परिकथेतील राजकुमारा... (प्रवीण टोकेकर)

परिकथेतील राजकुमारा... (प्रवीण टोकेकर)

सिंडरेलाची गोष्ट सगळ्यांना माहीत असते; पण ती सांगण्याचा मोह कुणाला सुटलाय? ही गोष्ट बहुधा ख्रिस्तपूर्व काळापासून चालत आली आहे. या कहाणीचं पहिलं रूप चीनमध्ये आठव्या शतकात सापडतं. त्यात तिचं नाव ये शियांग आहे. इटली, स्पेन, कोरिया, इंडोनेशिया...कितीतरी देशांत वेगवेगळ्या नावानं सिंडरेलाची गोष्ट हजारो वर्षं सांगितली जातेय. सावत्र आईचा आणि सावत्र बहिणाचा छळ रोज रोज सोसणाऱ्या सिंडरेलाला सरतेशेवटी तिचा ‘प्रिन्स चार्मिंग’ मिळतोच...अखेर प्रेमाला प्रेम लाभतंच!

एला नावाच्या लोभस मुलीची ही गोष्ट आहे. एलाचं हृदय जगात सगळ्यात निर्मळ होतं. म्हंजे इतकं निर्मळ, इतकं निर्मळ की त्याच्यापेक्षा निर्मळ असं या जगात काहीच नाही. एलाची एक छान आई होती. मिशी ओढली तरी मुळ्ळीच न रागवणारे बाबा होते; पण थोडेसे वाईट होते. का? तर ते सारखे कामाला बाहेर जायचे. आईच एलाला सांभाळायची. परसदारात भाज्या लावायची. अंगण झाडून काढायची. गावात लोकांची कामं करायची.

‘‘पऱ्या खऱ्या अस्तात का गं?’’ आईचा झगा ओढून ओढून एला विचारायची.
‘‘हो तर! पऱ्या असतात. त्यातलीच एक आपली गॉडमदर असते. ती आपल्याला सांभाळते,’’ आई ठामपणे सांगायची.
‘‘तुझा विश्‍वास आहे यावर?’’ एला.
‘‘ अर्थात! नसायला काय झालं?’’ आई.
‘‘मग माझा पण आहे...,’’ खुदकन हसत एला म्हणायची.
आईनं एलाला सांगितलं,‘‘...हे बघ एला, जिथं प्रेम असतं, तिथं भलाई असते. आणि भलाई असते तिथं पऱ्या असतात. त्यांचं जादूचं खरंखुरं जग असतं. म्हणून माणसानं प्रेमळ असावं...हॅव करेज अँड बी काइंड! ’’ एलाच्या सोनेरी केसांतून सुंदर हात फिरवत आई म्हणाली.
...हिंमत धर, दया कर...एलाच्या निर्मळ मनावर एक सुंदरशी चंद्रकोर उमटली.
* * *

...एक दिवस एलाची आई मरून गेली. मग एलाच्या बाबांनी एक सावत्र आई आणून ठेवली. होती मोठी नखरेल आणि तिला ‘ड्रेसेला’ आणि ‘अनास्ताशिया’ अशा दोन मुलीही होत्या. एलाच्याच वयाच्या; पण अगदीच ‘ध्यान’! एलाचे बाबा दूरगावी कामासाठी गेले आणि इथं सावत्र आईनं एलाचा छळ सुरू केला... एला बेटा, जरा हे परसदार झाडून घेतेस? एले, स्वयंपाकाचं कुठवर आलं? एलटले, क़ुठं उलथलीस?
चूल सोडून उंडारायला जातेस कशी, भवाने?...
एक दिवस गावातले एक काका आले म्हणाले ः ‘‘एला, तुझे बाबा दूरगावी जाताना रस्त्यात वारले. सॉरी.’’
...एला रड रड रडली. एलाची आई वैताग वैताग वैतागली. पदरात दोन मुली. त्यात ही थोरली एला नावाची धोंड. हे एवढं मोठं घर. मोठं कसलं? बडं घर नि पोकळ वासा. आता आम्ही खायचं काय? कोळसे? ...मग एलाची रवानगी पोटमाळ्यावर झाली. सुंदर मनाच्या एलानं तेही मनावर नाही घेतलं. ती आणि तिचे लाडके चार उंदीर! पोटमाळ्यावर मजेत राहू लागले. अंथरूण नाही, पांघरूण नाही...फायरप्लेसजवळ ती झोपू लागली. दिवसभर एला राब राब राबे. मर मर काम करी. सावत्र बहिणींची सरबराई करी. सावत्र आईचे जोडे खाई.
‘‘एला, तुझे हात काळे, तुझे केस काळे, तुझं थोबाड काळं! असं का गं काळे?’’ ड्रेसेलानं तिला चिडवलं.
‘‘ फायरप्लेसच्या लाकडांचा धूर होतो नं..ती राख...सिंडर...त्यानं काळं व्हायला होतं...’’ चाचरत म्हणाली एला.
‘‘ घाणेरडी एला! डर्टी एला!! सिंडर एला...सिंडरेला...हाहा!!’’ अनास्ताशियानं तिला नवं नावच ठेवलं.
इथून पुुढं तिचं नाव पडलं ः सिंडरेला.
* * *

ऐका हो ऐका, राज्यातल्या तमाम उपवर मुलींनो, त्यांच्या आई-बापांनो ऐका. आपले लाडके राजकुमार स्वयंवरास तयार झाले असून, राज्यातील गरीब, श्रीमंत, कुणीही विवाहयोग्य असेल तर शाही नृत्यासाठी महालावर उपस्थित राहावं. जी मुलगी राजकुमाराचं मन आपल्या नृत्यानं जिंकील ती भविष्यातली राणी होईल हो ऽऽऽ...राजाचा माणूस दवंडी पिटून गेला. एकच गडबड उडाली. मुलींनी झगे शिवायला टाकले. गावातले शिंपी कावून गेले. ड्रेसेला आणि अनास्ताशियानंही ठेवणीतले झगे काढून त्याची डागडुजी सिंडरेलाकडूनच करून घेतली. त्यांच्या कजाग आईनंही झकपक पोशाख निवडून ठेवला. आपणही जरा रॉयल दिसलं पाहिजे नं? सिंडरेला मात्र शांत होती.

‘‘सिंडरेला, तू नको येऊस महालात. तू लाज आणशील. तू ही अशी आणि तुझ्या अंगावरचं पटकूर. शी:!!,’’ लेडी ट्रेमेन ऊर्फ सावत्र आई म्हणाली.
‘‘पटकूर? हा माझ्या आईचा गाऊन आहे...’’ एला कळवळली.
‘‘वेल्‌, तुझ्या आईची रंगांची निवड इतकी भयानक होती, की ती मेली हे बरंच झालं!’’ लेडी ट्रेमेननं जिभेने एक जिव्हारी वार केलाः ‘‘ यू शॅल नॉट गो टू द पॅलेस!’’
...गाऊन फाटका होता, जुना होता; पण किती सुंदर होता. निळसर रंगाचा. त्याच्या अंगांगावर लाजऱ्या फुलांची नक्षी...एलाच्या डोळ्यात पाणी आलं.
* * *

अंगणात कामं करत असताना एक जख्ख म्हातारी तिथं आली. ‘बाळ, भूक लागलीये, जरा खायला देतेस?’ एलानं तिला वाडगाभर दूध दिलं...
‘‘मी तुझी डॉगफादर...आपलं गॉडमदर आहे...’’ आपलं जख्खं म्हातारं रूप त्यागून एक वेंधळी परी तिच्यासमोर उभी राहिली. म्हणाली ः ‘‘यु शॅल गो टू द पॅलेस!’’
पण कशी जाणार?
बिब्बिडी बॉब्बिडी बू...परीनं इकडं-तिकडं बघत परसातल्या भोपळ्याचा झगमगणारा सुवर्णरथ तयार केला. एलाच्या चार उंदरांचे चार पांढरेशुभ्र घोडे झाले. भिंतीवरती बागडणाऱ्या पाल-सरडोक्‍याचे फूटमन झाले. -फूटमन म्हंजे बाईसाहेबांसाठी रथाचा दरवाजा अदबीनं उघड-बंद करणारा सेवक. अंगणात पॅक पॅक करणाऱ्या बदकाचा झाला कोचमन...सारथी.

तुझ्या याच जुन्या गाऊनचं मी काय करते बघ...बिब्बिडी बॉब्बिडी बू...आणि... आभाळानं आपला निळा रंग देऊन टाकला. चांदोबानं आपलं चांदणं दिलं. ताऱ्यांनी त्यांचं तेज दिलं. त्यातून साकार झाला एक असा झगा, की त्याला तोड नव्हती सगळ्या तारांगणात. निळ्याभोर पायघोळ झग्यांवर चांदण्या लुकलुकत होत्या. निळ्या रंगाच्या अगणित छटा त्यात जलरंगासारख्या मिसळून गेलेल्या. त्यात आपली एला अशी काही दिसू लागली की पऱ्यांनीही तिच्यावर जाम जळावं. आंतर्बाह्य सुंदर म्हंजे नेमकं काय? तर ही आपली एला.
‘‘ई...तुझे जोडे किती बंडल? थांब तुला मस्त जोडे घालून देते’’ गॉडमदर परी म्हणाली. बिब्बिडी बॉब्बिडी बू...सुंदर काचेचे पैलूदार जोडे एलाच्या पायावर सजू लागले. किती मस्त शूज! झऱ्याच्या पाण्यासारखे निवळशंख...
‘‘अगं बाई, किती वेंधळी मी...जवळजवळ विसरतच होते...मध्यरात्री १२ वाजता बाराव्या ठोक्‍याला माझी ही जादूमंतर संपणार हं! पुन्हा तू तुझ्या मूळ स्वरूपात येशील!’’ गॉडमदर परी म्हणाली. ‘‘मध्यरात्री नं? खूप वेळ आहे की..’’ चांदणं सांडत एलाचा रथ महालाकडं निघाला.
* * *

एलाला बघून राजकुमार किट खुळावला. ही कुण्या देशाची राजकन्या? एलानं तिच्या प्रिन्स चार्मिंगबरोबर अप्रतिम नृत्य केलं. वेळ कसा गेला कळलंच नाही. बाराचे ठोके पडताना मात्र एलाला भान आलं आणि किटला बगिच्यातच सोडून ती पळाली. पळता पळता तिचा काचेचा जोडा मात्र महालाच्या दारातच पडला. परतीच्या प्रवासातच एलाचा स्वर्गीय झगा गायब झाला. एला पुन्हा सिंडरेला झाली. कोचमन बदक पॅक पॅक करू लागलं. फूटमनचे पुन्हा पाल-सरडोके झाले. घोड्यांची पुन्हा उंदरं झाली नि रथाचा झाला भोपळा.
पुढं काय घडलं?
प्रिन्स चार्मिंग किटनं काचेचा जोडा घेऊन गावभर शोध घेतला. तो कुठल्याच मुलीच्या पायाला बसेना. अखेर शोध घेता घेता तो एलाच्या घरी आला.
‘‘मी एला आहे...सिंडरेला. मी कुणी राजकन्या नाही. माझ्याकडं सुवर्णाचा रथ नाही. आभाळरंगाचा झगा नाही. मी एक साधीसुधी, प्रामाणिक, गावाकडची मुलगी आहे. तुझ्यावर प्रेम करणारी...तुझ्या हातातला काचेचा जोडा माझ्या पायात बसला, तर मी आहे तशी मला स्वीकारशील?’’ एलानं स्वच्छ स्वरात विचारलं.
‘‘ अर्थात...पण एका अटीवर. मी आहे तसा, तुलाही स्वीकारावं लागेल...चालेल?’’ निळ्या डोळ्यांच्या राजकुमारानं एक गुडघा टेकवत म्हटलं.
एलाचा जोडा एलाच्या पायाला आला, हे सांगणे न लगे.
* * *

सिंडरेलाची गोष्ट सगळ्यांना माहीत असते; पण ती सांगण्याचा मोह कुणाला सुटलाय? ही गोष्ट बहुधा ख्रिस्तपूर्व काळापासून चालत आली आहे. या लोककथेचं पहिलं रूप चीनमध्ये नवव्या शतकात सापडतं. त्यात तिचं नाव ये शियांग आहे. इटली, स्पेन, कोरिया, इंडोनेशिया...कितीतरी देशांत वेगवेगळ्या नावानं सिंडरेलाची गोष्ट हजारो वर्षं सांगितली जातेय. १६९७ मध्ये चार्ल्स पेरॉनं ‘सिंड्रेलाँ’ची गोष्ट पुन्हा सांगितली. त्यानंतर १८ व्या शतकात जर्मनीत जेकब आणि विल्हेम या ग्रिमबंधूंनी नव्यानं काही परिकथा लिहिल्या. त्यात एक होती ॲश्‍टेनपुटेल...म्हणजे सिंडरेलाच! शतकानुशतकं या परिकथेनं अनेक आकृतिबंधांतून आपलं प्रवाहीपण टिकवलं आहे. ऑपेरा, बॅले, चित्रकला, नाटक, चित्रपट, कार्टून...अशा असंख्य कलामाध्यमांना दशांगुळं पुरून उरलेली ही कहाणी आहे.

अर्थात या प्राचीन आणि मध्ययुगीन परिकथेत काही भाग खूपच रक्‍तबंबाळ होता. उदाहरणार्थ ः काचेचा बूट बसावा म्हणून एलाच्या बहिणी आपल्या टाचा कापून घेतात वगैरे. काही कथांमध्ये तर गॉडमदर परी नव्हतीच. तिथं इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष होता. काही कथांमध्ये सिंडरेला ही राणीच होती; पण पेरॉच्या फ्रेंच परिकथेनं हा किंचित विद्रूप भाग नष्ट करून शुद्ध परिकथा जन्माला घातली.

वॉल्ट डिस्नीसारख्या महान प्रतिभावंताला पेरॉच्या या परिकथेनं भुरळ घातली नसती, तरच नवल होतं. परिणामी, पेरॉची कहाणी घेऊन त्यानं १९५० मध्ये सिंडरेला चित्रपट पहिल्यांदा पेश केला. डिस्नी कंपनीनं हीच गोष्ट घेऊन २०१५ मध्ये दुसऱ्यांदा सिंडरेला बनवला, तेव्हा त्याचं दिग्दर्शन केलं केनेथ ब्रानाव या अफलातून प्रतिभावान परिकथाकारानं. या वेळी त्याच्या दिमतीला तिन्ही मित्यांचा ठाव घेणारं तंत्रज्ञान होतं. सुंदर अभिनेत्यांची फळी होती. डिस्नीसारखा सढळ हाताचा निर्माता होता आणि खुळावलेले रसिक होते. ब्रानावचं कथाकथन किती उच्च दर्जाचं आहे, हे या चित्रपटातून कळावं. त्यातल्या तांत्रिक करामती केवळ सुंदर आहेत; पण कथेचा आत्मा मारणाऱ्या नाहीत. उलट, तोच अधिक खुलवणारी कल्पकता इथं दिसते. कॉम्प्युटर ग्राफिक्‍सचा अतिरेक टाळून ब्रानावनं कथा आणखी एकदा स्वत:च्याच रंगात उजळून काढली.

हा हॉलिवुडी सिनेमा असला, तरी तयार केलाय ब्रिटिश कलावंतांनी. शुद्ध इंग्लिश उच्चारण, भाषेचा अचूक वापर. ती शाही रीती-रिवाजांतली सहजता. बिलकूलच न खटकणारा तो इंग्लिश, कुलीन शिष्टाचार. सारं काही दृष्ट लागावी असं आहे. लिली जेम्स नावाच्या गोड अभिनेत्रीनं सिंडरेला रंगवली आहे. तिच्या हसण्यातून खरंखुरं चांदणं सांडतं. तिच्या डोळ्यात पऱ्यांचं गाव आहे. केट ब्लॅंचेट ही आफ्टरऑल, शेक्‍सपीरिअन जातकुळीतली अभिनेत्री. सावत्र आईची भूमिका करताना ती जरासुद्धा आपला आब गमावत नाही. तिनं मांडलेल्या सिंडरेलाच्या छळालासुद्धा मर्यादा आहेत. हेलन बोनहॅम कार्टर इथं गॉडमदर परी झालीये. ‘ॲलिस इन वंडरलॅंड’मध्येही तिनं जॉनी डेपबरोबर गंमत आणली होती.

राजकुमार किटच्या भूमिकेतला रिचर्ड मॅडन शोभून दिसतो...अस्सल प्रिन्स चार्मिंग. सोनेरी केसांचा. निळ्या डोळ्यांचा. घोड्यावरून येणारा. रुंद छातीचा, हसण्यातच निमंत्रण देणारा राजबिंडा गडी.
हा चित्रपट संपतो तेव्हा गॉडमदर परीच्या आवाजात आपल्याला चित्रपटात मांडलेलं खूप मोठ्‌ठं तत्त्वज्ञान समजतं. ती म्हणते ः
...तर किट (प्रिन्स चार्मिंग) आणि एला सुखानं कालक्रमणा करू लागले. त्यांचा कारभार सर्वात कल्याणकारी आणि ममत्वाचा होता, हे वेगळं सांगायची गरज नाही. एला तश्‍शीच राहिली...जसं जग आहे, तसं तिनं कधी पाहिलंच नाही, तर जसं असायला हवं, तस्संच पाहिलं...असं खरंच घडतं. फक्‍त थोडी हिंमत आणि थोडा प्रेमळपणावर विश्‍वास असेल तर...थोडीशी जादूही घडतेच.’
‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com