काळरात्रीचा पहिला प्रहर... (प्रवीण टोकेकर)

रविवार, 25 मार्च 2018

पंतप्रधान झाल्यापासून ते डंकर्कच्या पलायनापर्यंतच्या चर्चिल यांच्या एकाकी लढाईचं प्रत्ययकारी चित्रण 'द डार्केस्ट आवर' या चित्रपटात दिसतं. युद्ध जिंकण्याची मूलभूत सामग्री असते ती खुमखुमी आणि खलबतं! विमानं, तोफा, क्षेपणास्त्रं, बंदुका हे सगळं त्यानंतर येतं. 'द डार्केस्ट आवर' हाच धडा शिकवून जातो. आपल्या रोजच्या जगण्या-मरण्यातही या संदर्भांना एक मोल देऊन जातो. सुजाणानं कधीही चुकवू नये, असा हा चित्रपट आहे. 

पंतप्रधान झाल्यापासून ते डंकर्कच्या पलायनापर्यंतच्या चर्चिल यांच्या एकाकी लढाईचं प्रत्ययकारी चित्रण 'द डार्केस्ट आवर' या चित्रपटात दिसतं. युद्ध जिंकण्याची मूलभूत सामग्री असते ती खुमखुमी आणि खलबतं! विमानं, तोफा, क्षेपणास्त्रं, बंदुका हे सगळं त्यानंतर येतं. 'द डार्केस्ट आवर' हाच धडा शिकवून जातो. आपल्या रोजच्या जगण्या-मरण्यातही या संदर्भांना एक मोल देऊन जातो. सुजाणानं कधीही चुकवू नये, असा हा चित्रपट आहे. 

इतिहास माझ्याकडं कनवाळूपणाने पाहील, कारण तो इतिहास मीच लिहिणार आहे. :  सर विन्स्टन चर्चिल, ब्रिटनचे माजी पंतप्रधान. (1874- 1965) 

सर विन्स्टन लेनार्ड स्पेन्सर चर्चिल हे एक भलतंच अवघड प्रकरण आहे. आपल्या अमोघ वक्‍तृत्वाच्या जोरावर त्यांनी दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचं आव्हान अखेरपर्यंत धगधगतं ठेवलं आणि विजयही मिळवला. इंग्लंडचा हा अजिंक्‍यवीर वादातीत मात्र नाही. त्यांच्या युद्धखोर, निर्घृण वृत्तीला नावं ठेवणाऱ्यांची संख्या आज इंग्लंडातही कमी नाही. नुकत्याच झालेल्या ऑस्कर पुरस्कारांच्या सोहळ्यात चर्चिल यांच्या चरित्रकहाणीवर आधारित 'द डार्केस्ट आवर' या चित्रपटाचं प्रचंड कौतुक झालं. गॅरी ओल्डमन या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट भूमिकेचा पुरस्कार बहाल झाला; पण 'पुन्हा एकदा सामूहिक कत्तलबाजाचा अनुचित सन्मान' असे मथळेही पाठोपाठ झळकले. 

चर्चिल यांनी हिटलरनामे राक्षसाचा पाडाव जरूर केला; पण त्यांची युद्धखोर वृत्ती आणि गतानुगतिकांविषयीची त्यांची खुले आम तुच्छता हिटलरच्या तोडीस तोड होती, असे दाखले दिले जातात. भारतीयांना तर त्यांनी 'शुद्ध जनावरं'म्हटलं होतं. (बीस्टली पीपल ऑफ द बीस्टली रिलिजन). सन 1943 च्या बंगालच्या भयानक दुष्काळात तब्बल 40 लाख गोरगरीब अन्नावाचून तडफडून मेले, त्याला कारणीभूत ठरली चर्चिल यांची नीती. (संदर्भग्रंथ : चर्चिल्स सीक्रेट वॉर, लेखिका : मधुश्री मुखर्जी) त्याचप्रमाणे मेसोपोटेमियामध्ये इराकी कुर्द बंडखोरांविरुद्ध विषारी वायूचा वापर करण्यात काहीही गैर नाही, असंही त्यांचं म्हणणं होतं. राणीच्या महालाच्या पायऱ्या चढणाऱ्या 'अर्धवस्त्र फकीरा'ला, म्हणजेच महात्मा गांधी यांना, पाहून त्यांना म्हणे मळमळत असे. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. 

इतकं असूनही चर्चिल यांचं व्यक्‍तिमत्त्व इतिहासात कलदार रुपयासारखं खणखणीत वाजत राहिलं. हमेशा टोकदार बोलणारा हा नेता एरवी त्याच्या देशातही सर्व-अप्रियच होता. त्यांना ब्रिटनचं पंतप्रधानपद मिळालं तेही नाइलाजानंच. ''कप्तानपद मिळालंय, ते जहाज बुडत असल्यामुळं...'' याची जाणीव त्यांना होती. 

हिटलरच्या फौजा सर्व बाजूंनी युरोप घेरत होत्या. फ्रान्सची कढी पातळ झाली होती. ब्रिटिश सैन्य पार चेपलं गेलं होतं. काही काळ किल्ला लढवून हिटलरशी तहाची बोलणी करावीत, एवढाच एक पर्याय डोळ्यांसमोर दिसत होता. ब्रिटिश पुढारी आणि राजा (किंग जॉर्ज सहावे) यांचंही तेच मत होतं. नामुष्की पत्करण्याची तयारी नव्हती ती फक्‍त विन्स्टन चर्चिल यांची. ''तुम्ही वाघाशी वाटाघाटी करू शकत नाही...विशेषत: तुमचं डोकं त्याच्या जबड्यात असेल तेव्हा!'' असं चर्चिल यांचं म्हणणं. 

युरोपची धूळधाण उडवत दाराशी येऊन ठेपलेल्या हिटलरच्या फौजांसमोर मॅजिनो तटबंदी पडली. फ्रान्सनं शस्त्रं टाकली. डंकर्कच्या किनाऱ्यावर तीन लाख ब्रिटिश फौज अडकली होती. समोर आगीचा वडवानल, मागं अफाट समुद्र... इथं अडकलेली फौज सुखरूप सोडवली नाही, तर डंकर्क हीच ब्रिटिश साम्राज्याची दफनभूमी ठरेल, हे ओळखायला कुणा युद्धतज्ञाची गरज नव्हती. लौकिकार्थानं हे युद्धातून पळ काढणंच होतं; पण त्याच्या जोरावरच पुढं चर्चिल यांनी महायुद्ध जिंकलं, म्हणून डंकर्कचं यशस्वी पलायन इतिहासात महत्त्वाचं ठरतं. 

पंतप्रधान झाल्यापासून ते डंकर्कच्या पलायनापर्यंतच्या चर्चिल यांच्या एकाकी लढाईचं प्रत्ययकारी चित्रण 'द डार्केस्ट आवर' या चित्रपटात दिसतं. युद्ध जिंकण्याची मूलभूत सामग्री असते खुमखुमी आणि खलबतं...! विमानं, तोफा, क्षेपणास्त्रं, बंदुका हे सगळं नंतर येतं. 'द डार्केस्ट आवर' हाच धडा शिकवून जातो. आपल्या रोजच्या जगण्या-मरण्यातही या संदर्भांना एक मोल देऊन जातो. सुजाणानं कधीही चुकवू नये, असा हा चित्रपट आहे. 

* * * 

तो सन 1940 चा मे महिना होता. हिटलरच्या फौजा बेल्जियमच्या सरहद्दीपर्यंत येऊन ठेपलेल्या. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये वातावरण तापलेलं होतं. पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचं नेतृत्व दुबळं ठरतंय, आघाडीचं सरकार बनवून सर्वसंमतीचा नव्या दमाचा पंतप्रधान नियुक्‍त करावा, असं मत बनत चाललं होतं. ठरलेल्या राजकारणानुसार, पार्लमेंटमध्ये मजूर पक्षाच्या मेहेरबान मेंबरांनी पंतप्रधान चेंबरलेन यांच्यावर टीकेची झोड उठवली. रावबहाद्दूर, खुर्ची सोडा! 

चेंबरलेनसाहेबांनी अखेर हा आग्रह मान्य केला. हुजूर पक्षाच्या एका अनौपचारिक डिनरच्या वेळी संभाव्य उमेदवारांची नावं चर्चेत आली. परराष्ट्रमंत्री लॉर्ड हॅलिफॅक्‍सचं नाव वारंवार येत होतं; पण 'अजून माझी तितकी तयारी झालेली नाही' असं सांगून लॉर्डसाहेबांनी हात झटकले. कुठलंही नाव पसंतीला उतरेना. 

''आता एकच नाव उरलंय, जे विरोधी पक्षांनाही त्यातल्या त्यात रुचेल...पण ते कुणालाच आवडणारं नाही...'' चेंबरलेन स्वत:शीच बोलल्यासारखं बोलले. 

ब्रिटिश आरमाराचे पहिले प्रमुख सर विन्स्टन चर्चिल तेव्हा व्हाइटहॉलमधल्या सरकारी बंगल्यात राहत असत. वय होतं 65. या उतावळ्या, तिरसट म्हाताऱ्याला मनासारखी धड टायपिस्ट मिळत नव्हती. इलिझाबेथ लेटन नावाची एक गरीब शेळी त्यांच्यासमोर उभी करण्यात आली. ओठात सदैव चिरुट, अस्ताव्यस्त नाइट गाऊन, सक्‍काळी सक्‍काळी डेस्कावर व्हिस्कीचा गिलास...अशा अवस्थेत चर्चिल यांनी इलिझाबेथला श्‍वास घेऊ न देता तारेचा मजकूर डिक्‍टेट करायला सुरवातही केली. एकीकडं फोन कानाला होता, ओठात चिरुट होता. असल्या गदारोळात टाइप झालेला मजकूर पाहून चर्चिलसाहेबांचं पित्त खवळलं आणि त्यांनी इलिझाबेथला अक्षरश: हाकलून दिलं. रडत रडत निघालेल्या इलिझाबेथची नोकरी वाचवली ती लेडी क्‍लेमंटाइन म्हणजेच सौभाग्यवती चर्चिल यांनी. क्‍लेमंटाइन आणि विन्स्टन या उतारवयातल्या जोडप्याचा भावबंध इलिझाबेथनं नंतर खूप जवळून पाहिला. ते नातं विलक्षण सुंदर होतं. 

* * * 

सर चर्चिल बकिंगहॅम महालात पोचले. खरंतर या बेमुर्वत माणसाला पंतप्रधान करणं सम्राटाच्याही जिवावर आलं होतं. चर्चिल यांनी आपल्या स्वभावाला मुरड घालून हिटलरशी शांततेच्या वाटाघाटी सुरू कराव्यात, युद्धबिद्ध या आपल्याला परवडणाऱ्या गोष्टी नाहीत, अशा विचारांचा खूप मोठा प्रवाह ब्रिटिश राजकारणात होता; पण नवनियुक्‍त पंतप्रधान चर्चिल यांनी पार्लमेंटमधल्या पहिल्याच भाषणात आपला आक्रमक बाणा जाहीर केला. शब्दांच्या ठिणग्या सभागृहात उडत राहिल्या... 

''सज्जनहो, अफाट पसरलेल्या ब्रिटिश साम्राज्याला आज एका धाग्यानं घट्ट बांधून टाकलं आहे. तो धागा आहे स्वाभिमानाचा. अगतिकतेला आणि लज्जेला सामोरं जाण्याऐवजी अखेरच्या क्षणापर्यंत युद्धासाठी उभं ठाकणं हे आपलं कर्तव्य ठरतं. लढायचं ते युद्धात विजय मिळेपर्यंत. रक्‍त, घाम, अश्रू आणि श्रम या साऱ्यासकट कितीही किंमत मोजावी लागो, कितीही वेदना होवोत, विजय अनिवार्य आहे...'' 

चर्चिल यांचा आविर्भाव बघून जनसामान्यांना स्फुरण आलंही असेल; पण राजकारण्यांनी ताबडतोब हालचाली सुरू केल्या. चर्चिल यांच्या विरोधात अविश्‍वासाचा ठराव आणून त्यांना घरी पाठवायचं, असा डाव 'हॅलिफॅक्‍स-चेंबरलेन आणि मंडळीं'नी रचला. त्याच सुमारास तब्बल तीन लाख ब्रिटिश सैनिक डंकर्कच्या किनाऱ्यावर अडकले असल्याची खबर येऊन थडकली. 

* * * 

चर्चिल यांनी रेडिओवरून भाषणं द्यायला सुरवात केली. ब्रिटिश फौजा कणखरपणे लढत असल्याचं चित्र त्यांनी उभं केलं. वस्तुस्थिती पूर्णत: उलट होती. रणांगणातून पळ काढायची वेळ आली होती. चर्चिल यांचा बराचसा वेळ वॉर रूममध्ये जायचा. लंडनमधल्या एका इमारतीच्या तळघरात ही खोली होती. तिथंच गुप्त बैठका होत. तिथूनच चर्चिल यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष फ्रॅंकलिन रुझवेल्टना फोन लावला. अमेरिका तोपर्यंत महायुद्धात उतरलेली नव्हती. 

''सर, तुमच्याकडून आम्ही काही पी-40 फायटर विमानं विकत घेतली होती. त्यांची डिलिव्हरी घेण्यासाठी जहाज पाठवू का?'' चर्चिल यांनी जमेल तितका नम्र आवाज लावून विचारणा केली. 

''ओह, तुम्ही अगदी माझी पंचाईत करताय...आमच्या नव्या कायद्यानुसार, लष्करी उपकरणं परदेशात पाठवायला मनाई आहे!'' रुझवेल्ट म्हणाले. 

''पण आम्ही त्या विमानांचे पैसे चुकते केले आहेत...ते पैसेही आम्ही तुमच्याकडूनच उसने घेतले होते की!'' चर्चिल यांनी मुद्दा रेटला. 

''ओह...सो सॉरी. तिकडं आत्ता रात्र असेल ना?'' रुझवेल्ट. 

'' होय...तुम्हाला कल्पनाही नाही येणार इतकी काळोखी रात्र!'' चर्चिल यांनी उत्तर दिलं. 

डंकर्कमधून आपलं सैन्य सुखरूप बाहेर काढण्यासाठी ते जंग जंग पछाडत होते. दुसऱ्या आघाडीवर घरचे शत्रू प्रबळ होत होते. इटलीचा सर्वेसर्वा मुसोलिनी मध्यस्थी करायला तयार आहे. हिटलरशी बोलणी करून युद्ध मिटवता येईल. फुकाच्या हौतात्म्याला काहीही अर्थ नाही, असा निर्वाणीचा सल्ला लॉर्ड हॅलिफॅक्‍स यांनी दिला. चोवीस तासांत तसा निर्णय जाहीर करा, अन्यथा मी राजीनामा देईन, असाही दम त्यांनी चर्चिल यांना भरला. किंग जॉर्ज यांचेही कान भरण्यात आले. अखेर चर्चिल यांची समजूत घालण्यासाठी किंग जॉर्जनं त्यांना जेवायला पॅलेसमध्ये बोलावलं. 

'' दिवसा कसं काय तुम्हाला हे जमतं?'' चर्चिल यांच्या शेजारच्या व्हिस्कीच्या चषकाकडं पाहत राजा म्हणाला. 

''प्रॅक्‍टिस लागते त्याला...'' चर्चिल शांतपणे म्हणाले. 

...शांततेच्या वाटाघाटी करणं म्हणजे शरणागती. ती पत्करणं चर्चिल यांना साफ नामंजूर होतं. साक्षात राजाला त्यांनी आपली बाजू पटवून दिली. डंकर्कची नामुष्की टाळणं अशक्‍य होऊन बसलं होतं. जिद्द न सोडता चर्चिल यांनी इतरही मार्ग हुडकून पाहिले. आमचे सैनिक परत आणण्यासाठी जहाजं तरी द्या, अशी रुझवेल्ट यांना पुन्हा गळ घातली; पण तिथंही नकारच मिळाला. अखेर ऍडमिरल बर्टरॅम रॅमसे यांना निरोप धाडला गेला : 'आसपासच्या मच्छिमारांकडून मिळतील तितक्‍या होड्या मिळवा. सैनिकांची सोडवणूक करा.' रॅमसे आणि चर्चिल यांनी गुप्त हालचाली करून 860 होड्यांचा बंदोबस्त केला. हेच ते जगद्विख्यात 'ऑपरेशन डायनॅमो'...ज्यानं इतिहासाचा पट बदलला. 

* * * 

कचेरीतून मधूनच सटकून लंडनमध्ये भटकण्याची चर्चिल यांना खोड होती. वॉर रूममधल्या झगड्यानंतर एकदा ते असेच लंडनच्या सुप्रसिद्ध भुयारी रेल्वेच्या डब्यात शिरले. डब्यातलं साधंसुधं पब्लिक हादरलं; पण चर्चिल यांनी बघता बघता डब्यातल्या सहप्रवाशांशी दोस्ती केली. 

''तुमचा चेहरा माझ्या बाळासारखा आहे...'' एक बाई म्हणाली. 

''माझा चेहरा जगातल्या कुठल्याही बाळासारखा दिसतो, मॅम!'' चर्चिल म्हणाले. गप्पा रंगल्या. चर्चिल यांनी विषय काढला. काय करायचं? लढायचं? की हत्यारं टाकायची? 

''वेड लागलंय काय! आम्ही रस्त्यात लढू...रस्त्यात! त्या हरामखोराच्या हुकमतीपेक्षा मरण परवडलं...'' सळसळत्या रक्‍ताचा एक तरुण म्हणाला. 

...चर्चिल परत आले, तेव्हा त्यांचा निर्णय आणखीच पक्‍का झाला होता. पार्लमेंटमध्ये त्यांनी कमालीच्या ओजस्वी शब्दांत भाषण दिलं. 

''सज्जनहो, पाय रोवून जी राष्ट्रं लढली ती अजरामर झाली. ज्यांनी गुडघे टेकले ती आज नामशेष आहेत. हा मानवाचा इतिहास आहे. ही वेळ वाटाघाटींची नाही. हाती लागेल त्या शस्त्रानिशी त्या मदोन्मत्त राक्षसाला नेस्तनाबूत करण्याची आहे. आपण रस्त्यात लढू. डोंगरांवर लढू. समुद्रात लढू. आकाशातून लढू...पण जिंकण्यासाठी लढू. ब्रिटनची भूमी अजेय होती, आहे आणि ती तशीच राहिली पाहिजे. ते आपल्या हातात आहे...वाटाघाटी कराव्यात असं काही जणांचं मत आहे; पण माझी त्यांना विनंती आहे, की तुमचं नेमस्त मत बदला. जो स्वत:चं मत बदलू शकत नाही, तो परिस्थितीही बदलू शकत नाही. पडेल त्या किमतीत विजय...पण शरणागती? नामंजूर!'' 

मंत्रमुग्ध झालेली पार्लमेंट थरारून गेली. पारडं फिरलं होतं. एका भाषणात विरोधक भुईसपाट झाले. टाळ्यांच्या कडकडाटात चर्चिल यांना सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. 

''नेमकं काय झालं?'' हात बांधून शांतपणे बसलेल्या लॉर्ड हॅलिफॅक्‍सना कुणीतरी विचारलं. लॉर्डसाहेबांनी त्यावर उत्तर दिलं :'' त्यांनी इंग्लिश भाषेला आज युद्धावर पाठवलं...'' 

* * * 

चर्चिल हा कलावंतांचा आवडता विषय आहे. किंबहुना पुरस्कारबिरस्कार हवा असेल तर चर्चिल यांची भूमिका करावी, असं मिस्किलपणे म्हटलं जायचं. 'द डार्केस्ट आवर' हा चित्रपट त्याच पठडीतला. 'थिअरी ऑफ एव्हरीथिंग' हा डॉ. स्टीव्हन हॉकिंग यांच्या जीवनावरचा चित्रपट ज्यांनी लिहिला, त्याच अँथनी मॅक्‌कार्टन यांनी चर्चिलची पटकथा लिहिली आहे. दिग्दर्शक जो राइट यांनी ती पडद्यावर आणली. गॅरी ओल्डमन या नाणावलेल्या अभिनेत्यानं या चित्रपटात साकारलेला चर्चिल हा आजवरचा सर्वात विश्‍वसनीय आणि प्रभावी चर्चिल आहे, असं कलावंत मंडळी खुल्या मनानं मान्य करतात. 

या चित्रपटाचा खरा नायक हे चर्चिल असले तरी प्राण म्हणाल तर इंग्लिश भाषा आहे. या चित्रपटातले संवाद, इंग्लिश लालित्य भाषेच्या प्रेमिकांना भुरळ घालणारं असंच आहे. 

...चर्चिल यांना युद्धावेगळं पाहिलं तर त्यांचं निराळं स्वरूप दिसतं. अनेकांना, विशेषत: भारतीयांना ते आवडण्यासारखं नाही, तरीही त्यांचं इतिहासातलं स्थान नाकारता येत नाही. काळरात्रीच्या पहिल्या प्रहरी जगाचा डोळा लागत होता, तेव्हा हा युद्धनेता जागा राहिला होता. 

इतिहासानं त्यांच्याकडं खरंच कनवाळूपणानं पाहिलं. कारण, तो त्यांनीच लिहिला होता. 

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Pravin Tokekar writes about the darkest hour movie