पप्पा सांगा कुणाचे? (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 19 मार्च 2017

ख्यातनाम बालसाहित्यिका पामेला ऊर्फ पी. एल. ट्रॅव्हर्स यांचा हट्टाग्रह आणि त्याला वॉल्ट डिस्नीसारख्या ‘बापा’ची मिळालेली कडू-गोड सोबत याची विलक्षण कहाणी म्हणजे ‘सेव्हिंग मि. बॅंक्‍स’ हा चित्रपट. चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेत लेखक खरंच इतका महत्त्वाचा असतो का? त्याच्या विक्षिप्तपणाला काही अर्थ असतो का? क्रिएटिव्ह असणं म्हणजे नेमकं काय असतं? अशा अनेक गहन प्रश्‍नांची उत्तर हा चित्रपट देतो...

ख्यातनाम बालसाहित्यिका पामेला ऊर्फ पी. एल. ट्रॅव्हर्स यांचा हट्टाग्रह आणि त्याला वॉल्ट डिस्नीसारख्या ‘बापा’ची मिळालेली कडू-गोड सोबत याची विलक्षण कहाणी म्हणजे ‘सेव्हिंग मि. बॅंक्‍स’ हा चित्रपट. चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेत लेखक खरंच इतका महत्त्वाचा असतो का? त्याच्या विक्षिप्तपणाला काही अर्थ असतो का? क्रिएटिव्ह असणं म्हणजे नेमकं काय असतं? अशा अनेक गहन प्रश्‍नांची उत्तर हा चित्रपट देतो...

‘माझे पप्पा वाईट्ट नाहीच्चेत मुळी’ पोट आत खेचून मान जोराजोरानं हलवत ती मुलगी हट्टानं किंचाळत राहिली. अश्रूंचे लोट गालावर धो धो वाहात राहिले. पाय हापटत ती ओरडत-रडत राहिली. आणि हेच... हेच त्या मुलीनं आयुष्यभर केलं.
लौकिकार्थानं एका अपयशी बापाची मुलगी. नाव ठेवा ः गिंटी. तर हा गिंटीचा बाप म्हणजे वाया गेलेला एक इसम होता. माणूस मूळचा बुद्धिमान. स्वभावानंही चांगला; पण दारूनं त्याला पार धुळीत लोळवला. सुंदरसं घर होतं. सोशिक बायको होती. गिंटी आणि तान्ही बिड्डी अशा बारबंदरी नावाच्या दोन गोडगोडगिट्ट मुली होत्या. बॅंकेत छानदार नोकरीही होती; पण या बाटलीच्या नादानं सगळंच गमावलं.
दर वर्षी नवं गाव. नवी बॅंक. नवं घर. नवं कर्ज. नवी दारू...बॅंकेतली उच्चपदावरची नोकरी जाता जाता वाचली. कारण, कर्ज फेडण्यासाठी त्यानं आपल्याच बॅंकेत फ्रॉड केला!

पण नशेत धुत्त नसेल, तर त्याच्यासारखा लाख माणूस नव्हता. मुलींना तर तो मजेदार गोष्टी सांगायचा. नकला करून करून हसवायचा. कल्पनाविश्‍व हे खरंच असतं. पऱ्या, जादू, राक्षस सगळं खरं खरं असतं. त्याची गोड छोकरी उगीच टक लावून बाहेरच्या झाडाकडं बघायला लागली की तो आपल्या बायकोला म्हणे : ‘तिला हटकू नकोस गं...ती कामात आहे’!
‘‘ए पोरी, कोण गं तू? माझी मुलगी पाहिलीस का? ती रॉयल प्रिन्सेस आहे हं!’’ अनोळखी चेहरा करून तो यायचा. गिंटी मज्जेत हसत म्हणायची ः ‘‘ मीच तुमची मुलगी आहे!’’

‘‘ओहो, विस्सरलोच की!’’ असं म्हणत तिला पाठुंगळी घेऊन हिंडायचा. आपले अंकल आल्बर्ट हे ॲक्‍चुअली घोडा आहेत; पण चेटकिणीच्या शापामुळं ते अंकल झालेत असल्या भन्नाट टेपा लावायचा. ‘घोडागाडीपेक्षा पाठीवरची राइड ज्यास्त भारी असते. तशी वॉकिंग बस नावाची एक बस असते, पण भलत्यासलत्याला त्याचं तिकिट नाही मिळत,’ असल्या लोणकढ्या देत तो मुलींबरोबर मजेत राहायचा. अभावातही भाव उराशी जपणारा हा बाप गिंटीला प्यारा होता, हे सांगायची गरज नाही.
‘‘ गिंट्या, स्वप्न बघणं कधीही सोडू नकोस. स्वप्नं संपली की सगळं संपलं...कळलं?’’ एक दिवस तो गिंटीला म्हणाला.
‘‘मला तुमच्यासारखं व्हायचंय, डॅड!’’ चिमुकले हात त्याच्या गळ्याभोवती घालून ती म्हणाली.
‘‘ नको गं राणी...नको!’’ असं म्हणून तो ढसाढसा रडायला आला. ट्रॅव्हर्स गॉफ नावाचा हा बाप अपयशी, कर्जबाजारी, दारुड्या असा लौकिक प्राप्त करून स्वर्गाकडं प्रस्थान ठेविता झाला; पण मुलीच्या लेखी मात्र तो निकम्मा, नालायक कधीच नव्हता. तो कायम तिच्या भावविश्‍वाचा नायकच राहिला.

पुढं गिंटीनं आपलं आडनाव (गॉफ) टाकून बापाचं (ट्रॅव्हर्स) हे नाव आडनाव म्हणून वापरलं. पामेला एल. ट्रॅव्हर्स. याच नावानं तिनं लहान मुलांसाठी मेरी पॉपिन्सच्या मस्त मस्त गोष्टी लिहिल्या. मेरी पॉपिन्स ही बोलकी छत्री आणि जादूची छडीवाली, हवेत उडणारी फॅंटास्टिक दाई होती. इतकी वर्षं झाली पण मेरी पॉपिन्सची भुरळ कायम आहे. तशी तिची भुरळ प्रतिभावान सर्जक वॉल्ट डिस्नी यालाही पडली होती. त्याच्या मुलींनाही पडली होती. डॉनल्ड डक आणि मिकी माऊसच्या या निर्मात्याला त्याच्या मुलींनी आव्हान दिलं : ‘मेरी पॉपिन्सवर सिनेमा बनवून दाखवा. मग आम्ही तुम्हाला मानू. वॉल्ट डिस्नीनं होकार भरला. पण...’

पॉपिन्सची लेखिका पीएल ट्रॅव्हर्सनं त्याला तब्बल वीस वर्ष तंगवलं. रडवलं. थकवलं.
तिचं हेच तर सांगणं होतं. ‘‘माझे पप्पा वाईट्‌ट नाहीच्चेत मुळी! कळलं?’’
ख्यातनाम बालसाहित्यिका पामेला ऊर्फ पी. एल. ट्रॅव्हर्स यांचा हट्टाग्रह आणि त्याला वॉल्ट डिस्नीसारख्या ‘बापा’ची मिळालेली कडू-गोड सोबत याची विलक्षण कहाणी म्हणजे ‘सेव्हिंग मि. बॅंक्‍स’ हा चित्रपट. डिस्नीसारख्या मनोरंजनसम्राटानं एका य:कश्‍चित गोष्टी लिहिणाऱ्या बाईला वीस वर्षं इतकं का झेललं असावं? नसता बनवला त्यानं ‘मेरी पॉपिन्स’ तर काय बिघडलं असतं? एका विक्षिप्त बाईनंही केवळ गोष्ट आपली आहे म्हणून वॉल्ट डिस्नीचे इतके अपमान का केले असावेत? लेखक खरंच इतका महत्त्वाचा असतो का? त्याच्या विक्षिप्तपणाला काही अर्थ असतो की आपलं उगीच पाब्लोपिकासोगिरी? क्रिएटिव्ह असणं म्हणजे नेमकं काय असतं? अशा अत्यंत गहन प्रश्‍नांची उत्तरं या चित्रपटात आपल्याला मिळतात. मन भारावून जातं. मनातलं मूल टाळ्या पिटतं. त्यातली एक टाळी पामेला ट्रॅव्हर्सच्या रम्य भावविश्‍वाला असते आणि दुसरी वॉल्ट डिस्नीच्या सृजनशील सोशिकतेला. खरं तर हे उलट असायला काही हरकत नव्हती...पण तीच तर ही गोष्ट आहे.
***

वॉल्ट डिस्नीनं सतत पिच्छा पुरवल्यानं आणि पैशाचीही तंगी आल्यानं शेवटी पामेला ट्रॅव्हर्सनं ‘मेरी पॉपिन्स’वर चित्रपट बनवण्याचे हक्‍क वॉल्ट डिस्नीला देऊन टाकले; पण अट अशी घातली, की ‘त्याची पटकथा माझ्यासमोर आणि माझ्या सूचनेबरहुकूम बनली पाहिजे. गाणीसुद्धा मी ‘ओके’ केलेली असली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुझी ती भिक्‍कार कार्टुनं माझ्या सिनेमात नकोत.’ वॉल्ट डिस्नी ‘हो’ म्हणाला. इंग्लंडहून पामेला ट्रॅव्हर्स लॉस एंजलिसला आली. तिच्या दिमतीला डिस्नीनं लंबीचवडी लिमूझिन, राल्फ हा सुस्वभावी चालक दिलेला होता. बिव्हर्ली हिल्स हॉटेलातली खोली वेगवेगळ्या कार्टूनच्या मऊशार बाहुल्यांनी सजवली होती. फळांनी परडी भरून ठेवली होती; पण पामेला ट्रॅव्हर्सनं फळं समोरच्या पोहण्याच्या तलावात फेकून दिली. बाहुल्या कपाटात दडवल्या. मिकी माऊसकडं बघून तर सणसणीत नाक मुरडलं आणि त्याला कोपऱ्यात फेकला.

वॉल्ट डिस्नीला बालमानसातलं काहीही कळत नाही, तो पक्‍का धंदेवाला आहे, अशी पामेलाबाईची ठाम समजूत होती. त्याचे चिक्‍कार पुरावे तिच्याकडं होतं. ‘बालमनाची तरलता म्हणजे काय, हे त्या डिस्नीच्या गावीही नाही, मेरी पॉपिन्सच्या निमित्तानं त्याला धडा शिकवण्याची संधी मिळाली आहे,’ असं पामेलाबाईला वाटत होतं.
स्टुडिओत पामेलानं सांगून टाकलं. मला नावानं हाक मारायचं कारण नाही. ‘कॉल मी मिसेस ट्रॅव्हर्स.’ बॉब आणि डिक शेरमनसारखी अफलातून प्रतिभावान दुक्‍कल गाणी बनवायला होती; पण त्यांच्या ‘धुना’ पामेलाबाईच्या कानाला खटकू लागल्या. ‘अरे, किती धंदा कराल? किती धंदा कराल?’

शेवटी तिनं वॉल्ट डिस्नीची भेट घेऊन सांगून टाकलं ः ‘हे जमणं अशक्‍य आहे. मेरी पॉपिन्स ही चवचाल वाटतेय. मि. बॅंक्‍ससाठी डिक व्हॅन डाइक नको, रिचर्ड बर्टन, लॉरेन्स ऑलिव्हिए किंवा ॲलेक गिनेससारखा तगडा अभिनेता हवा. ज्युली अँड्य्रूज मेरी पॉपिन्सच्या रोलमध्ये शोभत नाही. गाणी बंडल आहेत, ती तुझ्या डिस्नी पार्कात वाजव. संपूर्ण सिनेमात लाल रंग वापरायचाच नाही...आणि रिहर्सल रूममध्ये तुझं ते सिंथेटिक जेली आणि आइस्क्रीम वगैरे फालतू पदार्थ पाठवू नकोस. हिरव्या भाज्या पाठव त्यापेक्षा. संहिता मी म्हणते तश्‍शीच व्हायला हवी.’
आश्‍चर्य म्हणजे वॉल्ट डिस्नीनं सगळं मान्य केलं.
***

पामेलाला आपलं बालपण आठवत राहिलं. ते मोडकळीला आलेलं घर. दारूच्या नशेत बरळणारा बाप. आता तो आणखी प्यायला तर जगणार नाही, हे सांगायला डॉक्‍टरची गरजच नव्हती. नशिबाला दोष देत रडणारी आई...काहीही न कळणारी तान्ही बिड्डी. एका रात्री आईनं तिचा पापा घेऊन सरळ खाडी गाठली. तिच्या मनधरण्या करून छोट्या गिंटीनं तिला परत घरी आणलं होतं.

अचानक येऊन थडकलेल्या एलीआत्यानं मग घर सावरलं. तिच्या पोतडीत अनेक युक्‍त्या असायच्या. ही एलीआत्याच पुढं मेरी पॉपिन्सचं प्रेरणास्थान ठरली.
एक दिवस अंथरुणाला खिळलेल्या बापासमोर जाऊन ती उभी राहिली.
‘‘मी एक कविता केली आहे. वाचू?’’ बाप काही बोलला नाही. तरीही तिनं कविता वाचली.

‘‘ यीट्‌सच्या जवळपास पण जात नाही. हॅ:!!’’ बाप बरळला; पण त्या बरळण्यानंच पामेला गॉफच्या मनात काहीतरी जबर्दस्त अशी ऊर्मी पेरली. ती तिला आयुष्यभर पुरली. इतकी की त्यापुढं वॉल्ट डिस्नीसारखा सृजनाचा सम्राट नमला.
...त्यानंतर काही दिवसांनीच बापानं तिला जवळ बोलावून सांगितलं ः ‘तुझ्या आईनं माझं औषध लपवून ठेवलंय. ते दे ना आणून गिंटी. पुन्हा नाही सांगणार.’
...आणि गिंटीनं त्यांना ते औषध गपचूप नेऊन दिलं. दुसऱ्या दिवशी मि. ट्रॅव्हर्स गॉफ निवर्तल्याचं नातलगांना कळवण्यात आलं.
***

‘‘वॉल्ट, हे मी काय ऐकतेय? माझ्या सिनेमात तू तुझी कार्टून घुसडणार आहेस?’’ पामेलानं त्याला थेट जाब विचारला.
‘‘कमॉन, एका गाण्यातला छोटासा तुकडा आहे तो! इतकी अपसेट का होतेस, पाम?’’ अघळपघळपणाने वॉल्ट डिस्नी म्हणाला.
‘हा करारभंग आहे’ असं सांगून तिनं करारनामा भिरकावला. कुणालाही न सांगता विमान पकडून ती सरळ लंडनला निघून आली.
रात्री बेल वाजली. तिनं दार उघडलं, तर दारात साक्षात वॉल्ट डिस्नी.
चहा ढवळत तो सांगू लागला : ‘‘पाम, मनोरंजनाचा बादशहा, धंदेवाला कोट्यधीश, हात लावेल त्याचं सोनं करणारा मिडास राजा, अशी काहीतरी माझ्याबद्दल तुझी प्रतिमा झालेली दिसते. चुकतेयस तू. हे खरं असतं तर मी वीस वर्षं तुझ्या कच्छपि लागलो असतो का? माझंही बालपण कष्टात गेलं. माझ्या वडिलांची पेपरची लाइन होती. मी आणि रॉय - माझा भाऊ- थंडी-वाऱ्या-पावसात पेपर टाकायला जात असू. मग शाळा. मग पुन्हा संध्याकाळी पेपर टाकणं. चूक झाली की वडील फोडून काढत. पण तुला सांगू का, वडिलांना असं काळ्या रंगात रंगवण्याचा मला कंटाळा येतो. त्यांचे काही प्रॉब्लेम्स होतेच ना. मुख्य म्हणजे एखादी कहाणी वेगळ्या पद्धतीनं सांगायला मलाही आवडतं, तुझ्यासारखंच. मला माझे वडील आवडतात, तुझ्यासारखेच. मलाही माझ्या वडिलांची खरी प्रतिमा जपायला, सांगायला आवडतं...तुझ्यासारखंच. तुझी मेरी पॉपिन्स ही मुलांना वाचवणारी दाई नव्हती. ती तुझ्या वडिलांना ट्रॅव्हर्स गॉफ यांना वाचवायला आलेली होती. हो ना? मला माहीत आहे, तू एवढी अपसेट का असतेस ते. तुझं वडिलांवर इतकं प्रेम आहे, की त्यांचं नावसुद्धा घेतलंस तू. मलाही तेच करायचंय, पाम. करू दे ना मला हा सिनेमा...प्लीज.’’

अखेर पामेलानं पुन्हा परवानगी दिली. सिनेमा झाला; पण त्याच्या प्रीमिअरला बिझनेसमन वॉल्ट डिस्नीनं तिला निमंत्रण धाडलं नाही. ती जिद्दीनं गेली. सिनेमा बघून त्याची उघड वासलात लावायची, या तिडिकेनंच; पण तिला सिनेमा चक्‍क आवडला.
पॉपिन्स हा सन १९६४ मध्ये डिस्नीनं बनवलेला चित्रपट आजही क्‍लासिक म्हणून ओळखला जातो. त्यातल्या अभिजात गाण्यांसकट...आणि हो, कार्टून पेंग्विनसकट.
***

डिस्नीनं ‘मेरी पॉपिन्स’ कसा बनवला, याची ही कहाणी आहे. दिग्दर्शक जॉन ली हॅनकॉक यांची सर्वांगसुंदर हाताळणी आणि त्यातलं डिस्नीपण कमालीचं लोभस आहे. एम्मा थॉम्पसन या जबरदस्त अभिनेत्रीनं साकारलेली पामेला ट्रॅव्हर्स दीर्घकाळ स्मरणात राहील अशी, तर वॉल्ट डिस्नीचा अजरामर रोल, नन अदर दॅन टॉम हॅंक्‍सनं साकारलेला. मि. बॅंक्‍सच्या अविस्मरणीय भूमिकेत आहे कॉलिन फॅरेल. निम्मा खेळ या स्टारकास्टमध्येच खल्लास होतो. अर्थात सिनेमा सुंदर असला तरी बराचसा खोटा आहे. कारण, पामेला ट्रॅव्हर्स आणि वॉल्ट डिस्नी हे कधीच समोरासमोर भेटले नव्हते. त्यांच्यातल्या मनधरण्या, क्रिएटिव्ह झगडे हे फोनवर किंवा पत्रापत्रीतून झाले, हे सत्य आहे. मुख्य म्हणजे मेरी पॉपिन्सचं डिस्नीकरण केल्याबद्दल पामेला ट्रॅव्हर्सनं वॉल्ट डिस्नीला कधीच माफ केलं नाही. उलट, ती १९९६ मध्ये निवर्तली, तेव्हा तिचं मृत्युपत्र उघड करण्यात आलं. त्यात लिहिलं होतं : ‘मेरी पॉपिन्स आणि अन्य गोष्टींचे हक्‍क यापुढं कधीही कुठल्याही अमेरिकन माणसाला देऊ नयेत’.

Web Title: pravin tokekar's article in saptarang