अथांग निळाईतले दोन प्रवासी (प्रवीण टोकेकर)

अथांग निळाईतले दोन प्रवासी (प्रवीण टोकेकर)

जिमनं केलेला विश्‍वासघात ऑरोराला सहन झाला नाही. तिनं जिमला त्याच्या खोलीत घुसून खूप मारलं. जिमनं तिची मन:पूर्वक क्षमा मागितली; पण त्याला काही अर्थ नव्हता. वेळ घालवण्यासाठी जिमनं अखेर अंतरिक्षयानाच्या विशाल केंद्रभागात चक्‍क एक रोपटं आणून लावलं. इथंच आता आयुष्य कंठायचं. जमेल तसं. आपलं विश्व आपण उभं करायचं. जमेल तसं...

समजा, तुम्हाला इथं, या दुनियेत काही रस उरलेला नाही. दु:ख. दैना. पनवती. वेदना. प्रदूषण. दूषण. स्पर्धा. पैसा. वखवख. स्वार्थ...शी:! इथून निघालेलं बरं; पण कुठं जाणार? आत्महत्या तर आपल्याला करायची नाही. वो बुझदिली होगी. मग?
...जहाँ गम भी न हो, आँसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले...अशा एका ‘गगन के तले’ तुम्हाला जावंसं वाटतंय? वाटणारच हो, ये जीना भी कोई जीना है, लल्लू? ऐका. आम्ही तुम्हाला दुसऱ्या दुनियेत घेऊन जाऊ. तिथं तुमचं सेकंड लाइफ सुरू करा. ओके?

...दूर दूर कुठंतरी ६० प्रकाशवर्षं दूर असलेल्या ग्रहमालिकेत एक पृथ्वीसारखा ग्रह आहे. डिट्‌टो पृथ्वी हं. पण गंमत म्हंजे तिथं हवा, पाणी, जंगल, जमीन सगळं असूनही मानवी जीवन फुललंच नाही. मॅजिक नेव्हर हॅपण्ड्‌!! आम्ही त्याला ‘होमस्टीड २’ म्हणतो. तिथं जाऊन तुम्हाला ‘सेटल’ व्हायचंय; पण प्रकाशाच्या निम्म्या वेगानं जायचं ठरवलं, तरी तिथं पोचायला तुम्हाला १२० वर्षं लागणार आहेत. येस, करेक्‍ट, १२० च...पण काही हरकत नाही. आत्ता तुम्ही उदाहरणार्थ ३० वर्षांचे असाल, तर १२० वर्षांनंतर तुम्ही त्या ग्रहावर उतराल, तेव्हा ३० वर्षांचेच असाल. गॅरंटी.
आम्ही तुम्हाला सुरक्षित अशा दीर्घ निद्राकवचात झोपवून नेऊ. येस, हायबरनेशन पॉड. इथं झोपायचं. तिथं १२० वर्षांनी उठायचं. बात खतम. आहे काय नि नाही काय! तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखे पाच हजार लोक चाललेत तिथं. आमचं स्टारशिप ॲव्हलॉन हे अंतराळ-जहाज कमालीचं सुरक्षित आणि मस्त आहे. कूल आणि फेलसेफ.
चला, निघायचं? चला, बॉन व्हॉयेज...
* * *

इलेक्‍ट्रॉनिक आवाजांनी काही दशकांची शांतता भंग पावली. हायबरनेशन पॉडमध्ये गेली तीसेक वर्ष शांत झोपलेल्या जिम प्रेस्टनला जाग आली. पॉड उघडलं. एका अंतराळसुंदरीचा होलोग्राम त्याला प्रसन्न आवाजात उठवतोय : ‘गुड मॉर्निंग जिम, होमस्टिड २ च्या जवळ आपण पोचलो आहोत. चार महिन्यांत लॅंड होऊ. तोवर स्टारशिप ॲव्हलॉनच्या उच्च दर्जाच्या आतिथ्याचा लाभ घ्यावा. आपला मुक्‍काम सुखाचा होवो.’
जिम उठून बसला. त्यानं इकडं-तिकडं पाहिलं. शेकडो दीर्घ निद्राकवचांत शेकडो जण शांतपणे पहुडलेले. इलेक्‍ट्रॉनिक यंत्रणेचे काही चुकार आवाज वगळता अंगावर येईल अशी शांतता सर्वत्र पसरलेली.

काही काळ गेल्यानंतर जिम प्रेस्टनला जाणवतं की काहीतरी गडबड आहे. अत्यंत विशाल अशा या अंतराळयात्रेत आपण एकटे जागे झालो आहोत. १२० वर्षं झोपणार होतो; पण काही कारणानं आपण ३० वर्षांतच जागे झालो आहोत. संपूर्ण अंतराळयान ऑटोपायलटवर आहे. कुणीही माणूस आसपास नाही. कर्मचारी नाहीत. आहेत ते सगळे रोबो आहेत. ओह, हे काय होऊन बसलं?
स्टारशिप ॲव्हलॉनचा बार अत्यंत पॉश आहे. तुम्ही म्हणाल ते उंची मद्य हजर आहे. बोलघेवडा, चतुर बारटेंडर आर्थर जिमचं स्वागत करतो. जिमचं दु:ख मात्र त्याच्या हृदयापर्यंत काही पोचू शकत नाही. कारण, आर्थरपठ्ठ्याला हृदयच नाही. तो रोबो आहे.
अशी एकट्यानं अजून ८८ वर्षं कशी काढणार?
झोपलेल्या समाजाच्या मधोमध एक जागा माणूस. धडधाकट. जिवंत...म्हणजे एका अर्थी मृतच.
जिम काही झालं तरी एक माणूस आहे. माणूस हा प्राणी हलकट असतो, हेही तुम्हाला माहीत आहेच. ओशाळू नका असे. हे खरं आहे. हो की नाही? जिमच्या डोक्‍यात एक किडा वळवळतोय. आणखी कुणाला हायबरनेशनमधून जागं केलं तर? कंपनी मिळेल. जगणं थोडं सुसह्य होईल.
जागं केलेलं माणूस बाईमाणूस असेल तर? मग तर काय...
जिमच्या मनातलं काळंबेरं उफाळून येतं. शांत झोपलेल्या एका तरुण स्त्रीच्या हायबरनेशन पॉडशी तो स्क्रू आणि पाना घेऊन उभा राहतो. उघडू? देवा, मला क्षमा कर.
...जाग्या झालेल्या ऑरोरा लेनला काही कळलं नाही. गोंधळून ती त्याच्याकडं पाहत राहिली.
* * *

‘‘तू कधी जागा झालास?’’
‘‘एक वर्ष, तीन आठवडे आणि सात तासांपूर्वी.’’
‘‘पुन्हा हायबरनेशनमध्ये जाता येईल?’’
‘‘बहुधा नाही. दीर्घ निद्रेत पाठवणारी वैद्यकीय यंत्रणा स्टारशिप ॲव्हलॉनवर नाही.’’
‘‘दोघांनी ८८ वर्षं कशी काढायची?’’
‘‘माहीत नाही, ऑरोरा. सॉरी. इथून पृथ्वीवर पाठवलेला संदेश त्यांना मिळून त्याचं उत्तर यायला ५५ वर्षं लागतील. सो देअर इज नो स्कोप ऑफ रिटर्निंग.’’
...अफाट, अनंत अशा अंतरिक्षात दोन एकांडे जीव. परतीचा प्रवास शक्‍य नाही. मुक्‍काम गाठण्याची तर सुतराम शक्‍यता नाही. अशा परिस्थितीत एका अजनबी जोडप्यानं काय करायचं असतं?
गप्पांना मर्यादा आहेत. एकमेकांचं पूर्वायुष्य इंचाइंचानं सांगायचं ठरवलं तरी एखाद्‌-दोन वर्षांत एकमेकांची रंध्र नि रंध्र नको इतकी परिचित होऊन जातात. कालांतरानं शब्द संपतात. मग कदाचित नातंसुद्धा. सरतेशेवटी आयुष्य. या अंतरिक्षयानात सारं काही उपलब्ध आहे. फक्‍त माणसं नाहीत. माणसानं यंत्रणेशी बोलायचं. यंत्रणेनं माणसाशी.
जिमनं प्रेमानं ऑरोराचा वाढदिवस साजरा केला. तिला डेटवर नेण्याचं निमंत्रण दिलं. सुंदरसं डिनर घेतलं. मग स्पेससूट परिधान करून तिला स्पेसवॉकला नेलं.
आ चल के तुझे, मैं ले के चलूँ इक ऐसे गगन के तले...
जहाँ गम भी न हो, आँसू भी न हो...बस, प्यार ही प्यार पले...
भावविभोर झालेल्या ऑरोरानं जिम प्रेस्टनची सोबत स्वीकारली. एकमेकांसोबत जमेल तसं राहायचं ठरवलं. पृथ्वीवर ज्यात अपयशी ठरलो, ते प्रेम इथं या अथांग पोकळीत मिळावं?
‘‘इतका उशीर का लावलास? विचारायला?’’
‘‘मी तुला स्पेस देत होतो...’’
‘‘ओह...आय ॲम सो हॅपी.’’
‘‘हॅपी बर्थ डे स्वीटहार्ट. वाढदिवसाची भेट म्हणून हे आख्खं तारांगण तुला. आकाशातले तारे तोडून आणून देणारा कुणीतरी हवा होता ना? वेल, मी आहे!! शॅल आय?’’
त्यांच्या त्या अवकाशप्रेमाचा साक्षीदार स्वाती नक्षत्राचं तारामंडळ होतं.
* * *

बारटेंडर आर्थरनं सगळी वाट लावली. जिमनं तुला हायबरनेशन पॉडमधून मुद्दाम जागं केलं, असं त्यानं ऑरोराला निर्विकारपणे सांगून टाकलं. रोबोच तो...त्याला ना काळीज. ना खोटं बोलण्याची, लपवाछपवी करण्याची सवय. तो माणूस थोडाच होता?
ऑरोरा हादरते. किती अमानुष आहे हे. यानं मला जागं केलं. एका अर्थानं माझं आयुष्यच संपवलं. हा खून आहे, खून.
१२० वर्षांच्या दीर्घ निद्रेनंतर पुन्हा नव्यानं आयुष्याला सुरवात करता आली असती; पण जिम प्रेस्टन नावाच्या स्वार्थी माणसानं झोपेतून उठवलं. झोपेतून नव्हे, आयुष्यातून उठवलं...
ऑरोराला हा विश्‍वासघात सहन झाला नाही. तिनं जिमला त्याच्या खोलीत घुसून खूप मारलं. जिमनं तिची मन:पूर्वक क्षमा मागितली; पण त्याला काही अर्थ नव्हता.
वेळ घालवण्यासाठी जिमनं अखेर अंतरिक्षयानाच्या विशाल केंद्रभागात चक्‍क एक रोपटं आणून लावलं. इथंच आता आयुष्य कंठायचं. जमेल तसं. आपलं विश्व आपण उभं करायचं. जमेल तसं.
* * *

यानात काहीतरी गडबड आहे. अंतरिक्षाच्या पसाऱ्यात कोट्यवधी लघुग्रहसुद्धा हिंडत असतात; पण यानाला त्यांच्यापासून धोका नाही. यानाच्या जवळ जाणारा लघुग्रह तत्काळ फुटून नष्ट होतो. स्टारशिप ॲव्हलॉन इज मिटिऑर-सेफ.
पण बहुधा एका मोठ्या आकाराच्या लघुग्रहामुळं व्हायचं ते नुकसान झालं आहे. काही काळासाठी आण्विक ऊर्जेची यंत्रणा बंद पडल्यानं भलताच घोळ होऊन आख्खी यंत्रणा रिबूट झाली. त्यात जिम प्रेस्टनचं दीर्घ निद्राकवच उघडलं. तसंच ते यानाचे डेक चीफ गस याच्याही हायबरनेशन पॉडचं झालं. दोघांमध्ये आता तिसरा माणूस आला आहे; पण गसला असंख्य दुर्धर रोगांनी ग्रासलं असून, तो काही तासांचाच प्रवासी उरलाय. गसनं जाता जाता त्याचा यानाच्या कुठल्याही भागात जाण्याचा परवाना असलेला रिस्ट बॅंड या जोडप्याला देऊन टाकलाय.
आण्विक ऊर्जेची यंत्रणा असलेल्या भागाला लघुग्रह आदळून पडलेलं भगदाड मोठ्या धाडसानं जिमनं बंद केलं. स्टारशिप ॲव्हलॉन पुन्हा स्थिर झाली. मार्गक्रमणा करू लागली. दरम्यान, हायबरनेशन पॉडची यंत्रणा असलेला भाग जिमनं पाहून ठेवलाय.
‘‘ऑरोरा, ही एकच यंत्रणा तुला वाचवू शकेल. मी तुला पुन्हा दीर्घ निद्रा कवचात टाकतो. तू आरामात पोचशील होमस्टीड २ ला.
आणि तू?’’
‘‘मी एकटाच होतो. एकटाच राहीन.’’
***

पुढं काय घडलं? ते चित्रपटात पाहायचं. चित्रपटाचं नाव ‘पॅसेंजर्स.’
...गेल्या वर्षीच हा सिनेमा येऊन गेला. यंदा ऑस्करच्या नामांकनाच्या यादीत कुठं कुठं दिसला; पण तसले काही सन्मान या विज्ञानपटाच्या वाट्याला आले नाहीत. मॉर्टेन टिल्डम नावाच्या नॉर्वेजियन दिग्दर्शकानं हा चित्रपट साकारलेला आहे; पण दिग्दर्शकापेक्षा तो अमेरिकी लेखक जोन स्पाइट्‌सचा अधिक आहे. हा स्पाइट्‌स म्हणजे ‘प्रोमिथिअस’ किंवा ‘डॉक्‍टर स्ट्रेंज’चा लेखक. अवकाशासंबंधीच्या लिखाणासाठी तो वाखाणला जातो. जगभर व्याख्यानंही देत असतो. त्यानं लिहिलेली ही कथा आहे. खिस प्रॅटनं उभा केलेला जिम आणि जेनिफर लॉरेन्सच्या उत्कट अभिनयानिशी साकारलेली गेलेली ऑरोरा ही जोडी सोडली तर या आख्ख्या चित्रपटात दोन-तीनच मानवी कलावंत आहेत. एक तो डेक चीफ गस आणि बारटेंडर मायकेल शीन. बाकी कुणीही नाही तिथं.

या चित्रपटाचे खरे नायक-नायिका आहेत ते विज्ञान आणि तंत्रज्ञान. उत्तम कलादिग्दर्शन ही दमदार बाजू आहे. सिकॅमोर वृक्षाच्या बीजाप्रमाणे गरगरत जाणाऱ्या त्या प्रचंड स्टारशिप ॲव्हलॉनचं डिझाइन टाळ्या वसूल करतं; पण अफलातून चित्रण आणि ‘अफाट अंतरिक्षातली दोघं’ असा भलताच दिलखेचक विषय असूनही जाणकारांनी त्याची नाही म्हटलं तरी उपेक्षाच केली. ‘आणखी एक स्पेस भंकस’ असं त्याचं वर्णन केलं गेलं. खरं तर हा सिनेमा इतका काही टाकाऊ नाही.
जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमधल्या प्रवासात अशी मध्येच जाग येऊन भान आलं तर...नकोच.
हे आयुष्यभराचं ‘जागरण’ मृत्यूपेक्षाही भयानक. त्यापेक्षा झोपलेलं
काय वाईट? असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com