सर्पसत्र! (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar
pravin tokekar

सूड तो सूड...त्यातून साधायचं काय, हा वरकरणी भाबडा वाटणारा सवाल विख्यात चित्रकर्मी स्टीव्हन स्पीलबर्गनं 2005 मध्ये एका चित्रपटाद्वारे केला होता. नाव होतं ः म्युनिक. मन विषण्ण करणारा हा चित्रपट कधीही चुकवू नये असाच आहे. सूडभावनेनं एकमेकांत लढणं निरर्थक नाही का? "आय फॉर ऍन आय' या बायबलमधल्या चिरंतन तत्त्वाला काही अंत आहे की नाही? हा सूडाचा झगडा आपल्याला माणूस म्हणून कुठं नेतोय? असे कोंडीत पकडणारे प्रश्‍न स्पीलबर्गनं त्यातून विचारले. जाणत्यांचं विचारी मन आंतर्बाह्य ढवळून काढणारा हा चित्रपट आहे, यात शंका नाही.

"ऐक जनमेजया, सम्राट पंडूचं रक्‍त तुझ्या धमन्यांमधून धावत आहे. साक्षात युगंधराचं विश्‍वरूप स्वनेत्रांनी पाहणाऱ्या धनुर्धर पार्थाची गुणसूत्रं तुझ्यात आहेत. चक्रव्यूहात वीरगती प्राप्त झालेल्या वीर अभिमन्यूचा वारसा तुझ्या पेशीपेशींमध्ये आहे. तुझ्या पित्याचे, परीक्षिताचे सद्गुण तुझ्याठायी अधिष्ठित आहेत. पित्याच्या हत्येचा प्रतिशोध घेण्यासाठी तू हे सर्पसत्र आरंभलंस. या घनघोर यज्ञात तक्षकासह त्रिखंडातल्या सर्वच सर्पजातीची आहुती पडेल, हे तर निश्‍चित. ते पाहा, अफाट, अपरिमित अशा गरगरत्या आवर्ताच्या विवरात लक्षावधी सर्पंचरे यज्ञमुखाकडं कोसळत आहेत; पण या यज्ञाचं फलित काय? तुझ्यातल्या प्रतिशोधाची तीव्रतम भावना किंचित बोथट होईल आणि तुझा अहंकार कुरवाळला जाईल, यापरतें तुला काय मिळेल? तुझ्यातल्या प्रतिशोधाची भावनादेखील सर्पविषाइतकीच घातक आहे, हे तुला माहीत असायला हवं. जनमेजया, सर्प कितीही ठेचला तरी नष्ट होत नसतो. एक मृत्यू पावला की सहा निर्माण होतात. या मर्त्यलोकात विषकुप्यांना तोटा नाही. जनमेजया, सर्पसत्राच्या या अघोर यज्ञाची सांगता कधीही शांतिपाठानं होत नसते...कधीही...कधीही!''
...कोवळ्या आस्तिकाचं आवाहन जनमेजयाच्या हृदयाला विंधून गेलं. त्यानं यज्ञ थांबवला.
(महाभारत, जनमेजयाचं सर्पसत्र)
* * *

सर्प किंवा नाग बारा वर्ष डूख धरतो, अशी एक अंधश्रद्धा आहे. आपल्या नागपंचमीच्या कहाणीतही नांगराच्या फाळानं मृत्युमुखी पडलेल्या नागकुळाच्या आईनं सूडभावनेनं त्या शेतकऱ्याचा निर्वंश करण्यासाठी दंशदान केल्याचा उल्लेख आहेच; पण त्या कथेतही नागपंचमीची पूजा करणाऱ्या लेकीचं सौभाग्य शाबूत ठेवण्याचं शहाणपण ती नागीण दाखवते. इतकंच नव्हे तर, अमृताची कुपी देऊन तिनंच मारलेल्या शेतकऱ्याच्या कुळाला जिवंत करायला लावते...व्रताची कहाणी ती; पण त्यातली नागीणही आपलं देवत्व नाही सोडत. ही कथा श्रावणात एका दिवसापुरती आठवून आपण सोडून देतो; पण केवढा तरी अर्थ या कहाणीत सामावलेला आहे. जानपदी लोककहाणीतला हा आशय वर्तमानातल्या परिस्थितीशी जोडला तर तो अक्षरश: बघता बघता पृथ्वीगोल व्यापतो.

सूडभावना ही सर्पजातीची मक्‍तेदारी नव्हेच. ती आहे दोन पायाच्या माणसाची. व्यक्‍तीपुरतं बोलायचं झाल्यास सूडभावना ही तशी हलकी, हीन...पण राष्ट्रभक्‍तीचा रंग तीत मिसळला की आपापत: त्याची गणना पुण्यात होते. का न व्हावी? जगातल्या सर्व स्वातंत्र्यलढ्यांमधले पराकोटीचे संघर्ष याच रंगात न्हाऊन निघाले आहेत; पण शेवटी सूड तो सूड. त्यातून साधायचं काय, हा वरकरणी भाबडा वाटणारा सवाल विख्यात चित्रकर्मी स्टीव्हन स्पीलबर्गनं 2005 मध्ये एका चित्रपटाद्वारे केला होता. नाव होतं ः म्युनिक. मन विषण्ण करणारा हा चित्रपट कधीही चुकवू नये असाच आहे. हा चित्रपट कुणाला राष्ट्रप्रेमाची नवी ऊर्जा देऊन जातो, "राष्ट्र प्रथम' हा संदेश ठसठशीतपणे देतो; पण त्याचा अंतस्थ सूर खरं तर वेगळाच आहे. सूडभावनेनं एकमेकांत लढणं निरर्थक नाही का? "आय फॉर ऍन आय' या बायबलमधल्या चिरंतन तत्त्वाला काही अंत आहे की नाही? हा सूडाचा झगडा आपल्याला माणूस म्हणून कुठं नेतोय? असे कोंडीत पकडणारे प्रश्‍न स्पीलबर्गनं विचारले. स्पीलबर्गचा सूर तेव्हाही काही जणांना आवडला नव्हता. कदाचित आजही आवडणार नाही. इस्रायलींनी तर "स्पीलबर्गनं डिनोसॉरचे सिनेमे फार तर बनवावेत, असले नकोत!' अशी शेरेबाजी केली. स्पीलबर्गनंही या चित्रपटाचं प्रमोशन, मार्केटिंग अजिबात केलं नाही. "बघायचा तर बघा, नाहीतर राहू द्या' अशा खाक्‍यानं हा चित्रपट त्यानं केला. जाणत्याचं विचारी मन मात्र आंतर्बाह्य ढवळून काढणारा हा चित्रपट आहे, यात शंका नाही.
* * *

आजच्या सारखाच तो 1972 मधला सप्टेंबर महिना होता. पश्‍चिम जर्मनीकडं ऑलिम्पिक सोहळ्याचं यजमानपद होतं. म्युनिक शहरालगत भव्य ऑलिम्पिकनगरी वसवली गेली होती. देशोदेशीचे खेळाडू आले होते. स्पर्धेचा दुसरा आठवडा सुरू होता. सगळं ठीकठाक चाललं होतं; पण त्या ऑलिम्पिकनगरीतल्या 31 क्रमांकाच्या इमारतीत राहणाऱ्या इस्रायली पथकातल्या काहीजणांना मात्र टेन्शन आलं होतं. इथं धड सुरक्षाव्यवस्थाच नव्हती. "आओ-जाओ घर तुम्हारा' अशी अवस्था. त्यांच्या इमारतीलगतच मोठं फाटक होतं. रात्री-अपरात्री नजर चुकवून शहरात मौजमजा करायला गेलेले खेळाडू फाटकावर चढून बिनधास्त ये-जा करत असत. इस्रायली पथकाचे प्रमुख कलकिन यांनी तशी आयोजकांकडं तक्रारही केली होती; पण पुरेशी काळजी घेण्यात आली आहे, असं त्यांना सांगण्यात आलं. ता. पाच सप्टेंबरच्या पहाटे साडेचारच्या सुमाराला आठेक जणांचं टोळकं फाटक ओलांडून आत आलं. पाठीवरल्या बॅगमधून त्यातल्या प्रत्येकानं कालाश्‍निकोव रायफली काढल्या. ते इस्रायली खेळाडूंच्या इमारतीत थडकले. बंदुकांच्या फैरी झडल्या. सुरवातीचा थोडासा प्रतिकार थांबला. गोळीबार ऐकून बाकीच्या इमारतीतले काही लोक जागे झाले होते. गडबड झाली आहे हे लक्षात आलं. पोलिसदल आलं. गर्दी गोळा झाली. पॅलेस्टाइनच्या दहशतवाद्यांनी इस्रायली खेळाडूंना ओलिस धरलं असून एक-दोघांना गोळ्याही घातल्या आहेत असं कळलं.

पॅलेस्टाइन मुक्‍ती संघटना (पीएलओ) आणि इतर अरब संघटनांचं इस्रायलशी असलेलं साप-मुंगसाचं नातं सर्वश्रुत होतंच. दुश्‍मनांच्या घेऱ्यात राहून इस्रायलनं आपलं अस्तित्व जिवाच्या करारानं जपलं होतं. कणखरपणानं लढत, जशास तसं उत्तर देत इस्रायल आपल्या दुश्‍मनाला भूमीवर इंचभरही सरकू देत नव्हता. अरबांनी इस्रायलींवर हल्ले करावेत, इस्रायलींनी लीबिया, लेबनॉन, इजिप्त आदी देशांमध्ये घुसून मोहिमा राबवाव्यात, हे दुष्टचक्र सुरूच होतं. म्युनिकच्या ऑलिम्पिकनगरीत घुसलेले हे दहशवादी "ब्लॅक सप्टेंबर' नावाच्या संघटनेचे लोक होते. म्हणजे तसं त्यांनी सांगितलं होतं. ("ब्लॅक सप्टेंबर' नावाच्या संघटनेकडून अशा प्रकारचा हल्ला होणार आहे, हे जर्मन गुप्तहेरांना आधी कळलं होतं; पण त्यांनी म्हणावी तशी काळजी घेतली नाही, असं नंतर खूप वर्षांनी उघडकीस आलं).

...इस्रायलनं तातडीनं "दहशतवाद्यांशी आम्ही वाटाघाटी करत नसतो' हे धाडकन्‌ जाहीर करून टाकलं. जर्मन अधिकाऱ्यांची बोबडीच वळली. आता काय करायचं? इस्रायल आणि पश्‍चिम जर्मनीच्या ताब्यात असलेल्या आमच्या 234 साथीदारांची तातडीनं मुक्‍तता करावी, अशी मागणी पॅलेस्टिनी दहशतवाद्यांच्या म्होरक्‍यानं केली. आणखी वीसेक मागण्या होत्या. इस्रायलनं ढिम्म काही प्रतिक्रिया दिली नाही. जर्मन अधिकाऱ्यांना वाटाघाटीत थोडंफार यश आलं. अखेर ओलिसांना घेऊन दहशतवाद्यांनी विमानानं इजिप्तच्या कैरो विमानतळाकडं जावं असं ठरलं. "कैरोत उतरू नका,' असं इजिप्तनं तत्काळ बजावलं. तरीही दोन बसेसमधून ओलिस आणि दहशतवादी निघाले. बसमधून हेलिकॉप्टर्समध्ये आणि तिथून विमानतळ असा प्रवास होता; परंतु विमानतळावरच जर्मन पोलिसांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला. तुफान धुमश्‍चक्रीत सारं काही संपलं. सहा तारखेच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तिथं उरली होती ती अकरा इस्रायली खेळाडूंची अर्धीमुर्धी कलेवरं...छिन्नविच्छिन्न झालेली दहशतवाद्यांची पाचेक प्रेतं. तीन दहशतवादी जिवंत हाती लागले. त्यांना जर्मन पोलिसांनी ताब्यात घेतलं.
* * *

""वाटाघाटी, बोलणी वगैरे सोडा...इस्रायलनं याचं प्रत्युत्तर दिलं नाही तर लोक जगू देणार नाहीत आपल्याला,'' इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांनी पहिलंच वाक्‍य उच्चारलं आणि उपस्थित वरिष्ठ मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना आपला इरादा सांगून टाकला. "इस्रायलच्या नादाला लागणं महागात जातं' हा "सुविचार' जागतिक पातळीवर घट्‌ट करण्याचं इस्रायली धोरण होतं. "म्युनिक हत्याकांडाला जबाबदार असलेल्यांना असतील तिथून हुडकून काढा आणि तिथल्या तिथं संपवा,' असं स्पष्ट फर्मान निघालं. गुप्तहेरांची चक्रं वेगानं फिरली. म्युनिक हत्याकांडाला कारणीभूत ठरलेल्या आणि थेट सहभाग असलेल्या अकरा पॅलेस्टिनी आणि अरब दहशतवाद्यांची नावं इस्रायली "मोसाद' या गुप्तहेर संस्थेनं शोधली. मोहिमेचं सांकेतिक नाव होतं ः ऑपरेशन रॉथ ऑफ गॉड.

- मोसादमध्ये कार्यालयीन काम करणाऱ्या ऍवनर कॉफमन या तरुणाला अचानक गोल्डा मेयरबाईंनी बोलावून घेतलं. ऍवनरनं त्यांच्यासाठी काही काळ बॉडीगार्डचं काम केलं होतं. शिवाय, तो गोल्डाबाईंच्या आवडत्या सैनिकाचा मुलगा होता. कौटुंबिक ओळख होती. खरं कारण वेगळंच होतं. ऍवनरला मोसादमध्येही कुणी फारसं ओळखत नव्हतं...आणि बाहेरही. तो इस्रायली असला तरी जर्मन वंशाचा होता. युरोपात सहज खपून जाईल असा होता.
""ऍवनर, तुझी बायको गर्भवती आहे नं?'' गोल्डाबाईंनी आज्जीच्या सुरात मायेनं चौकशी केली.
""सातवा महिना लागलाय...'' काहीसं लाजत ऍवनर म्हणाला.
""माझेल तोव...! आपल्या भूमीसाठी हे करावंच लागेल पण...जमेल नं?'' पुन्हा तोच सहज सूर. "माझेल तोव' म्हणजे हिब्रू भाषेत अभिनंदन! ऍवनरला काही चॉइस नव्हताच. असता तरी त्यानं घेतला नसता. मातृभूमीसाठी काहीही करण्याचा जन्मजात संस्कार इस्रायली मुलांवर होत असतो. एफ्रॅम नावाचा माणूस ऍवनरचा हॅंडलर म्हणून नियुक्‍त झाला.
""या कागदावर सही कर...तुझा आणि मोसाद किंवा इस्रायली सरकारचा आता काहीही संबंध नाही. तू अधिकृतरीत्या अनधिकृत, बेरोजगार आणि विमाकवचहीन झाला आहेस. तू आता अस्तित्वातच नाहीस, असं म्हटलं तरी चालेल. तुझ्यासोबत आणखी चार जण असतील...'' एफ्रॅमनं धाडधाड सूचना दिल्या.
""पण माझी बायको कधीही प्रसूत होऊ शकते...'' ऍवनर बावचळून बघत बसला.
""तिलाही यातलं काहीही कळता कामा नये,'' एफ्रॅम म्हणाला. आडपडदा न ठेवता त्यानं पुढं सांगितलं, ""तुला फक्‍त युरोपातच काम करायचं आहे. रशियनांचं वर्चस्व असलेल्या पूर्व युरोपात मात्र जाऊ नकोस. रशियाला तूर्त दुखवायचं नाहीए. आणि हो...अरब देशांमध्येही जायचं नाही. ते आम्ही बघून घेऊ. युरोपच्या भूमीवरचे आपले शत्रू टिपणं हीच तुझी कामगिरी आहे. कळलं?''
आणखी एका अधिकाऱ्यानं ऍवनरची उलटतपासणी घेतली. म्हणाला ः ""झुरिकमधल्या कुठल्या तरी स्विस बॅंकेतल्या एका बॉक्‍समध्ये आम्ही अडीच लाख डालर्स ठेवू. तिथून तू लागतील तसे पैसे उचलायचे. लागतील तितके आम्ही भरत जाऊ. कुठल्याही परिस्थितीत आमच्याशी संपर्क करायचा नाही. बिनबोभाट कामं पार पाडायची. आणि हो... प्रत्येक खर्चाची रिसिट मला नंतर मिळाली पाहिजे. कुणीतरी या पैशासाठी मेहनत केलेली आहे, हे लक्षात ठेव. तू रॉथ्सचाइल्डसारख्या धनाढ्याकडं नोकरी करत नाहीएस. गरीब देश आहे आपला...''
...इथून सुरू झाला तो सूडाचा प्रवास.
* * *

ऍवनर कामाला लागला. झुरिकमध्ये जाऊन त्यानं बॅंकेतून काही पैसे उचलले. मग जुना कॉंटॅक्‍ट वापरून यादीतली सावजं कुठं मिळतील, याची चाचपणी केली. लुई नावाचा एक फ्रेंच इसम पैसे घेऊन असल्या टिप्स देतो, असं कळलं. ऍवनरनं लुईला गाठलं. "प्रत्येक नावाच्या पत्त्यासाठी दोन लाख डॉलर्स घेईन,' असं लुईनं सांगून एकेक पत्ता सांगायला सुरवात केली. कोण असेल हा लुई? सीआयएचा एजंट? केजीबीचा? कोण जाणे. असली व्यावसायिक कामं करणारेही त्या शीतयुद्धाच्या काळात बक्कळ पैका कमावत होते. त्यापैकीही असेल. ""मी शत्रू नाही...पण मित्रसुद्धा नाही. मी पैशाला बांधील आहे. मी नावं विचारत नाही...पैसे मिळताहेत तोवर तरी!'' लुईच्या बोलण्यात गर्भित धमकी होती. ऍवनरनं मुकाट्यानं त्याला पैशाची पुडकी दिली.

दक्षिण आफ्रिकी ड्रायव्हर स्टीव्ह, बेल्जियममध्ये खेळणी बनवणारा आणि बॉम्बस्फोटकांमधला उस्ताद रॉबर्ट, डेन्मार्कचा खोटी कागदपत्रं बनवण्यातला कसबी कलाकार हान्स आणि कामगिरीनंतरची "साफसफाई' करणारा बुजुर्ग कार्ल अशी चौकडी ऍवनरच्या दिमतीला देण्यात आली. कुणीही कुणाला ओळखत नव्हतं. यांना घेऊन ऍवनरला युरोपभर पसरलेले अकरा दहशतवादी उडवायचे होते. एफ्रॅमनं सुरवातीलाच त्याच्यासमोर अकरा फोटो टाकले होते... नावांसकट.
पहिलाच बळी रोममध्ये टिपला गेला. "ब्लॅक सप्टेंबर'चा जनक समजला जाणारा अब्देल वायल झ्वायटर हा रोममध्ये लेखक म्हणून जगत होता. "अरेबियन नाइट्‌स'चा इटालियन भाषेत अनुवाद त्यानं केला होता. त्याच्या राहत्या घराच्या आवारातच ऍवनर आणि रॉबर्टनं त्याला गोळ्या घातल्या. पॅरिसमध्ये महमूद हमशारीच्या घरात टेलिफोनमध्ये बॉम्ब बसवून त्यांनी पाठोपाठ हमशारीला यमसदनाला पाठवलं. हुसेन अब्दुल अल्‌ बशीर (चीर) याला सायप्रसमधल्या हॉटेलात गाठून संपवलं. महंमद युसूफ अल्‌ नज्जर, कमाल अदवान आणि कमाल नास्सेर या तिघांचा आता नंबर होता. ("म्युनिक'नंतर महिनाभरात पश्‍चिम जर्मनीचं एक विमान हायजॅक करून इजिप्तला नेण्यात आलं. "म्युनिक हत्याकांडात अटकेत असलेल्या तिघांची सुटका करा,' अशी मागणी अपहरणकर्त्यांनी केली. जर्मनीनं त्यांना तत्काळ सोडलं...ते हे तिघे!) ही सगळी "मिलीजुली' होती, हेही जगभर बोललं जातंच; पण तिघंही बैरुटमधल्या निर्वासितांच्या शिबिरात राहत होते. एफ्रॅमचा आदेश डावलून ऍवनरच्या टोळक्‍यानं बैरुट गाठलं. तिघांनाही लोळवलं. आणखीही काही दहशतवादी टिपले. या मोहिमेत त्यांना इस्रायली सुरक्षा बलाचंही साह्य मिळालं होतं. त्यातला एक कमांडो ऍवनरच्या लक्षात राहिला. त्याचं नाव होतं एहुद बराक. हेच बराक पुढं इस्रायलचे पंतप्रधान झाले.

झैद मुचासी हा "ब्लॅक सप्टेंबर'वाला अथेन्समध्ये दिसल्याची टिप लुईनं ऍवनरला दिली. अथेन्समधल्या एका सेफ हाऊसमध्ये त्यांच्या उतरण्याची व्यवस्थाही त्यानं केली. ऍवनरची टोळी ज्या सेफ हाऊसमध्ये उतरली होती, तिथंच लुईनं "पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशन'चे लोकही उतरवले होते. मोठाच पेचप्रसंग उभा राहिला; पण तो ऍवनरच्या प्रसंगावधानानं टळला. मुचासीला उडवून ते परतले.
इथवर आलेल्या ऍवनरचं अवसान आता ढळत चाललं होतं. मन फाटत चाललं. एकीकडं मातृभूसाठी उचललेला बेलभंडार, दुसरीकडं विवेकाची टोचणी...आपण हे काय आरंभलंय? यहुदी असणं म्हणजे हा रक्‍तपात? अकरा जणांना उडवल्यानंतर तरी हा रक्‍तपात थांबणार आहे का?
* * *

- मधल्या काळात ऍवनरनं आपली गर्भवती बायको डाफ्ना हिला ब्रुकलिनला हलवलं होतं. तिला बाळ झालं होतं. मुलगी होती. तिचं नाव ग्वेला होतं. ऍवनरमधल्या बापानं दोन अश्रू ढाळले. आपण जे काही करतोय, त्याचा वारसा नकळत आपल्या त्या पोरीकडं जाणार, या कल्पनेनं त्याच्या मनाच्या चिंध्या होत होत्या. त्याची दोलायमान परिस्थिती ओळखून कार्लनंही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. एफ्रॅमनं त्याच्यातली राष्ट्रभावना आणखी प्रज्वलित करण्यासाठी फुंकर घातली.
""आता थोडंच राहिलंय पोरा...देशासाठी तू खरा हीरो आहेस. मातृभूसाठी तू जे काही आरंभलंयस, त्याला तोड नाही,'' एफ्रॅम म्हणाला.
""एफ्रॅम, हे थांबणारं नाही. एक दहशतवादी उडवला की लग्गेच त्याची जागा त्याच्याही पेक्षा कडवा दहशतवादी घेतोय...सतत हेच करायचं का?'' ऍवनरनं बिनतोड सवाल केला.
""पुन्हा पुन्हा वाढतात म्हणून नखं कापायचीच नाहीत का, पोरा?'' एफ्रॅमनं त्याला निरुत्तर केलं.
..अली हसन सलामेह हा म्युनिक हत्याकांडाचा खरा सूत्रधार. त्याला उडवून मोहीम थांबवायला हरकत नाही, असं एफ्रॅमनं आडून आडून सुचवलं. सलामेहला संपवणं इतकं सोपं नाही, कारण तो सीआयएच्या मर्जीतला डबल एजंट आहे, अशी खबर लुईनं ऍवनरला दिली; पण ऍवनर हटून बसला. शेवटी, सलामेह लंडनमध्ये संरक्षणात राहतोय, हे लुईनं सांगून टाकलं.
* * *

-मुक्काम लंडन. भुरभुर पावसात दोन बॉडीगार्डांबरोबर चालणाऱ्या सलामेहला सहज उडवता आलं असतं; पण काही दारुड्या अमेरिकींनी तेवढ्यात तिथं धिंगाणा घालून ऍवनरचा बेत हाणून पाडला. सलामेह सटकला तो सटकलाच. हे अमेरिकी दारुडे सीआयएचे एजंट होते, हे नंतर "मोसाद'च्या लोकांना कळलं. सलामेह सीआयएला चांगल्या खबरा पुरवत असे. शिवाय, "अमेरिकेत गडबड करणार नाही', असाही शब्द त्यानं दिला होता.
बुजुर्ग कार्लचं कलेवर त्याच्या हॉटेलच्या खोलीत रक्‍ताच्या थारोळ्यात आढळलं. एका डच सुंदरीनं त्याचा खात्मा केला होता. ही सुंदरी व्यावसायिक मारेकरी असून हूर्न या नेदरलॅंड्‌समधल्या गावात राहते, असं लुईनं कळवून टाकलं. ऍवनरनं तिथं जाऊन तिला संपवलं. कमीत कमी साधनांमध्ये उत्तम स्फोटकं बनवणारा ऍवनरचा उजवा हात रॉबर्ट अचानक त्याच्या "प्रयोगशाळे'त स्फोट होऊन गतप्राण झाला. उरता उरले ऍवनर, स्टीव्ह आणि हान्स... पैकी, खंजीर पाठीत खुपसून हान्सचाही खून करण्यात आला.
कुणीतरी "मोसाद'मधलंच फितूर झालंय या भावनेनं ऍवनरला ग्रासलं. आपल्यावरही पाळत ठेवली जातीये, हेही त्याला कळत होतं. तो हवालदिल झाला.
इथून पुढं ऍवनर स्वत:शी, इस्रायली धुरीणांशी भांडत राहिला. या साऱ्याचं फलित काय, या प्रश्‍नाचं उत्तर त्याला मिळालंच नाही. त्याचा हा झगडा पडद्यावर पाहताना स्वत:च्याच विवेकाशी झगडण्याची एक उत्तम संधी मात्र रसिकांना मिळते. ती घ्या!
* * *

म्युनिकच्या भयंकर नरसंहाराचा इस्रायलनं सूड घेतला. तो घेतला गेला नसता, तर शत्रू शिरजोर झाला असता यात काही संदेह नव्हता. म्युनिकच्या प्रसंगानंतर लगेचच इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लीबिया आणि लेबनॉनच्या निर्वासितांच्या शिबिरांवर बॉम्बफेक करून दोनेकशे माणसं मारली होती. म्युनिकच्या सूडकथेचा सिलसिला दिग्दर्शक स्पीलबर्गनं कमालीच्या वास्तवदर्शी शैलीत मांडला. एरिक बाना या अभिनेत्यानं साकारलेला ऍवनर इतका जवळचा आणि "खरा' वाटतो की त्याला तोड नाही.

पुढं बॉंडपटांमध्ये जेम्स बॉंड पेश करणारा डॅनियल क्रेग इथं "मोसाद'चा हस्तक म्हणून मस्त वाटतो. या चित्रपटाला पाच ऑस्कर मानांकनं होती, मिळालं एकही नाही! चित्रपट बऱ्यापैकी चालला; पण स्पीलबर्गच्या अन्य चित्रपटांच्या गल्ल्यापुढं किरकोळच धंदा झाला म्हणायचा. जॉर्ज जोनासनामक लेखक-पत्रकारानं लिहिलेल्या "व्हेन्जन्स' या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे.
...या सर्पसत्राला अंत नाही, हे एक विषारी सत्य आहे. कुठं ना कुठं हे सर्प वेळोवेळी ठेचले जाताहेत आणि एक सर्प मेला की त्याची जागा अन्य सहा सरपटणारे जीव घेताहेत. हे सर्पचक्र अव्याहत सुरू आहे. या मर्त्यलोकात विषकुप्यांना तोटा नाही, हे खरंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com