मंगळदासाची बखर (प्रवीण टोकेकर)

मंगळदासाची बखर (प्रवीण टोकेकर)

‘द मार्शियन’ हा सिनेमा बघण्यासाठी तुम्हाला भौतिकशास्त्र, बॉटनी, रॉकेट सायन्स हे शिकण्याची काहीही गरज नाही. तो चित्रपटच तुम्हाला या विषयांचं जुजबी ज्ञान देऊन मोकळा होतो. ‘कधीही न चुकावा’ असा अनुभव आयुष्यात घ्यायचा असेल, तर हा सिनेमा पाहायलाच हवा.

पुण्याच्या गल्ली-बोळांत साधा पत्ता शोधताना आपली फेफे उडते. कॉलरीत घाम साठतो. पायाचे तुकडे पडतात. तहानेनं घसा कोरडा पडतो. ‘इथंच कुठं तरी सांगितला होता...’ हे वाक्‍य आपण सत्रांदा स्वत:शीच घोकतो. ‘मरू दे, जाऊ परत...’ असंही एक मन घोकत असतंच. एकटं एकटं वाटून धीर खचतो. मार्क वॉटनी तर चक्‍क मंगळावर एकटा अडकला होता. त्याच्या कुंडलीत कडक मंगळ असणार. नाहीतर वनस्पतीशास्त्राचा हा डॉक्‍टरेट मिळवलेला गडी मंगळावर कुठं तडफडला?
-मार्क वॉटनीची टेरिफिक कथा ‘द मार्शियन’ हा चमत्कारी विज्ञानपट सांगतो. चित्रपट टेरिफिक आहेच; पण अँडी विअर नावाच्या लेखकानं लिहिलेली मूळ कादंबरी तर सुपरटेरिफिक आहे. अँडी विअर हा वास्तविक एक कॉम्प्युटर प्रोग्रामर; पण त्यानं अंतराळशास्त्राची बुकं कोळून प्यायली आणि मग आपल्या ‘ब्लॉग’वर ही कादंबरी-मालिका लिहायला सुरवात केली. ही घटना २०१२ ची असेल. मग त्याचं पुस्तकही आलं. ते तुफानी खपाचं ठरलं आणि आदित्य सूद नावाच्या हॉलिवूडच्या जबरदस्त निर्मात्याच्या हातात पडलं. ते वाचून तो हडबडला. आदित्य सूद हे नाव वाचून तुम्हीसुद्धा च्याट पडला असणार! नाव भारतीय आहे; पण हा भारतीय वंशाचा गडी तद्दन अमेरिकी आहे. ‘डेडपूल’, ‘लोगान’, ‘एक्‍स मेन : अपोकॅलिप्स’, ‘सिंड्रेला’, ‘लेट्‌स बी कॉप्स’ असले भारी भारी सिनेमे त्यानं प्रोड्यूस केले आहेत; पण ते जाऊ दे. स्टोरी मार्क वॉटनीची आहे. अँडी विअर यानं ‘द मार्शियन‘ लिहिताना इतकं संशोधन केलं होतं, की त्यावरचा चित्रपट ‘सगळ्यात प्रामाणिक विज्ञान-काल्पनिका’ ठरला नसता तरंच नवल होतं. बरं, हा सिनेमा बघायला तुम्हाला भौतिकशास्त्र, बॉटनी, रॉकेट सायन्स हे शिकण्याची काहीही गरज नाही. तो चित्रपटच तुम्हाला जुजबी ज्ञान देऊन मोकळा होतो. आयुष्यात ‘कधीही न चुकावा’ असा अनुभव घ्यायचा असेल, तर ‘द मार्शियन’ बघणं भाग आहे.
* * *

‘हर्मिस’ हे नासाचं प्रचंड अवकाशयान एकदाचं गंतव्यस्थानी पोचलं. मंगळ. सूर्यमालिकेतला चौथा ग्रह. पृथ्वीवरच्या समस्त पुरुषजमातीचं तथाकथित उगमस्थान! हर्मिस तिथं उतरणं शक्‍य नाही; पण एका छोट्या मंगळयानानिशी त्या अंतराळवीरांनी पृष्ठभूमी गाठली. हर्मिस मंगळाच्या कक्षेत घिरट्या घालत राहिलं.

तिथले काही मातीचे नमुने अभ्यासायचे...मंगळभूमीवर बी पेरता येईल का, झाडं उगवतील का, यासाठी काही प्रयोग करायचे, अशी ही मोहीम होती. म्हणून वनस्पतीशास्त्रातला जाणकार मार्क वॉटनी अंतराळवीर म्हणून तिथं गेला होता. त्याच्या चमूची कमांडर होती मेलिसा लुईस. सोबत ‘आयटी’मधली जाणकार बेथ जोहान्सन, पायलट रिक मार्टिनेझ, फ्लाइट सर्जन डॉ. क्रिस बेक आणि नेव्हिगेटर-कम-रसायनशास्त्रज्ञ ॲलेक्‍स वॉगल. एकूण चमू सहा जणांचा. तिथल्या ॲरिस-३ च्या लॅंडिग साईटवर, म्हणजेच ॲसिडालिया प्लांटिशिया नावाच्या भूभागावर ते उतरले. (मंगळभूमीचे बहुतेक नकाशे एव्हाना तयार असून त्यांना नावंही दिली गेली आहेत). तिथं जवळच ‘नासा’चा एक छोटासा तळही उभा राहिला आहे. तुलनेनं सुरक्षित असा. इतक्‍यात वादळाची चाहूल लागल्यानं सगळ्यांची घाई सुरू झाली. अखेर कमांडर लुईसनं मोहीम थांबवून सगळ्यांना यानाकडं परतण्याचा आदेश दिला. कसेबसे सगळे पोचले. मार्क सगळ्यात मागं होता. वादळात त्याला पाऊल टाकवेना.  मंगळावरची वादळं भयानक असतात. रात्री तापमान उणे १२६ पर्यंत घसरू शकतं. तिथं गुरुत्वाकर्षणही पृथ्वीच्या ३८ टक्‍के एवढंच आहे. म्हणजे एखाद्याचं वजन १०० किलो असेल, तर तिथं तो साठेक किलोचा हलकाफुल होणार. वातावरणही विरळ. पृथ्वीच्या जेमतेम एखादा टक्‍का. कार्बन डायॉक्‍साइडचं प्रमाण जवळपास ९६ टक्‍के आहे नि ऑक्‍सिजन पाव टक्‍कापण नाही. धूळ मात्र प्रचंड. त्या धुळीनंच मार्कचा घात केला.

...यानाची एक डिश अँटेना वाऱ्याच्या झोतात तुटली आणि गरगरत थेट मार्कवर आदळली. अँटेनाची सळई त्याचा पोशाख कचकन्‌ भेदून शरीरात घुसली. असह्य वेदनांनी तो कोसळला. मनावर दगड ठेवून कमांडर लुईसनं उड्डाणाचा आदेश दिला. यान कसबसं निसटलं. मार्कचा देह मंगळावर पडून राहिला...
* * *

इकडं पृथ्वीवर ’नासा’चे संचालक टेडी सॅंडर्स यांनी पत्रकार परिषद घेऊन जगाला बातमी दिली, की मंगळावरच्या वादळातून हर्मिसचा क्रू सुखरूप वाचला आहे; मार्क मात्र आपण गमावला. ही निश्‍चितच दु:खद बाब आहे..वगैरे वगैरे.

पण मार्क जिवंत होता. जायबंदी होता आणि मुख्य म्हणजे एकटा होता. खुरडत खुरडत तो नजीकच्या तळाकडं पोचला. अँटेनाचा शरीरात घुसलेला तुकडा त्यानं महत्प्रयासानं काढून टाकला. रक्‍तस्राव रोखला. त्यानं आसपास नजर टाकली. व्हिडिओ लॉग इन करून ‘मी जिवंत आहे’ एवढा संदेश त्यानं पाठवला; पण व्यर्थ! हर्मिस किंवा पृथ्वी दोहोंपैकी कुठंही संपर्क साधला जात नव्हता. हा तळ छोटासा; पण सुसज्ज होता. इथं प्राणवायू होता. सहा जणांच्या चमूसाठी पुरेल एवढा अन्नसाठा होता. म्हणजे त्याला एकट्याला वर्षभर पुरला असता; पण यानंतरची मंगळमोहीम चार वर्षांनी येणार. तोवर तग धरणं मात्र अशक्‍य आहे. नजर जाईल तिथं लाल धूळ. उंच उंच पर्वतरांगा. सगळं बोडकं. ओकंबोकं. जीवसृष्टीचा मागमूस नाही. आपण जिवंत का राहिलोय? हलोऽऽ...एनीबडी हिअर?
* * *

...एडी सॅंडर्स यानं इथं मार्कला समारंभपूर्वक श्रद्धांजली वगैरे वाहिली. अमेरिकेला खूप दु:ख झालं. मंगळमोहिमेचा प्रमुख व्हिन्सेंट कपूर (कादंबरीत हा गृहस्थ वेंकट कपूर या नावानं येतो) याला एकदा तरी, मार्कच्या मृतदेहाचं काय झालं, हे बघायचं आहे. त्यासाठी उपग्रहाची दुर्बिण मंगळाकडं वळवावी लागणार; पण सॅंडर्सनं नकार दिला. उपग्रहाच्या दुर्बिणीचा चॅनल पुरेसा गुप्त नाही. तिथली (मार्कच्या मृतदेहाची) छायाचित्रं ‘चुकून’ बाहेर गेली तर अनर्थ घडेल, असं त्याचं म्हणणं; पण व्हिन्सेंट कपूरची एक कनिष्ठ सहकारी मिंडी पार्क या इंजिनिअर तरुणीनं ॲरिस-३ ची छायाचित्रं बघितली आणि तिला धक्‍काच बसला. रोव्हरची जागा बदलली होती. मंगळतळावरची सौर पॅनल्स स्वच्छ केलेली दिसत होती. कुणीतरी आहे तिथं! तिनं ताबडतोब व्हिन्सेंटला गाठलं. त्यानंही छायाचित्रं बघितली. म्हणजे? मार्क जिवंत आहे? ओह, डिअर गॉड!
* * *

स्थळ : मंगळ. मार्क आता मंगळावर बहुधा सेटल झालाय. त्यानं बटाट्याचं पीक घ्यायला सुरवात केलीये. मुळात तो वनस्पतीशास्त्रज्ञ. प्रतिकूल परिस्थितीत बियाणं रुजवण्याची किमया त्याला येते. माती म्हणून त्यानं अन्य सहकाऱ्यांची, स्वत:ची विष्ठा वापरायला सुरवात केली आहे! पण पाण्याला पर्याय नाही. पाणी : हायड्रोजनचे दोन अणू, ऑक्‍सिजनचा एक. एचटूओ. त्याच्यापाशी हायड्राझाइन हे रॉकेटइंधन बरंच होतं. ते नियंत्रित अवस्थेत जाळता आलं तर थेट पाणी मिळू शकेल, असा त्याचा अंदाज होता. तो खरा ठरला. अर्थात या प्रकारात एकदा त्याला किरकोळ भाजलंदेखील. लांबवर उत्तरेकडं शियापारेलीची दरी आहे. तिथं चार वर्षांनी ॲरिस-४ उतरेल. परसात उभ्या असलेल्या रोव्हरनं (मंगळावरचं चिमुकलं वाहन) तिथं जाता आलं तर काहीतरी आशा आहे. त्याला आठवलं. सन १९९७ मध्ये ‘नासा’नं मंगळावर पाथफाइंडर पाठवलं होतं. त्याची बॅटरी संपल्यानं ते इथंच कुठंतरी असेल. त्याला चार्ज करून पृथ्वीशी संपर्क साधता येऊ शकेल. त्याची आशा बळावली. मंगळावर दिवसाला ‘डे’ म्हणत नाहीत. तिथं उगवतो नि मावळतो तो ‘सोल.’ तिथला सोल २३ तास ५६ मिनिटं आणि चार सेकंदांचा नाही (ज्याला आपण साध्या भाषेत २४ तास म्हणतो). तो ३७ मिनिटं लांबलेला असतो. एकंदरीत, मार्कचे ‘सोल’ भरलेले होते.
* * *

मार्कइतका खटपट्या माणूस उभ्या मंगळभूमीवर सापडणार नाही. म्हणजे तिथं माणूस नाहीच म्हणा; पण पठ्ठ्यानं जिद्दीनं धुळीत निम्मं-अधिक पुरलं गेलेलं पाथफाइंडर शोधून काढलंच. त्याची सौर पॅनल्स पसरून चार्ज केली. छायाचित्र संदेशवहनाची यंत्रणा चक्‍क सुरू होती. तो हरखला. त्यानं हेक्‍साडेसिमल पद्धतीनं कार्ड तयार करून ‘मी जिवंत आहे’ हा संदेश यशस्वीरीत्या ‘नासा’ला धाडला. व्हिन्सेंट कपूरनं तो वाचला. मग सुरू झाला मानवी संवादाचा एक मनोज्ञ सिलसिला. हेक्‍साडेसिमल पद्धत ही दशांश चिन्हांसारखीच एक पद्धत आहे.
‘नासा’च्या मंडळींनी इथून त्याला रोव्हरची संपर्कयंत्रणा हॅक करण्यासाठी मार्गदर्शन केलं. आता मार्क त्यांच्याशी चॅटिंगसुद्धा करू शकतो.
- मार्क, आम्ही तुला गेले दोन महिने बघतो आहोत.
- ओके. हर्मिसचा क्रू कसा आहे?
- वेल्‌,  तू अजून जिवंत आहेस, हे आम्ही त्यांना सांगितलेलं नाही.
-का? भ***नो, का?
-मार्क, भाषा जपून वापर. आख्खं जग हे चॅटिंग लाइव्ह वाचतंय!
-अस्सं? मग ** ** *!!!
* * *

हर्मिसवरच्या चमूलाही शेवटी कळवलं गेलं. मार्क जिवंत आहे, हे ऐकून कमांडर लुईससकट सगळे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांना अपराधी वाटलं; पण ते बरेच पुढं निघून आले होते. इकडं पृथ्वीवर गोंधळ उडाला. मार्कला आपण ८६८ व्या सोलला गाठू शकतो. त्याच्याकडं असलेला अन्नाचा साठा ९०० सोल पुरेल इतका आहे. मग? आणायचं परत त्याला? नकोच. राहू दे त्याला...जमतील तितके दिवस.
- मार्कचा आणि हर्मिसचाही संपर्क झाला.
- मार्क : हाय मार्टिनेझ, कसा आहेस?
-मार्टिनेझ : मस्त! तू नसल्यामुळं इथं जागा भरपूर झाली आहे आणि अन्नही भरपूर उरतंय!
मार्क : कमांडर लुईस, तुझ्या डिस्को गाण्यांच्या सीड्या राहिल्या की इथं!
कमांडर लुईस : ऐक तूच. वेळ जाईल बरा!
-मार्क : तुझी गाण्यातली टेस्ट हॉरिबल आहे!
* * *

दुर्दैव क्रमांक एक, पृथ्वी : एक प्रोब अन्नसाठ्यासकट घाईघाईनं सोडण्यात आला. तो आकाशात फुटला. दुर्दैव क्रमांक दोन, मंगळ : मार्कच्या अवकाशतळावरचं संरक्षकछत वादळात उडालं. तिथल्या नियंत्रित वातावरणाचा एकदम आक्रसून स्फोट झाला. नियंत्रित वातावरणात बहरलेलं मार्कचं बटाट्याचं शेत गोठून, करपून गेलं. त्याच्याकडं आता फक्‍त ३०० सोल पुरेल इतकाच साठा उरला आहे. मग मृत्यू ठरलेला.
* * *

एका चिनी स्पेस सेंटरनं मंगळावरचा तो स्फोट टिपला. आमची काही मदत हवी आहे का, असं त्यांनी ‘नासा’ला विचारलं. दरम्यान, एक भन्नाट प्रकार ‘नासा’तच घडत होता. रिच पर्नेल म्हणून एक ॲस्ट्रोडायनॅमिक्‍समधला ‘बाप’ तरुण ‘नासा’च्या भात्यात होता. विक्षिप्त; पण कमालीचा तल्लख. त्यानं एक शक्‍कल शोधून काढली. हर्मिस पृथ्वीकडं निघालं आहे. गुरुत्वाकर्षणानं त्याचा वेग वाढेल. ते अवकाशयान पृथ्वीवर आणायचंच नाही. पृथ्वीच्या गुरुत्वशक्‍तीचाच फायदा घेऊन गोल वळसा घालत परत मंगळावर पाठवायचं. चिनी स्पेस सेंटरनं मधल्या काळात त्यांना इंधन पाठवावं. हर्मिस मार्कला पिक करेल. ‘रिच पर्नेल हा गाढव आहे,’ असं सांगून ‘नासा’चे संचालक सॅंडर्स यांनी सपशेल नकार दिला; पण हर्मिसचा प्रमुख संचालक हेंडरसनला राहवेना. त्यानं पर्नेलचा प्लॅन सरळ हर्मिसच्या क्रूला कळवला. हे बेकायदा कृत्य होतं. हर्मिस-कमांडर लुईसनं आपल्या सहकाऱ्यांचं मत घेतलं. मार्कला आणायला गेलो तर आपल्यावर कोर्टमार्शलची कारवाई होईल. काय करायचं? सगळ्यांनी सांगितलं ः ‘चला, मार्ककडं.’
* * *

मार्क एव्हाना खूप हडकुळा झाला होता. बटाटे जपून वापरणं अंगलट आलं होतं. दाढी वाढली होती. दात किडले होते; पण जिद्दीनं तो ॲरिस-४ या पुढल्या मोहिमेच्या लॅंडिंग साइटवर आला. कारण, त्याला मिळालेल्या नव्या माहितीनुसार, तिथं एक मंगळयान आधीच येऊन ‘पार्क’ झालेलं होतं; पण तिथवर जायचं म्हणजे ३२०० किलोमीटरचा प्रवास आहे. रोव्हरमधून करावा लागणार. रोज १३ तास त्याच्या सौर बॅटऱ्या चार्ज करत करत जायचं. मार्क निघाला.
...हलो देअर...मंगळावरचा मी पहिला वनस्पतीशास्त्रज्ञ आणि शेतकरीसुद्धा आहे. आणि हो, इथली भूमी ही एक प्रकारे आंतरराष्ट्रीय समुद्रासारखीच आहे. कुणाचाही हक्‍क नसलेल्या जागी मेरिटाइम कायदे लागू होतात. ‘नासा’चं मंगळयान पळवणं हा गुन्हा आहे. त्यादृष्टीनं मी मंगळावरचा पहिला चाचासुद्धा आहे.- स्पेस पायरेट. परवाच मी इथलं ते अमकं शिखर सर केलं. म्हणजे मी मंगळावरचा पहिला गिर्यारोहकसुद्धा आहे. मी पहिला, पहिला, पहिला...
* * *

हर्मिसनं आपली सगळी नियंत्रणं मॅन्युअल करून ‘नासा’चे कंट्रोल्स रद्द केले. कमांडर लुईसच्या नेतृत्वाखाली चमू मंगळाकडं निघाला. ...पण एक भानगड आहे. हर्मिस मंगळावर उतरू शकत नाही. मार्कलाच मंगळाचं वातावरण भेदून हर्मिसच्या कक्षेत यावं लागेल. तो कसा येणार? तो मंगळयानात बसून येणार; पण त्या यानाचं वजन कमी केलं, तरच तो अपेक्षित वेगात हर्मिसपर्यंत येऊ शकेल. जरासुद्धा उशीर झाला तर अंतराळात वाहून जाताना हर्मिसकडं बघून बाय बाय करावं लागेल. दोन्ही यानांची वेगाची गणितं जुळली पाहिजेत. अफाट अंतराळात नेमकं कुठं भेटायचं, हे ठरवावं लागेल. तसं ठरवणारी यंत्रणा मार्कपाशी नाही. तब्बल ३१२ मीटरचा फरक पडतो आहे. मार्क हर्मिसपर्यंत पोचू शकत नाही. त्याला स्पेसवॉक करून आणण्याचं अंतर यात गृहीत धरलं आहे. हा माणूस हातचा जाणार हे नक्‍की. मंगळानं घेतलेला पहिला बळी ः मार्क वॉटनी. पण तसं घडत नाही. अत्यंत थरारक, ज्याला अंतराळविज्ञानाची पराकोटी म्हणता येईल, अशा वैज्ञानिक घटना आणि मानवी जिद्द यांचं मिश्रण झालं की काय होतं? मार्क स्वत:हून हर्मिसपर्यंत कसा पोचतो? ‘द मार्शियन’चा हा क्‍लायमॅक्‍स शब्दात पकडणं म्हणजे खुळेपणा ठरेल. तो पडद्यावर पाहावा किंवा अँडी विअरची कादंबरी वाचून काढावी. खरं तर दोन्ही करावं.
* * *

मॅट डॅमन या गुणी अभिनेत्यानं साकारलेला मार्क वॉटनी केवळ अफलातून आहे. बोर्न चित्रपट-मालिकेतला जेसन बोर्न म्हणून सिनेरसिक त्याला ओळखत असतील; पण हा एक अद्भुत अभिनेता आहे, हे तर खरंच. क्रिस्तोफर नोलानच्या ‘इंटरस्टेलार’मध्येही तो होता. २०१५ ला त्याचं ऑस्कर जवळपास नक्‍की होतं; पण ‘द रेव्हनंट’चा लिओनार्डो डिकॅप्रियो सरस ठरला. ड्‍रु गोडार्ड या पटकथालेखकानं अँडी विअरच्या कादंबरीचं किती सोनं केलंय, हे ‘द मार्शियन’ बघताना पदोपदी जाणवतं. या चित्रपटातले संवाद तर इतके अप्रतिम आहेत, की आपण सहज त्यांचा एक भाग होऊन जातो. सर रिडली स्कॉट हे हॉलिवूडमधले नामवंत दिग्दर्शक. ‘एलियन’ आठवतोय? तो त्यांचाच. ‘ग्लॅडिएटर’, ‘थेल्मा अँड लुईस’, ‘ब्लॅक हॉक डाऊन’ आणि ‘प्रोमिथिअस’सुद्धा. मॅट डॅमन आणि रिडली स्कॉट एकत्र आल्यावर सगळं चित्रच बदललं. मुख्य म्हणजे बजेट प्रचंड वाढलं. जेसिका चेस्टेन हिनं साकारलेली कमांडर लुईस ग्रेट आहे. ‘झीरो डार्क थर्टी’मध्येही ती दिसली होतीच. ‘द मार्शियन’मध्ये व्हिन्सेंट कपूर ही एक व्यक्‍तिरेखा आहे. याची आई ख्रिश्‍चन आणि वडील भारतीय असतात, असा हा मंगळमोहिमेचा प्रमुख अधिकारी. ही भूमिका आधी आपल्या इरफान खानला ऑफर झाली होती; पण तेव्हा तो नेमका ‘पिकू’ हा हिंदी चित्रपट करण्यात बिझी होता. असो. ‘द मार्शियन’चं एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण चित्रपटात एक मंगळ ग्रहाचा कडक स्वभाव सोडला तर एकही खलनायक नाही. सगळीच बऱ्यापैकी भली माणसं इथं गोळा झाली आहेत. एवढं मोठं अंतराळधाडस; पण एकही व्यक्‍ती रक्‍तबंबाळ वगैरे होऊन मरतबिरत नाही. नो बॉडी काउंट!

...सुन्न करणारा अनुभव देत ही मंगळदासाची बखर संपते. बऱ्याच काळानं आपल्याला भान येतं. अरेच्चा, ही सगळी विज्ञान-काल्पनिका होती. माणूस अजून मंगळावर कुठं पोचलाय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com