आतंकाच्या अंत:करणी... (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar
pravin tokekar

लेबनॉनची राजधानी बैरुटमधला भयानक रक्‍तपात "हंड्रेड डेज्‌ सिव्हिल वॉर' म्हणून इतिहासात ओळखला जातो. या यादवीत जवळपास सव्वा लाख लोक बळी पडले. कित्येक निर्वासित झाले, त्यांचे अवशेष आजही दिसतात ते शहरातल्या वस्त्यांमध्ये आणि रहिवाशांच्या मनातही.
याच पार्श्‍वभूमीवरएक चित्रपट येऊन गेला. नाव होतं "बैरुट'. आतंकाच्या अंत:करणात बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. न कळणाऱ्या अशा घटनांमुळंही आपली सरहद्द शाबूत राहते, सिनेमे मुक्‍तपणे बघायला आपण मोकळे जगत राहतो हे कळू लागतं. जगण्याचं भान आणखी प्रखर होतं.

आताशा बैरुट पर्यटकांनी बरंच गजबजलेलं असतं. भूमध्य समुद्रावरल्या या शानदार शहरातली सात आश्‍चर्य टूरिस्टांचे जथे ओढत असतात. तिथले खडकाळ, रुपेरी समुद्रकिनारे बोलावत असतात. एका बाजूला अल्‌ अश्रफीचे डोंगर, दुसऱ्या कुशीत अल्‌ मुसेतिबाची पर्वतराजी. या दोघा दांडगटांमध्ये वसलेली ही लेबनॉनची राजधानी स्वभावत:च अठरापगड आहे. पाच हजार वर्षांचा इतिहास तिच्यात सामावलेला आहे; पण मधल्या काळात तिला ग्रहण लागलं होतं. पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत इथं फक्‍त दहशतवादाची रक्‍तरंजित पावलं उमटत होती. भर रस्त्यात मुडदे पडत होते आणि इमारतीच्या इमारती बॉम्बस्फोटांनी ढासळत होत्या. जीव मुठीत धरून रहिवासी जगत होते. आसमंतात निव्वळ धुरोळा, स्मशानवत्‌ शांतता आणि अधूनमधून फिरणाऱ्या दहशतवाद्यांच्या बंदुका...हे शहर उद्‌ध्वस्ताच्या अगदी किनाऱ्यावर होतं. याला कारणीभूत होती तिथली यादवी. शेजारच्या सीरियाचं सैन्य, यासर अराफत यांच्या पॅलेस्टाइन मुक्‍ती संघटनेचा (पीएलओ) वावर, अधूनमधून हल्ले करणाऱ्या इस्राईलच्या पलटणी आणि अन्य डझनावारी मुस्लिम दहशतवादी संघटनांचं इथं मुक्‍त थैमान होतं. हा आत्ता झाला, तो बॉम्बस्फोट नेमका कुणी केला, हेच मुळी समजत नसे.

बैरुटचे सरळसरळ दोन तुकडे झाले होते. पूर्वेला खिश्‍चन वस्ती, तर पश्‍चिमेला सीरियन फौजांच्या गराड्यातला मुस्लिम रहिवाशांचा डेरा. पीएलओची माणसं रस्त्यांवर टोल वसूल करत. तो कुणा दुसऱ्याच्याच खिशात जायचा. हे सगळं सुरू झालं 1948 च्या सुमारास. इस्राईलची निर्मिती करण्याचं घाटत होतं, त्या काळात पॅलेस्टिनींचं बळजबरीनं स्थलांतर झालं. लाखो पॅलेस्टिनी जॉर्डनच्या भूमीकडं निघाले. तिथूनही त्यांची हकालपट्टी झाल्यावर निर्वासितांचे लोंढे लेबनॉनकडे वळले. या निर्वासितांबरोबर पीएलओच्या बंदुका आल्या. अरब-इस्राईल रणकंदनात लेबनॉन अक्षरश: भरडला गेला. त्याला कारणंही तशीच होती. ऐन दुसऱ्या महायुद्धात सन 1943 मध्ये या देशाला फ्रेंचांनी स्वातंत्र्य दिलं, तेव्हा झालेल्या अलिखित करारानुसार राष्ट्राध्यक्ष ख्रिस्ती, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम आणि सभापतिपद शिया पंथाकडं जावं, असं ठरलं होतं. या यादवीचे परिणाम लवकरच दिसू लागले.

सत्तरच्या दशकात ही यादवी सर्वंकष युद्धात परावर्तित झाली. सगळा झगडा होता तो अनिर्बंध नियंत्रणासाठी. मग ख्रिस्ती बंडखोर आणि मुस्लिम दहशतवादी संघटना यांच्यात तुंबळ युद्ध पेटलं. इस्राईलचा तिखट अंतर्भाव होताच. शिवाय, मुस्लिमांना बळ देणारं शेजारच्या सीरियाचं सैन्य यात आपोआप ओढलं गेलं. बैरुटचं रूपांतर रणांगणात झालं. तिथं झालेला भयानक रक्‍तपात "हंड्रेड डेज्‌ सिव्हिल वॉर' म्हणून इतिहासात ओळखला जातो. या यादवीत जवळपास सव्वा लाख लोक बळी पडले. कित्येक निर्वासित झाले, त्यांचे अवशेष आजही दिसतात ते शहरातल्या वस्त्यांमध्ये आणि रहिवाशांच्या मनातही.

याच पार्श्‍वभूमीवर गेल्या जानेवारीत एक चित्रपट येऊन गेला. नाव होतं "बैरुट'. दहशतीच्या निर्बुद्ध थैमानातही काही अतर्क्‍य नाट्य घडत असतं. हे घडत असतं गुप्तहेरांच्या अधोविश्‍वात. पडद्यामागं हालचाली करून हे गुप्तहेर आपापली कामं बिनबोभाट करत असल्यानं देशोदेशीचे पुढारी हिरीरीनं परराष्ट्रनीती, शांततेच्या हाका वगैरे उगाळत जगासमोर चमकून घेत असतात. दहशतवादी काही अस्मानातून पडत नाहीत. आपल्यामधूनच निर्माण झालेले असतात. आपल्यातल्याच काही लोकांचे ते नातलग असू शकतात. त्या लाग्याबांध्यांनाही प्रसंगी अचानक आंतरराष्ट्रीय संदर्भ मिळून जातो. हेच सांगणारा हा चित्रपट होता.
एखाद्या देशातला गुप्तहेर पळवला जातो. त्याच्या बदल्यात एका दहशतवाद्याच्या सोडवणुकीची मागणी केली जाते. पुढं काय होतं? त्याचा हा एक वास्तववादी पट आहे. बैरुट, लेबनॉन, सीरिया वगैरे शब्द आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. थोडेफार संदर्भ लावण्याचा प्रयत्नही करतो; पण शेवटी जगाचा हा भाग आपल्याला तसा अनोळखीच राहतो. "बैरुट' हा चित्रपट नकळत आपलं नातं त्या अनोळखी जगाशी जोडतो.
* * *

- मेसन स्काइल्सच्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली असावी. बैरुटच्या अमेरिकी दूतावासातली छानदार नोकरी. लेबनॉनच्या रंगात मिसळून गेला होता गडी. त्याची लेबनीज्‌ बायको नादिया ही त्याचा जीव की प्राण होती. जुन्या बांधणीचं प्रशस्त घर होतं. नोकर-चाकर होते. मूल-बाळ यथावकाश झालंही असतं; पण एका क्षणात सगळं संपलं.
तो 1972 चा सुमार असेल. पॅलेस्टिनी निर्वासितांचे लोंढे लेबनॉनच्या दिशेनं आपोआप ओढले, ढकलले जात होते. करीम हा बारा-तेरा वर्षांचा पॅलेस्टिनी मुलगा नादियाला असाच रस्त्यावर सापडला. अबोल, घाबरलेला. नादियानं त्याला घरी आणलं. खाऊ-पिऊ घातलं. लळा लावला. मेसनलाही ते चलाख पोरगं आवडून गेलं. बिचारा अनाथ आहे. आई-बापाचा पत्ता नाही. जवळचं कुणी नाही...
पण अमेरिकी दूतावासातला एक कोपरा सीआयएच्या एजंटांचा होता. त्यांना हा प्रकार नाही आवडला. वास्तविक, सीआयएचं काम करणारा कॅल रायली हा मेसनचा मित्र होता; पण हा करीम कोण? कुठून आला? त्यानं चौकशा आरंभल्या.
""कमॉन कॅल...बारा वर्षांचं पोरगं आहे ते यार!'' मेसननं त्याला वेड्यात काढलं.
""मला त्याला काही प्रश्‍न विचारू देत!'' कॅलनं हेका सोडला नाही.
""त्याला कुणीही नाहीए जवळचं. नादिया ही त्याची ऑलमोस्ट आई आहे, कॅल!'' मेसन त्याला समजावत होता.
""रामी नावाच्या दहशतवाद्याचा तो भाऊ असावा, म्युनिक ऑलिम्पिकमध्ये इस्रायली खेळाडूंना गोळ्या घालणाऱ्यांमध्ये हा रामी होता, अशी माहिती आहे. मला त्याला विचारू तर दे ना!'' कॅल म्हणाला.
...विचारायची वेळ आली नाही. मेसनच्या घरच्या पार्टीत दहशतवादी अचानक घुसले. गोळ्यांचे आवाज घुमले. नादियाच्या शरीराची चाळण करून दहशतवाद्यांनी करीमला उचललं, गाडीत घालून ते निघूनही गेले. करीमचा भाऊ रामी स्वत: तिथं येऊन गेला होता.
* * *

बैरुटमधला संसार संपला. मेसन एकटाच मायदेशी परतला. न्यू इंग्लंडमध्ये बोस्टनला एका छोट्या फ्लॅटमध्ये राहू लागला. मालक-मजूर तंटे सोडवण्यासाठी मध्यस्थी करणं, कॉर्पोरेट वाटाघाटी तडीला नेणं असली बरा पैसा देणारी दलालीची कामं करत तो जगत राहिला. मजबूत दारू प्यायची...उरलेल्या वेळेत शुद्ध असेल तर काम...अशी दहा वर्षं गेली. मेसन संपल्यात जमा आहे, अशी त्याच्या सहकारी-मित्रांचीही खात्री पटली. त्यांनीही त्याचा नाद सोडून दिला होता.
एक दिवस त्याचा एक जुना क्‍लायंट सली भेटायला आला. अर्थात दारूच्या गुत्त्यात.
""बैरुट विद्यापीठात व्याख्यान द्यायला जाशील का? प्रमुख अतिथी आजारी पडलाय. तू त्याची जागा घे...साडेसहा हजार डॉलर्स आणि विमानाची बिझनेस क्‍लास तिकिटं...आजच निघ!'' सलीनं पाकीट समोर टाकलं.
""हॅ: ...माझ्याकडं पासपोर्टपण नाही...'' मेसननं उडवून लावलं.
""तिकिटाबरोबर आहे तुझा नवा पासपोर्ट... ही अमेरिकी सरकारची विनंती आहे, मेसन...प्लीज!'' एवढं बोलून सली निघून गेला.
इतकं काय अर्जंट असेल? पासपोर्टसकट तिकीट हातात आणून देण्यासारखं? प्रकरण सरळ नाही, हे मेसनला कळून चुकलं होतंच. तरीही तो बैरुटला गेला. त्यानं पाहिलं की, दहा वर्षांत फारसा बदल झालेला नव्हता. नुकत्याच झडून गेलेल्या यादवी युद्धाच्या जखमा अंगावर वागवत बैरुट दहशतीच्या वातावरणात जगत होतं. आल्या आल्या त्याचा ताबा घेत तिथल्या दूतावासातल्या सर्वोच्च अधिकाऱ्यानं सांगून टाकलं : ""कॅल रायलीचं अपहरण झालंय. एका पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेनं वाटाघाटींची मागणी केली आहे...कोण आहेत ते काहीही कळत नाहीए...''
""ओह...फार वाईट झालं...पण त्यात मी काय करू शकणार?'' मेसननं विचारलं.
""वाटाघाटी मेसन स्काइल्सनंच केल्या पाहिजेत, अशी त्या दहशतवाद्यांची पहिली अट आहे...'' अधिकाऱ्याच्या उद्‌गारांनी मेसनची विमानात घेतलेली उरलीसुरली दारू खाडकन उतरली. कॅल रायलीला खूप गुपितं माहीत असल्यानं पडेल त्या किमतीत त्याला सोडवणं सीआयएसाठी गरजेचं होतं. मेसनच्या सुरक्षिततेसाठी सॅंडी क्राऊडर नावाची एक एजंट देण्यात आली. वाटाघाटींसाठी सीआयएचं शिष्टमंडळ विशिष्ट ठिकाणी पोचलं. पडक्‍या इमारती, बंदूकधारी बंडखोरांना पार करत एका गल्लीतल्या अंधाऱ्या घरात ही भेट झाली.

""कॅल रायलीला सोडण्याचे किती पैसे घेणार?'' मेसननं थेट धंदेवाईक सवाल केला.
"" *** ...आम्ही काय इथं आइस्फ्रूट विकतोय? किती पैसे घेणार म्हणे! लेको, तुमच्यामुळं आम्ही आमच्या आया-बहिणी गमावल्या आहेत...पैसे देतोय स्साला!'' दहशतवाद्यांचा म्होरक्‍या भडकला. बंदुका ताणल्या गेल्या. तेवढ्यात एका गोळीनं त्या म्होरक्‍याच्या मेंदूचाच वेध घेतला. त्याच्याच सहकाऱ्यानं त्याला उडवलं होतं. डोक्‍याभोवतालचा गमछा सोडवत तो तरुण मारेकरी पाठीमागं उभा होता.
""माझ्या मित्राचं डोकं फिरलं होतं...जुना माणूस होता तो. अमेरिकनांशी कसं बोलायचं ते त्याला माहीत नव्हतं...माझ्याशी बोला मिस्टर मेसन...'' तो दहशतवादी सावकाश म्हणाला. थोडं झुकून पुढं म्हणाला ः ""मला ओळखलंत, सर?...मी करीम!''
* * *

अंतर्बाह्य दहशतवादी झालेला करीम फारसं काही बोलला नाही. "माझा मोठा भाऊ रामी याला सोडा, आम्ही कॅलली याला सोडू, पैशाची बात काढू नका,' असं त्यानं स्पष्टपणे सांगितलं.
"" व्हॉट? रामी? पण तो सीआयएच्या ताब्यात नाही...'' मेसन म्हणाला.
""नसेल...पण आम्हाला तो परत हवाय. नाहीतर कॅल रायलीला गोळ्या घालू...'' करीम म्हणाला. बैठक संपली. हा भलताच तिढा पडला होता. पॅलेस्टिनी दहशतवादी रामी इस्राईलच्या ताब्यात असणार, हे सांगायला कुण्या भविष्यवाल्याची गरज नव्हती. वरच्या पातळीवरून हालचाली झाल्या. "मोसाद'शी संधान बांधण्यात आलं. इस्रायलींनी साफ हात झटकले. "रामी नावाचा कुणी दहशतवादी आमच्या ताब्यात नाही आणि असलाच तरी असल्या लोकांना जिवंत ठेवण्याचं आमचं धोरणच नाही,' असं त्यांनी साफ सांगून टाकलं.
मेसनच्या हातात काही तासच होते. तेवढ्या वेळात त्यानं रामीला जिवंत आणून उभं केलं तरच कॅल रायली सुटू शकणार होता. शेवटी मेसननं कसंबसं पुन्हा करीमला गाठून "कॅल रायली जिवंत असल्याचा पुरावा आधी दे' असा आग्रह धरला. तशी भेट झाली. गावाबाहेर एका अंधाऱ्या खोलीत कॅल रायलीला बांधून ठेवण्यात आलं होतं. करीमनं मेसनला तिकडं नेलं.
""ऍलिस कशी आहे?'' कॅलनं मेसनला विचारलं. ऍलिस ही कॅल रायलीची बायको होती. एकेकाळी कॅल आणि मेसनचा घरोबा होता. दोघंही भावनावश झाले.
""ठीक आहे...कालच भेटली होती. तुझी वाट बघतेय. आम्ही त्याच्यासाठीच प्रयत्न करतोय, कॅल! आम्ही म्हणजे डॉन गेन्स, गॅरी रुझाक, शेलान, क्राऊडर...रामी नावाचा त्यांचा म्होरक्‍या त्यांना हवाय...पण माझ्यामते तो जिवंत नाहीए...'' मेसन म्हणाला.
""डॉन गेन्स विकला गेलाय, मेसन...ऍलिसला सांग की तो जिवंत हवा असेल तर...प्रे अँड लव्ह ओन्ली...प्रे लव्ह ओन्ली...'' त्याचं बोलणं पूर्ण होण्याच्या आत मेसनला खेचून बाहेर नेण्यात आलं. "प्रे लव्ह ओन्ली' म्हणजे पीएलओ...रामी पीएलओच्या ताब्यात आहे हे मेसनला थेट रायलीकडूनच कळलं ते असं. रायलीचा परस्पर काटा सीआयएमधल्याच कुणीतरी काढलाय, हेही त्याच्या ध्यानात आलं.
पुढं मेनननं एजंट सॅंडी क्राऊडरच्या साथीनं धाडसी बेत आखला. सीआयएलाही गंडवून त्यानं कॅल रायलीच्या सुटकेची मोहीम हातात घेतली. त्या मोहिमेला यश आलं? कसं? रामी सापडला? करीमचं काय झालं? हे सगळं पडद्यावर बघताना गुंग व्हायला होतं.
* * *

विल्यम फ्रान्सिस बकली या सन 1984 मध्ये हिज्बुल्ला मुजाहिदीनांनी बैरुटमधूनच अपहरण करून नेलेल्या सीआयए एजंटाच्या कहाणीवर हा चित्रपट बेतलेला आहे.
बकली हा मुरब्बी गुप्तहेर होता. अनेक वर्ष व्हिएतनाम, झायरे, इराण अशा देशांमधून काम केल्यानंतर बैरुटमधल्या बंडखोरांच्या संघटनांच्या खबरा काढण्याच्या कामात तो अडकला. त्याच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले गेले; पण काही महिन्यांनी हिज्बुल्ला दहशतवाद्यांनी त्याला मारलं...ही झाली सत्यकथा; पण "बैरुट' चित्रपटाच्या कथेत बरेच बदल आहेत. टोनी गिलरॉय या अत्यंत हुशार थ्रिलर चित्रपटलेखकानं ही नवी कहाणी रचली. गिलरॉय हे नाव हॉलिवूडमध्ये आदरानं घेतलं जातं. मॅट डॅमनची अफलातून भूमिका असलेल्या "बोर्न ट्रिलोजी'च्या मूळ पटकथा त्यांच्याच होत्या. जॉर्ज क्‍लूनीचा "मायकेल क्‍लेटन', ज्युलिया रॉबर्टसचा "डुप्लिसिटी' किंवा "रोग वन : अ स्टार वॉर्स स्टोरी' अशा दणकेबाज चित्रपटांचे लेखक गिलरॉय आहेत. "बैरुट' या चित्रपटाची संहिता त्यांनी दिग्दर्शक ब्रॅड अँडरसनच्या हातात ठेवली, मग "द मशिनिस्ट' सारखा चित्रपट देणाऱ्या अँडरसननं थेट वास्तववादी शैलीत "बैरुट' साकारला. काही वेळा तर चित्रपट पाहतोय की डॉक्‍युमेंट्री हेसुद्धा लक्षात येत नाही! मेसन स्काइल्सच्या भूमिकेसाठी त्यांनी अमेरिकेचा "आँख का तारा' ठरलेल्या जॉन हॅमला निवडलं. जॉन हॅम हा अमेरिकेत टीव्ही-मालिकेचा सुपरस्टार होता. त्याची "मॅड मेन' ही मालिका जवळपास आठ वर्षं धमाल करत होती. सीआयए एजंट सॅंडी क्राऊडरसाठी रोझामुंड पाइकची निवड झाली. सगळं शूटिंग पार पडलं ते मोरोक्‍कोमध्ये.

तगडी स्टारकास्ट, उत्तम निर्माते असूनही पिक्‍चर चाललं नाही. "दाढीवाले टेररिस्ट इथून तिथं पळतात...त्यांच्या मागं गोरे धावतात...अरे, आता बास ना! पुरे झाल्या या स्टोऱ्या' अशी टीका चित्रपटावर झाली. "बैरुट असं नाहीच्चे मुळी', असंही सुनावण्यात आलं. इतरही गंभीर आरोप चित्रपटावर झाले. अर्थात त्याला बव्हंशी कारणीभूत होतं ते लेबनॉनच्या तिढ्याबद्दलचं जनमानसातलं अज्ञान आणि चित्रपटकथेमागच्या सत्यकथेबद्दलची अनभिज्ञता.

गुप्तहेरकथा म्हटलं की आपल्याला त्या विशिष्ट पठडीतल्याच लागतात. त्याला वास्तववादाची जोड दिली की त्या बोअर वाटू लागतात. इतिहास शिकवायला गेलं तर संपलंच...तेच या चित्रपटाचं झालं; पण तरीही एकदा हा चित्रपट बघायला हवा. आतंकाच्या अंत:करणात बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. न कळणाऱ्या अशा काही घटनांमुळंही आपली सरहद्द शाबूत राहते, सिनेमे मुक्‍तपणे बघायला आपण मोकळे जगत राहतो हे कळू लागतं. जगण्याचं भान आणखी प्रखर होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com