...सिलसिला रह जाएगा (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 14 जानेवारी 2018

‘द माउंटन बिटविन अस...’ हॉलिवूडमध्ये ‘सर्व्हायव्हलपटां’ची वानवा नाही. ‘द माउंटन...’ हा सिनेमाही अशा पटांपैकीच एक आहे असंही म्हणता येईल आणि ‘तो केवळ सर्व्हायव्हलपट नाही’, असंही म्हणता येईल. कारण, या सिनेमात नात्यागोत्यांचे जबरदस्त ताणेबाणे आहेत. निर्घृण निसर्गाच्या चपेट्यात जीवन-मरणाचा संघर्ष करतानाही माणसाला फक्‍त अन्न, वस्त्र आणि निवारा तेवढा गरजेचा नसतो; नातं नावाची एक चीजदेखील तितकीच मूलभूत असते, हे अधोरेखित करणारा हा सिनेमा आहे.

‘द माउंटन बिटविन अस...’ हॉलिवूडमध्ये ‘सर्व्हायव्हलपटां’ची वानवा नाही. ‘द माउंटन...’ हा सिनेमाही अशा पटांपैकीच एक आहे असंही म्हणता येईल आणि ‘तो केवळ सर्व्हायव्हलपट नाही’, असंही म्हणता येईल. कारण, या सिनेमात नात्यागोत्यांचे जबरदस्त ताणेबाणे आहेत. निर्घृण निसर्गाच्या चपेट्यात जीवन-मरणाचा संघर्ष करतानाही माणसाला फक्‍त अन्न, वस्त्र आणि निवारा तेवढा गरजेचा नसतो; नातं नावाची एक चीजदेखील तितकीच मूलभूत असते, हे अधोरेखित करणारा हा सिनेमा आहे.

तू नहीं तो जिंदगी में और क्‍या रह जायेगा
दूर तक तन्हाइयों का सिलसिला रह जायेगा
दर्द की सारी तहें और सारे गुजरे हादसे
सब धुआँ हो जाएगा, एक वाकया रह जायेगा...
- इफ्तिखार इमाम सिद्दिकी

जुन्या गोष्टी अक्‍सर जुन्याच असतात. काळाची पुटं चढून चढून पार धुळीत गाडल्या जातात. एवढुशा गोष्टीवर जगण्याचे थरावर थर पडले तर आणखी काय होणार? अगदी आठवणसुद्धा राहत नाही; पण अचानक एखाद्या दिवशी आपलंच पुस्तक, वही, डायरी...असं काहीतरी फुटकळ हाताला लागतं. ती पानं हळुवार हातानं उलगडताना निष्प्राण, तपकिरी, पिवळट पडलेल्या फुलांच्या पाकळ्या दिसतात आणि कित्येक वर्षांचे उरावर साचलेले दगड-मातीचे थर फोडत फोडत ती आठवण निकरानं सरसरून वर येते. वाटतं, हे खरंच घडलं होतं? की आपल्या मनाचाच खेळ? अनिवार इच्छेच्या मृगजळाच्या काठी मांडलेला?

गेल्या वर्षीच असाच एक चित्रपट येऊन गेला. ग्रेटबीट काही नव्हता; पण मनात नसता घोंघावा मात्र सुरू करून गेला ः ‘द माउंटन बिटविन अस’. वास्तविक अशा सर्व्हायव्हलपटांची हॉलिवूडमध्ये रेलचेल आहे; पण ‘द माउंटन बिटविन अस’ हा निव्वळ सर्व्हायव्हलपट नाही. त्यात नात्यागोत्यांचे जबरदस्त ताणेबाणे आहेत. निर्घृण निसर्गाच्या चपेट्यात जीवन-मरणाचा संघर्ष करतानाही माणसाला फक्‍त अन्न, वस्त्र आणि निवारा तेवढा गरजेचा नसतो; नातं नावाची एक चीजदेखील तितकीच मूलभूत असते, हे अधोरेखित करणारा हा सिनेमा आहे. उत्तम छायाचित्रण, भन्नाट अभिनय आणि कमालीचं प्रभावी पार्श्‍वसंगीत यांमुळं हा चित्रपट लक्षात राहतो.
* * *

पाठीवर अजस्त्र सॅक घेऊन निघालेली ॲलेक्‍स मार्टिन जाम वैतागली आहे. तिला काहीही करून आज डेनव्हरला पोचायचं आहे. कारण, उद्या सकाळी तिचं स्वत:चंच लग्न आहे; पण आइडाहोतल्या बोई विमानतळावर आल्यावर तिला कळलं, वादळी हवेमुळं उड्डाणं काही काळ स्थगित करण्यात आली आहेत. नकटीच्या लग्नाला सत्राशे विघ्नं.  त्याच वेळेला शेजारच्या काउंटरवर डॉ. बेन बास तिथल्या सस्मित हवाई कर्मचारिणीला सांगू पाहत होता की ‘ यू सी, आय ॲम अ सर्जन. एका दहा वर्षांच्या मुलाचं ऑपरेशन करायला मला बाल्टिमोरला पोचायलाच हवं. काहीही करा...पुढचं फ्लाइट कधी आहे?’’ पुढचं फ्लाइटच नव्हतं. कर्मचारिणीनं खांदे उडवले. ॲलेक्‍स मार्टिनसारखी आगाऊ बाई हे सहन करणं शक्‍य नव्हतं. कुछ भी हो, मुझे अब डेनव्हर जानाही होगा, अशा जिद्दीला ती पेटली. तिनं डॉक्‍टर बेनला हटकलं.

‘‘ सॉरी, मी तुमचं बोलणं ऐकलं. तुम्ही डॉक्‍टर आहात का? माझ्याकडं एक आयडिया आहे. तुम्ही पुरेसा वाटा उचललात, तर आपण पोचू शकतो...’’ ॲलेक्‍सनं गळ घातली. इथून काही चार्टर्ड विमानं घेऊन जाण्याची सोय आहे. एखादं छोटं विमान भाड्यानं घेऊन दोघंही जाऊ. भाडं खूप पडेल; पण द्यायची किंमत. काय करणार? वगैरे. जवळच्याच खासगी विमानांच्या अड्ड्यावर वॉल्टर नावाचा एक वैमानिक भेटला. गडी अनुभवानं पिकलेला होता. दोघंही अडलेले पाशिंजर घेऊन निघायची त्यानं तयारी दाखवली. त्याचं इटुकलं विमान होतं. त्यात वॉल्टरनं त्याचा कुत्राही सोबत घेतला. विमानानं आभाळात झेप घेतली. काही तासांनंतर दूरवर बर्फराजी दिसू लागली. आभाळात ढगांची दाटी. दूरवर एक वादळ घोंघावताना दिसत होतं. त्याला वळसा घालून निघून जाऊ, असा वॉल्टरचा बेत होता. तसा फ्लाइट प्लॅन त्यानं आखलाही होता; पण...

नजीकच्या विमानतळाशी संपर्क साधतानाच अचानक वॉल्टरला धाप लागली. शब्द घशात अडकू लागले. त्याला घाम फुटला. तोंडातून लाळ गळू लागली. त्याला हार्ट ॲटॅक येतोय हे डॉ. बेनच्या लक्षात आलं. काही समजायच्या आतच वॉल्टर पायलटच्या खुर्चीतच कोलमडला. अफाट वारं, पावसाच्या झडी आणि बर्फाळ हवेत उलटंपालटं होत ते चिमुकलं विमान समोरच्या डोंगराकडं निघालं होतं. अर्धवट बेशुद्धावस्थेत वॉल्टरनं जिवाच्या करारानं एक पठार बघून विमान तिथं नेण्याचा प्रयत्न केला. त्या दुर्गम हिमसागरात शिरताना ‘थाड थाड थडाड थाड’ हादरे बसले. ॲलेक्‍सला पुढं काही कळलंच नाही...
* * *

डॉ. बेन कण्हतच जागा झाला. आपण कुठं आहोत? विमानाच्या खिडकीतून त्यानं बाहेर पाहिलं. सर्वदूर बर्फ होतं. पार मोडून पडलेल्या विमानाच्या अंतर्भागात शेजारीच ॲलेक्‍स मार्टिन मुडपलेल्या अवस्थेत पडलेली होती. चेहऱ्यावर रक्‍ताचे ओघळ साकळलेले; पण तिचा श्वास सुरू होता. पुढल्या भागात पायलट वॉल्टरचा मृतदेह होता. दूरवर कुत्र्याची भुंक ऐकू आली. डॉ. बेननं स्वत:ला सावरलं. खुर्चीच्या चिमटीत चेंगरलेल्या ॲलेक्‍सला सरळ केलं. पाय हलकेच बांधून ठेवला. पायलट वॉल्टरचा मृतदेह महत्प्रयासानं ओढून काढत त्याला नजीकच्या बर्फातच पुरलं. विमानात शोधाशोध केली. प्रथमोपचाराचं थोडं सामान होतं. काही अन्नाची पाकिटं, चॉकलेटं होती. हवेत बाणासारखे जाऊन आगीचे लोळ करणारे फ्लेअर्सही मिळाले.
...दोन दिवसांनंतर ॲलेक्‍स शुद्धीवर आली, तेव्हा तिला कळलं की तिचा उजवा पाय मोडला आहे. कपाळ आणि डाव्या अंगावर जखमा आहेत. अंगात सणसणीत तापही असावा. डॉ. बेन तगडा होता. व्यायामाचं शरीर होतं. किरकोळ जखमांपलीकडं त्याला काही झालं नव्हतं. ओळखीचा नाही, पाळखीचा नाही, अशा माणसासोबत अज्ञात जागेत आपण अडकलो आहोत. ॲलेक्‍स हादरली. आपल्या लग्नाचा मुहूर्त एव्हाना टळून गेला असेल. शोधाशोध सुरू झाली असेल. ‘आपण इथून निघू या’ ॲलेक्‍सनं घाई सुरू केली.

‘‘ हे बघ, तुझा पाय मोडलाय. तुझ्या सेलफोनचाही चक्‍काचूर झालाय. माझा फोन चालू आहे, पण नेटवर्क कुठाय? अशा परिस्थितीत ही जागा सोडली तर आपला शोध घेणं रेस्क्‍यू टीमला मुश्‍किल होईल,’’ बेन म्हणाला.
‘‘ तू टरकला आहेस म्हणून मी इथं बर्फात मरू? मी तुला धड ओळखतही नाही...’’ॲलेक्‍स वैतागली.
...अन्नाच्या शोधात डॉ. बेन थोडा दूर गेला असताना एका हिमबिबळ्यानं दबक्‍या पावलानं विमानाच्या अवशेषांमध्ये डोकं घातलं. कुत्रं भुंकू लागलं. त्याच्या मानेचा चावा घेऊन बिबळ्यानं मोर्चा सरळ अपंग झालेल्या ॲलेक्‍सकडे वळवला. भयातिरेकानं ओरडत ॲलेक्‍सनं जवळची फ्लेअरगन त्याच्या तोंडावरच झाडली. आरडाओरडा ऐकून परत आलेल्या डॉ. बेननं बघितलं तर ॲलेक्‍स घाबरलेली. कुत्रा घायाळ होऊन पडलेला...आणि हिमबिबळ्या अर्ध्या जळक्‍या अवस्थेत मरून पडलेला. त्या रात्री त्यांनी बिबळ्याचं मांस भाजून खाल्लं.
* * *

इथून निघायला हवं. असं किती दिवस राहणार? पण ॲलेक्‍सचा पाय मोडलेला. कुठल्या दिशेनं जावं हेच समजत नव्हतं. जीपीएस नाही. नकाशा नाही. सर्वदूर हिमकडे आणि बर्फ. एक तुलनेनं सोपा उतार पकडून ते निघाले. मग सुरू झाला एक जीवघेणा प्रवास. आशा-निराशेचा. विश्‍वासाचा-अविश्‍वासाचा. आप्तेष्टांचा विरह. भूतकाळातल्या आठवणी...मृत्यूच्या बर्फगार दलदलीत पावलं रोवत ती दोघं चालत राहिली.

‘‘तुझा कॅमेरा आहे ना? मरण्यापूर्वी माझा एक फोटो काढ...’’ बेन म्हणाला. ॲलेक्‍सनं काढला नाही. प्रचंड वाटचालीनंतर शेवटी एका रानात त्यांना लाकडाची झोपडी दिसली. ॲलेक्‍सला झोपडीत आणून डॉ. बेननं तिची खूप शुश्रूषा केली. हा ऊबदार आसरा त्यांना आयुष्याचा आधार वाटला. बेननं आपलं हृदय उघड केलं. ‘हार्ट इज जस्ट अ मसल’ असं म्हणणारा बेन प्रत्यक्षात खराखुरा हमसफर निघाला. एव्हाना सूर जुळले होते. आपल्या शहरी आयुष्यात आपण किती गोष्टी प्रीटेंड करत असतो? बेनचं दु:ख वेगळं होतं, ॲलेक्‍सचं वेगळं...पण एकमेकांच्या सहवासात त्यांना मार्ग बहुधा सापडला. त्या रात्री शेजारीच गाढ झोपलेल्या बेनचा तिनं सुंदर फोटो घेतला...
दोघांनीही हिय्या करून पुढली भयंकर वाटचाल केली. एके ठिकाणी त्यांना दूरवर लाकडाच्या वखारीचा आवाज आला. मानवी जीवनाच्या वेशीवर दोघांचीही शुद्ध हरपली. तिथंच त्यांची वाटचालही संपली होती.
* * *

इस्पितळात खाटेवर पडलेल्या डॉ. बेन बासला कळून चुकलं की बर्फामुळं हाताची बोटं निकामी झाली आहेत. यापुढं सर्जरी अशक्‍य. दुसऱ्या खोलीतच ॲलेक्‍स होती. तिच्या खोलीत बेनला मार्क भेटला. मार्क हा ॲलेक्‍सचा होणारा पती होता. लवकरच आम्ही लग्नाची तारीख पक्‍की करू, असं ती त्याला म्हणाली. डॉ. बेन लंडनला निघून गेला. सोबत तो कुत्राही घेऊन गेला.
पुढं काय घडलं? पर्वतातलं हे नातं एखाद्या गिर्यारोहकाचा मृतदेह बर्फातच गोठून जावा तसं गोठलं? शहरी सामान्य जीवनात परतल्यावर दोघांनी आपली खडतर वाटचाल सुरू ठेवली की दोघांमधला तो अजस्र पर्वत तसाच राहिला?
...चित्रपटाचा शेवट हे तर जीवनावरचं फार सुंदर भाष्य आहे. ते पडद्यावरच बघणं इष्ट.
* * *

केट विन्सलेट ही अभिनेत्री तर खरोखर महान आहे. ‘द माउंटन बिटविन अस’मधली तिनं साकारलेली ॲलेक्‍स मार्टिन अफलातूनच आहे. इद्रिस एल्बा या कृष्णवर्णीय ब्रिटिश नटानं तिच्या तोडीस तोड साथ दिली आहे. रांगडा, तरीही अबोल. एल्बा हा खरं तर ‘अमेरिकन गॅंगस्टर’ किंवा ‘थॉर’सारख्या थरारपटांमध्ये शोभतो. वास्तविक ‘द माउंटन बिटविन अस’ ही कादंबरी आहे, चार्ल्स मार्टिन नामे लेखकानं लिहिलेली. तिचं हे पडद्यावरचं रूप. अर्थात चित्रपटासाठी व्यक्‍तिरेखांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. बऱ्याच तपशिलाला चक्‍क फाटे देण्यात आले आहेत. या चित्रपटात सर्वात प्रभावी काम आहे ते मॅंडी वॉकर या महिला-सिनेमॅटोग्राफरचं. अंगावर येणारी बर्फकड्यांची ती दृश्‍यं खरोखर गोठवणारी आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत हानी अबू अस्साद.  पॅलेस्टाइनच्या या दिग्दर्शकानं बर्फातली ही कहाणी फारच प्रभावी रंगवली आहे. जगण्यासाठी माणसाला ‘शीत’, ‘सूत’ आणि ‘छत’ या तीन ‘त’कारान्तांबरोबरच आणखीही एका ‘त’कारान्ताची आवश्‍यकता असते आणि तो ‘त’कारान्त म्हणजे ‘सोबत’. गरज संपली की ते सोबतीचं नातं नष्ट होतं? व्हावं? माणसाच्या आयुष्यात ही असली नाती नेमकी कुठल्या रकान्यात नोंदवायची असतात? गरज, चैन की अपरिहार्यता? असे कितीतरी गहन प्रश्‍न पाडून हा चित्रपट संपतो.
दायरे इन्कार के, इकरार की सरगोशियाँ,
ये अगर टूटे कभी तो फासिला रह जायेगा...

...आपल्या शहरी जीवनातले नात्यागोत्यांचे पर्वतसुद्धा किती दुर्गम असतात. नाही?

Web Title: pravin tokekar write article in saptarang