होते म्हणू स्वप्न एक... (प्रवीण टोकेकर)

होते म्हणू स्वप्न एक... (प्रवीण टोकेकर)

‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ हा चित्रपट म्हणजे एखाद्या हुरहुरत्या सुंदर नज्मसारखा आहे... पडद्यावरची नज्म! हा चित्रपट पाहून सुस्कारा न टाकणारा कुठलाही मध्यमवयीन ‘तो’ किंवा ‘ती’ विरळीच म्हणावी लागेल. ‘हा चित्रपट तू पाहिलास का?’ या प्रश्‍नाचं उत्तरही किंचित हसून ‘नाही’ असंच द्यायचं असतं. पुढचा सगळा मामला हा शब्दांच्या पलीकडला...

मार्गशीर्षातल्या एखाद्या विभोर उत्तररात्री फरीदा खानमचा आर्त स्वर मनात हमखास मुक्‍कामाला येतो. ‘आज जाने की जिद ना करो’, अशी तिची आर्जवी हाक हळवं करते. त्या सुरांबरोबरच थोडीशी शतपावली करावी.
वक्‍त की कैद में जिंदगी है मगर
चंद घडियाँ यहीं अब तो आजाद है...

असे आझाद क्षण आपल्याला कधी मिळालेत? कधी कुणाला मिळतात का? कुणास ठाऊक. आयुष्यात असे कितीतरी गडद, गूढ रंग मिसळलेले असतात. कुणाला ते दिसत नाहीत. दाखवायचेही नसतात अजिबात. ते आपलं खास गुपित असतं. कधी ते आपल्याच सुप्त इच्छांनी घेतलेलं दिवास्वप्नांचं रूप असतं, तर कधी खोल मनाच्या तळाशी गाडलेले अस्सल अनुभव असतात. ...लौकिकार्थानं कदाचित ती एक घोडचूक असते. ‘गम बढे आते है कातिल की निगाहों की तरह...तुम छिपा लो मुझे ऐ दोस्त गुनाहों की तरह...’ शायर सुदर्शन फाकिर यांच्या शब्दात नोंदलेले हे ‘गुन्हे’ कुणाला सांगा किंवा सांगू नका, आयुष्याच्या कीर्दखतावणीत त्याची नोंद असतेच. काय असतात हे गुन्हे?

...आपल्या जवळच्या माणसांशी नकळत केलेली प्रतारणा. नात्यागोत्यांची बांधणी विस्कटणार नाही, याची काळजी घेणारी लपवाछपवी. तरुणपणीचा गाढवपणा. व्यवहारात घातलेला घोळ. काहीही असू शकतं...खरं तर घडून गेलेल्या असल्या काही घटनांवर किंवा जाणिवांवर आपल्या नजीकच्या व्यक्‍तीचीच काय, आपलीही मालकी नसते. त्यांना लौकिकाच्या आणि नैतिकतेच्या तराजूत तोलण्यात काय अर्थ आहे? त्या गाडलेल्याच बऱ्या.  

...पण एकटं, अगदी एकटं असताना भूतकाळातले हे गहिरे अनुभव थोडेसे चाळवावेत. आपल्या नेहमीच्या जगण्यापासून तुटून जावं. अगदी दूर जावं. रीतीभातींच्या पल्याडचा तो स्वप्नमाधवीचा प्रदेश मात्र खास आपल्या मालकीचा असतो. तिथं बाकी कुणाला प्रवेश नाही. तिथल्या सुपीक जमिनीत हे क्षण पेरून ठेवावेत...
खानमची नज्म ऐकली की हे असं काहीतरी होतं. खोल मनात गाडून टाकलेल्या काही आठवणी ढवळून निघतात. स्वरांमधलं ते दुखरेपण देह-मनात भिनलं की एक अनामिक दुःख-वेदना काही कारण नसताना ठाण मांडते. ती जीवघेणी वगैरे नसते; पण तरीही कमालीची आप्त वाटते.  

‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ ही अशीच एक सुंदर नज्म आहे; पण पडद्यावरली. हा चित्रपट पाहून सुस्कारा न टाकणारा कुठलाही मध्यमवयीन ‘तो’ किंवा ‘ती’ विरळाच म्हणावी लागेल. ‘हा चित्रपट तू पाहिलायस का?’ या प्रश्‍नाचं उत्तरही किंचित हसून ‘नाही’ असंच द्यायचं असतं. पुढचा सगळा मामला हा शब्दांच्या पलीकडला.
* * *

दूर शहरात राहत असलेल्या कॅरलिन आणि मायकेल या जॉन्सन-भावंडांना फोनवर कळलं की आई गेली. म्हातारीच होती. आयोवातल्या त्यांच्या शेतघरात एकटीच राहायची. शंभरवेळा सांगूनही कधी शहराकडं फिरकली नाही. ती आणि तिची शेतं...प्रॉपर्टी. तिच्या मृत्युपत्रात काही सूचना असल्याचं वकिलानं फोनवर सांगितलं होतं. जाणं भाग होतं.

आयोवा हे पश्‍चिमेकडं झुकलेलं मध्य अमेरिकेतलं एक हिरवंगार राज्य. विस्तीर्ण शेतं. मिसिसिपी आणि मिसुरी नदीच्या सरहद्दींनी अवघा प्रदेश सुजलाम्‌ सुफलाम्‌ झालेला. ग्रामीण भागात तर हिरव्या रंगाचीच मिजास. तिथल्या मॅडिसन कौंटीतलं एक शेत जॉन्सन कुटुंबाच्या मालकीचं होतं. तिथं राहायची फ्रॅंचेस्का जॉन्सन. म्हणजेच कॅरलिन आणि मायकेलची आई. वृद्ध असली तरी खुटखुटीत होती शेवटपर्यंत.
‘‘तुमच्या आईनं मृत्युपत्र करून ठेवलंय. खरंतर विशेष काही नाहीए त्यात. वाटण्याबिटण्यांबद्दल किरकोळ काही सूचना आहेत,’’ वकील म्हणाले. कॅरलिन आणि मायकेल खूप दिवसांनी आपल्या घरात हिंडत होते. याच वास्तूत त्यांचं बालपण गेलं. पिक अप्‌ ट्रकमधून इलिनॉइसला जाणं, बाजारातून खतं घेऊन येणं, खड्डे खणून झाडं लावणं, मजूर मिळाले नाहीत की वडिलांनी कामाला जुंपणं वगैरे टिपिकल शेतकरी कुटुंबाच्या आठवणी होत्या. नशिबानं आखून दिलेल्या मर्यादेत फ्रॅंचेस्कानं आपल्या पोरांचे खूप लाड केले होते. नवऱ्याचा आवाज कधी चढू दिला नव्हता. ती होती म्हणून घर व्यवस्थित चाललं. ‘फ्रॅंचेस्का या घराचा पाठकणा आहे,’ असं वडील म्हणायचे ते उगीच नाही. गेली बिचारी.
‘‘तुमच्या आईनं मृत्युपत्रात अशी सूचना लिहून ठेवली आहे की तिचं दफन नव्हे, दहन करावं!’’ चष्मा पुसत वकील म्हणाले.
‘‘व्हॉट? दहन? अशक्‍य!’’ कॅरलिनला आश्‍चर्याचा धक्‍काच बसला.
‘‘थोडं विचित्र आहे हे खरं; पण दहनच! दहन केल्यावर त्यांची रक्षा मॅडिसन कौंटीमधल्याच रोझमन छपरी पुलावरून आणि सेडर पुलावरून खालच्या नदीपात्रात उधळावी, अशी त्यांची सूचना आहे...’’ वकील म्हणाले.
‘‘ धिस इज टू मच...एक तर ही प्रथा ख्रिश्‍चन नाही आणि आमची आई तशी श्रद्धाळू आणि पापभीरू होती. शिवाय, वडिलांनी त्यांच्यासाठी आधीच शेजारी शेजारी छोटे प्लॉट्‌स घेऊन ठेवले होते. ते तिथंच गेले. आईनंही तिथंच जायला हवं!’’ मायकेल वैतागून म्हणाला.
वकिलानं त्यांना फ्रॅंचेस्काच्या जुन्यापान्या वस्तू दिल्या. काही फोटो होते. मुलांच्या लहानपणीचे वगैरे. पत्रं होती. एका खासगी तिजोरीची किल्लीही होती. कॅरलिननं घरभर हिंडून ती छोटी तिजोरी मिळवली. किल्लीनं उघडली. आत काही डायऱ्या, फोटो, पत्र. एक जुनाट मोडका कॅमेराही होता. तिनं मायकेलला हाक मारली. दोघांनी फोटो बघितले. फोटोत देखणा मध्यमवयीन चेहरा होता. किंचित हसणारा. तो रॉबर्ट किंकेडचा फोटो होता.
रॉबर्ट किंकेड हे नावही जॉन्सन-भावंडांनी ऐकलं नव्हतं. पत्रही त्यानं पाठवलेलीच होती. डिअर एफ...युअर्स आर! कोण हा? आपल्या आईचा प्रियकर आहे? कधी भेटला? कुठून आला? लग्नाआधीचा की नंतरचा?
आपल्या आईचं एक विवाहबाह्य अफेअर होतं, ही कल्पनाही त्या भावंडांना सहन झाली नाही. सालस, नाकासमोर चालून अखेर थडग्यात जाऊ पाहणारी फ्रॅंचेस्का अशी निघावी?
...पण तिथल्या डायऱ्या कॅरलिननं वाचायला घेतल्या आणि तिच्या अश्रूंना खळ राहिला नाही.
* * *

तो सन १९६५ मधला उन्हाळा होता. इलिनॉयची वार्षिक जत्रा हा शेतकऱ्यांच्या जीवनातला महत्त्वाचा भाग असे. वर्षभर शेतात पिकवलेलं विकून यायचं. नवे करारमदार करायचे. नवी साधनसामग्री, बियाणं घेऊन यायचं. थोडं मनोरंजनही साधायचं. रिचर्ड जॉन्सननं हाताबुडी आलेल्या पोरांना घेऊन जायचं ठरवलं. मायकेलला मिसरूड फुटलं होतं नि कॅरेलिनला तर सोळावं वरीस लागलेलं.
...मॅडिसन कौंटीत तेव्हा घराला कुलपं घालायची पद्धत नव्हती. फ्रॅंचेस्का म्हणाली ः ‘मी थांबीन. तुम्ही जाऊन या चार दिवस.’
रिचर्ड पोरांना पिक अप्‌ ट्रकमध्ये घालून निघून गेला. भरलेलं घर एकदम सुनं सुनं झालं. फ्रॅंचेस्कानं मोकळा श्‍वास घेतला. घरातल्या लाडक्‍या कुत्र्याला खायला घातलं. ‘त्रास दिलास तर बघ,’ असा खोटा दम दिला. खूप दिवसांत ऑपेरातली गाणी ऐकली नाहीत. जॅझ ऐकलं नाही की ‘ब्लूज’चं गारुड अनुभवलं नाही. तिनं रेडिओचा कान पिळला. या पोरांपायी कायम धांगडधिंगा ऐकावा लागतो. आपल्याला ती जुनी गाणी आवडायची; पण आता ऐकू कोण देतो? या घरात आपल्या मनासारखं काही चालत नाही. नवरा रिचर्ड ऑर्डरी सोडत असतो. त्याचं ऐकावं लागतं. बिचारा किती मेहनत करतो! त्याचा भार कमी करणं, हे कर्तव्यच आहे आपलं...
रिचर्ड तरुणपणी इटलीत आला होता मोठ्या युद्धात लढायला. सैनिक रिचर्ड जॉन्सन तिला आवडला आणि फ्रॅंचेस्का थेट अमेरिकन झाली. आयोवात येऊन इथली झाली. युद्धानंतर निवृत्ती घेऊन रिचर्डनं शेतीभातीत लक्ष घातलं. फ्रॅंचेस्कानं त्याला मनापासून साथ दिली. तिच्या धमन्यांमध्ये अजूनही इटालियन रक्‍त होतं. मोकळ्या क्षणी नृत्यासाठी तिचे पाय आपोआप किंचित थिरकू लागत. ऑपेराचे कणदार सूर कानाशी रुंजी घालत. इटालियन पदार्थांचा सुगंध नाकाशी दर्वळून जाई. इटलीच्या त्या हवेतच एक नशा आहे; पण संसार नेटका करण्याच्या धामधुमीत फ्रॅंचेस्का ते सगळं जणू विसरूनच गेली होती.

‘‘हलो, मला वाटतं, मी रस्ता चुकलोय!’’ घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरचा एक माणूस गाडीत बसूनच विचारत होता.
‘‘तुम्हाला आयोवात यायचं होतं का? जर ‘हो’ असेल तर तुम्ही चुकलेला नाही,’’ कपडे वाळत घालणारी फ्रॅंचेस्का त्या अनोळखी माणसाला म्हणाली.
‘‘रोझमन छपरी पूल इथंच आहे ना जवळपास?’’ तो माणूस म्हणाला.
‘‘ इथून थोडं पुढं गेलं की सॅम्सनांचं शेत लागतं. त्याला उजवी घालून सरळ गेलात की दोन मैलांवर एक पिवळं कुत्रं अंगावर धावत येईल. तिथं डावीकडं वळायचं. पुढल्या फाट्यावर कुणालाही विचारा...’’ चिक्‍कार घोळ घालत फ्रॅंचेस्कानं पत्ता सांगितला.
‘‘ओह!’’ तो माणूस हताश झाला असावा.
‘‘ मला नीट सांगता नाही येणार; पण दाखवता येईल... कदाचित!’’ ती ओशाळून म्हणाली. ‘‘येता?’’
‘‘ओके’’ असं म्हणून तिनं कपडे आणि केस थोडे ठाकठीक केले. दार लोटून घेतलं आणि त्याच्या गाडीत बसली.
...इथून पुढचे चार दिवस हे तिच्यासाठी, नव्हे,
दोघांसाठी जन्मजन्मांतरीचं संचित ठरलं.
* * *

त्याचं नाव रॉबर्ट किंकेड होतं. गाडीतल्या सामानावरून लक्षात आलं की तो एक सडाफटिंग फोटोग्राफर आहे. ‘नॅशनल जिओग्राफिक’ची एक असाइनमेंट होती. आयोवात काही जुने-पुराणे, मध्ययुगीन पूल आहेत. काहींना तर चक्‍क छपरं आहेत. छपरं असलेले पूल तेव्हा का उभारले असतील? त्यांचं संशोधन सुरू होतं. किंकेडकडं फोटो मिळवण्याची जबाबदारी होती.
‘‘तुम्ही मूळच्या कुठल्या?’’ गाडी चालवता चालवता त्यानं सिगारेट पेटवली.
‘‘ मी इटालियन आहे...’’
‘‘इटलीत कुठं? मी गेलोय इटलीला दोन वेळा...’’ बोलता बोलता किंकेडनं गप्पा रंगवल्या. रोझमनचा छपरी पूलही मिळाला. ‘आता प्रकाश कमी झालाय, उद्या सकाळी फोटो घेईन’, असं तो म्हणाला. त्यानं तिथलीच काही रानफुलं तोडून त्याचा गुंछा तिच्या हातात देत तिला ‘थॅंक्‍स’ म्हटलं. दोघंही परत आले.
कॉफीपुरत्या आलेल्या किंकेडनं मोठ्या सभ्यपणानं आसपासची चौकशी केली. कधी नव्हे ते श्रोता मिळाल्यासारखी फ्रॅंचेस्काही बडबडत सुटली. तिचं एकटेपण, इटलीच्या आठवणी, आवडी-निवडी सगळंच. ‘पोरं ऐकतात कुठं हल्ली?’ हेही सांगून झालं. किंकेड भलताच कलंदर वृत्तीचा होता. बायकोशी घटस्फोट होईल नाही तर काय? फोटोग्राफीच्या निमित्तानं जगभर हिंडून आलाय; पण सज्जन वाटतो.
‘‘माझा नवरा खूपच निर्मळ आहे,’’ ती बोलता बोलता म्हणाली.
‘‘तूसुद्धा आहेस, फ्रॅंचेस्का...’’ तो मनापासून म्हणाला.
इथं जवळपास एखादं लॉज आहे का बघतो, असं सांगून तो गेला. तिला वाटलं, त्याच्यात आणि आपल्या स्वभावात किती साम्य आहे! त्यालाही कविता तोंडपाठ आहेत. गाणीसुद्धा. उगीच अरबट-चरबट बोलत नाही. जग बघितल्यामुळं असेल; पण खूप परिपक्‍व वाटतो.
...इटली सोडून इथं येताना जे चित्र रंगवलं होतं, तसं आयुष्य आपल्या वाट्याला आलंच नाही, ही जाणीव भस्सकन्‌ उफाळून वर आली. ऐन रात्री तिनं घराच्या सज्जात येऊन भन्नाट वारं खुल्या देहात भरून घेतलं.
* * *

किंकेडच्या अचानक येण्यानं फ्रॅंचेस्का गोंधळून गेली होती. कोण कुठला हा अजनबी माणूस. त्याच्याशी आपण इतकं भडभडून का बोललो? चुकलंच...खरंच चुकलं? अचानक तिच्या ध्यानात आलं, खूप दिवसांनी आपण आरशासमोर उभ्या राहिलोय. मधूनच हसू फुटतंय. मुलं बाहेरगावी गेली आहेत आणि आपल्याला चुकल्याचुकल्यासारखंही फारसं वाटत नाहीय. त्याला पुन्हा भेटावं?
धावपळत तिनं आपली गाडी काढली. सेडर पुलाच्या खांबावर रात्रीच्या जेवणाचं निमंत्रण देणारी चिठ्‌ठीच डकवून आली. निनावी...आणि दुसऱ्या दिवशी किंकेड चक्‍क आला!

‘‘ओह रॉबर्ट! मला वाटलं आता आपण भेटणार नाही!’’ ती खुशीत म्हणाली. तो नुसतं हसला. सुख-दु:खाच्या गप्पा झाल्या. पुन्हा एकदा मनं मोकळी झाली. ग्लास भरले गेले. साधासा स्वयंपाक शिजू लागला. घरकामात किंकेड सहजपणे मदत करू लागला. रेडिओवर लागलेल्या भावविभोर गाण्यानं रात्र आणखी गडद होत गेली. फोनवर मैत्रिणीला कटवता कटवता पाठमोऱ्या बसलेल्या रॉबर्ट किंकेडची विस्कटलेली कॉलर तिनं सरळ केली. त्यानं तिचा हात अलवार पकडला. जग पाहिलेल्या त्याच्या छातीवर डोकं टेकवून मंदपणे नृत्य करताना तिला कमालीचं सुख लाभत होतं. चाळीशी उलटून गेली...पण हा क्षण, ही संवेदना कधीच वाट्याला आली नव्हती.
ं- मनं जुळतात, तेव्हा सतारीच्या झाल्यासारखा देहही झंकारून उठतो. मन आणि देह यांचं अद्वैत होतं. असल्या अलौकिक क्षणाला रोखून धरेल तर तो देह जिवंत तरी कसा मानायचा...? भावना, विकारांचे कल्लोळ उठले. रीतीभातींचा वैराण प्रदेश मागं पडला. रात्र अनावर होत गेली.
...त्या दिवशी फ्रॅंचेस्कानं डायरीत लिहिलं : त्या क्षणी माझ्याबद्दलच्या माझ्याच समजुती कोसळून नष्ट झाल्या. मी कुणीतरी दुसरीच स्त्री असल्यासारखी वागत होते; पण त्याच वेळी मी पूर्वीपेक्षाही अधिक ‘मी’ होते...
* * *

रॅंचेस्कानं भोचक शेजारणी आणि गावातल्या मैत्रिणींचे डोळे चुकवत छानसा ड्रेस खरेदी केला. घालून बघितला. रॉबर्टबरोबर बाहेर दिवसभराच्या सहलीला जाण्याचं ठरलं होतं. रॉबर्ट इतका सभ्य की त्यानंच तिला जाणीव करून दिली. ‘‘स्वीटहार्ट, तुझं गाव इतकं छोटं आहे की कुणी पाहिलं तर तासाभरात गवगवा होईल. जड जातं असलं गॉसिप. नाही म्हणालीस तरी चालेल. असली धाडसं करण्याचं वयही नाही आपलं. आय कॅन अंडरस्टॅंड!’’
‘‘मला यायचंय, रॉबर्ट!’’ तिचं मन बंड करून उठलं.
-मॅडिसनच्या आसपासचे पूल, बागा हिंडून दोघांनी सुंदर दिवस घालवला. रात्री दुसऱ्याच गावातल्या पबमध्ये जाऊन धुंद नृत्य केलं. पुन्हा एक अनावर रात्र घालवली.
‘‘इतकी वर्षं मी जगभर कां हिंडतोय ते मला कळलं, फ्रॅंचेस्का. मी तुलाच शोधत होतो...’’ रॉबर्ट आवेगानं म्हणाला.
‘‘ मला इथून घेऊन चल, रॉबर्ट...’’ मुसमुसत फ्रॅंचेस्का म्हणाली. फुलपाखराचा कधी पुन्हा सुरवंट होतो? मी झाले. मला पुन्हा पंख पसरायचेत रॉबर्ट. माझ्या गरजा, माझ्या जाणिवा, यांचं भान आलंच नसतं तर ठीक होतं; पण आता खूप जड जाईल.
रॉबर्टची त्याला तयारी होती; पण तसं घडलं मात्र नाही. रात्र पडेपर्यंत फ्रॅंचेस्का स्वत:शीच भांड भांड भांडली. रात्रीपर्यंत तिचा विचार बदलला होता.
ऐन निरोपाच्या क्षणी तिनं त्याला सांगून टाकलं...
‘‘नाही रॉबर्ट, कितीही मोह पडला तरी ही योग्य गोष्ट ठरणार नाही.  रिचर्डला हा धक्‍का झेपणारच नाही. तो कोसळून पडेल. शिवाय त्याची काही चूकही नाही. माझी मुलगीच आता सोळा वर्षांची आहे रॉबर्ट. त्यांचं भविष्य, त्यांची स्वप्नं यापुढं महत्त्वाची आहेत...’’
‘‘तुला माहीत नसेल; पण एखादी स्त्री संसारात पडते. मुलं झाली की तिचं एक आयुष्य थांबतं. दुसऱ्या आयुष्याला सुरवात होते. पुढं मुलांनीच चालायचं असतं. त्यांच्या वाटचालीला आपण फक्‍त तपशील पुरवायचे असतात. तेच थांबले तर...’’
‘‘ओके. मी इथंच घर केलं तर?’’ त्यानं व्याकुळ होऊन तिला विचारलं.
‘‘ नको रॉबर्ट. तुला कल्पना नाही, तू मला या चार दिवसांत काय दिलं आहेस. आपण पळून गेलो किंवा आणखी काही केलं तरी हे अनमोल क्षण राहणार नाहीत. मला ते अनमोलच राहायला हवे आहेत. मला आयुष्यभर तुझ्यावर अस्संच प्रेम करायचं आहे, रॉबर्ट...’’
‘‘पुन्हा अशी संधी येणार नाही, फ्रॅंचेस्का...’’रॉबर्ट हताश झाला होता.
‘‘ रॉबर्ट, समजून घे. माझ्या आयुष्यातले हे चार सगळ्यात सुंदर दिवस आहेत. त्यांच्याकडं मला एक घोडचूक म्हणून बघायचं नाही. आपण काही आततायीपणा केला तर मात्र ती घोडचूक ठरेल. या चार दिवसांच्या पुंजीवर मी आख्खं आयुष्य काढीन...’’ रडत रडत ती पुन्हा त्याच्या कुशीत शिरली.  
रॉबर्ट किंकेड परत गेला. फ्रॅंचेस्का जॉन्सनचं कुटुंब परत आलं. घर पुन्हा भरून गेलं. रेडिओवर पुन्हा धांगडधिंग्याची गाणी वाजायला लागली. रिचर्डचं हवं-नको बघणं, मुलांची खाणी यात फ्रॅंचेस्का पुन्हा गढून गेली.
त्या दिवशी तिनं डायरीत लिहिलं : तुम्ही सगळे परत आलात...आणि तुमच्याबरोबर माझ्या जगण्याचे सगळे तपशीलसुद्धा. त्यांनी मला रॉबर्ट किंकेडसोबत घालवलेल्या त्या सुंदर चार दिवसांपासून पुन्हा दूर नेलं. मला पुन्हा सुरक्षित वाटायला लागलं...
* * *

आईची डायरी वाचताना कॅरलिनच्या डोळ्यांना खळ राहिला नाही. शेजारी बसलेला मायकेलसुद्धा हळवा होऊन गेला. आपण आईला किती गृहीत धरलं होतं! त्यांना अपराधी वाटलं. त्या आठवणींच्या जोरावर तिनं आपलंही आयुष्य मार्गी लावून दिलं. कॅरलिन काय, मायकेल काय, दोघांच्याही शहरी जीवनात समस्या होत्या; पण फ्रॅंचेस्काच्या डायरीनं त्यांना त्या सोडवण्याचाही मार्ग दाखवला. दोघंही भावंडं गळ्यात गळे घालून रडली.
रॅंचेस्कानं डायरीच्या अखेरीला लिहिलं होतं : या चार दिवसांच्या अनमोल आठवणींवर रॉबर्टचा हक्‍क होता. बाकी सगळं आयुष्य मी संसाराला दिलं. आता मी मेल्यानंतर माझ्या राखेवर तरी त्याचा अधिकार नाही का? रॉबर्ट किंकेड काही वर्षांपूर्वी गेला. त्यानंही त्याची रक्षा मॅडिसन कौंटीच्या पुलावरून उधळायला सांगितली होती. ज्याचं होतं त्याला ते परत केलं पाहिजे. आता मात्र मला त्याच्याकडं जाऊ दे...’’
* * *

क्‍लिंट इस्टवूडनं साकारलेला रॉबर्ट किंकेड आणि मेरिल स्ट्रीपची केवळ लाजबाब अशी फ्रॅंचेस्का रसिकांचा अक्षरश: होश उडवते. मेरीलला या चित्रपटासाठी १९९५ मधलं ऑस्करही मिळणार होतं. थोडक्‍यात हुकलं. क्‍लिंट इस्टवूडनं या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. भावना आणि चित्रचौकटींचा त्यानं मांडलेला खेळ अद्वितीय आहे. रॉबर्ट जेम्स वॉलर नामक लेखकानं १९९१ मध्ये ही चिमुकली कादंबरिका लिहिली होती. ‘लव्ह ः ब्लॅक अँड व्हाइट’ या नावाची. हे वॉलरसाहेब खरंतर अर्थशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाचे अध्यापक; पण दोस्तमंडळींसाठी त्यांनी ही कादंबरी लिहिली. काही दिवसांनी एका एजंटचा फोन आला : ‘‘लेखकमहाशय, इतकी वर्षं आपण कुठं कडमडला होता?’’
कादंबरी अर्थात बेस्ट सेलर ठरली. अर्थात नंतर कादंबरीचं नाव बदलून ‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ असं ठेवलं गेलं. स्टीव्हन स्पीलबर्गनं लागलीच त्याचे चित्रपटविषयक हक्‍क विकत घेऊन टाकले. कादंबरी फार ग्रेटबीट नाहीए खरं तर. उगीच काहीतरी हळवी वर्णनं वाचून अधून मधून बोअरसुद्धा होतं. हळहळ आणि हुळहुळपंथाचं असं साहित्य आपल्या मराठीतही महामूर आहे. सगळीकडंच असतं. वॉलरनं नंतर २००२ मध्ये ‘अ थाउजंड कौंटी रोड्‌स’ नावाचा दुसरा भागही लिहिला. त्यात किंकेड आणि फ्रॅंचेस्का यांनी त्या जादूभऱ्या चार दिवसांच्या आठवणींवर आपापली आयुष्यं (एकमेकांना अजिबात न भेटता) कशी घालवली, याचं चित्रण आहे. २००५ मध्ये वॉलरमहाशयांनी ‘हाय प्लेन्स टॅंगो’ या शीर्षकानिशी तिसरा भागही आणला! किंकेडच्या मुलानं केलेलं हे वर्णन आहे. हुळहुळ्या लिखाणाला दाद देणारं सुपीक मन असणाऱ्यांनी ही तिन्ही पुस्तकं मिळवून वाचायला हरकत नाही. अन्यथा सगळंच कथानक हास्यास्पद वाटायला लागतं. असं असलं तरी  दिग्दर्शक क्‍लिंट इस्टवूडनं हीच अधुरी प्रेमकहाणी रुपेरी पडद्यावर आणताना ‘शब्दांच्या पलीकडलं’ इतकं सुंदर पद्धतीनं टिपलंय की अवघा चित्रपटानुभव सोन्याचा होऊन गेला. रॉबर्ट किंकेड अखेर फ्रॅंचेस्काच्या मनातलं गुपित बनून तिच्यासोबत अखेरपर्यंत राहिला. त्या गुपिताचा गडद रंग दिग्दर्शक क्‍लिंटनं अद्भुत हाताळणीनिशी बरोब्बर पकडला आहे. लेखक रॉबर्ट वॉलर गेल्या १० मार्चला टेक्‍सासमधल्या घरी निवर्तले.
रॅंचेस्का चुकली की तिचं बरोबरच होतं? स्त्रीनं असा त्याग कम्पल्सरी करायचाच असतो का? स्त्रीमुक्‍तीकडं सगळं जग चाललं असताना तिचं असं पाय खेचणारं चित्रण करण्यात काय अर्थ आहे? असे अनेक सवाल तेव्हाही विचारले गेले, अजूनही छेडले जातात. ‘फ्रॅंचेस्काची नैतिकता’ किंवा ‘द गुड वुमन ऑफ मॅडिसन कौंटी’ या शीर्षकाचे शोधनिबंधही लिहिले गेले. ही कहाणी त्याच्याही पलीकडं पाहणारी आहे, हे मात्र जवळपास सगळेच जाणकार कबूल करतात; पण ती तशी गेली, याला मेरिल स्ट्रीपचा अभिनय कारणीभूत आहे, अशीही पुस्ती जोडली जाते.
चित्रपटाचा प्रभाव मात्र अगदी प्रदीर्घ काळ राहतो, हे खरं. संपला की ‘चलते चलते यूँही कोई मिल गया था...’ची धून ओठांवर येते किंवा वर आठवलेली फरीदा खानमची नज्म मुक्‍कामाला येते. एखादी नज्म किंवा गझल किंवा कविता अशी हृदयात रुतून राहिली की आयुष्यभराची साथीदार होते. मनाच्या तळाशी पडून राहिलेल्या स्मृतींची चाळवाचाळव होते. रीतीभातींच्या पल्याडचा तो प्रदेश अवेळी बोलावू लागतो.
होते म्हणू स्वप्न एक, एक रात्र पाहिलेले
होते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेले
...काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
ही कुसुमाग्रजांची कविता आठवत राहते.

-मार्गशीर्षातल्या उत्तररात्रींचे रंग अधिकच गहिरे होत जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com