गूढ लिपीतली कूट अक्षरं (प्रवीण टोकेकर)

गूढ लिपीतली कूट अक्षरं (प्रवीण टोकेकर)

ब्रिटिश गणिती आणि लेखक अँड्य्रू हॉजेस यांनी ‘ब्रेकिंग द कोड’ या नावाचं एक नाटक पाहिलं. ते सर ॲलन ट्यूरिंग यांच्या जीवनावर आधारित होतं. ते पाहून भारावलेल्या हॉजेस यांनी झपाटल्यागत जबरदस्त माहिती मिळवत ‘ॲलन ट्यूरिंग : द एनिग्मा’ हे चरित्र लिहिलं. त्याच्यावर आधारित चित्रपट म्हणजे ‘इमिटेशन गेम.’ या वेळी याच चित्रपटाविषयी आणि ट्यूरिंग यांच्याविषयी...

जून महिन्यातल्या ढगाळ आभाळाकडं नजर गेली की कधी कधी उदास वाटतं. हा सर ॲलन ट्यूरिंग
    यांचा महिना. जन्म : ७ जून १९१२. मृत्यू : २३ जून १९५४. अवघ्या ४२ व्या वर्षी ट्यूरिंग गेले. इतक्‍या छोट्याशा आयुष्यात त्यांनी पुढल्या युगाची मुहूर्तमेढ रचली. अफाट गणिती बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी दुसरं महायुद्ध किमान अडीच वर्षं लवकर संपुष्टात आणलं. नाझींची मस्ती एकहाती उतरवली आणि किमान १५ लाख लोकांचे जीव वाचवले; पण हे त्यांचं तात्कालिक यश म्हणायचं. कारण, हे साध्य करताना त्यांनी असं एक यंत्र जन्माला घातलं, की ती भविष्यात कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजीवक यंत्राची माय ठरली. ‘अल्गोरिदम’च्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यात ट्यूरिंग यांचा वाटा सिंहाचा. खऱ्या अर्थानं हा मनुष्य संगणकाचा बाप नव्हे; तर आई होता.
...पण नियतीची लिपी भयंकर गूढ असते. तान्हेपणी सटवाई त्यांच्या भाळावर बहुधा इतकं क्‍लिष्ट भाग्य लिहून गेली, की ते संकेत उलगडता उलगडले नाहीत. ‘जिवंत असे तो लत्ता देती, मरता खांद्यावरती घेती...जगाचा उफराटा सन्मान’ या गोविंदाग्रजांच्या ओळी आठवाव्यात, इतके भोग त्यांच्या वाट्याला आले. एवढं अफाट कर्तृत्व गाजवणाऱ्या माणसाला आत्महत्या करावी लागावी? समलिंगी असल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागावा? शत्रुराष्ट्राचा हेर म्हणून चौकशीला तोंड द्यावं लागावं? स्वत:च्याच एकलेपणाशी झगडत जगायला लागावं? इतकंच नव्हे तर, त्यांचं संशोधन ५० वर्षं गुलदस्त्यात ठेवलं गेल्यानं हा प्रेषिताच्या मोलाचा माणूस एकटाच अनंताच्या प्रवासाला निघून गेला...
‘इमिटेशन गेम’ हा त्यांच्या जीवनावरचा नितांतसुंदर चित्रपट आहे. जून महिन्यात तर नक्‍की बघावा असा.
* * *

- ‘‘माझ्या बोलण्याकडं तुमचं लक्ष आहे? गुड. काळजीपूर्वक ऐकलं नाहीत तर काही गोष्टी तुम्ही मिस कराल. महत्त्वाच्या गोष्टी. मी थांबणार नाही, रिपिटदेखील करणार नाही...तुम्ही मला अडवायचंसुद्धा नाही. तुम्ही जिथं बसलेला आहात आणि मी जिथं आहे, त्यावरून तुम्हाला असं वाटू शकेल की पुढं जे काही घडेल, त्याची सूत्रं तुमच्या नियंत्रणात आहेत. तुम्ही चुकताहात. नियंत्रण माझ्या हातात आहे. कारण, मला अशा काही गोष्टी माहीत आहेत, त्यांची तुम्हाला सुतराम कल्पना नाही. मला तुमच्याकडून संपूर्ण बांधिलकीची अपेक्षा आहे. माझं म्हणणं एकाग्रचित्तानं ऐका आणि माझं पूर्ण सांगून झाल्याशिवाय मत बनवू नका. संपूर्ण शुद्ध भावनेनं तुम्ही हे करू शकणार नसाल, तर या खोलीतून निघून जा. इथं तुम्ही तुमच्या मर्जीनं आला आहात, माझ्या नव्हे. तेव्हा इथून पुढं जे काही होईल किंवा बघाल, त्याची जबाबदारी तुमची असेल, माझी नव्हे. लक्ष द्या...’’
सर ॲलन ट्यूरिंग यांच्या आवाजातल्या सज्जड दमानिशी ‘इमिटेशन गेम’ हा सिनेमा सुरू होतो. तुम्ही सावरून बसता. पुढं पडद्यावर एक कहाणी उजळू लागते...

ते वर्ष होतं १९५१. एमआय-६ या ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेला खबर लागली, की प्रोफेसर ॲलन ट्यूरिंग यांच्याकडं घरफोडी झाली आहे. दोघा पोलिसांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलं, तेव्हा स्वत: प्रोफेसर वायरी-बटणांच्या अवाढव्य जंजाळात जमिनीवर सांडलेली पावडर काळजीपूर्वक उचलत होते. घरफोडीची खबर तर त्यांनी फेटाळलीच; पण ‘ही पावडर म्हणजे सायनाइड असून, एक कणसुद्धा हुंगलात तर मराल’ असं सांगून त्यांनी पोलिसांनाच टरकवलं आणि हाकलून दिलं. प्रोफेसरमहाशय काहीतरी दडवताहेत, अशी शंका पोलिसांना येणं साहजिकच होतं.
इथून काळ १२ वर्षांनी मागं जातो...
१९३९ मध्ये दुसरं महायुद्ध धडधडून पेटलं होतं. बॉम्बवर्षावाच्या भयानं तब्बल आठ लाख ब्रिटिशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत होतं. अशा धुमसत्या काळात २७ वर्षांचा ॲलन ट्यूरिंग रेल्वेनं ब्लेचली पार्क इथल्या नौदलाच्या कचेरीत पोचला. कमांडर डेनिस्टन यांची भेट त्याला हवी आहे. डेनिस्टन यांनी कागदपत्रं चाळत विचारलं.
‘‘तुम्ही म्हणजे गणितातला मूर्तिमंत चमत्कार दिसताय!’’
‘‘वेल्‌...थोडासा.’’
‘‘तुम्हाला सरकारी नोकरी का हवी आहे?’’
‘‘मला नकोय...सरकारला माझी गरज आहे, असं मला वाटतं.’’
‘‘ निघा...!’’
‘‘एनिग्मा या जर्मन कोडयंत्राची उकल करण्यासाठी तुम्हाला माणूस हवा आहे. माझी मदत होऊ शकेल,’’ ट्यूरिंगनं अचूक खडा टाकला. कमांडर डेनिस्टन चरकले. एनिग्माबद्दल याला काय माहिती आहे?
‘‘जगातले सर्व तज्ज्ञ थकले आहेत. ‘एनिग्मा अनब्रेकेबल आहे,’ असं सगळे म्हणतात. तुम्ही कसं काय करू शकाल? तुम्हाला जर्मन येतं?’’
‘‘नाही’’
‘‘बर्टोल्ट ब्रेख्तपेक्षा चांगलं जर्मन येणाऱ्या एका थोर लेखकाला मी आत्ताच हाकलून दिलं आहे. तुम्हीही निघालेलं बरं!’’ (टिप : हा उल्लेख ‘हॉबिट’ आणि ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ ही क्‍लासिक्‍स लिहिणारे सुप्रसिद्ध लेखक जे. आर. आर. टोल्किन यांच्याविषयीचा आहे).
‘‘कोडलिपीचा भाषेशी संबंध नसतो. जर्मन कोडलिपी ही माझ्या मते कोड्यासारखी आहे. शिवाय प्रयत्नांशिवाय दुसरं काही तुमच्या हातात नाही. व्हाय नॉट ट्राय मी?’’
...अशा तऱ्हेनं ॲलन ट्यूरिंग एनिग्मा या कोडयंत्राच्या उकलीच्या गुप्त कामगिरीला लागला.
एनिग्मा हे काय प्रकरण होतं? नाझी जर्मनीनं अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर हे इलेक्‍ट्रोमेकॅनिकल रोटर सायफर यंत्र विकसित केलं होतं. पहिल्या महायुद्धापासून त्याचा वापर होत असे. आर्थर शेरबायसनामक एका जर्मन इंजिनिअरचा हा शोध. सहस्रावधी सेटिंग्ज असलेलं हे यंत्र सांकेतिक लिपीत आपल्या जहाजांना, विमानांना, लष्करी तळांना संदेश पाठवू शकायचं. तशी पोलंड, फ्रान्स यांच्याकडंही एनिग्मा यंत्रं होती, पण जर्मन यंत्राच्या मोर्स कोड संदेशांची उकल करणं कुणालाही साधलं नव्हतं. रात्री बाराच्या ठोक्‍याला त्याची सेटिंग्ज बदलली जायची. नवा दिवस. नवा कोड. अशी ही रचना होती. काही सुगावा लागण्याच्या आतच जर्मन यू-बोटी ब्रिटिश आरमार उद्‌ध्वस्त करत निघाल्या होत्या. युद्धकाळात अमेरिका दर आठवड्याला ब्रिटनकडं एक लाख टन धान्य पाठवायचं. दर आठवड्याला जर्मन बोटी ते धान्य बोटींसकट समुद्रातळी धाडायच्या.

दोस्तफौजांची ससेहोलपट होत होती. एनिग्मा कोडच्या उकल-कामगिरीवर ट्यूरिंगसह पीटर हिल्टन, जॉन केर्नक्रॉस, ह्यू अलेक्‍झांडर, किथ फरमन आणि चार्ल्स रिचर्डस असे आणखी गणिती मेंदूदेखील होते. ब्रिटिश गुप्तचरांनी मोठ्या हिकमतीनं बर्लिनहून पळवून आणलेलं एक एनिग्मा यंत्र समोर पडलं होतं; पण त्याच्या सेटिंग्जमधलं कुणालाही ओ की ठो समजत नव्हतं. रोज सकाळी सहाला कोड-मेसेज पाठवला जायचा. रात्री बाराला सेटिंग बदलणार. म्हणजे त्याची उकल करायला फक्‍त १८ तास मिळायचे. ह्यू अलेक्‍झांडर हा त्यांच्या टीमचा प्रमुख होताच; पण तो बुद्धिबळ चॅम्पियनसुद्धा होता. त्यानं असं शोधून काढलं की वेळेचा हिशेब करता या यंत्रात १५९ दशलक्ष दशलक्ष दशलक्ष इतक्‍या शक्‍यता असू शकतात. सगळ्या शक्‍यता तपासून बघायच्या म्हटल्या तर त्याला २० दशलक्ष वर्षं लागतील.

ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा या संशोधकांच्या मागं लागली होती. लवकर कोडब्रेक करा. माणसं मरतायत इथं. एमआय-६चा प्रमुख स्टुअर्ट मेंझीस त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. या मेंझीसवरूनच पुढं इयन फ्लेमिंग या लेखकाला जेम्स बाँडचं पात्र सुचलं...आणि हेच ते बाँडचे बॉस मि. एम!). एनिग्मा या कोडयंत्राला त्याच्यापेक्षाही प्रचंड ताकदीचं यंत्रच हरवू शकतं. ते बनवण्यासाठी एक लाख पौंड लागतील, असा तगादा ट्यूरिंगनं कमांडर डेनिस्टनकडं लावला. डेनिस्टननं त्याला उडवून लावलं. ‘तू एका लष्करी प्रकल्पाचा भाग आहेस, लष्करी शिस्तीनंच काम कर, ह्यू (ॲलेक्‍झांडर) तुझा प्रमुख आहे, त्याच्या आज्ञा पाळ,’ असा उलट दम दिला.
 ट्यूरिंगनं त्यांना विचारलं, ‘मग तुमचा बॉस कोण आहे?’ डेनिस्टननं त्याला नजरेनं भाजत ‘विन्स्टन चर्चिल’ असं उत्तर दिलं. ट्यूरिंगनं स्टुअर्ट मेंझीसकरवी थेट चर्चिल यांना पत्र पाठवून मागणी केली. चर्चिलसाहेबांनीही कमाल केली. त्यांनी त्याला एक लाख पाउंड मिळतील, याची व्यवस्था केलीच; शिवाय ह्यू अलेक्‍झांडरच्या जागी ट्यूरिंगला प्रकल्पप्रमुख नेमून टाकलं.
* * *

बालपणी ॲलनचा एक शाळूमित्र होता, क्रिस्तोफर मोरकॉम. स्वभावानं एककल्ली आणि तुसड्या ॲलनचं क्रिसशी मात्र जुळलं. क्रिस त्याला म्हणायचा ः ‘तू वेगळा आहेस...ऑड डक.’ सुरेख बदकापिलांतलं एक वेडं कुरूप पिल्लू; पण कुणी कल्पनाही करणार नाही, अशी तुझ्यासारखी वेगळी माणसंच काहीतरी कल्पनेपलीकडचं करून दाखवतात...क्रिसनं त्याला एक पुस्तकही दिलं. ‘कोड्‌स अँड सायफर्स’ नावाचं. त्या गूढ लिपीनं ॲलनलाही भुरळ घातली. मग क्रिस आणि ॲलन भरवर्गात एकमेकांना कोडलिपीतल्या चिठ्ठ्या देऊ-घेऊ लागले. क्रिसबद्दल वाटणारं आकर्षण ॲलनला आणखीच वेडं करत होतं; पण आपल्या भावना तो व्यक्‍त करू शकला नाही. त्यानं कोडलिपीतली एक चिठ्ठी तयार केली ः ‘आय लव्ह यू, क्रिस.’ पण ती दिली मात्र नाही. तेवढ्यात शाळेला सुट्टी लागली. सुट्टीनंतर आपण क्रिसला सांगून टाकायचं, असं ॲलननं ठरवलं होतं; पण सुट्टीनंतर घरी गेलेला क्रिस पुन्हा आलाच नाही. क्षयानं तो वारला होता.
ॲलनचं अव्यक्‍त प्रेम समलिंगी होतं. ते त्यानं उरात दडपून टाकलं.
* * *

माणसं काढून टाकलेली. आहेत ती ट्यूरिंगच्या तिरसट नेतृत्वाखाली धड काम करायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत नवी भरती करणं आवश्‍यक होतं. ट्यूरिंगनं वर्तमानपत्रात एक शब्दकोडं छापून आणलं. सोडवणाऱ्याला इनाम आणि सरकारी नोकरी! बाहेर बॉम्बिंग चाललेलं. लोक घर सोडून गेलेले. शब्दकोडी सोडवायला वेळ कुणाला होता? पण त्यातही जोन क्‍लार्क नावाच्या एका चलाख तरुणीनं ते साध्य केलं. मुलाखतीऐवजी आणखी एक कोडं सोडवण्याची इन्स्टंट स्पर्धा झाली. तीही तिनं जिंकली. ॲलननं तिला नोकरी देऊ केली.

ॲलन आणि त्याच्या टीमनं एक गणनयंत्र बनवत आणलं होतं. ॲलननं प्रेमानं त्याला ‘क्रिस्तोफर’ असं नाव दिलं होतं. अर्थात कामाच्या बाबतीत प्रगती शून्य होती. ‘दर रात्री १२ वाजता आपल्या कामाचे बारा वाजतात,’ असं ट्यूरिंग स्वत:च म्हणायचा. एका रात्री जर्मन गूढसंदेशाची उकल करताना ट्यूरिंगला दोन शब्दांचा गणिती पॅटर्न लक्षात आला. ते शब्द होते : हाइल हिटलर. या दोन शब्दांचा शोध घेतला तर आपल्याला पुढं जाता येईल, असं त्याला वाटलं. हा कोड ब्रेक करायला त्यानं जोनला सांगितलं.

एका बीअर पार्टीत गोपनीय कामं करणाऱ्या काही मित्रांशी बोलताना ट्यूरिंगनं आपल्या समलिंगी आकर्षणाबद्दल कबुली दिली. ‘आम्हाला अंदाज होताच’ अशी मित्रांची प्रतिक्रिया होती. अशा गोष्टी लपून थोड्याच राहतात? त्याच पार्टीत जोनच्या एका मैत्रिणीनं गंमत सांगितली. ती म्हणाली : ‘एक जर्मन एजंट त्याचा संदेश ‘सीआयएलएलवाय’ या अक्षरानं करतो, बहुधा त्याच्या मैत्रिणीचं नाव असणार!’ हे ऐकून ॲलनचे कान टवकारले. पार्टी सोडून तो तत्काळ आपल्या कामाच्या ठिकाणी पळाला. त्याच्यापाठोपाठ त्याची सगळी टीम.
विशिष्ट कळीची अक्षरं दाबून आपण या यंत्राद्वारे संबंधित संदेश हुडकू शकतो आणि त्याचा अर्थही लावू शकतो, हे काही तासांतच लक्षात आलं. एनिग्मा क्रॅक करण्यात ब्रिटिशांना यश आलं होतं. ट्यूरिंगचं यंत्र वरदान ठरलं.

हे अर्थात विनाअडथळा झालं नाही. ट्यूरिंगच्या चमूतला कुणीतरी रशियाला गुप्त माहिती पुरवतोय, हे एमआय-६च्या ध्यानात आलं. कमांडर डेनिस्टनचा संशय ट्यूरिंगवर होता. अबोल, गूढ आणि स्वत:पुरतं पाहणारा ट्यूरिंग हाच डबल एजंट असला पाहिजे, अशी त्यांची खात्री होती. त्याच्यामुळं बिचारी जोन क्‍लार्क भरडली गेली. कारण, मधल्या काळात ट्यूरिंग तिच्यात काही काळ गुंतला होता. इतका की एक तांब्याच्या तारेची अंगठीसुद्धा त्यानं तिला पेश केली होती; पण तो गुप्तहेर केर्नक्रॉस निघाला. ट्यूरिंगचं वरिष्ठांशी जमत नव्हतंच. जोनला त्रास होऊ नये, म्हणून त्यानं तिला ‘मी समलिंगी असल्यानं एकत्र राहाणं अशक्‍य आहे,’ असं सांगून टाकलं. त्याची एनिग्मा टीम संपुष्टात आली.
* * *

पुन्हा सन १९५१. प्रोफेसर ट्यूरिंग काय लपवताहेत? पोलिसांनी छडा लावलाच. एका जोडीदारासोबत त्यांनी ती रात्र घालवली होती. त्या जोडीदारानं काही माल लुटून त्यांच्या घरातून पळ काढला होता. ही गोष्ट प्रोफेसर ट्यूरिंग लपवत होते...तपास-अधिकारी रॉबर्ट नॉक्‍स याला चौकशीमध्ये ट्यूरिंग यांनी सगळं सांगून टाकलं. त्या पहिल्या सज्जड दमासकट.
‘‘ही इमिटेशन गेम काय भानगड आहे? तुमचा शोधनिबंध?’’ नॉक्‍सनं विचारलं.
‘‘तो एक...खेळ आहे म्हणा हवं तर...माणूस आणि यंत्र यांच्यातला फरक ओळखणारं यंत्र किंवा...’’ चाचरत, अडखळत टयूरिंग म्हणाले.
‘‘यंत्रं विचार करतात?’’ नॉक्‍सनं विचारलं.
‘‘माणसासारखा नाही करत; पण तुम्ही माझ्यासारखा विचार करत नाही, याचा अर्थ तुम्हाला विचार करता येत नाही, असं कसं म्हणता येईल? तांब्या-पितळेची ही भेंडोळी त्यांच्या पद्धतीनं विचारच करतात,’’ ट्यूरिंग यांनी संयमानं उत्तर दिलं. नंतर हताशपणानं त्यांनी त्या चौकशी-अधिकाऱ्याला विचारलं : ‘‘बोल, आता मी माणूस आहे की यंत्र? एक वॉर-हीरो की एक गुन्हेगार?’’
‘‘माहीत नाही...सर.’’
‘‘मग तुझाही मला काही उपयोग नाही,’’ ट्यूरिंग यांचे हे अखेरचे शब्द होते.
...पुढं सगळी शोकान्तिकाच घडली. समलिंगी संबंध हा तेव्हा ब्रिटनमधला अत्यंत घृणास्पद गुन्हा होता. तरीही न्यायालयानं त्यांना पर्याय दिला. तुरुंगात जा किंवा हॉर्मोनल उपचारांना सामोरे जा. हे उपचार म्हणजे शरीरातलं इस्ट्रोजेन हे स्त्रैण संप्रेरक वाढवायचं. त्यानं लैंगिक प्रेरणा कमी होतील. हॉर्मोनचे उपचार सुरू असताना घरात राहून संशोधन करायला कोर्टाची हरकत नव्हती. प्रोफेसर ॲलन ट्यूरिंग यांनी दुसरा मार्ग निवडला. या उपचारांचे त्यांच्यावर घातक परिणाम झाले. आवाज बदलला. शरीराची ठेवण बदलू लागली. प्रकृती ढासळली.
२३ जून १९५४ रोजी ते त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. उशाशी एक अर्धवट खाल्लेलं सफरचंद होतं. त्यात सायनाइडचे कण घालून त्यांनी जीवन संपवलं असावं, असा अंदाज बांधला गेला. त्या सफरचंदाची कुणीही तपासणी करू धजलं नाही.
पुढं सन २०१३ ब्रिटननं समलिंगी संबंधाबद्दल उदार भूमिका स्वीकारली. कायद्यात बदल केला. ब्रिटनच्या राणीसाहेबांनी ट्यूरिंग यांना मरणोत्तर शाही माफी दिली. पंतप्रधानांनी देशाच्या वतीनं ट्यूरिंग यांची जाहीर माफी मागितली.
एक पर्व संपलं. तोवर कॉम्प्युटरयुगाचा सूर्य कासराभर वर आला होता.
* * *

ब्रिटिश गणिती आणि लेखक अँड्य्रू हॉजेस यांनी ‘ब्रेकिंग द कोड’ या नावाचं एक नाटक पाहिलं. ते ट्यूरिंग यांच्या जीवनावर आधारित होतं. ते पाहून भारावलेल्या हॉजेस यांनी झपाटल्यागत जबरदस्त माहिती मिळवत ‘ॲलन ट्यूरिंग : द एनिग्मा’ हे चरित्र लिहिलं. (किंमत ४६७ रुपये. ऑनलाइन उपलब्ध.) त्याच्यावर आधारित चित्रपट म्हणजे ‘इमिटेशन गेम’. बेनेडिक्‍ट कम्बरबॅच या बेजोड अभिनेत्यानं साकारलेला ट्यूरिंग म्हणजे व्यक्‍तिरेखाचित्रणाचा अलौकिक वस्तुपाठ आहे. कसून अभ्यास, मेहनत यांची जोड प्रतिभेला मिळाली की काय होतं, याचं सुरेख उदाहरण. खरंतर त्याला या भूमिकेसाठी ऑस्करच मिळायचं; पण नेमका त्याच वर्षी स्टीफन हॉकिंगचं बायोपिक असलेला ‘थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ आला आणि एडी रेडमेननं ऑस्करची बाहुली पटकावली. आयुष्यात पहिल्यांदा ‘इमिटेशन गेम’साठी पटकथा लिहिणारा ग्रॅहम मूर मात्र ऑस्कर मिळवून गेला. तरीही मॉर्टेन टिल्डम या नॉर्वेजियन दिग्दर्शकानं खूप संवेदनेनं हा सिनेमा केला आहे, हे जाणवत राहतं. आज तारीख १८ जून. आणखी सहा दिवसांनी ट्यूरिंग ह्यांची पुण्यतिथी. म्हणजे ‘इमिटेशन गेम’ पुन्हा एकदा पाहायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com