साठीचा गजल! (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar
pravin tokekar

गेल्या साठ वर्षांत किती तरी सुंदर रोमॅंटिक चित्रपट येऊन गेले; पण "रोमन हॉलिडे'सारखा चित्रपट तोच. त्याला अजूनही तोड नाही साऱ्या तारांगणात. आयुष्याच्या मस्त मस्त उतारावर गुणगुणत वाटचाल करावी, अशी ती एक मस्त गझल आहे किंवा चटकन आठवणाऱ्या जुन्या रम्य स्मृतीसारखी, अवचित अंगावर टपकलेल्या पारिजाताच्या चुटुकदेठी शुभ्र फुलांच्या पहाटस्पर्शासारखी ती एक अनमोल चीज आहे.

विंदा करंदीकरांची एक मस्त गझल आठवतेय...
सारे तिचेच होते, सारे तिच्याच पाठी
हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याचसाठी

...वृद्धत्वाच्या मस्त मस्त उतारावरची ही गझल अनेक रसिकांना आठवत असेल. ही गझल आठवली की ओठांवरच्या खट्याळ स्मितहास्यासारखी ऑड्री हेपबर्न आठवते आणि ऑड्री मनात आली, तर पाठोपाठ ही गझल येऊन मनात पोचते! आताशा कानटोपी, स्वेटर किंवा गेलाबाजार एखादी छत्री घेऊन "चालायला' बाहेर पडणाऱ्या सीनिअर सिटिझन लोकांच्या उमेदीच्या वयातली ऑड्री हेपबर्न ही जागतिक हृदयदुखी होती. तिचं ते अपरं नाक, विभोर डोळे, शेलाटा बांधा, कपाळावर येणारी ती केसांची अवखळ रेघ...जाऊ दे. ऑड्री हेपबर्न आठवणाऱ्या व्यक्‍तीचं वय झालंय, असं वरकरणी वाटेलही; पण हे असं वाटणं भलतंच फसवं आहे, हे ध्यानात घ्या. उलट ऑड्रीच्या आठवणीनं नजरेत चमक आणि ओठांवर हसू येणारे कुठलेही आजोबा हे तिरक्‍यातिरक्‍या देवआनंद-चालीनं आपल्या वाट्याचा उतार उतरणारे चिरतरुण आहेत, ही खूणगाठ बांधा. न जाणो-
हसतोस काय बाबा तू बाविशीत बुढ्‌ढा
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी
असं आपल्यालाही ऐकवून ते मोकळे होतील!

...ऑड्री हेपबर्न होतीच तशी. ऑड्री आज असती तर 89 वर्षांची असती आणि तरीही जाम सुंदर दिसली असती. काही काही चेहरे म्हातारे होत नाहीत कधीच. बरोब्बर 65 वर्षांपूर्वी अशाच सप्टेंबरात हॉलिवूडमध्ये ऑड्री हेपबर्न या नावानं भल्याभल्यांचा तपोभंग केला होता. 27 ऑगस्ट 1953 रोजी विल्यम वायलरचा "रोमन हॉलिडे' सर्वत्र झळकला होता आणि त्यात "इंट्रोड्यूसिंग' होती ऑड्री. समोर ग्रेगरी पेकसारखा सितारा असूनही ऑड्रीनं दुनियेला बघता बघता पागल केलं. त्या दिवाण्यांमध्ये खुद्द ग्रेगरी पेकही होता. आता बोला.
पासष्ट वर्षापूर्वींचा हा चित्रपट आणखी तीनशे पासष्ट वर्षं असाच आळवला जाणार आहे. किशोरकुमारच्या जुन्या गाण्याच्या बहारदार लकेरीसारखा "रोमन हॉलिडे' अंतरंगात तरंग उमटवत राहतो. वास्तविक ही एक साधीसुधी प्रेमकहाणी. "बॉय मीट्‌स गर्ल'वाली. त्यातल्या सिच्युएशन्ससुद्धा काही अद्‌भुत आहेत, असंही नाही. हां, संपूर्ण कहाणी रोमच्या प्राचीन आणि रोमॅंटिक नेपथ्याच्या पार्श्‍वभूमीवर घडते, हे एक अद्‌भुत आहे. अर्थात सर्वात अद्‌भुत आहे ऑड्री...ऑड्री हेपबर्न. पहाटेच्या सुमाराला कधी पारिजातकाच्या झाडाखाली उभे राहिलाय? ती शेंदरी देठांची ओलसर शुभ्र फुलं अंगाला, मनाला अलवार स्पर्श करून हलकेच जमिनीवर उतरतात...अगदी तश्‍शी येते ऑड्री.
ऑड्री हे पारिजाताचं फूलच होतं. दवानं भिजून खळखळून हसणारं. नाजूक आणि धीटही. अवखळ आणि पोक्‍तही. स्वप्नाळू आणि व्यवहारीही.
...हल्लीच्या पिढीनं "रोमन हॉलिडे'च्या पलीकडचंही भरपूर पाहिलं आहे हे कबूल; पण पासष्ट वर्षांपूर्वीचं ते गारुड काय होतं, हे जाणून घेण्यासाठी तरी त्यांनी हा चित्रपट पाहावाच.
* * *

आटपाटनगराची एक राजकन्या होती. तिचं नाव प्रिन्सेस ऍन. ती ब्रिटिश राजघराण्याची नाही हं! हे वेगळंच कुठलं तरी राज्य आहे. बिलोरी महालात राहणाऱ्या राजकन्येला राजकाजाच्या निमित्तानं जगभर फिरावं लागतं. वेगवेगळ्या समारंभांना वेगवेगळे बोजड झगे घालून, महागडे अलंकार घालून हजर राहावं लागतं. देशोदेशीच्या राजा-महाराजांना, सरदार-दरकदारांना, पुढाऱ्या-पेंढाऱ्यांना सतत भेटावं लागतं. उजवा तळहात उलटा धरून पुढं करावा लागतो. मग लोक आदरानं त्यावर ओठ टेकवतात. राजकन्या म्हटलं की असले अधिकृत समारंभ आलेच. मिनिटामिनिटाचा कार्यक्रम आखलेला असतो. उदाहरणार्थ ः ब्रेकफास्टची वेळ. पदार्थांची निवड. न्याहारीचे पाहुणे...वगैरे. मग धर्मादाय कार्यक्रमांची उजळणी. भेटी-गाठी. दरबारी समारंभांमधली शाही उपस्थिती म्हणून तिच्या अस्तित्वाला विलक्षण महत्त्व आहे. दिमतीला नोकर-चाकर असले तरी हा सोन्याचा पिंजराच. ज्या वयात उत्फुल्लपणे जीवनाला भिडावं त्या वाढाळू वयात अधिकृत दरबारी कामकाजात चिरडून गेलेलं आयुष्य....त्याला चांगलं कसं म्हणायचं? प्रिन्सेस ऍनचा जीव नुसता उबगून गेला होता. कित्ती तो प्रवास. कित्ती ती माणसं. कित्ती ते खोटंखोटं वागणं. शी:!

प्रिन्सेस ऍन आत्ता कुठं फुलून येत होती. विंदाच्याच कवितेतल्या सान्यांच्या पोरींसारखी. "हल्ली हल्ली फुलू लागल्या शेजारिल सान्यांच्या पोरी, बाप लागला होऊ प्रेमळ, आई कर्मठ आणि करारी' अशी स्थिती. तारुण्यात प्रविष्ट झालेली ऍन दिसायला भलतीच गोड होती. तिचं गोड दिसणं हीसुद्धा एक जगभरातली बातमीच होती. "प्रिन्सेस ऍननं टिफनीचे अलंकार परिधान करून पॅरिसच्या जनतेला वेड लावलं...' ही बातमी पहिल्या पानावर यायची. ब्रिटनमध्ये शाही परिवारानं तिचं जंगी स्वागत केलं. ऍमस्टरडॅमच्या दौऱ्यात तिनं एका जहाजाचा नामकरणविधी उरकला आणि धर्मादाय इस्पितळाची उद्‌घाटनाची फीत कापली. पॅरिसमध्ये झालेल्या युरोपीय व्यापाऱ्यांच्या सभेत तिनं उपस्थिती दाखवली. चित्रप्रदर्शनांना भेटी दिल्या...हे अन्य मथळे.

आता तिचं आगमन रोम या प्राचीन शहरात झालं असून शानदार लष्करी संचलनाला उपस्थित राहिल्यानंतर हर हायनेस प्रिन्सेस ऍन यांनी रोममधल्या त्यांच्या देशाच्या आलिशान दूतावासात शाही मेजवानी दिली...ही ताजी बातमी आहे.
...रोमच्या अधिकृत दौऱ्यात, एका दरबारी कार्यक्रमात पायघोळ झग्याच्या आत पायातला नाजूक जोडा काढून पायाची बोटं मोकळी करणंही जेव्हा प्रिन्सेस ऍनला अशक्‍यप्राय झालं, तेव्हा मनानं जणू बंड पुकारलं. रात्री झोपण्यापूर्वी तिनं प्रचंड अकांडतांडव करून आपल्या दाईला भंडावून सोडल्यामुळं डॉक्‍टरांनी येऊन तिला झोपेचं इंजेक्‍शन दिलं; पण प्रिन्सेस ऍन कसली झोपतेय? तिनं खिडकीतून उडी मारून आलिशान दूतावासातून सरळ पोबारा केला. दूतावासाच्या भटारखान्यासाठी भाज्या आणि कच्चा माल पुरवणाऱ्या टेम्पोतून प्रिन्सेस ऍन थेट पोचली ती रोम शहराच्या मध्यवर्ती भागात. तिथं रात्र गडद होत होती...
* * *

""ए मुली, रात्री इथं झोपू नकोस...पोलिस पकडतील ना!'' पत्त्यांच्या खेळात पैसे गमावून शर्ट खोचत घराकडं निघालेल्या जो ब्रॅडलीनं त्या पोरीला हटकलं. काय येडी पोरगी आहे? रस्त्यात झिंगून पडायची ही काय वेळ आहे? जो ब्रॅडली हा अमेरिकी पत्रकार होता. बातम्या विकून कसंबसं पोट भरणारा सडाफटिंग; पण स्मार्ट पत्रकार. त्या पोरीनं नुसतं ऊं ऊं केलं.
""कुठं राहतेस?,'' तिला एका टॅक्‍सीत बसवून जोनं विचारलं.
""कोलोसियम...'' ती पोरगी बरळली.
""चुकीचा पत्ता सांगतायत त्या, साहेब!'" टॅक्‍सीवाला म्हणाला. शेवटी भलती कटकट नको म्हणून जोनं तिला आपल्या खोलीवर आणलं.
""ही लिफ्ट आहे का?'' त्या पोरीनं अर्धवट झोपेत विचारलं.
""लिफ्ट? माझी खोली आहे ही!'' जो नाही म्हटलं तरी दुखावला होता. एकंदरीत पोरगी बऱ्या घरातली दिसतेय. दारू प्यायलेली वाटत नाही; पण...कुछ तो गडबड है. प्रिन्सेस ऍनवर झोपेचं इंजेक्‍शन अंमल करू लागलं होतं; पण तिच्या स्वातंत्र्याची पहाट सुरू झाली तीच मुळी अशी...जो ब्रॅडली नावाच्या सडाफटिंग पत्रकाराच्या साक्षीनं.
* * *

प्रिन्सेस ऍनला खोलीत गाढ झोपलेल्या अवस्थेत सोडून जो ब्रॅडलीनं सकाळी कचेरी गाठली. त्याच्या थापेबाजीला न जुमानता अमेरिकी न्यूज सर्व्हिसच्या मालक-संपादकानं त्याला हाकलून देण्याचंच ठरवलं होतं; पण तिथंच प्रिन्सेस ऍनचा फोटो बघून आपल्या खोलीत या क्षणाला कुठली "पोरगी' झोपली आहे, याचा साक्षात्कार जो याला झाला. हमखास लागणारं लॉटरीचं तिकीट आपल्या हातात आहे, हे त्याला कळलं. आयर्विंग रादोविच नावाचा त्याचा एक छायाचित्रकार मित्र होता.
""बरं झालं, देवासारखा भेटलास...'' जो त्याला म्हणाला.
""का? पुन्हा पैशाचं पाकीट विसरलास काय?,'' आयर्विंगनं दोस्ताच्या सावध पवित्र्यात विचारलं.
""नाही रे...'' असं म्हणून जोनं त्याला कम्प्लीट स्टोरी सांगितली. "त्या पोरीला मी घुमवतो, आयती स्टोरी मिळेल, तू पाठीमागून गुपचूप फोटो काढ...' अशी जो याची अफलातून आयडिया होती. आयर्विंगनं कपाळाला हात लावला; पण तो कबूल झाला.
सहज चालत जाणं, मनात येईल त्या छानदार कॅफेत बसून कॉफीचे घुटके घेणं, केस वाट्टेल तसे कापणं, समुद्रकिनाऱ्यावर बिनधास्त हुंदडणं, रोमच्या रस्त्यांवरून खुलेआम हिंडणं, पर्यटनस्थळांवर जाऊन हॅहॅ हूहू करत फोटो काढणं...या खरं तर नॉर्मल गोष्टी. सामान्य शहरी मुलगी सहज करून जाईल अशा; पण प्रिन्सेस ऍनसाठी हे सगळं अप्राप्य होतं.
जो यानं तिच्या या इच्छा जवळपास पूर्ण केल्या. व्हेस्पा स्कूटरवर तिला रोम फिरवलं. रोमच्या प्राचीन चौकात सांता मारिया चर्च उभं आहे. तेही प्राचीनच. तिथं डाव्या भिंतीशी एक संगमरवरी भलामोठा मुखवटा आहे. त्याला "बोका देला व्हेरिता' म्हणतात. म्हणजे सत्यमुख...
""या तोंडात हात घातला की खरं बोलणाऱ्याला काही होत नाही; पण खोटं बोलणाऱ्याचा हात गिळला जातो...बघ तू!'' जो म्हणाला.
""खरंच?'' असं विचारत ऍननं हात घातला. काहीही झालं नाही.
""तू निरागस आहेस..,'' असं म्हणत जो यानं हात घातला. ओय...हात अडकला! जो आणि ऍन दोघंही किंचाळले.
""गंमत केली...'' हात काढत जो शांतपणे म्हणाला.
...अभूतपूर्व धमाल गोंधळात या दुकलीनं रोम अक्षरश: ढवळून काढलं. दोघांची गट्टी मस्त जमली होती. यौवन ही मोठी जादूई गोष्ट असते. हयातीत पहिल्या प्रथमच ती एका तरुणासोबत मस्त वेळ घालवत होती. जोमधला चार्म तरुण ऍनला जाणवला. जो ब्रॅडलीलाही ऍनमधलं निरागसपण, तिचा हळवा स्वभाव भावून गेला. दोन सुंदर लकेरी एकमेकांमध्ये आवेगानं गुंफल्या गेल्या की निराळीच हार्मनी निर्माण होते. द्वंद्वगीत म्हणजे तरी दुसरं काय असतं?
पण कुठल्याही सुंदर भावगीताचं आयुष्य शेवटी तीन-चार मिनिटांचं. तो काही बडा ख्याल नव्हे.
प्रिन्सेस ऍन आणि जो ब्रॅडलीची ही आधी-अधुरी प्रेमकहाणीही पूर्ण होणं कठीण होतं. दोघांची विश्व वेगळाली. जगण्याच्या कल्पनाच वेगळाल्या...हे विजोड सांधे कसे जुळायचे? तरीही एकमेकांवर जीव जडला तो जडलाच. प्रकरण अवघड होऊन बसलं.
""मध्यरात्रीच्या बाराच्या टोल्याला मी भोपळ्याच्या गाडीत बसून परत जाईन...पण माझा काचेचा बूट (तुझ्या) जिन्यावर पडून राहील, जो!'' कातर झालेल्या ऍननं डबडबलेल्या डोळ्यांनी म्हटलं तेव्हा जोसुद्धा हललाच; पण काही स्वप्नं टाळलेलीच बरी असतात, हे शहाणपण त्याला होतं.
""आणि मग आपली परिकथा इथेच संपेल!'' तो कोरडेपणानं म्हणाला.
...पुढचं सांगण्यात हशील नाही. ही आधुनिक परिकथा पडद्यावरच पाहायची. तिथंच एका सुस्काऱ्यानिशी सोडून यायची.
* * *

खरं तर "रोमन हॉलिडे'ची गोष्ट ही सांगण्याची गोष्टच नाही. ती अनुभवावी लागते. किशोरकुमारच्या "ये दिल ना होता बेचारा, कदम ना होते आवारा, तो खूबसूरत कोई अपना हमसफर होता...' या गाण्याचं विश्‍लेषण करत बसण्याची अरसिकता आणायची तरी कुठून? "रोमन हॉलिडे' हा संपूर्ण चित्रपटच किशोरकुमारच्या सदाबहार गाण्यासारखा आहे. बस, सुनते जाओ, देखते जाओ.
...वास्तविक ही कहाणी लिहिली गेली होती तेव्हाचा हॉलिवूडचा महासितारा कॅरी ग्रॅंटसाठी; पण "ऑड्री हेपबर्नसोबत प्रेमप्रसंग रंगवण्याइतका मी आता तरुण राहिलेलो नाही', असं सांगून ग्रॅंटनं नकार दिला. ग्रेगरी पेक एका पायावर तयार झाला. खरं कारण असं होतं की पिक्‍चरचं बजेट "पॅरामाउंट'नं जेमतेम 10 लाख डॉलर्स ठेवलं होतं. मानधन कमी मिळणार होतं. शिवाय, ऑड्री हेपबर्न भलतीच नवखी होती. सुपरस्टार कशाला स्ट्रगलरसोबत उभा राहील?
ऑड्री हेपबर्न ही उत्तम आणि प्रशिक्षित बॅले नर्तिका होती. काही डच चित्रपटांत आणि फ्रेंच नाटकात तिनं कामं केली होती; पण हॉलिवूडमध्ये तिला कुणी फारसं ओळखत नव्हतं. दिग्दर्शक विल्यम वायलरनं ऑडिशनमध्ये तिला निवडलं. संपूर्ण चित्रपट रोममध्ये चित्रित झाला. चित्रपट पुरा होता होता ग्रेगरी पेकनं वायलरला सांगून टाकलं ः "ऑड्री या चित्रपटात ऑस्कर काढणार! तिचं नाव श्रेयनामावलीत आधी घाल. माझं आणि तिचं मानधनही समान ठेव!' ग्रेगरी पेकची ही दिलदारी हॉलिवूडला न पेलणारीच होती; पण तसंच घडलं.
"रोमन हॉलिडे'साठी ऑड्रीला ऑस्कर जाहीर झालं. ही कहाणी लिहिली होती विख्यात पटकथालेखक डाल्टन ट्रम्बो यांनी; पण त्याच काळात कम्युनिस्टांशी ओढा असणाऱ्या चित्रकर्मींना हॉलिवूडमध्ये काळ्या यादीत टाकलेलं. असल्या "कॉम्मीज्‌'ना कामं मिळत नसत. ट्रम्बो यांनी आपला मित्र इयन मॅक्‍लेलन हंटर याचं नाव वापरून "रोमन हॉलिडे'ची संहिता सिद्ध केली. (डाल्टन ट्रम्बो यांच्या वादळी जीवनावर आधारित "ट्रम्बो' या चित्रपटाची ओळख याच स्तंभात आपण काही काळापूर्वी करून घेतली आहे). या संहितेलाही ऑस्कर मिळालं.
"रोमन हॉलिडे'नं इतिहास घडवला. व्हेस्पा स्कूटरवरून प्रिन्सेस ऍन आणि जो ब्रॅडली रोमच्या सडकांवर हिंडतात, अशी दृश्‍यं फेमस झाली होती. त्यानंतर व्हेस्पा स्कूटरची मागणी जगभर इतकी वाढली की ज्याचं नाव ते...असे कित्येक भन्नाट किस्से "रोमन हॉलिडे'बद्दल सांगता येतील.
गेल्या साठ वर्षांत किती तरी सुंदर रोमॅंटिक चित्रपट येऊन गेले; पण "रोमन हॉलिडे'सारखा चित्रपट तोच. त्याला अजूनही तोड नाही साऱ्या तारांगणात. आयुष्याच्या मस्त मस्त उतारावर गुणगुणत वाटचाल करावी, अशी ती एक मस्त गझल आहे किंवा चटकन आठवणाऱ्या जुन्या रम्य स्मृतीसारखी, अवचित अंगावर टपकलेल्या पारिजाताच्या चुटुकदेठी शुभ्र फुलांच्या पहाटस्पर्शासारखी ती एक अनमोल चीज आहे.
उपमा काहीही द्या किंवा नका देऊ..."रोमन हॉलिडे' आहे तिथंच आहे. काहीसा पडद्यावर...बराचसा आपल्या मनात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com