इक राह अकेली सी... (प्रवीण टोकेकर)

इक राह अकेली सी... (प्रवीण टोकेकर)

‘द ग्रीन माइल’ ही बुचकळ्यात टाकणारी कादंबरी आहे आणि चित्रपटही तसाच आहे. काहीसा अधुरा, म्हणूनच सुंदर. मेणबत्तीच्या मर्यादित प्रकाशासारखा. जीव एवढासा; पण भांडण तर अतर्क्‍य काळोखाशी मांडलेलं. हा चित्रपट पाहून झाल्यावर नाही म्हटलं तरी प्रश्‍न पडतोच. विज्ञानाला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. प्रकाशाच्या दायऱ्याबाहेरच्या काळोखात आणखी काय काय दडलेलं असेल?

उ  काड्याच्या दिवसांत नेहमीसारखे दिवे जातात. दिवे गेले की अंधारात काड्यापेटी टटोलत मेणबत्ती लावायची. वाऱ्याचा पत्ता नसतो. मेणबत्तीची ज्योत ताठ उभी राहत निश्‍चल जळत राहते. पोपडे गेलेल्या भिंतीवरची आपलीच सावली एकलकोंडी वाटू लागते. मेणबत्तीची छोटीशी ज्योत साथ देतेय...बाकी सगळा अंगावर येणारा अंधार. त्या इवल्याश्‍या ज्योतीनं एकटीनं खोलीचा कोपरा उजळला आहे. अंधाराचं जाळं हटवलं आहे. तिच्या उजेडाच्या दायऱ्यातली हरेक वस्तू ती स्पष्टपणे दाखवते. मूकपणे सांगते ः ‘मी आहे.’ त्यापलीकडल्या परिघात मात्र अंधाराचं साम्राज्य आहे. त्या अंधारात काय दडलंय, ते ती चिमुकली ज्योत दाखवू शकत नाही. ते तिच्या ताकदीच्या बाहेरचंच आहे.

अंधारात दडलेल्या अनेक गोष्टींचं आपल्याला ज्ञान नसतं; पण म्हणून त्यांचं अस्तित्व नाकारण्यात काही पॉइंट नाही. मुळात त्या दिसत नसल्या तरी तिथं आहेत, ही भयभावना तरी उजेडातलीच आहे नं? अज्ञाताचं भय ही अशी चिरंतन गोष्ट आहे.
खरंच चमत्कार घडतात का? अतिंद्रिय असं काही खरंच मौजूद असतं का?
‘द ग्रीन माइल’ हा चित्रपट त्या अंधारातल्या मेणबत्तीसारखा आहे. कोपऱ्यापुरता प्रकाश पाडून भिंतीवरच्या सावल्या दाखवत आसपासचा अंधार आणखी गडद करणऱ्या मेणबत्तीसारखा. माणसाच्या आयुष्यात किती अमर्याद शक्‍यता दडलेल्या आहेत, याची चुणूक दाखवणारा. नवं सहस्रक उलटण्याच्या काळात, म्हंजे साधारणत: अठरा वर्षांपूर्वी हा सिनेमा आला होता. तेव्हापासून अतिंद्रिय असं काही पाहिलं, ऐकलं की हमखास हा सिनेमा आठवतो. यात हॉरर असं काहीही नाही. हा काही पिशाच्चपट नाही; पण तरीही त्याचा परिणाम दीर्घ आणि खोल होतो.
* * *

पॉल एजकॉम्ब धडपडत खुर्चीवरून उठला. वास्तविक समोर फ्रेड अस्टेअरचा सिनेमा चालू होता. झक्‍कास गाणं सुरू होतं; पण पॉलला ते सहन झालं नाही. त्याच्या पाठोपाठ म्हातारी एलेनसुद्धा उठली.
पॉल एका वृद्धाश्रमात राहतो. खरंतर त्यांच्या आयुष्याची तिन्हीसांजही कधीच उलटून गेली आहे.
‘‘मी कधी काळी एका तुरुंगात अधिकारी होतो, हे सांगितलंय ना मी तुला एलेन?
‘‘मी तुझी मैत्रीण आहे, पॉल. सांगून टाक.’’
‘‘वेल्‌, १९३५ हे वर्ष माझ्यासाठी विलक्षण चमत्कारिक ठरलं. तेव्हा पडलेली कोडी अजूनही सुटत नाहीत...’’ आणि पॉल एजकॉम्ब आपली गोष्ट सांगू लागतो...
* * *

लुइझियानातल्या तुरुंगात पॉल हा एक गार्ड आहे. फाशीगेटात त्याची ड्यूटी आहे. फाशी झालेले कैदी इथं काही काळ ठेवले जातात. मरणाची तारीख ठरली की इथूनच त्यांना विजेच्या खुर्चीकडं नेलं जातं. इथले बहुतेक कैदी हे खुनीच असतात. विकृत. मरायच्याच लायकीचे. या फाशीगेटाला ‘द ग्रीन माइल’ असं नाव पडून गेलं आहे. खास असं काही कारण नाही. इथल्या फरश्‍या हिरवट रंगाच्या आहेत, एवढंच. ‘ग्रीन माइल’मध्ये एखादा गुन्हेगार आला, की तो शेवटची वाटचाल मृत्यूकडंच करणार. अन्य तुरुंगात याला ‘लास्ट माइल’ किंवा ‘अखेरचा मैल’ म्हटलं जातं. इथं फक्‍त तो ग्रीन आहे.

जॉन कॉफी नावाचा एक खुनी इसम इथं राहून गेला, तेव्हापासून पॉल एजकॉम्बचं आयुष्य पार उलटंपालटं होत गेलं.
जॉन कॉफीनं दोन कोवळ्या पोरींवर अमानुष बलात्कार करून त्यांना मारून टाकलं, असा आरोप पुराव्यानिशी सिद्ध झालाय. किंबहुना, दोन्ही मेलेल्या, रक्‍तबंबाळ पोरींच्या मृतदेहांपाशीच त्याला अटक झाली. पुढं खटला उभा राहिला. विजेची खुर्ची अटळच होती.
जॉन कॉफी सात फुटांचा, सव्वादोनशे पौंडांचा अजस्र काळा राक्षस आहे. त्याला हातकड्या घालून नेणारे तुरुंगाचे हवालदार विनोदी दिसतात, एवढा अफाट.
पण पॉल एजकॉम्बला त्याचं निर्व्याज हसू बघून आश्‍चर्यच वाटलं. जॉन कॉफी चक्‍क लहान मुलासारखा निरागस होता. इतका निर्भेळ पोरबुद्धीचा माणूस खुनी? त्याला विचारलं तर तो भाबड्या, रांगड्या सुरात म्हणतो ः ‘‘मी मारलं नाही. मी मदत करत होतो. आय वॉज ट्राइंग टू टेक इट बॅक...’’

काय परत घेत होता हा? कसली मदत करत होता? काहीतरी बरळतो लेकाचा. ज्याअर्थी त्याचा गुन्हा पुराव्यानिशी शाबित झाला आहे, त्याअर्थी तो खुनी असलाच पाहिजे. नुसताच खुनी नव्हे, तर विकृतही. पॉलनं त्याच्या मनातले विचार झटकले.
‘ग्रीन माइल’मधले दिवस असेच चाललेले असताना एक दिवस तिथं एक उंदीर दिसला. धीट होता. तो पहारेकऱ्यांच्या टेबलाशी येऊन बसायचा. धिटुकलाच होता. अडगळीच्या खोलीत त्यानं बीळ केलं असावं. तुरुंगातला सगळ्यात स्वतंत्र जीव! एका गार्डनं तर त्याला दत्तक घेतलंय. त्याचं बारसं केलं ः मि. जिंगल्स.
‘ग्रीन माइल’मध्ये तशी शांतता असते. एखादा आकांत करणारा कैदी सोडला तर शांततेचा भंग सहसा होत नाही; पण असल्या कैद्यांच्या दु:खाकडं कोण लक्ष द्यायला बसलंय? सबब, फावला वेळ खूप. साहजिकच मि. जिंगल्सनं तिथल्या कर्मचाऱ्यांना लळा लावला. टेबलावर चढून पुढ्यात टाकलेला मक्‍याचा पाव खायला तो शिकला. धिटाई जबर्दस्तच. पाय आपटला तर आश्‍चर्यानं वर बघायचा. अगदीच टरकली तर तुरूतुरू पळून अडगळीच्या खोलीत गडप व्हायचा. त्याचा राग येणारेही होतेच; पण त्यांना शोध घेऊनही तो कधी सापडला नाही.
एक दिवस, पर्सीच्या बेदरकार बुटाखाली येऊन ते उंदरू निर्जीव होऊन पडलं. पॉलसकट सगळे हळहळले.
‘‘बॉस, त्याला हिकडं देता का? मी बघू?’’ जॉन कॉफीच्या कोठडीतून आवाज आला.
जॉन कॉफीनं त्या चिमुकल्याला कुरवाळलं. डोळे मिटले. वेदनांनी त्याचा चेहरा पिळवटला. तोंडातून काहीतरी काळ्या ठिणग्यांसारखं, घोंघावणाऱ्या माश्‍यांसारखं बाहेर पडलं. उंदरात अचानक जान आली! तुरूतुरू धावत तो पळालाच.
आणखी एकदा असंच घडलं...

पॉल एजकॉम्बला त्या दिवसांत मूत्रमार्गाचं इन्फेक्‍शन झालं होतं. जाम कळा मारायच्या. कसातरी सहन करत तो दिवस ढकलत होता. एक दिवस कॉफीनं त्याला जवळ बोलावून गपकन्‌ त्याचं इन्फेक्‍शन पकडून ठेवलं. पुन्हा तेच. डोळे मिटणं. वेदनांनी पिळवटलेला चेहरा. तोंडातून माश्‍यांसारखे काळे भपकारे. त्या क्षणापासून पॉल चक्‍क खडखडीत बरा झाला.
तुरुंगाचा वॉर्डन हाल मूर्स तसा भला माणूस होता. नियमांबरहुकूम पावलं टाकणारा. पापभीरू. त्याच्या बायकोच्या मेंदूत लिंबाएवढा ट्यूमर आहे, हे क्ष-किरण चाचणीत कळलं होतं. काही दिवसांची सोबती असलेली बायको पलंगावर खंगून खंगून मरत होती. पॉल एजकॉम्बच्या डोक्‍यात भयंकर कल्पना आली.
जॉन कॉफीमध्ये काहीतरी ‘हीलिंग’ची इल्लम आहे. त्याचा उपयोग झाला तर? त्याला गाडीत घालून वॉर्डनच्या बंगल्यावर न्यायचं. बघू या काय होतं ते.
सहकाऱ्यांनी त्याला उडवून लावलं. एवढा दांडगट खुनी पळूनबिळून गेला तर कितीला पडेल हे प्रकरण? नकोच ते. वॉर्डनही नाही म्हणाला. पण सगळे उपचार थकले की माणूस चमत्काराची वाट पाहू लागतो. देवासमोर हात जोडतो. अंगारे-धुपारे करतो. जेलच्या वॉर्डनचं असंच झालं होतं.

त्या चांदण्या रात्री एका टेम्पोत घालून जॉन कॉफीला वॉर्डनच्या बंगल्यावर नेण्यात आलं. टिपूर चांदणं पडलं होतं.
‘‘हे पॉल, ती बघ कॅसी! खुर्चीत कशी एकटी बसल्येय!’’ तारकांनी खच्चून भरलेल्या आकाशाकडं बोट दाखवत कॉफी म्हणाला. कॅसिओपिया म्हणजे शर्मिष्ठा नक्षत्राकडं तो पाहत होता. कुणीही काही बोललं नाही.
वॉर्डन हाल मूर्सच्या घरात पहिल्या मजल्यावरच्या बेडरूममध्ये तेच घडलं, जे पॉलनं आधी अनुभवलं होतं.
अर्धवट बेशुद्धीतल्या मेलिंडाचा हात हातात घेत जॉन कॉफी राक्षसासारखा आ वासून वाकला. चराचरात दडून राहिलेलं काहीतरी खडबडून जागं झालं. आसमंत हादरला. जॉन कॉफीच्या डोळ्यात उभ्या जन्माची वेदना साकळली. मेलिंडाच्या मरणोन्मुख कुडीतून काळ्या माश्‍यांचे थवे घोंघावत जॉन कॉफीच्या घशात शिरले. हडकलेली मेलिंडा काही काळातच पुन्हा किंचित टवटवीत दिसू लागली. वाळक्‍या फांदीत पुन्हा जान भरून तिला पानं फुटावीत, फुलांचे घोस लागावेत, तसं काहीतरी घडलं.
जॉन कॉफी प्रचंड खोकत होता. बराच वेळ त्यानं मेलिंडाचा तो रोग, तिचं दुर्भाग्य आपल्या पोटात ठेवलं. पचवलं.

‘‘बॉस, मी गेल्यावर मि. जिंगल्सकडं बघशील?’’ जॉन कॉफीनं ममतेनं त्या उंदराकडं पाहत पॉल एजकॉम्बला विचारलं. पॉलनं मान डोलावली.
‘‘बॉस, लोक एकमेकांशी हिडीस वागतात. त्यानं मी कंटाळलोय. खूप वेदना आहेत या जगात. त्यांना तोंड देता देता मी साफ कोलमडलोय. मेंदूत काचेचा तुकडा घुसावा, तसं काहीतरी मला सतत जाणवत असतं...’’ रडत रडत जॉन कॉफी म्हणाला. पॉल एजकॉम्ब मुळापासून हादरून गेला. कॉफी निर्दोष होता. त्या मुलींची जान वाचवण्याच्या नादात सापडला आणि अडकवला गेला, हे सत्य त्याला कळलंय; पण आता खूप खूप उशीर झाला आहे. तारीख ठरली. जॉन कॉफीला मृत्युदंडाची शिक्षा देताना बघणं पॉलला शक्‍यच नव्हतं. एका विशेष नातेबंधानं तुरुंगातले कर्मचारी जॉन कॉफीशी बांधले गेले होते. त्यांच्यात जे काही निर्माण झालं होतं, ते कमालीचं सुंदर, चिरंतन आणि बेदाग होतं. जॉन कॉफी विजेच्या खुर्चीकडं शांतपणे गेला. आख्खा ‘ग्रीन माइल’ उत्सुकतेनं चालत आपणहून गेला; पण पॉल एजकॉम्बच्या आयुष्यातून तो कधीच गेला नाही.
* * *

पॉलची गोष्ट संपली.‘‘क्‍वाइट अ स्टोरी...’’ एलेन म्हणाली. तिचा अर्थातच विश्‍वास बसला नव्हता. पॉलनं अखेर तिला खुणावलं. तो जवळच असलेल्या एका रानातल्या खोपटात तिला घेऊन गेला. तिथं सिगार ठेवण्याचं एक खोकं होतं. खोक्‍यात मि. जिंगल्स टुकटुकत बघत होता. एलेन थक्‍क होऊन बघत राहिली. पॉलनं जॉन कॉफीला दिलेला शब्द पाळला होता.
‘‘ जॉन कॉफीनं मि. जिंगल्सला जीवनाचा संसर्ग दिलाय. तो मरणार नाही...’’ पॉल स्वत:शीच बोलल्यासारखं म्हणाला. पुढे तो जे म्हणाला, ते तर थोर होतं : ‘‘एलेन, मी आज १०८ वर्षांचा आहे. माझ्या सग्या-सोयऱ्यांचे मृत्यू पाहत जगतो आहे. हा शाप आहे की वरदान हे सांगणं कठीण आहे. मरण कुणाला चुकत नाही. ते अटळ असतं आणि कधीतरी येतंच; पण माझ्यासारख्या काही बंदिवानांना हा ‘ग्रीन माइल’ खूप लांबलचक वाटतो...’’
* * *

‘शॉशॅंक रिडिम्प्शन’ हा बेजोड चित्रपट ज्यानं केला, त्याच दिग्दर्शक फ्रॅंक डॅराबाँटनं ख्यातनाम लेखक स्टीफन किंग यांची आणखी एक कादंबरी उचलून रुपेरी पडद्यावर आणली, तो चित्रपट म्हणजे हा ‘द ग्रीन माइल’. ‘शॉशॅंक’मध्ये अँण्ड्य्रू ड्रुफेनचं मध्यवर्ती पात्र साकारण्यासाठी तेव्हा टॉम हॅंक्‍स उपलब्ध झाला नव्हता. ‘द ग्रीन माइल’मधल्या पॉल एजकॉम्बला टॉम हॅंक्‍सनं अक्षरश: अजरामर केलं.

‘हा आपला सगळ्यात आवडता चित्रपट आहे,’ असं टॉम स्वतः सांगतो. स्टीफन किंग यांच्या मते, हे त्यांच्या कादंबरीचं सगळ्यात चांगलं आणि प्रामाणिक रुपेरी स्वरूप आहे. यातली जॉन कॉफीची अफलातून व्यक्‍तिरेखा साकारली आहे मायकेल क्‍लार्क डंकन या अवाढव्य अभिनेत्यानं. राक्षसासारखा दिसणारा आणि लहान मुलासारखा निर्व्याज, स्वत:मधल्या अतिंद्रिय शक्‍तींबद्दल कमालीचा निरिच्छ अशा तिहेरी छटांचा त्यानं घडवलेला मिलाफ हा शतकाशतकातून अभावानंच पाहायला मिळतो. ब्रुस विलिससारख्या सुपरस्टारनं शब्द टाकल्यानं मायकेलची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली आणि त्याची निवड झाली. आजही मायकेल क्‍लार्क डंकन म्हटलं की जॉन कॉफीच आठवतो. या भूमिकेसाठी त्याला ऑस्कर नामांकनही मिळालं होतं. पाच वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्‍यानं डंकन अकाली गेला. स्टीफन किंग यांनी ‘द ग्रीन माइल’ ही कादंबरी १९९५ मध्ये सहा भागांत लिहिली. शंभर-शंभर पानांच्या पुस्तकांची मालिका म्हणा हवं तर. एकच एक कादंबरी लिहिली तर लोक शेवटची पानं चाळून रहस्यस्फोट करून घेऊन पुस्तक फेकून देतात, ही त्यांची तक्रार होती म्हणून त्यांनी हा ‘कादंबरीमालिके’चा मार्ग स्वीकारला होता. अर्थात लोकांनी ‘द ग्रीन माइल’सुद्धा डोक्‍यावर घेतली.

‘द ग्रीन माइल’ ही बुचकळ्यात टाकणारी कादंबरी आहे आणि चित्रपटही तसाच आहे. काहीसा अधुरा, म्हणूनच सुंदर. मेणबत्तीच्या मर्यादित प्रकाशासारखा. जीव एवढासा; पण भांडण तर अतर्क्‍य काळोखाशी मांडलेलं. हा चित्रपट पाहून झाल्यावर, नाही म्हटलं तरी, प्रश्‍न पडतोच. विज्ञानाला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. प्रकाशाच्या दायऱ्याबाहेरच्या काळोखात आणखी काय काय दडलेलं असेल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com