लॅश फॉर्वर्ड पाहत होतो, हा साक्षात्कार प्रेक्षकाला थक्‍क करून जातो. ही किमया दिग्दर्शक डेनिस विलेनेव यांची. त्यांनी चित्रपटाची मांडणी हेतुपुरस्सर एकरेषीय केलेली नाही. ती विलोमपद्धतीनंच बघावी लागते. चित्रपटात वापरलेलं संगीतसुद्धा याच धाटणीचं आहे. डॉ. लुईस बॅंक्‍सच्या भूमिकेत ऍमी ऍडम्स फिट्‌ट बसलेली आहे, तर डॉ. इयन कॉनोलीची महत्त्वाची भूमिका जेरेमी रेनर या बड्या सिताऱ्यानं केली आहे. या चित्रपटाचा खरा हीरो आहे तो पटकथालेखक एरिक हायसरर! इतकी अफलातून विज्ञाननिष्ठ पटकथा फार क्‍वचित बघायला मिळते. टेड चियांगच्या लघुकथेत एरिक यांनी भरपूर बदल केले आहेत, हे खरं आहे; पण त्याला आक्षेप घेणं खुद्द मूळ लेखक टेड चियांगलाही जड जावं. सन 2016 मध्ये आलेल्या या चित्रपटाला तब्बल आठ ऑस्कर नामांकनं होती. त्यातलं सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलनाचं ऑस्कर तेवढं त्याला मिळालं; पण दिग्दर्शक डेव्हिड विलेनेव यांना शास्त्रज्ञांनी जाहीर दाद दिली, हे त्यांचं सर्वात मोठं पारितोषिक मानलं पाहिजे. चित्रपटाच्या पडद्याचं त्यांनी खऱ्या अर्थानं चीज केलं.

चित्रपट संपता संपता लक्षात येतं की आपण भाषा भाषा जिला म्हणतो ती भाषा नाहीच. तो निव्वळ परस्परसंवादाचा एक मर्यादित मार्ग आहे. भाषेचं प्रयोजन काहीतरी वेगळं असावं. ते आपल्या ज्ञानेश्वरमाउलीला जाणवलं असणार. "शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु' ज्याला साधता येत होता, त्या परमतत्त्वाशी माउलीची मानसी बोलत राहिली.
...भाषा ही बोलण्या-लिहिण्या-ऐकण्या-वाचण्यापलीकडली गोष्ट आहे...म्हणजे असावी. आपल्याला दिसतं ते तिचं निव्वळ शब्दरूप.

Web Title: pravin tokekar write article in saptarang