सुंदर ती दुसरी दुनिया (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर
रविवार, 23 एप्रिल 2017

‘लाला लॅंड’ची जी सुरावट आहे, तिला तोड नाही. डोळे मिटून ऐकावी. फुलांच्या वाफ्यातून निळी, जांभळी, पिवळी, गुलाबी फुलपाखरं उडावीत, तसे पियानोचे सूर उमटतात. सुरांची वर्तुळं एकमेकांत मिसळतात, वेगळी होतात. मन भावविभोर होतं. ‘लाला लॅंड’ ही जगण्याची ‘दुसरी सुंदर दुनिया’ आहे. या सुंदर दुनियेत अधूनमधून एखादं पाऊल टाकून यावं. त्यासाठी हॉलिवूडची म्युझिकल फॅंटसीच साथीला असावी, अशी काही पूर्वअट नाही. हे ज्याला कळलं, तो सुखिया जाला!

‘लाला लॅंड’ची जी सुरावट आहे, तिला तोड नाही. डोळे मिटून ऐकावी. फुलांच्या वाफ्यातून निळी, जांभळी, पिवळी, गुलाबी फुलपाखरं उडावीत, तसे पियानोचे सूर उमटतात. सुरांची वर्तुळं एकमेकांत मिसळतात, वेगळी होतात. मन भावविभोर होतं. ‘लाला लॅंड’ ही जगण्याची ‘दुसरी सुंदर दुनिया’ आहे. या सुंदर दुनियेत अधूनमधून एखादं पाऊल टाकून यावं. त्यासाठी हॉलिवूडची म्युझिकल फॅंटसीच साथीला असावी, अशी काही पूर्वअट नाही. हे ज्याला कळलं, तो सुखिया जाला!

जगण्याचं गाव बारा भानगडींचं असतं. पावलापावलावर दु:ख, वेदनांचे उकिरडे असतात. नाकाला रुमाल लावायला लावणारे दुर्गंधांचे भपकारे असतात. पायाखाली ठेचकाळायला लावणारा रस्ता असतो. या असल्या गोष्टींना हुकवत ज्याला चालणं जमलं, त्यानं मुक्‍काम गाठला म्हणायचा. ‘वो सुबह कभी तो आयेगी’ असं स्वत:लाच बजावत स्वत:चा चाबूक स्वत:च्याच पाठीवर उडवायचा. चलते रहो बर्खुर्दार. ये दुनिया पित्तल दी है. खुद को बेबी डॉल मत समझना. बस, अब थोडा ही बाकी है...एवढं वळण घेतलं की आलंच.

याच भानगडींच्या गावाच्या वेशीला लागून आणखी एक गाव असतं. हे गाव गाण्याचं असतं. दिवस-रात्र नुसती धमाल गाणी. नाच. रंगीबेरंगी स्वप्नांचे शीग लागलेले. सुगंधी झुळका वाहतेल्या. आमराईत मोर नाचतेले. कोकीळ गातेले. इथं दु:खाला थाराच नाही. ये दुनिया सोने दी है, पुत्तर. 
त्या पैलतिरावर मिळेल मजला थारा?
सुहृदांची संगत-सोबत आणि उबारा?
...अरे, हा प्रश्‍न आहे की स्टेटमेंट? चला, लेट्‌स फाइंड इट आउट.
येस, वेलकम टू लाला लॅंड. स्वप्नांच्या दुनियेत तुमचं स्वागत असो. नो नो, इथं येण्यासाठी व्हिसा, पासपोर्ट काहीही लागत नाही. टोलनाक्‍याची पावतीही फाडावी लागत नाही. एंट्री-फीसुद्धा नाही. गेल्या सहा महिन्यांची तुमची बॅंक स्टेटमेंट्‌सही नकोत. किती दिवस राहायचं, तुमचं तुम्हीच ठरवा. ओके?

कबूल आहे की तुमच्या दुनियेत सगळंच काही बैजवार घडत नाही. चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर...हो ना? छोटी छोटी प्रापंचिक स्वप्नं पूर्ण होता होतासुद्धा केवढी दमछाक होते. होते ना? उदाहरणार्थ ः शाळकरी वयात डॉक्‍टर होऊन आवडत्या माणसाला बरं करण्याचं स्वप्न तुम्ही पाहायचात. रुबाबदार हसत वावरताय, लोक तुम्हाला जाम  करतायत, असं स्वप्न; पण हाती काय लागलं?- मेथीची जुडी!
डोंट वरी. तुम्ही तुमच्या दुनियेत जितकं काही गमावलंय ना, ते सगळं तुम्हाला इथं दामदुपटीनं रिएम्बर्स करून मिळेल. काय म्हणता तुम्ही मराठीत त्याला? करेक्‍ट, परतावा! आपल्या ‘लाला लॅंड’मध्ये कुठलाही टॅक्‍स नाही. नथिंग. जस्ट, लिव्ह द वे यू वाँट.
खोटं वाटतं? मग चलाच या सुंदर म्युझिकल सफरीला.
* * *
कॅलिफोर्नियाच्या स्वच्छ, निर्भेळ सूर्यप्रकाशात फ्री वे नुसता न्हातो आहे. हजारो वाहनं खोळंबलेली. वाहतुकीच्या त्या प्रचंड खोळंब्यात अचानक एका गाडीचा दरवाजा उघडतो. सुरांची एक लगड उलगडते. आपोआप पायाला ठेका देणारी लय सुरू होते आणि चक्‍क एक गाणं सुरू होतं...बघता बघता आणखी एक गाडीवाला खाली उतरतो. तो उतरतो, म्हणून ती उतरते. ती उतरली म्हणून आणखी दोघं-चौघं...पाच-पंचवीस...शंभर-दीडशे...पाचशे...
अवघा रस्ता गाऊ-नाचू लागतो : अनदर डे ऑफ सन!
धिस इज एलए...लॉस एंजलिस. या गावाच्या वेशीला लागूनच हॉलिवूड नावाची दुनिया आहे आणि त्याच्याही पलीकडं अदृश्‍य लाला लॅंड.

या खोळंब्यातच मिया आणि तिची टोयोटा प्रायस गाडी अडकली आहे. ती स्वत:शीच काहीतरी बडबडते आहे. इतक्‍यात पाठीमागून एक छाकटा तरुण आपली उघडी ब्यूक गाडी पुढं काढतो. जोरजोरानं हॉर्न वाजवून तिला तंद्रीतून ओढून आणतो. क्‍या यार, सो रहा है क्‍या? वरमून मिया आपली गाडी पुढं काढते. 

मिया ही आपली नायिका आहे आणि हा छाकटा तरुण म्हणजे आपला हीरो सेबेस्टियन.
वॉर्नर ब्रदर्सच्या स्टुडिओतल्या कॉफीशॉपमध्ये मिया कामाला आहे. स्टुडिओच्या ग्लॅमरस गिऱ्हाइकांना हसून कॉफी देणं हेच तिचं काम; पण तिला अभिनेत्री व्हायचंय. तिचा स्ट्रगल सुरू आहे. दुसरीकडं हा सेबेस्टियन जुन्या जॅझच्या विश्‍वातून बाहेर यायला तयार नाही. हल्लीच्या तरुणांना हे संगीत आवडत नाही, याचं त्याला प्रचंड वैषम्य आहे. त्याचं एक अभिजात स्वप्न आहे; पण रोकड्या दुनियेत त्याच्या या बोअरिंग, आउटडेटेड स्वप्नाला काहीच स्थान नाही. त्याचाही स्ट्रगल सुरू आहे. 
...टकटक चालत एक ग्लॅमर येतं. त्या मादक अस्तित्वाचा उंची सुगंध कॉफीशॉपमध्ये दर्वळतो. मिया तिला कॉफी देते. ग्लॅमर उंची पर्समधून पैसे काढू लागतं. ‘‘ धिस इज ऑन अस...आमच्यातर्फे!’’ मिया हसून सांगते. ‘नको, असं नको’ म्हणत ते ग्लॅमर शेजारी ठेवलेल्या ‘टिप्स’च्या खोक्‍यात नोटा सरकवतं. बाहेर एक गोल्फ कार्ट त्या ग्लॅमरच्या ‘ने-आणी’साठी उभं आहे. वॉव! व्हॉट अ लाइफ.

मियाचं लाइफ सुरू आहेच. संधी मिळेल तिथं ऑडिशन्स द्यायच्या. नापास व्हायचं. पुन्हा नवी ऑडिशन. तीन मैत्रिणींबरोबर अपार्टमेंट शेअर करत जगायचं. पार्ट्यांना जायचं. कशाला? तर तिथं ‘समवन इन द क्राउड’ भेटेल. ती एखादी संधी असेल किंवा सोबत. एरवी असल्या दाखवेगिरीनं बुजबुजलेल्या हॉलिवुडी पार्ट्यांमध्ये मियाचा जीव रमत नसावा. तिच्या डोळ्यात फक्‍त निर्भेळ यशाचं निळसर स्वप्न साकळलं आहे. मधल्या वेळात ‘तुम्हाला कोल्ड कॉफी की लॅत्ते, मॅम?’ हे आहेच.

सेबेस्टियनचं फार वेगळं नाही. खरं तर तो उत्तम पियानो वाजवतो. की-बोर्डही चांगलाच वाजवतो. त्याची संगीताची समज खरंच प्रगल्भ आहे; पण आता एखाद्यानं ‘मी प्रवाहाच्या विरुद्धच हात मारत बसणार,’ असा हट्ट धरला तर त्याला काही इलाज नाही. हे काही जॅझचे दिवस नाहीत. आसपास सगळं झिंगाट संगीत सुरू असताना कुणी ‘एखादी ठुमरी होऊन जाऊ द्या’ असा आग्रह धरण्यात काय पॉइंट आहे? सेबेस्टियनला ते कळतंय; पण वळत नाहीए. ‘जॅझला नवी संजीवनी आपणच देऊ’, असं काहीतरी त्याच्या मनानं घेतलंय. त्याला असा एक पब उभा करायचाय, जिथं जॅझचे सूर घुमतील. जाणकारांची दाद मिळेल. 

एका नापास ऑडिशननंतर एकटीच निघालेली मिया एका क्‍लबपाशी- लिप्टन क्‍लब -थबकते. एक भुरळ घालणारी सुरावट तिला खिळवून ठेवते. कुतूहलानं ती आत डोकावते. पियानोवर सेबेस्टियनची बोटं फिरताहेत. मख्ख चेहऱ्याचे गिलासवाले त्याच्याकडं अभिजात दुर्लक्ष करताहेत. क्‍लबचा व्यवस्थापकही सेबेस्टियनला हाकलण्यासाठी उतावीळ झाला आहे. पियानो थांबल्यावर अर्थात तो सेबेस्टियनला हाकलतोच.

बरंच काही घडतं. सारांश इतकाच की दोन स्ट्रगलर्स भेटतात. पुन्हा पुन्हा भेटतात. एकमेकांना धीर देतात. सांत्वन करतात. सोबत देतात. एकमेकांशी व्यक्‍त होतात.
उदाहरणार्थ,  मिया सांगते : ‘‘मला लहानपणापासून अभिनेत्री व्हायचं होतं. नेवाडातल्या बोल्डरसिटीत मस्त घर आहे आमचं. जुनं...माझं बालपण तिथंच गेलं. आमच्या घरासमोर एक लायब्ररी होती. माझी आत्या आली, की ती मला तिथं न्यायची. तिथं खूप कॅसेट्‌स, रेकॉर्डस, पुस्तकं असायची...’’ किंवा- सेबेस्टियन म्हणतो : ‘‘ वाट्टेल त्या गाण्याच्या फर्माइशी ऐकून घ्याव्या लागतात. लाज आहे लाज! मी एक गंभीर प्रकृतीचा संगीतकार आहे, मिया. हे थिल्लर चारसोबीस म्युझिक हे माझं काम नाही. माझ्या आवडीचं काही वाजवायला मिळेल, अशी जागा मला स्वत:लाच तयार करायला हवी. तूही असंच कर. ऑडिशन टाळायचा एकमेव मार्ग म्हणजे स्वत:च लेखक होणं. तू लिही की तुझं स्किट. तू नक्‍की यशस्वी होशील.’’

थोडक्‍यात दोघंही एकमेकांच्या साथीनं धडपडताहेत. बट धिस इज लॉस एंजलिस...वरशिप्स एव्हरीथिंग अँड व्हॅल्यूज नथिंग!  
* * *
सेबेस्टियन आणि मिया एकत्र राहताहेत. दोघंही धडपडीत बिझी आहेत. क्‍लब्ज्‌, बॅंड्‌स, पार्ट्यांमध्ये पियानो, की-बोर्ड वाजवून सेबेस्टियन बरे पैसे कमावतो आहे. अर्थात आवडी-निवडी बाजूला ठेवून. मियानं स्वत:च एक एकपात्री प्रयोगाची संहिता लिहीत आणली आहे. सेब हल्ली टूरवरच असतो. दिवसेंदिवस भेटत नाही. एक दिवस भेटतो.
‘‘तुला आवडतंय तुझं संगीत? जॅझ सोडून तुला बाकी काही करायचं नव्हतं ना?’’ मियानं विचारलं.
‘‘काय वाईट चाललंय? तूच म्हणालीस ना की पैसे कमाव म्हणून!’’ सेबेस्टियन. 
‘‘तुझं स्वप्न सोडून दे, असं म्हटलं नव्हतं मी!’’
‘‘आयला, याला काय अर्थय? तू म्हणालीस, म्हणून मी वरातीतला बॅंडवाला झालो. त्यातही तुला समाधान नाही? आता मी चार पैसे कमावतोय, पुढं चाललोय, तेही तुला बघवत नाही? का? तू एकाच जागी लटकलीस म्हणून?’’ सेबेस्टियननं जिव्हारी घाव घातला.
स्ट्रगलच्या नादात माणूस एवढा गुरफटून जातो, की आपलं मूळ स्वप्न काय होतं, हेच तो हरवून बसतो. सेबचं तसं व्हायला नको, एवढीच मियाची इच्छा होती; पण...
मियाच्या स्टेज शोला मोजून दहा माणसं आली. ‘बायकांचा एकपात्री प्रयोग आधीच बोअर असतो, त्यात ही सुमार अभिनेत्री...’ असल्या कॉमेंट्‌स ऐकून ती पार कोलमडली आहे. त्यात सेबसुद्धा प्रयोगाला आला नाही. प्रयोगानंतर भेटलेल्या सेबला तिनं सांगितलं : ‘‘ इस गाँव में मेरा कुछ जमता नही. मी चालले परत माझ्या घरी. स्वत:ला आणखी किती वर्षं फसवत राहू?’’ सेबच्या आग्रहाला बळी न पडता ती गेलीच.
काही दिवसांनी सेबच्या मोबाइलवर एक कॉल आला. एका कास्टिंग कंपनीकडून मियाची चौकशी करणारा कॉल. तो फोन घेऊन सेब अस्वस्थ झाला.
बोल्डरसिटीतल्या घरात मिया एकटी होती. तिच्या खोलीतल्या इनग्रिड बर्गमनच्या पोस्टरसारखीच. निर्जीव; पण हसरी. रात्री उशिरा तिला सेबच्या गाडीचा कर्कश हॉर्न ऐकू आला. अनिच्छेनं ती बाहेर आली.

‘‘मिया, पाच तास ड्राइव्ह करून आलोय. फ्रेंच मूव्हीसाठी तुला विचारणा झाली आहे. तुझ्या एकपात्री प्रयोगाला जे दहा लोक आले होते, त्यात ही कास्टिंगवाली बाईसुद्धा होती. उद्या संध्याकाळी पाच वाजता तुला ऑडिशनला यायचंय. मी सकाळी आठ वाजता गाडी घेऊन येईन. वाट बघणार नाही. बाय!’’ सेबेस्टियन निघूनसुद्धा गेला.
दुसऱ्या दिवशी ऑडिशन झाली. स्क्रिप्टशिवाय. मियानं मग तिचं आवडतं गाणंच म्हटलं : द फूल्स हू ड्रीम...
‘‘आता आपलं काय?’’ मियानं विचारलं.
‘‘तू तुझ्या मार्गानं जायचंस. पॅरिसला. आपलं स्वप्न पूर्ण करायचंस. मी माझ्या स्वप्नांच्या मागं लागेन. आपलं नातं या प्रवासात कुठं बसत नाही, मिया!’’ सेब म्हणाला.
* * *
वर्ष गेलं. ऋतू बदलले.
मियाला एक मूल झालंय. काळजी घेणारा नवरा आहे. पायाशी अर्थात यश लोळतंय.
वॉर्नर ब्रदर्सच्या त्याच कॉफीशॉपमध्ये ती कॉफी घेते...देत नाही! ‘इट्‌स ऑन अस’ असं सांगूनही पैसे ‘टिप्स’च्या खोक्‍यात टाकते. तिला ‘ने-आणी’साठी गोल्फकार्ट उभी आहे.
नवऱ्याच्या आग्रहास्तव ती एका पबमध्ये शिरते. पबच्या दर्शनी भागावर नाव असतं- ‘सेब’स्‌’
स्टेजवरून सेब तिला बघतो. किंचित गोंधळतो. ‘वेलकम टू द सेब्ज.’
तीच ती रम्य सुरावट सुरू होते. लिप्टन क्‍लबमध्ये सेबच्या याच सुरावटीनं मियाला खेचलं होतं.
ती सुरावट मियाला त्या सुंदर दुसऱ्या दुनियेत घेऊन जाते...
जिथं मिया आणि सेब एकत्र राहातायत...तिच्या प्रत्येक सुखाच्या क्षणात त्याचं हसू मिसळलं आहे...मूल त्या दोघांचं आहे. संसार दोघांचा आहे... इथं दुर्घटनाच नाहीए... इतकं सरळ आणि मजेशीर आहे, की आत्ता या घटकेला मिया तिच्या नवऱ्याबरोबर नाहीच. ती तर सेबबरोबर या पबमध्ये आली आहे...!
पबमधून निघताना ती मागं वळून पाहते. फक्‍त किंचित हसते. त्या हसण्यात ‘लाला लॅंड’चा प्राण आहे.
सेबही भुवई उडवून प्रतिसाद देतो. दॅट्‌स इट.
* * *
‘लाला लॅंड’नं गेल्या ऑस्कर सोहळ्यात इतिहास घडवला. चौदा नॉमिनेशन्स. सहा ऑस्कर. एम्मा स्टोन आणि रायन गॉस्लिंग यांनी तर बहारदार भूमिका केल्या आहेत. जोडीला चार चाँद लावणारं संगीत. तरणाबांड दिग्दर्शक डॅमियन शॅझेलची नव्या रंगांची, नव्या ढंगाची समजदारी. त्याची पेशकश, सारंच स्तिमित करणारं. 
वास्तविक ही कहाणी काही हट के वगैरे नाही. दोन स्ट्रगलर्सची चंदेरी दुनिया बऱ्याच ठिकाणी दिसली आहे; पण शॅझेलनं त्याची मांडणी संपूर्णत: म्युझिकल करून टाकली. जस्टिन हर्विट्‌झचं संगीत हा चित्रपटाचा आणखी एक नायकच आहे. ‘लाला लॅंड’ची म्हणून त्यानं कंपोज केलेली धून तर केवळ अद्वितीय अशी आहे. हर्विट्‌झनं या कामासाठी ऑस्कर मिळवलं. City of stars...are you shining just for me हे गाणं तर दिवसेंदिवस ओठांवर घोळतं. चक्‍क हिंदी वाटतं. काहीतरी ‘शिवरंजनी’ रागासारखं. तशी सगळीच गाणी अफलातून आहेत; पण ‘लाला लॅंड’ची म्हणून जी सुरावट आहे, तिला तोड नाही. डोळे मिटून ऐकावी. फुलांच्या वाफ्यातून निळी, जांभळी, पिवळी, गुलाबी फुलपाखरं उडावीत, तसे पियानोचे सूर उमटतात. सुरांची वर्तुळं एकमेकांत मिसळतात, वेगळी होतात. मन भावविभोर होतं. 
शॅझेलच्या ‘व्हिपलॅश’ या चित्रपटाबद्दल आपण काही आठवड्यांपूर्वीच बोललो होतो. तोदेखील संगीताधारित चित्रपट होता. ‘लाला लॅंड’ ही खास शॅझेलची हॉलिवुडी फॅंटसी आहे. नृत्य, संगीत यांची बौछार असलेले सिनेमे हॉलिवूडमध्ये क्‍वचित येतात. आपल्याकडं ही जातकुळी नवी नाही; किंबहुना संगीतापुरतं बोलायचं झालं तर आपले चित्रपट खूपच उजवे ठरतील. हा चित्रपट आपल्या करण जोहरनंही चांगला केला असता, असं वाटत राहतं सिनेमाभर. अर्थात, शॅझेलची हाताळणीच स्वप्नासारखी तरल आहे. समोर जे दिसतं आहे, ते सुंदर आणि अभिजात आहे. काव्यात्म आहे. रायन गॉस्लिंगची पियानोवर फिरणारी बोटं आणि एम्मा स्टोनचे डोळे चित्रपट संपल्यानंतरही बराच वेळ त्या सुरावटीसोबत तरंगत राहतात. एक वेगळी दुनिया खुणावत राहते.
जगण्याबिगण्याच्या भानगडीत वेशीला लागून असलेल्या या सुंदर दुनियेत अधूनमधून एखादं पाऊल टाकून यावं. त्यासाठी हॉलिवूडची म्युझिकल फॅंटसीच साथीला असावी, अशी काही पूर्वअट नाही. हे ज्याला कळलं, तो सुखिया जाला!

Web Title: pravin tokekar writes about oscar award