शब्दां ‘वाचून’ कळले सारे... (प्रवीण टोकेकर)

शब्दां ‘वाचून’ कळले सारे... (प्रवीण टोकेकर)

अर्धस्फुट वयातल्या प्रेमाची कहाणी सांगणाऱ्या ‘द रीडर’ या चित्रपटानं इतिहास घडवला. अजूनही तो टीव्हीवर अधूनमधून लागतो. जुन्या स्मृती चाळवतो. त्यातल्या काही चित्रपटातल्या असतात, काही वास्तवातल्या. अधेड उमरीतल्या अशा रीतीभातींच्या पल्याडच्या नात्याला भानगड किंवा लफड्याचा दुर्गंध असतो. ‘द रीडर’मधली हॅना मात्र बंद संदुकीत वर्षानुवर्षं ठेवलेल्या कस्तुरीसारखी मंद दरवळत राहते. एखाद्या गुपितासारखी...!

जर्मनीतल्या एका आळसट शहरात, रिपरिप पावसातल्या एका दुखऱ्या दुपारी ते घडलं. वर्ष होतं १९५८. बसमध्ये बसलेल्या १५ वर्षांच्या अधेड उमरीतल्या मायकेल बर्गला पोटातून उन्मळून आलं. धडपडत तो खाली उतरला आणि एका इमारतीच्या प्रवेशद्वाराशीच भडाभडा ओकला. ढग, पाऊस अंधूक झाला. अंगात हुडहुडी भरली. डोळे मिटू लागले. अशा अवस्थेत कुण्या देवदूताचे असावेत, असे दोन हात त्याच्या मदतीला आले. केसांमधून फिरणारे ते हात ऊबदार होते. कोण, कुठला याची चौकशी कानावर पडत होती. मायकेलनं कशीबशी उत्तरं दिली. कोण, कुठली ती...त्या पोक्‍त बाईनं त्याला मायेनं घरी जायला मदत केली. घरी गेल्यावर मायकेल जो अंथरुणाला खिळला, तो तीनेक महिन्यांनीच उठला. टायफॉइड. खंगत जाणाऱ्या मायकेलची शाळा बोंबललीच होती; पण बरं होता होतानाही त्याला ती पोक्‍त बाई आठवायची. किती मायेनं तिनं त्याची ओकारी साफ केली होती...
हिंडू-फिरू लागल्यावर मायकेलनं गुंछाभर फुलं घेतली आणि तिला शोधत शोधत तो त्या इमारतीपाशी आला.
दार उघडंच होतं.
‘‘काय?’’ कपड्यांची आवराआवर करत त्या पोक्‍त बाईनं कोरडेपणानं विचारलं. पस्तिशीची. कदाचित चाळिशीची. कुरळे केस. काहीसे अस्वस्थ डोळे. सरळ जिवणी. एकटीच राहतेय बहुधा. घर अस्ताव्यस्त पसरलं आहे. जेमतेम दीडखणी घर; पण त्याला रया नाही. समोरच आंघोळीचा टब दिसतोय. पाणी बहुधा तळमजल्यावरून आणावं लागतं हिला; पण काहीही असलं तरी बाईत काहीतरी जादू आहे खास.
-मायकेलनं काहीही न बोलता फुलं पुढं केली. ‘ठेव तिथं’ ती म्हणाली. ती बाई ट्राम कंडक्‍टर होती. कामावर निघाली होती. ‘माझ्यासोबत चल’ अशी खूण करून तिनं थोड्या आडोशाला जाऊन कपडे बदलले.

...मायकेल आंतर्बाह्य थरथरला. छातीत धडधड वाढली. चोरट्या नजरेनं तो तिला पाहत होता. तिलाही ते कळलं होतं; पण ती निर्विकारपणे कपडे बदलत राहिली. मायकेलच्या ओठांना कोरड पडली. हाता-पायातलं बळ गेलं. पौगंडाचं हे असंच असतं. नको तिथं आणि नको तेव्हा धडका देतं. सोबत एकटं येत नाही. एक गुन्हेगारी-भावना घेऊन येतं. मायकेल तिथून पळालाच.
नंतर बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा आला!
पण त्या बाईनं त्याला बेमुर्वतपणे घोळात घ्यायला सुरवात केली. पोक्‍त असली तरी तिच्या डोळ्यात एक निमंत्रण आहे. या कोवळ्या पोराचं काय करायचं, याचे आडाखे मांडत असेल का ती? माय गॉड, काय बाई आहे ही. मायकेल कितीही अबोल, कुढ्या, उदास मनोवृत्तीचा असला तरी शरीरानं तरुण होता. पौगंड त्याला अधिकच रांगडं करत होतं. हॉर्मोन्स नावाची गोष्ट भलभलते खेळ करवून घेते. मायकेल मागं हटला नाही.
‘‘तुझं नाव काय?’’ मायकेलनं विचारलं.
‘‘काय?’’
‘‘तुझं नाव’’
‘‘तुला काय करायचंय?’’
‘‘मी तीनदा आलोय इथं. मला तुझं नाव जाणून घ्यायचंय. काय चुकीचं आहे त्यात?’’
‘‘काही नाही, पोरा. काहीही चुकीचं नाही त्यात. माझं नाव हॅना.’’
‘‘तू ना खूप...खूप संशयास्पद दिसतेस.’’
‘‘तुझं नाव काय, पोरा?’’
‘‘मायकेल’’
‘‘हं...मायकेल. सो आय ॲम विथ मायकेल.’’
...इथून पुढं एक सिलसिला सुरू झाला.

मायकेलनं मित्र-मैत्रिणी सोडून दिल्या. अभ्यासातलं त्याचं लक्ष पार उडालं. घरातल्या उदास वातावरणातही तो उमलत गेला. अधेड वयात त्याला स्त्रीचा सहवास न मागता मिळू लागला होता. हॅनाच्या पुढाकारामुळं मायकेलची भीड चेपत गेली. ती त्याला न्हाऊ-माखू घालायची. खाऊ घालायची. त्याचे शाळकरी किस्से मनापासून ऐकायची. त्याला सल्ले द्यायची. पुस्तकांबद्दल तिला कमालीचं आकर्षण होती. त्याच्या हातातली पुस्तकं कसली आहेत? ‘वाचून दाखव’, असं सांगून ती खनपटीला बसे. मग मायकेल तिला गोष्टींची पुस्तकं वाचून दाखवू लागला.
आधी मायकेलचं सगळं कोडकौतुक पुरवायचं. मनाची, शरीराची भूक भागवायची. मग रतिक्‍लांत अवस्थेत मायकेलनं तिला गोष्ट वाचून दाखवायची. तासन्‌तास. दिवसेंदिवस. अंतोन चेखवचं ‘द लेडी विथ द डॉग’, इलियडचं ‘ओडिसी’, ‘ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबरी फिन’... एक दिवस तो ‘लेडी चॅटर्लीज्‌ लव्हर्स’ हे कामुक वर्णनं असलेलं पुस्तक घेऊन आला.

‘‘शी: कुठून आणलंस हे घाणेरडं पुस्तक?’’ बिछान्यावरच तिनं विचारलं.
‘‘ मित्राकडून उसनं आणलंय,’’ तो म्हणाला.
‘‘ शी:..घाण! पण वाच!’’
...महिनोन्‌महिने असंच सुरू होतं.
-मायकेल तिच्यात गुंतू लागला. हे चूक आहे, हे तिलाही कळत होतं. त्यालाही. पण इलाज नव्हता. हे असलं अर्धवट नातं कुठं जात नाही, कुठं येत नाही. इस रिश्‍ते को अंजाम नही होता.
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन
उसे इक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा...
पण हॅनामध्ये ही खूबसूरती नव्हती बहुधा. एक दिवस मायकेल तिच्या घरी गेला. तेव्हा तिनं घर बदललं होतं. ती गायब झाली होती. त्या घरातून आणि मायकेलच्या आयुष्यातूनसुद्धा.
* * *

साताठ वर्षांनंतर हायडलबर्गमधल्या लॉ स्कूलमध्ये विद्यार्थी मायकेल बर्ग याला एक प्रॅक्‍टिकल असाइनमेंट मिळाली. संपूर्ण वर्गानं एका केसची सुनावणी ऐकायची. नोट्‌स घ्यायच्या. कोर्टात खटला उभा राहिला होता. नाझी राजवटीच्या काळात ऑऊसविट्‌झ यातनातळावरच्या काही नाझी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आरोपी म्हणून उभं करण्यात आलं होतं. त्या यातनातळावर किमान ३०० जणांचे अमानुष बळी घेतले गेले, असा गंभीर आरोप होता. तिथल्या एका चर्चमध्ये आसरा घेतलेल्या ३०० जणांना बॉम्बिंगच्या काळात पळू न दिल्यानं त्यांचे हकनाक बळी गेले. या हत्यांची अंमलबजावणी करण्यात हॅना श्‍मिट्‌झ ही नर्स आघाडीवर होती.
कोर्टरूममध्ये मायकेलला धक्‍काच बसला. आरोपीच्या पिंजऱ्यात चक्‍क हॅना बसलेली होती.
‘‘ या बळींची निवड तू केलीस?’’ कोर्टानं विचारलं. तिनं मूकपणे मान हलवली.
‘‘या आज्ञेच्या कागदावरचं हस्ताक्षर तुझं आहे?’’ कोर्टानं पुन्हा विचारलं.
आणि हॅना चक्‍क ‘हो’ म्हणाली. कोर्टात शांतता पसरली. गुन्हा शाबित होऊन हॅनाला जन्मठेपेची शिक्षा झाली.
हॅनाचं हस्ताक्षर? ‘या बाईला एक अक्षरही लिहिता-वाचता येत नाही. ती निरक्षर आहे,’ असं मायकेलला भर कोर्टात ओरडून सांगायचं होतं; पण तशी सोय नव्हती. केवळ आपण अनपढ, गंवार आहोत, हे जगाला कळू नये, म्हणून खोटं बोलून ही मूर्ख बाई फासावर निघाली आहे? मायकेलच्या जिवाची तगमग झाली. त्यानं प्राध्यापक रोहल यांच्या कानावर हा प्रकार घातला; पण मायकेलच्या साक्षीला काहीही किंमत नव्हती. नाझी गुन्हेगार हा विनाविलंब लटकायलाच हवा, असं जनमत जगभर तयार झालं होतं.
आणखी काही वर्षं गेली...
अस्वस्थ मायकेलचं लग्न झालं. त्याला एक मुलगी झाली; पण तो या संसारात मनापासून कधी रमला नाही. हॅना त्याच्या मनातून कधी हटलीच नाही. आयुष्यभर ते त्याचं एक गुपित राहिलं. मात्र, मधल्या काळात त्यानं एक उद्योग गपचूप केला. उत्तमोत्तम पुस्तकं मोठ्यांदा वाचायची. ती टेपरेकॉर्डरवर घ्यायची. त्या कॅसेट तुरुंगात हॅनाला पाठवायच्या.

हॅनानंही कमाल केली. त्या कॅसेटचा वापर करून तिनं तुरुंगातल्या लायब्ररीतली पुस्तकं शोधली आणि कुणाचीही मदत न घेता ती ‘रटफ’ करत लिहायला, वाचायला शिकली. वाक्‍य लिहिता येतायंत, हे लक्षात आल्यावर तिनं पहिलं पत्र मायकेल बर्गलाच लिहिलं. मग तिची पत्रं यायची. त्यांना उत्तर म्हणून कथावाचनाच्या कॅसेट तुरुंगात रवाना व्हायच्या...
हे असंच सुरू राहिलं असतं; पण एक दिवस मायकेलला तुरुंगाधिकाऱ्यांचं पत्र आलं. हॅनाचं आता वय झालंय आणि आठ-दहा दिवसांत तिची पॅरोलवर सुटका होईल. तुमच्याशिवाय तिचं दुसरं कुणीही नाही. काही मदत होईल का?
एका अस्वस्थ ढगाळ दुपारी मायकेल तुरुंगात दाखल झाला. कॅंटीनमध्ये त्याला हॅना भेटली. लहानखुरी. केस पिकलेली. थकलेली. डोळ्यांभोवती वर्तुळं. तिनं संयतपणे विचारपूस केली. त्यानंही आपल्या फसलेल्या लग्नाची गोष्ट तिला थोडक्‍यात सांगितली. ‘‘तुझं काय, हॅना?’’ त्यानं अवघडून विचारलं.
‘‘माझं काय? एसएस गार्ड म्हणून नाझींमध्ये भरती झाले तेव्हाही मी काय करणारेय, याचा विचार केलेला नव्हता. आता मी कसलाच विचार करत नाही.
‘‘असं का?’’
‘‘प्रेतं विचार करतात का, पोरा?’’
...मायकेल भेटला त्याच रात्री हॅनानं तिच्या कोठडीत आत्महत्या केली. तिची लाडकी पुस्तकं टेबलावर एकावर एक रचून ठेवली होती. (त्यावर पाय ठेवूनच तिनं फाशी घेतली होती). एका टिनाच्या डब्यात किरकोळ रक्‍कम होती. सोबत मायकेलला चिठ्‌ठी : ‘नाझी अत्याचारांना बळी पडलेल्या कुठल्यातरी कुटुंबाला ही रक्‍कम देऊन टाक. - हॅना.’
तरुणपणी ज्या चर्चपाशी हॅना आणि मायकेल सायकल-रपेटीला गेले होते, त्या चर्चमागंच मायकेलनं हॅनाला चिरविश्रांती दिली. एका अधमुऱ्या नात्याचा हा एक संपूर्णविराम होता.
...हॅना हे एक स्वप्न होतं की स्वप्नदोष? ती एक चवचाल बाई होती की एकाकी पडलेली, हळुवार स्त्री? सखी, स्त्री, बहीण, आई, मावशी अशा कितीतरी भूमिका तिनं एकटीनं आपल्या आयुष्यात बजावल्या. प्रसंगी आपल्याला बेल्टनं मारायलाही ती कमी करायची नाही; पण लाडही तिनंच केले. हॅनामुळं आपल्याला खूप काही मिळालं आहे, याची त्याला कृतज्ञता वाटायची. तारुण्याच्या उंबरठ्यावर पडणारी कोडी हॅनामुळं तिथल्या तिथं सुटली. भावनांचा निचरा होत गेला. मन स्वच्छ, निवळशंख झालं. म्हणून तर आपण एक बऱ्यापैकी कायदेतज्ज्ञ बनू शकलो.
संपूर्ण विचारानंतर मायकेलनं आपल्या तरुण मुलीशी-ज्युलियाशी संपर्क साधला. तिला पॅरिसहून बोलावून घेतलं. ‘बाप म्हणून मी चुकलो,’ हेही कबूल केलं. त्या चर्चपाशी नेऊन त्यानं तिला हॅना श्‍मिट्‌झचं थडगं दाखवलं आणि एक जगावेगळी प्रेमकथा सांगायला सुरवात केली...   
* * *

‘द रीडर’ हा चित्रपट एकदा बघितला की मनातून हटणं कठीण. बर्नहार्ड श्‍लिंक या जर्मन लेखकानं १९९५ मध्ये हे पुस्तक लिहिलं. तेव्हापासून हॅना श्‍मिट्‌झ ही व्यक्‍तिरेखा खरी आहे की काल्पनिक याचीही चर्चा सुरूच आहे. कुणी म्हणतं, इल्से कोच नावाच्या ‘बुचेनवाल्डची हडळ’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या नाझी स्त्री-अधिकाऱ्यावर हॅना बेतलेली आहे. कुणी म्हणतं, बर्नहार्ड श्‍लिंकची ही आत्मकहाणीच आहे. श्‍लिंक यांनी आजवर कुठलाही खुलासा करायला नकार दिला आहे. केट विन्स्लेट या अलौकिक क्षमतेच्या अभिनेत्रीनं साकारलेली हॅना श्‍मिट्‌झ इतकी भारावून टाकते, की अस्वस्थ वाटायला लागतं. मध्यमवयीन एकाकी स्त्रीपासून वार्धक्‍यापर्यंतचा तिचा शब्दांसोबत असलेला अडाणी प्रवास प्रेक्षकाला मानसिक थकवाही आणू शकतो. असा संयत आणि समजूतदार अभिनय क्‍वचितच पाहायला मिळतो. म्हणूनच २००८ मध्ये ‘द रीडर’साठी केट विन्स्लेटला एकमुखानं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं ऑस्कर बहाल करण्यात आलं. खरं तर या भूमिकेसाठी तिला शंभरेक ऑस्कर-बाहुल्या द्यायला हरकत नाही. राल्फ फिएन्सनं साकारलेला अस्वस्थ, अबोल, अपराधभावनेनं ओतप्रोत भरलेला मायकेल बर्गदेखील तितकाच प्रभावी आहे. त्याच्यापेक्षाही ग्रेट काम केलं आहे ते डेव्हिड क्रॉस या जर्मन पोरानं. पौगंडवयातला मायकेल बर्ग पेश करण्यासाठी त्यानं सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश भाषा शिकून घेतली. हॅना आणि तरुण मायकेल बर्गची काही तप्त शृंगारदृश्‍यं चित्रपटात आहेत. नंतर कोर्टकज्जांची भानगड नको म्हणून निर्मात्यांनी सगळा चित्रपट शूट करून घेतला आणि हॉट दृश्‍यं त्याच्या १८ व्या वाढदिवसानंतर घेतली गेली.

स्टीफन डाल्ड्री यांनी मूळ कादंबरीत बरेच बदल करून चित्रपट तयार केला. वास्तविक केट विन्स्लेटनं प्रारंभी ‘सॉरी, नो होलोकॉस्ट मूव्हीज’ असं सांगून नकार दिला होता. अँजेलिना जोलीपासून ते निकोल किडमनपर्यंत सगळ्या जणींना विचारून झालं. शेवटी केट विन्स्लेटनंच हा रोल करावा, असं नियतीच्या मनात असावं. सिडनी पोलॉक आणि अँथनी मिंघेला हे दोघं निर्माते या चित्रपटासाठी कितीतरी वर्ष झगडत होते; पण चित्रपट रिलीज होण्यापूर्वी दोघंही या जगात राहिले नाहीत.
चित्रपटानं मात्र इतिहास घडवला. अजूनही तो टीव्हीवर अधूनमधून लागतो. जुन्या स्मृती चाळवतो. त्यातल्या काही चित्रपटातल्या असतात, काही वास्तवातल्या. अधेड उमरीतल्या अशा रीतीभातींच्या पल्याडच्या नात्याला भानगड किंवा लफड्याचा दुर्गंध असतो. ‘द रीडर’ मधली हॅना मात्र बंद संदुकीत वर्षानुवर्षं ठेवलेल्या कस्तुरीसारखी मंदपणे दर्वळत राहते. एखाद्या गुपितासारखी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com