एक होता पार्टनर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Novel Partner

सिल्कचा सुंदरसा झब्बा, स्वच्छ इस्त्रीचा पायजमा, हातात स्कूटरची चावी आणि ओठांवर गुणगुणणारं गाणं. डोळ्यात एक आपुलकीचं स्मित... दिसले की कायम गोळ्या-चॉकलेटं वाटणारे काका असतात ना, तसे होते वपु.

एक होता पार्टनर...

सिल्कचा सुंदरसा झब्बा, स्वच्छ इस्त्रीचा पायजमा, हातात स्कूटरची चावी आणि ओठांवर गुणगुणणारं गाणं. डोळ्यात एक आपुलकीचं स्मित... दिसले की कायम गोळ्या-चॉकलेटं वाटणारे काका असतात ना, तसे होते वपु. नॉर्मल बोलता बोलता ते एखादं वाक्यं असं काही बोलून जायचे की सगळं काही माळव्यातल्या आभाळासारखं लख्ख व्हायचं. आत्ता पन्नाशीत असलेल्या पिढीसाठी वसंत पुरुषोत्तम काळे यांची हीच इमेज होती. वाढुळ वयात हे वपुकाका त्यांना भेटले होते, त्यांच्याच एका गाजलेल्या कादंबरीतल्या ‘पार्टनर’सारखे.

वपु आज असायला हवे होते. असते तर नव्वदी पार असते. त्यांचा जन्म २५ मार्च, १९३२ रोजीचा. म्हणजे करा हिशेब, पण तसे अकालीच गेले. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर माणूस ‘अंत आणि एकांत’ यापैकी एकांताला अधिक घाबरतो. वपु एकांतात गेले. जाताना त्यांना आपण का जातोय, कुठं जातोय, हे बहुधा कळलं होतं. जाण्यापूर्वी ते बऱ्याचदा निर्वाणीच्या गोष्टी बोलत असत.

वपुंचे एक घनिष्ट मित्र होते. डोंबिवलीत राहायचे. मोठे नखचित्रकार होते. बंकिम खोपकर त्यांचं नाव. वपु त्यांच्याकडे नेहमी यायचे-जायचे. डोंबिवलीत वपुंचा चावकवर्ग प्रचंड होता. प्रचंड म्हणजे प्रचंडच. अधूनमधून येणारे वपु आणि मुक्कामालाच असलेले शन्ना नवरे ही सुशिक्षित मध्यमवर्गीय डोंबिवलीकरांची दैवतं होती. शन्ना तर अंतर्बाह्य डोंबिवलीकर होते. वपु राहायचे मुंबईत, पण पिंडानं डोंबिवलीकरच. मध्यमवर्गाचा वेदांत कोळून प्यायलेले हे दोघेही साहित्यिक, बंकिम खोपकरही असेच एकांतात गेले एक दिवस... तेव्हा वपुंनीही तशाच काहीशा एकटेपणाच्या भावना बोलून दाखवल्या होत्या, असं आठवतंय. ‘बंका गेला, मी राहिलो...’ असं ते स्वत:शी पुटपुटल्यासारखं बोलत राहिले. शेवटी २००१ साली वपु गेलेच. पण जाताना मराठी वाचकांसाठी केवढं तरी संचित सोडून गेले...

वपुंचं वास्तुविशारद असणं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग होतं. प्राचीन काळची वास्तुशिल्प बघताना ती बांधणाऱ्या शिल्पींचं कौतुक वाटत राहातं. विस्मय वाटतो, त्यातल्या कलाकारीचा, कल्पकतेचा, प्रतिभेचा. कभिन्न फत्तरात कोरून काढलेलं ते काव्य पाहताना देहभान हरपतं. वपुंची शब्दशिल्पं अशीच वाटतात. त्यांना सुचलेली वाक्य कशी सुचली असावीत असं वाटत राहातं. ‘‘आमचा अमका अमका मित्र इतका बेभरवशाचा की येतो येतो सांगून कधी कधी चक्क येतोसुद्धा!’ हे त्यांचं असंच एक लक्षात राहिलेलं वाक्य. बघा, एका वाक्यात त्यांनी मित्राचं व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभं केलं. इतकंच नाही, तर तो मित्र आपल्याही दोस्तान्यात सामील करून टाकला. किंवा, ‘‘मित्राची बायको म्हटली की हृदयात कसं कसं होतं, पण बायकोचा मित्र म्हटलं की...?’

किंवा, ‘एक क्षण भाळण्याचा, बाकी संभाळण्याचे...’ या असल्या वाक्यातली शाब्दिक करामत लोभस असायचीच, पण त्याला एक चिंतनाचाही पोत असायचा. अशी कितीतरी वपुवाक्य दागिन्यांसारखी काढून दाखवता येतील. एरवी कवितेत खपून गेल्या असत्या या ओळी. पण इथं थेट संवादात आल्या. हेच वपुंचं मर्मस्थान होतं. कविमनाचा गद्य लेखक होता तो.

साठीचं दशक चालू होतं तेव्हा मराठी सारस्वतांच्या मांदियाळीत फार भारी भारी लेखक नावारूपाला येत होते. केशवसुत, गडकरीमास्तर, बी कवी, माधव ज्युलियन यांचा जमाना संपला होता. ना. सी. फडके, वि. स. खांडेकर प्रभृतींचा दबदबा वाढला होता. तेव्हाच्या मराठी नायकाचा पोलो कॉलरचा सदरा असे, आणि बॅडमिंटन कोर्टवर तो नायिकेला प्रभावित वगैरे करत असे. मराठी कथा-कादंबऱ्यातले नायक राजा गोसावींसारखे दिसत. किंवा फडके लिहितात त्याबरहुकूम दिसण्याचा राजा गोसावींचा प्रयत्न असे, असं म्हणा हवं तर... त्यात श्री. ना. पेंडशांच्या ‘बापू’नं एकदम मुसंडी मारलीन! काही असलं तरी एकंदरित सगळा मामला तद्दन मध्यमवर्गीय होता. पुढे गाडगीळ-भावे, माडगूळकर-गोखले आदींनी मराठी कथेचं दालन समृद्ध करत आणलं. दुसरीकडे अत्रे-पुलं मंडळींनी वेगळीच धमाल उडवली होती.

याच वाङ्मयीन गदारोळात दोन परस्परविरोधी घटना घडत होत्या...

साठीच्या दशकाच्या मध्यावर भालचंद्र नेमाडेंचा पांडुरंग सांगवीकर ‘कोसला’चं बाड पंधरा दिवसांत लिहून घेऊन आला. सगळ्या मध्यमवर्गीय गठ्ठ्यावर ‘कोसला’ टाकून म्हणाला, च्यायचे, कादंब्री लिहितात. ही अशी.

नामदेव ढसाळ, भाऊ पाध्ये, चित्रे, कोलटकर यांनी मराठी साहित्यात असं काही तरी आणून ठेवलं की त्याची समीक्षा करण्याची मानसिक तयारीही मराठी साहित्यात झाली नव्हती. मच्छरदाणीत झोपलेल्या मराठी साहित्याला खडबडून जाग आणणारी ही घटना होती. नेमाडेपंथीयांची मोट फुटल्यावर मात्र मराठी साहित्याचा प्रवाह दाणकन बदलला. मध्यमवर्गाला लुभावणारं काही लिहिलं की ते फडतूस, टुकार समजण्याची रीत सुरू झाली. छंदोबद्ध कविता करणारे कविवर्य यमकजुळवे ठरले. पुलं देशपांडे यांच्या लोकप्रिय साहित्यात कायम तेवणारा ‘नंदादीप’ हा शब्द चेष्टेचा विषय झाला.

त्याच वेळेला व. पु. काळे यांची ‘पार्टनर’ ही कादंबरी १९७६ च्या सुमारास आली. या कादंबरीच्या पुढे तीसेक आवृत्त्या निघाल्या... नवसाहित्याच्या लोंढ्यात पार्टनर बरोब्बर तरंगला. मुंबई महापालिकेत वास्तुविशारद असलेले काळेसाहेब शब्दविशारदही आहेत, हे मराठी वाचकांना कळू लागलं होतं. मराठी वाचकांचा पिंड प्राय: दिवाळी अंकांमधल्या साहित्यावर पोसलेला होता. चांगले चांगले लेखक दिवाळी अंकांमध्ये आवर्जून लिहायचे त्याकाळी. वपु काळे हे नाव लक्ष वेधून घेऊ लागलं. कारण हा लेखक आपल्याच घरातली गोष्ट वेगळ्याच धाटणीनं सांगायचा.

सुसंस्कृत मध्यमवर्गीय माणसाचा त्याकाळी एक ठरावीक वाचन प्रवास असे. सुरवात सामान्यत: शिवशाहिरांच्या शिवचरित्रानं करायची. मग रणजित देसाई, शिवाजी सावंत, गो. नी. दांडेकर, सुमती क्षेत्रमाडे, गोखले-भावे-गाडगीळ असे पडाव घेत घेत जायचं. पुलंचा ‘असामी’ हृदयाशी ठेवायचा. अधूनमधून गंमत म्हणून नारायण धारप, बाबुराव अर्नाळकर यांना हाताशी धरायचं. जयंत नारळीकरांच्या विज्ञानकथांवर नुसतीच चर्चा करायची. यातूनच ती सुप्रसिद्ध ‘मिडल क्लास विस्डम’ साकार व्हायची. या विशिष्ट चिंतनशीलतेवर रंग चढायचा तो वपुंच्या साहित्याचा. वपु सुंदर गोष्ट लिहायचे. त्याहीपेक्षा सुंदर पद्धतीनं सांगायचे. त्यांच्या कथाकथनाला तुडुंब गर्दी व्हायची. त्यांचा तो जवळच्या नातलगाचा वाटावा, असा आपुलकीचा आवाज, नर्मविनोद, आयुष्याबद्दलची भाष्यं... यांचं असं काही गारुड व्हायचं की माणूस ऐकता ऐकता चिंतनशील होऊन जायचा. ‘‘रातकिडा किरकिरतोय ते ऐकून डोकं उठतं, पण त्याहीपेक्षा तो कुठं दडून ओरडतोय, हे कळत नाही, म्हणून अधिक त्रास होतो’’ असं काही ते बोलले की सामान्य श्रोता दंग व्हायचा. वाटायचं, अरे, हा आपलीच कहाणी सांगतोय, आपल्याच मनोवस्थेचं वर्णन करतोय...

वपुंच्या लिखाणात डोकावणारा तो विवेक खास मध्यमवर्गीय मुशीतून आलेला होता. म्हणूनच त्यांचं कथाकथन आवर्जून ऐकणारा वर्गही तोच राहिला. त्या काळी टेपरेकॉर्डरचा सुळसुळाट घरोघरी झाला होता. पुलंचं पेटीवादन आणि वपुंचं कथाकथन याच्या कॅसेट नसतील, असं मध्यमवर्गीय घर तेव्हा नसावं! ही सुखाची निधानं होती. अभिरुचीची प्रमाणपत्रं होती कित्येकांसाठी. कारटेपवर ज्यांचं कथाकथन पहिल्यांदा वाजलं, ते मराठीतले पहिले लेखक वपु काळे ठरले. त्यानंतर त्यांच्या बऱ्याच कॅसेटी बाजारात आल्या. पुलं, शंकर पाटील वगैरे कथनकार होतेच.

तेव्हा अर्थातच सोशल मीडियाचा जन्मसुद्धा झाला नव्हता, पण तरीही वपुंची वाक्यं ‘व्हायरल’ व्हायची. निव्वळ कथाकथन आणि साहित्यावर या अलौकिक गृहस्थानं मध्यमवर्गाचा असा काही वेदांत मांडला की, भल्या भल्यांनी कुर्निसात करावा. तरुणांच्या भाषेत सांगायचं तर त्यांनी तुमचा तो सोशल मीडिया का काय म्हंटात त्याला आग लावली असती. वपुंचे ट्विट तुफ्फानी चालले असते. त्यांचं फेसबुक पेज किंवा ब्लॉग गाजला असता. एकाच वाक्यात ते आख्खा वेदांत फेकायचे. काहीतरी ‘मीनिंगफुल’ टाकायला हवं म्हणून आपण कोटेबल कोट्स शोधत गुगल धुंडाळत असतो. वपुंना तसलं काही करावं लागलंच नसतं. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या जगण्याचं सार त्यांच्याकडे बुधले भरभरून होतं. वपुंची कोटेबल कोट्स थंडावली, पण त्याच्या आवृत्त्या निघतच राहिल्या. आयुष्यावर काही बोलू पाहणाऱ्या चारोळ्यांपासून कविता-गाण्यांपर्यंत सर्वत्र वपुंच्या खुणा दिसतात आजही. वाढदिवस किंवा तत्सम मुहूर्तांवरच्या शुभेच्छा कार्डांवरचा मजकूर वपुंच्या धाटणीचा असतो. इतकंच काय, लग्नपत्रिकांवरचे मायने-मजकूर बदलले.

साठी-सत्तरीच्या काळातच गजानन माधव मुक्तिबोध नावाचे एक हिंदी कवी होऊन गेले. त्यांचा ‘पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?’ हा जुमला फार गाजला होता. आजही तो कुठे कुठे वापरला जातो. वपुंचा पार्टनर हा चेहरा नसलेला निर्गुण निराकार होता. खरंतर आज वपुंच्या नावावर साठेक पुस्तकं आहेत. बहुतेक सगळीच वाचकप्रिय ठरली, पण खरं तर त्यांचं सगळंच साहित्य म्हणजे ‘पार्टनर’ या त्यांच्या कादंबरीचा विस्तार होता, असं म्हणावं लागेल. श्री नावाचा एक मध्यमवर्गीय माणूस. त्याचा प्रपंचात चाललेला झगडा, आणि पार्टनर नावाचा त्याचा अनाम मित्र. यांची ही कहाणी आपल्या तुपल्या जगण्याबद्दलच सांगणारी. वपुंचा पार्टनर जुमलेबाज नव्हता. जगण्याशी संबंधित काही सोपी सत्य सांगणारा एक माणूसच होता.

कधी कधी वाटतं, वपु काळे हेच आपले पार्टनर होते. तोच सिल्कचा सुंदरसा झब्बा, स्वच्छ इस्त्रीचा पायजमा. हातात स्कूटरची चावी, ओठांवर गुणगुणणारं गीत आणि डोळ्यांत आपुलकीचं स्मित.

टॅग्स :Bookpartnersaptarang