एक प्यादे की मौत... (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 22 जानेवारी 2017

पहिली लढत बॉबीनं मूर्खासारखी चाल करून गमावली. दुसऱ्या लढतीला तो आलाच नाही. ‘लाइव्ह प्रक्षेपण करणारे कॅमेरे फार आवाज करतात, कपडे बदलण्याच्या खोलीत शांतता असल्यानं तिथं लढती घ्याव्यात,’ अशी तक्रारवजा सूचना बॉबीनं केली. सगळे त्याच्यावर भडकले; पण बोरिस स्पास्की म्हणाला : ‘‘बॉबीला सांगा, मी शौचालयातसुद्धा खेळायला तयार आहे.’’

पहिली लढत बॉबीनं मूर्खासारखी चाल करून गमावली. दुसऱ्या लढतीला तो आलाच नाही. ‘लाइव्ह प्रक्षेपण करणारे कॅमेरे फार आवाज करतात, कपडे बदलण्याच्या खोलीत शांतता असल्यानं तिथं लढती घ्याव्यात,’ अशी तक्रारवजा सूचना बॉबीनं केली. सगळे त्याच्यावर भडकले; पण बोरिस स्पास्की म्हणाला : ‘‘बॉबीला सांगा, मी शौचालयातसुद्धा खेळायला तयार आहे.’’

बुद्धिबळ हा काही खेळ नाही. तो एक सत्याचा शोध आहे. ः रॉबर्ट जेम्स ‘बॉबी’ फिशर (९ मार्च १९४३-१७ जानेवारी २००८)
* * *
नऊ वर्षांपूर्वी १७ जानेवारीला दूर आइसलॅंडमधल्या रेयकाविक नावाच्या एका गावात एक प्यादं मेलं. ६४ चौकड्यांच्या बुद्धिबळपटावर एखाद्या नगण्य प्याद्याचं मरण ही काही मोठी घटना नव्हे. त्याचा बळी ही एक चाल असते. एका मोठ्या डावपेचाचा भाग म्हणून प्यादं बळी देण्याची खेळी बुद्धिबळपटूंना करावी लागते. त्यालाच ‘पॉन सॅक्रिफाइज्‌’म्हणतात. बळी जायचं आणि पटाशेजारच्या खोक्‍यात जाऊन पडायचं, हेच त्याचं भागधेय असतं; पण हे मेलेलं प्यादं विशेष होतं. कारण जगाच्या पटावर त्यानं एक प्रदीर्घ खेळ रंगवला. वजीराच्या तालावर इकडं तिकडं करणाऱ्या चक्रवर्ती राजासमोर हे प्यादं बेदरकार उभं राहिलं. हे प्यादं होतं दोन मदोन्मत्त महासत्तांच्या पटावरचं. खेळ होता शीतयुद्ध नावाच्या बुद्धिबळाचा. बॉबी फिशर हे त्या प्याद्याचं नाव.

आजवरचा सर्वश्रेष्ठ बुद्धिबळपटू म्हणून त्याचं नाव मानवी इतिहासात अमर आहे.
‘त्याचा मेंदू बरणीत भरून ठेवावा, म्हणजे भविष्यातल्या मेंदूतज्ज्ञांना त्याची कोडी उलगडणं सोपं जाईल,’ असं तो जिवंत असतानाच म्हटलं जायचं. तो जगला एक बुद्धिबळाचा अभिषिक्‍त सम्राट म्हणून. मेला एक पागल म्हणून...

हे म्हणजे सर्वांटिसच्या सुप्रसिद्ध डॉन किखोतेच्या नेमकं उलटं. डॉन किखोतेला राजकन्येची सुटका करताना पवनचक्‍क्‍यांमध्ये राक्षस दिसू लागले होते. भलभलते भ्रम बाळगत डॉन किखोते मेला; पण मरताना त्याला कळून चुकलं होतं, की ‘आख्खं आयुष्य हा एक भ्रम आहे...’ त्याच्या मरणशिळेवर लिहिलं गेलं ः ‘डॉन किखोते यांनी अवघं आयुष्य एक वेडा म्हणून घालवलं; पण मृत्यूसमयी तो जगातला सगळ्यात शहाणा इसम ठरला...’
बॉबी फिशरचं उलटं झालं. आयुष्य घालवलं एक बुद्धिबळिवंत म्हणून. मरताना मात्र तो एक एकाकी, निराधार वेडा होता.

‘पॉन सॅक्रिफाइज्‌’ हा नितांतसुंदर चित्रपट म्हणजे बॉबी फिशरच्या आयुष्याचं एक पेन्सिल स्केच आहे. रेघोट्यांनी जिवंत केलेलं. सगळे रंग त्यात नाहीत. तरीही ते संपृक्‍त वाटतं. या चित्रपटाला ऑस्करबिस्कर नाही मिळालं. टोबी मॅग्वायर यानं साकारलेला सटकू बॉबी फिशर मात्र लक्षात राहिला. त्याहीपेक्षा मनात बस्तान मिळवलं बोरिस स्पास्की या रशियन ग्रॅंडमास्टरची भूमिका करणाऱ्या लिएव श्रायबर यानं. त्याला ‘वूल्वराइन’मध्ये आपण पाहिलं असेलही कदाचित. सन २००० मध्ये ‘द लुझिन डिफेन्स’ नावाचा एक अफलातून बुद्धिबळपट येऊन गेला. तो आजवरचा सर्वोत्तम बुद्धिबळपट मानला जातो. ‘पॉन सॅक्रिफाइज्‌’ त्याच्या जवळपासही जात नाही. त्याआधी १९९२ मध्ये आलेल्या ‘इन सर्च ऑफ बॉबी फिशर’नंसुद्धा जास्त भाव खाल्ला होता; पण ‘पॉन सॅक्रिफाइज्‌’ बघावा तो त्यातल्या असाधारण अशा इतिहासाच्या चित्रणासाठी. शीतयुद्धात घटना अशा विशेष घडत नसल्या, तरी जे काही तरल पातळीवर तणावाचं राजकारण घडत असतं, त्याचं थेट प्रतिबिंब पडद्यावर उतरवणं महाकठीण. मात्र, ब्रिटिश पटकथाकार स्टिव्हन नाइट आणि दिग्दर्शक एडवर्ड झ्विक यांनी केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर ते आव्हान पेललं. एरवी ज्याला आपण स्पायडर मॅन म्हणून अधिक ओळखतो, त्या टोबी मॅग्वायरनं प्रमुख भूमिका केलीच; पण या चित्रपटाचा तो निर्मातादेखील आहे. बुद्धिजीवींना हा चित्रपट आवडल्याशिवाय राहणार नाही, हे नक्‍की.
* * *
बुद्धिबळ हे बॉबी फिशरला मिळालेलं वरदान होतं...आणि शापदेखील.
लहानग्या रॉबर्ट जेम्स फिशरचं बालपण मानसिकदृष्ट्या फार रोगट गेलं. ज्याचं बाप म्हणून नाव लावावं, त्याचा पत्ता नाही. तोच खरा बाप आहे की आणखी दुसरा कुणी, हाही एक समाजातला चर्चेचा विषय आहे. आई रेजिना कम्युनिस्ट मित्रांच्या कोंडाळ्यात मश्‍गूल. तशाही परिस्थितीत बॉबीला बुद्धिबळाचं वेड लागलं होतं. त्याच्या खोलीत बुद्धिबळाचा एक पट कायम मांडून ठेवलेला असे. सकाळी दात घासायला जाण्यापूर्वी एक चाल रचायची. सगळी आन्हिकं आटोपताना, दप्तर भरताना, बूट घालताना, शाळेत जाताना, शाळेतून आल्यावर, जेवताना, झोपण्यापूर्वी एकेक चाल रचत बॉबी बुद्धिबळ खेळत जायचा. वयाच्या पाचव्या वर्षी त्यानं आसपासचे सगळे बुद्धिबळवाले लोळवले. आईचे डॉक्‍टर मित्र असलेले एक जण बुद्धिबळात निष्णात होते. अमेरिकेत ते तेव्हा पंचविसाव्या स्थानावर होते म्हणे. त्यांनाही बॉबीनं हरवलं.

वयाच्या तेराव्या वर्षी रॉबर्ट जेम्स फिशर अमेरिकेचा बुद्धिबळ चॅम्पियन ठरला होता. एकदा अशीच एक स्पर्धा जिंकून घरी आलेल्या बॉबीनं जोडे ठेवायच्या फडताळात नवे पुरुषी जोडे पाहिले. बेडरूममधून बाहेर आलेल्या आईला तो वाट्‌टेल तसं बोलला...बॉबी वयात येत होता, तसतशी त्याच्या मेंदूतली गुंतागुंतही वाढत होती.

त्याच्या मनात अढी बसली...हे ज्यू लोक लेकाचे असेच असतात. हे खरे ख्रिस्ताचे शत्रू. आपला बाप तसला, आईही तसलीच! कम्युनिस्टांना तर चाबकानं फोडलं पाहिजे. बुद्धिबळात त्यांचा दबदबा आहे; पण ते लोक चीटिंग करतात. त्यांचं चीटिंग जगासमोर आणण्यासाठीच मला खेळलं पाहिजे. बॉबी फिशरनं एव्हाना ‘बॅड बॉय ऑफ चेस’चं बिरुद मिळवलं होतं. ...बॉबीला सलत होतं बोरिस स्पास्की नावाच्या रशियन जगज्जेत्याचं यश. त्याचा दबदबा. त्याचं ग्लॅमर. स्पास्की हा खरोखर थोर बुद्धिबळपटू होता. त्या काळी रशियात बुद्धिबळपटूंना हीरोसारखं वागवलं जायचं. वाट्टेल त्या सवलती मिळायच्या. पंचतारांकित हॉटेलात वास्तव्य. हिंडायफिरायला पॉश लिमूझिन...कम्युनिस्टांच्या कडेवरचं लाडकं बाळच. स्पास्की त्या सवलती पुरेपूर उपभोगायचा. इकडं आमचा हा अमेरिकी बुद्धिबळसितारा दोन वेळच्या जेवणालाही मोताद होता. ग्रॅंडमास्टर बॉबी फिशरनं बोरिस स्पास्कीला आव्हान दिलं, तेव्हा मात्र अमेरिकी सरकारनं कान टवकारले. सीआयए कामाला लागली. रशियाचं नाक कापणारा वीर योद्धा आपल्याच भूमीत जन्माला आलाय, या कल्पनेनं अमेरिकी सरकारचं ऊर भरून आलं; पण एक घोळ होता. हा वीरयोद्धा भयानक विक्षिप्त, बेभरवशी आणि उद्धट होता; पण बघता बघता बॉबी फिशर आणि बोरिस स्पास्की ही शीतयुद्धाच्या खेळात इरेला पडलेल्या दोन महासत्तांच्या हातामधली प्यादी झाली होती, हे दोघांच्याही लक्षात नाही आलं.

...रशियाचे केजीबीचे एजंट्‌स आपल्या मागावर आहेत, आपले फोन टॅप होतायत, घरावर नजर ठेवली जातेय, या समजुतीपायी बॉबीची खिट्टी पार सटकली होती. त्यानं एका वृत्तपत्राला जाहीर मुलाखत दिली ः ‘बोरिस स्पास्की हा फ्रॉड आहे. मी जगातला सर्वश्रेष्ठ बुद्धिबळपटू आहे, हे आता दिसेलच. मला रशिया भयंकर घाबरते...वगैरे वगैरे.’ बॉबीच्या वल्गना कुणी फारशा मनावर घेतल्या नाहीत; पण खुद्द बोरिस स्पास्कीनं मात्र ‘बॉबी म्हणेल तिथं म्हणेल तेव्हा’ आव्हान स्वीकारण्याची तयारी दाखवली. रेयकाविक या आइसलॅंडमधल्या गावात २४ लढतींचा जगज्जेतेपदाचा सामना मुक्रर झाला. आइसलॅंड हे तोवर कुणाच्या गावीही नव्हतं. जगातली सगळी माध्यमं रेयकाविकमध्ये येऊन थडकली. अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या शीतयुद्धाचा हा फैसला असेल, हे माध्यमांनी मान्य करून टाकलं होतंच. सन १९७२ मध्ये हे शीतयुद्धानं परिसीमा गाठली होती. त्या वर्षात खरं तर अमेरिका विविध कारणांनी ढवळून निघालेली होती. व्हिएतनाममधून अमेरिकेला अंतिमत: शेपूट दाबून पळून यावं लागलं होतं. ‘बीटल्स’ ऐन भरात आला होता. दुसरीकडं अमेरिकेला शस्त्रास्त्रनिर्मितीवरच्या स्वयंनिर्बंधांचा करार रशियाशी करावा लागला होता. राष्ट्राध्यक्ष निक्‍सन यांचं
पितळ उघडं पाडणारं ‘वॉटरगेट’ जगभर गाजत होतं. त्यातच या निक्‍सनमहाशयांनी चीनला भेट देऊन वेगळंच राजकारण सुरू केलं होतं.
‘‘स्पास्की पंचतारांकित हिल्टनमध्ये राहणार. त्याला फिरायला पॉश लिमूझिन मोटार आणि मला?...ते काही नाही. मलाही हे सगळं हवं. नाही तर मी खेळणार नाही,’’ बॉबीनं अमेरिकी बुद्धिबळ संघटनेवर पहिला हल्ला चढवला. कसंबसं त्याला हवं ते उपलब्ध करून देण्यात आलं.
‘‘माझ्यावर विषप्रयोग होतोय. केजीबी मला ठार मारण्याच्या बेतात आहे. माझं अन्न माझ्यासमोर शिजवा...’’ बॉबीची दुसरी चाल. एक आचारी त्याच्या दिमतीला देण्यात आला.
‘‘ माझ्या खात्यात ५० हजार डॉलर्स टाका. नाहीतर मी चाललो...,’’

बॉबीची तिसरी चाल. शेवटी खुद्द हेन्‍री किसिंजर यांनी बॉबीला फोन केला...
‘‘ हे बघ बॉबी, जगातला एक भिक्‍कार बुद्धिबळपटू एका जगज्जेत्या बुद्धिबळपटूला फोन करतोय, हे लक्षात घे! अमेरिकेचं नाक तुझ्या हातात आहे. कम्युनिस्टांची इज्जत धुळीला मिळवण्याची ऐतिहासिक संधी तुला मिळतेय. सारी अमेरिका तुझ्याकडं अपेक्षेनं पाहातेय...’’ किसिंजर यांनी आपला घोडा अडीच घरं पुढं काढला. बॉबी फुशारला.
पहिली लढत बॉबीनं मूर्खासारखी चाल करून गमावली. दुसऱ्या लढतीला तो आलाच नाही. ‘लाइव्ह प्रक्षेपण करणारे कॅमेरे फार आवाज करतात, कपडे बदलण्याच्या खोलीत शांतता असल्यानं तिथं लढती घ्याव्यात,’ अशी तक्रारवजा सूचना बॉबीनं केली. सगळे त्याच्यावर भडकले; पण बोरिस स्पास्की म्हणाला : ‘‘बॉबीला सांगा, मी शौचालयातसुद्धा खेळायला तयार आहे.’’
त्या काळात जगातल्या वृत्तपत्रांमध्य ठळक मथळे आइसलॅंडमधून येत असत. जणू काही पृथ्वीचं परिभ्रमण थांबलं असून फक्‍त बुद्धिबळाची ही झुंज तेवढी सुरू आहे. ‘साडेबारा गुण वि. साडेआठ गुण’ अशा फरकानं बॉबीनं जगज्जेतेपद मिळवलं. बॉबी फिशरनं या ‘मॅच ऑफ किंग्ज’ झुंजीत आपल्या प्रतिभेचे असे काही आविष्कार घडवले, की त्याच्या नवनव्या चालींचं विश्‍लेषण करणारी पुस्तकं आजही प्रसिद्ध होत असतात. त्या लढतींसारख्या लढती आजही खेळून पाहिल्या जातात.
बुद्धिबळाचाही एक रॉकस्टार असतो, हा शोध अमेरिकेला प्रथमच लागला होता.
***
पुढं सगळा उतार आहे...
जगज्जेतेपद त्यानं चक्‍क सोडून दिलं. पुन्हा तब्बल वीसेक वर्ष तो बुद्धिबळ खेळला नाही. खेळला तोही अमेरिकेचे निर्बंध असलेल्या युगोस्लावियात. सन १९९२ मध्ये. अमेरिकी सरकारनं त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढलं. पासपोर्ट रद्द केला. जर्मनीत स्थायिक होण्याचा त्याचा बेत जर्मनीनंच हाणून पाडला. जपानमध्ये रद्दबातल पासपोर्टवर प्रवास केल्याबद्दल त्याला अटक झाली. अनेक महिने तुरुंगात काढावे लागले. अखेर आइसलॅंडनं कृतज्ञता म्हणून त्याला आपलं नागरिकत्व बहाल केलं. मग तो मरेपर्यंत रेयकाविक या आपल्या विजयभूमीतच राहिला.
एकेकाळी रशियाचा तिरस्कार करणारा बॉबी फिशर कडवा अमेरिकाद्वेष्टा बनला. इतका की ‘नाइन इलेवन’ला वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन्ही मनोरे दहशतवाद्यांनी विमानं धडकवून पाडले, तेव्हा बॉबीनं ‘वंडरफुल न्यूज’ असे जाहीर उद्गार काढले.

बॉबी हा स्किझोफ्रेनियाचा बळी होता? की ॲस्पर्जर्स डिसॉर्डरचा? कुणालाही धड माहीत नाही. कुणी त्याची तपासणीच केली नाही. तरीही त्याचा मेंदू जतन करण्याची मागणी मात्र होत होती. १७ जानेवारी २००८ रोजी रायकेविकमधल्या एका कोंदट खोलीत बॉबी फिशरचं निधन झालं. तो गेला तेव्हा बरोब्बर ६४ वर्षांचा होता! बुद्धिबळाच्या पटालाही चौसष्ट चौकड्या असतात, हा निव्वळ योगायोग...

Web Title: pravin tokekar's article in saptarang