कोसळे दरीत पुलाचा डोलारा... (प्रवीण टोकेकर)

कोसळे दरीत पुलाचा डोलारा... (प्रवीण टोकेकर)

शत्रूसाठी एक ब्रिटिश सैनिक पूल बांधतो आहे...तोच पूल उडवण्यासाठी दुसरा ब्रिटिश सैनिक जीव पणाला लावतो आहे, असा तिढा निर्माण झाला. यात कोण जिंकलं? पूल शेवटी कुणी उडवला? ब्रिटिश इमान कसं जिंकलं? याची कहाणी ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्‍वाय’च्या क्‍लायमॅक्‍सला अशी काही उलगडत जाते की सलाम ठोकावासा वाटतो.

हवेत पेटला सूडाचा धुमारा
कोसळे दरीत पुलाचा डोलारा
उठला क्षणार्ध भयाण आक्रोश
कापले जंगल, कापले आकाश
उलटीपालटी होऊन गाडी ती
हजार शकले पडली खालती...

...कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘आगगाडी आणि जमीन’ या कवितेतल्या या अजरामर ओळी. एखादं चित्र किंवा चित्रपटातलं दृश्‍य रसिकाच्या मनात आपापत: जन्माला घालणाऱ्या. खूप वर्षांपूर्वी ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्‍वाय’ हा अलौकिक युद्धपट बघताना ते तसंच्या तसं साकार झालेलं बघून मन विस्मित झालं होतं. ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्‍वाय’सारखे चित्रपट शतकातून एखाद्‌-दुसरेच बनत असतात. सर्वार्थानं ‘एपिक’ हे बिरुद मिरवणारे अगदीच मोजके चित्रपट आजवर निघाले, त्यातली ही अगदी बिनीची कलाकृती. ‘क्‍लासिक्‍स’ची यादी करायला घेतली तर हा चित्रपट ओलांडून जाता येणार नाही. युद्धकैद्यांनीच चिकाटीनं बांधलेला एक पूल युद्धाच्या डावपेचाचा एक कळीचा मुद्दा ठरतो. ज्यांनी तो मेहनतीनं बांधला, तेच तो पूल उद्‌ध्वस्त करण्याच्या कामात खर्ची पडतात, असा सर्वसाधारण कथाभाग; पण हा चित्रपट इतक्‍या ढोबळ पद्धतीनं वर्णिता येणार नाही. युद्धधर्म म्हंजे काय, याचा बेजोड वस्तुपाठ ठरलेला हा चित्रपट आजही जगभरातल्या सैन्यदलांमध्ये आवडीनं दाखवला-पाहिला जातो. त्यातून साधता येणारा मूल्यसंस्कार शेकडो तासांच्या रपेटीनंही कदाचित साधता येणार नाही म्हणून! वास्तविक ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्‍वाय’चं कथानक काल्पनिक आहे. महायुद्धाच्या काळात तसे पूल प्रत्यक्षात बांधलेही गेले आणि पाडलेही गेले; पण ते वेगवेगळ्या परिस्थितीत. तशी कारस्थानं जरूर रचली गेली; पण ती कागदावर. मात्र, ज्या महायुद्धकालीन पार्श्‍वभूमीवर हे काल्पनिक कथानक कलम करण्यात आलं, ती मात्र शंभर टक्‍के अचूक होती. कारण, या कथेचा लेखकच मुळी तिथला एकेकाळचा युद्धकैदी होता!
* * *

पार्श्‍वभूमी थोडक्‍यात अशी : १९४२-४३ चा सुमार असेल. दुसरं महायुद्ध निर्णायक टप्प्यावर आलं होतं. बर्मामधून (नंतर ब्रह्मदेश, आता म्यानमार) जपान्यांनी दोस्तांची पळता भुई थोडी करत रंगून (आता यांगून) ते बॅंकॉकचा संपूर्ण पट्टा व्यापला होता. चिन्यांनीही माघार घेतली होती. मुदलात शेजारच्या हिंदुस्थानात तेव्हा ब्रिटिशांची राजवट असली तरी ‘चले जाव’च्या आरोळ्यांनी बंगाल आणि बिहार तापलेला होता. ‘जर्मन फर्स्ट’ हे दोस्तांच्या सैन्याचं धोरण असल्यानं जपान्यांचा समाचार घेणं तितकंसं अग्रक्रमाचं नव्हतं. शिवाय बर्माचा भूभाग ‘निबिड’ हा शब्द तोकडा ठरावा, अशा अरण्यानं व्यापलेला. साहजिकच तिथं दोस्तांच्या फौजांची कोंडी झाली.

...आणि अशा परिस्थितीत ब्रिटिश लेफ्टनंट कर्नल निकल्सन आणि त्यांची पलटण अलगद जपान्यांच्या हातात सापडली. युद्धकैद्याचं जिणं नशिबी आलं; पण त्या पराकोटीच्या क्रूर बंदीकाळातही या ब्रिटिश अधिकाऱ्याचा पीळ काही सुटला नव्हता. नैतिकता, जाज्ज्वल्य देशाभिमान आणि अतूट कार्यनिष्ठा यांचं सुरेख उदाहरण कर्नल निकल्सनच्या रूपानं तिथं खडी फोडत राहिलं...फटके खात राहिलं...टीचभर पिंजऱ्यात अवघडून कैद भोगत राहिलं.

कारण एकच होतं...
जवळच वाहणाऱ्या क्‍वाय नदीवर एक पूल बांधायचा होता. ते काम युद्धकैद्यांनी पुरं करावं, अशी जपानी कर्नल सायतोची प्राणांतिक इच्छा होती. रंगून ते बॅंकॉक हा भाग रेल्वेनं जोडला, तर सगळंच सोईचं होईल, या धोरणात्मक विचारानं जपान्यांनी हा प्रकल्प हाती घेतला होता. तब्बल ९० हजार आशियाई (हिंदुस्थानी समाविष्ट) मजूर आणि सुमारे ६० हजार युद्धकैदी यांना वेठीला धरून जपान्यांनी हे काम हाती घेतलं होतं. त्यातले हजारोजण अर्थात मरण पावले, हे वेगळं सांगायची गरज नसावी. (जॉन कोस्ट या लेखकानं लिहिलेल्या ‘रेलरोड्‌स ऑफ डेथ’ या किताबात त्याचा भयाण तपशील आढळतो).

सगळ्या युद्धकैद्यांनी उद्यापासून बांधकामाच्या ठिकाणी जावं, हा कर्नल सायतोचा फतवा ब्रिटिश लेफ्टनंट कर्नल निकल्सन यांनी साफ धुडकावला. जीनिव्हा करारानुसार अधिकारीवर्गाला अंगमेहनतीच्या कामाला जुंपता येणार नाही, हा नियम त्यांनी कर्नल सायतोच्या तोंडावर फेकला. उत्तरादाखल एक कानसुलात खाल्ली. कर्नल सायतोनं त्यांना दिवसभर उन्हात उभं केलं, उपाशी ठेवलं; पण लेफ्टनंट कर्नल निकल्सन बधले नाहीत.

अखेर कर्नल सायतोनं मग गोड बोलून काम काढायला सुरवात केली. आपण कसे दयाळू आणि कर्तव्यकठोर आहोत, हे तो स्वत:च्या तोंडानं सांगायला लागला. पुलाचं काम ठराविक मुदतीत पूर्ण करणं भाग होतं. तसा कर्नल सायतोला ‘वरून’ दट्ट्या होताच. इथं तर डेडलाइन उलटून जायच्या बेतात. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा कुणाला पत्ता नाही. पुलाचं काम झालं नाही, तर आपल्याला ‘सेप्पुकु’ करायला लागेल, याचीही त्याला कल्पना होती. ‘सेप्पुकु’ ही खास जपानी लष्करी संज्ञा आहे. सेप्पुकु म्हणजे शरण जाण्याऐवजी समारंभपूर्वक स्वत:ला शांतपणे संपवणं. हाराकिरीच.

अखेर रशियाविरुद्धच्या विजयाचा आनंद म्हणून कर्नल सायतोनं निकल्सन आणि त्यांच्या कंपूला एकांतकोठडीतून रिहा केलं. अंगमेहनतीच्या कामातून सूटदेखील दिली. लेफ्टनंट कर्नल निकल्सन मग पुलाच्या कामासाठी राजी झाले.
जपान्यांना आपण ब्रिज बांधून द्यायचा; पण तो कच्चाच बांधून द्यायचा, असाही ब्रिटिशांचा विचार झाला; पण लेफ्टनंट कर्नल निकल्सन यांचं मत वेगळं होतं. हा पूल ब्रिटिशांनी बांधलाच तर पुढच्या पिढ्यांसमोर तो ब्रिटिश बांधकाम, कार्यनिष्ठा आणि नैपुण्याचं उदाहरण म्हणूनच टिकला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. पुलाचं बांधकाम सुरू झालं होतं; पण जपानी अभियंत्यांनी पुलाची निवडलेली जागा साफ चुकलेली आहे, हे निकल्सन यांनी कर्नल सायतोच्या लक्षात आणून दिलं. सायतोनं जागा बदलली.
***

दरम्यान, कर्नल सायतोच्या तुरुंगछावणीतून दोघा-चौघांनी पळ काढण्यात यश मिळवलं होतं. त्यातला एक अमेरिकी होता. त्याचं नाव शीअर्स. स्थानिक बर्मी गावात काही काळ शुश्रूषा करून घेऊन त्यानं थेट एका चिमुकल्या बोटीनं पळ काढला. पळता पळता शुद्ध हरपलेल्या शीअर्सला ब्रिटिश फौजांनी उचललं आणि अमेरिकी अधिकारी म्हणून थेट सिलोनमध्ये (आता श्रीलंका)
कोलंबो इथल्या ब्रिटिश इस्पितळात हलवलं. तिथं एका नर्सशी सूत जुळवून तो राहत होता. ब्रिटिश मेजर वॉर्डन यांनी तिथं त्याला हेरलं. बर्मामधला एक पूल उडवण्याची कामगिरी त्याला देण्यात आली. तोच पूल, जो लेफ्टनंट कर्नल निकल्सन बांधत होते! शीअर्सनं कबुली देऊन टाकली, की तो अमेरिकी अधिकारी वगैरे नसून एका मृत अधिकाऱ्याचा बिल्ला चोरून राहतो आहे. मेजर वॉर्डननी त्याला जाळ्यात ओढून ब्रिटिशांतर्फे पुन्हा बर्मात धाडलं.
...शत्रूसाठी एक ब्रिटिश सैनिक पूल बांधतो आहे. तोच पूल उडवण्यासाठी दुसरा ब्रिटिश सैनिक जीव पणाला लावतो आहे, असा तिढा निर्माण झाला. यात कोण जिंकलं? पूल शेवटी कुणी उडवला? ब्रिटिश इमान कसं जिंकलं? याची कहाणी क्‍लायमॅक्‍सला अशी काही उलगडत जाते की सलाम ठोकावासा वाटतो.
* * *

हा चित्रपट खरं तर सर डेव्हिड लीन यांनी बनवलाच नसता. तेव्हाची आघाडीची अभिनेत्री ऑड्रे हेपबर्ननं त्यांच्यासाठी निर्मात्याकडं शब्द टाकला म्हणून हा चित्रपट झाला तरी! त्या काळात लीनसाहेब जवळपास कफल्लकच होते. हातात काम नव्हतं. आपली सोन्याची सिगारेट केससुद्धा गहाण ठेवण्याची पाळी त्यांच्यावर आलेली. अभिनेत्री ॲन टॉड हिच्याशी घेतलेला घटस्फोट लीनसाहेबांना जबर्दस्त महाग पडलेला होता. अशा स्थितीत जुनी मैत्रीण ऑड्रे धावून आली.

निर्माते सॅम स्पिएगल यांनी लीनसाहेबांच्या हातात एक पुस्तक दिलं. मूळ फ्रेंच कादंबरीचं ते इंग्लिश भाषांतर होतं ः अ ब्रिज ओव्हर द रिव्हर क्‍वाय. लीन यांनाही ही गोष्ट आवडली. ती त्यांना आवडली, याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांच्याकडचे पैसे संपले होते! निर्माते स्पिएगल यांनी लेखक म्हणून मुक्रर केलेल्या कार्ल फोरमन यांना लीनसाहेबांनी प्रथमतः डच्चू दिला आणि मायकेल विल्सन यांना त्यांच्या जागी नेमलं; पण त्यांनाही ते धड जमेना. प्रत्येक वेळी लीनसाहेब किंवा स्पीएगलमहाशय नवे बदल सुचवत होते.

...भरपूर पायपीट केल्यानंतर श्रीलंकेत एका खेडेगावानजीक चित्रीकरण करायचं ठरलं. अडीच लाख डॉलर्स (त्या वेळचे!) खर्चून पूलसुद्धा बांधायला घेण्यात आला. सुप्रसिद्ध लार्सन अँड टूब्रो कंपनीला दोन पूल बांधायचं कंत्राट दिलं गेलं. एक लाकडी आणि दुसरा पोलादाचा. लाकडी पूल उद्‌ध्वस्त झाला; पोलादाचा अजून वापरात आहे. क्‍लायमॅक्‍सच्या दृश्‍यात कुसुमाग्रजांच्या कवितेत वर्णिल्याबरहुकूम पूल आणि आगगाडी खालच्या दरीत कोसळते. या दृश्‍यासाठी जवळपास ४०० किलो डायनामाइट वापरावं लागलं.

...पण पुलाचं बांधकाम सुरू झालं, तोपर्यंत भूमिकासुद्धा ठरल्या नव्हत्या. लेफ्टनंट कर्नल निकल्सन यांची भूमिका करण्यासाठी साक्षात लॉरेन्स ऑलिव्हिए यांना विचारणा करण्यात आली होती; पण तेव्हा ते ‘द प्रिन्स अँड द शो गर्ल’च्या निर्मितीत गुंतले होते. ‘डेव्हिड लीनबरोबर सिलोनच्या जंगलात मच्छर मारण्यापेक्षा इथं मेरलिन मन्‍रोच्या बाहुपाशात प्रणयदृश्‍यं करणं केव्हाही चांगलं’ हे त्यांचे उद्गार गाजलेले आहेत. तेव्हाचा सुपरस्टार स्पेन्सर ट्रॅसीला विचारलं; पण या भूमिकेसाठी आंतर्बाह्य ब्रिटिश अभिनेता असावा, असंच त्याचंही मत पडलं. अखेर विनोदी भूमिकांसाठी लोकप्रिय ठरलेले ॲलेक गिनेस यांची भूमिका पक्‍की झाली. हा त्यांच्या कारकीर्दीतला परमोच्च बिंदू ठरला.

विल्यम होल्डेन हा तेव्हाचा एक महागडा सितारा होता. शीअर्सच्या भूमिकेसाठी त्यानं तीन लाख डॉलर्स आणि नफ्यातले १० टक्‍के वाजवून घेतले; पण भूमिका मस्तच केली. या संपूर्ण चित्रपटात एकही नायिका नाही. प्रणयदृश्‍यं नाहीत. औषधाला थोडंसं शीअर्स आणि नर्सचं एक प्रेमप्रकरण आहे; पण ते अगदीच नगण्य. तगडे कलावंत असूनही नायिका नसलेला हा एक महाचित्रपट ठरला. चित्रपटात सुरवातीला ब्रिटिश युद्धकैदी एक मार्चिंग साँग म्हणतात. हिटलरबद्दलचं एक असभ्य गाणं तेव्हा दोस्तसैन्यामध्ये प्रसिद्ध होतं. तेच वापरावं, असं लीनसाहेबांचं म्हणणं; पण ते फारच अश्‍लील आहे, असं सांगून निर्मात्यानं परवानगी दिली नाही. (तरीही चित्रपटात शिट्टीवर ते वाजलंच आहे!). एका सूर्यास्ताच्या दृश्‍यासाठी लीनसाहेबांनी संपूर्ण युनिटला १५० मैल जंगलात कुदवल्याची एक करुण कथा अजूनही हॉलिवूडमध्ये चघळली जाते. डेव्हिड लीन यांनी या चित्रपटासाठी दीड लाख डॉलर्सची बिदागी घेतली. तीही सुलभ हप्त्यात. करारावर सह्या केल्यावर लागलीच त्यांनी निर्मात्याकडून दोन हजार ॲडव्हान्स घेतला. त्यांच्या दंतवैद्याची उधारी थकली होती!

‘ब्रिज ऑन द रिव्हर क्‍वाय’ १९५७ मध्ये रिलीज झाला. जगभर त्यानं तुफान धंदा केलाच; पण जोडीला सात ऑस्कर पुरस्कारही पटकावले. उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार पिअरी बुले यांना मिळाला. वस्तुत: त्यांना इंग्लिशचा गंधही नव्हता; पण पटकथालेखक कार्ल फोरमन आणि मायकेल विल्सन हे दोघंही कम्युनिस्ट असल्याचा शिक्‍का बसल्यानं भूमिगत होते आणि कम्युनिस्टांवर ऑस्करवाल्यांचाही बहिष्कारच होता. म्हणून निर्मात्यानं कथालेखकाचंच नाव पटकथालेखक म्हणून दाखवलं होतं. अर्थात बुले यांनी पुरस्कार स्वीकारला नाही, तो भाग वेगळा. ‘पटकथालेखनाचं श्रेय विल्सन आणि मला मिळायला हवं,’ असा दिग्दर्शक डेव्हिड लीन यांचा आग्रह नव्हे; हट्‌ट होता. ऐन ऑस्करसोहळ्यात दोघांची चक्‍क हाणामारीही झाली! अखेर या चित्रपटाचं पटकथालेखनाचं ऑस्कर फोरमन-विल्सन द्वयीला मरणोत्तर १९८७ मध्ये जाहीर करण्यात आलं. फोरमन यांचं त्याच्या बरंच आधी निधन झालं होतं आणि पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विल्सन यांची इहलोकीची यात्रा संपली!

वास्तवात हा बहुचर्चित ब्रिज क्‍वाय नदीवर बांधला गेलाच नव्हता. क्‍वाय नदी करंगळीच्या धारेची आहे. तिला समांतर ही रेल्वे जाते. ती ज्या पुलावरून नदी ओलांडते, त्या नदीचं नाव मे क्‍लाँग; पण चित्रपटाचा महिमा असा की थायलंड सरकारनं १९६० मध्ये मे क्‍लाँग नदीचं नाव बदलून तिलाच ‘क्‍वाय’ म्हणून घोषित केलं. आज पर्यटक तिथं जाऊन फोटोबिटो काढून येतात!

...मुळात ब्रिजचं बांधकाम झालंच नाही. त्यामुळं तो पाडण्याचा प्रश्‍नच कधी आला नाही. तरीही तो पूल एक दंतकथा म्हणून अजरामर झाला. केवळ एका चित्रपटामुळं! आणि तो चित्रित झाला श्रीलंकेत. चित्रपटांची ही रंगरंगीली दुनिया काय काय घडवून आणील, कुणाला सांगता येतंय...क्‍वाय?!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com