उदकाचिया आर्ती... (प्रवीण टोकेकर)

उदकाचिया आर्ती... (प्रवीण टोकेकर)

जोशुआ कॉनर नावाच्या ऑस्ट्रेलियन शेतकऱ्याच्या आर्ट, एड आणि हेन्‍री या तिन्ही मुलांना त्या युद्धावर जावंच लागलं. तिथंच ते बेपत्ता झाले. त्यांना शोधण्यासाठी जोशुआनं समुद्राला पालाण घातलं. जमिनीखालच्या पाण्याचा वेध घेणारी त्याची नजर आपलंच रक्‍त शोधण्यासाठी भिरभिरू लागली. त्याची धाडसकथा म्हणजे ‘द वॉटर डिव्हायनर’ हा चित्रपट...

देवा, गंधर्वनगरीची वसती ।
सोडुनी आलो लक्ष्मीपती ।
होतो उदकाचिया आर्ती ।
रोहिणी पीत ।।
- ज्ञानेश्र्वरी, अध्याय ११, ओवी ५२

पा  याळू माणसानं पाय फिरवला की पाठीतली उसण गायब होते म्हणे. अशा पायाळू माणसाला विजेपासून धोका असतो आणि त्याला जमिनीतल्या पाण्याचा सुगावाही लागतो, अशी पूर्वापार समजूत आहे. समजूतच ती. त्याला ना शास्त्राधार, ना पुरावे. यातला जमिनीतलं पाणी शोधण्याचा इल्लम मात्र वरदानासारखा असतो. गुप्तधनासारखा धरणीच्या पोटात दडून राहिलेला पाण्याचा बहुमोल साठा हुडकणारी ती नजर देवाचीच मानायला हवी.

पाणी शोधण्याचे मंत्र नि मार्ग सांगणारा प्राचीन ‘उदकार्गल’नावाचा संस्कृत ग्रंथच आहे म्हणे. कुणी वाचलाय? अर्थात पाश्‍चात्यांमध्येही अशा काही समजुती आहेत. जमिनीच्या पोटातलं पाणी शोधण्याचे मार्ग हुडकणारी तिथं ‘डाउजिंग सोसायटी’च आहे. डाउजिंग हे भूगर्भातलं पाणी शोधण्याच्या तंत्राचं नाव आहे.
दगडा-मातीच्या थरांआड दडलेल्या त्या काळ्याशार गूढ पाण्यात कुठल्या तरी विहिरीचा श्‍वास असतो. एखाद्या तलावाचा जिवंत जिव्हाळा असतो किंवा नदीचं मूळदेखील असतं. भूमितळाशी दडून बसलेल्या गुप्त जळाचा शोध घेणाऱ्या एका इल्लमबाज शेतकऱ्याची गोष्ट काही वर्षांपूर्वी पाहण्या-वाचण्यात आली होती. चित्रपट होता ः ‘द वॉटर डिव्हायनर’. हॉलिवूडचा विख्यात अभिनेता रसेल क्रोनं आयुष्यात पहिल्यांदा दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. होय, तोच तो ‘ब्यूटीफुल माइंड’ किंवा ‘ग्लॅडिएडर’मधला बेमिसाल अभिनेता. त्याचा हा पहिलावहिला दिग्दर्शकीय प्रयत्न वाखाणण्याजोगाच होता. मध्यवर्ती कथाकल्पनाच भन्नाट. एका सूक्ष्म धाग्याची नऊवार पैठणी विणण्याचा चमत्कार होता तो.  

चित्रपट होता चांगलाच; पण त्याची पूर्वपीठिका  समजून घेणं गरजेचं आहे. सन १९१९ च्या सुमारास पहिल्या महायुद्धाच्या काळात गॅलिपोलीच्या तुंबळ लढाईत तुर्कस्तानातल्या ऑटोमन साम्राज्यावर निर्णायक घाव बसला; पण दोस्तांच्या सैन्याचीसुद्धा अभूतपूर्व वाताहत झाली. उभयपक्षी लाखभर सैनिक मेले. लाखो जायबंदी झाले. कोण जिंकलं आणि कोण हरलं, याला काही अर्थच उरला नाही. ‘दार्दानेल्सची लढाई’ किंवा ‘गॅलिपोलीचा रणसंग्राम’ म्हणून हे युद्ध इतिहासाच्या पानांमध्ये अमर आहे. ब्रिटिश आरमाराचे फर्स्ट लॉर्ड विन्स्टन चर्चिल यांना गॅलिपोलीच्या दाणादाणीनंतर बेसुमार टीकेचं धनी व्हावं लागलं. या लढाईनंतर आठच वर्षांनी तुर्कस्तान एक प्रजासत्ताक म्हणून उदयाला आलं आणि मुस्तफा केमाल अतातुर्क ऊर्फ केमाल पाशाचं झळझळीत नेतृत्वही! आजही तुर्कस्तानमध्ये दर २५ एप्रिलला ‘गेलिबोलू युद्धा’चा स्मरणदिन साजरा होत असतो. या लढाईत दोस्तांच्या, म्हणजेच ब्रिटिश सैन्याच्या बरोबरीनं ऑस्ट्रेलियाचे आणि न्यूझीलंडचे तरुण सैनिक लढले आणि त्या जबरदस्त संगरात धारातीर्थीही पडले. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड आर्मी कोअरचे (ॲनझॅक) किमान दहा हजार सैनिक लढाईत कामी आल्याची नोंद आहे. गॅलिपोलीच्या युद्धानं तुर्कस्तानात प्रजासत्ताकाचा उदय झाला, तर ऑस्ट्रेलियात आणि न्यूझीलंडमध्ये स्वातंत्र्याची ठिणगी पडली.

...जोशुआ कॉनर नावाच्या ऑस्ट्रेलियन शेतकऱ्याच्या आर्ट, एड आणि हेन्‍री या तिन्ही मुलांना या युद्धावर जावंच लागलं. तिथंच ते बेपत्ता झाले. त्यांना शोधण्यासाठी जोशुआनं समुद्राला पालाण घातलं. पाणी शोधणारी त्याची नजर आपलंच रक्‍त शोधण्यासाठी भिरभिरू लागली. त्याची धाडसकथा म्हणजे ‘द वॉटर डिव्हायनर’.
* * *

खोल खड्ड्यात उतरलेल्या जोशुआनं श्‍वास रोखून पहारीचा अखेरचा दणका दिला. फत्तराची परळ मधोमध फुटावी, तशी भेग पडून मनगटाएवढं पाण्याचं कारंजं उडालं. बदाबदा पाणी वर आलं. आभाळाच्या गोल तुकड्याकडं वर बघून जोशुआ खदाखदा विजयी हसला.
‘‘आज मुलांना गोष्ट सांगायची पाळी तुझी आहे हं...केव्हापासून ती वाट बघताहेत...’’ मोजा विणत बसलेली त्याची बायको म्हणाली. दिवसभर खणाखणी करून आंघोळ करून आलेला जोशुआ पार थकला होता.
‘‘आयॅम बोन टायर्ड, हनी...’’ तो म्हणाला.
‘‘असं कसं?’’ ती म्हणाली.

...जोशुआ मुलांच्या खोलीत गेला. ‘अरेबियन नाइट्‌स’चं पान उघडून त्यानं गोष्ट वाचायला सुरवात केली. तिन्ही मुलांचे पलंग रिकामे होते. पूर्ण रिकामे. गेली चार वर्ष ते असे रिकामेच आहेत. जोशुआची तिन्ही मुलं गॅलिपोलीच्या लढाईवरून कधीच परत आली नाहीत. कोवळी होती. नुकतीच मिसरूड फुटलेली. हकनाक गेली...त्यांचा मागमूसदेखील लागला नाही.
तेव्हापासून या असहाय नवरा-बायकोचं हे भ्रमवेड कायम आहे. त्यांच्या दृष्टीला आजही मुलं घराच्या आसपास हुंदडताना दिसतात. घोड्यावरून बेफाम दौडताना, खिदळताना दिसतात. मधूनच वास्तवाचं भान येतं. रिकामं घर खायला उठतं. शेतशिवार पोरकं, बिचारं वाटू लागतं. मन गदगदून जातं.
...हुंदके देत त्याची बायको त्याला एवढंच म्हणाली : ‘‘...पाणाड्या म्हणवतोस. जमिनीखालचं पाणी दिसतं; पण जमिनीनं गिळलेली तुझी मुलं दिसत नाहीत का रे तुला...?’’
त्याच रात्री तिनं नवऱ्यानं खणलेल्या विहिरीतच उडी टाकून आत्महत्या केली.
* * *

जोशुआला आता स्वत:चं असं कुणीच उरलं नव्हतं. बायकोला मातीआड करून तो घर-दार सोडून निघाला. तीन महिन्यांच्या बोटीच्या प्रवासानंतर तो इस्तंबूलच्या बंदरावर उतरला. तिथंही तेव्हा ‘इंगिलिस चले जाव’ची चळवळ सुरू झाली होती. लेफ्टनंट कर्नल ह्यूज याच्या अधिकाराखाली आपापल्या मृत वा बेपत्ता सैनिकांचा छडा लावण्याचं काम ब्रिटिशांच्या विशेष युद्धस्मशान पथकानं (वॉरग्रेव्ह युनिट) सुरू केलं होतं. तुर्की लष्कराकडंच त्यांनी या कामासाठी मदत मागितली होती. मेजर हसन बे आणि त्याचा सार्जंट जमाल यांनी अनिच्छेनंच मदतीची तयारी दर्शवली. एकमेकांच्या जिवावर उठलेले आता एकमेकांच्या साथीनं आपापल्यांचे मृतदेह शोधू पाहत होते. इस्तंबूलमध्ये उतरल्या उतरल्या एका चलाख तुर्की पोरानं जोशुआची बॅग उचलून सरळ पळ काढला. त्याच्यापाठोपाठ जोशुआ धावला. तो लहानगा ओऱ्हान नावाचा तुर्की छोकरा होता. तो आणि त्याची विधवा आई, आयेशा आपल्या जुन्या घराचंच हॉटेल करून गुजराण करण्याच्या खटाटोपात होती. ओऱ्हाननं गिऱ्हाईक अक्षरश: पळवून आणलं. एक खोली देऊ केली. आयेशाचा नवराही त्याच युद्धानं गिळलेला होता. शत्रुदेशातला पाहुणा आलेला तिला मुळीच आवडलं नव्हतं; पण इलाज नव्हता. पैसा हवा असतो सगळ्यांना. त्यात इस्तंबूलमध्ये सध्या ब्रिटिश सैनिकांचाच वावर वाढला आहे. काही कारणानं जोशुआची मेजर हसनशी आणि जमालशीही ओळख झाली. पोरांच्या शोधात समुद्र ओलांडून आलेला हा बाप त्यांना दयेला पात्र वाटला; पण ते हुकमाचे ताबेदार तेवढे होते.
...जोशुआला गॅलिपोलीला जाता आलं नाही. ब्रिटिश लष्करी मुख्यालयातून त्याला जवळजवळ हाकलूनच दिलं गेलं. ‘चार वर्षं तुझी मुलं आली नाहीत, त्याअर्थी ती आता या जगात नाहीत, हे कळायला हवं तुला...’ असं त्याला सुनावण्यात आलं. उलट, त्याचा पासपोर्ट जप्त करून कलकत्तामार्गे पुन्हा घरी जाण्यासाठी बोटीत बसवण्याची सक्‍ती करण्यात आली.
* * *

जोशुआला सारखं वाटायचं, की आपली मुलं कुठंतरी आहेत...जिवंत आहेत. डोळे मिटले की त्याला युद्धाची अस्पष्ट दृश्‍यं दिसू लागत. धुरानं आणि धुळीनं भरलेला आसमंत. काही टेकड्या...गरगर फिरणारी पवनचक्‍की दिसू लागे...तशाच गरगर फिरणाऱ्या उंच टोपीवाल्या मानवी आकृत्या...हे कुठलं नृत्य आहे? जोशुआला हे असे भास अनेकदा होत.परिस्थितीशी झगडणारी आयेशा आणि तिचा लहानगा ओऱ्हान यांचा जोशुआला लळा लागला. एक हळुवार नातं नकळत फुलत होतं. आपल्या मनाची फरफट जोशुआनं भाषांचे डोंगर ओलांडत आयेशाकडं अनेकदा बोलून दाखवली. गॅलिपोलीला एका छुप्या मार्गानं परवान्याशिवाय जाता येतं, हे तिनंच त्याला सुचवलं. मग कलकत्तामार्गे लंडनला जाणाऱ्या बोटीत जोशुआ बसलाच नाही. ब्रिटिश सैनिकांना गुंगारा देत तो जमालच्या आणि हसनच्या साथीनं सटकला. हे धाडसच होतं. असंतोषानं धुमसणारा तुर्की टापू ओलांडत तो अखेर गॅलिपोलीत पोचला.
युद्धभूमीवर त्याला सगळी दृश्‍यं दिसू लागली...धुमश्‍चक्री, बंदुकींच्या फैरी...वेदनांनी विव्हळणारे तुटके-फुटके देह...कलेवरांचा खच...रक्‍त-मांसाचा चिखल...
हसननं कथन केलेल्या युद्धप्रसंगांनी जोशुआच्या मनातल्या ‘त्या’ पाणीदार संवेदना जणू आणखीच धारदार केल्या. त्याच्या दिव्यदृष्टीसमोर सगळा न पाहिलेला इतिहास उभा राहात होता...या इथं आपली दोन मुलं धुळीत मिळाली; पण एक मुलगा अजूनही जिवंत असावा, हे त्याला इथंच जाणवलं.
...दूरवर त्याला पवनचक्‍की दिसली...सूफी नर्तकांचा गोल गोल फिरणारा तांडा ठळक होत गेला...तीच ती परिचित भासदृश्‍यं...या पवनचक्‍कीशी आपलं काय नातं आहे? अथक प्रयत्नांनंतर त्याला ती पवनचक्‍की खरोखर दिसली आणि तिथं त्याला त्याचा मुलगा आर्टदेखील खरंच भेटला.
...भूगर्भात खोलवर दडून राहिलेल्या पाण्याचा जिवंत झरा वास्तवाचा खडक फोडून बाहेर आला.
* * *

अँड्य्रू अनास्ताशिओज हे ऑस्ट्रेलियातले एक बऱ्यापैकी नामवंत असे इतिहासाचे आणि पुरातत्वशास्त्राचे अभ्यासक. काही कारणानं ते गॅलिपोलीचा इतिहास तपासत होते. त्या तपासात त्यांच्या हाती लेफ्टनंट कर्नल ह्यूज नावाच्या एका ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याचा तुर्कस्तानातला पत्रव्यवहार लागला. त्यात ‘एक म्हातारा पठ्ठ्या मुलांच्या शोधात चक्‍क ऑस्ट्रेलियाहून येऊन गॅलिपोलीत थडकला’ असं एकच वाक्‍य होतं. अनास्ताशिओज यांनी अनेक वर्षं या वाक्‍याचा पाठपुरावा केला. कोण असेल हा म्हातारा पठ्ठ्या? पण त्यांना काही ठावठिकाणा लागला नाही. शेवटी आपली पत्नी डॉ. मीघन अनास्नाशिओजच्या साथीनं त्यांनी चक्‍क ही कहाणी मनानंच लिहून काढली. त्याचं पडद्यावरचं रूप म्हणजे रसेल क्रो याचा चित्रपट ः द वॉटर डिव्हायनर.
एक चिमुकला धागा, त्याचं केवढं भव्य वस्त्र निर्माण झालं बघा. दिग्दर्शक रसेल क्रो यानं चित्रपटाची हाताळणीही इतकी कलात्मक पद्धतीनं केली की तो सरधोपट हॉलिवुडी सिनेमा राहिलाच नाही. शिवाय त्यानंच जोशुआ कॉनरची मध्यवर्ती भूमिकाही साकारली. चित्रपटात जोशुआला होणारे पवनचक्‍क्‍यांचे भास आणि त्यात सम्मीलित होणाऱ्या सूफी नृत्याच्या प्रतिमांचा वापर तर भल्याभल्यांनी दाद द्यावी, इतका चांगला आहे. छायाचित्रण अर्थातच बेजोड आहे. युद्धदृश्‍यंही प्रभावी आहेत. गॅलिपोलीच्या इतिहासाची काहीशी अपरिचित पार्श्‍वभूमी मात्र चित्रपटाशी समरस होताना अडसर निर्माण करते. ज्याला तुर्की वारसा असेल आणि ज्याचा गॅलिपोलीच्या लढाईशी परिचय असेल, त्याला हा चित्रपट आवडणारच. एरवी एका पाणाड्याच्या नजरेनं केलेलं हे इतिहासाचं उत्खनन पडद्यावर पाहणंही एक अनुभवच आहे. त्यासाठी पायाळू असण्याची गरज नाही. अभिजाताची तहान पुरेशी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com