असं एखादं पाखरू वेल्हाळ... (प्रवीण टोकेकर)

असं एखादं पाखरू वेल्हाळ... (प्रवीण टोकेकर)

वर्णद्वेष, जातीयता, बलात्कार, खून असल्या गोष्टी असूनही हा चित्रपट आग्रहानं मुला-बाळांना दाखवला गेला. हे उदाहरण विरळाच मानावं लागेल. शाळा सुरू होते, त्या वयात मुलांची जडणघडण वेगानं होत असते. भल्याबुऱ्या गोष्टी ती शिकत असतात. अशा वयात ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ बघायला मिळाला तर काम बरंचसं सोपं होऊन जातं. हा चित्रपट पाहून द ग्रेट वॉल्ट डिस्नी म्हणाला होता ः ‘‘अरे, लेको, मला हा असा चित्रपट काढायचा असतो रे नेहमी!’’

रा  नात एक पाखरू असतं म्हणे. मोठं बाजिंदं असतं. भुऱ्या मानेचं. करड्या पंखांचं. पिवळट पोटाचं. चिमुकल्या चोचीचं. असतं मोठं नक्‍कलबाज. कुठं सुतार पक्ष्याच्या ठोकठोकीचा आवाज काढील. कुठं फॉरिष्टाच्या जीपेचा आवाज काढून बाकीच्या प्राणिमात्रांची घाबरगुंडी उडवील. कुठं उगीच मोरासारखी केका देईल. माकडासारखं खाकरेल. हरणासारखा कोका देईल. साळुंकीसारखं कुलुकुलु बोलेल. सातबायांसारखा किचकिचाट करील. जंगलातला मिमिक्री आर्टिस्टच. बरं, हे पाखरू तसं पटकन दिसतही नाही. झाडपानोळ्यात मुरून नकला करतं. हिंदीत त्याला ‘नकलची चिडिया’ म्हणतात. इंग्रजीत ‘मॉकिंगबर्ड’.

असल्या नक्‍कलखोर पाखराला कधी गलोलीनं मारू नये. बिचारं ना कुणाच्या अध्यात, ना मध्यात. अवघ्या रानाचं मनोरंजन करणारं मजेदार पाखरू ते. त्याचा स्वभावच नकल्या. ही चिडिया कलाकार वृत्तीची असते. सृजनाच्या ऊर्मी तिला स्वस्थ बसू देत नाहीत, एवढंच. हां, आता कधी कधी नको तेव्हा गळा बोलून जातो त्या पाखराचा; पण त्यापायी जीव कशाला घ्यायचा?

नकल्या पाखराला मारणं म्हणजे निरागसतेला नख लावणं. वेलीवर डोलणारं फूल कचकन्‌ खुडणं. ते पापच. हाच, अगदी असाच संदेश देणारा एक जगावेगळा अभिजात चित्रपट १९६२ मध्ये पडद्यावर झळकला होता. त्या घटनेला आता ५५ वर्षं झाली आहेत; पण हा चित्रपट पुन्हा पुन्हा बघावा, दुसऱ्याला दाखवावा असं वाटत राहतं. चित्रपटाचं नाव होतं. ः टू किल अ मॉकिंगबर्ड. हार्पर ली नावाच्या एका लेखिकेनं याच नावाची कादंबरी लिहिली होती. ती अभिजात साहित्यात अढळ स्थान मिळवून गेली. तिला पुलित्झर पुरस्कार मिळाला, हे तर होतंच; पण या कादंबरीची मिजास अशी, की आजही अनेक ठिकाणी या कादंबरीतले धडे शाळेत शिकवले जातात. नाटुकल्या बसवल्या जातात. त्याची जाहीर वाचनं होतात. संस्कारवर्गातला तो अविभाज्य भाग होऊन बसला आहे. एकेकाळी तर ‘बायबल’च्या खालोखाल लोकप्रिय ठरलेलं पुस्तक मानलं जायचं ते. खरं तर हार्पर ली हिला एक सुबोध, छान बालकथा लिहायची होती; पण तिनं गोष्ट लिहिली त्यात भयकारी घटना होत्या. दहशत, बलात्कार, खोटं बोलणं, साक्षी-पुरावे, कोर्टकज्जे असल्या - लहान मुलांच्या जगात कधीच असू शकत नाहीत - गोष्टी होत्या. त्याला बालवाङ्‌मय कसं म्हणायचं? ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ हे खरंच बालवाङ्‌मय नाही. ते आहे मोठ्या माणसांचंच; पण निरागसता कशी हाताळायची असते, याचा वस्तुपाठ देणारं. एक सुंदर दृष्टिकोन बहाल करणारं.

चित्रपट अर्थातच संपूर्ण कृष्ण-धवल; पण त्याचं रसिकाच्या मनावर होणारं गारुड मात्र भलतंच रंगीत आहे. त्या रंगांचं मूळ हे कथावस्तूच्या मांडणीत आहे. ही कादंबरी किंवा चित्रपट आपल्या भेटीला येतो तो मात्र लहान मुलीच्या नजरेतून. सन १९२९ नंतर उद्भवलेल्या महामंदीच्या काळात ही गोष्ट घडते. २४ ऑगस्ट १९२९ रोजी एका काळ्या शुक्रवारी हजारो व्यापाऱ्यांनी अचानक तेरा दशलक्ष डॉलर्सचे (त्या काळातले तेरा दशलक्ष!) शेअर्स विकून टाकले. हाहाकार उडाला. कारखाने बंद पडू लागले. लोकांजवळचा पैसा संपला. बेरोजगारी २५ टक्‍क्‍यांवर गेली. दारिद्य्रानं कहर केला. त्या काळात अमेरिकेतल्या अलाबामामधल्या एका आळसट गावात ही घटना घडत होती...
* * *

मॅकॉम्ब हे अलाबामातलं एक छोटंसं गाव. पाचपन्नास टुमदार घरं. आसपास शेती. अरसपरस छोट्या बागा. ठराविक चाकोरीतलं जगणं. अशा गावात ॲटिकस फिंच आपल्या मुलांसोबत राहत होता. ॲटिकसला बायको नाही. ती चार वर्षांपूर्वी गेली. आईविना पोरं वाढवतोय तो प्रेमानं. जीन लुईस सहा वर्षांची आहे. तिचा मोठा भाऊ जेम आठ-नऊ वर्षांचा. घरकामाला एक कॅलपुर्निया नावाची कृष्णवर्णीय स्वयंपाकीण आहे. ती दिवसभर थांबते. घर सांभाळते. ॲटिकस पेशानं वकील आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी वकिली करणारा अगदीच मध्यमवर्गीय वकील. शेतीचे कज्जे. प्रॉपर्टीची भांडणं. व्यवहारातले बारकेसारके तंटे, कागदपत्रं, असली कायदेशीर कामं करून तो पोट भरतो आहे. खाऊन-पिऊन सुखी आहे ॲटिकस...पण तेवढंच. एक दिवस घराबाहेर खेळत असलेल्या जीन लुईसला वॉल्टर कनिंगहॅम येताना दिसला. तो गावातलाच शेतकरी होता. तिला लाडानं सगळे ‘स्काउट’ म्हणून ओळखतात. वॉल्टरनं संकोचून एक अक्रोडाची पिशवी स्काउटच्या हातात कोंबली आणि तो निघाला. ॲटिकसला तोंड देण्याआधीच त्याला पळून जायचं होतं. त्याचं काहीतरी कायद्याचं काम केल्याची फी म्हणून तो अक्रोड आणून देत होता म्हणे. माणसं साधी होती; पण मानी होती. मॅकॉम्बमधल्या शेतकऱ्यांकडं कुठून येणार पैसे? ते असलं काहीबाही देत परतफेड करत राहायचे.

उन्हाळ्याची सुटी होती. स्काउट आणि तिचा भाऊ जेम घराबाहेर खेळत असताना कोबीच्या वाफ्यात एक मुलगा दडलेला त्यांनी पाहिला. त्याचं नाव होतं डिल. शेजारच्या स्टीफनीमावशीकडं सुट्टीसाठी तो राहायला आला होता. स्काउट, जेम आणि डिलचं त्रिकूट काही मिनिटांत जमलं. डिल होताच चंट. दोघा भावंडांनी त्याला परिसराची माहिती दिली. उदाहरणार्थ : त्या मिसेस ड्यूबॉसच्या घरासमोरून पळत येऊ नकोस हं. त्यांच्याकडं बंदूक आहे. किंवा दोन घरं पलीकडं सोडून ते जुनं, बंद घर दिसतंय ना...तिथं कध्धीच जायचं नाही. तिथे बू रॅडली राहतो. तो राक्षस आहे. त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठा व्रण आहे. बू रॅडलीला कुणी पाहिलेलं नाही; पण तो अत्यंत खूँखार माणूस आहे म्हणे. त्याच्याकडं शस्त्र आहे. तो खुनी आहे खुनी...माहितीये? वस्तीतली मोठी माणसंही त्याच्याकडं कधी जात येत नाहीत. डिलच्या अवखळ मेंदूत खळबळ माजली. अमुक एका ठिकाणी जायचं नाही, असं मोठी माणसं म्हणतात, तेव्हा तिथं काहीही करून जायचं असतंच. हो की नाय? त्याच रात्री जेवणाच्या टेबलावर स्काउटनं ॲटिकसला विचारलं होतं.
‘‘ॲटिकस, तो बू रॅडली वाईट माणूस आहे ना?’’
‘‘नका रे त्या गरिबाला छळू. तिकडं जाऊ नका उगीच...तुम्हाला मी आधीच सांगितलंय!’’ ॲटिकस कंटाळून म्हणाला होता. स्काउट आपल्या वडिलांना थेट नावानंच हाक मारते. अगदी लहानपणापासून. पण बू रॅडलीला हा माणूस गरीब कसं म्हणतो? वेडा कुठला! स्काउट रात्री आपल्या भावाला आईबद्दल काय काय विचारत होती, तेव्हा न्यायाधीश टायलर ॲटिकसला भेटायला आले. ‘‘टॉम रॉबिन्सनची अगदी वैतागवाणी केस आली आहे. त्याच्या बचावासाठी वकील नेमणं मला भाग आहे. तू त्याचं वकीलपत्र घेतोस का?’’असं ते विचारत होते. ॲटिकसला नाहीही म्हणवेना, हो म्हणण्याची किंमतही कळत होती. तो दुग्ध्यात पडला.
* * *

डिलच्या उतावळ्या मेंदूलाही स्वस्थता नव्हती. सकाळी उठून स्काउट बाहेर धावली. जेमसुद्धा. ‘बू रॅडलीच्या घराकडं जाऊ या’ अशी आयडिया डिलनं काढली. जेमनं त्याला उडवून लावलं; पण स्काउटनं तेव्हा एक टायर काठीनं हाणत चालवायला घेतलं होतं. ते टायर गरगरत बू रॅडलीच्या घराच्या आवारातच गेलं. आता मेलो! पण जेमनं वडीलभावाच्या आविर्भावानं पुढाकार घेऊन शौर्य गाजवलं. बू रॅडलीच्या गुहेत शिरून त्यांनी आपला माल हस्तगत केला. वाह रे पठ्‌ठे! अर्थात बू रॅडली तिथं नव्हताच. याचा अर्थ तो तुरुंगात असणार. ‘आपण त्याला तुरुंगात जाऊन बघून येऊ या’ डिलच्या सुपीक मेंदूनं नवा बेत रचला. असले आरोपीबिरोपी कोर्टातच असतात, हे स्काउट आणि जेमला ऐकून माहीत होतंच. वकिलाचीच मुलं ती! तिघंही कोर्टात गेले. तिथं बू रॅडली काही दिसला नाही; पण ॲटिकस मात्र दिसला.

टॉम रॉबिन्सनची केस स्वीकारल्याबद्दल गावातल्या लोकांनी त्याला फैलावर घेतलं होतं. ‘त्या नालायकाच्या पोकळ कथेवर विश्‍वास ठेवलास. त्याची वकिली करताना जीभ झडेल तुझी’ बॉब इवेल नावाचा इसम ॲटिकसला शिव्या-शाप देत होता. ॲटिकस शांत राहिला. टॉम रॉबिन्सन या कृष्णवर्णीय तरुणानं बॉब इवेलच्या मुलीला, मायेला हिला काहीतरी इजा पोचवली होती. एक तर तो काळा. त्याचं बोलणं काय मनावर घ्यायचं? ते काळे लोक गुन्हेगार आणि खोटारडेच असतात ना! ‘बलात्कार’, ‘खोटारडा’ असले शब्दही या चिमुरड्यांनी ऐकले. अर्थात बॉब आणि त्याची मुलगी मायेला हे गोरे होते, हे वेगळं सांगायची गरज नाही.
* * *

रात्री डिलनं जेमला आव्हान दिलं. ‘‘हिंमत असेल तर चल, बू रॅडलीच्या घराशी जाऊन खिडकीतून आत डोकावून बघू या. येतोस?’’ हिमतीची बात करायची नाय हं. चल. तिघंही अंधारात बू रॅडलीच्या घराशी आले. कुंपणाची तार वाकवून आवारात शिरले. बू रॅडलीच्या पडवीपर्यंत पोचले. पडवीत एक कभिन्नकाळी अजस्र सावली हलत होती. आवारातल्या झाडांची पानं गूढ सळसळ करत होती. ती आकृती दबक्‍या पावलानं जेमजवळ आली. जेम भीतीनं आक्रसून गेला. तो घाबरलाय, हे पाहून आकृती मागं हटली.  तिघंही जीव खाऊन पळाले. पळताना जेमची पॅंटच कुंपणाच्या तारेत अडकली. बटणं सोडवून पॅंट तिथंच टाकून जेम पळाला. धापा टाकत घरी पोचला; पण पॅंट तर आणणं भाग होतं. ती कुंपणाशीच राहिली होती. जेम पुन्हा तिथं गेला. ...डिल दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल्या गावी निघून गेला. ‘पुढल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत भेटू’ असं सांगायला तो विसरला नाही.
* * *

शाळेचा पहिला दिवस स्काउटसाठी बरा गेला नाही. ‘काळ्यांच्या वकिलाची पोरगी’ म्हणून शेतकरी कनिंगहॅमच्या पोरानं तिची खोड काढली. स्काउटनं त्याला जाम मारलं. जेमनं तिचं भांडण सामोपचारानं सोडवून कनिंगहॅमच्या पोराला घरी जेवायला नेलं. जेम आपल्या भैणीला जाम सांभाळतो. आई नाहीए ना... जेवणाच्या टेबलावर जेमला कळलं की या बेट्या कनिंगहॅमकडं पण बंदूक आहे. कनिंगहॅम पिता-पुत्र अधूनमधून रानात जाऊन ससे, खारी टिपतात. पाखरं उडवतात. श्‍शॅ! ॲटिकसनंही त्याला मिळालेल्या पहिल्या बंदुकीचा किस्सा सांगितला.  ‘‘माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की नीळकंठी पाखरं कितीही मार. ती खूप असतात; पण नेव्हर शूट अ मॉकिंगबर्ड!’’ ॲटिकस म्हणाला. ‘‘का?’’ जेमनं विचारलं.
‘‘अरे, ते नक्‍कलबाज पाखरू काय करतं? गाणी म्हणतं. आवाज काढतं. आपल्या मनाला विरंगुळा देतं. ते काही कणसं खात नाही. नको तिथं घरटी करून अंडी घालत नाही. त्यांना कशाला मारायचं? पाप असतं ते...’’ ॲटिकस मनापासून म्हणाला. तेवढ्यात कनिंगहॅमच्या पोरानं आख्ख्या आमटीत आपली प्लेट बुडवून काढली. काय हे? स्काउट त्याला झापायला निघाली; पण कॅलपुर्नियानं, कामवालीनं तिला सैपाकघरात बोलावून उलट दमात घेतलं. ‘‘हे बघ, तो पाहुणा आहे. त्यानं टेबलक्‍लॉथ खाल्ला तरी गप्प बसायचं आपण. पुन्हा अशी वागणार असशील तर इथं सैपाकघरात पान मांडीन तुझं!’’
एका पिसाळलेल्या कुत्र्याला ॲटिकसनं गोळी घालताना पाहून जेम आणि स्काउटच्या मनातला बापाबद्दलचा आदर वाढला. खुद्द गावच्या शेरीफनं ॲटिकसला बक्षीस दिलं होतं.
स्काउटच्या मारामाऱ्या चालूच राहिल्या. कारण, अवघं गाव काळ्या टॉम रॉबिन्सनला वाचवायला निघालेल्या ॲटिकसवर संतापलं होतं. काहीबाही बोलत होतं. शाळेतही त्याचे पडसाद उमटत होते.
* * *

बू रॅडलीच्या घराजवळ एक वृक्ष आहे. त्याला एक छान ढोली आहे. जेम आणि स्काउटला त्या ढोलीत दोन छोट्या बाहुल्या सापडल्या. एक मुलगा आणि एक मुलगी. घरी आल्यावर जेमनं त्याचं गुपित फोडलं. एक खोकं स्काउटसमोर उघडं केलं. त्यात खजिना होता. बिल्ले, मोडकं घड्याळ. बरंच काही. ‘‘स्काउट, ही बू रॅडलीची ढोली आहे. कुंपणात अडकलेली माझी पॅंट आणायला मी त्या दिवशी परत गेलो होतो ना, तेव्हाही मला ती तिथं नीट घडी करून ठेवलेली आढळली होती. हे घबाड तेव्हाच सापडलं.’’

बघता बघता पुन्हा उन्हाळा आला. डिल पुन्हा सुट्टीवर आला; पण तोवर टॉम रॉबिन्सनची केस उभी राहिली होती. वर्षभर तो ॲबट्‌सव्हिलच्या तुरुंगात होता; पण केससाठी त्याला पुन्हा गावात आणणं शेरीफ टेटला भाग पडलं. पुन्हा गावकरी खवळून उठले. ॲटिकसनं रात्रभर आपल्या अशिलावर पहारा दिला. गावकरी त्याला मारायला धावले; पण जेम आणि स्काउटनं धीरानं परिस्थिती हाताळली. आपल्या वडिलांना वाचवलं. गावकऱ्यांचा म्होरक्‍या तो कनिंगहॅमच होता.
* * *

सुनावणी कमालीची नाट्यपूर्ण ठरली.
‘‘मी चांगली घरात काम करत होते. घरातलं अवजड फडताळ हलवण्यासाठी मी टॉमला विचारलं. एक दमडीही देऊ केली; पण त्यानं मला मागच्या बाजूनं आवळून धरलं आणि...आणि...मी प्रतिकार केला तर त्यानं मला खूप मारलं...’’ मायेला हिनं कोर्टाला सांगितलं. तिच्या उजव्या गालावर, मानेवर खरोखर अजूनही बुजलेले वळ दिसत होते. तिच्या बापानं इवेलनंही ‘हा काळ्या नीग्रोच तिच्यावर अतिप्रसंग करत होता, मी वेळीच आलो म्हणून पळाला,’ असं सांगितलं. वकील ॲटिकस फिंचनं मात्र हा आरोप खोटा ठरवला. आरोपी टॉम रॉबिन्सनचा डावा हात बालपणापासूनच जायबंदी आहे. उजव्या गालावर तो मारेलच कसा, हा त्याचा युक्‍तिवाद. मायेलासुद्धा गडबडली. तिनंच त्याच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला; पण तो अंगलट येईल म्हणून तिनं हे बापाच्या मदतीनं कुभांड रचलंय, हे त्यानं सोदाहरण स्पष्ट केलं.  हे सगळं कोर्टनाट्य जेम, स्काउट आणि डिल यांच्या समोरच घडत होतं. कारण भरगच्च कोर्टात रेव्हरंड साइक्‍स यांची परवानगी घेऊन हे त्रिकूट चक्‍क कृष्णवर्णीयांसाठी राखीव ठेवलेल्या वरच्या मजल्यावरच्या गॅलरीतून सगळं पाहात होतं. टॉम रॉबिन्सन निर्दोष असल्याचं दिसत असूनही ज्युरींनी त्यालाच दोषी ठरवलं. कारण, तो कृष्णवर्णीय होता.
कोर्ट उठलं, तेव्हा कागदपत्रांची आवराआवर करून ॲटिकस निघाला. वरच्या मजल्यावरच्या कृष्णवर्णीयांनी त्याला मानवंदना दिली. रे. साइक्‍स तर स्काउटला म्हणाले ः ‘‘मिस जीन लुईस, उभ्या राहा. तुमचे वडील निघाले आहेत!!’’
आपले बाबा खूप म्हणजे खूप मोट्ठे...अगदी आभाळायेवढे मोठे असल्याचं जेम आणि स्काउटला तेव्हा कळून चुकलं. तिच्या चिमुकल्या हृदयात अभिमान दाटून आला.
* * *

ही केस आपण हरणार हे तर ॲटिकसलाही माहीत होतं. त्याच्या कुटुंबाला तरी उजळमाथ्यानं जगता यावं म्हणून त्यानं ती केस प्राणपणानं लढवली; पण ‘कोर्टातून तुरुंगात जाताना पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसशिपायाच्या गोळीनं टॉम रॉबिन्सन मेला,’ अशी खबर त्याला शेरीफ टेटनं दिली. ॲटिकसला धक्‍काच बसला. टॉम रॉबिन्सनच्या बायकोला, हेलनला त्यानंच ही बातमी दिली. तेव्हा बॉब इवेल तिथं येऊन त्याच्या तोंडावर थुंकला.
...आणि ऑक्‍टोबरात ते घडलं.
शाळेतल्या एका कार्यक्रमात स्काउट ‘टुणुक भोपळा’ झाली होती. कार्यक्रमाच्या शेवटी तिच्या लक्षात आलं. आपले घरी जायचे कपडे हरवले आहेत. जेमबरोबर ती तशीच भोपळा बनून घराकडं निघाली. अंधार पडला होता. रस्त्यालगत झाडी होती. जीव मुठीत धरून दोन्ही भावंडं निघाली. तेवढ्यात काहीतरी झालं. जेम दूर फेकला गेला. भोपळ्यातली स्काउट गडगडत गेली. तिला नीटसं दिसेना. काही काळानंतर एक ढगळ शर्टातला इसम जेमला हातावर उचलून घेऊन जाताना दिसला. कशीबशी भोपळ्यातून सोडवणूक करून स्काउट पाठोपाठ आली. तो इसम थेट त्यांच्या घरातच शिरला. जेमला खूप लागलं होतं. तो बेशुद्ध होता. गंभीर चेहऱ्यानं ॲटिकस आणि शेरीफ टेट पडवीत उभे होते.  रानातल्या रस्त्यानं येताना आपल्यावर कुणीतरी हल्ला केला, हे स्काउटला कळत होतं; पण त्यात ‘बॉब इवेल मेला’ हे स्काउटला त्यांच्या संभाषणातून कळलं. जेमला कुणी वाचवलं?
दाराच्या आड शांतपणे उभा असलेला बू रॅडली स्काउटला तिथं पहिल्यांदा दिसला. त्यानंच जेमला उचलून घरी आणलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर व्रण नव्हता. तो खुनी वाटत नव्हता. किती भला दिसत होता.
‘‘तुला कळत नाही, ॲटिकस. बॉब इवेल स्वत: त्या चाकूवर पडला. त्यानं तो मेला. त्याला कुणीही मारलेलं नाही. जेमनंही नाही आणि या बू रॅडलीनंही नाही. कळलं?’’ शेरीफ टेट सांगत होते, ‘‘बू रॅडलीनं तर उलट चांगलं सामाजिक कृत्य केलं. एक गुन्हा रोखला त्यानं. या असल्या अपघाती प्रकरणात त्याला गुंतवणं म्हणजे...ते...ते पापच ना?’’ बू रॅडलीला प्रेमानं निरोप देताना स्काउटच्या मनात आलं ः ‘खरं आहे. शेरीफकाका म्हणतात ते. बू रॅडली हा मॉकिंगबर्डच आहे की!’’
* * *

ग्रेगरी पेक या विख्यात अभिनेत्यानं साकारलेला ॲटिकस फिंच अक्षरश: मनात भरतो. तरणाबांड, देखणा ग्रेगरी इथं अभिनयाचे वेगळेच पैलू दाखवतो. त्याच्या व्यक्‍तिरेखेला माणुसकीचा गंध आहे. निरागसांच्या जगताला हळुवारपणे हाताळणारं हृदय आहे. त्यात एक प्रगल्भ जाणतेपणा आहे. ग्रेगरी पेकला स्वत:ला त्याच्या कारकीर्दीतला सगळ्यात बेष्ट चित्रपट कुठला, असं विचारलं तर तो ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ असंच उत्तर द्यायचा. त्याला अर्थात या भूमिकेसाठी सन १९६३ चं ऑस्कर मिळालं. मुहूर्ताच्या चित्रीकरणाच्या वेळी लेखिका हार्पर ली हजर होती. ग्रेगरी पेकला बघून ती रडायलाच लागली. ‘‘काय झालं रडायला?’’ पेकनं विचारलं, तेव्हा ’तुला बघून मला माझ्या वडिलांची आठवण आली. अगदी तसाच दिसतोस रे...तुझ्या छोट्याशा सुटलेल्या पोटासकट!,’’ हार्पर ली म्हणाली.

‘‘काही तरी बोलू नकोस. ते ढेरपोट नाही माझं...अभिनय म्हणतात त्याला!’’ डोळे मिचकावत पेकनं तिला दटावलं. हार्पर ली शेवटपर्यंत अलाबामात मन्‍रोव्हिल इथंच राहिल्या. गेल्या वर्षी फेब्रुवारीत त्या गेल्या. ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’चा सिक्‍वेल लिहायचं, असं त्यांच्या मनात खूप होतं; पण ते जमलं नाही. ‘मॉकिंगबर्ड’ या खरं तर त्यांच्या बालपणीच्या आठवणीच आहेत. निर्माते-दिग्दर्शक रॉबर्ट पॅट्रिक मलिगन यांनी चित्रपटाची हाताळणी इतक्‍या समंजसपणानं केली आहे, की कादंबरी सरस की चित्रपट याविषयी गोंधळ उडावा. वास्तविक हार्पर ली यांची कादंबरी येऊन दोनेक वर्ष झाली होती आणि चांगली गाजतही होती. अशा प्रचंड वाचल्या गेलेल्या कादंबरीवर चित्रपट काढणं हे आव्हान होतं; पण मलिगन खरा प्रतिभावान दिग्दर्शक. त्यानं हार्पर ली यांनी सांगितलेल्या गोष्टीला जागतिक पैलू दिला. अर्थात त्यातलं बरंचसं श्रेय पटकथालेखक हॉर्टन फूट यांनाही द्यावं लागेल. वर्णद्वेष, जातीयता, बलात्कार, खून असल्या गोष्टी असूनही हा चित्रपट आग्रहानं मुला-बाळांना दाखवला गेला. हे उदाहरण विरळाच मानावं लागेल. शाळा सुरू होते, त्या वयात मुलांची जडणघडण वेगानं होत असते. भल्याबुऱ्या गोष्टी ती शिकत असतात. अशा वयात ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ बघायला मिळाला तर काम बरंचसं सोपं होऊन जातं. हा चित्रपट पाहून द ग्रेट वॉल्ट डिस्नी म्हणाला होता ः ‘‘अरे, लेको, मला हा असा चित्रपट काढायचा असतो रे नेहमी!’’
...निरागस सूर जपणारं ते नक्‍कलबाज, भलाईचं पाखरू सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हे वेल्हाळ पाखरू कुठं आढळलं तर कळवा. त्याला जपायला हवं. आधीच उशीर झालाय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com