कुणी न येथे भला चांगला... (प्रवीण टोकेकर)

कुणी न येथे भला चांगला... (प्रवीण टोकेकर)

‘द गुड, द बॅड, द अग्ली’ या चित्रपटाची एक खासियत म्हणजे अफलातून चित्रण. ५० वर्षांपूर्वी अर्थात चित्रणाचं तंत्र तितकं काही प्रगत नव्हतं; पण शैलीदार बंदूकबाजी, अर्थपूर्ण क्‍लोजअप्स आणि छाती दडपवणारे लाँग शॉट्‌स यांचा जादूई मिलाफ प्रेक्षकांवर गारुड करतो.

क्षितिजापर्यंत वैराण प्रांत पसरलेला. सगळा रखरखाट. काही बोडक्‍या टेकड्या. तुरळक झाड-झाडोरा. चुकार सफेद-करड्या ढगाचा अपवाद सोडला, तर आभाळाचंही वाळवंटच झालेलं. त्या आभाळाच्या कोपऱ्यात कुठंतरी दूरवर घारी-गिधाडांच्या घिरट्यांची चावळ. बस इतकंच. दूरवर एक काळा ठिपका दिसतो. ठळक होत जातो. दमगीर झालेला घोडा दिसतोय. त्याच्या पाठीवर ओणवलेला घोडेस्वार. एकतर तो मेला आहे किंवा तहानेनं अर्धमेला झाला आहे. बंदुकीच्या गोळ्यांनी चाळणही झालेला असू शकेल.

...पुराण्या काळातल्या वेस्टर्नपटांमधलं हे एक पठडीतलं दृश्‍य. वेगवेगळ्या आकाराचे गावठी कट्टे. बंदुका, सुरे...यांची रेलचेल असलेल्या या मारधाडपटांनी हॉलिवूडचं एक दालन कमालीचं समृद्ध करून टाकलं आहे. इटली आणि स्पेनच्या चित्रकर्त्यांनी या मार्गानं हॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवलं होतं. त्यांना ‘स्पाघेट्‌टी वेस्टर्न’ म्हटलं जायचं. अर्थात, बहुतेक सगळे चित्रपट तसे सुमारच म्हणायचे; पण त्यातल्या काहींनी खरंच इतिहास घडवला. चित्रपटनिर्मितीच्या तंत्रा-मंत्रात नवे प्रयोग, नवी किमया करून दाखवलीच; पण जबरदस्त क्षमतेचे आणि गुणवत्तेचे अभिनेते आणि दिग्दर्शकही हॉलिवूडला बहाल केले.
‘द गुड, द बॅड, द अग्ली’ हा असल्या चित्रपटांचा मेरुमणी.
-मारधाडपट असला तरी एकदम अभिजात. यातला अभिनय, त्याचं चित्रण, कथाकथनाची अनोखी पठडी...सगळंच इतकं लोकविलक्षण की १६१ मिनिटं खुर्चीला खिळलेला प्रेक्षक पॉपकॉर्नसाठीही उठू नये. अर्थात टेक्‍सास किंवा मेक्‍सिकोच्या वाळवंटातलं ते हिंस्र, निर्दय जगणं उत्सुकतेनं अनुभवण्याची ऊर्मी मात्र आपल्याठायी हवी. ती पूर्वअटच म्हणायची. वरकरणी एकसुरी वाटणारी त्यातली लांबलचक दृश्‍यं रमून पाहण्यासाठी अंतर्बाह्य बैठक जमवता आली पाहिजे. मगच हे दालन आपल्याला स्वीकारतं, अन्यथा नाही. वेस्टर्नपटांमधल्या कहाणीला एक अकथित पृष्ठभूमी असते. मेक्‍सिकोच्या आसपासची ती मध्ययुगाच्या मावळतीचे अवशेष जपणारी संस्कृती थोडीफार ठाऊक असेल, तर चित्रपट बेहद्द आवडणार यात शंका नाही. १९५०-६० च्या दशकात असे शेकडो चित्रपट आले; पण ‘द गुड, द बॅड, द अग्ली’ यासम हाच.
* * *

एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातली १८६१ ते ६५ ही चार-पाच वर्ष अमेरिकेनं भीषण सिव्हिल वॉरला तोंड दिलं. तब्बल ११ दक्षिणी राज्यांनी संयुक्‍त अमेरिकेतल्या सामीलीकरणाला विरोध करत आपला वेगळा राज्यसंघ तयार केला. त्यातली सात दक्षिणी राज्य ही ‘गुलाम राज्य’ मानली जायची. या राज्यसंघाच्या वेगवेगळ्या ‘बंडखोर लष्करां’नी अमेरिकी सरकारला सळो की पळो केलं.अराजकाची परिस्थिती होती. प्रचंड रक्‍तपात, गोळीबार अनुभवल्यानंतर अखेर १९६५ मध्ये राज्यसंघाचं तथाकथित सरकार कोसळलं. त्यांची ‘लष्करं’ इतस्तत: पांगली आणि सिव्हिल वॉर संपलं.
त्या काळात तिथं इतरही रक्‍तलांच्छित कहाण्या घडत होत्या. काही खऱ्या. काही खोट्या.
त्यातली एक ही तिघा बंदूकबाजांची कहाणी.
सेन्टेन्झा ऊर्फ ‘एंजल आइज्‌’ नावाचा व्यावसायिक मारेकरी स्टिव्हन्स नावाच्या राज्यसंघाच्या माजी सैनिकाकडे आला आहे. कारण धंदेवाईक आहे. बेकर नावाच्या इसमानं त्याला- स्टिव्हन्सला- उडवण्याची सुपारीच घेतली आहे; पण आधी त्यानं त्याच्याबरोबर शांतपणे जेवून घेतलं.
‘‘ बिल कार्सननं राज्यसंघाच्या तिजोरीतलं चिक्‍कार सोनं लुटलंय. त्याला शोधतोय मी!’’ स्टिव्हन्स सांगतो आहे. ते ऐकून एंजल आइज्‌चे डोळे चमकले आहेत ः ‘‘ तू एक काम कर. तुला मी हजार डॉलर देतो. बेकरला उडव!’’

एंजल आइज्‌ हा अत्यंत मूल्य पाळणारा माणूस आहे. त्यानं प्रथम बेकरला उडवण्याची सुपारी उचलली. हजार डॉलर कनवटीला लावून स्टिव्हन्सला उडवलं. नंतर बेकरकडं जाऊन स्टिव्हन्सच्या सुपारीची रक्‍कम उचलून त्यालाही गोळी घातली. उसूल नाम की भी कोई चीज होती है, भाई।
एंजल आइज्‌ हा एक शंभर नंबरी ‘द बॅड’ आहे.
विनोदी चेहऱ्याचा हा टुको रामिरेझ. चेहऱ्यावर जाऊ नका. अत्यंत नीच प्रवृत्तीचा आहे. केसानं गळा कापेल. बंदूक चालवण्यात इतका तरबेज की उडत्या पाखराच्या पलीकडल्या पंखाचं सातवं पीस उडवून दाखवेल. साहजिकच त्याच्या नावावर बख्खळ गुन्हे नोंदले गेले आहेत. काही राज्यात तो ‘वाँटेड’ आहे. ‘या इलाख्यात भुकेकंगाल व्हायचं नसेल तर दोनच मार्ग आहेत ः एक, धर्मगुरू होणं किंवा डाकू होणं....दुसरा मार्ग जरा बरा आहे!’ असं त्याचं म्हणणं. ‘व्हेन यू वाँट टू शूट...शूट. डोंट टॉक’ हे त्याचं जीवनसूत्र आहे. ही इज रिअल अग्ली.

ब्लाँडी हा एक भला बंदूकबाज. भला म्हणायचा, पण पैसे मिळवण्याचा धंदा तोच. बंदूकबाजी. सडसडीत, अबोल आणि कायम ओठात सिगार. कमरेला दोन पिस्तुलं. टुकोबरोबर त्याची घातकी पार्टनरशिप झाली आहे. टुकोला पोलिसांच्या हवाली करायचं. त्याच्या माथ्यावरचं इनाम खिशात घालायचं आणि लगेच त्याला सोडवून दुसऱ्या गावात पळवायचं. हा याचा नवा धंदा आहे; पण दोघंही एकमेकांपासून कमालीचे सावध आहेत. ब्लाँडीनं चालवलेला खेळ थांबवण्याच्या इराद्यानं टुकोनं त्याला वाळवंटात घासटत नेलं. अर्धमेला ब्लाँडी मरायला तयार झाला होता. तेवढ्यात-
बिल कार्सनचा घायाळ देह घेऊन एक घोडागाडी आली...मरणप्राय कार्सननं राज्यसंघाचं सोनं कुठल्यातरी दफनभूमीत दडवल्याचं सांगितलं. पण कुठल्या? ते सांगण्याआधीच तो कोसळला. जवळपास मेलेला कार्सन आणि अर्धमेला ब्लाँडी. त्यांना सोडून टुको घाईघाईनं पाणी आणायला गेला खरा; पण तेवढ्यात शेजारी पडलेल्या ब्लाँडीला खजिन्याचा पत्ता सांगून कार्सननं प्राण सोडले होते... टुकोनं तेच पाणी ब्लाँडीला पाजलं. याला आता जगवलं पाहिजे. ही लॉटरी आहे. याला खजिन्याचा पत्ता माहीत आहे. पुढली कहाणी म्हंजे हा सिनेमा.
कमीत कमी शब्द बोलणारा ब्लाँडी सर्वार्थानं ‘द गुड’ ठरला. कसा? ते चित्रपटातच बघा.
* * *

‘द गुड, द बॅड, द अग्ली’ हा सभ्य लोकांनी काहीशा असभ्य अभिरुचीच्या प्रेक्षकांसाठी तयार केलेला देमारपट होता, हे मान्य. १९६६ मध्ये इटालियन दिग्दर्शक सर्गिओ लिओनी यांनी हा चित्रपट काढला. ‘स्पाघेट्‌टी वेस्टर्न’पटांचे ते उद्‌गाते म्हणावे लागतील. त्यांनी वास्तविक एक त्रिधारा पेश केली होती. ‘डॉलर ट्रिलोजी’ म्हणून ती आजही ओळखली जाते. ‘फिस्टफुल ऑफ डॉलर्स’ आणि ‘फॉर अ फ्यू मोअर’ हे त्यांचे दोन चित्रपट येऊन दणकून धंदा करून गेले होते. ‘द गुड, द बॅड...’ हा त्यातला तिसरा. या चित्रपटानं धंद्याचं रेकॉर्ड मोडलंच; पण बघता बघता अभिजात चित्रपटांच्या पंक्‍तीतही स्थान मिळवलं. हे म्हंजे अस्सल उच्चभ्रू लग्नाच्या मांडवात एखाद्या मुंडासेवाल्यानं गडगडाट करत यावं आणि उपस्थित वऱ्हाडाला हबकून टाकावं, त्यातलाच प्रकार.

ब्लाँडीचा रोल क्‍लिंट इस्टवूडनं करावा, अशी लिओनीची खूप इच्छा होती; पण इस्टवूडनं चिक्‍कार भाव खाऊन ‘अडीच लाख डॉलर आणि उत्तरेतल्या टेरिटरीतली १० टक्‍के कमाई द्यावी,’ अशी महागडी अट टाकली. लिओनी रडतखडत तयार झाला. क्‍लिंट इस्टवूड हा वेस्टर्नपटांचा तेव्हा राजा होता. नंतर शूटिंग सुरू होण्याच्या आधी इस्टवूडनं सर्जिओकडं ‘फेरारी’ मोटारीचीही मागणी केली. ती पूर्ण झाल्यावरच चित्रीकरण सुरू होऊ शकलं. इस्टवूड या ट्रिलोजीचा नायक असला तरी ‘द गुड, द बॅड...’ मध्ये त्याला कमीत कमी संवाद आहेत. आणि त्याच्यापेक्षा जास्त फूटेज त्याच्या सहनायकाला म्हणजे टुकोला मिळालं आहे. ‘फेरारी’ मागण्याचं कारण हे होतं...!
...आदिवासी टोळ्यांमध्ये वापरतात, त्या बासरीची ती तुटक लकेर. पडद्यावर उमटणारं धुराचं वलय आणि क्षणभरानं झाडामागून डोकावणारा क्‍लिंट इस्टवूडचा राकट, तरीही रुबाबदार आणि निर्विकार, तरीही बोलका चेहरा...या दृश्‍यानं पब्लिक मात्र बेहद्द खूश झालं. आजही ‘द गुड, द बॅड, द अग्ली’ची ती परिचित धून येणाऱ्या पिढ्यांनाही तितकीच भुरळ घालते. कालातीत असं हे संगीत ठरलं. ते इटालियन संगीतकार एन्निओ मोरिकोनं यांनी दिलं होतं.
या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे कॅमेऱ्याचं अफलातून चित्रण. ५० वर्षांपूर्वी अर्थात चित्रणाचं तंत्र तितकं काही प्रगत नव्हतं; पण शैलीदार बंदूकबाजी, अर्थपूर्ण क्‍लोजअप्स आणि छाती दडपवणारे लाँग शॉट्‌स यांचा जादूई मिलाफ प्रेक्षकांवर गारुड करतो.

इस्टवूडबरोबरच ‘द बॅड’ ऊर्फ सेंटेन्झा ऊर्फ एंजल आइज्‌ रंगवणारा ली व्हान क्‍लीफसुद्धा जबरदस्त भाव खातो. त्याचे निर्दय, स्वार्थी डोळे प्रेक्षकांचा ठाव क्षणात घेतात. तसाच टुको रामिरेझ झालेला एली वालाश. या तिघांचेही असे काही परफॉर्मन्सेस बघायला मिळतात की बस.
विशेषत: क्‍लायमॅक्‍सला एका रिंगणात तिघंही बंदूकबाज उभे राहतात. डोळ्यांच्या पापण्यांचाही आवाज टिपतील, असे कसबी मारेकरी म्हणून...या प्रकाराला ‘मेक्‍सिकन स्टॅंड ऑफ’ किंवा ‘ट्रुएल’ असं म्हटलं जातं. ‘ट्रुएल’ म्हणजे रिंगणात उभं राहून दुसऱ्यानं बंदुकीला हात घालण्याआधी त्याला चपळाईनं उडवणं. हा या चित्रपटाचा थरारक कळस आहे. तो पडद्यावरच बघावा.

...या चित्रपटात बाईमाणूस जवळपास नाहीच. एखादंच पात्र आहे; तेही दुय्यम. प्रत्यक्षातही तसंच काहीसं घडलं. क्‍लिंट इस्टवूडसोबत १४ वर्षं काढलेल्या त्याच्या साँड्रा लोकी नावाच्या मैत्रिणीनं शेवटी आपलं आत्मचरित्र लिहिलं. त्यात इस्टवूडची तिनं अक्षरश: सालटी काढली. तिच्या चरित्राचं शीर्षक आहे ः ‘द गुड, द बॅड अँड द व्हेरी अग्ली!’
चालायचंच. हॉलिवूड है...हॉलिवूडही रहेगा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com