चाबूक ! (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 26 मार्च 2017

 

‘‘मी छळत नाही रे तुम्हाला. माझे शिकवण्याचे मार्ग चुकत असतील; पण...ग्रेट कलावंत असे हवेतून जन्माला येत नाहीत. टोक गाठावं लागतं त्याला..शरीर-मनानं असं टोक गाठलं, की आयुष्यातला बेस्ट सोलो परफॉर्मन्स देता येतो. अन्यथा नाही...’’ ग्लास ओठाला लावत फ्लेचर सलगीनं सांगत होता.

 

 

‘‘मी छळत नाही रे तुम्हाला. माझे शिकवण्याचे मार्ग चुकत असतील; पण...ग्रेट कलावंत असे हवेतून जन्माला येत नाहीत. टोक गाठावं लागतं त्याला..शरीर-मनानं असं टोक गाठलं, की आयुष्यातला बेस्ट सोलो परफॉर्मन्स देता येतो. अन्यथा नाही...’’ ग्लास ओठाला लावत फ्लेचर सलगीनं सांगत होता.

 

ए  खाद्या ऑर्केस्ट्रात स्टेजवर ‘भांड्यांचं दुकान’ मांडून बसलेला लांब केसांचा गडी दिसतो. हातातल्या ड्रमस्टिक्‍स इथं-तिथं हापटत, मधूनमधून थाळे वाजवत जोरदार काम चाललेलं असतं. त्याच्या वाजवण्यापेक्षा त्याचं झुलणंच अधिक लक्षवेधक. अर्थात, ही समजदारी संगीताची मर्यादित भूक असणाऱ्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांची. आमची धाव ड्रम वाजवत ‘लैला मैं लैला’ गाण्यातल्या ‘तुतुक तुतुक’ करणाऱ्या गब्बरसिंगच्या पुढं जात नसते. फिल्मी मेलडीवर पोसलेले आपले पिंड. हे दणदणाटी संगीत मनाला भावणार कुठून? अर्थात हे असले पाच-सात लहान मोठे ड्रम्स आणि दोन-तीन थाळ्या एकाच वेळेला वाजवणं सोपं नसावं, एवढं मात्र कळत असतं; पण ते तेवढंच.

ड्रमिंग हा जॅझ संगीताचा आत्मा आहे. अभिजात संगीताच्या आपल्या दुनियेत तबल्याचे ताल असतात. मृदंगाचे बोल असतात. ढोलकीचे तुकडे असतात. इथं ‘कायद्या’चं राज्य असतं. लय-तालाच्या या अरण्यात जितकं शिराल, तितकं ते निबिड होत जातं. त्या तालारण्यातली एक शाखा म्हणजे जॅझ आणि त्यातले ड्रम्स.
हातातून रक्‍त वाहेपर्यंत तासन्‌तास साधना. तालाची गणितं. त्याचे ते गिचमिड चार्टस...अवघड मामला आहे. ही विद्या एकलव्यासारखी शिकता येणं अशक्‍य. तिला गुरू हवा; पण तो गुरू कसाई निघाला तर? शिष्य तावून-सुलाखून निघेल की विझून जाईल? शिष्याला धारेवर धरल्याशिवाय कला वश होत नाहीच का? अभिजाताच्या क्षेत्रात ही हिंसकता कुठून शिरते? अशा अनेक प्रश्‍नांची चर्चा करणारा चित्रपट म्हणजे ‘व्हिपलॅश.’

गेल्या ऑस्कर सोहळ्यात अर्धा डझन बाहुल्या घरी नेणाऱ्या ‘ला ला लॅंड’ची जन्मभूमी म्हणजे ‘व्हिपलॅश’ हा चित्रपट. आधी हा बघायचा, मग पाठोपाठ ‘ला ला लॅंड.’ कारण ज्यानं ‘ला ला लॅंड’चा चमत्कार घडवला, त्याच डॅमियन शॅझलनं ‘व्हिपलॅश’ साकारला आहे.
 
अँड्य्रू नीमन हा एक कोवळा पोरगा. हल्ली हल्लीच तो शेफर संगीतशाळेत जाऊ लागला आहे. त्याला मोठं होऊन बडी रिचसारखं चमत्कारी ड्रमर व्हायचं आहे. बर्नार्ड बडी रिच ही एक दंतकथा होऊन गेली जॅझच्या जगात. कुठंही न शिकलेला, कधीही रियाझ न करणारा बडी रिच हा ड्रमवादनाच्या जगात देव मानला जातो. अँड्य्रूला तसंच व्हायचंय.

एकलकोंडा, कुणाशीही धड न बोलणारा काहीसा स्वमग्न अँड्य्रू....तो आणि त्याचे ड्रम्स हेच त्याचं विश्‍व आहे. त्याच्या वयाची इतर पोरं फावल्या वेळात पोरीबिरी पटवून डेटवर जातात; पण याला अजून कुणीही सोबत नाही. त्याला गरजही नाही बहुधा.
ड्रमवर रियाज करत असतानाच, त्याच्यासमोर फ्लेचर येऊन उभा राहिला. त्यानं वाजवणं थांबवलं.
‘‘मी सांगितलं तुला थांबवायला?’’ फ्लेचर गुरकावला. अँड्य्रूनं पुन्हा स्टिक्‍स ड्रमवर सोडल्या.
‘‘मी तुला पुन्हा वाजवायला तरी सांगितलं?’’ पुन्हा फ्लेचर गुरकावला. अँड्य्रू घाबरून थांबला.
‘‘मी कोण आहे माहीत आहे तुला?’’
...अँड्य्रूनं मान हलवली. शेफर संगीतशाळेचा लिजंडरी टेरेन्स फ्लेचर कुणाला माहीत नाही? शेफरचा वाद्यवृंद आज जॅझजगतात आदराचं स्थान पटकावून आहे, तो या महाभागामुळं. साक्षात द टेरेन्स फ्लेचर.
‘पुन्हा वाजव’ असं फर्मावल्यावर अँड्य्रूनं उत्साहात ताल पकडला; पण धाडकन दार लावून टेरेन्स फ्लेचर निघूनसुद्धा गेला होता...
ही त्यांची पहिली भेट.
 
एक दिवस फ्लेचरनं त्याला थांबवून त्याची जमेल तितक्‍या मृदू सुरात विचारपूस केली. वडील काय करतात? लेखक आहेत. लेखक? काय लिहितात? गोष्टी. आई? ती लहानपणी मला सोडून गेली. डिव्होर्स झाला त्यांचा. ओह. घरात कुणी म्युझिकवालं आहे? बरं. उद्या पहाटे सहाला माझ्या स्टुडिओत हजर राहा. काय?
शेफरच्या वाद्यवृंदात थेट पर्यायी ड्रमर म्हणून फ्लेचर त्याला आमंत्रित करत होता. अँड्य्रू मनातल्या मनात ‘शेफर’ला! रात्री मल्टिप्लेक्‍सच्या बर्गरदुकानातल्या पोरीला त्यानं सरळ ‘माझ्याबरोबर बाहेर येशील का?’ असं विचारलंसुद्धा. ती चक्‍क ‘हो’ म्हणाली. माय गॉड. व्हॉट अ डे!

...अँड्य्रू थोडासा लेटच पोचला; पण कुणीही नव्हतं तिथं. नऊ वाजता बाकीचे वादक आले. पाठोपाठ थंड चेहऱ्याचा फ्लेचर. तिथून त्याचे रंग दिसायला लागले. तालीम सुरू झाली. योग्य तो टेम्पो मिळत नसल्याच्या कुरकुरीचं रूपांतर रागात, रागाचं स्फोटात, स्फोटाचं महास्फोटात होताना त्याला बघायला मिळालं. बेसुऱ्या वादकाला अपमानित करून बाहेर घालवणं हा बहुधा फ्लेचरचा छंद असावा.
‘‘तू आऊट ऑफ ट्यून आहेस हे कळलंय तुला?’’ फ्लेचरनं मेट्‌सझ नावाच्या एका ट्रम्पेटवाल्याला फैलावर घेतलं.

‘‘होय!’’ भेदरलेला ट्रम्पेटवाला रडत रडत म्हणाला. फ्लेचरनं त्याला बाहेर काढलं.
‘‘ एरिक्‍सन, फॉर द रेकॉर्ड, तो मेट्‌झ आऊट ऑफ ट्यून नव्हता, तू होतास. त्याला बिचाऱ्याला आपण बेसूर आहोत तेही कळलं नाही. तेवढा गुन्हाही बाहेर घालवायला पुरेसा आहे. तूसुद्धा फूट!’’ फ्लेचरनं दुसरा बळी घेतला.
कोअर ड्रमर म्हणजे वाद्यवृंदाचा मुख्य ड्रमर; पण त्याचा अल्टरनेट, म्हणजे पर्यायी ड्रमरसुद्धा तितक्‍याच तयारीचा लागतो. ‘कोअर ड्रमरची जागा ही कमवायची असते. ती कुणी देत नाही, कुणी मागत नाही,’ हे फ्लेचरचं तत्त्वज्ञान आहे.
 
विक्रमादित्यासारखाच अँड्य्रूनंही हट्‌ट सोडला नाही. त्याच्या पाठीवर फ्लेचर नावाचा आग्यावेताळ होता!
हातातून रक्‍त येईपर्यंत प्रॅक्‍टिस करता करता अँड्य्रूची तहान-भूक हरपली. ड्रमरोलची अत्युच्च लय गाठता गाठता फ्लेचरचा छळही वाढत गेला.
‘‘वाजव, वाजव ***, यू पीस ऑफ **...माझा बाप लेखक म्हणे. हुडुत! तुझा बाप *** होता. उगीच नाही तुझी आई दुसऱ्याचा हात धरून पळून गेली. तुझ्या बापाला युजीन ओ’निल होता येईना, आणि आईला ***!! वाजव, वाजव!...’’ फ्लेचरच्या भयानक भडिमारानं अँड्य्रूच्या मनाची काहिली होत होती. फ्लेचरच्या चिक्‍कार शिव्या खात अँड्य्रूनं अखेर कोअर ड्रमरची जागा हासिल केलीच.

त्याचं झालं असं की एका वाद्यवृंद स्पर्धेत शेफरला उतरायचं होतं. ‘व्हिपलेश’ ही सदाबहार धून वाजवायची होती. स्वत: फ्लेचर वाद्यवृंद लीड करणार होता; पण कोअर ड्रमर टॅनरनं दिलेले चार्टस अँड्य्रूनं चक्‍क हरवले. टॅनर बाद झाला. ‘मी स्मरणानं ‘व्हिपलॅश’ वाजवीन’ अशी हमी अँड्य्रून दिली. आणि त्यानं दगा दिला नाही. तो कोअर ड्रमर झाला.
एक दिवस फ्लेचरनं कॉनोली नावाचा आणखी एक ड्रमर आणला. कॉनोली हा खरं तर अँड्य्रूच्या जवळपाससुद्धा नव्हता; पण फ्लेचरनं मुद्दाम त्याचे लाड करायला सुरवात केली. अँड्य्रूनं फ्लेचरशी वाद घातला.
‘‘वेल, इफ यू वाँट इट. अर्न इट!’’ फ्लेचर बरळला.
 
दिवस-रात्र रियाज. बर्फाच्या पाण्यात हात बुडवायचे. ड्रमकिटला हात घालायचा. बोटातून रक्‍त ड्रमवर ठिबकायचं. पुन्हा हात बर्फात. बॅंडएडच्या पट्ट्या. असं करत अखेर अँड्य्रू कार्यक्रमाला निघाला; पण दुर्दैव...त्याची बस बंद पडली. त्यानं जवळच्या ‘रेंटल’ मधून कार भाड्यानं उचलली आणि तो भरधाव निघाला. वेळेत पोचल्यावर त्याच्या लक्षात आलं, ड्रमकिट (स्टिक्‍स) भाड्याच्या मोटारीतच राहिल्या. तो पुन्हा गेला. या वेळी कार घेऊन परत येत असतानाच त्याला जबरदस्त अपघात झाला. तरीही तो वेड्यासारखा रक्‍तबंबाळ अवस्थेत कार्यक्रमाच्या हॉलमध्ये पोचला.
फ्लेचरचे डोळे आग ओकत होते.

पण अपघातानं घायाळ झालेल्या अँड्य्रूला हार पत्करावी लागली. त्याचं मन तर जायबंदी होतंच; पण शरीरानंही दगा दिला. संतापानं बेभान होत अँड्य्रूनं अखेर भर रंगमंचावर फ्लेचरची गचांडी धरली. त्याला उलथापालथा केला.
‘‘ ***, यू आर अ पीस ऑफ **!’’
साहजिकच शेफर संगीतशाळेतून अँड्य्रू नीमनला डच्चू मिळाला. दरम्यान त्यानंच नव्याकोऱ्या गर्लफ्रेंडशी संबंध तोडले होते. बडी रिचसारखं ग्रेट होण्याचं त्याचं स्वप्न विझून गेलं होतं.

...शेफर संगीतशाळेतल्या एका वादकानं आत्महत्या केली होती. फ्लेचरच्या छळवादापुढं ते पोरगं मोडून पडलं होतं. तो अपघातात मेल्याचं फ्लेचर खोटंच सांगायचा; पण त्या पोराच्या आई-बापांनी कोर्टात केस केली होती. वडिलांच्या सांगण्यावरून अनामिक राहण्याच्या अटीवर अँड्य्रूनं फ्लेचरविरुद्ध साक्ष दिली. फ्लेचरलाही शेफर संगीतशाळेतून काढून टाकण्यात आलं.
 
ड्रमकिट गंजत पडलेलं. अँड्य्रू एका रेस्तरांमध्ये छोटीशी नोकरी करू लागला होता. गुणी पोरगं वाया जाताना त्याचे वडील हताशपणे बघत होते. तेवढ्यात अँड्य्रूला त्याच्या गावातच टेरेन्स फ्लेचरचा कार्यक्रम असल्याचं कळलं. छे, फ्लेचर त्याला भेटलासुद्धा. गोड बोलला. दोस्तासारखी विचारपूस केली. ‘‘मी छळत नाही रे. तुम्हा लोकांनी तुमचीच मर्यादा ओलांडावी, असं मला वाटत असतं. मी ढकलत असतो नुसतं तुम्हाला. माझे मार्ग चुकत असतील; पण...ग्रेट कलावंत असे हवेतून जन्माला येत नाहीत. टोक गाठावं लागतं त्याला...शरीर-मनानं असं टोक गाठलं की आयुष्यातला बेस्ट सोलो परफॉर्मन्स देता येतो. अन्यथा नाही...’’ ग्लास ओठाला लावत फ्लेचर सलगीनं सांगत होता. अँड्य्रू झराझरा निवळत गेला.

‘‘ जेव्हीसीची जॅझ स्पर्धा आहे. माझ्याकडे तगडा ड्रमर नाही. ‘व्हिपलॅश’ आणि ‘कॅराव्हान’ हे दोन्ही टाइम चार्टस पेश करायचा इरादा आहे. येतोस?’’ फ्लेचरनं त्याला गळ घातली. अँड्य्रूला पुन्हा धुमारे फुटले.  ...भरगच्च सभागार. शांत. वातानुकूलित. मंद दिव्यांनी मिणमिणणारा रंगमंच. त्यावर नव्या उमेदीनं वाद्यवृंदासह बसलेला ड्रमर अँड्य्रू नीमन. इतक्‍यात लीड करणारा फ्लेचर त्याच्या जवळ आला.
‘‘माझ्याविरुद्ध साक्ष तूच दिली होतीस. मी *** वाटलो का तुला? आता चारचौघांत तुझी काय हालत करतो बघ!’’ फ्लेचरच्या धमकीनं अँड्य्रूच्या काळजाचं पाणी पाणी झालं. फ्लेचरनं क्षणाचाही वेळ न दवडता तिसऱ्याच, अपरिचित अशा सुरावटीची घोषणा केली. त्यातलं अक्षरही अँड्य्रूला ठाऊन नव्हतं. तो उघडा पडला.
विंगेत त्याचे वडील उभे होते. ते त्याला म्हणाले ः ‘‘चल घरी जाऊ. तो तुला जगू देणार नाही.’’
पण अँड्य्रूमध्ये कसला तरी संचार झाला. ताडताड पावलं टाकत तो थेट रंगमंचावर गेला. ड्रम्सवरती हात टाकले. ‘व्हिपलॅश‘ची अफाट लय सुरू झाली.
...अँड्य्रू नीमनच्या आयुष्यातल्या सगळ्यात बेस्ट सोलो परफॉर्मन्सला सुरवात झाली होती.
 
डॅमियन शॅझलनं हा चित्रपट बनवला २०१४ मध्ये. वर्षभर आधी त्यानं हीच शॉर्ट फिल्म बनवली होती. का? तर पैसेच नव्हते म्हणून. वास्तविक या काळात त्याला ‘ला ला लॅंड’नं साद घातली होती. त्या बेचैन अवस्थेत त्यानं व्हिपलॅश हा लघुपट तयार केला. तो लोकांना इतका आवडला, की त्याचा पूर्ण लांबीचा सिनेमा बनवायला गुंतवणूकदार तयार झाले. अट एकच : सिनेमा १० आठवड्यांत बनवायचा आणि प्रदर्शितही करायचा.’ फक्‍त १९ दिवसांत डॅमियननं चित्रपटाचं शूटिंग उरकलं.
या चित्रपटाला दोन ऑस्कर मिळाली. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचं जे. के. सिमन्सला आणि सर्वोत्कृष्ट ध्वनिलेखनाचं.

जे. के. सिमन्सनं साकारलेला खत्रूड टेरेन्स फ्लेचर अफलातूनच आहे. पराकोटीची संगीतनिष्ठा आणि क्रौर्य याची त्यानं अशी काही सांगड घातली आहे, की तिला तोड नाही. आख्ख्या चित्रपटात सिमन्सनं एकही वाद्य वाजवलेलं नाही. त्यानं वाद्यवृंद लीड मात्र मस्तच केलाय. हाताच्या खुणा करत विविध वादकांना अचूक वाहत नेण्याचं काम हा संचालक करत असतो. त्याची नजरही बोलत असते. हाताची बोटं बोलत असतात. सिमन्सनं इथं जिंकलं आहे. अँड्य्रूचा रोल माइल्स टेलरनं केलाय. तो स्वत: एक चांगला ड्रमर आहेच. इतका की शूटिंगच्या वेळी त्यानं वाजवलेले निम्मे तुकडे कायम ठेवावे लागले. या चित्रपटातले कलाकार हे बरेचसे संगीतक्षेत्रातलेच असल्यानं कुठंही भंपकबाजी नाही. म्हणजे हीरो हिरॉइनकडं बघत पियानो वाजवतोय...बोटं एकीकडं आणि त्याचा मजनू-चेहरा दुसरीकडं असला गंगा-जमनी प्रकार नाही. इथं थेट परफॉर्मन्सची मजा घेता येते.

खुद्द डॅमियन शॅझल हा काही काळ ड्रमर होता. ही कहाणी त्याच्या स्वानुभवाची आहे, असं म्हणता येईल. त्याच्या एका गुरूला तो असाच टरकून असे. याच चित्रपटाच्या काळात त्याला ‘ला ला लॅंड’ खुणावत होता. त्याची चाहूल लागली होती. वयाच्या अवघ्या पस्तिशीच्या जवळ येताना शॅझलला अफाट यश मिळालं आहे. त्याच्या म्युझिकल गुणवत्तेची पहिली पावलंही किती यशवंत होती, हे पाहण्यासाठी ‘व्हिपलॅश’ बघणं आवश्‍यक.
काहीही म्हणा, या ‘भांड्यांच्या दुकानात’ जादू आहे. नुसते टॅटू आणि लांब केस नाहीत. खरंच.

Web Title: pravin tokekar's article in saptarang