दुर्दम्य! (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

‘ब्रीऽऽद’ हा चित्रपट म्हणजे केवळ प्रेमकहाणी नव्हे, तर ती आहे एक अस्सल प्रेरणादायी कथा. गळ्यापासून खाली लुळेपणा आलेल्या रॉबिन कॅव्हेंडिश या बहाद्दराची आणि त्यांना समर्थपणे साथ देणारी त्यांची पत्नी डायना यांची. ‘अपंगत्वावर कुण्या एकानं केलेली मात’ एवढ्याच वर्तुळापुरती ती सीमित नाही. या वर्तुळाच्याही पुढं जाऊन ती बरंच काही सांगून जाते.

‘ब्रीऽऽद’ हा चित्रपट म्हणजे केवळ प्रेमकहाणी नव्हे, तर ती आहे एक अस्सल प्रेरणादायी कथा. गळ्यापासून खाली लुळेपणा आलेल्या रॉबिन कॅव्हेंडिश या बहाद्दराची आणि त्यांना समर्थपणे साथ देणारी त्यांची पत्नी डायना यांची. ‘अपंगत्वावर कुण्या एकानं केलेली मात’ एवढ्याच वर्तुळापुरती ती सीमित नाही. या वर्तुळाच्याही पुढं जाऊन ती बरंच काही सांगून जाते.

म्हणौनि माझे नीच नवे।
श्‍वासोच्छ्वासही प्रबंध होआवे।
गुरुकृपा काय नोहे।
ज्ञानदेवो म्हणे।।
-ज्ञानेश्‍वरी,

ओवी : ३३, अध्याय : अठरावा.
का  ळोख्या रात्री झाडांच्या पानोळ्यात उजेडाचे ठिपके लुकलुकू लागतात. आख्खं झाडच्या झाड उजेडाचं होऊन जातं. काजव्यांच्या प्रकाशात कुणाला पुस्तकं-पोथ्या वाचता येणार नाहीत हे कबूल; पण असं इवलंसं स्वयंप्रकाशी अस्तित्वसुद्धा जगायला पुरेसं असतं. कुणीतरी उजेडाचा थेंब घेऊन यावा आणि त्यानं दाखवलेल्या अल्पस्वल्प प्रकाशात आपण जमेल तशी मार्गक्रमणा करावी, असं मानत श्‍वासोच्छ्वास करणारेच या पृथ्वीतलावर जास्त. लाखात एखाद्या देवदूताच्या श्‍वासोच्छ्वासाचा प्रबंध होतो. आपल्या-तुपल्या सामान्यांचं होतं ते नुसतंच श्‍वसन.

गेल्या शतकात रॉबिन कॅव्हेंडिश नावाच्या एका ब्रिटिश तरुणानं असाच स्वयंपूर्ण उजेड दाखवला. त्याची कहाणी आपल्याला फारशी माहीत असण्याचं कारण नाही. दूर इंग्लंडात रॉबिन कॅव्हेंडिश यांनी ता. १२ मार्च १९३० रोजी डर्बीशायरमध्ये जन्म घेतला आणि ८ ऑगस्ट १९९४ रोजी ऑक्‍सफर्डशायरमध्ये त्यांनी शेवटला श्‍वास घेतला, एवढ्यात ही गोष्ट संपली असती; पण मधल्या ६४ वर्षांत त्यांनी घेतलेला प्रत्येक श्‍वास हा जगभरातल्या अपंगांसाठी, खुर्चीला खिळलेल्या परावलंबी जीवांसाठीच घेतला आणि सोडला होता, इथं गोष्टीला गाथेचं अधिष्ठान प्राप्त होतं.

‘‘खुर्चीला खिळलात, पलंगावर अहर्निश पडलात म्हणून काय झालं? तुमचा श्‍वास तर चालू आहे ना? मग या जगात तुम्हाला निश्‍चित स्थान आहे. या अवस्थेतही माणूस कामाचा डोंगर उभा करू शकतो. कर्तृत्वाला असं एका जागी खिळवता येत नसतं, महाशय!! उठा, निघा...तुमच्यासारखे अनेक अपंग तुमच्या मदतीच्या हाताची वाट पाहताहेत. त्यांच्यासाठी तरी उठा...!’’ हे रॉबिन यांनी ठणठणीत आवाजात सांगितलं आणि करूनही दाखवलं. रॉबिन यांना राणी इलिझाबेथनं कृतज्ञतेनं ‘एमबीई’चा किताब दिला. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जगभरातल्या हजारो अपंगांनी त्यांना मन:पूर्वक ‘थॅंक यू’ म्हटलं.

विशेष म्हणजे हे रॉबिन वयाच्या अठ्‌ठाविसाव्या वर्षापासून स्वत: चाकाच्या खुर्चीला खिळलेले होते. गळ्यापासून त्यांचं शरीर कायमस्वरूपी निश्‍चेष्ट होतं. इतकंच नव्हे तर, त्यांना आयुष्यभर कृत्रिम व्हेंटिलेटरच्या साह्यानंच उसना श्‍वासोच्छ्वास करावा लागला; पण नाकाम शरीरानिशी जगभर फिरणाऱ्या या देवमाणसाला ‘देणाऱ्याचे हात हजारो’ होते.
रॉबिन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट गेल्याच वर्षी येऊन गेला. नाव होतं ः ‘ब्रीऽऽद..’ बघा, चित्रपटाचं नाव किती सार्थ आहे...इंग्लिशमध्येही आणि मराठीतही! खरोखर श्‍वासोच्छ्वास हेच त्यांचं ब्रीद होतं. चित्रपट खूप गाजला नाही; पण रॉबिन यांची जिगर आणि प्रतिकूलतेवर टाच रोवण्याचा त्यांचा पक्‍का इरादा स्तिमित करून गेला. वाटलं, ही मंडळी कुठल्या मुशीतून जन्माला येतात कुणास ठाऊक.
* * *

साधारणतः १९५७ चा सुमार असेल. ब्रिटिश लष्करात सात वर्षं काढून कॅप्टन रॉबिन नुकताच शहरी जीवनाला रुळत होता. तसा सुखवस्तू कुटुंबातला. जेमतेम पंचविशीचा. लष्करी कामगिरीनंतर त्यानं केनियात चहाच्या मळ्यात नोकरी धरली. जगभरातले अनेक चहाचे मळे ब्रिटिशांच्या ताब्यात होते. चहाची तोड, वर्गवारी, स्थानिक मजुरांच्या नेमणुका, त्यांना हुकमाखाली ठेवणं यांत रॉबिन रमला होता. सुट्‌टीच्या काळात घरी इंग्लंडला यायचं...टेनिस किंवा क्रिकेट खेळायचं...दोस्तांबरोबर पार्ट्या, पिकनिका करायच्या हेच त्याचं मस्तमौला आयुष्य होतं. तारुण्य होतं. खेळगड्याचं तंदुरुस्त शरीर होतं. एका क्रिकेटच्या सामन्याच्या वेळी त्याला डायना ब्लेकर भेटली. रॉबिनला ती बघताक्षणी आवडली. तिलाही तो आवडला. मग सगळं ठरल्याप्रमाणे झालं.

‘‘दिसायला बरा आहे म्हणून हुरळून जाऊ नकोस...लग्न करून केनियात मच्छर मारायला जाणार आहेस का?’ असं तिला तिच्या जुळ्या भावांनी एकमुखानं विचारलं; पण डायनानं रॉबिनला होकार दिला. लग्न करून ती केनियात गेली. केनियात मोठ्ठं घर, नोकर-चाकर... सगळं चांगलंच होतं. रॉबिन दांपत्याला लग्गेच एक अपत्य झालं.
केनियामध्ये सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळता खेळता एक दिवस रॉबिन अचानक पडला. थोडं गरगरलं; पण थोडा आराम केला की बरं वाटेल, असं त्याला वाटलं. मात्र, नंतर त्याला फणफणून ताप भरला. नैरोबीच्या मोठ्या इस्पितळात हलवावं लागलं. निदान झालं ः हा पोलिओचा हल्ला होता. एरवी पोलिओग्रस्तांमध्ये पाय गमावलेले अधिक असतात; पण रॉबिन गळ्याच्या खाली संपूर्ण लुळा पडला. त्याला कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर ठेवावं लागलं. त्या काळी आजच्यासारखे अत्याधुनिक व्हेंटिलेटर नव्हते. लोखंडी व्हेंटिलेटर असायचे. लोहाराच्या भात्यासारखे. ट्राकिओक्‍टमीची शस्त्रक्रिया करून व्हेंटिलेटरची एक नळी रॉबिनच्या फुफ्फुसांना जोडण्यात आली. भात्याच्या उघडझापीनं त्याचं जगणं सुरू झालं.
* * *

रॉबिनची अवस्था बिकट होती. तो फारतर तीनेक महिने जगेल, असं डॉक्‍टरांनी डायनाला सांगितलं. हा भयानक प्रसंग होता. व्हेंटिलेटरचा प्लग काढला तर तीनेक मिनिटंच तो जगू शकतो, हेही कळलं होतं. प्लग काढायचा? त्याचीही पुढल्या हालांमधून सुटका होईल, तुलाही नवीन आयुष्य सुरू करता येईल, असं तिला सासू-सासऱ्यांपासून कित्येकांनी सांगितलं. रॉबिनला अर्थात बोलता येत नव्हतं; पण ओठ हलवून त्यानंही डायनाला सांगितलं ः ‘‘आय वाँट टू डाय...मला मरायचंय!’’
डायनानं ऐकलं नाही. यापुढल्या आयुष्यातली आपली सगळ्या प्रकारची सुखं संपलेली आहेत, हे तिलाही कळलं होतं. कुशीत छोटं मूल होतं. त्यालाही वाढवायचं होतं. इस्पितळात पडून राहिलेल्या नवऱ्याची बिलं भरणं कालांतरानं खूप कठीण होणार, हेही तिला कळत होतं; पण तिनं तो विचार झटकला.
रॉबिनला इस्पितळातून बाहेर काढण्याच्या हालचाली तिनं सुरू केल्या. हे अवघडच होतं. कारण, तो यांत्रिक व्हेंटिलेटर इस्पितळातल्या नर्सेसनाच वापरता येण्याजोगा होता. मग तिनं नर्सिंग शिकून घेतलं. आणि शेवटी स्वत:च्या विश्‍वासावर हवाला ठेवत डॉक्‍टरांशी भांडण काढून रॉबिनला इस्पितळातून हलवून घरी आणलं. पुढं काय? हा यक्षप्रश्‍न समोर होता.
* * *

लवकरच कॅव्हेंडिश कुटुंब ऑक्‍सफर्डला परतलं. इथं मित्रमंडळींचा, नातलगांचा बराच मोठा गोतावळा होता. रॉबिनच्या प्रकृतीत लक्षणीय फरक पडू लागला. अथक्‌ परिश्रमांनी त्यानं वाणी परत मिळवली. इतक्‍या शुद्ध रूपात मिळवली की त्याचं चैतन्यानं रसरसलेलं, सकारात्मक भावनांनी भारलेलं बोलणं ऐकण्यासाठी लोक लांबलांबून येत. आपल्या अपंगत्वाचा त्यानं कधीच बाऊ केला नाही; किंबहुना तो त्याची उपेक्षाच करी. ऑक्‍सफर्डमधल्या त्याच्या घरातलं वातावरण कमालीचं खेळकर आणि अनौपचारिक असे. भेटायला गेलेल्या माणसाला जणू रॉबिन त्याचीच वाट पाहत बसला होता, असं वाटायचं.

‘‘ओहो, अलभ्य लाभ! बोला, काय घेणार? एक काम करा, खाली तळघरात जा, तिथं वाइनचा मस्त खजिना आहे. वरच्या खणातली दुसरी आणि तिसरी बाटली...ओके?’’ तो सांगायचा. बघता बघता पाहुणेमंडळी घरच्यासारखी होऊन जात. त्याला बघून शारीरिक किंवा मानसिक व्याधी दूर पळूनच जातात, असं त्याच्याबद्दल बोललं जायचं.
वास्तविक व्हेंटिलेटरचे अन्य त्रास होतेच. कृत्रिम श्‍वासोच्छ्वासामुळं कधी कधी त्याच्या फुफ्फुसांमधून रक्‍त येई. श्‍वास गुदमरे. संसर्गाचे त्रासही होते; पण त्याच्या सेवेत अहोरात्र असलेल्या डायनाच्या जोरावर त्यानं सगळ्या अडचणी दूर फेकल्या. पोलिओनं आलेल्या अपंगत्वामुळं काय होतं? वावरण्यावर मर्यादा येतात. हेच रॉबिनला नको होतं. त्याच्यासाठी चाकाची एक खुर्ची बनवण्यात आली. तो अवाढव्य लोखंडी व्हेंटिलेटर खुर्चीलाच अडकवलेला असे. बॅटरीवर चालणारा हा व्हेंटिलेटर रॉबिनचाच एक बुद्धिमान शास्त्रज्ञ-मित्र टेडी हॉल यानं बनवून दिला होता. अर्थात बॅटरी रिचार्ज करण्याची सोय मात्र सुरवातीला नव्हती. नंतर हेच व्हेंटिलेटरचं डिझाइन बदलत-सुधारत गेलं. त्याचा आकार छोटा होत गेला. खुर्चीतही सुधारणा होत गेल्या. पुढं तर रॉबिननं अशी खुर्ची बनवून घेतली, की तिच्या साह्यानं फिरता तर येईच; शिवाय केवळ मानेच्या काही स्नायूंची हालचाल करून टीव्हीचा चॅनेलही बदलता येई...बेल वाजवता येई...फोन उचलता येई. अर्थात यामध्ये झपाट्यानं विकसित होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा वाटाही खूप मोलाचा होता. अशा खूप खुर्च्या त्यानं अनेक गरजूंना वाटल्या. रॉबिन हा जगभरातल्या अपंगांसाठी रोल मॉडेल ठरला. कृत्रिम श्‍वासोच्छ्वासाच्या मदतीनं जगणाऱ्यांना इंग्लिशमध्ये ‘रेस्पोनॉट’ अशी संज्ञा आहे. इंग्लंडामधले रेस्पोनॉट शोधून त्यांची यादी करणं, त्यांना सरकारी मदत, सवलती मिळवून देणं असं काम त्यानं हाती घेतलं. अपंगांसाठी होणाऱ्या सुधारणा पडताळून पाहण्यासाठी रॉबिननं स्वत:चा अक्षरश: गिनिपिग केला. नवनवी औषधं, उपकरणं यांची पहिली चाचणी रॉबिनच्या घरी होत असे. कृत्रिम श्‍वसनाच्या जोरावर दिवस कंठणाऱ्यांना बाहेर सहलीला जाणं अशक्‍य असतं. मुक्‍कामाची सहल ही तर बातच सोडा. रॉबिन आणि डायनानं मग साउदॅम्पटनमध्ये खास रेस्पोनॉटसाठी रिझॉर्ट सुरू केलं. तिथं वैद्यकीय मदतही आहे आणि चैनीच्या गोष्टीही. आजही ते रिझॉर्ट सुरू आहे.

ता. आठ ऑगस्ट १९९४ रोजी रॉबिन कॅव्हेंडिश निवर्तले आणि ४० वर्षांच्या सहवासात पहिल्यांदा डायनाचा श्‍वास अडकला. रॉबिन यांचं कार्य त्या आजही पुढं नेत आहेत. जगभरातल्या रेस्पोनॉटसाठी जगातलं एकमेव आधारकेंद्र त्यांचा ट्रस्ट चालवतो. उजेडाचं बेट आताशा बरंच उजळून निघालं आहे.
* * *

जोनाथन कॅव्हेंडिश हे ‘इमेजरियम’ नावाच्या चित्रपट कंपनीचे मालक-चालक. रॉबिन आणि डायनाचे पुत्र. ‘प्लॅनेट ऑफ द एप्स’ किंवा ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’सारख्या भन्नाट सिनेमात गाजलेल्या भूमिका करणारे अँडी सर्किस यांच्या साथीनं त्यांनी ही कंपनी यशस्वीरीत्या उभी केली आहे. सर्किस यांनी ‘ ब्रीद’चं दिग्दर्शन केलं. या सिनेमाला त्यांनी एकदम रोमॅंटिक डूब दिली आहे. अर्थात चित्रपटात अनेक त्रुटी आहेत. उदाहरणार्थ ः कॅव्हेंडिश कंपनी अर्थार्जनासाठी नेमकं काय करत होती, हे शेवटपर्यंत कळत नाही; पण असे चौकस सवाल मागं टाकले तर चित्रपटाचा गाभा सापडू शकतो. या चित्रपटाची साहजिकच तुलना झाली ती अँडी रेडमेन यांनी केलेल्या ‘थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ या चित्रपटाशी. प्रख्यात खगोलतज्ज्ञ आणि भौतिकीविज्ञानातलं ऋषितुल्य व्यक्‍तिमत्त्व स्टीफन हॉकिंग यांच्यावरचा तो अप्रतिम जीवनपट होता. त्यानं ऑस्कर पटकावलं होतं.

अँड्य्रू गारफील्डनं ‘ब्रीऽऽद’ या चित्रपटात कमाल केली आहे. ‘अमेझिंग स्पायडरमॅन’मध्ये चेहरा झाकून वावरणारा हा सुपरहीरो या चित्रपटात रॉबिन कॅव्हेंडिश म्हणून समोर येतो. बिछान्यावर पडून फक्‍त भावमुद्रांच्या जोरावर अवघा पडदा भारून टाकतो. डायनाच्या रोलमध्ये क्‍लेअर फॉय आहे. तिनंही सुंदर साथ दिली आहे. चित्रपट बघताना जाणवत राहतं की आपण एक अप्रतिम प्रेमकहाणी बघत आहोत. ही कहाणी फक्‍त ‘अपंगत्वावर कुण्या एकानं केलेली मात’ एवढ्याच वर्तुळापुरती सीमित नाही. रॉबिन कॅव्हेंडिश यांचा खरा व्हेंटिलेटर होता त्यांची पत्नी डायना. बस्स, हा उजेडाचा आणखी एक थेंब दिसला की चित्रपटातल्या अनेक त्रुटी जाणवेनाशा होतात.
उजेडाची बेटं शोधायला बॅटरी घेऊन जावं लागत नाही. ते उजळलेलं समोर दिसतंच.

Web Title: pravin tokekar write article in saptarang